रामायण Express – भाग 24 वालीचा वध –

 

रामायण Express –

भाग 24

वालीचा वध –

  वाली अजेय वीर होता. जो कोणी त्याच्यासी लढेल त्याची अर्धी ताकद वालीला मिळेल असा त्याला वर होता. त्यामुळे त्याच्याशी युद्ध करायला सुग्रीव घाबरत होता. पण रामाच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने ललकारून युद्धासाठी आलेल्या वालीवर श्रीरामाने बाण सोडला. वाली पडला. मृत्यूशी झुंजणारा वाली रामाला म्हणाला, ‘‘रघुनंदन! आपण राजा दशरथाचे कीर्तीमान पुत्र आहात. मी काही तुमच्याशी लढायला आलो नव्हतो. आमचं आपापसात युद्ध चालू असताना मला मारून आपण कोणता मोठा पराक्रम साधला? आपण सत्त्वगुणसम्पन्न, कुलीन, तेजस्वी, उत्तम व्रताचं आचरण करणारे, करुणेचा सागर, प्रजेचे हितैषी, समयोचित कार्य करणारे, महान उत्साही आणि काय काय आहात असं मी ऐकून होतो. प्रत्यक्षात मात्र आपला विवेक नष्ट झालेला दिसतो. माझ्या सारख्या निरपराधावर बाण सोडून आपण मला ठार मारलत. हत्तीला पकडायला खेडा करताना ज्याप्रमाणे मोठ्या खड्ड्यावर गवत पसरून ठेवतात  त्याप्रमाणे मला धोका देऊन आपण मला ठार मारलत.’’

श्रीराम म्हणाले, ‘‘वाली, तुला धर्म, अर्थ, काम  समयोचित लौकिक सदाचाराचाही परिचय नाही आणि एखाद्या बालबुद्धी अजाण मुलाने काहीही बरळावं तशी माझी निंदा करतोस? तू कुठल्याही ज्ञानवृद्ध, बुद्धिमान आचार्यांचा परामर्श न घेता, त्याच्याशी सल्लामसलती विनाच मला ज्ञान शिकवतोयस. तू जीवनामधे फक्त कामवासनेला प्राधान्य दिलस.

थोरला भाऊ, पिता आणि ज्ञान देणारा गरू हे कायम पितृतुल्य असतात. त्याच प्रमाणे धाकटा भाऊ , पुत्र आणि गुणवान शिष्य हे पुत्रतुल्य असतात.

 सज्जनांचा न्याय हा सूक्ष्म असतो. दुर्ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासाठी अवघड असतो. तुझा स्वभाव तर चंचल आहेच पण कोणा नीतीमान सज्जन, धर्मज्ञाचा सल्ला सोडून तू तुझ्यासारख्याच चंचल बुद्धीच्या, उथळ, अडाणी वानरांकडून परामर्श घेतोस. तुला धर्म काय समजणार? मी तुला का मारल ह्याच कारण ऐक. तू तुझ्या मुलाप्रमाणे असलेल्या तुझ्या धाकट्या भावाच्या पत्नीचा उपभोग घेतोस? ती तुझ्या सुनेसारखी वा मुलीसारखी आहे. कामवासनेने पिसाटलेला तू, तिच्यावरही बलात्कार करतोस? राजा असूनही तू स्वतःच स्वेच्छाचारी, धर्मभ्रष्ट, कामवासनेने बरबटलेला आहेस. स्वतःच्या भावाच्या धमपत्नीला तू तुझी कामवासना शमविण्यासाठी मिठीत ओढतोस? जो अशाप्रकारे प्रजेविरुद्धच आचरण करत असेल, ज्याला उचित लोकाचारही माहित नाही त्याला दंड देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्या संपूर्ण भरतखंडावर इक्क्ष्वाकु कुलाच्या राजा भरताचं राज्य आहे. राजा भरत धर्मात्मा आहेत. ते सत्यवादी, सरळ, धर्म, अर्थ, काम हया तत्त्वांचे जाणकार आहेत. दुष्टांचं पारिपत्य करणे आणि सज्जनांचं रक्षण करणे ते जाणतात. राजा भरताच्या वतीने सर्व राजांना लोकहिताच्या नियमांचं पालन करण्याचा आदेश देत, नीती, नियम, सत्य, पराक्रम हे राजोचित गुण दृढतमपणे स्वतःत बाणवा हे सांगत आम्ही भरतखंडात सर्वत्र जात आहोत.

मी क्षत्रीय कुलोत्पन्न असल्याने तुझ्या अपराधांना क्षमा करू शकत नाही. जो पुरूष आपली कन्या, बहिण अथवा धाकट्या भावाच्या पत्नीकडे पापबु्द्धीनी जातो; त्याच्यासाठी एकच  शिक्षा, एकच दंड सांगितला आहे तो म्हणजे त्याचा वध!

मित्रांनो, दरवेळी वालीवधावर आक्षेप नोंदविणार्‍या विद्वानांमुळे माझ्यासारख्या सामान्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतो त्याचं उत्तर रामाच्याच शब्दात पण थोडक्यात दिले आहे. मला वाटते, नक्की पटण्यासारखे आहे.

ठकासी असावे महाठक । उद्धटासी उद्धट।

खटनटासी खटनट । झालेची पाहिजे ।।

जय जय रघुवीर समर्थ!

-----------------------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)