रामायण Express – भाग 25 रामेश्वरम्
रामायण Express –
भाग 25
रामेश्वरम्
आपली रामायण Express ट्रेन नेहमीच्या वर्दळीच्या स्टेशन्सना न थांबता
मुख्य स्टेशन पासून जरा जवळपासच्या स्टेशनवर थांबत असे. नित्याच्या वेळेवर धवणार्या
ट्रेन्सच्या दिनचर्येत त्याने ढवळाढवळ न होता रामायण express चे यात्री जरा आरामात
चढू उतरू शकत. ट्रेन थांबली आणि दरवाजे उघडले की ट्रेनचे शस्त्रसज्ज गार्डस लगेचच त्या
त्या डब्याच्या दरवाज्या समोर सज्ज उभे असत. कोणा अनाहूत बाहेरच्यांना आत प्रवेश करू
देत नसत. त्यामुळे चोर, लुटारूंपासून गाडी शतप्रतिशत सुरक्षित असे. निर्धारित वेळेवर धाणार्या महत्त्वाच्या ट्रेन्सना
प्राधान्य मिळणे योग्यच असल्याने काहीवेळा ठरलेल्या वेळापेक्षा थोडा उशीर झाला तरी
पुढच्या गंतव्यापर्यंत जायला बसेसही बाहेर वाट बघत असत. पुढच्या हॉटेल्सचे व खोल्यांचे
आगाऊ राखीव आरक्षण असल्याने त्यासाठी यात्रींना टेन्शन घ्यायची गरज नसे. संध्याकाळी
पाच वाजता आमची ट्रेन मदुराईपासून 54 कि.मि. वर असलेल्या मनमदुराईस पोचली. पुढे रामेश्वरम् पर्यंतच्या बस प्रवासाला तीन तास लागणार असल्याने
निघण्यापूर्वीच `हाय टी’ची काळजी ट्रेनमधे घेतली गेली होती. डिनर हॉल भव्य होते. आगगाडीच्या
डब्यांना छान सजावट, दिव्यांची प्रसन्न रोषणाई,
डायनिंग टेबल्स खुर्च्या ठेऊन छानशा डिनरहॉलमधे परिवर्तित केलेले होते. टेबल्स
सुंदर लावलेली असत. बाहेरून दिसणार नाही पण आतून बाहेरचे दिसू शकेल अशा फिल्म्समुळे
आत काय आहे ह्याचा बाहेरून हिंडणार्यांना अंदाज येत नसे. खादाड मुलांना बाहेर नेण्यापूर्वी
आई जसे पोटभर जेऊ खाऊ घालून मग बाहेर नेते तसे बस ने तीन तास लागतील. वाटेत चहा कॉफी
मिळेलच हे सांगता येत नाही हे सांगणारा ब्रेडपकोडा, केक, कॉफी/चहा असा पोटभर नाश्ता
पुढे आला. ट्रेनचे 18-20 डबे भरून एकंदर 152 माणसे असल्याने प्रत्येक डब्यातील उतारूंनी
किती नंबरच्या बसमधे बसायचे आहे ह्याची फोनमधे आगावू सूचना प्रत्येकाला अॅपवर आली
होती. त्या व्यतिरिक्त महत्त्वाच्या सूचना माईकवरून प्रत्येक सीटवर ऐकू येत असे.
आमचा बसेस चा कारवाँ रामेश्वरम् च्या दिशेने निघाला. अंधार पडायला लागला
होता. बाहेर फारशी वस्ती जाणवत नव्हती. उतारूंना फ्रेश होण्यासाठी आमच्या बसेस MDS
नावाच्या बेकरीपाशी थांबल्या. बाहेर वस्ती दिसत नसली तरी बेकरीत गर्दी आणि लोकांची
वर्दळ दिसत होती. 10-15 मिनिटात बसेसचा ताफा निघाला. तो हॉटेल दैविक (DAIWIK) पाशी
थांबला. हॉटेल ऐसपैस होतं. जेवण हॉलच नावही अन्नम्! आजचा दिवस विश्रांतीचा होता. उद्या पहाटेच रामेश्वरम्
मंदिरात जायचं होतं. सगळ्या लोकांचं आवरून ते ठरल्यावेळेपेक्षा तासभर उशीर करतात हे
लक्षात घेऊन दुसर्या दिवशी पहाटेच आवरून पाच वाजता आम्ही हॉटेलबाहेरच रिक्शा घेतली.
त्याने 1000 रु. त रामेश्वम् मधील वेळेत होतील तेवढी सर्व ठिकाणं दाखवायचं कबूल केलं.
कोणाला दुखवायचं नाही पण दक्षिणेत वेळेचं भान, स्वच्छता, शिस्त हे उत्तरेपेक्षा खुप
पटिंनी चांगलं असतं. असा माझा अनुभव आहे. ‘‘आपण आधी मणिदर्शनम् ला जाऊ.’’ कृष्णा रिक्षावाल्याच्या
म्हणण्याला मान हलवत आम्ही दुजोरा दिला. कृष्णच आपल्याला पालखीतून घेऊन जाणार म्हटल्यावर
अजून काय पाहिजे! सर्व देवळं पहाटे पाच वाजताच
उघडतात. लवकर दर्शनासाठी तिकीट घेऊन त्यातल्या त्यात अखूड रांगेतून दर्शन मात्र छान
झालं. कृष्णाच्या रिक्शात पादत्राणं बिनदिक्कत ठेवून गेलो. दक्षिणेच्या देवळांची भव्यता,
गोपुरांची अस्मानी उंची, रेखीव, प्रमाणबद्ध व कमनीय मूर्तींनी सजलेले खांब आणि गोपुरं
सर्व काही स्थापत्य कलेचा अनुपम नमुना होता.
‘आपल्या पूर्वजांनी कुठल्याही यंत्रांशिवाय हे काम केलं’ हे सांगणार्यांना मात्र माझा
प्रश्न असतो; यंत्र हा शब्द रामायणाहून प्राचीन असताना; जेव्हा ही स्थापत्य शास्त्राचा
उत्तम नमुना असलेली, भूमितीतही बिनचूक असलेली मंदिरं बांधली ती काय यंत्रांविना असतील
का? आपणच आपल्या पूर्वजांना मागास ठरवणारे केवढे अडाणी! हं! एवढं मात्र खरं की, त्यांची
यंत्र एकतर भारतातून गायब तरी केली गेली किंवा ज्यांनी ज्यांनी भारतावर हल्ला केला
ते घेऊन तरी गेले असावेत. नुसतेच घेऊन गेले नसावेत तर भारतीय हे नागा सापाचे खेळ करणारे
अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्ध आहेत आणि आम्ही पश्चिमी राज्यकर्तेच सर्वश्रेष्ठ, डोकेबाज
आहोत हा कीडा आपल्या डोक्यात घालून गेले. ही आवाई आपल्यातच पसरवून गेले. ज्या पाश्चिमात्यांकडे
एकदम यंत्रयुग सुरू झालं ते कोणाच्या ज्ञानावर आधारीत होतं? हा प्रश्न आम्हाला का पडत
नाही? असो! हे माझे विचार!
मित्रांनो बहुप्रतिक्षेत असलेलं रामेश्वरम्
पहायच होतं. रामेश्वरम् च्या समुद्रात हजारो भाविक सूर्योदयालाच अर्घ्य देत होते. डुबक्या
घेत होते. देऊळ जवळच असूनही त्यावर पाटी तामीळमधे असल्याने कळायला मार्गच नव्हता. हे
कुठलं मंदिर? विचारलं तर रामेश्वरम्! एकसे
एक भव्य देवळ पाहताना आपल्या स्थापत्य विशारद, शिल्पकला पारंगत, अभ्यासू, तज्ज्ञ, कुशल
कारागिरी करणार्या आपल्या असामान्य प्रज्ञेच्या पूर्वजांना आपोआप हात जोडले गेले.
एक जलांजली समुद्रात त्यांनाही देताना आपण अशा थोर भारतीयांचे वंशज आहोत ह्या कल्पनेनी
मन भरून आलं. लोकांनी श्रद्धेने काशीहून गंगेच्या पाण्याने भरून आणलेले गडू फोडून पुजारी
ते एका बादलीत काढून घेत होता. भरलेल्या गंगाजलाच्या बादल्या रामेश्वराच्या पिंडीवर
ओतल्या जात होत्या काशीहून सुरू झालेल्या यात्रेची समाप्ती रामेश्वरला होते. समुद्र
पार करण्यापूर्वी हिमालयातील शिवाची रामाने येथे पूजा केली तेच हे शिवलिंग! उत्तरेतील अयोध्येच्या रामाच्या नावाने असलेलं हे
भारताच्या दक्षिण टोकावरील मंदिर पाहिल्यावर भारताच्या एकात्मतची प्रचिती देणारे अजून
वेगळे पुरावे कसले हवे? उत्तर भारत दक्षिण भारताहून सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा आहे
आणि म्हणून भारताचं विभाजन करायला निघालेल्या अति शहाण्यांना भारत कळलाच नाही. म्हणावे लागेल. आपलं वैविध्य हेच तर आपलं ऐश्वर्य
आहे.
‘रामर् पदम्’ -
अजूनही भली सकाळच होती. कृष्णा म्हणाला तुम्हाला
‘रामर् पदम्’ ला नेतो. त्याच्यावर विश्वास
ठेऊन आम्ही जात होतो. गल्ल्या बोळांमधून रिक्शा जात होती. सकाळी सकाळी प्रत्येक घराघरापुढे
सडा सारवण होऊन सुंदर, सुबकशा रांगोळ्या रेखल्या होत्या. झाडझूड, सडा रांगोळीनी घरं
कशी सुस्नात प्रसन्न वाटत होती. झोपडी असो की बंगला एकसे एक सुंदर रांगोळ्या बघताना,
त्या रांगोळीच्या रेखीव रेघा बघताना घरातील माऊलींच्या हातांनाही वंदन करावेसे वाटले.
आपल्या कडील झकपक घरांच्या मनोर्यात आणि शुभ्रतेचे परिमाण दाखवणार्या फरशांवर रांगोळ्याही
म्लान झाल्या आहेत. विविध रांगोळ्या बघता बघता
रामरपदम ची छोटी टेकडी आली. त्या टेकडीवर रामाचं मंदिर आहेच पण तेथून दिसणारा भव्य
भूभाग, सुमद्र बघण्यासारखा आहे. तेथून लंका
दिसते असं म्हणतात. श्रीरामांनी ह्या जागेवरून सर्व भूभागाचे अवलोकन करून लंकेवर कसा
विजय मिळवावा ह्याचा आराखडा पक्का केला असे म्हणतात. राम आणि सुग्रीवाच्या युद्धनीतीतील
नैपुण्याचा येथपासूच प्रत्यय यावा.
‘अजून वेळ आहे आपल्यापाशी’ म्हणत कृष्णा
आम्हाला पंचमुखी हनुमान मंदिरात घेऊन गेला. ‘‘मंदिरात आत गेल्यावर आत अजून एक मंदिर
आहे तथे पाण्यावर तरंगणारा दगड आहे. तो पाहून य़ा. अशाच दगडांनी रामसेतू बांधला होता.’’
असेही त्याने सांगितले. पंचमुखी हनुमान खरोखरीच फार भव्य तरिही कमनीय आहे. त्याचं दर्शन घेऊन आत गेलो. आत असलेल्या राममंदिराच्या
ओट्यावर पुजारी बसलेले होते. त्यांच्या शेजारी
एका मोठ्या घंगाळ्यात पाण्यावर एक 40 किलो वजनाचा मोठा दगड तरंगत होता. नलनीलाचा हात
लागताच हे दगड पाण्यावर तरंगू लागले असं पुजार्यांनी
सांगितलं. दिसायला तो दगड कोरलप्रमाणे वाटत होता.पण कोरलचा दगड पाण्यावर तरंगत नाही
असे मला वाटते.
सकाळ सुंदर झाली. आता हॉटेलवर परतायला पाहिजे
होतं. दुपारी धनुष्कोडी, रामेश्वरम् चा समुद्र पाहणार होतो. बिभीषणाचं मंदिरही! आणि
परत जाताना पम्बन ब्रिज!
पम्बन ह्या बेटावरील दक्षिणपूर्वेला असलेलं
धनुष्कोडी गाव श्रीलंकेच्या तलाईमन्नार ह्या गावापासून साधारण 24 कि.मी. पश्चिमेला आहे. येथून लंकेला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग
आहे जो श्रीरामांनी लंकेत जाण्यासाठी निश्चित करून तेथे सेतू बांधला. हा सेतू धनुष्याकृती
असल्याचं नेपाळमधल्या परशुराम कुंडाच्या पुजार्याने आम्हाला सांगितलं होतं. सर्वात दूर गाव समान संस्कृतीमुळे किती सहज जोडलं जातं
नं! रामानी शिवधनुष्याचा भंग केल्यावर त्याचा एक तुकडा धनुष्कोडीला पडला तोच रामसेतू!
असं म्हणतात की लंका जिंकून श्रीराम परत भारतात येत असताना बिभीषणाच्या सांगण्यावरून
आपल्या धनुष्याच्या एका टोकाने या ठिकाणी सेतू तोडून टाकला. म्हणून त्या गाचावं नावही
धनुष्कोडी
धनुष्कोडी गावात आज मात्र वस्त अशी नाही.
1964 च्या रामेश्वरम् नावाच्या वादळात धनुष्कोडी गाव उध्वस्त झालं. आजही तेथे भरपूर
प्रवासी येतात पण रहिवासी कोणी नाही. धनुष्कोडी
असो वा रामेश्वरम् चा समुद्र असो अत्यंत नितळ,
आरस्पानी सुंदर आहेत. मनाचा ठाव घेणारा आहे. भारताचा पूर्वेकडील गंगा सागर आणि पश्चिमेकडील
सिंधुसागर एकमेकांना मिळतात असं हे सुंदर स्थान आहे. रस्त्याने बस जाताना आपल्या दोन्ही
बाजूला समुद्र बघायचं सौख्य रामेश्वरम् ला मिळतं.
समुद्रावरून नजर हटत नाही. नीलम रत्नांना वितळवून हा समुद्र बनला असावा. अथकपणे
त्यात उठणार्या आणि किनार्याकडे धाव घेणार्या शुभ्र लाटा पाहल्यावर समुद्राच्या
पाण्यात जाऊन आल्याशिवाय कोणी परत जात नाही.
पम्बन ब्रिज-
रामसेतू जसा एकमेव तसा नवीन जमान्यातील
पम्बन ब्रिज ही एकमेवच! साधारण 2 कि.मि. लांबीचा पम्बन ब्रिज पम्बन किंवा रामेश्वरम
ह्या बेटाला मुख्य भूमीला मण्डपम् येथे जोडतो. इतर वेळेला पम्बन ब्रिजवरून वाहतुक होणारा
हा ब्रिज खालून जहाज जाणार असेल तर मात्र त्याचा काही भाग एक बटण दाबताच वर उचलला जाईल
व खालून मोठे जहाज सहज जाऊ शकेल असा बनवला आहे. जुना इंग्रजकालीन ब्रिज धोकादायक झाल्याने
मोदींच्या कार्यकाळात हा ब्रिज नव्याने बनवायला सुरवात केली तो ह्या डिसेंबर पर्यंत
पुरा होईल.
बिभीषण मंदिर – नासिक
ला जसं एकमेव लक्ष्मण मंदिर आहे तसं रामेश्वरम् पासून 13 कि.मि. वर कोदंड रामस्वामीमंदिर
आहे तेथे भारतातील एकमेव बिभीषण मंदिर आहे. असं म्हणतात की रावणाला मारून श्रीराम लंकेहून
भारतभूमीवर आले तेव्हा येथे बिभीषणाचा राज्याभिषेक केला. ह्या मंदिरात एक दुर्बीणही
ठेवली आहे. तेथून समुद्रसेतू दिसतो.
इथूनच जवळ समुद्रात बंगालच्या वा मन्नारच्या
खाडीच्या बाजूला समुद्रात दगडाचं बनवलेलं एक तरंगणारं शिवलिंग आहे. हे समुद्रात न बुडणारं
शिवलिंग पहायला अनेक लोक समुद्रात जातात. ह्याच दगडांनी रामसेतू बनला आहे.
परत एकदा आमच्या फिरत्या बंगल्यात जायला आम्ही निघालो. बस आम्हाला घेऊन मदुराईजवळ कूडलनगर ला पोचली. रामायण express चकाचक स्वच्छ होऊन आमची वाट बघत होती. “जयरामजी की बाबूजी! जयरामजी की माँजी! चलिये गरम गरम खाना तैयार हैं.” म्हणत आमच्या औट घटकेच्या माहेरात आमचं जोरदार स्वागत झालं.
------------------------
#लेखणीअरुंधतीची-
(तरुण भारत मुंबई, 10.07.24
)
रामसेतूविषयी
काही ठळक निरीक्षणे
रामसेतूच्या
समुद्राखालील संशोधनासाठी भारतीय पुरातत्त्वविभागाकडून 2021 साली प्रारंभ
दक्षिणेती
अण्णा विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठाने केलेल्या
संशोधनातून रामसेतू 18,400 वर्ष जुना असल्याचा निष्कर्ष.
अमेरिकन
सायन्स चॅनेलने रामसेतू मानवनिर्मित असल्याचे
यापूर्वीच सांगितले आहे.
इस्रोची
यशस्वी कामगिरी – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ला
रामसेतूचा
समुद्राखालील
अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. धनुष्कोडी पासून श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत
हा सेतूचा नकाशा इस्रोने प्रसिद्ध केला आहे. हा नकाशा तयार करण्यासाठी इस्रो ने अमेरिकन
उपग्रहाच्या सहाय्याने समुद्रतळावर लेसरच्या माध्यमातून सेतूचे प्रतिबिंब मिळविणे इस्रोला
सोपे गेले. 29 कि.मि. चा चुनखडी असणारा सेतू 99.98% समुद्रात बुडाला असल्याचे शास्रज्ञ
म्हणाले. मंदिरातील एका नोंदीनुसार 1480 पर्यंत हा सेतू समुद्राच्या पातळीवर होता.
मात्र नंतर झालेल्या एका वादळामुळे हा सेतूपाण्याखाली गेला. या पूर्वी झालेल्या संशोधनातून
रामसेतूच्या खाली 11 अरुंद, निमुळत्या फटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फटींमधून सेतूच्या
नैऋत्येकडील मन्नारचे आखात आणि ईशान्येकडी पाल्कच्या सामुद्रधुनीतील पााणी प्रवाहित
होते. या फटी अवरोधाचे परिणाम कमी करत असल्याचेही शास्त्रज्ञांचे मत आहे.
-------------------------
Comments
Post a Comment