ताम्बूल/विडा -

 

ताम्बूल/विडा -

  

पूर्वी कोणी आपल्याकडे आलं वा आपण कोणाकडे गेलो तर काही तरी खाऊ दिल्याशिवाय जाऊ देत नसत. किमान चहा, कॉफी नाहीतर दूध अगदीच काही नको म्हटलं तर हातावर चमचाभर साखर तरी ठेवायची पद्धत होती. नागपूरला गेल्यावर ‘‘काही नको’’ म्हटलं तर ‘‘किमान पान तरी खाऊन जा’’ म्हणून आग्रह व्हायचा. लगेचच पानाचं तबक पुढे येई. हे सजलेलं पानाचं तबक मला माझ्या बालपणात घेऊन जाई. घरी सणासुदीला सवाष्ण ब्राह्मण वा कोणी जेवायला यायचं असेल तर विडे बनवायचं काम आम्हा मुलींकडे येई. तबकात छान मोठी मोठी जरा हिरवट पिवळसर रंगाकडे झुकलेली,मऊ नागवेलीची पानं, कात, चुना, वाट्यांमधे मसाला सुपारी (घरी बनवलेली), बारीक लखनवी बडिशेप, गुलकंद, ताजं खोवलेलं ओलं खोबरं, वेलदोडा, लवंग, गुंजेचा पाला, अस्मन्तारा (पुदिन्याचा अर्क) अशी बरीच सामग्री असायची. पानांच्या गठ्ठ्यातील वीडा बांधता येईल अशी सुबक पानं वेगळी काढून, पुसून, येणार्‍या पाहुणे किती आहेत याचा हिशोब करत विडे एका पानाचे लोडाचे का दोन पानाचे घडीचे का तीन वा पाच पानाचे गोवंद विडे --- का सशाच्या कानाचे विडे हे ठरवत आम्ही विडे बांधत असू. पानं चांगली नाहीच मिळाली किंवा विसरली तर कोपर्‍यावरून पानपट्टी आणायचं कामही करावं लागे. पानपट्टी, लोडाचे, घडीचे, गोविंद वा कानाचे विडे हा चढत्या भांजणीने विड्याची श्रीमंती दाखवणारा सोपान आहे असं मला वाटतं.

विडा बांधणं ह्या कारागिरी इतकच विड्याच्या आतील रसायन जसं हवं तसं जमणं हे हेही कौशल्य असे. चुना कात जास्त नको. चुना जास्त झाला तर जीभ भाजते. जास्त कात विडयाला कडवट चव देतो. पण विडा रंगायलाही हवा. फार गोड नको आणि कोरडा रुक्षही नको. सर्व काही प्रमाणात हवं. असा तोल सांभाळत निगुतिने केलेला विडा खाऊन पाहुण्यांनी कौतुक केलं की पानं नखलून दुखणारी बोटंही खूष होत. 

आपल्याकडे काव्य प्रकारात विडा हा फार सुंदर काव्य प्रकार आहे. ‘‘विडा घ्या हो नारायणा’’ म्हणत रुक्मिणी आपल्या रुक्मिणीकांताला विडा देऊ करते. पत्नी आपल्या पतीला अथवा यथासांग पूजेनंतर भक्त आपल्या आराध्याला विडा/ तांबूल अर्पण करतो. ह्या विड्यांची बांधणी मोठी सुंदर असते. हीच कल्पना मनात धरून उमेच्या मुखात असलेल्या तांबुलाचं वर्णन शिखरिणीमधे करायचा अरुंधतीने प्रयत्न केला.

सदा शांतीच्या या हरित मनपर्णावर उमे

अशांती रूपी या नखलसि शीरा देठ निगुते

उमे जाळोनीया सकल अवघे मीपण सुखे

चुना मोतीयाचा धवल हळु लावी तव करे ॥ 3.1

 

मनाचा बुद्धिचा करुनी अडकित्ता कतरसी

मनीषांची सार्‍या अवघड सुपारी कुरकुरी

सुबुद्धीची घाली रुचकर बरी वेलचि वरी

विवेकाचा लावी लव अरुण तो काथ वरती ॥ 3.2

 

सुगंधी कस्तूरी विविध तव अंगीकृत कला

विड्यामध्ये घाली हृदय जणु का केशर अहा

महा वैराग्याची परिमलयुता जायपतरी

महा संकल्पाचे सबळ वर हे जायफळही॥ 3.3

 

तयी भावार्थाचा अति रुचिर कर्पूर सजवी

दयाबुद्धीरूपी सुमधुर खडीसाखर गुणी

विडा बांधूनी हा त्रयदशगुणी सात्विक अती

क्षमारूपी त्याच्यावर जणु लवंगा ठसविसी ॥ 3.4

 

असा घोळे जोची त्रयदशगुणी तांबुल मुखी

तुझ्या भक्तांना तो अनुपम सुखे दे मिळवुनी

उमेच्या मुखातला हा तांबूल साधासुधा नाही तो त्रयोदशगुणी ताम्बूल आहे. तिच्या सर्व गुणांनी रंगला आहे. भक्त त्याचे दोष जाळून, सर्व गुण एकत्रित करून बांधलेला ताम्बूल आपल्या आराध्याला अर्पण करतो. काही वेळेला मात्र वेगळा प्रसंगही येतो.

(सौंदर्य लहरींमधे) राक्षसांसोबत युद्ध जिंकल्यावर आपण युद्ध जिंकलं हे सांगण्यासाठी देवेंद्रासहित सर्व देव इतके उतावीळ होतात की, आपला पराक्रम सांगण्यासाठी, कौतुक करवून घेण्यासाठी सारे देव आपले युद्धभूमीवरील शिरस्त्राण, चिलखत/ कवच हा पोशाख न बदलताच प्रथम शिवाकडे न जाता मनापासून कौतुक करणार्‍या आपल्या पार्वतीमातेचं दर्शन घ्यायला येतात. त्यावेळी पार्वती आपल्या मुखातील त्रयदशोगुणी तांबुल त्यांना भरवून आपल्या सर्व पुत्रांचं/ सर्व देवांचं कौतुक करते असं वर्णन आहे.(श्लोक 65)

मित्रांनो  उमेच्या मुखातील तांबूल आहे तरी कसा ह्याचं वर्णन म्हणूनच आधी वर दिलं आहे. आपण आत्मसात केलेल्या सर्व विद्या, कला, गुण ह्यांच प्रतिक हा तांबूल आहे. हे सर्व गुण, कला विद्या जणु काही तिच्या जिभेवरच ताम्बूल रूपात हजर आहेत. असा ताम्बूल आपल्या पुत्रांना सहज आत्मसात करता येईल अशा प्रकारे ती प्रत्येक पुत्राला भरवत आहे. 

   रणी दैत्यांना त्या करुनिच पराभूत सहजी

रणातूनी येती सुरगण कराया नमनची

असे अंगी त्यांच्या चिलखत रणी जे चढविले

सवे त्याच्या येती प्रथम करण्या वंदन शिवे ।। 65.1

 

प्रसादाची माते धरुन मनि गे आस तुझिया

शिरीचे काढूनी मुकुट करती वंदन तुला

प्रसादा देऊनी सुखविसि सुरांसीच सकला

तुझ्या तांबूलाने सकल म्हणती धन्य क्षण हा ।। 65.2

अहो असा ताम्बूल मातेच्या मुखातून प्रत्यक्ष मिळाला तर निरस जीवन सर्व रसांनी परिपूर्ण नाही झालं तरच नवल! रंगहीन आयुष्य रंगात न्हाऊन निघालं नाही तरच आश्चर्य! निरुद्देश्य जीवनाला उद्दिष्ट सापडलं नाही तरच अपूर्वाई!

--------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –