1 ‘‘ आपली झाडं आपले प्राणी ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)
रसिक वाचक हो!
‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ ही नवीन लेखमाला आपण सुरू करत आहोत. लेखमालेचं शीर्षक
हे आपल्या भारतभूमीशिवाय दुसर्या कोणाला लागू होणार? भारतभूमीविषयी विशेष प्रेम, आस्था
असलेल्या अरुंधती प्रवीण दिक्षित ह्याची ही लेखमाला आपल्या मासिकात आपण समाविष्ट करत आहोत. जरूर वाचा.
‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ (
feb.)
1 ‘‘ आपली
झाडं आपले प्राणी ’’
असच एक बेट आहे. त्याचं नाव आहे रॉड्रिग्ज! मॉरिशसच्या अखत्यारीत
येणारं! मॉरिशस सरकारच्या कामानिमित्त श्री. दीक्षितांबरोबर त्या बेटावर 4-5 दिवस राहण्याचा योग आला. श्री. दीक्षित आणि त्याच्या
सार्या टीमसोबत छोट्याशा एअरपोर्टवर उतरलो. सरकारी गाडी न्यायला आली होती. गाडीत रेडिओ चालू होता. आम्ही गप्पा मारत असतांनाच ड्रायव्हरने रेडिओवर चालू
असलेल्या बातम्यांकडे आमचं लक्ष वेधलं. इंडियाहून आपल्या मदतीसाठी मॉरिशसला आलेले भारतीय डेलिगेशन रॉड्रिग्जला
पोचल्याचे ठळक बातम्यांमधे सुरवातीलाच सविस्तर सांगत होते. ‘‘भारतीय डेलिगेशनचं स्थानिक प्रशासनातर्फे
स्वागत असो’’! असं सांगितलं जात होतं. मला त्यात भारत किंवा इंडिया हा शब्द कुठेच ऐकू येत नव्हता. इंडिया चा
उच्चार वारंवार इंज्या इंज्या असा होत असल्याने बातमी गाडीवान दादांकडूनच मला नीट कळली.
India ह्या स्पेलिंगच्या शेवटी असलेल्या dia आहे. d चा उच्चार फ्रेंच मधे ज होतो तर
ia चा या किंवा इया. त्यानुसार इंडियाचा उच्चार
इंज्या होतो हे कळलं आणि भाषा भाषा सुद्धा एकमेकांच्या झिं‘ज्या’ ओढतात हे लक्षात आलं.
आपल्या देशाला पूर्वापार भारत म्हणत होते ते किती छान होतं. आताही आपणही भारतच म्हणू या.
मॉरिशस सरकारतर्फेच
तेथे रहायची सोय असल्याने आधीच हॉटेल बुकिंग झाले होते. गाडीवान दादांकडून हॉटेलचं
नाव कळलं ‘ला तामार्या’ ! तेथील उच्चारामुळे फारसं पटकन कळलं नाही मग वाचल्यावर लक्षात
आलं; ज्याला इंग्रजीत Tamarind म्हटलं जातं त्याला फ्रेंचमधे Tamarin म्हणतात. पण शेवटच्या
in चा उच्चार अँ असा होत असल्यानी The Tamarind ला फ्रेंचमधे ‘ला तामार्या’ संबोधलं
जात होतं. स्वच्छ मराठीत सांगायचं तर, ‘हॉटेल चिंच’! हे हॉटेल चिंच समुद्रकिनारी नसल्याने,
प्रतिष्ठितपणात थोडं कमी पडत होतं त्यामुळे दुसर्या दिवशी आमची सोय ‘ला कोकोचे’(Cocotiers) म्हणजे ‘हॉटेल
नारळ’ मधे करण्यात आली. फायु स्टार हॉटेलांची नावं ताज, अँबेसिडर, ट्रायडंट, ओबेरॉय
अशी ऐकायची सवय कानांनाही झाली आहे. फार तर परकीय भाषेत असल्यामुळे चालू शकेल असं जिंजर
बिंजर इतपत ठिक!----पण चिंच, बोर आवळा, कवठ,
बेलफळ ह्या ज्या फळांना फळांच्या वर्गात आपण मागच्या बाकावर बसवतो किंवा त्यांच्या
तुरट, आंबट चवीमुळे वा तीव्र वासामुळे वा खोकला सर्दी देणारे म्हणून, अत्यंत वांड,
वात्रट, द्वाड, उपद्यापी ह्या वर्गातील समजून फळांच्या वर्गाबाहेर अंगठे धरूनच उभे
करतो त्यांना येथे इतकी यथेच्छ प्रतिष्ठा पाहून मला काय वाटलं हे सांगता येणं अवघड
आहे. पण विचार करायला लावणार्या मनातील यंत्रानी मन घुसळून काढलं एवढ मात्र नक्की!
पहिल्यांदाच, आपल्या
भाषेत आपली नावं का असू नयेत असं वाटून गेलं. ह्या हॉटेल नारळच्या वाटेवर असलेलं ‘ले
कोनोकोनो’ हे हॉटेल एका खाऊन संपलेल्या माशाच्या नावावरून ठेवलं होतं. एकेकाळी हे मासे
येथे भरपूर होते. डच, फ्रेंच आणि ब्रिटिशांनी ते संपवले. परत मनात आलं आपल्या समुद्र
किनार्यावर एखादं फायु स्टार हॉटेल कोळंबी असायला काय हरकत आहे?
हे छोटसं बेट फिरल्यावर
तेथे कॉटन बे (हॉटेल कापूस पुळण) नावाचं अजून ही एक हॉटेल सापडलं. कापूस आणि समुद्र
किनार्याचा काही संबंध तरी आहे का? पण तिथे ऐटित मिरवत होतं.
मॉरिशस आणि रॉड्रिग्ज
येथे वडाची प्रचंड मोठी भरपूर झाडं आहेत. एका भव्य, निकोप, सुंदरशा वटवृक्षाला सामावून
घेत, प्रवेशद्वारावरच तो येणार्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घईल अशा प्रकारे त्यावर
प्रकाशझोत सोडून, त्याचा भव्यपणा प्रवेशद्वारातच वेधून घेणारं, नजरेत भरणारं Le Banian हॉटेल आणि तो वटवृक्ष माझ्या कायमचा स्मरणात
राहून गेला. आपल्याला रोजचा वाटणारा वड नेहमी
पाईन ट्री पाहणार्यांना किती आकर्षक वाटत असेल, हे वडाच्या प्रथम दर्शनाने प्रवाशांच्या
चेहर्यावर उमटलेल्या आश्चर्यातूनच कळून येई.
आपल्या येथे ज्या
वनस्पती, जी फुले, जे प्राणी आहेत त्यांचं आपल्या आयुष्यात केवढं महत्त्व असतं. त्यांचं
निरीक्षण थोडे फार अभ्यासू करतातही पण जे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत; ज्यांच्याविना
आपलं जीवन निरस होऊन जाईल अशा झाडांना, पशु पक्ष्यांना आपल्या जीवनात आपण पाहिजे तेवढा
मान का देऊ नये? त्यांचा अभिमान का बाळगू नये?
त्यांची छानशी काळजी घेऊन, त्यांना आपल्या जीवनात सामावून का घेऊ नये? मॉल्स, दुकानं,
घरं, इमारती, कॉलनीज, गाड्या, हॉटेल्स ह्यांना आपण त्यांची नावं का देऊ नयेत? ती सुद्धा
आपल्या भाषेत? अमेरिकेतील ‘रेडवुड फॉरेस्टमधे’ त्या झाडांना त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या
राष्ट्राध्यक्षांची नाव दिली आहेत. आपल्याकडील झाडांना महत्त्वाच्या व्यक्तींची नावं
दिली तर ती झाडं आणि त्या व्यक्ती दोन्हींची माहिती एकमेकांविषयीच्या संभाषणातून सहज
मिळू शकेल.
रामायण वाचताना एका गोष्टीने
माझं मन वेधून घेतलं. राम वनवासाला निघाला तेव्हा अनेक ऋषींच्या आश्रमात थांबला. प्रयागराज येथे भरद्वाज मुनींच्या आश्रमात एक रात्र
विश्रांती घेतल्यावर त्याने चित्रकूटाचा रस्ता मुनीवरांना विचारला. मार्ग सांगतांना
ऋषीवरांनी किती अंतर गेल्यावर तुला कुठली झाडं लागतील हे सविस्तर सांगितलं. ‘‘येथून
निघाल्यावर काही वेळाने तेथे ‘श्यामवट’ हा महाकाय वटवृक्ष लागेल. तेथे तू आणि सीता
उभयतांनी त्यांची पूजा करा. तेथून एक कोसभर पुढे गेलं की नीलवन लागेल तेथे सल्लकी आणि
बोराची भरपूर झाडं लागतील तेथे यमुनेच्या तीरावर
वेळुची सुंदर बनं आहेत तेथूनच चित्रकूटला रस्ता जातो.’’
असे हे वृक्ष आपल्या
जीवनात कधीकाळी पूर्ण सामावले होते. जसे रामाच्या ध्वजावर ‘कोविदार’ म्हणजे कांचन वृक्षाचं
चिन्ह असल्याचे उल्लेख आहेत तसे बलारामाच्या ध्वजावर ‘ताल’ म्हणजे ताडाच्या वृक्षाचं
पान अंकित असल्याचा भागवतात उल्लेख आहे. ज्या निसर्गासोबत आपण राहतो त्या निसर्गाला
आपल्या जीवनात इतकं उच्च स्थान मिळणं हे त्या निसर्गाला आणि आपल्याला केवढं भूषणावह
आहे. मोर, हंस, उंदिर, बैल, रेडा ह्या सर्व प्राण्यांना देवांनी वाहन बनवून सामान्य
माणसाच्या जीवनात आणून ठेवलं आहे. कृष्णाच्या मुकुटात असलेलं मोराचं निळं हिरवं मखमली
पीस, आपल्या परिसरात पूर्वी खूप मोर असतील, आपल्या सोबतीने रहात असतील, मुलं मोरांच्या
समवेत नाचत असतील असं काय काय सांगून जातं. मोराचा निळा हिरवा पिसारा कृष्णाच्या जवळकीने
मनात अजूनच फुलून येतो. आपणं आपल्या संस्कृतीला दिलेला मान जगात आपली मान उंचावणारा
ठरतो. दुसर्यांच्या संस्कृतीची नक्कल करता येते. पण ती आपली संस्कृती ठरत नाही. त्यातून
फक्त मानहानी होते आणि आपला न्यूनगंड प्रकाशित होतो.
पंचतंत्रात कावळा, घुबड,
कोल्हा, हरीण, कासव, कबुतर, सिंह, लांडगा----- अशा अनेक पशुपक्ष्यांना गोष्टींमधे एकत्र
आणून त्यांचे स्वभाव माणसांच्या स्वभावाशी इतके तंतोतंत जोडले आहेत की, झाडे, पशु,
पक्षी, प्राणी, किटक आणि माणूस ह्यांच एकत्रित तयार होणारं जग लहानपणापासूनच आपल्याला
निसर्गाच्या सानिध्यात नेतं.
पंचतंत्रात येणारा असाच
एका सुंदर वडाच्या झाडाचा उल्लेख मला सुखावून जातो. पंचतंत्रातील दुसर्या म्हणजे
‘मित्रसंप्राप्ति’ ह्या तंत्राची सुरवताच एका वडाच्या झाडाच्या वर्णनाने होते. भारतात
दक्षिणेकडे ‘महिलारोप्य’ नावाचं एक नगर होतं.
त्याच्या जवळच एक विशाल गर्द सावली देणारं वडाचं झाड होतं. अनेक पक्षी त्या
झाडाची फळं खाऊन, झाडाच्या फांद्यांवर, ढोल्यांमधे रहात असत. असंख्य कीटक त्या झाडाभोवती
सतत रुंजी घालत. तर अनेक थकले भागले वाटसरू त्याच्या छायेत बसून विश्राम करत. जे म्हटलं
आहे ते खरच आहे,
ज्या झाडाच्या छायेत
थकले भागलेले प्राणीमात्र शांतपणे विश्रांती घेतात; ज्याच्या पानाफुलांवर पक्ष्यांचे
थवे आनंदाने विहरत राहतात; ज्याच्या गोड फळाचा आस्वाद घेत गुंजन करतात; ज्याच्या ढोल्यांमधे
अनेक जिवजंतु निवास करतात, ज्याच्या फांद्यांवर माकडं खेळतात, राहतात; ज्याच्या फुलांचा
मध घेण्यासाठी असंख्य भुंगे त्याच्यावर गुंजारव करत असतात; आपली पानं, फुलं, खोड, फांद्या---
अशा आपल्या सर्वांगानी जो त्याच्या जवळ आलेल्या जीवांना भरभरून आनंद देत राहतो अशा
तरुवराचं संपूर्ण आयुष्य प्रशंसनीय आहे. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
बाकीची झाडं म्हणजे फक्त भुईला भार समजली पाहिजेत. संस्कृत मधे असलेला हा श्लोक मी तुम्हाला मराठीतून देते.
तुम्हालाही नक्की आवडेल.
प्राणी झोपति सावलीत जयिच्या, पक्षी
सुखे राहती
सौख्ये नांदति जीवही कितितरी, ढोलीत,
फांद्यांतुनी ।
घेती आश्रय माकडे तरुवरी, स्वादिष्ट
खाती फळे
भुंगे सोडति ना फुलांस क्षणही, गोडी
मधाची कळे ।।
सर्वांगे सुख देतसे तरु महा, तो कौतुकाचा धनी
ज्यांचा ना उपयोग जीव-जगता, ते भार भूमीवरी ।।
-----------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment