रामायण Express भाग 20 नासिक ते होस्पेट

 

नासिक ते होस्पेट (किष्किंधा कांड)



सुहृत् हो वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण पंपा सरोवर ओलाडून आकाशमार्गे लंकेत पोचला आणि  सीता अशोकवाटिकेत अशा प्रकारे नजर कैदेत ठेवली गेली. 


पंपा सरोवरं भारतात अनेक ठिकाणी असल्याचा उल्लेख आहे.  आम्ही जाणार होतो ते  पम्पासरोवर कर्नाटकमधे हम्पी जवळ कोप्पल जिल्हात तुंगभद्रेच्या दक्षिणेकडे असल्याचे मानतात. तेथेच सुग्रीवाची राजधानी किष्किंधा असल्याचे पुरावे पहायला मिळतात.

 केरळच्या कोल्लम येथे जेथे जटायूचे पंख कापले तेथे जटायूचं भव्य शिल्प आणि जटायू पार्क आहे. तेथे पम्पासरोवर आहे.

पम्पा सरोवर आणि शबरीधाम गुजरातमधील डांग जिल्ह्यात असल्याचे तेथील लोक मानतात.

सुहृत्हो! श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, शबरी----इ इ. ह्या सार्‍या राम परिवाराबद्दल सर्व भारतीयांनाच का बाहेरच्या देशातील लोकांनाही इतकी आत्मीयता आहे की राम आमचाच तो दुसरीकडे कसा असू शकेल ह्या प्रेमळ आत्मीयतेतून उभारलेल्या हया मंदिरांना निःशंकपणे, भक्तिभावाने हात जोडावेत. कुठला काथ्याकूट करायला गेलो तर पदरात काही पडणार नाही. आणि रामाची सीता कोण इतपर्यंत भ्रमित व्हायला होईल असे वाटते. 

केरळमधले पम्पा सरोवर लंकेच्या जवळ येते. अंतराच्या दृष्टीने सुसंगत वाटते; तरी आम्ही मनात कुठलाही संदेह न ठेवता कर्नाटकमधे होस्पेटला पोचलो. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना गोंधळ, बेशिस्त कमी होत जाते; तर सुटसुटितपणा, स्वच्छता वाढत जाते असा गेल्या अनेक वर्षांमधला माझा अनुभव आहे. तो परत आला. तुंगभद्रेचं पात्र जवळ जवळ कोरडच पडलं होत. पण तेथील सुंदर दगड, शिळा, पर्वत मन वेधून घेणारे होते. आपण रामायण express मधे बसून जे जे दिसेल जे जे दाखवतील, ते आनंदानी पहायच असा आमचा सोपा मंत्र होता. कारण कुठे नेपाळ, कुठे रामेश्वर!  सर्व आम्ही  विनाश्रम, डोक्याला ताप न देता, कुठल्याही हॉटेलच्या वा बसच्या बुकिंगची चिंता न करता एकत्रितपणे पाहणार होतो.

आपण मात्र सीतेला शोधत किष्किंधेला पोचलेल्या श्रीरामांच्या चरणांचे ठसे शोधत नाशिकहून होस्पेटला जाऊ या. श्रीरामांचा मार्ग अनेकांनी वेगवेगळा सांगितला असेल. मी मात्र रामायण express मधून नासिकहून होस्पेटला जात आहे. होस्पेटच्या हॉटेलचं नाव बघता क्षणीच आवडून गेलं. मल्लिगा! ---मालति! सुंदर हॉटेल सुंदर व्यवस्था! पोचलो तर संध्याकाळ उलटून चालली होती. आपापल्या रूम्सवर फ्रेश होऊन हॉटेलच्या समोर असलेल्या हॉटेलच्या डायनिंग रूम मधे जायचं होतं. आम्ही दोघे जरा लवकरच तयार होऊन आलो होतो. डायनिंगरूम मधे जाण्याऐवजी त्याच्याच खाली असलेल्या हॉलमधे कुठल्याशा कंपनीचा बक्षिस समारंभ चालू होता. कौतुकाने आम्हीही थोडावेळ बसलो. कंपनीच्या कामात उत्तम सुधारणा घडवून आणणार्‍या गटांना बक्षिस दिलं जात होतं. सर्वजण आपल्या पत्नी व मुलाबाळांसह बक्षिस घ्यायला व्यासपीठावर येतांना पाहून छान वाटत होतं. आम्हीही दोघे टाळ्या वाजवून कौतुकात सहभागी झालो. त्याही लोकांना अवचित पाहुणे आवडले असावेत. तेथून निघताना तेथील उपस्थित अधिकार्‍यांना धन्यवाद देत, अभिनंदन करून निघालो तेव्हा त्यानाही हा उत्स्फूर्त प्रतिसाद आवडला.

उद्या आम्हाला सकाळीच अनेगुंडी व हम्पीला जायचं होतं. हम्पी ही विजनगर साम्राज्याची राजधानी तर अनेगुंडी त्याहून पुरातन..... वानरराज सुग्रीवाची राजधानी! हा भूभाग विजय नगरचं साम्राज्य आणि रामायण कालीन वाली व सुग्रीवाची किष्किंधा नगरी ह्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पहाण्यासारख्या 50 जागा तरी नक्की आहेत. आम्ही थोडक्यावेळात जे साधेल ते पाहणाार होतो. पम्पा सरोवर आणि शबरी आश्रमही येथे आहेत. ज्या ठिकाणी वालीला मारलं ती वाली गुफाही येथे आहे.

 मारुतरायाचा जन्म झाला ती अंजनेयाद्रि टेकडी तुंगभद्रेच्या काठावरील अनेगुंडी भागात आहे. आम्हाला सकाळीच अंजनेयाद्री टेकडी चढून जायचे होते. 575 पायर्‍या कशा चढणार असे वाटत होते. पण सारेच (सर्व साधारण सत्तरीच्या मागेपुढे असलेले तरूण) चढून आले तेव्हा मारुतरायाची कृपा कळली.  ‘आम्ही बघा कसे तुरुतुरु चढून गेलो’ असा दावा करत भापायला चान्स नव्हता कारण आम्ही बसने पोचलो तेव्हा काही उत्साही पहाटेच आपली आपण टॅक्सी करून टेकडी चढून हनुमानाचे दर्शन सुर्योदयाच्या वेळेला साधत उतरून येऊन परत चाललेले होते. तर आम्ही उतरताना आम्हाला भेटलेले आमचे सहप्रवासी हाशहुश करत बसत बसत पण चढताना मधेच माघार न घेता दर्शन घेऊनच उतरले.

होस्पेट ते अंजनेयाद्रि 13 कि.मी. अंतर बसने जाताना दिसणारी तुंगभद्रा तेथील वैशिष्ट्यपूर्ण भूभाग पूर्णच वेगळा आहे. महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणायचं काहीच कारण नाही असं येथील दगड पाहिल्यावर वाटलं. तुंगभद्रा बर्‍यापैकी कोरडीच होती. पण त्यातील पाण्यामुळे तयार झालेल्या अश्मकलाकृती म्हणजे गोल गोल दगडांच्या जणु काही नदीपात्रात  अश्मकमलांप्रमाणे वा  नदीपात्रात तयार झालेल्या मोठ्या गोमट्या पायवाटा वाटत होत्या. दगड, शिळांचे तयार झालेले मोठे मोठे पर्वत, म्हणावेत का वाली-सुग्रीवाच्या युद्धात गदांच्या प्रहारानी वा बाणांच्या वर्षावानी फुटून चुरा झालेले डोंगर म्हणावेत?  ह्या डोंगरावर मोठ्या कलात्मकतेने स्वतःला वाटेल तसं लोटून देणार्‍या शिळा मोठ्या आश्चर्याने बघाव्यात का शिळांवर तोल साधणार्‍या कधी छोट्या तर कधी भल्या मोठ्या शिळांनी तयार झालेले मजेशीर आकार डोळे विस्फारून कौतुकानी पहात बसावेत. हा असा भूभाग दगडाळ, खडकाळ असूनही निसर्गाने  आपल्या वारा, पाऊस ,पाणी ह्या छिन्नी हातोड्याने घडवलेल्या शिळाशिल्पाने नटलेला अपूर्व वाटला. दंडकारण्यातील घनदाट झाडी संपून आपण एका वेगळ्या भूभागात  rock- garden मधे  आल्याची एक सुस्पष्ट जाणीव इथल्या पूर्ण वेगळ्या भूभागाने करून दिली. वाल्मिकी रामायणातील अरण्य काण्ड संपून येथे किष्किंधाकांड चालू होते. येथील डोंगर दर्‍या, घळया, गुहा, ही भारतीय अस्वलांना रहायला उत्तम जागा करून देतात ( Indian Sloth bear ) हे अस्वलांचं आजही रहाण्याचं ठिकाण  असेल तर रामायण काळात जाम्बवंत इथेच कुठेसा रहात असेल का? हाही विचार मनात डोकावून गेला. ह्या भागात वाली आणि सुग्रीव ह्यांचं प्रसिद्ध युद्ध झालं. वालीला असा वर होता की त्याच्याशी लढणार्‍याची अर्धी ताकद वालीला मिळत असे. त्यामुळे वाली कायमच श्रेष्ठ ठरत असे. वाली आणि सुग्रीव हे विचारांनी भिन्न असले तर दिसायला तंतोतंत सारखे होते. त्यामुळे वाली कोण व सुग्रीव कोण हे श्रीराम ओळखू शकले नाहीत. शेवटी सुग्रीवाच्या गळ्यात नीलकमलांची माला घालून श्रीरामांनी त्याला लढायला पाठवलं. आणि झाडामागून वालीला बाण मारला.ती जागा म्हणजे वालीची गुहा ती ह्याच भागात आहे. तीही यात्री पाहून येऊ शकतात. ह्याच भागात पम्पा सरोवर आणि शबरी आश्रम आहे. आमच्या सोबत असलेले काही यात्री दोनदा तीनदा एकेका ठिकाणी जाऊन आले होते. ते संपूर्ण  यात्रेचा आणि तेथील स्थळांचा अभ्यास करून शबरी आश्रम, वालीची गुहा इत्यादि आम्हाला एका दिवसात न साधलेले प्रकार पाहून आले.

आम्हाला विरुपाक्ष मंदिर आणि विजय विठ्ठल मंदिर पहायचं होतं. माथ्यावर जळते उन अशी वेळ झाली होती विरुपाक्ष हे  भव्य शिवमंदिर द्रविड शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. त्याचं वर निमुळते होत जाणारे गोपुर किंवा शिखर, नाजुक कलाकुसरीने नटलेले खांब शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आहेत. मूळ देवळाच्या शेजारीच ओवरी सारख्या जागी असलेल्या देवळांमधील लक्ष्मी व पार्वतीच्या मूर्तींचा गोडवा मनात कायमचा राहून जाणारा आहे. त्यामुळे फोटो काढण्यास मनाई असली तरी मनात चित्रित झालेल्या मूर्ती कोण पुसणार?

उन्हातान्हातही कानडाऊ करनाटकु विठ्ठलाचे श्रीमुख बघण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. तुंगभद्रेच्या काठावर असलेलं विठ्ठल मंदिर हे हम्पीचं सर्वात भव्य आणि अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहे. हम्पीला जिथे बघावं तिथे नैसर्गिक शिळाशिल्प  वाहव्वा म्हणायला लावत असताना निसर्गाला  आह्वान देत त्याहीपेक्षा सुंदर, अद्वितीय असं शिल्प मानवानी उभारून निसर्गालाही थिटं ठरवल्याचा प्रत्यय येथील मंदिरं पाहून येत होता. जणु जमिन दुभंगून एक प्रचंड दगडी रथ वर यावा त्याप्रमाणे आमच्यासमोर दगडातून साकारलेले शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले सुंदर दगडी रथरूपी भव्य मंदिराचे दृश्य उभे होते. आपल्या सुंदर मंदिरांना विरूप व्हावं लागण्याचा मुसलमानी हैदोसीचा शाप ह्याही मंदिराला आहेच. त्याच्या उरल्यासुरल्या देहाकडे पाहूनही त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती.  ह्या मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग तळघरातून जातो. देवाला परिक्रमा करताना आपण त्या मूर्तीच्या वर असू नये असे राजाला वाटले त्याच्या नम्रपणाची ही ओळख मनाला स्पर्शून गेली.  त्या मूर्ती व गाभार्‍या भोवतालून जाणारा हा परिक्रमा मार्ग अंधारा राहू नये म्हणून वरून केलेले झरोके आतला परिक्रमा मार्ग दिवे लावल्याप्रमाणे उजळून टाकतात. त्यातून येणार्‍या उन्हाच्या कडशांना हाताच्या ओंजळीत धरून तरुण तरुणी फोटो काढत होते. आनंदाने उजळलेले व सूर्य प्रकाशाने उनसावली धरलेले त्यांचे चेहरे फोटोसाठी सुंदर दिसत होते. अनाम भारतीय शिल्पींना मनोमन हात जोडले गेले. 

नजर हटणार नाही असं दगडांवरचं कोरीव काम बघण्यासाठी गाईड घेतला तर इतरवेळी नुसतं पाहून कळणारच नाहीत असे अनेक बारकावे जादुई चष्मा घातल्यासारखे सहज दिसायला लागतात. 

सूरमाधुर्य निर्माण करणारे खांब हे येथील वैशिष्ठ्य! त्यांना सारेगम खांबही म्हणतात. त्यांचे फोटो काढण्यास वा त्यावर वाजवून पहाण्यास मनाई असली तरी यु ट्युबवर ते व त्यांची करामत पाहता येते. (असेच खांब मी वेरुळ लेण्यातही अनुभवले आहेत.) मंदिराच्या कडेच्या प्रवेशद्वारातून बाहेर येताच तेथील ओवरीसारख्या भागात दगडाचा बनवलेला सोफा अस होता. गाइडने तेथे मुद्दाम बसायला सांगितले. घरच्या भुसभशीत आत धसणार्‍या सोफ्यात न मिळणारी सुखद विश्राती मिळून पाठीला बरंऽऽऽ वाटलं. त्याा दगड सोफ्याची पाठ पाठीला विश्रांती देत होतीच शिवाय बाहेर कडक उन असुनही सोफा शांत थंडगार होता. तेथे बसल्या सल्या तेथील कोरीवखांबांकडे बघत होतो. येथे कोरलेले रामायणातील प्रसंग, त्यातील बारकाव्यांसकट जेव्हा तेथील गाईड दाखवतो तेव्हा व्वा! आहाहा! असे उद्गार मुखातून निघाल्याशिवाय रहात नाहीत.

 पण हाय रे हाय!!! आत मूर्ती नसलेलं हे राऊळ कितीही सुंदर असलं. तरी मनास उदासी देऊन गेलं.

https://www.thrillophilia.com/places-to-visit-in-hampi

https://karnatakatourism.org/tour-item/anegundi/

विरुपाक्ष मंदिर -

https://indianexpress.com/article/explained/explained-history/hampi-virupaksha-temple-collapse-history-9352962/

विठ्ठल मंदिर

https://www.karnataka.com/hampi/vittala-temple/#google_vignette

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –

ललित लेख (अनुक्रमणिका)