॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ 4 मुक्काम अहमदनगर 1981

 

                                 

4 मुक्काम अहमदनगर 1981

आंधळी कोशिंबीर खेळतांना ज्याच्यावर राज्य आलं असेल त्याच्या डोळयावर रुमालाची पट्टी बांधून सारे सवंगडी त्याला गोल गोल फिरवत साईऽऽऽसुट्ट्यो म्हणत सोडून देतात तशीच माझ्या डोळ्यावर बदली नावाची रुमालाची घडी बांधून मला हया दाही भुवनसुंदर्‍या गोलगोल फिरवून सोडून देत.

 मधूनच माझ्या आजू बाजूला जवळ येऊन मला आवाज देत माझ्या बाजूबाजूने पळत राहत. स्वतःवर राज्य आलेला जसा मधेच चपळाई करून जवळून पळणार्‍याला पकडतोच आणि कोणाला पकडलं हे पाहण्यासाठी डोळ्यावरील पट्टी मोठ्या कतुहलाने दूर करतो त्याप्रमाणे बदली नावाची माझ्या डोळ्यावरील पट्टी; पहिल्या गावाचं आवरण दूर करत असतांनाच कुठल्या विश्वसुंदरीचा हात मी पकडला आहे हे उत्सुकतेने मी पाहू लागे. आणि अचानक झालेल्या तिच्या दर्शनाने मी विस्मित/ स्तिमित होऊन जात असे. आलटून पालटून त्यांचं होणारं दर्शन, त्यांची होणारी भेट, हसत हसत एकीने सोडून दिलेला हात अलगद दुसरीने हातात घेणं हा हृद्य सोहळा आयुष्यभर चालू राहिला. प्रवीण दीक्षितांच्या बढती सोबत नवीन बदलीचं गोवं कोणतं असेल ह्याची मनातील उत्सुकता असतांनाच दीक्षितांच्या बढती, बदलीचा खलिता आला (1981) आणि with immediate effect  अहमदनगरला Additional SP. म्हणून रुजू होण्याचे आदेश आले. अहमदनगर विशाल जिल्हा आहे.  त्यामुळे तेथे नव्यानेच  Additional SP ची पोस्ट निर्माण केली होती. दीक्षित तेथील पहिले  Additional SP म्हणून चार्ज घेणार होते.( 1981)

 




अहमदनगर हा विशाल जिल्हा आहे. जिल्ह्याचा आडवा उभा पसारा फार मोठा आहे. त्याची उत्तर किनार (अकोले, संगमनेर, कोपरगाव) थेट विपुल पावसाच्या नाशिकला जाऊन भिडली आहे. तर मधूनच ठाण्याशीही सलगी साधून आहे. सहाजिकच जिल्ह्याच्या उत्तरेला नाशिक जि. ला सलगी करणारे अकोले, राजूर, भंडारदरा हे भाग उंचावरील थंड हवेची ठिकाणं आहेत. येथेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईही आहे. पाणी, गायीगुरं, दूध-दुभतं, पीकपाणी ह्यानी समृद्ध, रंधा फॉल, अंब्रेला फॅाल असे अनेक धबधबे असलेला हा भाग्यवान भाग! 

 तर उत्तर पूर्वेच्या बाजूने अहमदनगरच्या नेवासा, शेवगाव तालुक्यांची सीमा औरंगाबाद जिल्ह्याला भिडलेली. मधेच हा जिल्हा औरंगाबादसवे जालन्यालाही बोट लावून येतो की काय असे वाटते.

पूर्वेकडून बिडचा सुळका अहमदनगरमधे घुसलेला. तर दक्षिणेला अहमदनगरचा कर्जत तालुका सोलापूरला, तर जामखेड उस्मानाबादला चिकटलेला. पश्चिमेकडे भिमा नदीची सरहद्द अहमदनगर आणि पुण्याला वेगळं करते. भिमेच्या ऐलथडी श्रीगोंदा, सिद्धटेकचा गणपती तर पैलथडी दौंड. असा 8 जिल्ह्यांना त्याचे गाल चिकटवून बसलेला हा अहमदनगर जिल्हा!

उत्तरेला समृद्ध असलेल्या ह्या जिल्ह्याचे पुणे बीड जिल्ह्यांना चिकटलेले पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुके मात्र अगदीच दुष्काळी भाग होते. पावसाचा सुकाळ ते कायमचा दुष्काळ आणि अति थंड ते उष्ण रखरखीत असा हवामानाचा मोठा स्पेक्ट्रम तिथे दिसे. बीडमधे घुसलेलं अहमदनगरचं दक्षिण टोक म्हणजे कर्जत-जामखेड तालुका. ह्याच तालुक्यातील चौंडी हे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांचं गाव. राहुरीच्या कृषीसंशोधन केद्राने महाराष्ट्रात घडवलेली प्रगती आम्ही प्रत्यक्ष बघत होतो. ज्ञानेश्वर सागर/मुळा धरण आणि त्याच्या सानिध्याने राहुरी शेतकी कॉलेजचा व त्यामुळे राहुरीचा झालेला विकास सुखावणारा असे. पाटाच्या कडेनी लावलेली टप्पोरी काळीभोर गरदार जांभळं, राहुरीची कलिंगडं, खरबुजं, वाळकी, जुनाबार मोसंबी आणि फळं तर श्रीगोंद्यांची लिंब, मोसंबी असा फळांनी समृद्ध जिल्हा असे. श्रीरामपूरचे भरगच्च उसाचे मळे तर त्यासोबत साखरेच्या कारखान्यांमधून दरवळणारा मळीचा वास अनेक माशांना निमंत्रण देणारा असे. शिरूर, शिक्रापूर सारख्या ठिकठिकाणच्या एस. टी च्या थांब्यांवर मिळणारा उसाचा रस लाजवाब असे. राजूर अकोले येथे दुधदुभत्याची मुबलकता असल्याने तेथील पेढे, रबडी यांची कितीही मालामाल  असली तरी नगरमधे मिळणार्‍या दुधाला मात्र फक्त काँग्रेस गवताची कडू चव आणि वास असे. येथील गायीम्हशींनाही काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे गवळी सांगत असे. इतकी चार्‍याची मारामार असे.

  जि.औरंगाबादला लागून असलेल्या ता. नेवासे येथे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते मोहिनीराजाचे मंदिरही येथेच. शनिशिंगणापूर तेव्हा फार थोडक्या लोकांना माहित असे. आम्ही गेलो तर देव आमची वाट बघत पारावच उभा होता. घराच्या दरवाजांना पडदे होते पण दरवाजे नव्हते. रस्तोरस्ती टाकल्या जाणार्‍या केबल्सच्या भल्यामोठ्या रिळांचे लाकडी गोल काही ठिकाणी दरवाजापुढे सरकवले होते. तेव्हा शिर्डीही भक्तांच्या पसंतीच्या देवळांच्या पहिल्या दहात नसेल. पण तेव्हाचे महाराष्ट्राचे गव्हर्नर ओमप्रकाश मेहरा हे वारंवार शिर्डीला भेट देत. त्यानंतर शिर्डीचे भाग्यही खुलले. कळसूबाई सारख्या उंच उंच सुळक्यासोबत हरिश्चंद्रगडसारखा अवघड गडही इथलाच!

पॅकर्स आणि मूव्हर्स आत्ता आले. कासव आपलं सर्व अंग पाहिजे तेंव्हा कवचात ओढून घेतं, त्याप्रमाणे बदली झाली की पसरलेला सर्व संसार कासवाच्या कवचाप्रमाणे बॅगा अपल्या पोटात ओढून घेत. लग्नानंतर आईला `येते गं! ' म्हणून जाण्यासाठी सूटकेस भरली आणि `सूटकेस लाईफ'ला सुरवात झाली. सुटकेस लाईफ हा चकचकीत शब्द मी वापरायचे. आई विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर म्हणायची. माझ्या दोन आणि नवर्‍याच्या दोन अशा चार बॅगांच्या पुढच्या 25 वर्षात 25 बॅगा झाल्या. कधी कधी घर म्हणजे मला बॅगांचा कारखानाच वाटायचा. अख्खा शिवाजीच बसेल इतका मोठा शिवाजीचा मिठाईचा पेटारा, 32 इंची अमेरिकन, 24 इंची युरोपियन, मग 20 इंची , हँडबॅग्स, पाठीवरील सॅक्स, ते पोटाला बांधायच्या छोट्या पोटल्या, चंच्या - -असं घर बॅगमय झालं. पाहिजे ते सामान ठेवायला उपयोगी ह्या व्याख्येपेक्षा नको असलेलं सामान कोंबायला बर्‍या अशी व्याख्या जास्त लागू झाली. कित्येकींमधले अलिबाबाचे खजिने परत उघडून पहायलाही फुरसत मिळाली नाही. किंवा उघडून मांडायला जागा

माझ्या भुवनसुंदर सख्यांशी मैत्री होण्या अगोदर दिशाहीन अशा माझ्या मनाने एकदा मी स्वतःच भुताबाई झाल्याचा अनुभव औरंगाबादला/संभाजीनगरला घेतला होता आता ह्या सख्या मला भुताचा अनुभव यावा म्हणून अहमदनगरला घेऊन आल्या होत्या. प्रवीण दीक्षितांची येथे Additional SP.  म्हणून बदली झाली होती. ही पोस्ट नव्याने तयार केलेली असल्याने प्रवीण दीक्षित अहमदनगरचे पहिलेच अ‍ॅडिशनल एस्. पी. होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्या पोस्टसाठी नेहमी सारखे विशिष्ट घर राखीव नव्हते. पण रिकाम्या असलेल्या घरांची पहाणी करून त्यातील योग्य वाटेल त्या घरात राहण्याची मुभा PWD ने आम्हाला दिली होती. तीन चार घरे पाहिल्यावर मला औरंगाबाद पुणे ह्या हायवे वर असलेला पाच एकराच्या मोकळ्या ढाकळ्या परिसरात असलेला जुन्या काळातला एक भव्य कौलारू बंगला आवडला. ओसाडीत असला तरी थोडी डागडुजी करून, थोडी झाडं लावून सुधारण्यासारखा होता.  बंगल्याच्या मागेच काही खोल्या रांगेत उभ्या होत्या. बंगल्याची आणि बंगल्यात राहाणार्‍यांची काळजी घ्यायला राहणार्‍या नोकरांसाठीच्या त्या खोल्या होत्या.  काही खोल्यांमधे चंद्रकला बाई त्यांच्या कुटुंबासमवेत राहात होत्या. आम्ही बंगला पहायला आलो म्हटल्यावर त्याही धावत आल्या. ``सायेब हा बंगला घेऊ नगा. हा भुताचा बंगला हाय.’’ आम्हाला बंगला दाखवायला आलेले बरोबरचे 10-15 जणं एकदम गप्प झाले. ``बगा म्हनुनतर आतापरयंत येक बी सायब हिथं र्‍हायाला आला नाय.’’  सगळ्यांच्याच चेहर्‍यावर काळजी पसरली. `भुताच्या सहवासात चंद्रकला बाई राहत असतील तर मला रहायला काय हरकत आहे?’ असा साधा सोपा पण बेरकी विचार माझ्या मनात आला आणि मी म्हटलं, ``बरं आहे की! कोणीच सोबतीला नाही म्हणत एकट्याने भुतासारखं राहण्यापेक्षा येथे मला निदान भुताची तरी सोबत असेल.’’ सगळ्यांनाच हसू आलं. पण तरीही प्रवीणसरांनी गंभीर होत अनेक वेळेला मी तेथे एकटीच राहणार असल्याची जाणीव करून देत मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितला. तसेही हे सर्व इंग्रजकालीन बंगले असल्याने शंभरीच्यावर वयाचे होते. येवढ्या वर्षात कोणी ना कोणी त्यात खपणं स्वाभाविकच होतं. मी ठाम होते. दीक्षितांचा जीव भांड्यात पडला असावा. कारण आमचा घराचा शोध संपवून त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू होणं शक्य होणार होतं. बंगल्याभोवती जकरंडाच्या झाडांवर शिल्लक असलेला नीलमोहोर लक्ष वेधून घेत होता. आधीच्या कोणीतरी ही सुंदर झाडं लावली होती. तशी निलगिरीची झाडंही बंगल्यापासून थेट बंगल्याच्या गेटपर्यत दुतर्फा होती.  त्यामुळेच आम्ही बंगल्याला नाव दिलं निलगिरी. पूर्वी सर्व जनसंपर्क हा फक्त पत्रव्यवहारावरच अवलंबून होता. त्यामुळे निनावी बंगल्यात पत्र पोचायला अडचण येऊ नये, मला माहेरची आणि इतरही सर्व पत्र वेळेवर मिळावीत हा बंगल्याला नाव देण्यामागे अजूनही एक उद्देश होता.

बंगल्याबाहेर असलेल्या पाच एकराच्या आवारात अधुन मधून जांभळ्या फुलांची झुडपं अंगोपांग फुलली होती. ओसाडीपेक्षा बरी वाटली डोळ्याला. तेवढीच डोळ्यांना सुखावणारी हिरवाई!  दुसर्‍या दिवशी बंगला पहायला गेलो तेंव्हा डागडुजी सुरू झाली होती. माळी येऊन बाहेरच्या आवारातील सर्व फुलांनी गच्च भरलेली झाडं  मूळापासून खणून काढत होता. बहुतेक झुडपं काढूनही झाली होती. `` अरेरे कशाला काढली ती!’’ न राहवून मी म्हणाले. त्यावर सगळे मलाच हसत म्हणाले, ``वहिनीसाहेब ती झाडं बेशरमीची व्हती. ती अशी घरामंदी लावत न्हाईत. ती गावाबाहेरच्या उकिरड्यावरची झाडं हायेती.’’ पूर्वी माणसाच्या काही जातींना वेशीबाहेर रहावे लागे. आता माणसांसोबत झाडांचीही हाकालपट्टी गावाबाहेर व्हावी? माणसांप्रमाणे झाडांनासुद्धा जाती जमाती असतात की काय? त्यांना सुद्धा वेशीबाहेर राहण्याची सोय करावी? उगीचच मनातल्या मनात मला राग आला. नंतर अनेकवेळा गाव संपलं की खरोखरच वेशीबाहेर उकिरड्यावर, दलदलीत उगवलेली अगोपांग जांभळ्या फुलांनी बहरलेली ही झाडं पाहिली की त्यांचं बेशरमी हे नावं मनाला डाचत असे. ह्या वनस्पतीला चांगलं नावं पाहिजे होतं. तिच्यावर अन्याय होतोय असं सारखं मनात येई मग वाटे ,

 

ती जरा आली फुलावर

तो घाव पडला मुळावर

घरच्या बगिचातून तिची

हकालपट्टी उकिरड्यावर

 

गावाबाहेर दलदलीवर

तरी वाढली भराभर

साधं फुलण्याच स्वप्न तिचं

मनी रुजलं होतं खोलवर

 

बहरणं तिचं अनावर

जाणार्‍याच्या नजरेवर

अधाशी नजरा तिला

डसत होत्या अंगभर

 

काटेरी जिभा तिला

ओरखाडत मनावर

तरी गावाची घाण झाकीत

बेशरमी फुलली अंगभर

फक्त- --- साधं फुलण्याच स्वप्न तिचं

साकारलं ------ पण? उकिरड्यावर!

  

             नंतर काही दिवसांनी बेशरमीचा पराक्रम कळला. जंगलात वनवासी लोकांसोबत काम करणारी एक मैत्रिण तिचा अनुभव सांगत होती. तिला तिथल्या वनवासी मुलीनी सांगितलेला,---

``बेशरमी ही फार विषारी वनस्पती आहे. तिच्या पानात गुंडाळून मासा तळला तर तो मासाही विषारी होतो. माणूस मरतो त्याने. पण त्या विषाने माशाची चव जराही बदलत नाही.’’

मैत्रिण म्हणाली ``पण मग बेशरमीच्या पानात मासा तळायचाच कशाला ना?’’

त्यावर निरागसपणे ती मुलगी उत्तरली, ``कधी कधी नवरा दारू पिऊन फार छळतो, कधी कधी दुसर्‍याच मुलीच्या प्रेमात पडतो किंवा कधी कधी आपल्यालाच दुसरा कोणी आवडतो -----!!!!! ’’

एकंदर बेशरमीचं नावं बदलावं असं परत कधी वाटलं नाही.

 आमच्या नवीन नवीन संसारात कुठल्याही फर्निचरची जराही अडगळ नव्हती. ना सोफा, ना पलंग, ना खुर्च्या ना डायनिंग टेबल. सर्व संसार एका रिक्षा-टेंपोतून त्या भव्य बंगल्याच्या पडवीच्या एका कोपर्‍यात येऊन उतरला. संध्याकाळ होत होती. प्रवीणसर आफिसला गेले होते. मी सुंदर सूर्यास्त माझ्या सख्यांसमवेत बघत होते. पूर्वी रेल्वेच्या वेटिंगरूम मधे असायच्या तशा दोन तीन भल्या दांडग्या खुर्च्या घरासोबतच घराभोवती असलेल्या पडवीमधे ठेवलेल्या होत्या. बंगल्यासोबतच त्या आमच्या वाट्याला आल्या होत्या. पण एक आश्चर्यही वाटत होतं. ह्या खुर्च्यांचे हात भारीच लांब होते. त्या हातांच्या खाली अजून दोन तशाच लांबलचक लाकडी पट्ट्या जोडलेल्या होत्या. नेलकटरच्या कडेला असलेल्या खाचेत नख घालून छोटं ब्लेड जस ओढून काढता येतं, तशा त्या पुढच्या बाजूला बाहेर काढता यायच्या. त्या पट्ट्या बाहेर काढल्या की कोपरात दुमडलेले भले दांडगे हात खुर्चीनी सरळ केल्यासारखे वाटत. एवढे प्रचंड हात? मग कोणीतरी त्या पट्ट्या पुढे एकमेकांवर क्रॉस करून रेल्वेच्या वेटिंगरूममधे प्रवाशांना कसं त्यावर पाय ठेऊन झोपता यायचं हे सांगितलं. त्यावर पाय ठेवले की पलंग तयार! अशा अँटिक खुर्च्यांचे लांब हात पाहून मनात म्हटलं, माझ्यापेक्षा दुप्पट लांबीच्या आणि उंचीच्या, कोणाच्या मापाने, कोणा माणसासाठी ह्या खुर्च्या बनवल्या असतील?  इतके लांब हात कोणाचे असतील बरं? हो की ह्या घरातले भूत सुद्धा त्याचे लांब हात पाय पसरून त्यावर आरामात बसू शकेल त्यावर. असा मनात विचार येऊन मलाही हसू आले आणि अचानक खळ्ळ्ळ!!!!! टबभर काचेची क्रोकरी स्वयंपाकघरात फुटल्याचा आवाज होऊन मी स्वयंपाकघराकडे धावले. माझ्यासोबत तिथे असलेले दोन तीन इतरही लोक धावले. स्वयंपाकघर शांत होतं.  मला हुश्श झालं कारण लग्नाआधी पहिल्यांदाच मी येणार म्हणून प्रवीणसरांनी सुंदर डिनरसेट, टीसेट, ग्लास सेट विकत  आणला होता. मला तो फारच आवडला होता. तो फुटलेला नाही पाहून मला हायसं वाटलं. आम्ही बाहेर आलो आणि माझ्या लक्षात आलं, अरे अजून तर मी संसार बाहेरच काढला नाही. मग आवाज कसला झाला? झाला असेल आजू बाजूच्या कुठल्या घरातला. माझी क्रोकरी फुटली नव्हती हया दिलाशानेच मी निवांत झाले.  थोड्याच दिवसात  आठवड्यात रंग लावून घर तयार होणार होतं. पण रंग लावतांना एक अडचण होती. घराची उंची 20 ते 22 फूट इतकी असावी. PWD च्या हिशोबाने 11 फूट उंची रंग लावायला ग्राह्य धरली जाई. आता काय करायचं? त्यांनी आम्हाला एक पर्याय दिला. घराला खालून 11 फूट वर किंवा वरून 11 फूट  खाली आम्ही रंग देऊ. जमिनीपासून वर 11 फूट रंग लावल्याने घर नवीन आणि हसरं दिसायला लागलं. आणि आम्ही तेथे राहायलाही आलो.

                   दीक्षितसरांबरोबर असलेल्या तीनचार अधिकार्‍यांपैकी एकानी सांगितलं, सर आपल्याकडे ऑफीसचं जुनं टेबल पडून आहे. तुम्ही ते घरी वापरू शकता. दोन खुर्च्याही दुरुस्त करून टेबलासोबत घरी आल्या. टुमदार स्वयंपाकघरात माझे डब्बेडुब्बे लागले. स्वयंपाकघराच्या समोर असलेल्या कोठीच्या खोलीत डायनिंग सेट इतर क्रोकरी नीट बसली. सोबत देवबाप्पाही आरूढ झाले. प्रवीणसर नसले तरी मला आजुबाजूला हिंडायला, झाडं लावायला ओसाड पण मुबलक परिसर होता.  थोड्याच दिवसात आमचं किचन गार्डन माळ्याच्या मदतीने डुलू लागलं. वांगी, भेंडी, गवार, टोमॅटो च्या सोबत सुंदर पारिजात आला.  राहुरीच्या  कृषी संशोधन केंद्रातून डाळींब, मोसंबी, केळी अशी फळांची झाडंही आणून लावली. घरासमोरच पाण्यासाठी एक गोल हौद बांधला होता. छोटासा असला तरी त्याच्या भेगा बुजवून छान तंदुरुस्त झाला. त्यात एक छोटं कारंजही विराजमान झालं. रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांच्या नजरेत बंगला भरू लागला.

                     बंगल्याचे दोन शयनकक्ष म्हणजे अति भव्य हॉल्स होते. आईबाबांचे घर ग्रामदेवतेच्याच सानिध्यात असल्याने रात्री उशीरापर्यंत लग्नाच्या वरातींचा आणि बँडचा सिलसिला चालू राही. एका वेळेला पाच सहा बँडस् वेगवेगळे गाणे वाजवत एकमेकांसमोर उभे राहिले की, हा गोंधळ मला सर्व काही सुरळीत चालू आहे असे आश्वस्त करीत असे. परिणामी त्या अर्धा डझन बँडच्या तालात मला गाढ झोपायचा सराव होता. मला झोपही अत्यंत गाढ लागे. रात्री झोपलं की सकाळी जाग! इथे मात्र काहीतरी स्वप्नांनी सतत जाग येई. खोलीतून बाहेर येऊन बघावे तर आमच्याकडे आलेले पाहुणेही स्वप्नांनी हैराण होऊन बाहेरच गप्पा मारत बसलेले दिसत. तोच------- स्वयंपाकघरातून परत तोच आवाज खळ्ळ्ळ!!!!! टबभर काचेची क्रोकरी असलेला टब खाली पडून फुटल्याचा आवाज!! सोबत माझे डबेही पडल्याचा आवाज! अशा वेळेस जेवढे लोक घरात असतील तेवढे सर्व लोक स्वयंपाकघराच्याच दिशेने धावत. माझा टि-सेट, डिनर सेट, ग्लास सर्व सर्व स्वयंपाकघराच्या समोरच्या खोलीत असूनही आम्ही स्वयंपाकघरच का गाठायचो माहित नाही. परत मी समोरच्या खोलीत येऊन डोळे भरून माझी नव्या संसाराची सुरवात असलेली सुंदर क्रोकरी हात फिरवून ठिक आहे ना पहायचे. एकसारख्या आकाराचे नवे चकचकीत डबेही छान एका ओळीत बसलेले.  आमच्या बेसावध क्षणांना गाठत ही क्रोकरी फुटल्याचा आवाज येई. आणि पूर्वी कितीही वेळा किचनमधे जाऊन आलो असलो तरी परत परत आम्ही ह्या आवाजाच्या दिशेने, किचनमधेच धावत जात असू. आणि नंतर परत परत मी माझी क्रोकरी डोळेभरून पहात असे. माझा भूताखेतावर अजिबात विश्वास नव्हता. अजूनही नाही. इतक्या शांत परिसरात दूरूनही कुठला आवाज येऊ शकत असेल असं म्हणत असतांना रात्री अपरात्री दोन तीन वाजता येणारा आवाज घरातल्या झोपलेल्यांनाही उठवे. अर्धा डझन बँड्सच्या तालासूरात गाढ झोपणार्‍या मलाही. ओढून स्वयंपाकघराकडे नेई. मग वाटे, माहीत नाही कोण असेल बिचारी जिची टबभर क्रोकरी फुटल्याचं दुःख तिला तिच्या मृत्यूनंतरही वाटत राहिलं. पण तिनी कधीही कोणाला त्रास दिला नाही. 

             स्वप्नांच्या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही प्रशस्त व्हरांड्यांमधे गाद्या टाकून मच्छरदाणी लावून झोपू लागलो. व्हरांड्यात रात्री बाहेरून कोणी प्राणी येऊ नयेत म्हणून जाळीही मारून घेतली. आणि रात्री धडामकन आवाजाने जाग आली. ही जाळी नेहमीच्या वहिवाटीच्या रस्त्यात आल्याने उद मांजरांचा अंदाज चुकला होता. ती जाळीवर धडामकन येऊन आपटली होती. बहुतेक सरकारी कौलारू घरांच्या कौलांच्या आश्रयाने उद मांजरे राहतात हा नंतरचाही माझा अनुभव आहे. आम्हाला पहिल्यांदाच उद मांजरं पहायला मिळाली. केसाळ लांब शेपटी, मोठे मोठे पाचूसारखे लकाकणारे डोळे, लांबुळकं तोंड! --- एका नव्या परिवार सदस्याशी ओळख झाली. आणि आम्हालाही निवांत झोप मिळाली. दोन दिवस उद त्याच रस्त्याने येऊन गोंधळात पडले. धडमकन् आपटत राहिले. पण त्यांनी अखेर दुसरा मार्ग शोधला.

      ``चला चला जेवायला वाढलं आहे.’’ म्हणत मी प्रवीणसरांच्या पानात गरम गरम तव्यावरची पोळी वाढली. खोलीतून आवरून ते येऊन बसले. पोळी आण गं ! मला नवल वाटलं इतक्यात पोळी झालीही खाऊन ? मी दुसरी पोळी घेऊन गेले. ऑफिस टेबलाला डायनिंग टेबलमधे रूपांतरीत केलं असल्याने टेबल चांगलच प्रशस्त होतं. त्यावर संपूर्ण वृत्तपत्र उलगडून वाचत, शेजारीच फोन ठेऊन त्यावर बोलत प्रवीणचं जेवण चालू असतांनाच पोळी गायब! अगं तू पोळी वाढली होतीस ना? हो? मग पोळी कुठे गेली? अशी ताटातली पोळी गायब करणार्‍या भुताचा मात्र आता छडा लावलाच पाहिजे म्हणून मी टेबलाखालून कुंच्यानी झाडूनही घेतलं ऑफिस टेबल असल्याने त्याला दोन्ही बाजूंना कप्पे होते. त्यात मी काटे, चमचे, टेबल नॅपकिन्स, टेबल मॅटस् असं छान लावून ठेवलं होतं. ते उघडताच चोराचा पत्ता लागला. उंदिरमामा तूप लावलेली गरम गरम पोळी पटकन ओढून ड्रॉवरमधे नेत होता, माझ्या तीनही पोळ्या त्याने पिल्लांसाठी लांबवल्या होत्या. परत स्वच्छता मोहीम उघडली.

                बंगल्या बाहेरील विस्तृत परिसराच्या एका कोपर्‍यात हिरवगार चिंचेचं सुंदर झाड होतं. मी तिकडे जायला लागले की चंद्रकलाबाई धावत येत. ``वहिनीसाहेब अशा अवस्थेत तिकडं नगासा जाऊ. त्या तिथं गोर्‍या मडमेला पुरलेलं हाय. ती तिथं असतीया.’’  आणि माझी तीच अवस्था मला तिथे घेऊन जात असे. कारण चिंचेवर लोंबणारे चिंचेचे आकडे मला खुणावत असत. ``अगं तिला तिच्या देशात परत जाता नाही आलं तर ती अजुन कुठे जाणार?’’ माझ्या असल्या बोलण्यानी ती अजूनच घाबरी घुबरी होई. एकदा तिच्या घराजवळून फिरतांना तिच्या घरासमोर वाळत असलेल्या पोतभर चिंचा पाहून मला गोर्‍या मडमेची भीतीही कळली. मी त्या सुरेखशा चिंचेच्या झाडापाशी गेल्यावर झाडाच्या बुंध्यात पटकन कोणाला सापडणार नाही अशी लपवलेली बांबूची उंच अकडीही मला सापडली आणि मी मनसोक्त चिंचा काढून आणु लागले.

                आता भुताचा एकच प्रश्न कळायचा राहिला होता तो म्हणजे क्रोकरी फुटल्याचा आवाज. मला आवाजाचं रहस्य कळलं नाही म्हणजे ते भूत आहे हे मानायला मी तयार नव्हते.  तरीही ते रहस्य अहमदनगरचं ते घर सोडल्यानंतरही अनेक वर्ष माझ्या मनाचा कोपरा कुरतडत राहिलं. भूत मानायचं का नाही? `बाप दखव नाहीतर श्राद्ध करम्हणणार्‍या मनाला ते रहस्य कुठेतरी हो नाहीच्या उबर्‍यावरच थांबवत असे. नंतर खूप वर्षांनी कुठेशी वाचलं की उद मांजरं कधी कधी क्रोकरी फुटल्यासारखा आवाज काढतात. आणि माझ्या मनातलं रहस्य उलगडल. पण नगर शिवाय बाकी कुठेही मी त्यांना तसा आवाज काढतांना पाहिलं नव्हतं हे ही खरच! असो!

त्या भुतासोबत आमचा काळ आनंदात गेला एवढं खरं. कित्येकवेळेला तर आम्ही जे म्हणु ते त्याक्षणीच तेथे घडत असे. थोडक्यात चिंतामणीच्या सोबत वा कल्पवृक्षाखाली राहिल्यागत जे मनात येईल ते घडत तसे. आम्हाला आश्चर्याचा धक्काही बसत असे. अशा चिंतामणीसोबत वा कल्पवल्ली खाली बसायला फारच मोठी पात्रता लागते. कारण तुमच्या मनात कायम चांगले आणि कल्याणप्रद विचार येणं यासाठी तुम्ही श्रीराम तरी पाहिजे नाहीतर श्रीकृष्ण तरी.

 ``आता इथून कुठे जायला लागणार नाही ना तुम्हाला?’’ मी प्रवीणना विचारत असतांनाच फोन वाजू लागला. जळगावचे SP रजेवर गेले आहेत महिनाभर जळगावच्या SP चा Charge साभाळायला जळगावला हजर व्हा.

झालं! पुढचा महिनाभर मला एकट्यानी भुतासोबत राहणं क्रमप्राप्त होतं. आई वडिलांना बोलावून घेतलं. तेव्हाही भूत नेमानी मनात येईल तेव्हा क्रोकरी फोडत राहिल. जो पर्यंत मला काचा गोळा करायला लागत नव्हत्या आणि माझी क्रोकरी सुरक्षित होती तोपर्यंत भूताने त्याची स्वतःची कितीही क्रोकरी कोणत्याही वेळेला फोडायला माझी हरकत नव्हती.

                 महिनाभर जळगावला राहून प्रवीण दीक्षित परत आल्यावर बोलता बोलता मी सहजच विचारलं? ``आता लगेचच बदली नाही ना होणार तुमची? कारण औरंगाबादला मी साडतीन महिनेच राहिले होते. येथेही साडेतीन महिने होत आले आहेत. असं मी विचारत असतांनाच आणि प्रवीण नाहीतला ना उच्चारत असतांनाच  टेबलावरचा फोन वाजला. फोन खाली ठेवत हसत हसत दीक्षित म्हणाले, चला बांधा सामान  Transfer to दौंड! एकंदर दीक्षित सरांच्या खाणार नाही आणि खाऊही देणार नाही ह्या बाणेदार कामाची घेतलेली ही दखल होती. पण त्याने विचलीत होण्याचे कारण नव्हते.  नवीन गावी जायच्या आनंदात मी आवराआवरीला सुरवात केली. एका भुताच्या घरातून आम्हाला आता दुसर्‍या सुंदर भुतबंगल्यात रहायला जायचं होतं.

 ह्या साडेतीन महिन्यांमधे मला इतका मोठा नगर जिल्हा  थोडातरी पहायला मिळाला त्याचा खूप आनंद वाटला.

-----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती