2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)
‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’
2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’
एकदा वसंतपंचमीला आम्ही
काहीजण मध्यप्रदेशात ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. ओंकारेश्वर हे कावेरी आणि
नर्मदा नद्यांच्या संगमावर असलेलं ज्योतिर्लिंग आहे. (ही कावेरी कर्नााटकातील नव्हे....
मध्यप्रदेशातील) तेव्हा तेथे सर्व घाट सजवले
जात होते सर्वत्र सुंदर रोषणाई केली गेली होती. देवळांवर विविध रंगी उजेडाचे झोत सोडले
होते. आमची राहण्याची खोली नर्मदेच्या समोर असल्याने रात्री जाग आल्यावर रात्रीच्या
नीरव शांततेत समोर वाहणारा नर्मदेचा वेगवान प्रवाह, देवळे आणि 108 फूट उंच बाल शंकराचार्यांचा
पुतळा प्रकाशाच्या रोषणाईत उजळून गेलेले दिसत होते. मनाला प्रसन्न करत होते. तो वेगवान
प्रवाह पाहून वारंवार नर्मदाष्टक जिभेवर रेंगाळत होतं.
पुढे पुढेचि धावतो जलौघ नर्मदे तुझा
मिळावयासि सिंधुलाचि ओढ लागली तुला
तरंगमालिका असंख्य रम्य सौम्य सुंदरा
तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या अनंत ह्या
दुसर्या दिवशी भल्या
सकाळी निघून आम्ही नावेतून ओंकारश्वराची प्रदक्षिणा करणार होतो. जरा उजाडता उजाडता
नावाडी हजर झला. इथे नेहमीच अशी रोषणाई असते का?’’ असं त्याला विचारल्यावर तो सांगू
लागला, ‘‘येथे रथसप्तमीला मेकलकन्या नर्मदेचा जन्मदिवस साजरा करतात. त्यासाठी ही सर्व
सजावट चालू आहे.’’ ती कल्पनाच फार मोहक वाटली.... नदीचा वाढदिवस! रथसप्तमीच्या आदल्याच
दिवशी आपण नर्मदेचा निरोप घेत आहोत ह्याची चुटपुट लागली. नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी
असून सिंधुसागराला मिळतात. नर्मदा भारताच्या कटिप्रदेशावर मेखलेसारखी विराजमान आहे.
‘नर्म’ ह्या शब्दाचा अर्थ सुख तर ‘दा’ म्हणजे देणारी. नर्मदा सर्वांना सुख देणारी आहे.
तिच्या दर्शनाने प्रसन्न करणारी आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यावर, उत्तरायण
सुरू होतं अशा सुमुहूर्तावर वसंत ऋतुमधली रथसप्तमी ही सुंदर तिथी प्राणीमात्रांना निरंतर
सुख देणार्या ह्या नदीच्या जीवनाशी जोडून तो दिवस तिचा जन्मदिन साजरा करण्याची किती
ही सुंदर प्रथा! त्या निमित्ताने वर्षातून
एकदा ह्या जीवनदायिनी नदीचे आभार मानून तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही रीत
मला आवडली.
आपल्या भारतीय सनातन संस्कृतीत मानवाच्या आजूबाजूच्या सर्व
स्थावर जंगम वस्तूंना मानवी जीवनात जवळचं स्थान दिलं जातं. त्यांना मानवी रूपात
डोळ्यासमोर साकार करून दैवी रूपात पूजलं जातं. नद्या जीवनदायिनी असतात हे ओळखून
त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं.
नर्मदेप्रमाणे बाकी नद्यांचा असा जन्मदिन साजरा केला जातो
का? असेल तर कधी? हा विचार मनात आला. आणि शोध घेता लक्षात आलं की, तापी
नदीचा उत्सव, ज्याला तापी जन्मोत्सव म्हणतात,
तो आषाढ शुद्ध सप्तमी या तिथीला(साधारणपणे जुलै महिन्यात) नदीच्या उगमाच्या मुलताई
येथे जसा साजरा केला जातो तसा, तिच्यामुळे समृद्धीचे वरदान लाभलेल्या खानदेश, भुसावळ,
जळगाव, रावेर, सुरत अशा नदीकाठावरील गावातही उत्साहात साजरा केला जातो. ग्रंथ व पुराणानुसार जेवढे महत्त्व
गंगा, नर्मदा नद्यांना आहे, तेवढेच तापीला आहे. तापी खान्देशातील शेतीच नाही तर
समाज जीवनही समृद्ध करणारी जीवनदायी नदी आहे.
भारतावर सिंधुसंस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे. ही
सुंदर सिंधुनदी लडाख ले मधल्या काही भागात आज पहायला मिळते. उन्हाळ्यात(जून त
सप्टेंबर) भगव्या रंगाच्या ब्राह्मिनी डक्स आणि दुर्मिळ पक्ष्यांनी सजलेली ही आरस्पानी
प्रवाहाची नदी हिवाळ्यात इतकी गोठून जाते की तिच्या प्रवाहाला चादर रस्ता म्हणतात.
त्यावरून मोठमोठे ट्रक्सही जाऊ शकतात. अशा नदीचा ‘सिंधु-दर्शन उत्सव’ गेले 29 वर्ष
साधारण जून 23 ते 26 मधे साजरा होतो. अध्यात्मिक संवेदना, देशभक्तीची किनार, आणि
सांस्कृतिक मूळांशी निगडित असलेला हा उत्सव ले मधल्या सिंधु घाटावर साजरा केला
जातो.
गंगा
यमुना ह्या आपल्या भारत देशातील पवित्र नद्या. हिमालयातून येताना आपल्यासोबत
प्रचंड गाळ घेउन येतात आणि उत्तर भारत सुजल सुफल बनवितात. जेव्हा उन्हाळ्यात बाकी
नद्या क्षीण होतात अशा वेळी हिमालयातील बर्फ वितळून, हिमालयात उगम पावणर्या
नद्यांना पूर येतात. उत्तर भारतातील होरपळणारा उन्हाळा ह्या नद्यांमुळे सुसह्य
होतो. जेष्ठ महिन्यातील सुरवातीचे नऊ दिवस हे असह्य उन्हाळ्याचे, नवतापाचे दिवस
मानले जातात. उन्हाळा त्याच्या चरम सीमेवर असतो. अंगाची लाही लाही होत असताना सर्व
ताप, शीण दूर करणार्या गंगेचा ‘गंगादशहरा’ हा दहा दिवसाचा महोत्सव सुरू होतो.
गंगा दशहरा अजूनही एका गंगेवर विलक्षण प्रेम करणार्या कवीची आठवण करून देतो. ‘गंगा
लहरी’ हे काव्य लिहीणार्या जगन्नाथ पंडिताची!
गंगा, जगन्नाथ पंडितकृता गंगालहरी आणि जगन्नाथ पंडित ह्यांची गुंफलेली अजोड
कहाणी गंगा दशहरात कोणाला आठवणार नाही? आपोआपच गंगालहरीचे श्लोक(संस्कृतचे मराठी
भाषांतर) मुखात घोळू लागतात.
असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे
असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।
जलौघाने तू गे शमविसि तृषा या
धरणिची
तृषार्ता पृथ्वीला निवविसि जलानेच जननी ।।
तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिसी
सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती ।
फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी
महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी ।।
जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले
जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि गमे ।
शिवाला त्या वाटे तव सलिल ऐश्वर्य बहु हे
म्हणोनी का मूर्ध्नी तुजसि करितो धारण सखे ।।
असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे
असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।
तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते
सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके ।।
सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे
मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे ।
सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे
अनर्थांसी सार्या नित शमवु दे हे माय मम गे ।।
अशा ह्या गंगेप्रति
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचा जन्मोत्सव म्हणा, दशहरा म्हणा हवाच की!
आपल्या ह्या सुजला सुफला समृद्ध
भारत भूमीत गंगेसोबत मुखी येणारं नाव म्हणजे यमुना! आणि यमुनेचं नाव घेताच
कृष्णाची आठवण झाली नाही असं कसं होईल? यमुना आणि कृष्णाची प्रीती ही अभंग आहे. यमुनेच्या
वर्णनात कृष्णही सामावला आहे.
सलील सावळे जिचेच कृष्णरंगि रंगले
सुनीलवर्ण नीरवस्त्र चारुगात्रि वाहते
जिचे तरंग सुंदरा मनोहरी करी तटा
सुरम्य वालुकामयी प्रदेश भूषवी सदा
रुप्यात नाहतीच वृक्षमंजिरी जिच्या तिरा
सुशोभिता करी प्रवाह शारदीय रात्रिला
अखंड मग्न तज्ञ सृष्टिपूजनीच जी सदा
अपार सौख्य देतसे समस्त जीवसृष्टिला
अशा ह्या यमुना नदीचा जन्मदिन अनेक
ठिकाणी वेगवेगळ्या वेळी साजरा होतो, चैत्र शुद्ध षष्ठीला ‘यमुना छठ’ नावाने
हा साजरा केला जातो तर, ‘यमुना पुश्करम्’ दर १२ वर्षांनी साजरा होतो. (जून २०२६
मध्ये आगामी), अश्विन महिन्यात दिवाळीनंतर दिल्लीतील यमुनोत्सव वा यमुना दिवस साजरा
करतात. नदीची पूजा, स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात
दिल्ली, मथुरा आणि यमुनोत्रीतही यमुनोत्सव साजरा होतो.
सुवर्ण वर्ण सावळा झळाळतो जिचा सदा
जिला बघूनि आठवे सदैव कृष्ण सावळा।।
अशा
ह्या यमुनेचा जन्मदिन साजरा करून आपण थोडं खाली उतरू आणि गोदावरीला भेटू. गोदावरी
नदीचा ‘गोदा जन्मोत्सव’ दरवर्षी, माघ शुक्ल दशमीला (साधारणपणे फेब्रु. महिन्यात) नाशिक/त्र्यंबकेश्वर
येथे साजरा होतो.
आंध्र आणि तेलंगाणा मध्ये आषाढ चतुर्दशी पासून 12 दिवस ‘आषाढ
पुष्करम्’ ह्या नावने गोदावरी उत्सव होतो तर 144 वर्षांनी ‘गोदावरी महापुष्करम्’
ह्या नावाने उत्सव होतो. मकर संक्रांतीलाही तिच्या पवित्र प्रवाहात स्नान केलं
जातं.
थोडं कृष्णामाईलाही भेटू.
आपल्या महाराष्ट्रात कृष्णामाई उत्सव – वाई कराड सांगली मिरज माघ ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत
मोठ्या उत्साहात साजरा होतो.
कावेरी नदीचे मुख्य उत्सव ‘कावेरी संक्रमण’ वा ‘तुलु संक्रमण’ आणि ‘आडि पेरुक्कु’ हे आहेत; कावेरी संक्रमण साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यात
जिथे सूर्य तुला राशीत प्रवेश करतो अशा कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यातील तालकावेरी येथे
साजरे केले जाते, तर ‘आडि पेरुक्कु’ जुलै-ऑगस्टच्या सुमारास कावेरीतीरावर साजरे
होते. हे काही थोडेसे सांगितलेले नद्यांचे जन्मोत्सव
ह्या सर्व भव्य दिव्य नद्यांपुढे आपल्या मुळामुठा काही
कमी नाहीत. मुळामुठा ह्या नद्या लहान जरूर आहेत पण त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज ,
बाजीराव पेशवे अशा एकसे एक कर्तबगार व्यक्तिमत्त्वांना जन्म दिला. ह्याच मुळामुठेच्या
काठावर एकदा बाजीरावाने एक विलक्षण दृश्य पाहिलं. एक ससा एका जंगली कुत्र्यामागे लागला
होता. ही अजब घटना पाहून बाजीराव पेशव्यांनी ह्या नदीकाठी त्या जागेवर शनिवार वाडा
बांधला जो आजही आम्हाला स्फुरण देत राहतो.
मुळा मुठेचे नीर वीर
हे कुशाग्र मतिचे दे वरदान
इथे तळपल्या तलवारी अन्
जिह्वांचे ते कुशाग्र बाण
मृद्गंधातुन येथ दरवळे
स्वातंत्र्याचा नित अभिमान
अन्यायाला वाचा फोडुन
मुळा मुठा दे नित आह्वान
मुळा मुठेच्या प्रवाहातुनी
वाहतसे नित पसायदान
गीतार्थाचे इथे आकलन
दे अमरत्वाचे बीज महान
अशा ह्या
मुळामुठा नद्यांचा पुण्यात मोठा उत्सव होतो हे माहित हे का? हा उत्सव ‘मुठाई नदी महोत्सव’ ह्या नावाने तो ओळखला जातो, 28 नोव्हे. ला भारतीय नद्यांचा
जन्मोत्सव दिन असतो त्याच सुमारास
‘मुठाई महोत्सव’ संभाजी पार्क जवळ आयोजित केला जातो, त्यात नदी स्वच्छता
मोहीम, जल गुणवत्ता चाचणी, विविध कार्यक्रम आणि नागरिक सहभाग असतो.
सुहृत् हो! हे मी
नावाला काही उत्सव सांगितले. आपल्या भागातील नद्यांचे उत्सव आपण शोधून काढा. आपण आपले
वाढदिवस साजरे करतो. त्यासोबत ह्या जीवनदायिनी नद्याचेहीप्रवाह स्वच्छ करून तो दूषित
होणार नाही ह्याची काळजी घेऊन वाढदिवस साजरे करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू
या.
----------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment