अमृताचा स्वीकार -
अमृताचा स्वीकार -
मी, सूर्य उगवल्याप्रमाणे अर्धगोल लाल, केशरी, पिवळ्या आकर्षक रंगाचा नवीन पायपोस
/ कॉयरमॅट दरवाजात ठेवला. मनीला घराबाहेर जायचं होतं. दवाजात नवीन कायसा भयंकर प्राणी
तोंड उघडून बसलेला वाटून मनी दचकली. शेपूट फेंदारून तिरकी तिरकी चालत ती त्या पायपोसापर्यंत
जाई आणि मागे येई. परत दबत दबत त्याच्यापर्यंत जाई वास घेई, त्याला झटकन पंजा
मारून त्याची प्रतिक्रिया अजमावत परत गोंडेदार शेपूट फुलवून घाबरून मागे येई. ``अगं
तो काही प्राणी नाही’’ म्हणत मी तो पायपोस तिच्याजवळ ढकलल्यावर तिने घाबरून पाचसहा
फूट उंच उडी मारून धूम ठोकली. काही दिवसांनी ह्या नवीन गोष्टीची सवय झाल्यावर
हिवाळ्यात उन्हं पडली की आपल्या पिल्लांना घेऊन ती त्या उबदार कॉयर मॅटवर मुक्काम ठोके.
आम्हाला दरवाजातून बाहेर जायची वेळ आली तर तो पायपोस तिच्यासकट बाजूला सरकवून गेल्यानेही
तिला फरक पडत नसे. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, नवीन गोष्टीचं स्वागत कधीच `स्वागतम्
स्वागतम्---!!’ असं पायघड्या घालून होत नाही. अज्ञानातून झालेल्या विरोधातूनच
होते.
माझ्या आठवणीत कोळशाची शेगडी ते स्टोव्ह ते गॅस हे स्थित्यंतरही काही सरळ नव्हतं.
`घर देता का घर?’ असं विचारत केविलवाणं फिरावं तसं एल्. डि. भाव्यांची माणसे घरोघरी
एक छोटा सिलिंडर आणि एका बर्नरची शेगडी घेऊन फिरत. एक महिना शेगडी आणि सिलिंडर फुकट
वापरायला मिळे. अनेक जण त्यांनाच ‘आगलावे’ मानून अर्ध्या जिन्यातून घालवून देत. कालांतराने
लोकं रांगा लावून उभे राहत आणि भावे भाव खात.
प्रेशर कुकर
नावाची द्रौपदीची थाळी स्वयंपाकघरात येण्यापूर्वी आमच्यावेळच्या सर्व समाजात कुकरच्या
भाताची चव , बाहेर पितळ्याच्या किंवा तांब्याच्या तपेलीत मंद आचेवर शिजवलेल्या भाताची
चव ह्यावरून मोठे मोठे वाद विवाद तापत असत. पाट्यावर वाटलेली चटणीच कशी चविष्ट असते
असं त्या मिक्सरला हिणवत हिणवतच मिक्सर घरात आले. मिक्सर चालू करण्यापूर्वी काय काय
ड्रिल आचरणात आणावं ह्याचे धडे वृत्तपत्रापासून मासिकंपर्यंत येऊ लागले. लाकडी पाटावर
उभे रहा. हातात लाकडी लाटणे ठेवा ---- आज हास्यास्पद वाटतील अशा पण तेंव्हाच्या काळजीयुक्त
अनेक सूचना असत. मुलं बिघडतात असं सांगतच गाणारी मंजुषा / ट्रांझिस्टर गळ्यात घालून
लोक रस्त्यातून फिरू लागले. टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह, मोबाईल फोन
अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे धाकधुक, काळजी, आणि वापरायच्या आधीच मारलेल्या फुलीच्या
मानसिक रोगजंतूंच्या काळोख्या बोगद्यातूनच घरात अवतीर्ण झाली. करोनापेक्षाही भयंकर
फुली मारलेल्या चॅनेल मधून आज डिशवॉशर, लॅपट़ॉप, पामटॉप, किंडल ------- अशी अनेक उपकरणे
प्रवास करत असली तरी ती घरात आल्याशिवाय राहणार नाहीत. बुलेट ट्रेन असो, मेट्रो
असो, नवीन एअरपोर्ट असो वा भव्य बंदरं असो! आज JNPT चं भव्य बंदर उभं
राहण्यापूर्वी !982 पासून झालेली आंदोलनं ही त्यावेळी श्री. दीक्षित जि. रायगडला
SP असल्याने फार जवळून पाहिली आहेत. आज स्थानिकांचा रोष, दबाव तर सोडाच पण त्यांची
आजची पिढी JNPT विना जीवन विचारही करू शकणार नाहीत. आज वाढवण बंदर ही भारताच्या
व्यापाराला दूरवर पोचविण्यासाठी सज्ज होत आहे.
UPI Payment
असो वा GST असो! प्रखर विरोधाच्या काटेरी जाळीतून चिरफाड करत त्यांना
मृतप्राय अवस्थेतून तग धरून मगच जोमदारपणे उभं रहावं लागतं. विकासाचा झपाटा वाढला;
पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे विकासाच्या लोंढ्यात माणूस वाहून जायला लागला की मग तो
नवीन बदलाचा किनारा पकडण्याची धडपड करायला लागतो आणि बदल अपसूक मान्य करतो.
नाकातोंडात बदलाचं पाणी जायला लागलं की पुराणमतवादी झक मारत वरच्या पायरीवर चढून मी पुरोगामी असल्याची
शेखी मिरवायला लागतो.
आज लोकल बंद पडल्यावर होणारा हाहाक्कार, ट्रेन रद्द झाल्यावर होणारा माणसांचा
क्षोभ होतांना आणि टिव्हिवर पाहतांना, कित्येक वेळेला मला वाटते, त्यांच्याच पूर्वजांनी
मुंबई ठाणे ही पहिली ट्रेन सुरू करतांना केलेली आंदोलने प्रत्येक स्टेशनच्या स्क्रीनवर
मधे मधे दाखवत राहवीत. म्हणजे जीवनाचा भाग झालेली लोकल वा ट्रेनची महती लोकांना
पटेल.आणि नवीन बदलांबद्दल कृतज्ञताही वाटेल. अजून काही वर्षांनी सहजपणे मेट्रोतून फिरणार्या
एखाद्या तरुणाला ‘‘ही मेट्रो तुझ्या आज्याने होऊ देणार नाही’’ अशी डरकाळी फोडली होती
आणि त्याच्यामागे जी जी रं जी जी रामाची हलगी वाजवायला तेंव्हाचे त्याचे हजारो गुंड
झाडं कापली ---- झाडं कापली--- म्हणून पर्यावरणाच्या नावाने छाती पिटत होते हे सांगितलं
तर ते त्यांना महामूर्ख ठरवून मोठा हास्य कल्लोळ करतील ह्याची मला खात्री आहे.
स्त्री शिकायला जाते म्हणून तिला दगड मारणार्या, काचा खायला घालून मारणार्या
लोकांच्या पुढच्या पिढ्यांमधील लेकी, सुना आज उच्च शिक्षित असल्याचा त्यांनाही
अभिमान आहे.
असे म्हणतात की आपल्या प्रत्येक हालचालीसाठी दोन स्नायुंची एक जोडी काम करत
असते. एक आकुंचन पावतो तर दुसरा प्रसरण पावतो. एकमेकांविरुद्ध वागणार्या ह्या
antagonist स्नायु-द्वयामुळेच हालचाल सुलभ होते. Action and reaction are equal
and opposite. ह्या तत्वानुसार नको आणि होच्या जोरदार रेट्यानेच समाज प्रगतीपथावर दौडत
राहतो. राक्षसांच्या विध्वंसामुळेच देवांच्याकडून रामसेतू निर्माण होतात. आपण
विकासासाठी मदत करणारच असतो फक्त राम बनून करायची का राक्षस बनून नाकारत करायची ते प्रत्येकानी ठरवावं.
आपल्याला हा नाही तर तो, हो किंवा नाही
दोन्ही पैकी एक पर्याय स्वीकारावाच लागेल. हो नाहीच्या मंथनातून उद्याचे अमृत आणि कालकूट
दोन्हीही बाहेर येणार आहे. आपण अमृताचा स्वीकार करणार का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न
आहे.
-----------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment