रामायण Express – भाग 11 काशी विश्वनाथ ते सीता समाहिता स्थल

 

 

रामायण Express –

भाग 11

काशी विश्वनाथ ते सीता समाहिता स्थल

 

यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति

पण्डितान् उपाश्रयति ।

तस्य दिवरकिरणैः नलिनिदलमिव

विकास्यते बुद्धिः ।।

 सूर्य किरणांमुळे कमळाच्या पाकळ्या जशा हळु हळु उमलत जात पूर्ण कमळच छान उमलतं; त्या प्रमाणे जो वाचतो, म्हणतो, पाठ करतो, लिहून काढतो, पहातो, परत परत प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेतो, अनुभवी, विद्वानांच्या सहवासात राहतो; त्याला हुशार होण्यासाठी अमका क्लास, तमकी ट्यूशन असे अजून वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तो हळु हळु सहजपणे विद्वान होतो. त्याच्या बुद्धीचा  विकास होतो.

 दशरथनंदन श्रीरामाचं शिक्षण वसिष्ठ महर्षीकडे उत्तमपणे चालू होतं. वेद, शास्त्र ह्यांचं वाचन, पठण, मनन, लिखाण सर्व यथासांग चालू होतं. समस्यांकडे राजकुमाराने कसं पहावं ही दृष्टीही वसिष्ठांकडून त्याला मिळाली होती. पण पुढील म्हणजे--- पश्यति, परिपृच्छति, पण्डितान् उपाश्रयति  ह्या तीन्हीची कसर विश्वामित्रांनी भरून काढली.

 

ह्या विशाल जगाचा प्रत्यक्ष अनुभव, तेथील समस्या, त्यांचे बारकावे, प्रत्यक्ष राक्षसांना तोंड देणे, त्यासाठी दुसर्‍यांशी बोलणी करून मदत मिळवणे हा अनुभव त्याला विश्वामित्रांमुळे मिळत होता. आणि रामाच्या लाघवी स्वभावाची ओळख झाल्याने इतरही श्रीरामाला सहकार्य करत होते.

 भारत दर्शनची एक दीर्घ यात्रा ते रामाला घडवत होते. त्यातून  अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी देत ते चालले होते. रामाला त्यांचा प्रत्यक्ष परिचय करून देणं आणि ऋषींना रामाचा प्रत्यक्ष परिचय करवून देण्यानी; दोन्ही बांजूनी एकमेकांचा स्वीकार व त्यातून जे आत्मीयतेचे बंध निर्माण होणं आवश्यक होतं.  भविष्यातील राजा म्हणून रामासाठी जशी ही परिचय मोहिम आवश्यक होती त्याचप्रमाणे विद्वानांकडून भविष्यात रामाच्या राजेपणावर शिक्कामोर्तब होण्यासाठीही ती आवश्यक होती.

रामाच्या, स्थिर, विवेकी, लाघवी, कर्मकठोर स्वभावाची भुरळ पडत आश्रमवासी सहजपणे त्याच्या बाजूने ठाम उभे राहणार होते. त्याच प्रमाणे विशाल भारताचा भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वांगीण आलेख, वस्तुस्थितीचं प्रत्यक्ष चित्रण भावी राजा म्हणून रामाला जाणून घेणं आवश्यक होतं.

ह्या सर्वांचा विचार करून विश्वामित्र त्राटिकावधानंतर लगेचच राम लक्ष्मणांना अयोध्येला धाडण्या ऐवजी भारत दर्शन घडवत होते. त्या त्या स्थळासोबत जोडल्या गेलेल्या अनेक कथा ऐकवून राम लक्ष्मणाच्या हृदयातही पराक्रमाचं तेज जागवत होते.

मित्रांनो ज्या ज्या लोकांना काही वेळा क्षणाचाही विलंब न लावता तडकाफडकी निर्णय घ्यायला लागला, पण तो निर्णय घेतल्याने ते यशस्वी झाले अशा जगभरातल्या ( त्यात अनेक भारतीयही आहेत.) लोकांच्या मुलाखती घेऊन, त्यांनी हा निर्णय का व कसा घेतला हयाचा , काऊझेस आणि पोझनर ह्या दोन शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. हे निर्णय घेणारे कोणीही एकमेकांना माहित नसताना सुद्धा त्या सर्वांच्या मुलाखतीतून एक सामायिक मुद्दा पुढे आला. कधी काळी लहानपणी आजी, आजोबा, बाबा, आई, शिक्षक  किंवा अजून कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीची अचानक अशा वेळी आठवण होऊन त्यांनी तो निर्णय घेतला होता. गोष्टींचं असं विलक्षण महत्त्व आहे. ते जाणून आपला सर्व अभ्यास पूर्वी गोष्टीरूपच होता.

रामाला सर्व अस्त्रांचं ज्ञान दिल्यावर महर्षी राम लक्ष्मणाला घेऊन वाराणसी, प्रयागराजला आले. रामाला विश्वामित्रांनी गंगा कशी पृथ्वीवर आली हे सांगतांना सगर राजा, त्याची मुलं, भगिरथाचे अथक प्रयत्न, गंगावतरण अशा अनेक गोष्टी सांगितल्या.

 त्या सर्व प्रसंगांचं स्मरण करत आम्ही वाराणसीला पोचलो. पूर्वी पाहलेलं काशीविश्वनाथ मंदिर आणि त्या पार्श्वभूमीवर आताची भव्यता अनुभवताना काय वाटलं हे सांगणं अवघड आहे. आपल्या धर्माचं, आपल्या अस्मितेचं  प्रतिक जपलं गेलं तर किती मनांना केवढी उभारी देणारं असतं, सर्व हृदयांना सांधायला ,एकत्र यायला किती उपयोगी असतं हे तेथे उपस्थित लाखो लाखो जण अनुभवत होतो. काशीविश्वेश्वराचं दर्शन घेऊ धन्य होत होतो.

 कॅनडाहून परत आणलेल्या अन्नपूर्णेला पहातानाही धर्मो रक्षति रक्षितः । जो धर्माचं पालन करतो, रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. ह्या भावनेनी मन भरून आलं. ‘‘बाई गं तुलाही पळवून नेलं दुष्टांनी. पण आमच्या राजानी आमच्या भावना जाणून परत आणलं तुला. तुझा आणि आमचा वनवास संपवला. अन्नपूर्णेच्या देवळात ‘‘भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी’’ म्हणत हाताची ओंजळ पुढे केली. पुजार्‍याने ओंजळीत घातलेले प्रसादाचे दोन चमचे तांदूळ माहेरची ओटी आणावी तसे रुमालात बांधून आणताना मन भरून आलं.

पूर्वी पाहलेली ज्ञानवापी, मूर्तीसकट पुजार्‍यानी त्यात मारलेली उडी मंदिराकडे पाठ केलेला नंदी ह्या सगळ्याची खंत धुवून निघाली.  संध्याकाळ झाली होती. गंगेची आरती पहायला क्रुझ थांबला होता. ठराविक वेळेत पोचायचं होतं. मोदिजींचं भाषण ऐकल्यामुळे तिथेच मिळणारा खरपूस भाजलेल्या खव्याचा लाल पेढा मात्र न चुकता बरोबर घेतला. मागच्यावेळी छोट्या बोटीतून गंगा आारती पाहिली होती. क्रुझ मधून पाहताना गंगेचा हवाहवासा वाटणारा मृदु, मुलायम, शीतल स्पर्श अनुभवायला मिळणार नव्हता पण वेगळा अनुभव होता. गंगा अनुभवणं तिच्या शांत संथ वाटणार्‍या पात्राला डोळे भरून पाहणं हे कायमच आनंददायी असतं. डोळे भरून गंगेचं पात्र पाहताना  जगन्नाथ पंडिताची गंगालहरीही आपोआप मनाच्या किनार्‍याने वाहू लागते

असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे

असे कल्याणाची सजीव पुतळी तूचि सरिते

जलौघाने  तू गे शमविसि  तृषा या धरणिची

तृषार्ता पृथ्वीला निवविसि जलानेच जननी।।1.1

 

तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिसी

सुधाधारा या गे हरित अवनी ही फुलविती

फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी

महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी।।1.2 2

 

जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले

जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि गमे

शिवाला त्या वाटे तव सलिल ऐश्वर्य बहु हे

म्हणोनी का मूर्ध्नी तुजसि करितो धारण सखे।।1.3

 

असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे

असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे

तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते

सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके।।1.4

 

सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे

मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे

सदा चैतन्याने उसळत असे जीवन असे

जलाने ऐशा या  सकलचि अकल्याण शमु दे।।1.5

 

काश्यां हि काश्यते काशी ! एकएकाळी विद्वानांच्या तेजाने विश्वभरात चमकणारी काशी, रामप्रभुचा चरणस्पर्श झालेली काशी पाहताना कुठे तरी मनात खोल खोल श्री जगद्गुरू शंकराचार्यांचे काशीपञ्चक उमटत होते.

 

झाली कायाच काशी, अति पुनित अशी, तेवता ब्रह्मज्ञान

चित्तामध्ये गुरूची अविरत स्मरतो पाउले हा प्रयाग

विश्वाला व्यापिते जी त्रिभुवन जननी ज्ञानगंगा सदैव

वाहे बोधामृताची सतत हृदि अती जाह्नवी ही पवित्र ।।5.1

 

चित्ती भक्ती अनन्या; मनि अढळ वसे  नित्य निष्ठा गया ही

विश्वाच्या या क्रियांना अगणित असुनी सूर्य जैसाच साक्षी

तैसा जो अंतरात्मा सकल जन मनी साक्षिभावेच राही

तोची विश्वेश माझ्या हृदि  वसत असे तूर्यवस्था धरोनी।।5.2

 

तीर्थांचे तीर्थ झालो; अति पुनित असा देह हा ज्ञानरूपी

देहामध्येच माझ्या वसति सकल हे देव तीर्थादिकेही

शोधू आता कशाला विमल नव नवी व्यर्थ तीर्थे दुजी मी

आता ना अन्य तीर्थे मजविण मजला जाहलो मीच काशी।।5.3

 

गंगेचा शांत धीर गंभीर प्रवाह मनाती

काशी, प्रयाग करत विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन थेट मानस सरोवरा जवळ असलेल्या सिद्धाश्रमात गेल्याचे उल्लेख आहेत. जनकाचा सीतेच्या विवाहासाठी लावलेला पण जाणून घेऊन तेथून ते मग जनकपूरला आले. सीता आणि द्रौपदी ह्या वीरशुल्का आहेत. म्हणजे अत्यंत अवघड पण पूर्ण करण्यासाठी आपल्या शौर्याचं शुल्क आदा करून दोघींना त्यांच्या वीर पतींनी जिंकून घेतलं आहे. त्यामुळे सीता स्वयंवर नव्हे तर सीता विवाह म्हणणेच उचित.

आम्ही जनकपूर धाम पाहून आलो होतो. पण सिद्धाश्रमला जाणार नव्हतो. उद्या प्रयागराजला जाणार होतो. रामाच्या सर्व पदचिह्नांचा विचार केला तर संपूर्ण भारतखंड त्यांनी पादाक्रांत केला होता. आज सर्व सोयींनी परिपूर्ण असलेल्या रेल्वेलाही ते सर्व भूभाग दाखवणं अशक्य वाटत होतं.

 

वाराणसीहून सकाळीच तुलसीमंदिर आणि संकटमोचन हनुमान पाहून आलो होतो. एका वेगळ्याच फार ऐकिवात नसलेल्या स्थळाला भेट द्यायला जाणार होतो. उत्तर प्रदेशात काशी ते प्रयागराज ह्या रस्त्यावर वाराणसीहून 80 कि.मि.वर भदोही जिल्हात जंगीगंज बाजार गावापासून 11 कि.मि. तर भदोही पासून 45 कि.मि. वर गंगातीरावर ‘‘सीता समााहित स्थल’’ आहे. रामाने त्याग केल्यावर सीतामातेने आपल्या दुसर्‍या वनवासाचा अत्यंत कठीण काळ येथेच व्यतीत केला असे म्हटले जाते. त्याला पौराणिक मान्यताही आहे. लव कुशांचा जन्मही इथेच झाला. तुलसीदासाच्या ‘‘कवितावली’’ ह्या काव्यात ह्या स्थानाचा सीतामढी असा उल्लेख आहे. येथेच वाल्मिकी आश्रम आहे. कुशलवांनी येथेच मारुतरायाला ब्रह्मास्त्रानी जखडून टाकले होते. त्या घटनेचं प्रतिक म्हणून मारुतीची 108 फुटी उंचच उंच मूर्ती आहे. ही जगातील सर्वात उंच अशी मारुतीची मूर्ती आहे. हया मूर्तीच्या खाली मारुतीचं सुंदर मंदिर आहे.  सीतामातेचं मंदिर तळमजला आणि वरचा मजला अशा दोन मजल्यांमधे विभागलं आहे. वर अयोध्येत राणी म्हणून राहणार्‍या सीतेचं मंदिर आहे तर तळघरामधे सीता भूमातेच्या उदरात सामावली  ती प्रतिमा आहे. येथील सीतेची मूर्ती पाहून मनात कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही.

सीताकी केश वाटिका पण आहे. तेथे आपले केस सीतामाई विंचरत असे. येथे एक वेगळ्याच प्रकारचं, केसांप्रमाणे दिसणारं गवत उगवतं त्यालाही सीतेचे केस असं म्हटलं जातं हे गवत फक्त ह्याच जागी उगवतं. सीता समाहित स्थल मनात कायमच्या वास्तव्याला आलेल्या जागेबद्दल फार न बोलता एक संपूर्ण माहिती देणार्‍या व्हिडिओची लिंक देते आपण जरूर बघा.

----------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

 https://m.youtube.com/watch?v=KKcngHGYY1A

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –