एकाम्रवन आणि जगन्नाथ -

 

एकाम्रवन आणि जगन्नाथ -

 

पुरीच्या जगन्नाथासमोर उभे होतो.  महा प्रचंड गर्दी, सतत दूर दूरहून येणारे लोकांचे लोंढे, मंदिरात पाय ठेवायलाही जागा नाही, उड्या मारून मारून घेतलेले जगन्नाथाचे दर्शन, त्यातही गाभार्‍याचा दरवाजा असा काही अर्धवट उघडलेला किंवा  जास्त करून लावलेला की त्यातून बलराम दिसेल पण कृष्ण दिसूच नये. वाकवाकून दिसला दिसला म्हणत चित्तचोराचं झालेलं दर्शन-- (आपल्या मंदिरांमधे दरवाजे अर्धवट उघडे ठेवायच्या, चारी बाजूंना मोठे दरवाजे असूनही एक छोटासा दिंडी दरवाजा एघडा ठेवायचा, देवाचा दरवाजा किंवा पडदा अचानक चालू बंद करायच्या  मंदिरवाल्यांनी शोधलेल्या प्रथा ह्या चेंगराचेंगरी होण्यास जास्त पोषक आणि स्टँपीडमधेच भक्तांना मोक्ष प्रदान करणार्‍या असतात का?) सगळच जरा मनाला नाराजीकडे झुकवणारं होतं. लांबून लांबून शेकडो बसेस भरभरून आलेल्या गरीब सुदाम्यांच्या आणि सुदामदेवींच्या चेहर्‍यावरील श्रद्धा आणि कृष्ण भेटीचा आनंद पाहून मलाच जरा खजील झाल्यासारखं वाटत होतं.

खूप दिवस पुरीच्या जगन्नाथाला जायच जायचं म्हणूनही जाणं राहून जात होतं. ज्या सहजपणे भारताचे उत्तर- दक्षिण भाग पाहून होतात तेवढे पूर्व पश्चिम पाहून होत नाहीत असं माझं खरं किंवा खोटं निरीक्षण होतं. (2017 सालचं) भारत हिंडूनही पुरीचा जगन्नाथ मनात फुरंगटूनच उभा होता. आता मोदीजींमुळे चलो अयोध्या, चलो काशी, चलो प्रयाग, चलो सोमनाथ, चलो केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी), चलो उज्जैन, चलो ओंकारेश्वर--- इतकच कशाला बद्री, केदार, चारधाम सर्व गावं लोक सतत हिंडतच असतात. उद्या चांद्रयान 4, 5, 6---z  च्या विक्रम लँडर्सनी भारतातून थेट चंद्राच्या काळ्या पृष्ठभागावर माणसांना घेऊन जायच्या टूर्स ऑरर्गनाइझ करायला सुरवात केली तरी  आपल्याकडे पुढच्या पाच वर्षांचं बुकींग एका दिवसात फुल्ल होईल ह्याची मला खात्री आहे. असो!

चंदनाला सापांचा विळखा असावा तशी अत्यंत सुंदर मंदिरे असूनही फुलवाले, प्रसादवाले, पंड्या आणि गुंड्यांनी देवाला असा काही विळखा घातला होता की मनाला कुठे आनंद जराही वाटू नये. तेथील कल्लोळात देवासमोर बसून शांतपणे विष्णुसहस्रनाम म्हणून प्रवीणना देव भेटला. अत्यंत शांत समाधानाने ते मंदिरातून बाहेर पडले पण माझी मात्र निराशा मला लपवता आली नाही. टॅक्सीच्या चालकाने ``दर्शन झालं का?'' असं विचारल्यावर ह्यांचे प्रसन्नचित्ताने होऽऽऽ! उत्तर आले तरी माझे मौन त्याला बरेच काही सांगून गेले असावे.

दुसर्‍या दिवशी भुवनेश्वरहून आम्ही परत मुंबईला जाणार होतो. एअर पोर्टला जायला निघालो. टॅक्सीवाल्याने गप्पा मारायला सुरवात केली. ‘‘आम्ही भारताच्या (centre) च्या निवडणुकीला मोदीला मत देणार आणि ओडिशाच्या (state) च्या निवडणुकीला आम्हाला आमचा ओडीसी भाषा येणारा नवीन’ बरा. पण हळु हळु सगळे मोदींकडे झुकत आहेत '' असे हसत हसत त्याने 2017 साली आम्हाला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. त्याची 2019 च्या  लोकसभा निवडणूक आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्यावेळी आश्चर्यजनक आठवण झाली.

‘‘विमान थोडं उशीरा आहे. आपणं थोडं उशीरा जाऊ.’’ गोष्टी सांगता सांगता, बोलता बोलता तो आम्हाला एका जागी घेऊन आला. `` खास जागी घेऊन आलो आहे. येथे तुम्हाला आवडेल येथे आमचा CM नवीन रोज फिरायला येतो.'' (कालपासून सर्व आदर एकेरीतच व्यक्त होत होता.)

फारशा उत्साहाने उतरलो नाही पण आत प्रवेश करताच तेथील प्रसन्न शांततेनी आणि विविध मंद सुवासांनी मन प्रसन्न झालं. काल भेटलेला जगन्नाथ भेटला असं वाटलं. जवळच लिंगराज मंदिराचा भव्य कळस दिसत होता. समोर बिंदुसार तलाव विविध रंगी कमळांनी फुलून गेला होता. तलावाकाठी एक सुंदर बाग. ---एकाम्रवन! एकाम्रवन म्हणजे जेथे एकच आम्रवृक्ष आहे असं वन किंवा बाग. फार रसिकतेने जोपासली होती. राम तुळस, कृष्ण तुळस, वैजयंती तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, कुंकू तुळस, सब्जा तुळस, रान तुळस, दौणा तुळस, इत्यादि बारा प्रकारच्या तुळशी तेथे जोपासल्या होत्या. तुळशी इतक्या प्रकारच्या असतात हे पहिल्यांदाच पाहिले. लिंबाप्रमाणे वास असलेली आणि लिंबाच्या पानाप्रमाणे छोटेसे पंख असल्याप्रमाणे देठ असलेली (winged petiole ) तुळस लिंबासोबत तुळशीचा वासही जपून होती. दोनशेच्यावर औषधी, दुर्मिळ वनस्पती छान जपलेल्या जोपासलेल्या दिसत होत्या.

ललितनगर आणि रघुरामपूरच्या कलाकारांनी सगळ्या बागेचे रूप-रंग भारतीय पद्धतीने साकारलं होतं. बाग तीन टप्प्यांमधे विभागली आहे. शिवपिंडी, पार्वतीपिंडी आणि गणेश पिंडी. पिंडी म्हणजे चौथरा. प्रत्येक देवतेला आवडतील अशी फुले तेथे लावलेली आहेत. झाडांच्या पारांवर केलेली कोरीव कामेही लक्षणीय सुंदर. तेथे असलेल्या एकाम्राच्या तसेच बेलाच्या वृक्षाला बांधलेला पारही बघत रहावा असा सुंदर! शिवाला रुद्राक्ष प्रिय असल्याने रुद्राक्षाच्या पृष्ठभागाप्रमाणे झाडाच्या पाराचा पोत साकारलेला.

तेवढ्या पंधरा मिनिटात तुळसीमाळ गळा असा तुलसीप्रिय जगन्नाथ साक्षात भेटल्याची अनुभूती आली. डाव्या हातात वेणू घेऊन तलावाच्या काठाकाठने तुळशीवनातून हिंडणारा जगन्नाथ डोळ्यासमोर उभा राहिला.


धरी प्रेमे वेणू सुरमधुर ती सव्यचि करी
सुवर्णा रत्नांचा किरिट बहु आकर्षक शिरी
किरीटी मोराचे खुलुन दिसते पीस तुजसी
जरीकाठाचे हे झुळझुळित पीतांबर कटी।।2.1

कटाक्षासी टाकी हळुच तिरक्या लोभस अती
सख्यांना पाही तू हळुच हसुनी खोडकरची
तुझ्या या लीलांनी जणु अवतरे स्वर्ग भुवनी
महद्भाग्याने ही झळकतचि वृंदावनपुरी।।2.2

व्रजाच्या लीला हा परिचय तुझा कौतुकमयी
उभा राहे नेत्री स्मरण तव होताचि हृदयी
तुझ्या या लीलांचा पट उलगडो दृष्टिपुढती
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।2.3

( भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे
दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते।
सदा श्रीमद्वृन्दावनवसतिलीलापरिचयो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।2 )

काल एका कोपर्‍यात लपून बसलेला, उड्या मारूनही थोडासाच दृष्टिपथात आलेला जगन्नाथ मधे उभ्या असलेल्या सुभद्रेचा हात धरून बलरामासह आज `नयनपथगामी भवतु मे' असा डोळ्याच्या पुतळ्यांमधे स्थिर झाला.

असे नीलाद्रिच्या कुशित तव प्रासाद रमणा
समुद्राच्या तीरी तळपत असे स्वर्णमय हा
तयांचे तेजस्वी कळसचि निळे हे झळकती
निळ्या लाटांची ही अभिनव असे नक्षि पुढती।।3.1

तुझ्यासंगे आहे हलधर प्रभावी तुजसमा
सुभद्रा लाडाची बहिणहि मधे संगति तुझ्या
इथे देवांना तू तव चरण सेवा घडविली
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।3.2

जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे म्हणत विमानात बसतांना जगन्नाथ भेटल्याचा आनंद झाला


----------------------------------------


लेखणी अरुंधतीची

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

सखा कृष्ण हरी हा अनुक्रमणिका