गजरा -

 

गजरा -

ऋतुबदलाची घोषणा पहिल्यांदा होते ती वृक्षांकडून. रस्त्याने जाता जाता अचानक एका परिचित वासाने मोहिनी घातली. चालता चालता अरे! हा तर गगनचाफा(बूच)! म्हणत असतांनाच गगनचाफ्याच्या झाडाखाली कधी आले कळलं नाही. खाली पांढर्‍याशुभ्र फुलांचा सडा सांडला होता. ताजं, पांढरंशुभ्र, चार पाकळ्यांच, लांब, पोकळ देठाचं फुल फुटपाथवरून उचलून नाकाशी लावून तो सुवास डोळे मिटून मनसोक्त छातीत भरून घेण्याची पुढची क्रिया आपोआप घडली. त्या सुवासाने प्रसन्न होत वर पाहिलं. सरळसोट बुंध्याचं उंचच उंच झाड गगनाशी स्पर्धा करत असतांना दुसरीकडे त्याची फुलं मात्र असंख्य घंटाचे झेले लोंबत असावेत त्याप्रमाणे जमिनीकडे दृष्टी लावून बसली होती. त्या झुंबरफुलांच असं लाडिक लाडिक हलणं कुणा छकुल्याच्या कानातील डुल हलल्याप्रमाणे मोठं गोड वाटत होतं.

चालता चालता हातातील फूल काय करावं ह्या विचारात असतांना सर्व आठवणी एकदम शाळेत घेऊन गेल्या. शाळेमधे शांताबाईंनी ह्या बुचाच्या लांब दांड्या एकमेकात गुंफून वेणी बनवायला शिकवलं होतं. बूचाची फुलं संपली की मधुमालतीची पांढरी, गुलाबी, लाल अशी रंग बदलत जाणारी लांब देठाची फुलं गुंफत मधल्या सुट्टीच्या वेळात आम्हा मुलींच्या डोक्यात फुलवेण्यांची दाटी झालेली असे. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या दांडीला  नखानेच थोडी चिर पाडून त्यात दुसरी पाकळी गुंफून लांबच लांब माळ कशी तयार करायची हेही त्यांनीच शिकवलं. सुई दोरा लागतो कशाला? केळाच्या पानाचा किंवा नारळाच्या झावळीचा लांब धागा काढून त्यात ओवलेला नाजुक बकुळीच्या फुलांचा गजरा काही मैत्रिणींनी शिकवला.

मुंबईच्या फुलवाल्या एकएक मोगर्‍याचं फूल दोर्‍याच्या विळख्यात नजाकतीने बांधत गोल गोल फिरवत मुंबई गजरा बांधतांना आणि त्यातून तयार होणारा दंडगोल दाट गजरा पहायला मला तेंव्हाही आवडायचं आणि आजही आवडत. दाक्षिणात्यांचे हार गुंफतांना पाहंणं हा एक हृद्य अनुभव असतो. लाल किंवा केशरी गुलाबाची एक एक पंकुडी फुलाभोवती लपेटून त्याच्याभोवती दोर्‍याचा वेढा गुंडाळतांना त्या पाकळीचा फुलाला चिकटलेला फिका भाग बाहेरच्या बाजूला आल्याने काय सुंदर छटांची गुंफण होते आहाहा! तुम्हाला कसा हार पाहिजे? वेगवेगळ्या हारांचा अल्बम हारवाल्यांकडे पाहून बदलाच्या वार्‍यात हार गजरेही जास्त सुदृढ झाल्यासारखं वाटलं.

निशिगंधाचा किंवा मधुर वासाच्या लिलीचा घसघशीत शुभ्र हार कलाबुत लावून सजला की शुभ्र रेशीम साडीला हलकासा जरीकाठ असलेल्या सरस्वतीच्या मूर्तीसाठीच असं आजही मला उगीचच वाटतं. दोर्‍याच्या घट्ट वीणीत चापून चोपून बांधलेला दुर्वांचा हारच गणपतीला शोभा आणतो तर पांडुरंगाला घमघमणार्‍या वासाच्या अंजिरी कृष्ण तुळशीचा. चैत्रात हजेरी लावणारा दौणा रामनवमीला रामाच्या हारामधे सुसंगती आणतो. कोमल पारिजाताला दोर्‍याची गाठही सहन होत नाही आणि सुईचं टोचणं सोसवत नाही. सुई दोर्‍यानी अलगद फुलाच्या आरपार ओवायलाच लागतात. अशा पारिजातकाच्या माळा घरातल्या देवांच्या तसबिरींचं पावित्र्य कोमलही करतात.

दरवाजावर मात्र झेंडुची/ गोंड्याची माळच पाहिजे. एक गेंदा एक आंब्याचं पान अशी सजलेली माळ दारावर महिरापित डुलु लागली की ओठांची हसरी महिराप झाल्यासारखं घरही प्रसन्न हसत असल्यासारखं वाटतं. दरवाजा काळसर कडे झुकणारा असेल तर झेडुचे गेंद लिंबु रंगावर पाहिजेत. दरवाजा फिक्या रंगाचा असेल तर गेंद आंबाबहार रंगावर पाहिजेत.

आपली मातृभूमी गंधवती आहे. किती म्हणून किती लिहीलं तरी दोन चार फुलांची नाव गजर्‍यातून सुटूनच जातील.  बाहेर मिळणारे गजरे मोहविणारे असले तरी काही खास घरी गुंफलेल्या गजर्‍यांचा तोरा वेगळाच असतो. जाई, जुई, चमेली, सायली यांचे भरगच्च गजरे असोत किंवा हार ते घरच्या वेलीवरच्या कळ्यांचे असतील तर गजर्‍यात फुललेल्या फुलांचा ताजेपणा सुगंध काही औरच असतो. टोकदार नाकाची चाफेकळी जशी असते तशी बाहेरून किंचित गुलाबी छटा असलेली जाईही सुबक, टोकदार नाकाची असते. फुलली की वेलीवर चांदण्या उतरल्यासारखी फुलते. (ह्या जाईला कुणी जुईही म्हणतात.पाठभेद असू शकतो.) घरी फुललेला मदनबाण असो बटमोगरा असो किंवा एखादा कवठीचाफा वा हिरवा चाफा असो केसात एखादं फूल जरी माळलं तरी सुगंध जणु पायघड्या पसरत जात असतो.  मग अशा मदनबाण, बटमोगरा ह्यांचा घरच्या देवाला केलेला हार असो वा घरच्या लक्ष्मीने माळलेला गजरा असो जणु काही साक्षात मदन धनुष्याला पुष्पबाण लावून सज्ज असतो. ह्या शिवाय पूर्वी घरोघरी दिसणारी परंतु आत्ता अभावानेच दिसणारी निळी, पांढरी, पिवळी काटेकोरांटी आणि अबोली गजर्‍यात बसण्यासाठी  संध्याकाळी चार वाजताच गाल फुगवून तयार असते. त्यांचे अत्यंत मंद वासाचे गुबगुबीत नीळे, पिवळे, पांढरे शुभ्र गजरे साजशृंगाराला पूर्णता देतात.

चांगला गजरा आणि चांगली कविता `सुवृत्त' (सुंदर वृत्तात किंवा गोलाकार,दंडगोल) आणि `अछिद्र' (बिनचूक/ मधे मधे जागा न सुटलेले) असले पाहिजेत. कविता छान वृत्तात तर गजरा जाडीला सर्वत्र एकसारखा छान दंडगोल. कुठे जाड कुठे बारीक नको. कवितेत दोष नकोत तर गजर्‍यात फुलांमधे अंतर राहून गेलेलं नको. दोन्ही कसे सुबक सुंदर पाहिजेत.  

लांब सडक दाट केसांच्या नागिणीसारख्या जाड वेणीवर मोगरा, अबोली आणि मरव्याचा एकत्र गुंफलेला गजराच पाहिजे. छानशा हेअरस्टाईलवर एकाच बाजूने घातलेला मोगर्‍याचा गच्च मुंबई गजरा ठसठशीत व्यक्तिमत्त्वाला अजुन खुलवतो तर जाई, जुई, सायलीचा नाजुकसा गजरा एखाद्या चवळीच्या शेंगेसारख्या नाजुक तन्वीला अजन बहार आणतो. नऊवारी, ठसठशीत कुंकु भारदस्त व्यक्तिमत्त्व घसघशीत आंबाड्यावर मी मनानीच शेवंतीची वेणी माळते. अजुन लक्षात राहण्यासारखी वेणी म्हणजे केवड्याच्या पातीची बनवलेली. केवड्याच्या पाती अशा नजाकतीने गुंफलेल्या असत की जणु नारायणपेठी साडीची टेंपल बॉर्डरच. बराच काळ टिकणार्‍या तगरीच्या कळ्यांची वेणी असो किंवा आंबड्यावर घालायची जाळी, त्यांचा नाजुकपणा वेगळाच. सुरंगीच्या गजर्‍याचा घमघमाट वेगळा आणि मल्लिकेचा परिमल वेगळाच तर मालती पुष्पमालेचाही आमोद निराळा. कुंदाची शुभ्रता वेगळीच आणि नेवाळीची वेगळी. कोमल सोनटक्का वेणीत गुंफतांना हात कोमलच असला पाहिजे. सोनटक्का पांढरा असो वा सोनेरीसर पिवळा त्याची कोमलता शारदाम्बेच्या कोमल चरणांसारखी.

चाफ्याची कंठी हा तर अजूनच मंत्रमुग्ध करणारा मालाप्रवास. सुगंध, रंग, लावण्य ह्यांना हिरव्या लाल लोकरीच्या धाग्यामधे एका ओळीत बांधतांना त्यांच्यावर तयार होणारी हिरव्या लोकरीच्या वेणीची कलाकुसर बघावी का फुलांचं सौन्दर्य का त्या सार्‍याच कंठीची प्रशंसा करावी हेच कळत नाही. चाफ्याच्या कंठ्या हाराइतपत लांब गुंफल्या तर वधुवरांच्या साजशृंगाराला अजुन कशाचीच गरज पडत नाही. दोन प्रेमी जीवांसोबत सार्‍या वर्‍हाडालाही धुंद करतात. फुलांची माळ किंवा चांगलं काव्य कसं असावं हे सांगतांना एक कवि म्हणतो,

अविदितगुणापि सुकवेर्भणतिः कर्णेषु वमति मधुधारा।

 ह्यनधिगतपरिमलापि हि हरति दृशं मालतीमाला ।।

एखादया अनाम कवीचं नाव, गुणं माहित नसलं तरी तो जर चांगला कवी असेल (सुकवी) तर त्याची एखादी उक्तीसुद्धा कानावर पडताच अमृतवर्षाव झाल्यासारखं वाटतं. फुलांचं सुद्धा तसच! नाव माहीत नसलं तरी सुगंध भुरळ घालतोच!

 हाराच्या बाबतीत गुणं म्हणजे दोरा. अविदित म्हणजे लक्षात येणार नाही, दिसणार नाही असा. माळेतील दोरा दिसायला नको. (इतकी फुलं दाट ओवलेली पाहिजेत.) न पाहिलेल्या मालतीच्या फुलांचा न अनुभवलेला परिमळ मन मोहून घेतो. त्या फुलांचा दोरा दिसणार नाही (अविदितगुणा)  असा भरगच्च गजरा पाहिल्यावर डोळ्यांनाही सुखावून जातो. चाफ्याच्या कंठीवर लाल-हिरव्या लोकरीची सुबक वेणीसारखी वीण `अविदितगुणा' नसूनही मोहवणारी असते.

जानकी राघवाच्या स्वयंवरात जानकीने रघुरामाच्या गळ्यात घातलेली विवाह माला कुणी रसिकाने नीलकमलांची कल्पिली आहे तर त्याहून रसिक कल्पना आहे की ही विवाहमाला मधुकपुष्पे आणि तुलसीमंजिर्‍यांची  होती.  मधुक म्हणजे मोहाची फुले. त्यांचा सुगंध अत्यंत मादक आणि गोड. फुलांच्या सेवनाने गुंगी येणारच. फुलं लाजेने खाली मान झुकलेली. तर अंजिरी तुलसी मंजिर्‍यांचा सुवास मनाला प्रसन्न पावन करणारा पण त्यांचं ताठपण खांदे मागे घेऊन ताठ मानेने उभ्या असलेल्या खंबीर पुरुषासारखं! वधुवरांच्या स्वभावाचं चित्रण साधणारं विवाहमालेचं इतकं सुंदर गुंफण कुठे साधलं नसेल.

जसा आजूबाजूचा निसर्ग असेल तसे शब्द आणि काव्य कल्पना जन्म घेतात. ज्या मातीतील फुलं त्या मातीतील कल्पना तेथील लोकांच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनतात. कृष्णाला शोधत राधा यमुनेकाठी आल्यावर तिच्या केसात माळलेल्या गजर्‍यातील फुले यमुनेच्या पाण्यात पडतात. त्याचं श्री आद्य शंकराचार्यांनी मोठं गोड वर्णन केलं आहे.

हरीस भेटण्या अधीर राधिका फिरे तिरी

गळे तिच्याच वेणितून माळिली फुले जली।।7.2

 

जुई चमेली चंपकादि पुष्पमालिका  त्या

जलास भूषवी अखंड प्रीतिची अभंगता

श्री आद्य शंकराचार्य जगन्माता त्रिपुरसुंदरीच्या दाट वेणीचं वर्णन करतांना म्हणतात, माय, वळणं वळणं घेत जाणारं (meandering) सुंदर नदीच पात्र निळ्या कमळांनी फुलून गेल्यावर तिच्यातील पाणी, प्रवाह काहीही न दिसता नुसती नीलकमले दिसत रहावीत त्याप्रमाणे तुझ्या मऊ रेशमी केसांच्या लडी म्हणजे नीलकमलांचं इंदिवर श्याम (इंदीवर म्हणजे निळं कमळ ) असं जणु नलिनीबनच! जिथे बघावं तिथे पूर्ण उमललेली, काही अस्फुट तर काही कळ्या अशी नील कमलांची दाटी झालेली.  ह्या नलिनीबनासोबत त्याचा परिमलही प्रवाहित झालेला! नीलकमलांची सुगंधित नदी संथ वाहत असावी असा हा सुंगधित घनदाट केश कलाप पाहून इंद्राच्या बागेतील कल्पवृक्षाच्या फुलांनाही हेवा वाटून त्यांनी हा अलौकिक सुगंध प्राप्त व्हावा म्हणून नंदनवन सोडून दिले आहे. तुझ्या केशकलापाचा एक अंशभर जरी सुगंध मिळाला तरी आमचे जीवन धन्य होईल असा विचार करून त्यांनी तुझ्या केशकलापाचा आश्रय घेतला आहे. अशा असंख्य स्वर्गीय फुलांनी, कल्पसुमाच्या घोसांनी, नंदनवनातील कल्पलतेच्या कुसुम-तुर्‍यांनी, फुलांच्या लोंगरांनी, पुष्प गुच्छांनी तुझ्या केसांवर गर्दी केली आहे. असा हा सुंदर गजरा कल्पनेनीही मला सुखवून जातो. अपार आनंद देतो.

फिरे दृष्टी मोदे गहन जणु इंदीवर वनी

कळ्या पुष्पे जेथे फुलति किति दाटीतच निळी ।। 43.1

जणू गुंफीली का सघन तव वेणी सुबकशी

तुर्‍यांनी गुच्छांनी सकल सुमनांनी मिळुन ही

जलौघाने जाई भरुन सरिता घेत वळणे

तशी ही वेणी गे परिमल फुलांनीच बहरे ।। 43.2

अगे ह्या इंद्राच्या सुखद बगिचातील कुसुमे

तयांमध्येही ती सुविमलचि कल्पद्रुम-फुले

तुझ्या ह्या केसांचा लव मिळविण्या सौरभ शिवे

फुलांच्या घोसांनी सजवितिच वेणी तव उमे ।। 43.4

असो-------! मला मात्र एका वेगळ्याच पुष्पमालेची आठवण झाली. श्री आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र याच्यांत वादविवाद सुरू होणार होता. वादविवादात कोण योग्य हे ठरविण्यासाठी मंडनमिश्राची सुविद्य पत्नी प्रत्यक्ष शारदाच निर्णायक परीक्षक म्हणून काम बघणार होती. वादविवाद सुरू होण्यापूर्वी तिने दोन्हीही प्रतिस्पर्ध्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली. अट अशी होती की ज्याची पुष्पमाला पहिल्यांदा सुकेल त्याने हार मान्य करावी. खूप दिवस ही अट मला अवाजवी वाटत होती. नंतर कै. वरदानंदभारतींच्या पुस्तकात त्याचा केलेला उलगडा मनाला फार भावून गेला. परीक्षेत जेंव्हा एखादा अवघड प्रश्न सुटत नाही, चुकतो किंवा प्रश्नाचं उत्तर येत नाही असं लक्षात येत तेंव्हा परीक्षार्थी भांबावून जातो. त्याच्या मनाची चलबिचल सुरू होते. धडधड वाढते. त्याचं BP नकळत वाढतं. त्यासोबत कानशीलं गरम व्हायला लागतात. परिणामी त्याचं शरीराचं तापमानही वाढतं. ह्या वाढलेल्या तापमानामुळे गळ्यात घातलेली पुष्पमाला सुकते. मोठेपणी आपल्या मनातील चलबिचल प्रतिस्पर्ध्यांच्या चेहर्‍यावर न दिसू देण्याची काळज ते घेतीलही पण पुष्पमालेतून हा बदल नक्कीच कळून येईल. इतका सूक्ष्म विचार करणारी शारदा नक्कीच प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेली, थोरच म्हटली पाहिजे.

हाच धागा पकडून आपण श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या श्रीकृष्णाष्टकम् पर्यंत जाऊ या. श्रीकृष्णाचं `गदी शङ्खी चक्री विमलवनमाली स्थररुचिः ' असं सुंदर वर्णन आहे. हातात गदा, शंख, चक्र, गळ्यात ताजी टवटवीत वनातल्या फुलांची माला असलेला श्रीकृष्ण स्थिररुची आहे. ह्यातील प्रत्येक शब्द दुसर्‍या शब्दाशी गजर्‍यात गुंफल्यासारखा अर्थाने अपसूक गुंफला गेलेला आहे.

 गदा, शंख, चक्र अशी संहारक आयुध घेऊन शत्रूच्या संहारासाठी सज्ज असलेल्या श्रीहरीच्या गळ्यात आपाद वनमाला आहे. सख्यांनी गुंफुन त्याच्या गळ्यात घातलेली आहे. वनातील फुलं इतकी कोमल असतात की ती तोडली की लगेचच सुकून जातात. श्रीहरीच्या गळ्यातील पायापर्यंत रुळणारी वनमाला मात्र सतत टवटवीत असते. अहो ह्या श्रीहरीला भय ते काय ठावुकच नाही. घाबरावं ते इतरांनी! सर्वांपेक्षा कैक पटींनी समर्थ, बलशाली असेल तोच भयमुक्त असेल वा जो बुद्धीचा अमोघ बाणाप्रमाणे  नेमका व अचूक वापर करू शकतो त्यालाच  इतकी मनाची स्थिरता प्राप्त होते.

