रामायण Express - भाग - 28 रामटेक (नागपूर)

 

रामायण Express -

भाग - 28

रामटेक (नागपूर)


सुहृत् हो!

आमच्यासोबत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड मधे स्थायिक झालेले काही परदेशस्थित अनिवासी भारतीय ही होते. ललिता लंडनहून आली होती. तिचे पणजोबा गुजरातमधे मातीची भांडी बनवणारे कुंभार होते. आज ती लंडनमधे रहात होती. सम्पन्न होती. भारतप्रेमाने भारत यात्रेसाठी आली होती. आम्ही रामेश्वरला आलो तेव्हा मंदिरात लवकर दर्शन होण्यासाठी मैत्रिणींशी बोलत बोलत तिने मोठ्या पर्समधून पाकिट काढलं. तिकिट काढून छोटं पाकीट पर्समधे टाकलं. दर्शन करून मंदिराबाहेर आल्यावर काही किरकोळ खरेदीसाठी पर्समधे हात घालते तो काय!---- पाकिटच नाही. भयंकर घाबरली. मटकन खाली बसली. जणु ब्रह्मांड आठवलं. सगळं जग आपल्याभोवती फिरतय वाटायला लागलं. तिच्या पायातले त्राणच गेले. पाकिटात पासपोर्ट, सर्व पैसे, महत्त्वाचा दैस्ताऐवज सर्व काही होते. त्यांच्याविना ती परतीचा प्रवास करू शकत नव्हती. पैसे नसल्याने परत गुजरातलाही जाऊ शकत नव्हती. देवळाच्या दरवाजातच पोलीसचौकी होती. ती मैत्रिणींसोबत धावत धावत चौकीत गेली. झालेली गोष्ट सांगितली.

पोलीस शांतपणे तिला चौकीत घेऊन गेला. एक पाकिट काढून तिच्यासमोर ठेवलं. आपलं पाकीट पाहून तिला इतका आनंद झाला की आनंदाने तिने त्या पोलीसाला मिठीच मारली.

प्रत्यक्षात पाकिट पर्समधे ठेवताना बोलता बोलता पर्समधे हात जाण्याऐवजी पर्सबाहेरच हात राहिला आणि पाकिट पर्समधे जायच्या ऐवजी भर गर्दित खाली पडलं. गर्दीत कोणी न सापडल्याने पोलीसाने नीट ठेवलं होतं. ''भारतात लोकं लुटतात, चोर्‍या करतात. तू एकटी जाऊ नकोस. तू परतही येणार नाहीस --- '' असं काहीबाही तिच्या मुलांनी, ओळखीच्यांनी तिला सांगितलं होतं. त्या सर्व पार्श्वभूमीवर तिला आलेला चांगला अनुभव पाहून ती वारंवार मोदीजींना, भारताला, भारतीय पोलीसांना धन्यवाद देत होती. आम्हालाही भारताची प्रतिमा बाहेरच्या जगात उंचावल्याचा आनंद झाला. नुसतीच काशीची गंगा रामेश्वरला वाहून आमची यात्रा सम्पन्न झाली नाही तर भारतावर लागलेले कलंकही पुसले जात आहेत हे पाहून बरं वाटलं.

----------------

परतीच्या प्रवासात श्रीराम दशाननाला धराशायी करून सीतामातेला घेऊन अयोध्येकडे निघाले. विजयाच्या दुंदुभी वाजल्या असणार. भद्राचलम् ला त्यांचं पुष्पक विमान काही काळ थांबलं असणार. आम्ही भद्राचलम् ला राम मंदिर पाहून श्रीरामांच्या विजयोत्सवात भाग घेत सुंदरशा रामायण Express ने नागपूरला पोचलो. रामटेक हा श्रीरामांचा अयोध्याच्या परतीच्या प्रवासातील दुसरा थांबा. आमची रामायण यात्रा येथे सुफळ संपूर्ण झाली.

श्रीरामांनी वनवासातील चार महिने नागपूर जवळील रामटेक वर व्यतीत केले असं म्हणतात. अगस्तीमुनींनी येथे श्रीरामांना अनेक अस्त्र- शस्त्रांचं ज्ञान दिलं. त्यात ब्रह्मास्त्राचंही ज्ञान दिलं असं सांगतात. सीतामाईही त्यांच्यासोबत येथे असल्याचा उल्लेख पद्मपुराणात आहे . म्हणजे सीता हरणाआधी श्रीराम आणि अगस्तीमुनींची ह्या रामगिरीवर भेट असावी. रामटेकला कालिदासाने मेघदूतम् लिहीलं. त्यात रामटेकचा उल्लेख रामगिरी असा येतो.

श्रीरामांमधे असलेले सद्गुण आणि जोडीला असलेला अचाट पराक्रम हेरुन हाच युवक रावणाला शिकस्त देऊ शकतो हे अगस्तींनी ताडलं असावं. संपूर्ण भारतभूमी ही इक्ष्वाकु वंशाच्या राजांच्या हाताखाली होती. छोटी छोटी राज्य आणि त्यांचे राजे होते पण सर्वांवर सत्ता ईक्ष्वाकुंची होती. त्या न्यायाने भारतातील सर्व अन्याय दूर करण्याची जबाबदारी रघुवंशाची होती. पण हे न्यायाने चालणारं राज्य रावणाला कसं पटावं? त्याने राक्षसांची जनपदे थेट उत्तरेत अयोध्येपासून ते दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत स्थापली होती.

आजही उत्तरेतील पशुपतिपासून दक्षिणेत तिरुपती पर्यंत जंगलात राहून भारतीय लोकसत्तेेला त्रास देणार्‍या, प्रगतीला खीळ घालणार्‍या नक्षल्यांना वारंवार नामोहरम करावे लागते. गाव/ग्राम ह्या अर्थी जनपद हा वाल्मिकी रामायणात वापरलेला शब्द आजही उत्तरेत जसाच्या तसा वापरला जातो.

सत्तेच्या हव्यासापायी, स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसर्‍याला ओरबाडून सहज मिळणार्‍या सुखासाठी दुष्टांना साथ द्यायला सुखलोलूप लोकांची संख्या कायम जास्तच असते. पण अशांना धडा शिकवायला एक श्रीराम आणि एक अगस्ती, एक विश्वामित्र आणि एक दाशरथी एक श्रीकृष्ण आणि एक पार्थ पुरतात.

हत्ती अवाढव्य असला तरी एक अंकुश त्याला ताळ्यावर आणायला पुरतो. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा घनदाट अंधाराला दूर करायला एक दिवा पुरतो.

छोटासा असुदेत अंकुश गजाहूनी अवाढव्य त्या

तो काबूत करे क्षणात सहजी, त्या माजलेल्या गजा ।।

राहे दाट भरून तो तम जरी, त्या दीप सारी दुरी

अंघाराहुन दीप तो चिमुकला, तेजात ना तो कमी ।।

भासे वज्र लहान त्या गिरिपुढे, सामर्थ्य त्याचे महा

आकारावर का कधी ठरतसे श्रेष्ठत्व विश्वात ह्या ।।

अगस्तीमुनींनाही राक्षसांनी कल्पनातीत त्रास, दुःख दिलं होतं. त्राटिकेने अगस्तीऋषींचा उत्तर भारतात असलेला संपूर्ण आश्रम बेचिराख करून त्यांच्या सर्व शिष्यांना, मुलांना जाळून टाकलं होतं. राक्षसांच्या त्रासाला कंटाळून अगस्ती दक्षिण भारतात येऊन राहिले होते.

आम्ही रामटेकची छोटी टेकडी चढून मंदिरात आलो.

आम्ही रामटेक/ रामगिरीचं दर्शन घेतलं. एकापुढे एक दोन मंदिरं आहेत. पुढच्या मंदिरात लक्ष्मण एकटाच आहे तर मागच्या मंदिरात राम-सीता दोघे आहेत. दरवेळी रामाच्या संरक्षणासाठी पुढे चालणारा लक्ष्मण लंका विजयानंतरही सदा सज्ज व रामापुढेच आहे. कैकयीच्या सर्व दुष्ट मनसुब्यांवर मात करत जणु खैराच्याही अत्युष्ण अग्नीतून सुवर्णाप्रमाणे उजळून निघालेली रामचरित सरिता संपूर्ण भारताला, भरतीयांना इतकच नाही तर इतर देशवासीयांनाही स्फूर्ती देऊन गेली. देत आहे आणि देत राहील !आज कित्येक हजार वर्षांनंतरही आम्ही रामचरित सरितेत पावन झाल्यासारखं वाटलं. नवीन स्फूर्ती मिळवून आम्ही परतणार होतो. जय श्रीराम!

रामटेकच्या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगातात.

ह्या भागात भरपूर पाऊस असतो.जेव्हा वीज चमकते तेव्हा वीजेच्या त्या अद्भुत प्रकाशात मंदिराच्या कळसावर श्रीरामांची प्रतिमा उजळून निघते असं स्थानिक लोक सांगतात.

हे देऊळ बांधताना त्यात वाळू वापरलेली नाही. पण आज चारपाच शतकानंतरही मंदिराचा एकसुद्धा चिरा निसटलेला नाही वा हलत नाही.

ह्या मंदिर परिसरात बांधून काढलेला एक प्रशस्त तलाव आहे. त्या तलावाचं पाणी कधीही आटतही नाही वा वहावतही नाही. कायम एकाच पातळीत पहायला मिळतं.

नागपूर पर्यंतचा आमचा ट्रेन + बस असा साडे सात ते आठ हजार कि. मि. किंवा जास्तीच चा प्रवास झाला होता. अनेक गावांना अनेक ठिकाणी आम्ही वेळे अभावी जाऊ शकलो नव्हतो हे लक्षात घेता चौदा वर्षात श्रीरामांनी व लक्ष्मणाने व सीतेने पायी प्रवास करून केवढे अंतर पार केले हे विचार करून पाहता आश्चर्यकारक आणि अद्भुत वाटणारी घटना आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगाणा---- बापरे बापरे!! आठ राज्य तर येथेच झाली त्याशिवाय नेपाळ आणि लंकेसारखे दोन परमुलूख! ते सुद्धा रानावनातून, काट्याकुट्यातून तर कधी समुद्र लंघून सतत राक्षसांशी युद्ध करत!

--------------------------------

सुहृत् हो!

आमची रामायण यात्रा येथे सुफळ संपूर्ण झाली. आमचे दिल्ली, लखनऊ आणि उत्तरेतील अनेक प्रवाशांना दिल्लीला जायचं होतं. नाागपूरला सर्वांचे निरोप घेत आमच्या गंतव्याकडे नेणारी दुसरी ट्रेन गाठायची होती. ट्रेनमधे आम्हाला घरातील मुलांच्याप्रमाणे आपलेपणाने, सतत हसतमुखाने सर्व सुविधा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांनी ‘‘माँजी! बाबूजी खाये बिगर मत जाना । ’’ म्हणत कचोरी, सँडविच कॉफी इत्यादिंची खैरात केली. इतकं सारं खाणं अशक्य होतं. ट्रेनबाहेर नागपूरचे मित्र नागपूरची सांबारवडी घेऊन हजर होते. सर्वांच्या प्रेमाने भारावून जात रामायण Express चा निरोप घेतला. सर्व कर्मचारी व सहप्रवासी गेल्या 18 दिवसात आमचा परिवार झाले होते. सर्वांसोबत फोटो सेशन, निरोपाचे हात हलवत आम्ही 20 दिवसांनी आमच्या घरी पोचलो. बरोबर बर्‍याच अनुभवाचं गाठोडं होतं. ते रसिक वाचकांसमोर उघडलं आहे. ‘‘रामायण Express’’ !!!!

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

#लेखणीअरुंधतीची-

रामायण express यात्रा वर्णन समाप्त 🙏

संपूर्ण पुस्तकरूपात एकत्रित वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

 https://lekhaniarundhatichi.blogspot.com/2024/05/blog-post.html

 


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)