इस्त्री
इस्त्री -
इस्त्री हा माझा जिव्हाळ्याचा विषय. झाडांना पाणी घातलं की, डगळे टाकलेली,
माना टाकलेली, मलूल झालेली झाडं हळु हळु ताठ होताना पहायला जे आंतरिक सुख मिळतं तेच
सुख सुरकुत्या पडलेल्या दमटसर जुन्या वा नवीन कपड्यांना इस्त्री करून त्यंच्यावर पसरलेल्या
वृद्धत्वाच्या सुरकुत्या घालवून परत एकदा कडक, ताठ बनवून त्यांना तारुण्यावस्था प्राप्त
करून देण्याने लाभते. एकाचा ओलावा राखून तर दुसर्याचा घालवून त्यांना नवसंजीवनी देण्याच्या
क्रिया विरुद्ध वाटल्या तरी सारख्याच चैतन्यदायी व कृपाळू असतात.
माझ्या लहानपणी आत्तासारख्या smart इस्त्र्या नसत. आज्जी जशी चूलीतल्या
लाकडावर वा कोळशांवर तिचं काम चालवत असे त्याप्रमाणे अवजड लोखंडी इस्त्र्या कोळशावरच
काम करत. हे अग्नीतत्त्व जागृत करण्याचं काम कोणा वडील नात्याकडे असे. इस्त्रीत कोळसे
घालून त्यावर किंचित रॉकेल घालून वा शेगडीतला निखारा इतर कोळशांवर ठेऊन कोळसे रसरशीत
पेटले की तिचं वरचं झाकण लावून ते लॉक केलं जाई. ह्या झाकणाच्या वरच्या बाजूस इस्त्री
धरायचं लाकडी हँडल असे. काही काळाने तेही तापून गरम होई. मग त्याला एखादं फडकं गुंडाळून
इस्त्री केली जाई. तेव्हा कपडे प्रेसला देणं वा प्रेस करणं हे दोन्ही वक्प्रचार वापरात
नव्हते.
जहाजाला किंवा विमानाला जशा एका लायनीत खिडक्या असतात
तशा जहाजाच्या आकाराच्या जडजूड इस्त्रीला आतमधील जळत्या कोळशांना ज्वलनासाठी आवश्यक
प्राणवायू मिळण्यासाठी दोन्ही बाजूच्या कडांवर चौकोनी छोटी भोकं असतं. त्यातून लालबुंद
झालले निखारे विस्फारित नेत्रांनी बाबांच्या आडून पाहणे आणि कपड्यांवरच्या लाटासदृश
सुरकुत्यांमधून बोटीप्रमाणे विचरणार्याला खमंग वासाच्या इस्त्रीला अनुभवणे हा अस्सल
अनुभव तुम्हीही अनेकांनी घेतला असेल.
कोळसा लाकडी कोळसाच वापरला जाई. चुकून एखादा तडतडणारा दगडी कोळसा आला
तर तो आतल्या आत जरी तडतडला तरी इस्त्रीच्या भोकांमधून त्याची ठिणगी बाहेर उडे. आणि
एखाद्या चांगल्या कपड्यावर पडली तर त्याची कायमची आठवण त्या कपड्यावर ठेवे. हे असे
‘होली’ कपडे त्या तडतडणार्या कोळशावर चरफडत घालावे लागत. त्यासाठी इस्त्री परत उघडून
असा कोळसा शोधून त्याची बाहेर गच्छन्ति होत असे. इस्त्रीवाला मात्र असे जळके कपडे कपड्याच्या घड्यांच्या
डोंगरात शिताफीने आत घालून आणत असे.
इस्त्रीचे तापमान कमी जास्त करायची सोय नसे. त्यामुळे इस्त्रीला ताव
असेपर्यंत जाड सुती कपडे इस्त्री मारून घ्यायला लागत. इस्त्री फार तापली असेल तर पांढर्या कपड्यांना
पिवळसर जळका रंग येई. तो येऊ नये म्हणून टेबलावर इस्त्रीसाठी अंथरलेली एखादी जुनी चादर
कामी येई. त्यावर इस्त्री फिरवल्यावर इस्त्रीच्या तावाचा अंदाज येई. त्यानुसार कपडा
इस्त्रीला घेतला जाई. अशा तापलेल्या इस्त्रीने शाळेचे गणवेशाचे गडद रंगाचे निळे स्कर्ट
वा खाकी अर्ध्या पँटी, सुती, जाड `इजारी’ त्यातील प्रत्येक ताणाबाणा सुतासारखा सरळ
करून कडक इस्त्रीचा बनवला जाई. वडिलांच्या खास गांधी टोपी किंवा नेहरू टोपी सारख्या
काही खास कपड्यांवर खळीत बुडवलेला कापडाचा ओला बोळा फिरवून त्यांचा ‘‘क्रिस्पीनेस’’
वाढवला जाई. तापलेल्या इस्त्रीचा एक प्रकारचा गरम खमंग वास आला की आतून आईचा आवाज घुमे,
‘‘इस्त्री तापली चांगलीच! फ्रॉकला इस्त्री करू नका हं जळेल!’’
वडिलांनी पेटवलेल्या इस्त्रीवर आमच्या शाळेचे स्कर्ट ब्लाऊज रीचार्ज
करून घेणे, बाकीचे इस्त्रीसाठी आसुसलेले कपडे चमकवून घेणे हे जितकं तत्परतेनी केलं
जाई तितक्याच आठवणीने सर्व कपड्यांना इस्त्री करून झाल्यावर, विझत आलेल्या, राखेत माखलेल्या,
मंदसर दिसणार्या निखार्यांवर साठवून ठेवलेल्या
फणसाच्या आठळ्या, रताळ्याचे वा बाकी कंदांचे तुकडे स्थानापन्न होत. त्यांचा खमंग वास
सुटला की ते राखेत उलटे करुन राहिलेल्या राखेवर मंद भाजले जात.
कोळशाची इस्त्री जाऊन इलेक्ट्रिसिटीवर चालणारी इस्त्री आली आणि तिच्या
वीजवाहक लांब पुच्छामुळे (वायर) इस्त्रीची जागा निश्चित झाली. पण हिचं फिलॅमेंट जळणे
आणि ते बदलून आणणे हा नेहमीचाच सोपस्कार होऊन गेला. शेवटी एक जादाचं फिलॅमेंट घरी ठेऊन
देणे व आधीचे जळले तर घरच्या घरी बदलणे यात वडिलांचा, भावाचा हात असे. फिलॅमेंटच्या
वर अॅसबेसटॉस शीट घालून इस्त्रीची गर्मी वनवे फक्त खालीच लागेल अशी दक्षता असे. त्या जळालेल्या फिलॅमेंटचं पापुद्रेवालं,
चमकदार अभ्रक मिळवण्यासाठी मुलांची भंडणं होत.
कालांतरानी इस्त्र्या बदलल्या जाडजुड इस्त्रीच्या जागी हलक्या, खाली
टेफ्लॉन कोटिंगच्या, पाण्याची छोटी टाकीवाल्या, प्लॅस्टिकच्या रंगिबेरंगी शोभिवंत,
चालू असताना नागमणी प्रमाणे डोक्यावर छोटा प्रकाशठिपका असणर्या, तर कधी बिन वायरच्या,
इलेक्ट्रिक पोर्टवर ठेवताच गरम होणार्या, बटण दाबताच आगगाडीच्या इंजिनसारखी कपड्यावर
वाफ धडकवणार्या, दुसरं बटण दाबताच कपड्यावरील हट्टी सुरकुतीवर वॉटर कॅनन प्रमाणे पाण्याची
पिचकारी मारणार्या इस्त्र्या माझं चित्त वेधून गेल्या.
आपल्या कपड्यांना आपण स्वतः इस्त्री करण्याची मजा काही वेगळी असते.
कुठे डबल क्रिझ न येता, सुरकुती रहित कपड्यांना
परिधान करताना जरा जास्तच तोर्यात असल्यासारखं वाटतं. प्रत्येक कपड्याला एका वेगळ्या
पद्धतीने इस्त्री करायला लागते. त्यानंतर त्या कपड्याची आपल्या कपाटात त्याच्या नेहमीच्या
जागेवर मावणारी पद्धतशीर सुबक घडी हा अजून सुखकर प्रवास असतो. तो हँगरला अडकवायचा असेल
तर त्याच्या बाह्या दरवाजा लावताना चेपून दुमडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागते.
घडीतला कपडा घालायच्या आधी पटकन घड्यांवर इस्त्री मारून घातला तर जरा वेगळ्याच झोकात
जाता येतं.
इस्त्री करणं आवडायचं आजून एक कारण आहे. आपले हात चालू असले तरी विचार
करायला डोकं पूर्ण वेळ मोकळं असतं. मनाला आणि मेंदूला मिळणार्या ह्या सुट्टीची दोघेही
फार वाट बघत असतात. अनेक पाठ करावी वाटणारी स्तोत्र, श्लोक वा काहीही शेजारी ठेऊन पाठ
करायला मला जसं आवडतं तसं अनेक लेखांचे विषय शांत चित्ताने मनात घोळवण्यााठी मिळालेला
हा एकान्त मी सहजासहजी हातचा घालवत नाही.
अनेकजणं मला विचारतात काय? तू अमक्या तमक्या कामाला बाई नाही ठेवलीस?
कपडे इस्त्रीला देत नाहीस? खरतर मला मी भेटण्याच्या प्रवासाचा सुखद थांबा इस्त्रीच्या
टेबलाजवळ, स्वयंपाकघराच्या ओट्याजवळ असतो. ह्या छोट्या छोट्या कामांमधून मिळणारं समाधान
जसं वेगळच असतं. तसं आपण आपल्याला भेटायला मिळण्याचा हा सिक्रेट बगीचा असतो असं मला
वाटतं; जेथे मी माझ्या गळ्यात हात घालून म्हणते, ‘‘अरे यार! किती वाट पहायला लावलीस!’’
(मित्र मैत्रिणींनो, हा लेख बेफिकीरपणे आयुष्याच्या
रस्त्यावरून चालणार्या फक्त माझ्यासारख्या मनमौजींसाठी आहे.)
---------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment