रामायण Express भाग 4 हनुमानगढी व शरयू

 

रामायण Express

भाग 4  हनुमानगढी व शरयू


मित्रांनो,

अयोध्या म्हणजे हजारो मंदिरं, मठ, आश्रम (7-8 हजार) ह्यांची गढी आहे असं लोक सांगतात. प्रत्येकामागे काही ना काही कहाण्या गुंफलेल्या असतात. काही खर्‍या काही कपोलकल्पित, काही नव्याने पैसा कमावण्यासाठीही असतील ; वारंवार आक्रमण, विध्वंस, जाळपोळ, कत्तली ह्यामधूनही सत्याची बीजं मौखिक इतिहासातून (Oral history) पुढच्या पिढीकडे जात राहिली. जनमनात रुजली. जनजिह्वेवरून पुढच्या पिढीकडे हा इतिहासाचा तेजस्वी वारसा सरकत सरकत आज आपल्यापर्यंत पोचला तो काही उगीच नाही तर त्यात तथ्य होतं म्हणूनच. राईचा पर्वत व्हायला राई तर आवश्यक आहेच ना!  विक्रमादित्याने येथे हनुमानगढीसह 360 मंदिरं बांधली असं म्हणे स्कंद पुराणात आहे. औरंगजेबानी निर्दयपणे फोडली मंदिरं! जगात चार प्रकारचे लोक आहेत. भर्तृहरीच्या सांगण्याप्रमाणे  समाजात काही लोकं परोपकारी सज्जन असतात. काही स्वार्थी असले तरी त इतरांना विनाकारण त्रास देत नाहीत. मनुष्यांमधे राक्षसवृत्तीने राहणारे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍यांचं लुबाडायला मागेपुढे बघत नाहीत. पण ह्या तीन प्रकारच्या लोकांहून अजून एका वेगळ्या प्रकारचे, राक्षसांहूनही निंदनीय लोक आहेत.

कोणी एक समाजभूषण असे सद्वर्तनी सर्वदा

लोकांचे हित साधण्या झटतसे निस्वार्थभावे सदा ।।

साधे स्वार्थ कुणी परी न छळतो लोका कधी जो उगी

तो समान्य प्रकारचा नर दिसे सर्वत्र ह्या भूवरी ।।

काही राक्षसवृत्तिचे मनुज ते हानी दुजाची करी

स्वस्वार्थापुढतीच ते जनहिता धूळीसमा मानिती ।।

का निष्कारण मांडतीच नकळे उच्छाद काहीजण

जी जी गोष्ट असे जना हितकरी त्याचे करी भंजन ।।

ना साधे हित, स्वार्थ ना घडतसे कल्याण त्यांचे कधी

ह्या वाह्यात जनांस काय म्हणणे ? विध्वंस वृत्ती कृती ।।

असे हे चौथ्या प्रकारचे  हीनाहूनही हीन जन! त्यांना काय म्हणावे? जे स्वतः काहीही बांधू शकले नाहीत ते दुसर्‍यांच्या अजोड कलाकृती मात्र सातत्याने फोडत राहिले. ना त्यातून त्यांचे कल्याण झाले ना काही स्वहित  साधले. असो!

 रामायण लिहायचं काम जरी वाल्मिकींनी केलं तरी रामाचा पराक्रम जन हृदया हृदयात जागृत ठेवण्याचं काम हे असंख्य सामान्य जनांचंच!  ह्या सामान्य वाटणार्‍या लोकांवर  अनेकांनी अत्याचार केले. अत्याचाराखाली भरडत राहिले हे भारतीय! अत्याचारी अतिरेक्यांची नावं बदलत गेली कधी मुसलमान मुघल तर कधी डच, ब्रिटिश! कधी आपलेच!

 पण! ------

यातनाओं से किसी की भावनाएँ कब मिटी हैं?

कठिन दुर्गम शृंग से क्या प्रबल सरिताएँ रुकी हैं?

आणि ---!

अवधच्या नबाबाकडून बैराग्यांच्या सेनेने हनुमानगढी परत जिंकून घेतली आणि त्यावर हनुमान मंदिर उभारलं. हनुमान मंदिराखाली मशिदीचे अवशेष आहेत म्हणून अनेकवेळा ती पाडण्याचे प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले. अयोध्यावासीयांच्या मुखातून आलेला इतिहास आज मी तुमच्यापर्यंत पोचवला.

हनुमान गढी मंदिर ----हिंदूंचं श्रद्धास्थान!  श्रीरामप्रभु व सीतामाई लंकाविजयानंतर अयोध्येस आले. त्यांच्यासोबत हनुमानही आले. हनुमानास राहण्यासाठी रामाने जी जागा दिली ती हनुमागढी. तेथेच एका गुफेत मारुती रहात असे व रामकोटाचं रक्षण करत असे. रामाने शरयूत आत्मसमर्पण करताना हनुमानास अयोध्येच्या राज्याची जबाबदारी सोपवली. अयोध्येचे लोक अजूनही हनुमानाला सध्याचा अयोध्येचा राजा मानतात. हा रामभक्त आजही कुठल्याही क्षणी तेथेच असतो अशी त्यांची श्रद्धा!

दक्षिणेवर विजय मिळवून आले म्हणून मंदिर दक्षिणाभिमुख आहे. लंकेशावर अलौकिक विजय मिळवून रामसैन्य परत येत आहे हे सर्वांना कळण्यासाठी अनेक ध्वजा फडकवत हर्षोल्लासाने आलेल्या सैन्याच्या सार्‍या ध्वजा ह्या ठिकाी उभारल्या गेल्या म्हणून येथे आजही अनेक ध्वज फडकत असतात. लंकेवर विजयाचे चिह्नस्वरूप 8 मि. लांब आणि 4 मि. रुंद असा भव्य ध्वज आजही तेथे फडकत असतो. रामाचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या रामभक्ताचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. प्रभु रामांनंतर अयोध्या परत वसवायचं काम विक्रमादित्यानी केलं

हातात असलेल्या थोडक्या वेळात रामललाला आधी भेटण्यास ह्या रामभक्ताची ना नसावी.  रामललाला भेटून हनुमानगढीची गर्दी भेदून हनुमानाचं दर्शन दिलेल्या वेळात अशक्य वाटत असेल तर आपल्याकडे कळसदर्शनही तेवढेच पवित्र आहे.

शरयूही पहायची होती. हनुमानगढी पाहताना त्याच्या समोर असलेल्या एका उंच्या पुर्‍या भव्य मंदिरावर नजर सतत जात होती. जुनं देऊळ असावं. पण मूळ बांधकाम खणखणित होतं. त्याचा भव्यपणा झाकला जात नव्हता. प्रचंड गर्दीत सर्वांकडून दुर्लक्षित  असलेलं त्याचं धीर गंभीर अबोलपण खूप काही बोलून जात होतं.  त्याचा भला मोठा घुमट मनात कायमचा वस्तीला आला. झाडं उगवली होती त्याच्यावर. अनेकांना विचारून कोणाकडून समाधानकारक उत्तर येत नव्हतं.  शेवटी एका दुकानदाराने सांगितलं, ‘‘वो तो रामजी का दरबार हैं । अब वहाँ कोई मूर्ती नहीं हैं ।’’ ऐकताना मन खिन्न झालं.

हातात फोन/ कॅमेरा नसल्याने त्या भव्य दुर्लक्षित मंदिराचा फोटो घेता आला नाही त्याचं मात्र वाईट वाटलं. राममंदिरानंतर त्याचंही नूतनीकरण होणार असल्याचं तेथील लोक बोलत होते. जखमेवर फुंकर वाटली ती. अयोध्येत रामाचं बालपण गेलं म्हणून रामलल्ला पाहिजेच पण ज्या अयोध्येत राम जानकीला घेऊन आले तेथे रामासोबत वामांगी सीतामाई हवीच. लक्ष्मण धनुष्य घेऊन श्रीरामाच्या उजव्या बाजूस सज्ज हवा. मागे चवरी व अब्दागिरी घेऊन भरत शत्रुघ्नही! पायाशी निष्ठावंत मारुतराय आणि समोर सज्जनांचा दरबारही हवाच. ह्या सर्वांच्याशिवाय श्रीरामांसही पूर्णत्व नाही. माझ्या मनातील एक छोटी सल बाहेर आली. माझ्या  आणि जनमनातील रामपंचायतनाची स्थापना मनानेच त्या भव्य मंदिराच्या गाभार्‍यात करून शरय़ू आरतीला त्या जनसागरात सामील झालो.

एकदा का ब्रह्म प्राप्ती झाली की मनाची चलबिचल शांत होते. मनात कोणतेही किंतु, परंतुचे भोवरे उमटत नाहीत. एखाद्या खोल, शांत जलाशयासरखं मन शांत शांत होतं. श्रीरामप्रभुंच्या सहवासात शरयूलाही हीच रामबाधा झाली की काय न कळे. घाटाच्या पायरीवर बसून तिचा प्रवाह न्याहाळण्यासारखं सौख्य नाही. मनातील सारे विचार ती धुवून नेते.  गंगा यमुनेच्या कौतुकात थोडी मागे पडलेली शरयू तितकीच सुंदर आहे.  वेग आहे पण जाणवत नाही. लाटा आहेत पण त्याच्यातील कमालीची शांतता भंग पावत नाही. लोकांनी काठावर बुड्या मारून वा फुलं टाकूनही तिच्या भव्य पात्राची अमल-विमलता कमी झालेली नाही. नावा प्रवाशाना दुसर्‍या काठावर घेऊन जात आहेत. नावेच्या मागे उमटणार्‍या < ह्या खुणेच्या लाटा परत संथपणे पाण्यात सामावल्या जात आहेत! आपोआप!! (आप म्हणजे पाणी.) जळी जळ मिसळावे तसे मनही शरयूत मिसळून जात होतं. समोरच कोणी भल्यामोठ्या आरत्यांमधे वाती लावण्यात , कोणी शरयूच्या छोट्या मूर्तीला सजवण्यात, कोणी वेगवेगळी देवगीते लाऊडस्पीकरवरून लावण्यात, लहान मुले त्यावर नाचण्यात, कोणी झांजांचे वाटप अशा कामात गढून गेलेले. भास्कराने निरोप घेतला. त्या गूढ जललतिकेचे बदलते रंग बघतांना समोरच्या गडबडीचा त्रास होत नव्हता पण आपण लोक फारच आवाजी आहोत. काही गोष्टी शांतपणे केल्या तर -----! दुसर्‍यांच्या श्रद्धेला बाध नाही आणत. अशा वेळी माझ्यापुरता  माझ्या मनातील  शांत वाहणार्‍या जललतेचा कॅनव्हास मी माझ्यापुरता उघडून बसते. मोठ्या मोठ्या झांजांच्या आवाजात आरती सुरू झाली आणि संपली. झांझावाती आरतीनंतर अंधारात बस शोधण, तिच्यापर्यंत पोचणं हे आवश्यक कार्य होतं.

 रामलल्लाचं दर्शन इतकं समाधान देऊन गेलं की,  कनक महाल आणि बाकीची स्थळे पाहिलीच पाहिजेत असं वाटलं नाही. कनक महाल हा कैकयीने सीतेला विवाहानंतर बक्षिस दिेलेला महाल. श्रीराम व सीता ह्याच महालात राहत असं म्हणतात. नदी वाहत असते. प्रत्येकानी आपल्या ओंजळीत येईल तेवढे पाणी प्यावे. जेवढं पहायला मिळालं त्यावर मन समाधानी होतं. जातांना हनुमानगढीसमोरील भव्य मंदिर रामदरबार न कळत माझ्या सोबत कायमचा आला.

उद्या परत पहाटेच शरयू भेटीचा आनंद मिळणार होता. कोणी पहाटेच गुप्तार घाटावर जाणार होते. शरयूवरील लक्ष्मण घाट, जटाय़ू घाट, अहिल्याबाई घाट, धौरहरा घाट, जानकी घाट अशा 51 घाटांपैकी गुप्तारघाट अत्यंत नयनरम्य! श्रीरामांनी येथेच जलसमाधी घेतली. अयोध्येला गेला तर हा घाट नक्की बघावा. फार कमी जणांना माहित असलेली गोष्ट म्हणजे तेथे बाबा की समाधी  म्हणून एक समाधीस्थळ आहे ती खरोखरची नेताजी सुभाषचंद्र बोसांची समाधी आहे. शेवटचे काही दिवस सुभाषबाबू वेश पालटून गुप्तपणे तेथे राहत होते. असं  तेथील  स्थानिकांचं म्हणणं आहे.   

----------------------------------

#लेखणीअरुंधतीची-



गुप्तारघाट










Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –