रामायण Express भाग 21 सीतेचा शोध –

 

सीतेचा शोध –

भाग - 21

सुहृत् हो!

 ‘‘हे सीते हे लक्ष्मणा वाचव! वाचव!’’ मारीचाने रामाच्या आवाजात मारलेली आर्त हाक ऐकताच श्रीराम शहारून गेले. ज्याची भीती वाटावी अशा संभाव्य पण अदृश्य संकटाच्या भयाने त्यांचं मन ग्रासून गेलं. लक्ष्मणाला आश्रम सोडून आलेलं पाहिल्यावर मनातील भीती अजून गडद झाली. रामलक्ष्मण त्वरेने पर्णकुटीत पोचले. रामाच्या जीवाची कोण घालमेल होत होती. धावत त्याने सर्व पर्णशाळा पालथी घातली. पण सीता कुठे दिसली नाही.  पण-------!!! गवताच्या चटयांचं गवत, मृगचर्म अस्ताव्यस्त पडलं होतं. रामाला ज्या गोष्टीचं भय वाटत होतं तेच घडलं होतं. भीषण जंगलात नंदनवनाप्रमाणे वाटणारी पंचवटीतील पर्णकुटी सीतेवाचून भयाण जंगलाहूनही भयद वाटू लागली. सीतेला हाका मारत, शोधत हिंडणार्‍या रामलक्ष्मणांना सीता कुठेही सापडली नाही. सीतेला राक्षसांनी खाल्ल का पळवलं तिच्यावर कोणतं आकाश कोसळलं असेल!!! प्रत्येक कल्पना जीवाचा थरकाप करणारी होती. राक्षसांपुढे पाय रोवून खंबीरपणे उभा राहणारा शत्रुंजय राम सीतेच्या वियोगाने एखाद्या मुलासारखा हमसून हमसून रडू लागला. ‘‘लक्ष्मणा आधी मला राज्याचा त्याग करावा लागला. त्यानंतर माझ्या आप्तजनांचा वियोग मी सहन केला. माझ्या पित्याने माझ्यासाठी प्राणत्याग केला. आता माझ्या प्राणप्रिय सीतेचं कोणी हरण तर केलं नसेल?’’ उत्तर द्यायला अजुन तिसरं होतं तरी कोण? पर्णकुटी जवळील प्रत्येक वृक्षाला श्रीराम सीता कुठे गेली म्हणून विचारत होते.पण त्यांच्या  मौनाशिवाय दुसरं उत्तर नव्हतं. आरण्यरुदन म्हणजे काय हे वेगळं सांगायला नको. 

 लक्ष्मणा, मी सीतेशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणणारे रामप्रभु म्हणजे जणु दुःखरूपी दलदलीत फसत चाललेल्या सामर्थ्यवान हत्तीप्रमाणे वाटत होते ते पाहून लक्ष्मण म्हणाला, ‘‘हे महामते! शोक पुरे कर. जानकीला शोधण्याचा प्रयत्न कर. वनामधे जिथे जिथे ती मिळण्याची शक्यता आहे तिथे तिथे वेळ न काढता सत्वर चला. आपण तिला शोधून काढू.’’  रामलक्ष्मण सार्‍या वनात हिंडून आले. सीतेचा कुठेच पत्ता लागेना. श्रीरामांच्या शरीरातील जणु सारा त्राण निघून गेला. धैर्य गळून पडलं. त्यांची मति काम करेनाशी झाली. सीतेच्या आठवणींनी वारंवार हृदय भरून येऊन ते विलाप करत होते. ते पाहून लक्ष्मण परत म्हणाला, हे रामा, शोक, निराशा सोड. धैर्य धारण कर. सीतेला शोधण्यासाठी मनात उत्साह ठेव. असंभाव्य वाटणारे केवढेही मोठे दुष्कर काम असले तरी उत्साही माणूस दुःख करत बसत नाही.’’

रोजच्या सहवासाने ओळखीचे झालेले मृग मात्र जणू काही सांगत होते.  कधी रावण घेऊन गेलेल्या दिशेकडे तोंड करून तर कधी आकाशाकडे तोंड करून जणु काही सीतचा पत्ता सांगायचा प्रयत्न करत होते. ते पाहून कदाचित हाच रस्ता ते दाखवत असावेत असं म्हणून श्रीराम व लक्ष्मण त्या दिशेने म्हणजे दक्षिण दिशेकडे जाऊ लागले. तेवढ्यात वनात एक फूल पडलेलं रामाने पाहिलं. ते श्रीरामांनी वैदेहीला दिलं होतं. तिने ते केसात माळलंही होतं. तेवढ्यात गोदावरीच्या काठावर राक्षसाचं एक भलं मोठं पाऊल उमटलेलं दिसलं. तिथेच रावणाच्या भयाने सीता  झाडांमागे पळाली होती. तिच्याही पायांचे ठसे त्या जमिनीवर उमटले होते. (मित्रांनो, ज्या भूमीवर लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याचा, श्रीरामाने मारीचाला ठार मारल्याचा इतिहास आहे त्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीवर सीतेला राक्षसाच्या भयाने जीवाच्या आकांताने पळायला लागावं ही गोष्ट मनाला चटका देऊन जाणारी आहे. रामायणाची खरी सुरवात महाराष्ट्रात नासिकच्या पंचवटीत अशी झाली. ) मग सीतेच्या आभूषणांना जडवलेले सोन्याचे घुंगरू, सीतेचे आणि एका राक्षसाच्या पायांचे ठसे, तुटलेलं धनुष्य, अनेक बाण, तुटलेल्या रथाचा सांगाडा बघत असताना तेथे पडलेला रक्ताचा सडा पाहून एका वेगळ्याच भीतीने श्रीराम शहारून गेले. ‘‘सीतेच्यासंबंधी वाद होऊन राक्षसांमधे यद्ध होऊन सीतेचे तुकडे तुकडे करुन ह्या दुष्ट राक्षसांनी आपापसात वाटून तिला खाल्ल तर नसेल?’’ थोड्याच अंतरावर  रथावर असलेलं रत्नजडित छत्र तुटून पडलं होतं. पिशाचांप्रमाणे तोंडं असलेली गाढवं मरून पडली होती. त्यांच्या छातीवर सोन्याची कवचं बांधली होती. लक्ष्मणा नक्कीच ह्या राक्षसांनी सीतेला मारलं तरी असावं नाहीतर तिला खाल्लं तरी असावं

श्रीरामाच्या विलापाचं रूपांतर हळुहळु क्रोधात होऊ लागलं. ते म्हणाले, ‘‘लक्ष्मणा, त्रिपुरासुरालाही जिंकणारे महादेव त्यांच्या कपाळू स्वभावामुळे शांत बसतात तेव्हा त्यांचं ऐश्वर्य न कळल्याने सारे प्राणीमात्र त्यांचा अवमान करू धजतात. मी कायम लोकांच्या कल्याणाचा विचार करून कायम लोकहितासाठी तत्पर राहिलो. मृदु, उदार, दानी, माझ्या सर्व भावनांना वश करून जितेंद्रिय राहिलो तर हे देवसुद्धा मला निर्बळ समजायला लागले.  आज माझा दयाळुपणाच जणु माझा दोष झाला आहे. माझ्यात काही दम नाही, मी सामर्थ्यहीन, कमकुवत, अगतिक, लाचार आहे असं समजून माझ्या सीतेचं अपहरण केलं गेलं. आता प्रलयकाळी सर्वांच्या संहारासाठी प्रकट होणार्‍या सूर्याप्रमाणे माझा प्रचंड पराक्रम मला दाखवावा लागेल. माझ्या पराक्रमाने आता ह्या जगातील कोणीही सुखाने राहू शकणार नाही. मी माझ्या अमोघ बाणांनी ह्या सर्वांचा नाश करीन.’’ असे म्हणत श्रीरामांनी त्याचं  धनुष्य हातात घेतलेलं पाहून लक्ष्मण हात जोडून श्रीरामांच्या पुढे उभा राहिला.  ‘‘रामा, शांत हो! शांत हो! तू स्वभावतःच मृदु, जितेंद्रिय, लोकांच्या हितासाठी तत्पर आहेस. आज अचानक रागाच्या भरात कोणा एकाच्या अपराधासाठी तू सर्वांना शिक्षा देऊ नकोस. राजा स्वभावाने शांतच असावा. लोकांच्या अपराधानुसार त्याने दंड द्यावा. एखाद्या स्त्रीचं अपहरण किंवा नाश कोण योग्य म्हणेल? पण नद्या, समुद्र, पर्वत, देवता, गंधर्व, दानव हे कोणी तुझ्या विरुद्ध वागायला धजावणार नाहीत. हे राजा ज्याने सीतेचं अपहरण केलं त्याला आपण शोधून काढलं पाहिजे. जर आपल्याला त्यात कोणी मदत केली नाही तर तू सर्वांचा खुशाल संहार कर. हे नरश्रेष्ठ ह्या भूतलावर कोणवर संकटं येत नाहीत? तू धीर धर. विदेहराजकुमारी सीता मरण पावली वा नष्ट झाली तरी सामान्य असंस्कृत अशिक्षित लोकांप्रमाणे तू शोक वा चिंता करणं उचित नाही. तुझ्यासारखे सर्वज्ञ पुरूष भयंकर आपत्तीतही खेद, शोक आवरून आपली सदसत् विवेक बुद्धी कायम जागृत ठेवतात. काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्याचा तत्त्वनिष्ठ विचार कर. हे वीरवर हा सर्व उपदेश पूर्वी तू मला वारंवार केला आहेस. आता हा उपदेश तुला कोण शिकवणार? प्रत्यक्ष बृहस्पती आला तरी त्याला तुला हा उपदेश करण्याची ताकद नाही.  तू प्रज्ञावंत आहेस. अत्यंतिक शोकामुळे तुझ्या सुप्तावस्थेत गेलेल्या ज्ञानाला परत जागवण्याचा मी प्रयत्न करतोय. इक्क्ष्वाकु कुळशिरोमणी!  तुझ्या मानवी वा देवतुल्य पराक्रमाचा समयोचित उपयोग करून शत्रूचा वध केला पाहिजे. संपूर्ण जगाचा विनाश करून काय साधणार जे पापी, अपराधी असतील त्या शत्रूंचा शोध घेऊन त्यांना मूळापासून उखडून फेकलं पाहिजे.  

सूर्यात अंगभूत तेज असतच. वायूत स्वतःची गती असतेच त्याप्रमाणे रामा, तुझ्यामधे यश आहेच. ’’

श्रीराम आपल्या अनुज (धाकट्या भावाचा) लक्ष्मणाचे सुयोग्य  खडे बोल ऐकून त्याच्याशी सहमत झाले.

(मित्रांनो, लक्ष्मणाचा हा सुंदर उपदेश महाराष्ट्राच्या भूमीने अनुभवला असणार. आपल्यात मुरवला असणार. सीतेचं अपहरण पाहून व्यथित झालेली ही भूमी शोकाकूल प्रभुरामचंद्रांनाही योग्य मार्गावर आणणारे लक्ष्मणाचे विवेकपूर्ण भाषण ऐकून विवेकयुक्त चैतन्याने मोहरून आली असेल. आमच्या रामायण express च्या प्रवासात राम,लक्ष्मण,सीता ह्या सर्वांची अनेक देवळं पाहिली पण एकट्या लक्ष्मणाचं देऊळ फक्त नासिकलाच पाहिलं. वेळ प्रसंगी मोठ्या भावालाही धीर देणारी किंचित कडक वाणी म्हणूनच महाराष्ट्राने आत्मसात केली असावी. अशा ह्या अमोघ वाणीच्या लक्ष्मणाचा परिचय करून दिल्याशिवाय लेखणीला पुढे जावसं वाटलं नाही.)  

---------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)