भर्तृहरी-
भर्तृहरी-
काही
गोष्टी लहानपणी वाचलेल्या असतात. पण ! त्याचा अर्थ कळेपर्यंत आयुष्य संपत येतं.
भर्तृहरी
नावाचा राजा होता. एक दिवस त्याच्या सभेत एक साधू आला. तो म्हणाला, ‘‘राजा, तू
प्रजाहितदक्ष आहेस. न्यायी आहेस, कलेचा भोक्ता आहेस, सर्व सद्गुण तुझ्यावर प्रसन्न आहेत. मी तुला एक फळ देतो. हे फळ जो कोणी खाईल तो अमर
होईल.’’ साधूने झोळीतून एक फळ काढून राजाच्या हातात ठेवलं आणि तो निघून गेला. त्या
फळाचा आकार, रंग, रूप इतकं मोहक होतं की ते पहाताक्षणीच खावं असं कोणालाही वाटावं.
पण राजा फार निस्पृह होता; त्याने विचार केला की, ‘माझी लाडकी राणी खूप सुंदर आहे.
माझ्या राज्याच्या कामापुढे मी तिच्याकडे लक्षच देऊ शकत नाही. मी हे फळ तिला देईन.’
राजाने राणीला फळ दिलं. -----पण! राणीचं उत्कट प्रेम सरसेनापतीवर होतं. राणीने
विचार केला सरसेनापती जर उद्याचा राजा झाला तर ---! तिने ते फळ सरसेनापतीला दिलं.
सरनौबत पद कायम रहावं म्हणून सेनापती
राणीवर खोटं खोटं प्रेम आहे असं भासवत असला
तरी त्याचं प्रेम एका लावण्यवती गणिकेवर होतं. त्याने ते फळ त्या गणिकेला दिलं. त्या गणिकेनी विचार केला, ‘‘बोलून
चालून मी एक गणिका! माझं हे अत्यंत लाजिरवाणं आयुष्य घेऊन मी अमर होण्यापेक्षा मी
हे फळ ह्या देशाच्या राजाला देते. तो न्यायप्रिय आहे. प्रजावत्सल आहे. तो अमर झाला
तर, प्रजा कायम सुखी राहील.’’ तिने ते फळ राजाला आणून दिलं.
राजा
ते फळ परत आपल्याकडे आलेलं पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने सर्व चौकशी केली तेव्हा
त्याला सर्व वृत्तांत समजून आला. सर्वांचा खरा चेहरा पाहून राजा उद्विग्न झाला. ‘‘हा
धिक्! हा धिक्! अरे ज्याला मी पवित्र
प्रेम, अन् काय काय समजत होतो---सर्व सर्व खोटं आहे. सर्व फोल आहे.’’ राजाला
वैराग्य प्राप्त झालं. ते फळ त्याने स्वतःच खाउन टाकले. त्याने आपलं राज्य आपल्या
सावत्र भावावर विक्रमावर सोपवलं आणि तो अरण्यात निघून गेला.
ज्याचं
त्याचं फळ ज्याला त्यालाच लाभतं. खावं लागतं. भोगावं लागतं. ते वाईट असो वा
अत्युत्तम असो. राजाला राजाचं फळ मिळणारच होतं. राजा प्रजाहितदक्ष होता,
निस्पृह होता अनेक गुण सम्पन्न होता पण! राजाचा मोह गेला
नव्हता. लाडक्या राणीत त्याचं मन गुंतलेलं होतं. त्यामुळे अमरत्वाचं ते फळ खायला
राजा अजून परिपक्व झाला नव्हता. अमरत्व मिळण्याच्या निकषाच्या एक रेघ मागे होता.
कदाचित म्हणूनच साधूने त्याला ते फळ देतांना फळाचा गुण सांगितला पण ते ते तू खा असं
सांगितलं नाही.
राजानी
मोहानी ते राणीला द्यायचा प्रयत्न केला तरी तिची जनमानसात अमर व्हायची लायकी
नव्हती ना सेनापतीची होती. गणिकेला किमान आपण त्या लायकीचे नाही ही जाणीव तरी
होती. राजालाही तो मानत असलेलं सत्य हे सत्य नसून ते फारच अतर्क्य आणि धक्कादायक आहे ही जाणीव होणं आवश्यक होतं.
अमरत्व
सुखासुखी प्राप्त होत नाही. भर्तृहरी उत्तम न्यायी राजा असला तरी; मोहातून सुटला
नव्हता. ज्या क्षणी पत्नीच्या मोहातून सुटला त्याक्षणीच अमर झाला; त्याच्या भौतिक
सुखाच्या चिखलात रुतलेल्या बदफैली राणीला सारं जग कधीच विसरून गेलं.
असे
अनेक भर्तृहरी आजही समाजात असतात. त्याचं यश, यशासवे मिळणारे सुखोपभोग ह्याच्या
लोभाने अनेक आप्तबांधव त्यांच्या भोवती घोटाळत असतात. अशा भर्तृहरींच्या काटेरी
ध्येयमार्गाशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. आप्तांसाठी अप्राप्य असलेली भौतिक
सुखं त्यांना त्या ध्येयवादी नराच्या संगतीतून लाभत असतात. अशा ध्येयाने झपाटलेल्या
ध्येयवादी, निस्पृह, माणसाचं लक्ष कीर्ती, श्री ह्यांच्याकडे नसतच. त्याच्यासाठी ती
फक्त बायप्रॉडक्टस् असतात.
राजेंद्रबाबू भारताचे पहिले राष्ट्रपती झाले तेव्हा, महादेवीवर्मा प्रयागराजच्या ‘प्रयाग महिला विद्यापीठाच्या’ कुलगुरू होत्या. राजेंद्रबाबूच्या परिवारातील मुली तेथे शिकत होत्या. ह्या मुलींना इतर मुलींप्रमाणेच वागविण्यात यावे. त्यांना राष्ट्रपतींच्या नातेवाईक म्हणून कुठल्याही गैर सवलती मिळू नयेत असा कडक निरोप राजेंद्र बाबूंनी महादेवींना पाठवला. एकदा राजेंद्रबाबूंनी महादेवींना भेटायला राष्ट्रपतीभवनात बोलावले. त्या ट्रेनने गेल्या. राजेंद्र बाबूंच्या पत्नीला त्यांनी ‘‘तुमच्यासाठी काय आणू?’’ म्हणून विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘महादेवीजी, राष्ट्रपती भवनात धान्य पाखडायला सूप मिळत नाही. तुम्ही जरा दोन चार सुपं आणाल का?’’ महादेवींना रेल्वे स्टेशनवरून नेण्यासाठी लाल दिव्याची गाडी, राष्ट्रपतींचे सेवक आले होते. वेगवेगळ्या आकाराची आठ दहा सुपं गाडीत न मावल्यानी गाडीवर बांधून नेतांना पाहून सर्वजण त्या गाडीकडे वळून वळून परत परत पहात होते. त्या दिवशी राजेंद्र बाबूंचा उपवास होता. महादेवींना त्यांनी तसे सांगितले आणि म्हणाले, ‘‘आपल्याला काय, कसे जेवण हवे ते खानसाम्याला सांगा.’’ महादेवी म्हणाल्या, ‘‘मला वेगळं काही नको. जे आपण खाल ते मला चालेल. महादेवींना वाटलं राष्ट्रपती भवनातील उपवास हा शाही उपवास असेल. पण प्रत्यक्षात जेवायच्या वेळी उकडलेले दोन बटाटे समोर आले. राजेंद्रबांबूंना लाभलेली संतुष्टी, अनासक्ती इतक्या मोठ्या भवनात राहून, अधिकाराच्या कल्पवृक्षाखाली बसूनही भंग पावत नव्हती हे फक्त महादेवींनाच कळलं. अत्यंत संतुष्टपणे पुढे आलेले बटाटे त्यांनीही खाल्ले. दुसरा कोणी असता तर आधीच चमचमित बटाटेवड्यांची ऑर्डर देउन मोकळा झाला असता.
सर्वांना
हे कसं साधावं? राणीला भर्तृहरी कळला नाही. त्याच्या मनात असलेलं तिचं स्थानही
कळलं नाही. तिला तोंडपुजा, दिडदमडीचे अलंकार नजर करणारा, सेनापतीच बरा वाटत
राहिला. मोठ्या लोकांचं मोठेपणं पेलणं सगळ्यांनाच कसं शक्य होईल? पाणी त्याच्याहून
हलकी फुलं पानं तोलून धरू शकतं. म्हणून पाण्यावर फुलांचा गालिचा शोभतो. हिरे
माणकांना धारण करण्यासाठी घनतम सोनच लागतं.
अनेक मोठ्या लोकांच्या आजूबाजूला वावरणारे लोक हे गायबगळ्यासारखे असतात. गाय गवतातून चालतांना उडणारे किडे मिळवण्यासाठी तिच्यासोबत जात रहातात. तिलाही त्यांचा क्षणैक सहवास बरा वाटतो. पण ते जिगर दोस्त होऊ शकत नाहीत. मोठ्या लोकांना कामापलिकडे, त्यांच्या ध्येयापलिकडे कोणी दोस्त शिल्लक रहात नाहीत. ‘‘एकला चलो रे !’’ असे ते भारल्यासारखे चालत रहातात. जेव्हा नारायण मूर्ती म्हणतात की, आठवड्याला 70 तास सर्वांनी काम करायला पाहिजे तेव्हा ते स्वतः देहभान हरपून 105 तासांच्या वर काम करतच असतात. त्यांचे निकषच वेगळे असतात. ऐश्वर्य इच्छुकांना हा कठोरपथ मानवणारा नसतो.
विष्णूचे गुण पाहून लक्ष्मी स्वतः त्यांचे पाय
चुरत असते. लक्ष्मीकडे त्यांच लक्षही नसतं. लक्ष्मीच्या सौंदर्यात विरघळणार्याकडे
लक्ष्मी ढुंकूनही बघत नाही.
अॅलिस इन वंडरलँड मधली अॅलिस अशीच पळत असते. पळून
पळून दमते. नंतर बघते तर, ती जिथे उभी असते तिथेच उभी असल्याचं तिच्या लक्षात येतं.
दुसर्या बाजूनी हे वाक्य पाहिलं तर माणसाला आहे त्या जागेवर स्थिर राहण्यासाठी
अटोकाट प्रयत्न करायला लागतात. उरी फुटेतो धावावं लागतं. मग----
वाटेत
कोणी साधू भेटून अमर होणारं फळ देतो पण------! हे तू खा असं सांगत नाही. तो ते फळ
आपल्या प्रियजनांना देण्यास उत्सुक असतो. पण! ---सर्वत्र फिरून परत ते
त्यांच्याचकडे आलं की क्षणभराची उद्विग्नता जरूर येत असेल पण-- त्यांच्या ध्येयाला वैराग्याचं तेज प्राप्त
होतं---- अमरत्वाकडे नेणारं!
------------------
5 जुलै 2025
Comments
Post a Comment