शिखरिणी

 

शिखरिणी  ----

कधी एकदा गंगा लहरींच्या प्रेमात पडून अत्यंत प्रेमाने मी त्यांचा अनुवाद करायचा घाट घातला. गंगालहरींच्या 53 श्लोकांपैकी शेवटचे थोडेसे श्लोक सोडता बाकी सारे श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत.  नदीच्या प्रवाहाप्रमाणे शांतपणे पुढे सरकणार्‍या शिखरिणी वृत्ताचा मोह पडून मी मग शिवानंद लहरींचे 100 श्लोक भाषांतरीत केले. त्यातील निम्मे शिखरिणी श्लोक आहेत. ते सहज होत गेले आणि मी करत गेले. एवढं करून थांबावं ना? पण नाही! मग शिवमहिम्न, आनंदलहरी आणि सौंदर्यलहरी करतांना शिखरिणी अशी काही भिनत गेली की ज्याचं नाव ते!

एक दिवस सहज बसले असताना एक शांत तरुणी आली. माझ्यापुढे उभी राहून ओळखीचं स्मित करत होती.

मी - कोण गं बाई तू

तरुणी – मी शिखरिणी! तुझ्याजवळ कायम असते त्यामुळे तुझी भाषा आई किंवा वृत्त आई समज!

मी – जा बाई जा. का असा माझा अंत पाहतेस? मला तुझ्याशिवाय काही दुसरं सुचेनासं झालय. खाता-पिता, बसता-उठता,  जागता- झोपता शिखरिणी! त्यात तू अजून माझ्या समोर अशी प्रकट होऊन मला घाबरवू नकोस.

शिखरिणी – गूढ हसते

मी – माता न तू वैरिणी! माता न तू वैरिणी!! ----माता न तू वैरिणी!!! मी तिया घेत कौशल्याने विषयाच्या समेवर येते.

शिखरिणी – छे छे असं तू म्हणूच शकत नाहीस !

मी -मग कसं म्हणू?

शिखरिणी – (हसत)-- शिखरिणीत!

मी - का बरं?

शिखरिणी –  आता तुला फक्त माझीच सवय झालीए. मी सांगते तसच तू म्हणणार

म्हण बरं .

मी निमूटपणे

नसे माता माझी मम निकट वैरीण असशी

तुझ्या थैमानाची नच शिखरिणी ‘आदत’ मनी

शिखरिणी – हं आता कस! आता ह्यापुढे तू सतत शिखरिणीतच विचार करशील, बोलशील आणि लिहीशील.

मी - नको माते नको! तुझ्या ह्या बंधनातून माझा मुक्तिमार्ग दाखव.

परत माझ्या वाटेला जाऊ नकोस. पण अजून काही महिने तुला  हे स्वीकारावच लागेल. हळुहळुच तू माझ्या बंधनातून मुक्त होशील.

 

प्रसंग दुसरा

स्वयंपाक करता करता अचानक माझ्या ओठी येते-

 

सुखे मी रांधीला रुचकर स्वयंपाक सगळा

तुम्हासाठी सारा सुजन पतिदेवा बहुविधा

पदार्थांचा घ्यावा हळुहळु रसास्वाद सगळ्या

विडा स्वीकारा हा अति निगुतिने बांधुन दिला

----------------------

छे छे हे तर पतिदेव स्तोत्रच म्हणायला लागले मी! शिखरिणीतून मुक्तता नाही तर निदान थोडं सुधारित व्हायला काय हरकत आहे. नवीन ओळी गाउ लागते,

 

किती राबू ऐशी निशिदिनि स्वयंपाक करुनी

नसे कामामध्ये मदत तुमची ती कणभरी

मुलांचे घर्च्यांचे करत मम हा जन्म सरला

तरी का कोणासी क्षणभर दया ये कधिच का

----------------------

हा सुद्धा काळ मागे पडला बाई! रांधा वाढा उष्टी काढा ! चूल आणि मूल! आता घरच्यांचही करायला लागत नाही नवीन सुनांना! सगळेच कशी मस्त ऑर्डर देऊन आनंदात आरामात एन्जॉय करतात. तोच मी गुणुणू लागले,---

 

स्विगी का झोमॅटो लवकरचि दे ऑर्डर जरा

किती इंची पिझ्झा तुजसिच हवा हे ठरव बा

मला सांगी पास्ता बरगर उद्याला मज हवा

तुझ्या नाश्त्याचा तू डिअर ठरवि मेनु यमिसा

----------------------

ऑफिसमधून उशीरा येणार्‍या स्त्रीवर्गाला हल्ली पूर्वीसारखी सफाई द्यायला लागत नाही. कारणे सांगा मधून त्यांची पार मुक्ती झालीए. किती तडफदारपणे सांगत असतात नं! मी कौतुकाने गाउ लागले,----

 

हबी होती पार्टी बदलुनचि गेला कलिग रे

करूनी आले मी डिनर अमुच्या बॉसचि सवे

उद्या माझ्या दोन्ही लवकर मिटिंगाच असती

हबी भेटू रात्री उदइक तुझ्या ऑफिसमधे

--------

आता काळ बदललाय! पूर्वी आमच्यावेळी मुलीला पहायला यायचे त्यालाही चहापोह्यांचा कार्यक्रम म्हणायचे. मुलीनी ट्रेमधे चहा घेऊन यायचा! मान खाली घालून --- छे छे आता जग किती पुढे गेलय! आणि मी आनंदाने गुणगुणु लागले

 

चहाचे टाकीले जरी अधण तू रामप्रहरी

तरी माझाही तू मगभर चहा नित्यचि करी

तुझ्या हातीचा हा गरम अति फर्मासचि चहा

कशी यावी त्याची गुडलक चहासी सर पहा

 

शिखरिणी शिखरिणी!! अगं सोड मला! ह्यापुढे मी तुझ्या वाट्यास जाणार नाही! कुठून तरी शिखरिणीच्या हास्याचा आवाज खोलीभर घुमतो.

मी डोक्याला हात लावू मटकन खुर्चीत बसते.

--------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -