सहस्रांशु श्रीहरी

 

सहस्रांशु श्रीहरी

सूर्य उदयाचलावर येतांना पिसार्‍याप्रमाणे त्याच्या हजारो, लाखो किरणांना घेऊन येतो म्हणून सूर्याला सहस्रार्चि, सहस्रांशु, अंशुमान म्हणतात. प्रकाश हेच त्याचं स्वरूप. अंधारात बुडालेलं विश्व, सूर्यकिरण जणु परत वर उचलून आणतात. अंधारलेल्या डोळ्यांना परत एकदा जग स्वच्छ, स्पष्ट, निर्मळपणे दिसू लागतं. रात्रीच्या अंधारात लुप्त झालेल्या सार्‍या वाटा दिसायला लागतात. कुठली वाट कुठे जाणार आहे, कुठल्या वाटेने गेलो तर आपण कोठे पोहचू  हेही  कळायला लागतं. आपल्या इच्छा, आवड आणि पाठीवर असलेल्या कर्तव्याच्या बोजानुसार प्रत्येकजण वेगवेगळी वाट धरतो. कोणी राजमार्ग पसंत करतो. कोणी दर्‍या डोंगरातून जाणारी  वाट धरतो तर कुणी अजुन कुठली.

डोळ्यांना दृष्टी देणारा सूर्य आपण पाहू शकतो पण जो आपल्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घालून, ज्ञानाचा उजेड तयार करून आपल्याला योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म ह्या सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान देतो तो विवेकसूर्य उदय पावून मनात उजाडायला सर्वच जण पात्र असतात असं मात्र नाही. कुठली वाट योग्य होती हे गतकाळाचं विश्लेषण करणं सोपं असतं पण वर्तमानात घडणार्‍या प्रसंगांची एकमेकांशी सांगड घालत काय अयोग्य काय योग्य हे कळणं अवघड असतं. आणि कळलं तरी तो सत्याचा धर्ममार्ग अनुसरणं त्याहून अधिक अवघड असतं. ज्याचा विवेक जागृत असतो त्यालाच योग्य मार्ग दिसतो. नाहीतर ज्ञानाचं अंजन घालून  विवेकपथ दाखवणार्‍या गुरूस्वरूप श्रीहरीचं अनुसरण तरी केलं पाहिजे. सर्वांना हिताच्या वाटा दाखवणारा, विवेकाचं ज्ञान देणारा, घोर अज्ञानरूपी अंधारात ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा, आपल्या अमोघ तत्वज्ञानाने जग उजळून टाकणारा हा श्रीहरी  म्हणूनच सहस्रार्चि, सहस्रांशु, अंशुमान आहे.

सूर्य वाटा दाखवत असला तरी ही वाट घे, ती घेऊ नकोस असं काहीच सांगत नाही. त्याप्रमाणे कृष्णाने प्रत्येकाला विवेक जरूर सांगितला पण तू असच वाग असा आग्रह कधी धरला नाही. कृष्ण लहान असताना कृष्णाने शिशुपालाला मांडीवर घेताच त्याचे जास्तीचे अवयव गळून पडले. शिशुपालचे जास्तीचे अवयव ज्याच्या मांडीवर गळून पडतील त्याच्या हातून शिशुपाल मारला जाईल अशी आकाशवाणी झाली होती. आत्याने कृष्णाला शिशुपालाला जीवदान देण्याची विनंती केल्यावर कृष्णाने त्याचे शंभर अपराध माफ करण्याचे वचन दिले. पण शिशुपालाला कृष्ण समजला नाही. कृष्णाचा विवेक त्याला कळला नाही. कृष्णाच्या हातून आपल्याला मरण असतानाही त्याने आपले शंभर अपराध माफ करण्याचे मोठे मन दाखवले ह्या बद्दल ऋणी राहण्याचे सोडून  तो त्याचा दुस्वास करत राहिला. सतत ‘‘हा गवळ्याचा पोर, हा राजा तरी आहे का?’’ म्हणून त्याची निंदा नालस्ती करत राहिला. ‘‘पांडव  घाबरून कृष्णाला अग्रपूजेचा मान देत आहेत. पण कुत्र जसं लपून छपून मिळालेलं तूप चाटण्यात धन्यता मानतं तसा हा अग्रपूजा स्वीकारण्यास अयोग्य असूनही मोठ्या मानभावीपणे आपणच सर्वात श्रेष्ठ असं दाखवत ती स्वीकारण्याचा निर्लज्जपणा करत आहे. ------’’ असं अजूनही काहीबाही बोलत राहिला!   ह्या सहस्रांशुच्या प्रकाशातही  शशुपालाने स्वतःच्या मरणाचा रस्ता आपल्या हाताने प्रशस्त केला.

द्युतात राज्य हरलेल्या, अत्यंत खिन्न झालेल्या पांडवांची काम्यकवनात कृष्णाने भेट घेतली. शून्यातून स्वर्ग निर्माण कणारे पांडव अधर्मामुळे परत एकदा शून्यावर येऊन पोचले असले तरी, त्यांच्यावर अधर्माने गुदरलेला तो प्रसंग पाहून कृष्ण म्हणाला, ‘‘आता ही एक गोष्ट नक्की झाली की, पृथ्वी ह्या दुराचारी दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन ह्यांचं रक्त प्यायल्याशिवाय राहणार नाही.’’ दुःखाने जळणार्‍या द्रौपदीला आश्वासित करत कृष्ण म्हणाला, ‘‘हे कल्याणी आज तुझ्या मनात ज्यांच्याविषयी तू रागाने धगधगत आहेस, त्यांच्या स्त्रिया ह्याहून भीषण क्रंदन करतील. अर्जुनाच्या बाणांनी ह्या सर्वांचा भीषण संहार होईल.’’ कृष्णाचा हा भयंकर संताप पाहून  त्याला शांत करण्यासाठी अर्जुनाने त्याची स्तुती केली. ‘‘हे भगवान श्रीहरी, तूच ब्रह्मा, चंद्र, सूर्य, धर्म, धाता,  काळ आणि दिशास्वरूप आहेस. तूच वामनरूप घेऊन तीन पावलात तीन लोक व्यापलेस.  हे अजन्मा! सर्वस्वरूप! तूच सूर्यामधे ज्योतीरूपात राहून त्याला प्रकाशित करतोस. ह्या सहस्रांशु श्रीहरीने पांडवांना दाखवलेला युद्धमार्ग त्याचवेळी सार्‍या पांडवांच्या मनात बीज पेरल्याप्रमाणे दृढ रुजला.   

कृष्णाने सर्वांनाच योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला होता. शिष्टाईला गेलेल्या कृष्णाने धृतराष्ट्रालाही अत्यंत सौम्य पण कणखर शब्दात समजावले आहे.

‘‘धर्म आणि अर्थाचा विचार करून सत्य काय ते सांगायचं झालं तर हे कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्रा, युद्धाचा आग्रह धरू नका. लाखो क्षत्रियांना मृत्यूच्या दाढेतून आपण सोडवा. आपण क्रोधाच्या आहारी जाऊ नका. शांतचित्ताने विचार करा. पांडवांना त्यांचे न्यायोचित वडिलांकडून मिळालेले अर्धे राज्य द्या. अर्ध्या राज्यात आपण आपल्या मुलांसह आनंदाने रहा. आत्ता तरी आपण योग्याला अयोग्य आणि अयोग्यला योग्य समजत आहात.  अनर्थालाच खरा अर्थ आणि अर्थाला अनर्थ ठरवत आहात. आपल्या पुत्रांवर तर लोभाचे भूत स्वार झाले आहे. त्यांना आपण आपल्या काबूत ठेवा. पांडव आपली सेवाही करायला तयार आहेत आणि युद्धही करायला तयार आहेत. आपल्याला जो उचित हितकारक वाटेल तो मार्ग आपण नक्की करा.’’

त्यानंतर परशुराम आणि कण्व आदि मुनींनीही धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘‘हे राजा तू प्रचंड नरसंहाराला निमंत्रण देत आहेस. दुर्योधना, तू एकटाच फार बलवान आहेस असं समजू नकोस. पृथ्वीवर एकाहून एक बलवान योद्धे असतातच. खर्‍या शूरांसमोर प्रचंड सेनेची ताकदही फिकी पडते.  तीर्थस्वरूप असलेल्या कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे तुमच्या कुळाचं रक्षण करा.’’

कृष्ण, परशुराम, कण्व आदि ऋषीमुनींचे सूर्यकिरणांसारखे समोर पसरलेले, भविष्य स्वच्छ दाखविणारे विचार ऐकल्यावर अहंकारी दुर्योधनाची भुवई वर चढली. श्वासोच्छ्वासाची गतीही वाढली. कर्णाकडे बघून जोरजोरात हसत  मांडीवर  षड्डु ठोकत  तो म्हणाला, ‘‘ऋषीवर माझं जे काही व्हायचं असेल, जशी माझी गति असेल त्याप्रमाणेच ईश्वराने मला तयार केलं आहे. त्याप्रमाणेच माझं आचरण आहे. अजून तुम्ही सांगून काय फरक पडणार आहे?’’ भगवान व्यास, भीष्म, देवर्षी नारद सर्वांनी दुर्योधनाला समजावले. नारद म्हणाले ‘‘बाबा रे, ह्या जगात सहृदय श्रोता आणि हित सांगणारा सुहृद मिळणं कठीण आहे.’’ वरवर कृष्णाचं पटलं आहे असं दाखवत धृतराष्ट्र म्हणाला, ‘‘हे कृष्णा , तू म्हणतोएस ते धर्मानुकूल आणि न्यायसंगत आहे. मला मान्य आहे पण दुर्योधन माझं ऐकत नाही. तूच त्याला समजावून सांगं.’’

दुर्योधनाला श्रीहरीने केलेला उपदेशही अत्यंत लाघवी प्रेमळच आहे. श्रीकृष्ण अत्यंत गोडपणे म्हणाले, ‘‘हे कुरुनंदन तू माझं ऐक त्यातच तुझ्या परिवाराचं मोठं सौख्य आहे. तू मोठ्या बुद्धिमान कुळात जन्म घेतला आहेस तरीही अत्यंत निंदनीय अशा कुळात जन्म घेतलेले लोक जसे क्रूरकर्मा दुष्टबुद्धी , निर्लज्ज असतात तसा तू का वागतोएस? तुझा हा हेकटपणा भयंकर अशी प्राणहानी, अधर्म  आणि अनिष्टाच्या उंबर्‍यावर तुला नेऊन ठेवत आहे. तुझ्या ह्या दुराग्रहाचं समर्थन योग्य नाही. तुझा हा हटवादीपणा सफळ होणार नाही. तुझा हेका सोड. त्यातच तुझ्यावर अवलंबून असलेल्या बंधू, मित्र, सेवक सर्वांचं कल्याण आहे. पांडव अत्यंत बुद्धिमान, शूरवीर, उत्साही, आत्मज्ञ, बहुश्रुत आहेत. त्यांच्यासोबत संधी कर. त्यातच विश्वशांती आहे. तुझ्यातही शास्त्रज्ञान, क्षमाशीलता, शरम हे गुण आहेत. मातापित्यांच्या आज्ञेत रहा. तेच तुझे खरे हितैषी आहेत. माणूस संकटात सापडला की पहिल्यांदा त्याला आपल्या पित्याचा उपदेश आठवतो. जो लोभामुळे हिताचे बोल ऐकत नाही तो महा संकटात सापडतो. त्यातून बाहेर पडायचा मार्गही त्याला सापडत नाही.’’ दुर्योधनाने वारंवार पांडवांना कसं छळलं कपटाने त्यांना कसा मारायचा अनेकदा प्रयत्न केला तेही कृष्णाने सांगितलं. अत्यंतिक लोभ कौरवांच्या कुळाच्या नाशाला कारणीभूत होईल हेही सुनावले. पण  त्याचा परिणाम दुर्योधनाला शहाणपणा येण्याऐवजी त्याने कृष्णालाच कैद करण्याचा आदेश दिला. कौरवांच्या मनात उजाडलं नाही.

महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वीच श्रीहरीने प्रत्येकाला चार समजुतीच्या गोष्टी तर कधी चार खडे बोल सुनावून पाहिले. द्रोण, भीष्म, कर्ण ह्यांनाही ह्या अत्यंत तेजस्वी गभस्तिमान् अशा श्रीहरीने विवेकाचा मार्ग दाखवला नाही अ‍से नाही; पण सन्मार्ग घेण्याचं धाडस ह्या कुणाला झालं नाही. प्रकाशात उजळलेल्‌या योग्य दिशा दिसूनही  त्या घेतल्या नाहीत म्हणून सूर्य काही म्हणत नाही. ती न घेणारा आपल्या कर्माने नाश पावतो.

 

पार्थाला गीतारूपी सुदीर्घ उपदेश केल्यावरही  तुला जे काही सांगायचे होते ते मी सांगितले. आता तुला जे योग्य वाटेल तसे तू वाग’’-- `यथेच्छसि  तथा कुरु' / यथा योग्यं तथा कुरु।' ‘’ म्हणून हा कमलपत्राक्ष त्यातून कमलपत्रासारखा पूर्ण अलिप्त राहिला. सूर्यकिरण पाणी भेदून तळ्याच्या तळापर्यंत जातात पण ओले होत नाहीत. दीपाच्या प्रकाशात घरातील सर्व कामे चालू राहतात पण दिवा कुठलीच कामे करत नसतो. कृष्णप्रकाशात पांडव उजळून निघाले. पार्थाला त्याची योग्य वाट सापडली. कृष्ण मात्र सर्व गुंत्यातून पूर्ण मोकळाच होता.

सूर्य उगवला की कमळं उलतात म्हणून सूर्याला पद्मप्रबोध म्हणतात. ह्या अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान श्रीहरीसहस्रांशुच्या विवेकरूप किरणांनी पांडवांची भाग्य कमळं उमलली. मंडुकांना मात्र चिखलाचाच आश्रय योग्य वाटला. सूर्याला शत्रुघ्न आणि कृतघ्नघ्न म्हणतात. कारण तो शत्रूंचा नाश करणारा (घ्न) आणि कृतघ्नांचा नाश करणारा कृतघ्नघ्न आहे. श्रीहरीनेही सार्‍या शत्रूंचा आणि कृतघ्नांचा नाश केला. त्याला तो जबाबदार कसा म्हणावा? पंचमहाभूतांमधे ‘‘मी केले’’ असा जराही अहंकार नसतो. पाण्याने बुडवले, आगीने जाळले, डोंगराने पाडले असे म्हणत नाहीत तर पाण्यात बुडून मेला म्हणतात. अग्नीत जळून मेला, डोंगरावरून पडून मेला म्हणतात. श्रीहरीने सर्वांना त्यांच्या हिताच्या वाटा दाखवल्या. ज्यांनी त्या अनुसरल्या नाहीत त्यांचा नाश झाला. गांधारी मात्र ह्या सर्व संहाराला कृष्णालाच जबाबदार धरत राहिली. तिने कधीही स्वतःच्या मुलांना योग्य मार्ग दाखवला नाही; पण  कृष्णाला शाप देऊन मोकळी झाली. कृष्णाने तोही हसत स्वीकारला. ज्यांनी गांधारीप्रमाणे अज्ञानाची पट्टी स्वतःहून डोळ्यावर बांधली आहे ते आजही कृष्णाला दोष देत राहतात. सूर्यावर थुंकण्याने सूर्याला काय फरक पडणार म्हणा? जो तो ज्याची त्याची लायकी दाखवतो इतकेच म्हणू शकतो. अशा विवेकरूप कृष्णाबद्दल जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात,

शठांना संहारीसुजन नित रक्षी सजग जो

मनी संदेहाला वितळविविवेका उठवितो

जलाने संपृक्ता घन जणु हवासा जनमनी

मना मोही मेघासम घननिळा श्यामल हरी।। 7.1

 

हवासा वाटे जो  व्रजचिमुकल्यांना सुहृदची

सखा पार्थाचाही विजयपथ दावी विमल ही

असे विश्वाचा या जनक परि नाही जनक ज्या

अजन्मा आहे जो मरणचि अनंता कुठुनि त्या।। 7.2

 

सदाचारी ऐशा सुखवि सुजनांसी प्रभुचि हा

असे सन्मार्गी जोकणखरचि आधार नित त्या

विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा

दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।। 7.3

--------------------------------------------

@अरुंधतीप्रवीणदीक्षित-


 


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)