ससेमिरा
ससेमिरा
( सिंहासन बत्तिशी मधील दुसरी गोष्ट.)
वैशाली नावाच्या राज्यात नंद नावाचा राजा राज्य करत होता.
राजाची राणी भानुमती अत्यंत सुंदर होती. तिच्याशिवाय राजाला चैन पडत नसे त्यामुळे
त्याचं राज्यकारभारातून लक्ष कमी कमी होऊ लागलेलं पाहून त्याच्या सल्लागारांनी
त्याला सुचवलं की, राजाने भानुमतीचं चांगल्या चित्रकाराकडून चित्र काढून ते
त्याच्या दरबारात लावावं म्हणजे त्याला राणी सतत समोरही दिसत राहील आणि तो
पहिल्याप्रमाणे उत्तम राज्यकारभारही करेल. राजाला हा उपाय आवडला. त्याप्रमाणे एका
प्रथितयश कलाकराला बोलावून राणीचं चित्र काढण्यात आलं. राजाला ते चित्र खूप आवडलं.
राणीच्या तलम वस्त्रातून राणीचं उठून दसणारं सौंदर्य, तिची लोभस मुद्रा,
वागण्यातील देखणी अदा—सर्व काही चित्रकारानी अत्यंत सुंदर रीत्या साकारलं
होतं. सर्वांनी त्या चित्राचं कौतुक केलं.
पण राजाचा बृहस्पतीप्रमाणे अत्यंत तेजस्वी, विद्यावाचस्पती राजपुरोहित शारदानन्द
मात्र गप्प होता. त्याला मौन पाहून राजा म्हणाला, ‘‘ आपल्याला ह्या चित्रात काही
कमी वाटते का? आपण आपला अभिप्राय का दिला नाही?’’ ‘‘शारदानन्द म्हणाला, ‘‘राजा,
भानुमतीच्या मांडीवर असलेला तीळ ह्या चित्रात दिसत नाही.’’ ते ऐकल्यावर हया
शारदान्दाने चोरून राणीला एकान्तात पाहिले असणार ह्या कल्पनेने राजाचा संताप अनावर
झाला. त्याने काहीही ऐकून न घेता शारदानन्दाला रानात नेऊन शिरच्छेद करण्याची
सेनापतीला आज्ञा दिली.
रागावलेल्या राजापुढे कोणाचेच काही चालणार नाही हे लक्षात
घेऊन सेनापती शारदानन्दाला रानात घेऊन गेला पण शारदानन्दासारख्या कसलेल्या
नीतीतज्ज्ञाची, चतुर विद्वानाची आपल्या राज्याला ठायी ठायी आवश्यकता आहे हे जाणून
त्याने त्याचा वध न करता त्याला आपल्या महालाच्या तळघरात लपवून ठेवले आणि त्याच्या
अंगावर असलेले कपडे एका सशाला मारून त्याच्या रक्तात बुडवून राजाला नेऊन दाखवले.
ते पाहून राजाचा राग शांत झाला.
त्यानंतर काही दिवसांनी नंदपुत्र जयपाल शिकारीला गेला. अनेक पशू मारल्यावर त्याची दृष्टी एका कृष्णमृगावर पडली. त्याचा पाठलाग करत तो अत्यंत निबिड आरण्यात पोचला. त्याचं सैन्यही मागेच राहून गेलं आणि त्याची व सैन्याची चुकामूक झाली. इकडे कृष्णमृगही पहाता पाहता झाडीत अदृश्य झाला. एकटाच घोड्यावर स्वार झालेला तो राजकुमार एका सरोवरापाशी पोचला.घोड्यावरून उतरून त्याने घोडा एका झाडाला बांधला. सरोवराचं पाणी पिऊन तिथल्या झाडाच्या छायेत तो बसणार इतक्यात त्याला समोरून येणारा एक पट्टेदार, तरूण, सशक्त, हिंस्र चित्रक नावाचा वाघ दिसला. त्याला पाहून घाबरलेला घोडा त्याचा लगाम तोडून नगरीच्या दिशेनी पळून गेला. सर्व प्रसंगानी अत्यंत बिथरलेला, थरथर कापणारा राजपुत्र त्याच झाडाची फांदी पकडून
कसाबसा झाडावर चढला.
तो
ज्या फांदीवर चढून गेला तेथे पहिल्यांदाच एक अस्वल वाघाच्या भीतीने चढून बसलेलं
पाहून राजकुमार गर्भगळित झाला. थरथर कापू लागला. त्याला पाहून ते अस्वल
मनुष्यवाणीनी म्हणालं, ‘‘राजपुत्रा घाबरू नकोस. येथे तू मला शरण आला आहेस. सुरक्षा
मिळावी म्हणून येथे आला आहेस. मी तुला
काही अपाय करणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. वाघाची भीती बाळगू नकोस. त्यावर
राजकुमार म्हणाला, ‘‘हे अस्वलराज, शरण आलेल्या शरणार्थीचं रक्षण करणं ह्याहून अधिक
कुठलं धार्मिक वा नैतिक पुण्यकर्म नाही. हजारो जिवंत प्राण्यांच्या बलिदानाने
मिळणार्या पुण्यापेक्षा शरणागताला दिलेलं अभयदान हे श्रेष्ठ पुण्य आहे.’’
त्यांचा असा संवाद चालू असेतो तो वाघ ही तेथे
येऊन पोहोचला. दोघांना झाडावर पहून त्याने झाडाखालीच तळ ठोकला. थोड्या वेळात
सूर्यही बुडाला. अत्यंत थकलेल्या राजपुत्राला झोप येऊ लागली. तो तेथे फांदीच्या
आधाराने झोपायचा प्रयत्न करू लागला. ते पाहून ते अस्वलराज त्याला म्हणाले, ‘‘राजपुत्रा
असा झोपू नकोस. अशाने झोपेत तोल जाऊन तू खाली पडशील त्यापेक्षा तू माझ्या मांडीवर
निःशंकपणे झोप.’’ त्याचे ऐकून तो राजपुत्र अस्वलाच्या मांडीवर झोपी गेला.
राजपुत्र झोपला आहे हे पाहून खाली बसलेला वाघ
वरच्या अस्वलाला म्हणाला, ‘‘मित्रा, तुझ्या मांडीवर झोपलेला माणूस आहे. तो आपल्या दोघाांचाही
स्वाभाविक शत्रू आहे. तो गावातून ह्या जंगलात खास आपली शिकार करायला आला आहे. तू त्याला
तुझ्या मांडीवर का घेऊन बसला आहेस? तू भले त्याचा हितचिंतक असशील पण माणूस तुझ्या उपकारांच्या
बदल्यात अपकारच करेल आणि तुझं भलबुरं करायला मागेपुढे बघणार नाही. तू त्याला खाली ढकलून दे. मी त्याला आनंदाने खाईन.
माझंही पोट भरेल, मी येथून निघून जाईन आणि तुझाही जाण्याचा रस्ता निर्विघ्न होईल.’’
त्यावर अस्वल म्हणालं, ‘‘माझं काय बरवाईट व्हायचं असेल ते होवो. मी त्याला खाली ढकलून
देणार नाही. हा माझ्यावर विसंबून, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गाढ झोपला आहे; त्याला
मी फसवणार नाही आणि तुझ्या कुटील डावाला बळी पडणार नाही. तो कोणीही असला तरी मी त्याचा
विश्वासघात करणार नाही. शरण आलेल्याचा जीव घेणं हे महा पाप आहे.’’
काही
वेळाने राजपुत्र उठला. झोप झाल्याने त्याला तरतरी आली होती. ते पाहून अस्वल म्हणालं,
‘‘हा वाघ ह्या झाडाखालीच तळ ठोकून बसला आहे. तुझी झोप झाली आहे. आता मी थोडावेळ मी
झोपतो.’’ असं म्हणून तो राजकुमाराच्या शेजारी झोपला. तेव्हा खाली बसलेला वाघ राजपुत्राला
म्हणाला, ‘‘मित्रा, ह्या अस्वलावर भरवसा ठेऊ नकोस.त्याचे पंजे बघ किती तीक्ष्ण आहेत.
शिवाय मला तो अत्यंत लहरी स्वभावाचा वाटतो. त्याचा दयाळूपणाही मोठा कावेबाज वाटतो.
खरतर तुला खायचंच निश्चितपणे त्याच्या मनात आहे. म्हणूनच त्याने तुला जिवंत ठेवलं आहे.
तू त्याला खाली ढकलून दे. मी त्याला खाईन आणि निघून जाईन तूही निःशंकपणे तुझ्या नगरीत
परत जाऊ शकशील.’’
नदीनां च नखीनां च श्रृंगीनां शस्त्रपाणिनाम ।
विश्वासो नैव कर्तंव्य: स्त्रीषु राजकुशलेष्वपि ॥
तीक्ष्ण
नख्या असे ज्यांच्या । वा शिंगे असती महा
नाही
भरवसा त्यांचा । नदीचाही तसाच वा
बाळगे
नर शस्त्रासी । वा जरी रमणी कुणी
राज्य
कुशल वा कोणी । विश्वासार्ह न भूपती
नदी, तीक्ष्ण नखं असलेली जनावरें, शिंगाचे पशु, हत्यारबंद माणूस, स्त्रिया, नीतीशास्त्रकुशल, राज्यकारभार करण्यात
कुशल राजे यांचा कधीहि विश्वास धरुं नये असे नीतिशास्त्र सांग़ते म्हणुन तूं या अस्वलास खाली ढकलून दे. मी त्याला खाऊन निघून जाईन.
