शिखरिणी
शिखरिणी ---- कधी एकदा गंगा लहरींच्या प्रेमात पडून अत्यंत प्रेमाने मी त्यांचा अनुवाद करायचा घाट घातला. गंगालहरींच्या 53 श्लोकांपैकी शेवटचे थोडेसे श्लोक सोडता बाकी सारे श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत. नदीच्या प्रवाहाप्रमाणे शांतपणे पुढे सरकणार्या शिखरिणी वृत्ताचा मोह पडून मी मग शिवानंद लहरींचे 100 श्लोक भाषांतरीत केले. त्यातील निम्मे शिखरिणी श्लोक आहेत. ते सहज होत गेले आणि मी करत गेले. एवढं करून थांबावं ना? पण नाही! मग शिवमहिम्न, आनंदलहरी आणि सौंदर्यलहरी करतांना शिखरिणी अशी काही भिनत गेली की ज्याचं नाव ते! एक दिवस सहज बसले असताना एक शांत तरुणी आली. माझ्यापुढे उभी राहून ओळखीचं स्मित करत होती. मी - कोण गं बाई तू तरुणी – मी शिखरिणी! तुझ्याजवळ कायम असते त्यामुळे तुझी भाषा आई किंवा वृत्त आई समज! मी – जा बाई जा. का असा माझा अंत पाहतेस? मला तुझ्याशिवाय काही दुसरं सुचेनासं झालय. खाता-पिता, बसता-उठता, जागता- झोपता शिखरिणी! त्यात तू अजून माझ्या समोर अशी प्रकट होऊन मला घाबरवू नकोस. शिखरिणी – गूढ हसते मी – माता न तू वैरिणी! माता न तू वैरिणी!! ----माता न तू व...