Expiry Date/ उपयुक्त कालमर्यादा -

 

Expiry Date/ उपयुक्त कालमर्यादा -

वस्तु, खाण्याचे पदार्थ, औषधं घेताना माझी नजर त्यावरील बाऽऽरीक अक्षरात लिहीलेली Expiry date शोधत असते. बर्‍याचवेळेला ती अत्यंत बारीक अक्षरात दिसणार नाही अशी लिहीलेली असते. ती एकदाची सापडली आणि आजच्या आणि त्या तारखेत एक उचित योग्य अंतर असलं की मग मी दुकानदाराला ती वस्तू वा औषध द्यायला आणि बिल करायला सांगते. तुम्हीसुद्धा असंच करत असता. पण काही गोष्टीवरील ह्या कालमर्यादेच्या तारखा बारीक अक्षरात लिहिलेल्या नसून अदृश्यपणे त्यावर वावरत असतात. त्या Expiry Dates तुम्हाला जाणूनच घ्याव्या लागतात. कधी 1 वर्षाची गॅरेंटी. 6 महिन्यांची वॉरेंटी सारखे वेगळे शब्द आपल्यापर्यंत पोचवून त्या कंपन्या आपल्याला आडवळणाने Expiry Dates सांगून आपल्याला सावधच करत असतात. 10 वर्ष मशिनची गॅरेंटी सांगतांना मोटरची गॅरेंटी मात्र 1च वर्ष असल्याचं बारीक अक्षरात वा हळुच सांगितलं जातं.

काही Expiry Dates/ कालमर्यादा आपल्यालाच ठरवायला लागतात. कपडे, जुनाट दिसायला लागले की त्यांची बाहेर वापराची Expiry date उलटून गेलेली असते. तर तवे, पातेल्यांचं टेफ्लॉन कोटिंग गेलं की तेही बाद च्या बाउंड्री लाइनच्या पलिकडे पोचलेले असतात. पडदे सोफा कव्हर्स, घरातील अनेक मशिन्स ह्यांच्या कालमर्यादा आपणच ठरायला लागतात. पण त्यांचा व आपला अंत  पाहता त्या बदललेल्या बर्‍या असतात. कित्येक वेळा पोळी भाजायच्या तव्याचे झालेले द्रोण भाजी परतायला वापरले जातात.

जुने वाडे अंगावर पडून माणसं मरण्यापेक्षा आता पाडायला योग्य झाले आहेत हे वेळच्यावेळी समजून उमजून पाडायला लागतात. जुन्या घरातील सोयी आत्ताची समाजव्यवस्था पाहता कालबाह्य असतात. पिलं उडून गेली की अत्यंत श्रमून कलाकुसरीनी बांधलेली घरटी पक्षी काही सांभाळत बसत नाहीत. त्याप्रमाणे भल्या मोठ्या घरांमधे ही मुलाची खोली, ही मुलीची अशी ग्रीनकार्ड मिळवलेल्या मुलांच्या खोल्या सजवत बसणार्‍या पालकांनी अशा खोल्यांची वा भल्यामोठ्या घरांची Expiry Date उलटून गेल्याचे मनाला समजावणे आवश्यक असते.

काही औषधांच्या वा खाण्याच्या पदार्थांच्या एक्सपायर्‍या त्यांचे बंद असलेले सील उघडले की,काही तासात, काही दिवसात वा  काही महिन्यात संपतात. इंजेक्शनची काचेची नळी फोडली की त्यावेळच्या इंजेक्शन सोबतच त्याची मुदत संपते. भले तुम्ही ते वापरा अथवा नका वापरू!

काही संबंधांचं सुद्धा असच असतं. ट्रेनच्या प्रवासात बरोबर वडे, कुल्फी खाऊन मनसोक्त गप्पा झाल्या तरी प्रवास संपला की मैत्रीची Expiry संपते. भाजी घेतली की भाजीवालीबरोबच्या गप्पा आटतात. तर शाळा, कॉलेज मधली मैत्री काही अपवाद सोडता बर्‍याच प्रमाणात शाळा कॉलेज नंतर काही महिने वा 2-3 वर्ष लाल Expiry ची रेष दाखवत राहते आणि शेवटी क्षीण होत संपून जाते.

  कपड्यांना, भांड्यांना, घरांनाच का, नात्यांना सुद्धा Expiry Date असते. ज्या क्षणी उपयुक्तता संपते त्याक्षणी Expiry date लागू होते. उपयुक्तता संपलेले औषध, वस्तु वा नातं तेवढ परिणामकारक तरी रहात नाही किंवा त्या औषधाची वा नात्याची भयंकर अ‍ॅलर्जी तरी येते. दुधात मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे नातीही नासून जाऊ शकतात. भाऊ, बहिणी आई वडील घट्ट वाटणार्‍या नात्यातील वीण उसवता उसवता कधी आणि कशाने कायमचा गुंता तयार होईल हे सांगता येत नाही. सोडवता आला तरी नाती परत विणली जात नाहीत. नात्यांमधे वाढत जाणारा कोरडेपणा हे  Expiry Date संपल्याचं  द्योतक असतं.

फळणार्‍या फुलणार्‍या, सावली देणार्‍या वृक्षाने मी किती उपयोगी आहे असं स्वतःशीच वाटून घेऊन चालत नाही. तुम्ही दुसर्‍यांना उपयोगी वाटता का नाही हे महत्त्वाचं.  असा अवाढव्य सुंदर वृक्ष रस्त्याच्या मधेच येत असेल तर प्रगतीआड येणारा हा वृक्ष फळे, सावली देणारा असला तरी त्याची उपयुक्तता संपलेली असते. दुसर्‍यांच्या प्रगतीच्या आड येण्याची त्याची किंमत त्याला चुकवायलाच लागते. म्हणून माणसानीही मी अजून खूप वर्ष उपयोगी पडू शकतो म्हटलं तरी असं स्वतःला नाही तर दुसर्‍यांना तसं वाटणं आवश्यक असतं. तुम्ही दुसर्‍यांना उपयोगी पडत असालही पण रस्त्याच्या कडेला लावलेल्या नव्या तरुप्रमाणे आज तुमची जागा नात्यातल्या दुसर्‍या कोणी घेतली असली तर आपली कालमर्यादा संपली हे समजून तुम्हाला नात्यांच्या पाशातून हलकेच दूर होणंच सोयीच असतं

मुलाचं लग्न झाली की मुलगा आणि आईवडिलांमधील उपयुक्त कालमर्यादेची ओढलेली रेष गडद होत जाते हे आईवडिलांना जेवढं लवकर कळेल तेवढं बरं असतं. तर मुलीचं बाळंतपण, मुलांना सांभाळणे इ.साठी नवीन इंजेक्शनची सिंरिज लगबगीने उघडावी त्याप्रमाणे काही काळ मुलीच्या आईवडिलांची उपयुक्तता चालू होते. पण ही काही काळापुरती आहे हे त्यांनी जाणून असलेलं बरं. मुलं परदेशात असली तर सहा सहा महिने ही कालमर्यादा हिच्या / त्याच्या आईवडिलात विभागून जाते. पण तीही किती काळ! त्याही उपयुक्त कालमर्यादेची/ Expiry Date ची अदृश्य लिपी वाचता आली तर बरी! .

दुकानात उरलेल्या बंगाली मिठायांची कालमर्यादा संपत आली की त्या परत रिसायकल करून नविन केल्या जातात म्हणे. (माझी ऐकीव माहिती आहे) कालौघात विश्वभर विखुरलेल्या मैत्रीची नाती कधीकाळी कशाच्या निमित्ताने एकत्र येऊन overhaul  होतात  थोडाकाळ. पण जोमात जोशात एकत्र आलेली मैत्रीची नाती अचानक थोड्याच काळात कोकणातील नद्यांसारखी पाऊस संपल्यासंपल्या आटूनही जातात लगेचच. आपली Expiry Date आपल्याला वाचता आली तर बरी!

काही आयुर्वेदिक आसवं, आरिष्टांवर त्यांच्या कालमर्यादेची तारीख नसते ती जेवढी जुनी तेवढी चांगली मानली जातात. ख्रिश्चनांकडे मूल जन्माला आल्यावर त्याच्या नावची दारूची बाटली जमिनीत पुरून ठेवायची गोव्याला पद्धत होती. ती त्याच्या लग्नाच्या दिवशी उघडली जात असे असं म्हणे. जेवढी जुनी तेवढी ती उंची! ( माझ्या लहानपणी पाहिलं होतं.)  जुन्या बिन डागाच्या दागिन्यांची अँटिक व्हॅल्यू कशी व किती वाढत जाईल हेही सांगता येत नाही म्हणा. त्यामुळे दोन नात्यातील Expiry Date जरी संपत आली असली तरी ती तिसर्‍या नात्याला लागू होईलच असं मात्र मुळीच नाही. ही एक तेवढीच उत्साही बाब! ज्यांच्या सोबत ही कालमर्यादा / Expiry Date अजून भरपूर शिल्लक आहे अशां मित्र मैत्रिणींबरोबर आपल्या वाढलेल्या अँटिक व्हॅल्यूसह मोरासारखं ऐटित फिरून घ्यावं हेही तितकच खरं!

-----------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -