रामायण Express - शृंगवेरपूर ते चित्रकूट भाग 13
शृंगवेरपूर ते चित्रकूट
भाग 13
(वाल्मिकी रामायणानुसार)
शृंगवेरपुर पर्यंत श्रीराम लक्ष्मण सीतेचा प्रवास इतका खडतर नव्हता. सुमंत्र स्वतः रथाचं सारथ्य करत त्यांना
शृंगवेरपूरच्या वनापर्यंत सोडायला आले होते.
गंगेचं घडणारं अत्यंत मनोहारी दर्शन डोळ्यांना सुखवित होतं.गंगा तटावर
अनेक पक्षी किलबिलत होते. गंगेच्या तटावर नवीन
कोवळ्या पालवीनी आणि फुलांनी बहरलेला हिंगणंचा छानसा वृक्ष पाहून श्रीराम सुमन्त्राला
म्हणाले, ‘‘सुमन्त्र, रथ येथेच थांबव. आम्ही ह्या सुंदर हिंगणवृक्षाखाली आजची रात्र
आम्ही झोपू. माणसं, पशु, पक्षी, देव, गंधर्व सर्वांनाच प्रिय, आदरणीय असलेली गंगा ह्या
झाडाखाली झोपताना सतत दिसत राहील.’’
सुमंत्राने आपला रथ त्या झाडापाशी नेऊन उभा केला. श्रीराम, सीता, लक्ष्मण
रथातून उतरल्यावर रथ बाजूला नेऊन, रथाचे घोडे सोडून सुमंत्र रामापुढे हात जोडून उभा
राहिला. हा सारा प्रदेश निषादराज गुहाच्या अधिपत्याखाली होता. आणि गुह आणि श्रीराम
एकमेकांचे खास दोस्त होते. श्रीराम आपल्या राज्यात आले आहेत हे समजतााच निषादराज गुह
अनेक प्रकारचं सुग्रास अन्न श्रीरामांना अर्पण करण्यासाठी घेऊन आला होता. त्यात अनेक
प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, विविध सरबतं, पेय, खिरी, ह्यांचा ही समावेश होता. श्रीराम
आणि निषादराजानी प्रेमानी एकमेकांना मिठी मारली. श्रीरामांनी सांगितलं, ‘‘मी एक व्रतस्थ
वनवासी असल्याने वनातील फळं, कंदमुळ ह्यावरच उपजीवीका असेल. मी दुसर्या कोणीही दिलेल्या
अन्नाचा स्वीकार करू शकत नाही. तू ते परत घेऊन जा. पण ह्या रथाच्या घोड्यांसाठी तू आणलेलं गवत मी स्वीकार
करतो. कारण घोड्यांना त्याची आत्ता जरुरी आहे.’’ त्या दिवशी लक्ष्मणाने आणलेलं गंगेच
पाणी पिऊनच श्रीराम झोपी गेले.(हा वाल्मिकी रामायणातील प्रसंग मी देत आहे. (राम कुठल्याही
प्रकारे समिष भोजन करत नसल्याचा हा पुरावा आहे. तिघेही अत्यंत व्रतस्थ वृत्तीने रहात
होते.) प्रभु रामाच्या रक्षणासाठी रात्रभर लक्ष्मण आणि निषादराज जागेच होते.
दुसर्या दिवशी पहाटे पहाटे कोकीळ, मोर आणि इतर पक्ष्यांच्या किबिलाटाने
श्रीराम जाग झाले. आपण येथेच राहिलो तर आपल्याला भेटायला जनपदवासी म्हणजे अनेक नगरवासी
येत राहतील त्याने ह्या जागेची शांतता धोक्यात येईल हे जाणून त्यांनी गंगा पार करून
घनदाट आरण्य असलेल्या वत्स देशात जायचा निर्णय घेतला. लोकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून
गुहराजाकडून थोडसं दूध मागवून घेऊन रामलक्ष्णांनी आपल्या केसांच्या ऋषीमुनींप्रमाणे
जटा बनवल्या. गुहराजानी दिसायला सुंदर, पाण्यात सहज आणि जलद जाणारी नाव मागवून घेतली.
सुमंत्राला निरोप देणं मोठं कठीण काम होतं. रामावरील अत्यंतिक प्रेमापोटी
सुमंत्र श्रीरामांसोबत वनवासात येण्याची आज्ञा मागू लागला. पण श्रीरामांनी त्याला समजावलं
की, सुमंत्र जर अयोध्येला परत गेला तरच कैकयीची
राम वनात गेल्याची खात्री पटेल. अन्यथा तिचा संशय कायम राहील. हे ऐकल्यावर नाईलाजाने
सुमंत्र अयोध्येला परतायला तयार झाला. राम, लक्ष्मण, सीता तिघेजण नावेत बसून पैलतीर
गाठेपर्यंत काठावर उभे राहून निषादराज गुह, सुमंत्र डबडबलेल्या डोळ्यांनी तिघांकडे
पहात होते.
राम गंगेच्या दक्षिण तटावर पोचले. इथून पुढे त्यांचा खरोखरचा वनवास
सुरू झाला. जंगल घनदाट होतं. आता रथही नव्हता, सुमंत्रही नव्हता आणि परम मित्र गुहही नव्हता. नगरातील सोयी सुविधांचा
मागमूस नव्हता. मिळालेली कंदमुळं आणि थोडंफार इतर काहीतरी घेऊन तिघंही एका झाडाखाली
आले. तेथेच अत्यंत सजग राहून विश्राम केला.
सकाळी हिंडत हिंडत, पूर्वी कधी न पाहिलेले भूभाग बघत, निरनिराळे वृक्ष,
फुलं, अशी निसर्गाची शोभा बघत कधी चालत तर कधी आरामशीर जागी आनंदाने बसत, तर कधी अयोध्येत
घडलेल्या दुःखद घटनांविषयी बोलत, मातापित्यांचं स्मरण करत, गंगा, यमुना, सरस्वतीच्या
भव्य संगमावर प्रयागराजला आले. जेथे दोन नद्या मिळतात त्यााला संगम तर तीन नद्या मिळतात
त्याला प्रयाग म्हटले जाते. संध्याकाळी चालत ते ऋषी भरद्वांजांच्या आश्रमापाशी पोचले.
आपण आल्याची सूचना शिष्यांकरवी ऋषींना दिली आणि ऋषींनी अनुमती दिल्यावर त्यांना भेटायला
ते आत गेले. महान ज्ञानी आणि अग्नीचं ज्ञान बाळगणारे, अनेक विषयात पारंगत आचार्य भरद्वाजाच्या
आश्रमात मुनीवरांच्या सोबत बाजूला वनातील अनेक प्राणी, पक्षी आणि इतर मुनीजन बसलेले
होते.
त्रिकालदर्शी भरद्वाज म्हणाले, ‘‘हे कुकुस्थकुलभूषण राम, मी दीर्घकाळ तुझीच प्रतीक्षा करत होतो. तुला पाहून
आज माझं मनोरथ सफल झालं. तुला अकारण वनवास मिळाला असल्याचं मला कळलं. तरी तू ह्या गंगा
यमुना, सरस्वतीच्या संगमा परिसरात आनंदाने राहू शकतोस. इथला निसर्ग अत्यंत मनोरम, पवित्र
आणि एकांत देणारा आहे.
पण सर्व प्राणीमात्रांचं हिताची चिंता करणारे, त्यांच्या कल्याणासाठी
झटणारे प्रभु राम म्हणाले, ‘‘भगवान येथून माझं जनपद जवळ आहे. लोकांना कळलं की मी येथे
आहे, तर सारे नागरीक वारंवार मला भेटायला, सीतेला पहायला येथे येतील त्याने येथील शांती
भंग पावेल. मला आपण जेथे कोणााला त्रास होणार नाही, अयोध्येपासून दूर असेल असं एखादं
योग्य स्थान सांगा.
त्यावर भरद्वाज म्हणाले, ‘‘तू म्हणतोस तस स्थान येथून 10 कोस (साधारण 32
कि. मि ) दूर आहे. तेथे ऋषीमुनी राहतात असा एक पर्वत आहे. तो गंधमादन
पर्वतासारखा सुंदर आहे. तेथे खूप माकडं आणि अस्वलं आहेत. त्या सुंदर पर्वताच्या मनोहारी
दर्शनानेच मनातील सर्व वाईट विचार झरझर निघून जातात. तेथून मंदाकिनी नदी वाहते. तिला
पयस्विनीही म्हणतात. तेथे मधुर फळं, कन्दमुळं भरपूर उपलब्ध असतात. त्या सुंदर चित्रकूट
परिसरात तुम्ही तिघे जाउन राहा. तेथे मंदाकिनी नदी, अनेक निर्झर, पर्वत शिखरं, अनेक
गुहा अशा सुंदर सुंदर ठिकाणी सीतेसोबत हिंडताना तुला आनंद मिळेल.’’
भरद्वाजांनी स्वतःच सर्व जाणून, रामाला पुढच्या प्रवासात अत्यावश्यक
असलेल्या वस्तु, सामग्री रामाला दिल्या. रात्री
भरद्वाजांच्या आश्रमात विश्राम करून सकाळी तिघे चित्रकूटला जायला निघाले.
पित्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने
रामाला आशीर्वाद देत, भरद्वाज रामाला काही अंतरापर्यंत पोचवायला आले. त्या तीघांना
अशीर्वाद देऊन, रामाला तेथून पुढचा पदपथ सांगितला. ‘‘गंगेच्या विरुद्ध दिशेनी येणार्या
यमुनेच्या काठाकाठनी जाताना माणसांच्या येण्याजाण्याने तयार झालेली पायवाट दिसेल. तेथे
एक तराफा बनवून तुम्ही यमुना पार करून पलिकडे जा. तेथून थोडं पुढे गेलं की खूप मोठा
‘श्यामवट’ नावाचा वटवृक्ष दिसेल. वडाच्या पारंब्यांनी त्या वडाभोवती असंख्य झाडं तयार
झाली आहेत. सीतेला त्या वटवृक्षाला हात जोडून नमस्कार करायला सांग. वाटलं तर काही काळ
तेथे थांबला तरी चालेल. तेथून एक कोस पुढे गेलं की ‘नीलवन’ लागेल तेथे सुरूच्या झाडांचं
जंगल लागेल. यमुनेच्या तीरावर उगवलेल्या बांबूंनी हा परिसर फार सुंदर झाला आहे. तेथून
पुढे चित्रकूटला रस्ता जातो.’’ मी अनेकवेळा ह्या रस्त्याने चित्रकूटला गेलो आहे.’’
मोठ्या प्रेमाने तिघांनाही आशीर्वाद देऊन ऋषी परत फिरले.
सुहृदहो! हा सर्व पायी जाण्याचा अड़घड रस्ता! एवढी मोठी नदी पार करायची
तर नदीला ओढ किती! तराफाही आपणच बनवायचा! वल्हवायचंही आपणच! रॉबिनसनक्रुसो आपल्या मुलांना
माहिती असतो पण रामायण----! वाल्मकी रामायणाप्रमाणे हा श्रीरामांनी घेतलेला मार्ग!
आम्ही मात्र बसच्या सुखासनात बसून ज्या ज्या स्थळांना राम लक्ष्मण सीतेनी
भेट दिली होती,जेथे जेथ त्यांचे चरणचिह्न उमटले त्या त्या पण सद्यस्थितीतील सुधारित
स्थळांना भेट देत नव्या जुन्याची सांगड घालत त्यामागील प्रसंग डोळ्याासमोर उभे करत
होतो. आमच्या बरोबर राजस्थानमधील असलेले एक मित्रवर्य त्या त्या स्थळांना वाल्मिकी
रामायणातील तो प्रसंग व्हॉटस् अॅप ग्रुपवर ठेवत असल्याने एक समांतर प्रवास होत असल्यासारखं
वाटत होतं. स्थळं काही प्रमाणात तीच असली तरी पायवाट नव्हती. रस्ते ही भव्य झाले आहेत. प्रयागराजच्या भव्य संगमावर
असलेला तेवढाच भव्य पूल, स्वराज भवन संग्रहालय आदि नेहरूंचे प्रचंड मोठे घर कदाचित
तो श्यामवट नाही दिसला पण बसच्या खिडकीतून
आंब्याचे डेरेदार मोहरानी खचाखच भरलेले अनेक वृक्ष नुसते नजरेलाच सुखावत नव्हते तर
त्यांच्या गडद गंधानी वेडावून टाकत होते.
आम्ही संध्याकाळी चित्रकूटला पोचलो.
चित्रकूटला पहाण्यासारख्या खूप जागा आहेत. ज्या पर्वतावर प्रभु रामचंद्रांनी
14 वर्षांच्या वनवासातील 11 वर्षांचा काळ व्यतीत केला तो कामदगिरी पर्वत त्याची परिक्रमा
करायची होती ती 4.50 कि.मि, आहे. तुलसीदासांनी
जे तुलसीराायण लिहिले त्यातील काही कांड अयोध्येत काही वाराणसीला तर काही चित्रकूटला
लिहिली. असं म्हणतात की, तुलसीदासांना प्रभुरामचंद्राचे दर्शन येथेच झाले. वाराणसीच्या
अस्सी घाटावर राहत असताना मारुतरायाने त्यांना दर्शन दिलं. तुलसीदासांनी प्रभुरामचंद्रांच्या
दर्शनाची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस मारुत रायाने सांगितले की प्रभु चित्रकुटला असतात
तेथे तुला ते भेटतील. मारुतरायाच्या सांगण्याप्रमाणे तुलसीदासजी चित्रकूटला गेले. ते तेथील रस्त्यावरून जात असताना घोड्यावरून आलेल्या
दोन राजपुत्रांनी त्यांना मार्ग विचारला. त्यांनी सांगितला. ते राजपुत्र गेल्यावर झाडावर
बसलेल्या मारुतरायानी त्याना विचारलं, ‘‘तुलसीदासजी, स्वामी मिले नं?’’ ‘‘नही!’’ तुलसीदासाने सांगितलं. आत्ता घोड्यावरुन
गेलेले राजपुत्र म्हणजे रामलक्ष्मण होते. हनुमानाने सांगितलं. अरे मला कसं कळणार! मी
ह्या वेषात कधि त्यांना पाहिलेच नाही. तुलसीदास म्हणाले. ठिक आहे. उद्या भेटतील हनुमानजी
म्हणाले. दुसर्या दिवशी पहाटेच सर्व आह्निक
उरकून स्नान करून तुसीदासजी मंदाकिनीच्या तीरावर बसून गंध उगाळत बसले असता एक छोटा
बालक तेथे आला आणि म्हणाला, ‘‘तुलसीदासजी मलाही गंध लावाल का?’’ त्या गोड गोंडस बालकाला
तिलक लावल्याक्षणी तया बालकाने त्याचेही बोट गंधात बुडवून तुलसीदासांच्या कपाळावर टेकवलं
मात्र ते समाधि अवस्थेत गेले. वर झाडावर बसलेल्या हनुमानाची उलघाल होऊ लागली. तो एक
श्लोक म्हणाला,
‘‘चित्रकूट के घाटपर लगी संतन
की भीर
तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुवीर’’
तुलसीदास भानावर आले. त्यांनी त्या
छोट्या मुलाचे हात पकडले आणि म्हणाले, ‘‘प्रभु माझ्या मनात आहे त्या कोदंडधारी रूपात
मला आपण दर्शन द्या.’’ एका क्षणभरासाठी त्यांना त्या रूपात श्रीरामांनी दर्शन दिलं आणि तुलसीदासांची
‘‘मम गुण गावत पुलक शरीरा ।
गदगद गीरा, नयन बह नीरा । ।
अशी अवस्था झाली.
चित्रकूट अत्यंत सुंदर जागा आहे. रामायण संदर्भातील कामदगिरी, स्फटिक
शिला, हनुमान धारा, सति अनसूया आश्रम, गुप्त गोदावरी, भरत मिलाप मंदिर, अशी अनेक स्थळ
येथे पाहण्यासारखी आहेत. शिवाय चित्रकूट ह्या स्थानासंबंधी काही खास गोष्टी सांगितल्या
जातात. त्यांच्याविषयी उद्या लिहीते.
------------------------
लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment