अकारादि सकारान्त
अकारादि सकारान्त
भोज राजाच्या दरबारात
कालिदास नावाचा अत्यंत श्रेष्ठ कवी होता. भोजाचं
कालीदासावर अतिशय प्रेम होतं. कालिदास हा सर्व विद्वानांमधे सर्वश्रेष्ठ विद्वान
आहे असं भोज राजा म्हणत असे. त्यामुळे इतर विद्वानांना कालिदासाचा मत्सर वाटत असे.
‘‘हे राजा, आम्हीही कालिदासाच्या तोडीस
तोड विद्वान असतांना कालिदासालाच आपण सर्वश्रेष्ठ का म्हणून म्हणता?’’ असं ते राजाला
विचारीत. राजा म्हणे, ‘‘त्यात काय! तुम्ही वादविवादात कालिदासाचा पराभव केला तर मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ
विद्वान म्हणेन.’’ ते ऐकून दूरदूरच्या देशातील विद्वानही कालिदासाचा वादविवादात पराभव
करण्यासाठी येऊ लागले.
एक दिवस एक विद्वान कालिदासाचा पत्ता शोधत धारा नगरीत
फिरत होता. तेवढ्यात त्याला डोक्यावर टोपली घेऊन जाणारी एक बाई दिसली. ``थांब थांब थांब!’’ म्हणत तो तिच्यापाशी
पोचला. लगेचच तिला मी कालिदासाचा पराभव करण्यासाठी आलो आहे हे सांगण्यापेक्षा त्याने
विचार केला आपण जरा ह्या स्त्रीशी बोलून तिच्यावर आपल्या विद्वत्तेची छाप पडेल असं बघावं. म्हणून त्यानी
तिला विचारलं, ``मुली, तुझ्या डोक्यावरच्या
ह्या टोपलीत काय आहे?’’ त्या स्त्रीने बरोबर जाणलं की हा बाहेरच्या देशातून कालिदासासोबत
वादविवाद करायला आला आहे.
ती हसून त्याला म्हणाली,
वृक्षाग्रे
तु फलं यस्य फलाग्रे वृक्षमेवच ।
अकारादि
सकारान्त यो जानाति स पण्डितः ।।
टोकावरीच वृक्षाच्या । रसाळ फळ येतसे
डोक्यावरी फळाच्या त्या । पुन्हा तो वृक्ष येतसे
अकारादि सकारान्त । नाव सोपे असे असे
ओळखेलचि तो मोठा । थोर विद्वान जाणिजे
तो विद्वान डोक खाजवत
विचारच करत बसला. शेवटी त्या स्त्रीला म्हणाला,
``नाही बुवा कळलं कुठलं फळ आहे ते.’’
तेव्हा हसत हसत ती म्हणाली अहो अ ह्या अक्षराने सुरवात असलेले आणि शेवटच अक्षर स असलेले असे
अननस माझ्या टोपलीत आहेत.
त्या चतुर मुलीकडे बघत त्याने आशचर्याने विचारलं,
‘‘मुली, अगं तू इतकी चतुर कशी झालीस?’’ तेव्हा ती म्हणाली, ``अहो पंडित महाराज, मी काही दिवस कालिदासाच्या
घरी काम करत होते.’’
ते ऐकल्यावर तो विद्वान
विचार करू लागला की जर कालिदासाच्या घरी काही दिवस काम करणारी मुलगीच जर इतकी चतुर
असेल आणि माझा पराभव करू शकत असेल तर कालिदास किती प्रतिभावान विद्वान असेल! अशा विद्वानासोबत
आपण वाद घालत बसण्यापेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याची माफी मागून त्याच्याकडे राहून
थोडं ज्ञान संपादनं केलं तर आपणही ह्या मुलीसारखे चतुर होऊ. नंतर कालिदासाकडे राहून
अभ्यास करून तो खरोखरचा विद्वान झाला.
----------------------------------
Comments
Post a Comment