धियां साक्षी शुद्धः –

 

धियां साक्षी शुद्धः –

 

महाभारतातील भीषण युद्धाचं वर्णन गीतेच्या  सुरवातीला असलेल्या गीता-महातम्यातील श्लोकात दिलं आहे. तो श्लोक असा  आहे,

भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला
शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी 
सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ।।

म्हणजेच,

जी रोरावत जातसे रणनदी संहारकारी महा
भीष्म द्रोणचि काठ दुर्गम तिचे ना लागती जे करा
सूडाने गढुळे जयद्रथरुपी पाणी जिचे सर्वथा
जेथे धूर्त लबाड त्या शकुनिच्या जाळ्याच नीलोत्पला ।।

 

लाटां भीषण उंच ह्या धडकती राधेयरूपी महा
लाभे वेग महा भयानक तिला योद्धा कृपाचार्य हा
घेई जी वळसेचि घातक जिला दुर्योधनी भोवरे
अश्वत्थाम विकर्ण शल्य मगरी मासे महाकाय ते ।।

 

गेले पार करोनि ती रणनदी कौंतेय ते सर्वही
नावाडी असताच केशव कशी जाणार ना नाव ती
लाभे ज्यासचि कृष्णसंग बरवा चिंता तयासी नसे
जाई पार करोनि तो भवनदी चित्ती जया कृष्ण रे ।।

युद्धात पांडव तरून गेले त्याचं कारण होतं, कृष्ण कृष्ण आणि कृष्ण! हा कृष्ण आहे तरी कसा?

श्रीकृष्णाष्टकात श्रीकृष्णाचे वर्णन करतांना श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, हा श्रीहरी ‘धियां साक्षी शुद्धः’ असा आहे. धी म्हणजे बुद्धी. हा श्रीहरी बुद्धीचा साक्षीदार आहे. साक्षीदार हा घडणार्‍या घटनेत प्रत्यक्ष सहभागी नसतो. पण प्रत्यक्षदर्शी असतो. तो त्या घटनेची सत्यासत्यता योग्य प्रकारे जाणून असतो. आज कित्येक दुकानात, मॉलमधे, सोनाराच्या दुकानांमधे, सोसायट्यांमधे CCTV कॅमेरे लावलेले असतात. दुकानात शिरतांना सुरवातीलाच पाटी असते. ‘You are under observation’ कॅमेरा आपल्याला दिसत नसतो पण, आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. तो तुमच्यावर नजर ठेऊन आहे (नीट वागा नाहीतर पकडले जाल.) ह्याची आधीच सूचना प्रवेशद्वाराशी जाहीररीत्या लिहिलेली असते.

आद्य शंकराचार्य आपल्याला हेच सांगतात. श्रीहरी हा तुमच्या मनात चाललेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहे. श्रीहरी हा मनात लावलेला CCTV कॅमेरा आहे. तो काही चुकीची नोंद करणार नाही. तो अत्यंत पारदर्शी आहे. जे मनात चाललेलं आहे त्याचच चित्रण करणारा आहे. अत्यंत निर्दोष, निष्कलंक, शुद्ध आहे.

घराला घातलेलं कुलूप सामान्य माणसाला योग्य किल्लीशिवाय उघडत नाही. किल्ली हरवलीच तर किल्ली बनवणार्‍याला बोलवावं लागतं. चोर हेच कलूप एका मिनिटात एखाद्या पिनेनेही उघडतो. मग विचार येतो की सज्जन माणूस कुलूप उघडू शकत नाही आणि चोर कुठलंही कुलूप सहज उघडू शकतो मग कुलूप घालायचच कशाला?  हे कुलूप ‘धियां साक्षी’---बुद्धीच्या साक्षीदाराप्रमाणे असतं. दुर्जन असला तरी साधारणपणे जेथे कमितकमी प्रतिकार करावा लागेल(least resistance)अशी जागा निवडतो. तो प्रत्येक कुलूप फोडत नाही. चांगली सुरक्षाव्यवस्था, भक्कम कुलूप पाहून त्याचेही पाय क्षणभर थबकतात. हात सहज पुढे होत नाही. कुलूप नसेलच तर तो बिनदिक्कत आत शिरायला कचरणार नाही. सज्जन दुसर्‍याच्या घराचं कुलूप कशाला उघडेल? पण घर उघडच आहे म्हटलं तर सज्जनाच्या मनात एखादेवेळी का होईना घर उघडच आहे; डोकावून पहायला काय हरकत आहे असा विचार डोकावू शकतो. त्यामुळे कुलूप हे घराला बंद करायचं साधन नसून मनाच्या दुराचाराला घातलेली पायबंदी आहे. ते सज्जनासाठी मनावर सहज नियंत्रणाचं, आणि चोराला ‘खडतर प्रतिकार करायची तयारी आहे का?’ असं मनाला धाक घालणारं, वाईट विचारांवर घातलेलं कुलूप असतं. दोघांनाही दुराचारापासून परावृत्त करायचं काम करत असतं. विवेकरूपी श्रीहरी हा सज्जनाला विनासायास तर दुर्जनाला धाकात ठेऊन योग्य मार्गाचा अवलंब करण्यास भाग पाडतो.

कोणाला वाटेल माझ्या बुद्धीत, माझ्या डोक्यात, माझ्या मनात काय चाललं आहे हे कोणाला कळणार? पण प्रत्येकाच्या हृदयात, बुद्धीत विवेकरूपाने राहणारा श्रीहरी प्रत्येक क्षणाची आणि प्रत्येक विचाराची नोंद ठेवत असतो. CCTV कॅमेरा किंवा कुलूप जे काम बाह्य सम्पत्तीच्या रक्षणासाठी करतात तेच काम श्रीहरी आपल्या मनाच्या अनमोल सम्पत्तीच्या रक्षणासाठी करत असतो. बुद्धीला योग्य निर्णय घेण्यासाठी जो साक्षीदार म्हणून काम करतो तो म्हणजेच विवेक. तो प्रत्येकाच्या हृदयात बसून सर्व घडणार्‍या गोष्टींची चित्रगुप्ताप्रमाणे नोंद ठेवत असतो. प्रत्येकाला निर्णय घेण्यापूर्वी तो सजग करत असतो. योग्यायोग्यतेची जाणीव करून देत असतो. तो सर्वत्रच भरून राहिला असल्याने तुम्ही कुठेही गेला तरी त्याचं अस्तित्त्व जाणवल्यावाचून राहत नाही. विवेकालाही सतत जागृत ठेवणारा हा साक्षीदार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून `धियां साक्षी शुद्धः' असा श्रीहरीच आहे. सदैव माझ्या बुद्धीचा अत्यंत प्रामाणिक सच्चा साक्षीदार हा विवेकरूपी श्रीहरी माझ्या नजरेसमोर सतत मला दिसत राहो.

न्यायदानाचं काम करतांना साक्षीदार हा फार महत्त्वाचा ठरतो कारण त्याने ती घटना घडतांना आपल्या डोळ्यांनी पाहिलेली असते. हा साक्षीदार खोटा असून चालत नाही. लोभाने वा भयाने त्याने आपली साक्ष फिरवून चालत नाही. जे सत्य आहे तेच त्याने सांगणे अपेक्षित असते. मानवी साक्षीदार असा फुटू शकतो पण CCTV ची नोंद कशी चुकेल? मनातला विवेकरूपी साक्षीदारही CCTV च्या नोंदीप्रमाणेच जे जसं आहे तेच सतत दाखवत राहतो. CCTV मधेही  वीज नसणं, कनेक्शन तुटणं अशी गडबड होऊ शकते पण मनात विवेकरूपाने राहणार्‍या श्रीहरीच्या सांगण्यात कधीही गडबड होत नाही. श्रीहरी अत्यंत शुद्ध, निर्मळ, प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गावर अढळपणे उभा असलेला, हा माझा हा परका असा अपपरभाव नसलेला; लोभ, मोह, भय ह्यापासून तो दूर असलेला अद्वितीय साक्षीदार आहे. तो हेराफेरी करत नाही. ‘You are under observation.’ आमचा कॅमेरा जे चाललं आहे तेच टिपतो हेच वाक्य आद्य शंकराचार्य धियां साक्षी शुदधः म्हणजेच ‘हरी शुद्ध आहे’ ह्या एका वाक्यात/ शब्दात सांगतात.

 विवेकरूपी श्रीहरीने एकदा का माझ्या मनात चाललेल्या दुष्ट विचारांची नोंद घेतली की माझ्या मनःपटलावर ते चित्र तो कायम मला दिसत राहील असं ठेवतो. त्या सतत दिसत असलेल्या नको वाटणार्‍या दृश्याने, विवेकाची टोचणी माझ्या मनाला लागून मी पश्चात्तापात कायम पोळत राहते.

 

माणूस जेंव्हा अनेक निर्णय घेत असतो तेंव्हा त्याच्या बुद्धीने योग्य काय अयोग्य काय ह्याचा न्याय निवाडा करायचा असतो. अशा वेळेला अनेकजण अनेक सल्ले देत राहतात. माणसाचं मन श्रेय (श्रेयस्कर) आणि प्रेय (शरीराला आवडणारं) ह्यामध्ये कायम गल्लत करून प्रेयाची निवड करतं. हे मना पण क्षणैक आनंद मिळवून देणारं प्रेय तुला श्रेयस्कर नाही. जो बुद्धीचा साक्षी असलेला श्रीहरी आहे तो कायम श्रियाश्लिष्टः असा आहे. म्हणजेच जे श्रेय (हितकर) आहे ते कायम ह्या विवेकाचाही विवेक असलेल्या श्रीहरीला कायम बिलगून(श्लिष्ट) आहे. जे श्रेयस्कर आहे ती म्हणजेच अत्यंत पवित्र आनंदायिनी अशी कमला म्हणजे माता लक्ष्मी आहे. जिथे विवेकाचा साक्षी जागरूक आहे तेथेच ही लक्ष्मी निवास करते. हे मना असा हा तिन्ही लोकांचा स्वामी, जो शरण जाण्यास अत्यंत योग्य आहे. जो सर्वांचाच एकमेव `शरण्य' आहे त्याला तू शरण जा.

निसर्गतःच शरीर आणि इंद्रिये जरी अनावश्यक प्रेयासाठी झुरत असली तरी मन ह्या `शरण्या'कडे (शरण जाणयास योग्य श्रीकृष्णाकडे) आकृष्ट होत असतं. श्रेयाकडे कायम ओढ घेत राहतं अस ते अमल, विमल कृष्णरूप माझ्या नेत्रांना सतत दिसत राहो.

{ श्रियाश्लिष्टो विष्णुः स्थिरचरवपुर्वेदविषयो

धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः।

गदी शङ्खी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः

शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः ।।1 }

 ह्या बुद्धीला न्याय्य बाजू समजण्यासाठी साक्षीदाराची गरज भासतेच. सहाजिकच खरं सांगायचं झालं तर तो बावन्नकशी सोन्यासारखा शुद्ध असला पाहिजे. बानन्नकशी शुद्ध सुवर्णाला चार कसोट्या पार करायला लागतात. तशाच चार कसोट्यांमधे हा बुद्धीचा साक्षीदार खरा उतरला पाहिजे. सोन्यासाठी कसोट्या असतात, घासणे ,कापणे/ भोक पाडणे, मुशीत पिवळेधमक होईपर्यंत तापविणे आणि ठोकणे. बावन्नकशी माणसाची परीक्षा त्याचं शिक्षण आणि विवध विषयातील पारंगतता, त्याचे शील, सद्गुण आणि त्याच्या प्रत्यक्ष कामावरून होते.

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः ।

तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

 

माणसाचं मन श्रेय (श्रेयस्कर) आणि प्रेय (शरीराला आवडणारं) ह्यामध्ये कायम गल्लत करून प्रेयाची निवड करतं. हे मना पण क्षणैक आनंद मिळवून देणारं प्रेय तुला श्रेयस्कर नाही. जो बुद्धीचा साक्षी असलेला श्रीहरी आहे तो कायम श्रियाश्लिष्टः असा आहे. जे श्रेय आहे ते कायम ह्या विवेकाचाही विवेक असलेल्या श्रीहरीला कायम बिलगून(श्लिष्ट) आहे. जे श्रेयस्कर आहे ती म्हणजेच अत्यंत पवित्र आनंदायिनी अशी कमला म्हणजे माता लक्ष्मी आहे. जिथे विवेकाचा साक्षी जागरूक आहे तेथेच ही लक्ष्मी निवास करते. हे मना असा हा तिन्ही लोकांचा स्वामी, जो शरण जाण्यास अत्यंत योग्य आहे. जो सर्वांचाच एकमेव `शरण्य' आहे त्याला तू शरण जा.

निसर्गतःच मन ह्या `शरण्या'कडे आकृष्ट होत असतं. शरीर आणि इंद्रिये जरी अनावश्यक प्रेयासाठी झुरत असली तरी मन ज्या श्रेयाकडे कायम ओढ घेत राहतं अस ते अमल, विमल कृष्णरूप माझ्या नेत्रांना सतत दिसत राहो.

{ श्रियाश्लिष्टो विष्णुः स्थिरचरवपुर्वेदविषयो

धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः।

गदी शङ्खी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः

शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः ।।1 }

 

जया आलिंगे ती कमलनयना नित्य कमला

उरे व्यापूनी जो अखिल जगतासीच नित या

असे काया ज्याची चल अचल हे विश्व सकला

दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण सुखदा ।। 1.1 ।।

 

जया जाणायाला निगमचि असे एक सबला

कळे थोडा थोडा निगम-वचनातूनि लव हा

विवेकाचा साक्षी, अमल विमला न्यूनरहिता

दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा ।। 1.2 ।।

 

अगा नेत्रांसी ज्या कमल फुलले हीच उपमा

करी दुःखांचे जो हरण; सुख देई परम वा

खळांना दैत्यांना यमसदन दावी वधुनिया

दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण मधुरा ।। 1.3 ।।

 

गदा शंखा चक्रा करि धरुनि खड्गास लिलया

स्वभक्ता रक्षाया सतत कटिबद्धा सजग हा

रुळे कंठी मुग्धा वनसुमनमाला परिमला

दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण मजला ।। 1.4 ।।

 

अती तेजस्वी जो अचल अविनाशी नित नवा

तिन्हीलोकस्वामी तुजविण कुठे आश्रय दुजा

विसावा विश्वाचा सकल जगजेठी निरुपमा

दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण हरि हा ।। 1.5 ।।

 

--------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा