रामायण Express – भाग 27 वाल्मिकी रामायण- सीतेच्या शोधात वानरसेना-
रामायण Express –
भाग 27
वाल्मिकी रामायण-
सीतेच्या शोधात वानरसेना-
मित्रांनो, भूतकाळात घडलेल्या प्रसंगांची सुसंगतवार शृंखला आपल्याला
माहित असते; त्यामुळे त्यातील कुठला प्रसंग असा घडला असता तर--? ह्या विचारांनी मन
तितकं आशंकित होत नाही. मनाचा थरकाप होत नाही कारण भविष्यातली पुढची घडी, पुढचा क्षण
काय झाला होता हे ज्ञात असतं. धक्क्याची तीव्रताही पातळ झालेली असते. पण तोच प्रसंग वर्तमानकालात चालू
असला तर आपण त्या प्रसंगातील पात्र असू शकतो. प्रत्येक प्रसंग असा घडेल का तसा घडेल
ह्या भीतीने , काय योग्य काय अयोग्य, कुठला मार्ग आपल्याला यशापर्यंत पोचवेल? इत्यादि
विचारांनी शंकित असतो.
वालीपुत्र अंगदाचंही तस होत
होतं. सुग्रीवाच्या आज्ञेनुसार सर्व वानर सीतेला
शोधायला बाहेर तर पडले पण म्हणावं तसं यश येत नव्हतं. सुग्रीवाने घालून दिलेली 1महिन्याची
मुदतही संपली होती. मयसूराने निर्माण केलेल्या एका गुहेत सर्व वानर गेले खरे पण त्या
गुहेतून बाहेर पडायचा रस्ता बंद झाल्याने त्याना उशीर झाला होता. स्वयंप्रभा नावाच्या
तापसीने त्याना बाहेर काढले. आपण परत गेलो तर सुग्रीव आपल्याला देहदंड देईल ह्या कल्पनेने
वालीपुत्र अंगद मनातून धास्तावला होता. मी वालीपुत्र, शत्रूचा मुलगा असल्याने सुग्रीव
काही ना काही कारणाने वा गुप्तपणे माझा वध करेल ह्याचीही शंका व चिंता त्याच्या मनात
कायम सतावत असे. वालीचं राज्य सुग्रीवाला दिल्यावर युवरापदावर माझा अभिषेक श्रीरामांनी
केला आहे. सुग्रीवाने नाही. आपण सीतेला न शोधताच परत आलो हे सुग्रीवाला कळलं तर श्रीरामांना
खूष करायला तो आपला बळी नक्की देईल. त्यापेक्षा आपण इथेच त्या मायावी गुहेत जाऊन राहू;
तेथे आपल्याला कोणी सापडवून काढू शकणार नाही.
असा विचार त्याच्या मनात मूळ धरत होता. अंगद
आणि तारचे हे विचार ऐकून अनेक वानर त्यांच्या बाजूने बोलू लागले.
अंगद सर्व गुण सम्पन्न आणि
वालीसारखाच कर्तृत्तववान होता. तार वानराच्या बहकाव्यात येऊन तो आपल्या वानरांच्या
कळपाला फोडू शकतो हे पाहून हनुमानाने भेद नीतीचा अवलंब केला. ‘‘तारानंदन ज्या वानरांवर
तुझा विश्वास आहे ते तुला साथ देतील असं वाटतं का? ते अत्यंत चंचल आहेत. उद्या त्याच्या
पत्नीपासून, मुलाबाळांपासून, परिवारापासून ते तुटले गेले, अलग झाले तर ते तुझं ऐकतील
असं तुला वाटतं का? कदापी नाही. त्याउलट हे
नील, जाम्बवान्, सुहोत्र असो किंवा मी असो तुझ्या साम, दाम, दंड, भेद ह्या कुठल्याही
नीतीला आम्ही बळी पडणार नाही आणि सुग्रीवाची साथ सोडणार नाही; त्यामुळे सुग्रीवाचं
पारडं कायम तुझ्यापेक्षा भारी असेल. आणि तुला वाटत असेल की ही गुहा तुझं मातेप्रमाणे
रक्षण करेल तर तुला हेही सांगतो की, लक्ष्मणाचे तीक्ष्ण, वेगवान बाण ह्या गुहेला कधीच
विदीर्ण करतील. तुझ्या मनात जी शंका आहे ती खरी नाही. योग्य वेळ आली की वानरराज सुग्रीव
तुला राज्यावर बसवतील.
अंगद म्हणाला, ‘‘सुग्रीवावर
विश्वास कसा ठेवावा? माझ्या पित्याने राक्षसाशी लढताना संरक्षणार्थ गुहेच्या दाराशी त्यांना नियुक्त केलं असतानाही ते
ती गुहा बंद करून निघून गेले; मातेसमान असलेल्या आपल्या वहिनीला, माझ्या मातेला त्यांनी
नीचपणे, असभ्यपणे पत्नीरूपात ग्रहण केलं, इतकच नाही तर--- तर ज्या श्रीरामांना अग्नीसाक्षीने
सीतेच्या शोधाचं वचन दिलं तेही ते विसरले आणि सुखोपभोगात रमले. फक्त लक्ष्मणाच्या भयंकर
क्रोधापुढे विवश होऊन ते श्रीरामांना मदत करायला तयार झाले ते शत्रूच्या मुलाला जिवंत
ठेवतील काय? त्यापेक्षा मी येथेच आमरण उपवास करू मरून जाईन. अंगदाच्या बोलण्याने गहिवरलेले
अजून काही वानरही अंगदाबरोबर तेथे बसूनच मरणमार्ग पत्करण्यावर राजी झाले.
सारे तेथे बसून आपल्या नशिबाला दोष देत होते. हया कैकेयी मुळे हे सगळं
घडलं. रामाला वनवास, सीताहरण, जटायू मरण-------
पण तेवढ्यात एका भल्या मोठ्या गिधाडाचं लक्ष त्या बसलेल्या वानरांकडे गेलं आणि आपण एकेक
करून सर्व वानरांना खाउन टाकू असं म्हणत तो त्यांच्या दिशेने यायला निघाला. पण ह्या
वानरांच्या तोंडून जटायूचं नाव ऐकल्यावर तो त्यांच्यापाशी येऊन त्यांची व ते काय म्हणत
आहेत त्याची चौकशी करू लागला. जटायूच्या मृत्यूने तो दुःखी झाला. तो जटायूचा मोठा भाऊ
संपाती होता. त्याने जटायूला सूर्यापासून वाचवताना
आपले पंख कसे जळले ह्याची कहाणी त्यांना सांगितली त्याच सोबत रावण सीतेला घेऊन जाताना
पाहिल्याचेही सांगितले. इतकच नाही तर संपातीचा पुत्र सुपार्श्व आकाशातून येत असताना
एक काळा पुरूष एका सुंदर स्त्रीला लंकेला घेऊन गेल्याचे त्याने पाहिल्यचेही त्याने
वानरसेनेला सांगितले. ती ‘‘हे राम, हे लक्ष्मण’’ म्हणून आक्रोश करत होती. वानरसेनेला
रावण सीतेला समुद्रापार लंकेत घेऊन गेल्याचं तेव्हाच कळलं.
सम्पाती चे पंख जळून गेल्याने तो उडू शकत नव्हता. दु;खी होता. त्यावेळी
तेथे राहणार्या भगवान निशाकर ऋषींनी त्याला सांगितलं होतं की, ‘‘संपाती तू चिंता करू
नकोस, तू दुसरीकडे कुठेही न जाता येथेच रहा.
माझ्या तपोबलाने मी तुला सांगतो की, इक्ष्वाकु वंशातील राजपुत्र श्रीराम व लक्ष्मण
ह्या वनात येथे येतील. काळाची प्रतिक्षा कर तेव्हा तुला नवीन पंख येतील. तुझी क्षीण
झालेली ताकद परत तुला प्राप्त होईल’’. असं म्हणत असतांनाच अंगदाच्या देखतच संपातीला
नवीन पंख फुटले. ते पाहून सर्व वानरसेनेचा उत्साह दहापटीने वाढला. पण समोर असीम सुमद्र
पसरलेला होता. अंगद म्हणाला, आपल्यापैकी कोण सर्वात जास्त बलवान आहे? कोण हा समुद्र
ओलांडून जाईल? सारी वानरसेना मौन झाली.
थोड्याच वेळात सर्व वानरसेना लांब उड्या मारून आपण किती अंतर जाऊ शकतो
हे पाहू लागली. पण कोणी लंकेपर्यंत पोचू शकणार नव्हता. अंगद म्हणाला मी लंकेपर्यंत
जाऊ शकेन पण परत येण्याएवढी ताकद माझ्यात नाही. तेव्हा जाम्बवंत म्हणाला, अंगद तू आमचा
गुरूपुत्र आहेस. आम्ही सर्वजण तुझ्या आश्रयाने आहोत. तू जाणे केव्हाही उचित नाही. त्यानंतर
जांबवानाने मारुतरायाला त्याने लहान असताना कशी सूर्यापर्यंत झेप घेतली होती ह्याची
आठवण करून दिली. तो आपल्या पित्याप्रमाणे कितीही योजनं दूर जाऊ शकतो असं पित्याचं त्याला
वरदान असल्याची गोष्टही सांगितली आणि त्यानुसार
महेन्द्र पर्वतावर चढून मारुतरायाने थेट लंकेत पोचेल अशी मारलेली हनुमान उडी आपल्याला
ज्ञात आहे.
मारुतराय नुसतेच लंकेत पोचले नाहीत तर त्यांनी अशोकवनातील सीतेलाही हुडकून काढलं. मित्रांनो, आपण न पाहिलेल्या
व्यक्तीला एखाद्या विशाल देशातून शोधून काढणं काय सोपं काम आहे का? त्यासाठी एखाद्या
निष्णात गुप्तहेराचीच तरबेज नजर पाहिजे. सीतेच्या मनात विश्वास उत्पन्न करायला स्वभावतःच
सत्यवादी, चतुर, राजनीतीज्ञ मुत्सदीपणाही हवा.
त्याचप्रमाणे मारुतरायाची भेट लंका नगरवासीयांच्या आणि लंकाधीशाच्या
सैन्याच्या मनात चांगलीच जरब उत्पन्न करून गेली. एकट्या पवनसुताने वादळी वार्याप्रमाणे
लंकेत थैमान घातलं. अशोक वाटिकेचा विध्वंस केला. रावणाच्या कुलदेवतेचं स्थान असलेला
चैत्यप्रासाद तोडून फोडून टाकला. त्यातील सोन्याच्या खांबांना शंभर धारा होत्या. त्याने
तेथीलच सोन्याचा खांब उपसून काढून युद्ध करण्यासाठी त्याच्यावर धावून आलेल्या सैनिकांना
त्याचे तडाखे देऊन ठार मारलं. चैत्यप्रासादावर उभं राहून हनुमानाने ‘‘अस्त्रवेत्ता
श्रीराम आणि महाबली लक्ष्मण की जय! सुग्रीव की जय’’ च्या घोषणा द्यायला सुरवात केली.
मी पवनपुत्र हनुमान श्री रामचंद्रांचा दास असून शत्रूसेनेचा संहार करणार आहे’’ असं
म्हणत रावणाच्या पाच सेनापतींचा वध केला.,
रावणाच्या मुलाचा अक्षपुत्राचा वध केला. प्रहस्तपुत्र जम्बुमालीलाही एका वृक्षाच्या
तडाख्याने गारद केलं. सात मंत्रीपुत्रांचाही विनाश केला. शेवटी इंद्रजीताने ब्रह्मास्त्राने
बांधल्यावर आणि शेपटीला आग लावल्यावर ह्या
वायुसुताने सारी लंका त्या अग्नीने जाळून टाकली. सारीकडे हाहाःकार माजला. सेवकच इतका
भीषण असेल तर ह्याचा स्वामी किती घातक असेल अशी जबरदस्त दहशत सार्या लंकेवर बसवूनच
माारुतराय सीतामाईचा संदेश घेऊन श्रीरामांकडे परत आला लंकेची रचना तेथील दुर्गाची रचना,
दुर्गाचे प्रवेशद्वार, सेना विभाग, सर्व सर्व इत्थंभूत माहिती किष्किंधेला येऊन त्याने
श्रीरामांना दिली. रघुत्तमाने हनुमानाला गाढ आलिंगन दिलं.
सर्व सेनेच्या संचलनाचं योग्य
नियोजन करून त्याचा आराखडा व प्रत्येकास कामाची नेमणूक देऊन मधे येणार्या अडचणीं व
संकटांची नीट जाणीव करून देऊन त्यांच्यापासून सावध राहण्याचे सुचवले. सर् आराखडा पक्का
करून, समजावून उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सर्व सेना व्यूह बनवून लंकेकडे कूच झाली.
आण मजल दरमजल करत समुद्र किनार्यावर येऊन थांबली. विश्वकर्म्याचे पुत्र नल आणि नील
यांनी धनुष्कोडीला महासेतूचं निर्माणकार्य
प्रारंभ केलं. ह्या सेतूवरून श्रीरामाची वानरसेना लंकेत पोचली आणि ह्याच रामसेतूवरून
लंकाविजय करून सीतामाईसह परत आली.
ही सर्व ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना रामाच्या अचाट पराक्रमाचा आवाका स्तंभित
करत होता. गोष्टीत आणि गोष्टीपुरताच वाटलेला विस्मय आज प्रभु रामचंद्रांच्या पराक्रमाचं
मोल अनमोल आहे हे जाणून आम्हाला त्या महान विभूतीसमोर नम्र करत होता. यात्रेचा उद्देश
मनात खोलवर ठसत होता.रामाचं पुष्पक विमान ळंकेहून भद्राचलम् हून नागपूर मार्गे अयोध्येला
पोचलं. तर आम्ही नागपूरला!
-----------------------
लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment