मेघदूतम्
मेघदूतम्
काही गोष्टी माणसाला कृतार्थ करणार्या असतात. धन्य करणार्या
असतात. काशी विश्वनाथाचं दर्शन असो वा पवित्र
गंगामय्याचं स्नान असो! ती अनुभूतीच वेगळी
असते. किती यात्रेकरूंनी त्याचा लाभ घेतला, ह्याच्याशी माझं काही देणं घेणं नसतं. माझ्या
आधीही लाखो यात्रेकरू येउन गेलेले असतात; नंतरही लाखो येणार असतात. पण----! मला काशीची तीर्थयात्रा घडली,
मला गंगामैया भेटली हा माझ्यासाठी, मला कृतार्थ करणारा, मला धन्यता
देणारा अनुभव असतो.
त्याप्रमाणे मेघदूत असो वा गंगालहरी असो ही कालातीत काव्य
आहेत. त्यांच्यात उणेपणा वा जुनेपणा येत नाही. त्यांचा अनुवाद किती जणांनी केला
ह्यापेक्षा तो मी केला हा निस्सीम आनंद तीर्थक्षेत्राच्या दर्शनासारखा असतो.
अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुखांनाही त्याचा अनुवाद करावासा वाटतो. कविवर्य बा.भ.
बोरकरांनाही त्याचा अनुवाद करावासा वाटतो.
कवितेवर आपली ठसठशीत मोहोर उमटवण्यार्या शांताताईंनाही त्याचा अनुवाद
करावासा वाटतो, ज्ञानपीठ लाभलेल्या कुसुमाग्रजांनाही त्याचा अनुवाद करावासा
वाटतो. आणि आपल्यालाही वाटतो. पूर्वीही अनेक जणांनी केला. सध्याच्या तेलंगणामधे रहात असलेल्या मल्लिनाथानी
त्याच्यावर लिहीलेला भाष्यग्रंथ सर्वात अधिक गाजला होता. त्यावरूनच उत्तम भाष्याला
मल्लिनाथी म्हणायला लागले.
हे काव्यच इतकं सतेज
आहे सचेत आहे की प्रत्येकाला एक नवीन स्फूर्ती देऊन जातं. प्रत्येकाचा अनुवाद काही
वेगळ्याच गोष्टींनी, वेगळ्याच ध्येयानी प्रेरित होऊन केला गेलेला असतो. कुठला मंतरलेला
क्षण कोणाला कुठल्या गोष्टीसाठी प्रेरित करेल हे सांगता येत नाही. हे काव्य अनेक कवी,
लेखक, नाटककार नर्तक, अभिनेते, गायक ह्यांना स्फूर्ती देणारं ठरलं आहे.
एक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे पुण्याचे सुप्रसिद्ध शल्य-विशारद
डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांचा! ते कालिदासाच्या काव्याने इतके भारावून गेले, मोहित
झाले की, ते म्हणाले, ‘‘कालिदासा मीच तुझा दूत होतो आणि तू जिथून जिथून त्या मेघाला
जायला सांगितलस तिथून तिथून त्या रस्त्यानी आकाशातून माझं विमान घेऊन आकाशमार्गानी
जाऊन येतो.’’ इतकच नाही ते रघुवंश हया कालिदासाच्या
काव्यातील रामाचाही पदपथ आकाशातून भ्रमण करून आले. त्यांनी रामटेक म्हणजे नागपूरपासून
हिमालयापर्यंत स्वतःच्या विमानानी जसा प्रवास केला तसा अयोध्या ते थेट श्रीलंकाही त्यांच्या
विमानाने, त्यांच्या गाडीनी होडीने प्रवास केला आणि आणि ह्या मार्गावरील छायाचित्र
असलेला एक अद्भुत ग्रंथ लिहीला. जेव्हा विमानं अस्तित्वात नव्हती तेव्हा कालिदासानी
हे इतकं अचूक ‘करतलामलक’ म्हणजे तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं; म्हणजे आता
आपण ड्रोन वर्णन म्हणू या; असं नेमकं भारताचं आकाशातून वर्णन कसं केलं असेल हे एक आश्चर्यच आहे. वाल्मिकी रामायणात लोणारचं सरोवर
हे चौकोनी असल्याचा उल्लेख आहे. पण कालिदासानी मात्र हे सरोवर गोला असल्याचा केलेला
उल्लेख किती अचूक होता हे भाव्यांनी प्रत्यक्ष आकाशातून छायाचित्र काढून दाखवून दिलं.
डॉ. भाव्यांनी अजून एक निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणजे, आकाशातून सज्जनगड हा भारताच्या
नकाशासारखा दिसतो. एखाद्या मोठ्या भूभागाचा प्रत्यक्ष छोटा नकाशा त्याच भूभागात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असावा हे केवढं
आश्चर्य! प्रत्येकाला येणारे हे विविध अनुभव
प्रत्येकाला तीर्थयात्रेची स्वतंत्र अनुभूती देणारे असतात.
पण---! काशीला गंगामय्याच्या घाटापासून ते काशीविश्वनाथाच्या राऊळापर्यंत पर्यंत थेट प्रशस्त
कॉरिडॉर व्हावा असं एखाद्या मोदीजींनाच वाटतं आणि ते ती कल्पना प्रत्यक्षात आणतातही. असं भव्य दिव्य
स्वप्न पहायला कल्पनाशक्ती लागते; ती साकारण्याची इच्छाशक्ती लागते. आणि ती प्रत्यक्ष
कृतीत आणण्यासाठी लोकांच्या पाठिंब्याची, आर्थिक
सहाय्याची, कुशल कारागिरांच्या सहाय्याची खंबीर शक्तीही लागते.
विनयाताईंनी माझ्यासारख्या
सामान्य वाचकांना मेघदूताच्या सरळ अर्थापर्यंत पोचता येईल, त्याचा रसास्वाद घेता येईल
असा भव्य कॉरिडॉर त्यांच्या अमरमेघ ह्या पुस्तकाच्या रूपानी बांधला असं म्हणता
येईल. एक एक श्लोक वाचतांना त्याच्यातील अनेक गोष्टी सुंदर रीतीनी उलगडून दाखवत त्यांनी
तो कॉरिडॉर इतका सुंदर सजवला आहे की, त्या मार्गावर आपणच जणु त्या मेघासवे जात आहोत
असं वाटतं. त्यांनी दिलेल्या रसास्वादात्मक टिपा इतक्या सुंदर आहेत की वाचन हे वाचन
न राहता आपण त्या लावण्यसूक्तचा भाग आहोत असं त्या वाटायला लावतात. आज मेघदूत नव्यानी
अनुभवलं असं वाटतं.
मेघदूतावर अनेक पुस्तकं आहेत पण त्याचा रसास्वाद कसा घेता
येईल हे विनयाताईंच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच त्यांनी मेघदूताचं लावण्योपनिषद्
करून ते आपल्या हातात ठेवलं आहे.
सामान्य माणसाला नको
वाटणारं रूक्ष करणारं व्याकरण त्यांनी वगळलं आहे. तरी थोडं बहुत संस्कृत कळणार्यांना
अन्वयाची काठी किंवा शिडी ठेवली आहे
काव्याची गोडी चाखताना साहित्य शास्त्राची काय गरज? हा वाचकांच्या मनातला प्रश्न विनयाताईंनी स्वतःच
उपस्थित केला आहे. त्यांनी त्याचं उत्तर फार सुरेख दिलं आहे. विनयाताईंनी त्यासाठी
समईचं सुंदर उदाहरण दिलं आहे. अंधारातील गोष्ट
दिसण्यासाठी समई लावावी लागते. पण वस्तू दिसताच आपण समईकडे पाठ करतो. शास्त्राचं तसच
आहे. हल्ली आपण बटण दाबलं की दिवा लागतो त्यामुळे सर्व गोष्टी इतक्या गृहीत धरल्या
जातात की असं काही शास्त्र आवश्यक आहे असा विचारही आपल्या मनात येत नाही.
मेघदूतातील दुसर्या
श्लोकात पत्नी विरहानी एकट्या यक्षाचा काळ जात नाहीए असा पाठ आहे. त्यांनी दिलेली टिप
आहे; कालः न गतः – कालं तेन नीतः काळ जात नाहीए तो काळ कसाबसा कंठतोय हे वाचताना मला
सहज वेरूळची आठवण झाली. वेरूळच्या लेण्यामधे एक छोटं शिल्प कमानीसारख्या एका भागावर
कोरलेलं सोबतच्या गाइडनी दाखवलं. एका बाजूला एक यक्ष सामानाचं बोचकं घेऊन चालला आहे.
त्याच्या चेहर्यावरचे भाव दुःखी कष्टी दमलेले. तर दुसर्या चित्रात एक यक्ष पतिपत्नी खूप मोठा बोजा घेऊन आनंदानी वेगानी चालले आहेत. ही दोन चित्र जवळ असली
तरी त्यांचा काही एकमेकांशी संबंध आहे हे नवख्याला कळत नाही त्या दोन चित्रांमधे असलेल्या
अदृश्य लिंक्स जेव्हा तिथला गाइड उलगडून सांगतो तेव्हाच ते कळत. एकट्या माणसाला थोडसं
ओझही पेलवत नाही. त्याला जीवनाचच ओझं होतं. तो काळ कंठतो एकटेपणामुळे तो थकतो कंटाळतो.
पण नवराबायको दोघं बरोबर असले की ते दसपट ओझं सहज उचलून आनंदानी जातात. हे सांगायला
गाईडच लागतो. गाईड हा मला कायम अदृश्य गोष्टी दाखवणारा चष्मा वाटतो तसं विनयाताईंचं
पुस्तक हे इतरवेळेला ज्या सामान्य शब्द, प्रसंग ह्यांच्याकडे लक्षही जाणार नाही अशा
अदृश्य पण अनेक न दिसलेल्या गोष्टीतलं सौंदर्य समजाऊन सांगणारं पुस्तक आहे. जो कोणी
हे पुस्तक वाचेल त्याला तो जादुई चष्मा मिळेल.
शास्त्र आवश्यक कसं असतं बघा हं! अमेरिकन माणसाला मराठी जेवण वाढलेलं ताट नुसतं पुढे
ठेउन चालत नाही. तू कसं जेव हे सांगायला लागतं. तू पोळीबरोबर भात खाऊ नकोस. भाताबरोबर
श्रीखंड वा आामरस खात नाहीत. वाडगाभर कोशिंबीर तुझ्या एकट्यासाठी सॅलड म्हणून ठेवलेली
नाही. हे एरवी त्याला कसं कळणार?
प्रत्येक शब्दाच औचित्य विनयाताईंनी फार सुरेख समजावलं आहे. पत्नी ह्या अर्थी
कान्ता, भार्या अनेक शब्द असले तरी; जी अत्यंत प्रिय आहे ती कान्ता! तोच शब्द कालिदासाने वापरला आहे
एखाद्या तन्मण्यासारख्या दागिन्यात अनेक रत्न बसवण्यासाठी
विविध आकाराची कोंदणं बनवलेली असतात. प्रत्येक रत्नाचं कोंदण ठरलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं रत्न तिथे बसणार नाही.
त्याचप्रमाणे एकाच अर्थी अनेक शब्द असले तरी त्यांच्यात वेगवेगळ्या अर्थछटा
असतात. अशावेळी काव्यात येणार्या शब्दाच ‘अनतिरिक्तत्व ’ त्याच्यासम तोच!
दुसरा कुठला नाही. त्या प्रमाणे अन्यून म्हणजे
त्यात काही न्यून, कमी न राहणं! त्यांनी सहज दाखवलं आहे. हे अनतिरिक्तत्व आणि अन्यून
विनयाताईंमुळेच कळतं.
वाल्मीकी रामायण असो, शिवमहिम्ना सारखं संस्कृत स्तोत्र असो
वा मेघदूतासारखं कालिदासाचं काव्य असो! श्लोकातला चवथा चरण हा ‘‘गागर में सागर’’ असा
एखादा वैश्विक सिद्धांत थोडक्या शब्दात मांडणारा असतो. ज्याचं भाषांतर करणं हे अनुवाद
करणार्याचा कस लावणारं असतं. योग्य रीतीने हा अनुवादाचा दागिना घडला तर अपार आनंद
देणारा असतो. भाषेला ललामभूत होतो
वाल्मीकी रामायण आणि मेघदूतम् ह्या दोन्ही काव्यात एक मोठं
साम्य आहे. पत्नी विरहातून ही काव्य निर्माण झाली असली तरी संपूर्ण भारताचं सुंदर वर्णन
त्यात आहे. रामायणात हे वर्णन भारताच्या थंडी प्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत खाली
येतं. तर भारतात पावसाचा प्रवास हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होतो. मेघदूताचा प्रवास रामटेकपासून थेट अलकापुरीपर्यंत कैलासापर्यंत आहे.
अत्यंत तरल मनाच्या ह्या दोन्ही कवींनी, माणूस, पशू, पक्षी, डोंगर, समुद्र सर्व स्थावर
जंगमांना आकलन होणारी एक वैश्विक भाषा कल्पून ती पात्र एकमेकांच्या सुखदुःखात पुरती एकरूप झालेली दाखवली
आहेत. राम झाडांशी बोलतो, राम जटायू पक्ष्याशी बोलतो, जटायू रामाशी बोलतो. जटायू सीतेला
वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतो. तर जटायूचे पंख रावणानी कापल्यावर सीता जटायूला छातीशी
धरून रडायला लागते. राम वानरांशी बोलतो. रामाचं दुःख पाहून हरणांच्या डोळ्यात अश्रु
दाटतात. रामासाठी वानर प्राण पणाला लावतात. सगळेच भूतहित हया धर्माच्या नियमांचं पालन करत असतात
तर मेघदूतम् मधे यक्ष ढगाला तू कसा कसा माझ्या प्रियेकडे जा
ह्याचा मार्ग सांगतो. नर्मदेचं वर्णन करताना कालिदासाला ती हत्तीच्या अंगावर घातलेल्या
विविध दागिन्यांसारखी वाटते तर वेत्रावती नदीमधले तरंग एखाद्या सुभ्रू (कमानदार भुवया
असलेल्या) तरुणीच्या भुवयांच्या सुंदर हालचालीसारखे वाटतात. हा वैश्विक प्रेमभाव, एकरूपता
मला फार आवडते. मेघदूतात मेघ यक्षाशी बोलत नाही. पण यक्ष त्याला म्हणतो. इत्युक्तं हि प्रणयिषु सताम् ईप्सितार्थक्रियैव ।। 51 सज्जन बोलले नाहीत तरी जे जे त्यांच्याकडे याचना करतात त्यांच काम ते पूर्ण करतात. चातकानी जलाची याचना केली तर ती तू
पूर्ण करतोस. त्यामुळे तू मला भले ‘‘ मी तुझं काम मी स्वीकार केलं आहे़ ’’ असं बोलला नाहीस तरी चालेल.
ही उत्तमोत्तम काव्य मला कायम सीता किंवा द्रौपदी सारखी वीर-शुल्का
वाटतात. (वीर शुल्का म्हणजे ज्यांच्या विवाहासाठी काही तरी अवघड पण लावलेला असतो. तो
पूर्ण करायला लागतो. आपल्या पराक्रमाचं, वीर्याचं शुल्क देऊन ह्या राजकन्यांना मिळवायचं
असतं.) ही काव्यं हातात वरमाळ घेऊन आपला इच्छित
अनुवादक वर शोधत फिरत नाहीत. त्यांना समर्थ शब्दाचं, अचूक वृत्ताचं मोल देऊन, पण
जिंकून आणावं लागतं आपल्या भाषेच्या साम्राज्यात.! .....भावार्थाच्या पालखीत ठेवलेल्या
पादुकांसारखं मिरवत मिरवत! विनयाताईंनी अमरमेघ
मधे सर्वसामान्य वाचकांना मेघदूताच्या गाभ्यापर्यंत पोचवायचं हे आह्वान मोठ्या कुशलतेनी
पेललं आहे.
आपल्या राजपुत्रानी जिंकून आणलेली ही सुंदरी सीता आहे तरी
कशी हे पहायला अयोध्येच्या रस्त्याच्या दुतर्फा जसे नगरजन कुतुहलाने उभे होते तसे---- मग माझ्यासारखे असंख्य वाचक कतुहलानी बघत
असतात ही नवीन परभाषी कलाकृती माझ्या भाषेत कशी काय वाटतीए! शोभून दिसतीए
का नाही दिसत! केशर खलून दुधात घातल्यावर ते दुधाला सुंदर रंग आणि स्वाद देतं. त्याप्रमाणे
नवी अनुवादित कलाकृती माझ्या भाषेचा रंग स्वाद खुलवणारी आहे का नाही? हे वाचक बघत असतो.
पण त्यासाठी केशराला अग्निदिव्यातून जावं लागतं
केशर गरम करायला लागतं. खलायला लागतं त्यानंतर ते दुधाला रंग
देतं. दुधाला स्वाद देतं त्याप्रमाणे विनयाताईंनी प्रतिभा, नैपुण्य , अभ्यास ह्यांचा कस पणाला लावला आहे
आणि म्हणूनच इतकं सुंदर पू्र्ण आगळं वेगळं पुस्तक आज आपल्या सर्वांना हातात मिळत
आहे. सर्वांनी ‘अमरमेघ’ जरूर खरेदी करा, वाचा आणि मेघदूतम् चा आनंद मिळवा.
दिवसेंदिवस प्रेमाची होत चालेली थट्टा, हिडीसरूप, लिव्ह इन
रिलेशनशिपमधे राहण्याच्या नावाखााली एकमेकांची चाललेली फसवणूक, फक्त पैशाच्या तराजूत सुख तोलणारी लोकं
पाहिली की ह्या विशुद्ध प्रेमाची अमूल्य किंमत कळते.
----------------------
Comments
Post a Comment