एका अनुवादाची अनमोल किंमत -

 


एका अनुवादाची अनमोल किंमत -

``विप्रा आग्रह हा येथं

ओलांडू तू नको नदी ही झाला सूर्यास्त ----------''

मी फोन कानाला लावून ऐकत होते. पलिकडून R. N. पराडकरांसारख्या मृदु सुरेल आवाजात तो वृद्ध मला भजन गाऊन दाखवत होता. कधीही न ऐकलेले शब्द भजनातून ऐकतांना फार गोड वाटत होते. बोलणं मधे मधे तुटत होतं. रेंजही बरोबर नव्हती पण फोन बंद करवत नव्हता. फोन एकदोनदा कट झाला तरी मी लगेचच लावला.

 फिरायला जातांना मी फोन बरोबर ठेवत नाही.  घरी येऊन पाहिलं तर माहित नसलेल्या नंबरवरून पाच वेळा कोणीतरी फोन लावला होता. पलिकडच्याला खूप तातडीने काही सांगायचं होतं का? उगीचच कोणी पाच पाच वेळेला फोन नाही लावत.(तेव्हा वारंवार येणारे फोन सरसकट सायबर क्राइमचे नसायचे.) शेवटी मीच त्या अनाम व्यक्तीला फोन लावला.

‘‘कोण? अरुंधती दीक्षित का?’’ पलिकडून आवाज आला. ‘‘मी अमुक अमुक. नर्मदापरिक्रमार्थी. सध्या मी गुजरात मधे आहे. आत्ताच नर्मदा नदी पार करून दुसर्‍या किनार्‍याला येऊन बसलो आहे. खूप प्रयासाने आपला नंबर मिळाला.''

     नर्मदा परिक्रमा करतांना मी एका मठात थांबलो असता ‘जय जय रघुवीर समर्थ’ ह्या मासिकाचा एक जुना अंक वाचायला मिळाला. त्या अंकात नर्मदाष्टकम् चा आपण केलेला सुंदर अनुवाद होता. तो मला इतका आवडला की संस्कृत स्तोत्रासोबत मी तोही पाठ करून टाकला. त्यासोबत आपला फोन नं.ही होता तो सेव्ह केला होता माझ्या मोबाईलमधे पण-----!

परिक्रमा करतांना एका दुर्गम भागात प्रवास करतांना तेथील स्थानिक मुलाला बरोबर घेतलं होतं. त्याने माझा मोबाईल सिमसकट घेतला. त्यामुळे सर्वच नंबर गेले. नवीन मोबाईल घेऊन आधीचे सर्व नंबर त्यावर लोड करायला मला जमत नव्हतं.माझ्या मुलाच्या घरी ‘जयजय रघुवीर समर्थ’ मासिक येतं. त्याला तमचा नं शोधायला सांगितलं होतं.  आज नंबर मिळवला मुलाकडून आणि तुम्हाला फोन केला.

``ह्या सुंदर अनुवादासाठी आपल्याला काय देऊ? वेळ आहे का तुम्हाला? दोन गाणी म्हणून दाखवू का?  माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही.  अंगावरचे कपडेही येथील रानातल्या लोकांनी काढून घेतले. कुडकुडत रानातून बाहेर आलो. रस्त्यावर भेटलेल्या माणसाला कपडे देशील का विचारलं. मी परिक्रमार्थी आहे पाहिल्यावर त्याने अंगावरचे कपडे उतरवून दिले. माझ्याकडे काही नसलं तरी मी भजन म्हणू शकतो. तुम्हाला एक भजन म्हणून दाखवू का? ''

मी सुन्न झाले. एक वेगळाच अनुभव होता. त्याचवेळेस माझ्या अनुवादाचं असामान्य मोल पाहून डोळ्यात पाणी जमा झालं. मी म्हणाले, - असं का म्हणता? आपण आठवणीने इतक्या दूरून फोन केला. साऽऽरं काही मिळालं मला. आपण नर्मदाष्टकासोबत मराठी अनुवादही पाठ केला आहे, हे माझं अहो भाग्य! नर्मदेच्या काठावर हा मराठी अनुवाद पोचला असेल तर, मी भरून पावले. नर्मदामय्येला माझा नमस्कार सांगा. भजन ऐकायलाही मला नक्की आवडेल.

``विप्रा आग्रह हा येथं

ओलांडू तू नको नदी ही झाला सूर्यास्त ----------''

 एक सुरेल दत्त भजन मी मंत्रमुग्ध होऊन ऐकलं.

सहा महिन्यांनंतर परत तोच फोन वाजला. मृदु सुरेल आवाज! ‘‘आपली नर्मदा परिक्रमा कशी चालू आहे? आपली तब्बेत तर ठीक आहे ना? आपल्याला काही त्रास तर नाही ना?’’ मी एका दमात सर्व विचारून घेतलं. अनेक वेळेला नर्मदा परिक्रमा करणारा ही व्यक्ती सत्तरीपुढची वृद्ध असून सुखरूप आहे ह्या एकाच गोष्टीने मला फार समाधान वाटलं होतं.

पलीकडून आवाज आला, ‘‘मधे माझ्या दोन भावजया गेल्या. खूप वाईट वाटलं. नाही जाता आलं. तुमच्याशी बोलावंस वाटलं. माझी नर्मदा परिक्रमा मी सावकाश पूर्ण करणार आहे. अजून दोन वर्ष तरी लागतील. पूर्वीच्या परिक्रमा मी सहा सहा महिन्यातही केल्या आहेत. आता कसलीच घाई नाही. एक गाणं म्हणून दाखवू का?’’ मला पराडकराच्यासम मृदुल आवाजात ऐकलेल्या

विप्रा आग्रह हा येथं

ओलांडू तू नको नदी ही झाला सूर्यास्त ----------

गाण्याचे सूर कानात घुमत होते. मी म्हटलं, ‘‘म्हणाना! आवडेल मला ऐकायला.’’ पुन्हा दत्ताचं दुसरं भजन. मन तृप्त करून गेलं. भजन संपल्यावर पलिकडून विचारणा झाली, ‘‘वेळ असेल तुम्हाला तर अजून एक गाणं म्हणू का?’’ 

 ‘‘65 वर्षांपूर्वी मी आईच्या मांडीवर झोपलो की आई हे गाणं म्हणायची.’’ तिची आठवण म्हणून हे गाणं मला तुम्हाला ऐकवायला आवडेल. एक जुनं सुंदर शब्दरचनेचं गाणं ऐकत होते. रेंजचा खूपच त्रास होता. मधल्या मधल्या ओळी ऐकू येत नव्हत्या. त्यांचं गाणं संपल्यावर त्यांना म्हटलं ‘‘परत शब्द सांगता का?’’  ‘‘तुम्हाला पत्राने पाठवतो.’’  फोन संपला.

मनात आलं, एका अनुवादाचं केवढं अनमोल बक्षिस हे! नर्मदेच्या काठावरून माझ्यापर्यंत पोचलेलं. का! ----का!! नर्मदामैयानीच नर्मदाष्टकाच्या अनुवादासाठी तिचे सुरेल आशीर्वाद मला असे धाडले? हृदयात नर्मदामैय्याच्या लहरी उठत होत्या. परत परत होणारी आनंदाची अनुभूती मला खूप खूप श्रीमंत करून गेली. अनुवाद करूनही बरीच वर्ष लोटली होती. मी परत एकदा माझा ब्लॉग उघडून नर्मदाष्टकम् वर नजर टाकली. नर्मदेचा सुंदर प्रवाह माझ्या नजरेसमोर खळाळत वाहत होता –

-----------------------------------

 

पुढे पुढेचि धावतो जलौघ नर्मदे तुझा

मिळावयासि सिंधुलाचि ओढ लागली तुला

सहस्र खेळती तुषार सप्तरंगि सुंदरा

उफाळती सवेग तेचि पांगती इतस्ततः ।।1.1

 

तरंगमालिका असंख्य रम्य सौम्य सुंदरा

तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या अनंत ह्या

प्रवेशता गजेंद्र झुंडिने प्रवाहि गे तुझ्या

तरंग भंग पावती प्रवाह थांबतो जरा ।।1.2

 

छळीति पाप, ताप, दुःख वैरि जे सदा कदा

पिशाच भूत प्रेत जे शहारवीच मन्मना

असो भयाण प्राणघाति दुःख जे  यमासमा

तयास वारितेचि वारि नर्मदे तुझेचि गा।।1.3

 

समर्थ हे सलील जे भयास थोपवी महा

तुझ्याचि कोमला पदास भूषवी पुन्हा पुन्हा

अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या

 असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।1.4 

---------------------------------------

संपूर्ण नर्मदाष्टक व त्याचा अनुवाद वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

नर्मदाष्टकम्


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती