ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु !

 

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु !

अशोक चंक्रांकिता, ध्वजा ही राष्ट्राची देवता देवता----गाणं ऐकताना आपल्या राष्ट्रध्वजावरील निळ्या रंगाचं अशोक चिन्ह, त्याच्यावरील 24 आरे असं  सर्व चित्र डोळ्यासमोर आपोआप येत राहतं. त्यासोबत अशोकाची गोष्ट, अशोकस्तंभ, स्तंभावरील चार रुबाबदार सिंह! सगळ्या कशा भारताच्या मातीचं नातं सांगणार्‍या भूषणावह गोष्टी!---मन भरून येतील अशा! ---छाती अभिमानाने भरून येईल अशा!

महाराष्ट्राला शिवराजांचा वारसा वा प्रतिक म्हणून लाभलेला जरीपटका म्हणजे महाराष्ट्राची देवताच जणू. पूर्वी ध्वज घेऊन सैन्याच्या आघाडीला राहणारे शूर वीर ‘बिन्नीचे स्वार’ म्हणून ओळखले जात. समरांगणावर जोवर ध्वज फडकत आहे  तोवर  आपलं सैन्य विजयी आहे हे वेगळं सांगायला लागत नसे.  बिन्नीचा स्वार पडला तरी त्याच्या हातातील झेंडा सहजपणे दुसरा सांभाळत असे पण ध्वज खाली पडू देत नसे. इतकं महत्त्व त्या ध्वजाला आहे. प्रत्येक राष्ट्राचा आपला झेंडा असतो.

उगवत्या सूर्याचा प्रदेश हे सांगणारा जपानचा झेंडा पांढर्‍याशुभ्र  पृष्ठभागावर लालबुंद सूर्य दाखवतो. तर अमेरिकेत 50 states आहेत हे सांगण्यासाठी अमेरिकेच्या झेंड्यावर 50 stars असतात. तर 13 पट्टे मूळ ब्रिटिश वसाहतींचे प्रतिक आहेत.

दक्षिण गोलार्धात असलेल्या देशांमधून दक्षिण आकाशात दिसणारे The Southern Cross (Crux constellation)  लक्षवेधी वेगळेपण दाखवणारे असते. ( आपण त्याला दक्षिणेकडच्या आकाशात विश्वामित्रांनी सदेह स्वर्गाला पाठवलेला पण धड ना स्वर्गात धड ना जमिनीवर असा मधेच पण उलटा लटकणारा त्रिशंकू म्हणतो.) हा Southern Cross वा त्रिशंकू ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, न्यूझिलंड, पापुआ न्यू गिनिया आणि सामोआ ह्‌या दक्षिण गोलार्धातील देशांच्या झेंड्यावर विराजमान असतो.

 


हे पहात असताना मन प्राचीनकाळातील ध्वजाचा शोध घेऊ लागलं आणि लक्षात आलं की, फार पूर्वीपासून ध्वजांवर कसली ना कसली चिन्ह आहेतच! त्या काळातील त्या गोष्टींची महती सांगणार्‍या! त्या त्या प्रदेशातील विपुलता दर्शविणार्‍या किंवा काही खास गोष्टींशी नातं सांगणार्‍या!

रामायण काळात जाउन शोध घेतल्यावर, स्कंद आणि कूर्म पुराणानुसार ईक्ष्वाकुंच्या ध्वजावर कोविदार वृक्षाचे चिह्न असे. कोविदार म्हणजे कांचनवृक्ष! आपला शत्रू येत आहे का मित्र हे दूरवरूनच रथावर फडकणार्‍या ध्वजावरून कळत असे. राम14 वर्षांच्या वनवासाला गेला तेव्हा भरत अयोध्येत नव्हता. भरत येऊन, वडिलांचे सर्व अग्निसंस्कार करून, रामाला परत आणण्यासाठी म्हणून सर्व सैन्य घेऊन निघाला. राम तोवर चित्रकूटला पोचला होता. ऋषी, मुनींना विचारत, रामाचा ठावठिकाणा शोधत येणारं सैन्य लक्ष्मणाला दुरूनच दिसलं. हे सैन्य भरताचं आहे हे लक्ष्मणाने ओळखलं ते सैन्याच्या रथावर फडकणार्‍या भरताच्या कोविदार ध्वजामुळे! भरताच्या ध्वजावर कोविदार वृक्षाचं चिह्न होतं. ( अयोध्या कांड 96 वा सर्ग श्लोक 18 - कोविदारध्वज रथे, 21-अपि नौ वशमागच्छेत् कोविदारध्वजो रणे--)

  रघुवंशाचा ध्वज लाल आणि मरून ह्याच्या मधला म्हणजे साधारण कमळाचा (lotous pink) ज्याला अरक्कु म्हणून संबोधले जाते अशा रंगाच्या पृष्ठभागावर सूर्याच्या ज्वाळांप्रमाणे तीन शमी पत्र दाखवणारा असे. असं म्हणतात की लाल रंग हा निसर्गातील वनस्पतींपासून बनविलेला पहिला रंग आहे. कोरोमंडल किनार्‍यावर मिळणार्‍या मंजिस्ता/ मजिठा/ छायावेर ह्या वनस्पतीपासून चमकार अरक्कु रंगाची निर्मिती होत असे आजही कांचीपुरमच्या रेशमी साड्यांना रंग देण्यासाठी अरक्कु रंग वापरला जातो.

 

रामाच्या ध्वजाला अरुणध्वज असंही म्हणतात. काहींच्या मते रामाच्या ध्वजावर सूर्याचं चिह्न असे. रामाने रावणासोबतच्या युद्धात रघुवंशाचा ध्वज घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता असं म्हणतात. राम रावणाच्या युद्धात रावण रथावर होता तर श्रीराम पायी. रावणाशी युद्धाच्या वेळी मात्र इंद्राने आपला सुवर्णरथ आपल्या सारथी मातलीसह श्रीरामाच्या सेवेला पाठवला. इंद्राच्या ध्वजाला जय, विजय, किंवा जाम्बूनद म्हणत. जाम्बूनद हया संस्कृत शब्दाचा अर्थ सोने असा आहे. त्याच्यावर सोन्याचा ध्वजदंड होता. इंद्राच्या ध्वजावर कपाल म्हणजे कवटीचं चिन्ह असे.  

रावणाच्या ध्वजावरही मानवी कवटीचं चिह्न असे. रामाबरोबरच्या युद्धातही रावणाच्या ध्वजावर कवटीचेच चिह्न होते. रावणाच्या/ राक्षसांच्या रथाला घोड्यांऐवजी गाढवं जोडलेली असतं. रावणाच्या रथाच्या गाढवांना सोन्याची चिलखतं घातलेली असत आणि त्यांची तोंड पिशाच्याप्रमाणे असल्याचाही उल्लेख येतो.

रावणाच्या मुलाच्या मेघनादच्या ध्वजावर मृगराज सिंह अंकित केलेला असे. रावणाच्या बाजूने लढणार्‍या प्रहस्ताच्या ध्वजावर सर्पाचे चिह्न होते. तर कंभननाच्या ध्वजावर शेषनाग!

महाभारतकालीन उल्लेखांमधे बलरामाच्या ध्वजावर तालपत्राचं (ताडाच्या झाडाच्या गोलाकार पंख्याप्रमाणे असलेल्या) चिन्ह असे. कृष्णच्या ध्वजावर गरुडाचं चिह्न असल्याने कृष्णाला गरुडध्वज असं संबोधलं जातं तर अर्जुनाच्या ध्वजावर हनुमान/ कपि/ वानर हे चिह्न असल्याने अर्जुनाला कपिध्वज असे म्हणतात. पितामह भीष्मांच्या ध्वजावर तालपत्र आणि पाच तारे असं चिह्न होतं तर, द्रोणाचार्यांच्या ध्वजावर सुवर्णवेदी, कमंडलू आणि धनुष्य अंकित केलं होतं. कृपाचार्यांच्या ध्वजावर सांड/ बैलाचं चित्र होतं.

धर्मराजाचा ध्वज चंद्र आणि नक्षत्र अंकित असलेला सुवर्णध्वज असे

सहदेवाचा ध्वज चांदी जडित हंस, घंटा पताका युक्त तर नकुलाच्या ध्वजावर सुवर्ण पाठीचं लाल हरीण असे

अभिमन्यूच्या रथावर पिवळ्या पानांचा वृक्ष आणि शरभ पक्षी (हा शरभ काल्पनिक पक्षी हत्ती आणि सिंहाहूनही बलवान मानला जाई.त्याचा अर्धा भाग सिंहाचा अर्धा मनुष्याचा, आठ पाय, दोन पंख, चोच, सहस्र भुजा, माथ्यावर जटा, मस्तकी चंद्र असा रागरंग असे.) असलेला ध्वज फडकत असे

 

 शरभ

मंद्रराजाच्या ध्वजावर नांगर तर अंगराज वृषसेनाच्या ध्वजावर मोर; जयद्रथाच्या ध्वजावर - चांदीचा शूकर /वराह असे. भूरीश्रवाच्या ध्वजावर  यूप चिह्न होतं. बळी द्यायच्या पशूला ज्या खांबाला बांधतात त्याला यूप म्हणतात. त्याचा ध्वज सूर्याप्रमाने प्रकाशमान व्हायचा आणि त्याच्या ध्वजावर चंद्रमाही दिसत असे. घटोत्कचाच्या ध्वजावर गिधाड चिह्न होतं तर दुर्योधनाच्या ध्वजावर नागाचं चिह्न होतं. अश्वत्थाम्याच्या ध्वजावर सिंहाच्या शेपटीचं चिह्न होतं.

ध्वजा एखाद्या व्यक्तीची अथवा गोष्टीची उपस्थिती सांगते. अग्नीला धूमध्वज म्हणतात. जेथे धूर असतो तेथे अग्नी असतोच. ध्वजा ह्या अर्थी केतू असाही शब्द आहे. धुराची किंवा दगड, गोटे धुळीची शेपटी वागविणार्‍या, आकाशात अचानक दिसणार्‍या तार्‍याला धूमकेतू तेवढ्यासाठीच म्हणतात.

आपल्याकडे नवीन वर्षाच्या प्रभातीस , गुढीपाडव्याला गुढी वा जो ध्वज उभारतात त्याला ब्रह्मध्वज म्हणतात. वसंत ऋतू हा नवीन निर्मितीचा ऋतू आहे. झाडांना नवीन पालवी फुटते. फुले येतात. जणु काही सृष्टी निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाचं प्रतिक वा त्या विधात्याचे आभार म्हणून आपण गुढ्या, ध्वज उभे करतो. नवनिर्मितीचा सोहळा आणि नव-वर्ष एकमेकांसोबत साजरं करण्याची ही गोड परंपरा आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारी, कल्याणकारी, निसर्गाशी प्रत्येकाचे धागे जोडणारी असते.

शालिवाहन ह्या हिंदू राजाने भारतावर चालून आलेल्या अत्यंत क्रूर शक आणि हूणांचा पराभव करून त्या प्रित्यर्थ नवीन कालगणना सुरू केली. त्या कालगणनेनुसार आपल्या नवीन वर्षाचे/ संवत्सराचे नाव विश्ववसु असून शालिवाहन शक 1947 आहे. दुष्ट शत्रूंचे निर्दालन केल्याची आठवण, पराक्रमाचे प्रतिक म्हणून सुरू केलेल्या अशा अनेक कालगणनांची परंपरा भारतात आहे, विक्रमाने केलेला पराक्रम सर्वांना लक्षात रहायला लावणारे विक्रम संवत्सर जसे आहे तसे फार पूर्वी धर्मराजाच्या पराक्रमाची निशाणी म्हणून त्यानेही सुरू केलेली कालगणना होती. असो! 

राजा शालिवाहन, राजा विक्रम  अशा ह्या आपल्या हिंदू राजांनी केलेल्या अफाट पराक्रमाचे प्रतिक असलेल्या ह्या नववर्षानिमित्त

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु।।

म्हणजेच, सर्व मनोकामना पूर्ण करणार्‍या ब्रह्मध्वजाला माझा नमस्कार असो. हे सुरू झालेले नवीन वर्ष माझ्या घरी कुशल मंगल करो. ह्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जागणार्‍या प्रार्थनेसह सर्वांना मनापासून शुभेच्छा!



---------------------------------

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –