रामायण Express भाग 23 राम सुग्रीव भेट

 

रामायण Express

भाग 23

 राम सुग्रीव भेट

मित्रांनो, आपण होस्पेटहून छान A.C गाडीने, गुळगुळीत रस्त्यावरून एकेकाळी विजयनगरचं साम्राज्य असलेला तर त्याही आधी हजारो वर्ष वानरराज सुग्रीवाची राजधानी असलेला अनेगुंडी, हम्पी ह्या इतिहासाने समृद्ध भागात  मतंगमुनीच्या आश्रमात शबरीला भेटलो व वानरराज सुग्रीवाच्या किष्किंधा नगरीला पोहोचलो.

पण!! श्रीराम व लक्ष्मण दोघे रघुवंशी सर्व आयुधं, आणि त्यांचं जीवन निर्वाहाचं सामान घेऊन पायीपायी किती अंतर चालून येथे पोचले असतील? पम्पा सरोवर व तेथील निसर्गसौंदर्य पाहून एकाचवेळी श्रीरामांना त्या पम्पा सरोवराच्या सौंदर्याने भुरळही घातली आणि सीता विरहाने हृदयात खोलवर झालेल्या जखमेने असह्य पीडाही होऊ लागली. ऊद्विग्न मनाने शोकात बुडलेल्या श्रीरामांना वारंवार लक्ष्मण धीर देत आहे. कधी मधुर वाणीने तर कधी थोडसं रागावूनही. वारंवार लक्ष्मण रामाला सांगत आहे, ‘‘तुझा दीनवाणेपणा सोड. धैर्य धर. उत्साहाने केलेल्या योग्य कार्यातूनच कार्यसिद्धी होऊन आपल्याला पाहिजे ते फळ मिळेल. शोक मागे सोडून दे. सीता सीता करत एखाद्या कामुक पुरुषासारखा रडू नकोस. तो काही तुझा खरा स्वभावही नाही. पण ह्यावेळेला तुला तुझ्या पराक्रमाचा विसर पडलाय. तू जर हिम्मत धरलीस तरच आपण सीतेचा शोध घेऊ शकू.’’ लक्ष्मणाच्या वरवरच्या कठोर भाषणामागे दडलेला अत्यंत प्रेमळ, स्वतःच्या जीवापेक्षा श्रीरामांची काळजी करणारा, काळजी घेणारा लहान भाऊ श्रीरामांना कळत होता; म्हणूनच श्रीराम वारंवार लक्ष्मणाचा ‘हे सौम्य’ म्हणून उल्लेख करतात.

लक्ष्मणाच्या अशा प्रकारे धीर देण्याने श्रीरामही सावध झाले. दोघे पम्पाच्या काठाने पुढचा रस्ता चालू लागले. त्याचवेळी पम्पा सरोवराच्या तटावर फिरणार्‍या सुग्रीवाने मत्त हत्तीप्रमाणे धीम्या पण दमदार गतीने चालणार्‍या ह्या दोन शस्त्रसज्ज राजपुत्रांना पाहिलं आणि वालीने माझा नाश करायला छद्मवेशात ह्या दोघा वीरांना पाठवलं असावं ह्या कल्पनेने तो मनात अत्यंत घाबरला. अद्ययावत आणि श्रेष्ठ आयुध धारण केलेले हे दोघे ऋष्यमूक पर्वताच्या दिशेने येताना पाहून सुग्रीवाचे सारे सहाय्यक वानर एका पर्वतावरून दुसर्‍या पर्वताच्या शिखरांवरून उड्या मारत सुग्रीवाच्या जवळ येऊन सुग्रीवाला घेरून उभे राहिले. सुग्रीवाला दिलासा देत मारुतराय म्हणाले, तुम्ही सर्वांनी घाबरायचं काहीच कारण नाही कारण हा मलय नावाचा उंच पर्वत आहे. येथे वाली येणार नाही.

पण सुग्रीवाने आपल्या मनातील भीती मारुतरायाला बोलून दाखवली. ‘‘ह्या दोघांकडे असलेली अद्ययावत श्रेष्ठ दर्जाची शस्त्र पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. हे छद्मवेशी आपल्या मनात विश्वास उत्पन्न करून आपला घात करू शकतात. वाली तर दुसर्‍याला फसवण्यात अत्यंत कुशल आहे. राजाला माहिती कळण्याचे अनेक मार्ग असतात. आणि दुसर्‍याला फसवण्याचेही! हे वीरवर तू अत्यंत सामान्य गाववाल्याचा वेश करून जा आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलून त्यांच्या मनातील नेमका उद्देश्य जाणून घे. त्याच बरोबर वारंवार तू वानरराज सुग्रीवाचे गुणगानही कर म्हणजे त्यांच्या मनातील खरे भाव ताडता येतील.’’

त्यानुसार मारुतरायाने एका सामान्य भिक्षुचा वेश घेतला आणि तो रामलक्ष्मणाजवळ पोचला. श्रीराम व लक्ष्मणापाशी येऊन त्यांना  अत्यंत आदराने नमस्कार करून मधुर वाणीने चौकशी करायला सुरवात केली. त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करून त्यांचा ह्या जंगलात येण्याचा उद्देश ही विचारला.

इतकं बोलूनही ते दोघं आपला परिचय देत नाहिएत हे पाहून त्याने धर्मात्मा सुग्रीवाची हकिगत सांगायला सुरवात केली. मी त्याचा मंत्री असून सुग्रीवाला आपल्या दोघांशी मित्रता, सलोखा पाहिजे हेही त्याने सांगितले. मी पवन कुमार असल्याने मी कुठलाही वेश धारण करू शकतो. इतकं बोलून मारुतराय मौन झाले.

मारुतरायाचं भाषण ऐकून हा सामान्य भिक्षु नाही हे रामाने ताडलं. चारही वेदांचं शिक्षण झाल्याशिवाय कोणी इतकी बिनचूक ,व्याकरण शुद्ध, आणि तरीही दुसर्‍याचं मन जिंकणारी भाषा वापरून मधाळ संभाषण करू शकणार नाही. मारुतरायाच्या संभाषणावेळी त्याच्या भुवया, डोळे, कपाळ, तोंड किंवा बाकी शरीराद्वारेही अत्यंत संयमित, सुसंस्कारी हावभाव, हलचाली होत होत्या. शब्दोच्चार सुस्पष्ट आणि खणखणित असले तरी ओरडल्यासारखे वा तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखे नव्हते.

त्यातील खरेपणा ओळखून रामाने लक्ष्मणाला त्याच्याशी बोलणी करायला सांगितली. त्याप्रमाणे लक्ष्मणानेही हनुमानाशी बोलणी केली. ‘‘हे पवनपुत्रा तू सत्पुरूष आहेस. आम्हाला सुग्रीवाची मित्रता मान्य आहे.’’ नंतर हनुमानाने त्यांना त्यांचा परिचय आणि इतक्या गहन वनात येण्याचं कारण विचारलं. आणि मारुतराय आणि लक्ष्मणाने एकमेकांना आपले पूर्व इतिहास सांगितले. दनु नावाच्या दैत्याने/ कबंध राक्षसाने  आम्हाला सीतेला शोधण्यासाठी सुग्रीव मदत करेल असे सांगितल्याने सर्व जगाचा त्राता राम आज सुग्रीवाला शरण आल्याचे लक्ष्मणाने सांगितले. सुग्रीवही सीतेला शोधण्यासाठी आपली सर्वतोपरी मदत करेल असे मारुतरायाने अत्यंत हर्षभराने सांगितले. मारुतरााचा बोलतानाचा तो उत्साह पाहून लक्षमण म्हणाला, ‘‘रामा ह्याच्या उत्साहावरून असं वाटतय की सुग्रीवालाही आपल्याकडून काही कामाची अपेक्षा असावी. अशा स्थितित आपलं काम झालं अस समजायला हरकत नाही.’’

 हया संभाषणानंतर मारुतराय दोघांनाही ऋष्यमूक पर्वतरांगांवरील मलयपर्वत नावाच्या शिखरावर सुग्रीवाच्या भेटीला घेऊन गेले. आणि त्या दोघांचा परिचय सुग्रीवाला दिला. रामलक्ष्माणाचे गुणगान करून हे दोघे भाऊ सीतेला शोधण्यासाठी आपली मदत घेण्यासाठी आल्याचेही सांगितले. मारुतरायाचं संभाषण ऐकून सुग्रीव श्रीरामांना सुखद वाटेल अशा रूपाने श्रीरामांजवळ येऊन म्हणाला, प्रभो, आपण अत्यंत सुशिक्षित, धर्मज्ञ, परम तपस्वी, दयाळू असूनही माझ्यासारख्या वानराशी मैत्री करायची इच्छा प्रकट केली हा माझा मोठा सत्कारच आहे. जर आपण मैत्रीची कामना ठेवत असाल तर माझा हात मी पुढे केलेलाच आहे. तो आपण हातात घेऊन आपली मैत्री अतूट राहील ह्याची ग्वाही द्या.

सुग्रीवाच्या सुभाषितासारख्या सुंदर भाषणाने श्रीरामांचं मनही प्रसन्न झालं. सुग्रीवाे मैत्रीसाठी पुढे केलेला हात आपल्या हातात घेऊन किंचित दाबत त्याने शोकात बुडालेल्या सुग्रीवाला गाढ आलिंगन दिलं.

हनुमानानेही आपलं भिक्षुरूप सोडून मूळ रूप धारण केलं. लाकडं घासून अग्नी प्रज्वलित करून साक्षीरूपात दोघांच्या मधे ठेवला. श्रीराम आणि सुग्रीवाने अग्निप्रदक्षिणा केली आणि एकमेकांशी दृढ मित्रता केली.

दोघांचं दुःख एकच होतं. दोघांनीही एकमेकांना आपली कथा सांगतली. रामाची कथा ऐकल्यावर सुग्रीव तातडीने त्याच्या गुहेत जाऊन एका उत्तरीयात बांधलेले काही दागिने घेऊन आला. रावणाने सीतेचे हरण करताना विलाप करणार्‍या सीतेने एका पर्वतावर चार वानर बसलेले पाहून त्यांच्यामधे पडतील असे टाकलेले होते. श्रीरांमांनी ते लक्ष्मणाला दाखवले. लक्ष्मणा, बघ, बघ हे सारे सीतेचेच दागिने आहेत. लक्ष्मण म्हणाला, हे रामा! हे बाजुबंद  वा कुंडल मला परिचित नाहीत पण रोज सीतामातेला अभिवादन करताना दिसणारे हे तिच्या पायातील पैंजण मी ओळखतो. परत एकदा रावणानेच सीतेचं अपहरण केल्याचं नक्की झाल्यावर श्रीरामांचा क्रोध अनावर होऊन त्यांनी रावणाला यमसदनाला पठवण्याची प्रतिज्ञा केली.

सुग्रीवानेही रामाला शोक न करण्याविषयी विनवले आणि मैथिलीला शोधून काढण्याची सत्यप्रतिज्ञा केली. श्रीराम म्हणाले, मीही तुझ्यासाठी काय करू ते तू निःसंकोच सांग. वर्षाकाळी पेरलेलं बीज जसं नक्की रुजून बहरून येतं त्याप्रमाणे तुझं मनोरथ नक्की पूर्ण होईल.

-------------------------------

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)