राजपुत्राने विचार केला. त्यालाही तो विचार पटला.
त्याने झोपलेल्या अस्वलाला खाली ढकलून दिलं. पण अस्वल खाली पडलं नाही कारण झाडाच्या
फांदीला आपल्या तीक्ष्ण नखांनी पकडूनच ते झोपलं होतं. त्यामुळे पडता पडता त्याने स्वतःला
लगेचच सावरलं. त्याची अणकुचिदार नखं झाडाच्या खोडात रोवून तोल सांभाळत ते सावरून बसलं. आता मात्र
राजपुत्र भयंकर घाबरला. भय़ाने थरथर कापू लागला. तेव्हा अस्वल म्हणालं, ‘‘अरे दुष्टा!
तू तर अधमाहून अधम निघालास. आता कशाला घाबरतो आहेस? मी तुला खाणार नाही. इजाही करणार
नाही.पण तुला आपल्या दुष्कृत्यांचं फळ भोगावच लागेल. आजपासून तू ससेमिरा चा जप करत
पिशाच्याप्रमाणे भटकत रहा. जो कोणी तुला हा विश्वासघाताचा प्रसंग अन्तर्ज्ञानाने जाणून,
ह्या प्रसंगाची आठवण करून देणारे स से मि रा ह्या अद्याक्षरांचे
चार श्लोक सांगेल तेव्हाच तुझे हे वेड जाईल.
तोपर्यंत पहाट होत आली. फटफटायला लागलं. वाघ आपल्याला
भक्ष्य मिळत नाही हे पाहून निघून गेला. अस्वलही आपल्या घराच्या दिशेने निघून गेलं.
इकडे राजपु्त्राचा घोडा राजपुत्राशिवाय एकटाच
गावात पोचलेला पाहून लोकांनी राजाला तशी वर्दी दिली. राजपुत्राशिवाय एकट्याच आलेल्या
घोड्याला पाहून राजपुत्राच्या बर्यावाईटाच्या शंकेने राजा स्वतः सैन्यासह राजपुत्राच्या शोधात जंगलात
निघाले. राजपुत्र ज्या दिशेने जंगलात गेला होता त्या दिशेने सर्वजण जंगलात पोचल्यार
काहीवेळाने त्यांना जंगलात ससेमिरा ससेमिरा अशा विचित्र शब्दाचा वारंवार उच्चार करत
हिंडणारा राजपुत्र दिसला. अत्यंत दुःखाने ते वेड लागलेल्या आपल्या राजपुत्राला घरी
घेऊन आले. सगळ्यांकडून उत्तम चिकित्सा करूनही कुठल्याही वैद्यराजाच्या औषधाने गुण आला
नाही तेव्हा राजाला शारदानंदांची आठवण झाली आणि तो म्हणाला, ‘‘आज जर शारदानंद असता
तर त्याने त्वरित ह्याला बरं केलं असतं. पण मीच त्याला मारायचा आदेश दिला. माणसाने
निर्णय घेतांना पूर्ण विचाराअंती घेतला पाहिजे जो विवेकाने निर्णय घेत नाही त्याला
संकटकाळात घोर निराशेचाच सामना करावा लागतो. त्यावेळी त्याला कोणी मदतही करू शकत नाही.’’
मंत्री म्हणाला, राजा, एखादी गोष्ट घडायची नसेल
तर ती अत्यंत सावधानी बाळगून पण होत नाही. आणि एखादी गोष्ट घडणारच असेल तर कुठले सुरक्षेचे
उपाय नसतानाही, कुठलीही सावधानी न ठेवताही घडून येते. तुमच्या हातात असलेलेही जर तुमच्या
नशिबात नसेल तर तुमचं नसतच! ( करतलगतमपि नश्यति यस्य हि भविताव्यता नास्ति )।
नंतर राजानी आपल्या मंत्र्यांना राज्यात दवंडी पिटण्यास सांगितली की, ‘‘जो
कोणी राजपुत्राला ठीक करेल त्याला अर्ध राज्य बक्षिस मिळेल.’’ मंत्र्यांनीही
राजाच्या मताला दुजोरा दिला. ते ऐकून सेनापती घरी आला. त्याने शारदानंदाला सर्व
हकिकत सांगितली; तेव्हा शारदानंद अन्तर्ज्ञानाने वनात घडलेला सर्व वृत्तान्त जणून म्हणाला, ‘‘ सेनापती,
तू राजाला सांग की माझी मुलगी चतुर आहे ती ह्या राजपुत्राचा इलाज करू शकेल. पण ती राजपुत्राच्या
वा कोणाच्या समोर येणार नाही. राजपुत्र आणि तिच्यामधे एक पडदा असेल. पडद्यामागून ती
राजपुत्राशी बोलेल.’’ त्याप्रमाने सेनापतीने राजाला सांगितले. राजा तयार झाला.
राजा राजपुत्राला घेऊन सेनापतीच्या घरी गेला.
राजासह वेड लागलेला राजपुत्र ससेमिरा चा जप करत पडद्याच्या दुसर्या बाजूला बसला. जंगलात
झालेला सर्व वृत्तांत अंतर्ज्ञानाने कळलेल्या शारदानंदाने राजपुत्राला उद्दशून पहिला
श्लोक म्हटला,
सद्भावप्रतिपन्नानां वचने का विदग्धता ।
अङ्कमारुह्य सुप्तानां हन्तुः
किं नाम पौरुषम् ।।1
सद्भाव जागवूनीया । चित्ती विश्वास तो भला
वंचना करणे
त्याची । योग्य का ही कृतघ्नता ।।1.1
निर्धास्त झोपला
गाढ । मांडीवरी विसंबुन
करावा घात
त्याचाची । ह्यात शौर्य न पौरुष ।। 1.2
आणि काय आश्चर्य! राजपुत्राच्या ससेमिरा ह्या
त्याच त्याच उच्चारणातील स हे अक्षर जाऊन तो सेमिरा सेमिरा ---- म्हणू लागला. आता शारदानंदाने से ह्या अक्षराने सुरवात असलेला
दुसरा श्लोक म्हटला,
सेतुं गत्वा समुद्रस्य गङ्गासागरसङ्गमम् ।
ब्रह्महत्यापि मुञ्चेत मित्रद्रोही
न मुच्यते ।।2
सेतूपर्यंत रामाच्या । केले तीर्थाटना जरी
भावे पायी जरी पोचे । गंगा सागर
संगमी ।
ब्रह्महत्येसमा जाई । त्याने पाप
भयंकरी ।
परंतु मित्रद्रोह्याला । मुक्ती
ना मिळते कधी ।।2
आणि से हे अक्षर राजपुत्राच्या घोकमपट्टीतून गळून
गेलं राजपुत्र मिरा मिरा मिरा---- म्हणू लागला. राजाही आश्चर्याने बघत होता. तोच सेनापतीच्या
त्या घुंघटधारी मुलीने तिसरा श्लोक म्हणायला सुरवात केली,
मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः ।
त्रयस्ते नरकं यान्ति यावदाहूतसंप्लवम्
।। 3
मित्रद्रोही कृतघ्नासी । विश्वासघातक्यासही
एकमात्र गती लाभे । नरकाची भयंकरी
अनंतकाळपर्यंत । ना हो प्रलय जोवरी
तीघांची सुटका नाही । तोवरी रौरवातुनी
।।3
आता मात्र राजपुत्र रा रा रा घोकत राहिला. आणि
पडद्यामागून राजाला अत्यंत सुस्पष्ट श्लोक ऐकू आला,
राजन् तव च पुत्रस्य यदि कल्याणमिच्छसि।
दानं देयं
द्विजातिभ्यो देवाराधनं कुरू ।। 4
राजा जरी स्वपुत्राचे । व्हावे कल्याण वाटते
दान देई
द्विजांना तू । जाई शरण ईश्वरे
त्या श्लोकाच्या श्रवणाने राजपुत्राचं वेड गेलं.
राजपुत्र पूर्वीसारखा वेडविरहित झालेला पाहून अत्यानंदाने राजाने त्याला मिठी मारली.
आणि सर्व वृत्तांत विचारला. जंगलात घडलेली सर्व घटना त्याने वडिलांना सांगितली. तेव्हा
पडद्यामागील मुलीचे आभार मानत राजा म्हणाला, ‘‘मुली, तू तर त्यावेळी त्या निबिड रानात
नव्हतीस मग तुला त्या तेथे घडलेला प्रसंग कसा कळला?’’ त्यावर घुंघट घेऊन बसलेला शारदानंद
राजाला म्हणाला, ‘‘राजा, ज्या अन्तर्ज्ञानाने मला राणी भानुमतीच्या मांडीवरील तीळ कळला,
त्याच अन्तर्ज्ञानाने मला रानातला प्रसंगही कळला.’’
ते ऐकताच राजाने क्षणात पडदा दूर केला. तेथे बसलेल्या
शारदानंदाला पाहून राजाला अत्यंत आनंद झाला. स्वतःच्या घोडचुकीबद्दल त्याने साष्टांग
नमस्कार घालून त्याची माफी मागितली. शारदानंदाला ठार न मारता जिवंत ठेवल्याबद्दल आपला आनंद व्यक्त करत त्याने
सेनापतीचेही आभार मानले. देऊ केलेलं राज्य शारदानंदाने परत राजालाच देऊ केलं.
---------------------------------------
Comments
Post a Comment