रामायण Express – भाग 10 सरयु गंगा संगम

 

रामायण Express –

भाग 10

सरयु गंगा संगम

राजा दशरथ विश्वामित्र ऋषींसोबत रामलक्ष्मणांना पाठवण्यास धजत नव्हता. नसनसत्या शंका आणि भीतीने तो हादरून गेला होता. तेव्हा वसिष्ठ महर्षी राजा दशरथाला म्हणाले,

‘‘हे राजा, राम, लक्ष्मण अस्त्रविद्या जाणत असोत वा नसोत राक्षस त्यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. चारही बाजूंनी धगधगणार्‍या अग्नीनी सुरक्षित केलेल्या जागी ठेवलेल्या अमृताला ज्या प्रमाणे कोणी हात लावू शकत नाही त्याप्रमाणे कुशिकनंदन विश्वामित्रांकडे सोपवलेल्या ह्या राजकुमारांना कोणीही राक्षस वक्र दृष्टीने पाहू शकणार नाहीत.’’

‘‘विश्वामित्रांच्या प्रचंड क्षमतेबद्दल तू शंका घेऊ नकोस.’’ वसिष्ठांनी राजाला  धीर देत सांगितलं, ‘‘विश्वामित्रांचा केवढा प्रभाव आहे हे मोठ्या मोठ्यां देवदेवतांना, राजामहाराजांना अजून माहित नाही; पण ही सर्व अस्त्र प्रजापति कृशाश्व ह्यांनी तयार केलेली आहेत आणि ती सर्व विश्वामित्रांकडे सोपवली आहेत. त्या अस्त्रांचा विधिवत् वापर फक्त तेच जाणतात. जी अस्त्र आज उपलब्ध नाहीत, ती तयार करण्याची प्रचंड क्षमता फक्त विश्वामित्रांकडेच आहे. स्वतः एकटे विश्वामित्र सर्व राक्षसांना सहज नामोहरम करू शकतात. पण भूत, वर्तमान, भविष्य कळणारे विश्वामित्र योग्य विचार करून, तुझ्या मुलांवर उपकार करण्यासाठीच त्यांना घेऊन जाण्याची मागणी करत आहेत.’’ वसिष्ठांनी दशरथाला समजावलं आणि दशरथानेही महर्षी विश्वामित्रांची मागणी मान्य केली.

सुंदर वस्त्र  घातलेले, अलंकारांनी नटलेले दोन छोटे छोटे राजकुमार राम लक्ष्मण कमरेला तलवारी लावून, एका खांद्यावर धनुष्य तर दुसर्‍या खांद्यावर बाणांनी भरलेला भाता लावून विश्वामित्रांमागे जाताना जणु सिंहाचे दोन बछडे सिंहामागे जात असल्याप्रमाणे मोठं मोहक दृश्य होतं. राजा दशरथाशी अधिकार वाणीने, क्रोधाने बोलणारे विश्वामित्र रामलक्ष्मणाशी मोठ्या प्रेमळ लाघवीपणे, गोड बोलत होते. दोन्ही राजकुमारांना घेऊन विश्वामित्र अयोध्येपासून दिड योजन दूर सरयुच्या दक्षिण तीरावर आले होते. मित्रांनो, एक योजन म्हणजे 8 मैल आणि 1 मैल म्हणजे 1.6 कि.मि. म्हणजे 19 -20 कि.मि. अंतर 13-14 वर्षांचे कुमार किती सहज चालले बघा! गोड बोलत, मुलांशी गप्पा मारत विश्वामित्रांच्या सोबत इतकं अंतर कसं हसत खेळत पार झालं. सरयुच्या काठावर ऋषींनी मुलांना हातपाय धुवून आचमन करायला सांगितलं. श्रीरामाला ऋषीवर म्हणाले,

‘‘हे नरश्रेष्ठ रामा मी तुला बला आणि अतिबला ह्या विद्या देतो. त्या प्रसिद्ध विद्यांचे मंत्रसमूह तू ग्रहण कर.  ही विद्या सर्व विद्यांची जननी आहे. ही विद्या प्राप्त करणार्‍याची कोणीही बरोबरी करू शकणार नाही.

ही विद्या ग्रहण करणारा कधी दमत नाही. थकत नाही. त्याला ज्वर, रोग किंवा चिंतेमुळे काही कष्ट, मनस्ताप होत नाही. त्याचं तारुण्य व सुंदर रूप कधी बदलत नाही. बाहुबलात तिन्ही लोकात त्याचा सामना कोणी करू शकत नाही. तो झोपलेला असताना वा असावधान असताना कोणी राक्षस त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. सौभाग्य, चातुर्य, ज्ञान, बुद्धीचा योग्य निश्चय ह्यात कोणीही त्याच्या पासंगाला पुरणार नाही. ह्या विद्येच्या ग्रहणानी तहान, भूकेनी जीव कळवळत नाही. शरीराला कुठलाही त्रास, पीडा होत नाही. ह्या विद्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या दोन तेजस्वी कन्यकाच आहेत. ह्या विद्या संपादन करण्यासाठी तूच एक योग्य पात्र आहेस. संपूर्ण जगाच्या रक्षणासाठी तू ह्या विद्या ग्रहण कर. ह्या विद्या प्राप्त करून भूतळावर सर्वत्र तू यश संपादन करशील. सर्वत्र तुझी सुकीर्ती पसरेल. मी माझ्या तपस्येच्या बळानी त्या मिळवल्या आहेत. त्या तुला अनेकविध प्रकारे उपयोगी पडतील.’’ विद्या ग्रहण केलेला नरश्रेष्ठ रघुनंदन अत्यंत तेजस्वी दिसू लागला.

सरयुच्या तीरावर उभं राहून हा घडलेला प्रसंग मन जसाच्या तसा पहात होतं. इथेच तर नसेल घडला हा प्रसंग? राजमहालात मऊ शय्येवर झोपणारे राजपुत्र महर्षी विश्वामित्रांनी प्रेमानी थोपटत सांगितलेल्या छान छान गोष्टी ऐकत इथेच रात्री गवत आणि पानांच्या शय्येवर झोपले.  रामाचे चरणकमल उमटेली सरयुची मऊसूत  रेशमी ओलसर वाळू कपाळावर लावायचा मोह आवरला नाही.

पहाटे उठून आपलं आह्निक आटपून मानेवर, कानांवर केसांच्या लाडिक लडी रुळणारे (काकपक्षधारी) हे राजपुत्र विश्वामित्रांसमवेत चालत, गप्पागोष्टी करत सरयु आणि गंगा ह्यांच्या संगमावर असलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमापाशी आले. बलिया आरा छापरा ह्या गावांच्यामधे सरयु आणि गंगेचा संगम आहे. ( आज वृत्तपत्रातील बातमीनुसार सुट्टीसाठी आराला जाण्यासाठी जास्त रेल्वे गाड्या मुंबईहून सोडल्या आहेत. )जाता जाता महर्षी विश्वामित्र अनेक प्रकारची माहिती, गोष्टी रामलक्ष्मणांना सांगत होते. मधेच कंदर्प म्हणजे काम वा अनंगाचा आश्रम दाखवत त्यांना महादेवांनी कसं जाळून टाकलं ही गोष्टही सांगितली. आज आपण इथेच राहू. उद्या हा संगम पार करून पलिकडे जाऊ, असं सांगून तिघेही तेथिल मुनींच्या आश्रमात राहिले. तेथील मुनींनीही तिघांचे छान स्वागत केले.

(मित्रांनो, आमच्या बालपणी, आणि पुढेही कितीतरी वर्ष  हॉटेल्समधे राहण्याची पद्धत नव्हती. त्या त्या गावाला असलेल्या नातेवाईक अथवा ओळखीच्याच्याकडे आम्ही रहात असू. त्या नव्या घरी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करतानां, त्यांच्या बागांमधील फुलं, फळं पाहताना  त्यांच्या मुलामुलींशी खेळताना जाम मजा यायची. आज मात्र भव्य भासणार्‍या, जे मागाल ते हजर करणार्‍या हॉटेल्समधे अशी पूर्वीसारखी माणसं आणि परस्पर संवाद मिळत  नाही, सहज एकमेकात देवाण घेवाण होणार्‍या ज्ञान आणि माहितीची उणीव भरून निघत नाही. रामाच्या पदपथानी जात असलो तरी ही आश्रमाची गम्मत नाही. असो! )

 रात्री तेथे राहून सकाळी पुढचे मार्गक्रमण करायचे असल्याने ऋषींनी सकाळीच एक छानशी नाव तयार ठेवली होती. तिघेही त्यात बसले. गंगेच्या मध्यावर आल्यावर पाण्याचा मोठा खळखळाट ऐकून रामानी विचारल, महर्षी हा कसला भयंकर खळखळाट? हसत विश्वामित्र म्हणाले, सरयु येथे गंगेला मिळते. त्या दोन जलधारांचा एकमेकांमधे मिसळतांना होणारा हा आवाज आहे. बिहारमधील बलिया, आरा आणि छपरा ह्यांच्यामधे हा संगम आहे.  गोंडा, अयोध्या ते फैजाबाद पर्यंत ही नदी सरयु, देविका वा रामप्रिया ह्या नावाने ओळखली जाते पुढे घागरा नावाने प्रसिद्ध आहे. सर, सरस म्हणजे सरोवर! यु म्हणजे विलग होणे, वेगळं होणे. मानससरातून उगम पावते/ बाहेर पडते/ वेगळी होते म्हणून ही सरयु.   बक्सरलाा जाताना  आम्ही नेपाळकडून आल्यामुळे सरयु गंगा मिलन पाहता आलं नाही तरी मन मात्र गुगलच्या आधारानी राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रांचा प्रवास पाहून आलं.

गंगा पार केल्यावर रामलक्ष्मणांना एक भीषण घनदाट आरण्य  दृष्टीस पडलं. अनेक वन्य प्राण्यांनी ते युक्त होतं. ह्या भयंकर वनाचं नाव काय महर्षी? आश्चर्यचकित झालेल्या रामानी विचारलं.

बाळा, कुकुत्स्थनंदना ! इथे पू्वी  सुंदर असे दोन देश होते. मलद आणि करूष! इंद्रानी वृत्रासुराला मारलं तेव्हा तो अतिशत मळला होता. आणि प्रचंड भूकेनी व्याकूळ झाला होता. तेव्हा देवांनी येथे त्याला भरपूर गंगाजलानी न्हाउ माखू घातलं. त्याने त्याचा मळ आणि कारूष म्हणजे क्षुधा येथे निघून गेले म्हणून ह्यांना मलद आणि करूष जनपद म्हणत. अत्यंत सम्पन्न असलेल्या ह्या प्रदेशांची  ताटका राक्षसिणीने पार वाट लावून टाकली.

मित्रांनो, आज इतक्या वर्षांनी ह्या प्रदेशांमधून जाताना एक गोष्ट जाणवली, आपण ज्याना गाव, ग्राम म्हणतो त्यांना येथे आजही जनपद म्हणतात. कधीकाळी संस्कृत ही बोली भाषा असणार ह्याचे हे सांडलेले छोटे छोटे पुरावे!

वारंवार ताटका/त्राटिकेच्या वधाचा विचार करताना, विश्वामित्रांचा जोरदार संवाद कानात गुंजत होता,

 ‘‘नरश्रेष्ठा, स्त्रीहत्येचा विचार करत हिला दया दाखवू नकोस. एका राजपुत्राला चारही वर्णांच्या हिताचा विचार करताना स्त्री हत्या जरी करावी लागली तरी त्याने मागेपुढे पाहू नये. प्रजेच्या रक्षणासाठी नरेशाला क्रूरतापूर्ण, पातकयुक्त, सदोष काम करायला लागलं तरी त्याने ते केलं पाहिजे. ज्यांच्यावर राज्यपालनाची, प्रजापालनाची जबाबदारी आहे त्यांचा हा सनातन धर्मच आहे. ह्या त्राटिकेत लेशमात्र धर्माचं नाव नाही तिला ठार मार!

हा उपदेश जर आपल्या हिंदू राजांनी पाळला असता आणि शत्रूच्या दुष्ट स्त्रियांवर मेहेरनजर न होता त्यांना मारलं असतं तर काय हिम्मत होती मोगलांची आमच्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेनी पहायची. आणि श्रीहरीप्रमाणे हरण केलेल्या सर्व स्त्रियांना सन्माने परत आणलं असतं तर अश्रुंमधूनही फुलं फुलली असती. आजतरी अशा फसलेल्या, फसवल्या गेलेल्या स्त्रिया, मुली वा माणसांना सन्मानाने परत आपल्यात सामावून घेऊ या.

--------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

  अनेक गावांना  थोडसं पाहता आलं, काहींचा ओझरता स्पर्श झाला. (मलद, करूष) पण काही गावं (आरा, बलिया, छापरा) न पाहताही मनाला स्पर्शून गेली त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय लेखणीला चैन पडेना!  

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)