 थोडा विचार केला तर दुसरी गोष्ट लक्षाात येईल की, जो लढण्यासाठी सज्ज आहे त्याच्या गळ्यातील पायापर्यंत वनमाला किती मधे मधे येईल. एकाद्या खोड्याळ गायीच्या किंवा बैलाच्या गळ्यात लोढणं नामक एक लाकडी ओंडका बांधलेला असतो. चालतांना तो त्याच्या पायात मधेमधे आल्याने तो जोरात इकडे तिकडे पळू शकत नाही. युद्धप्रसंगीही सर्व शस्त्रांस्त्रांसोबत ही आपाद वनमाला सहजगत्या सांभाळणारा तो योद्धा किती कुशल असला पाहिजे! त्याचं कारण त्यांनी पुढच्या गुंफलेल्या शब्दात दिलं आहे. श्रीहरी हा स्थिररुची आहे.

स्थिर म्हणजे - दृढ, स्थिरमति, अचल, शान्त, स्थायी, नित्य, शाश्वत, निश्चित, स्वस्थचित्त, धीरगंभीर. रुचि ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ मात्र थोडा वेगळा आहे. रुचिः म्हणजे प्रकाश, कान्ति, आभा, उज्ज्वलता, रुच् अस क्रियापपद जरी घेतलं तरी त्याचा अर्थ  चमकणे, प्रसन्न असणे,  रमणीय असा होतो. म्हणून स्थिररुचिः असलेल्या कृष्णचंद्राच व्यक्तिमत्त्व कायम शांत, सौम्य, स्थिर, अत्यंत प्रसन्न आहे. त्याच्या भावना कायम स्थिर असतात. तो कधीही संतापत नाही. त्याची चलबिचलही होत नाही.

अर्जुनाला गीता सांगतांना हा कृष्णचंद्र म्हणतो, एकदा का तुझा कर्तव्याचा निश्चय दृढ झाला की तुझं मन, तुझी मति कधीही अस्थिर होणार नाही. ही निश्चयात्मिका बुद्धी कायम एकच असते. ज्यांचा त्यांच्या कर्तव्याबद्दलचा निश्चय पक्का नसतो त्यांना कधी असं करावं तर कधी तसं करावं असं वाटत राहिल्याने त्यांच्या निश्चयाला असंख्य फाटे फुटतात. कुठलीच गोष्ट ते तडीस नेऊ शकत नाहीत.

तू तुझं अंतःकरण तुझ्या स्वाधीन ठेव. सुख, दुःख, हर्ष शोकात त्याला लडबडू देऊ नकोस.  अंतःकरणात असलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन असलेलं तुझं मन कधीही भरकटत जात नाही. तू हे माझे आप्त, हे माझे गुरू ह्या उथळ विचारांच्या डबक्यातून बाहेर पड मग स्थिरचित्त परमात्म्यामधे लीन होता तुला विशाल, काठोकाठ निर्मळ जलाने भरलेल्या सरोवरात आल्याची अनुभूती येईल. एकदा का तुझा निश्चय पक्का झाला की, मला हे मिळायला पाहिजे, हेच का माझ्या नशिबात असे प्रश्न तुला पडणार नाहीत.

हातात सर्व आयुधं असणारा योद्धा कुणीही कितीही डिवचलं तरी स्थिरमती, अक्षोभ्य असाच पाहिजे. कोणावरही पूर्वग्रह दूषित नजरेने किंवा स्वतःच्या मनमानीपणाने शस्त्र चालवणारा नको. अत्यंत विवेकाने निर्णय घेणारा असावा. त्याचा विवेक कायम शाबूत असल्याची निशाणी म्हणजे ही सदोदित  टवटवीत असलेली आपाद वनमाला. श्रीहरीच्या चरणांचा स्पर्श अमृतत्त्व देणारा आहे. म्हणूनही ही पायापर्यंत रुळणारी वनमाला कायम टववटवीअसावी! 

म्हणूनच अशा ह्या स्थिररुचि कृष्णचंद्राच्या चरणांवर ही लेखरुपी वनमाला अर्पण !

----------------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -