3 गंधवती (सुजला सुफला सस्यश्यामला)
3 ‘‘ गंधवती ” -
आपली वसुंधरा ही गंधवती आहे. सर्व सुगंधांचं आगर. पावसाचे चार थेंब तापलेल्या मातीवर पडताच मातीचा अस्सा सुगंध दरवळायला लागतो की मन वेडावून जातं. असा गंध जगात दुसरा सापडणार नाही. अन्नपूर्णा स्तोत्रात सर्व प्राणीमात्रांना अन्न पुरवणारी शिवाची पत्नी पार्वती ही दुसरी तिसरी कोणी नसून उर्वी म्हणजे पृथ्वी असल्याचा उल्लेख आहे. (उर्वी सर्व जनेश्वरी- श्लोक7) ज्या प्रमाणे आपण ध्वज हा राष्ट्राचं प्रतिक मानतो त्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारतभूमीला आपण जगाचं प्रतिक मानतो. (पूर्वी zero meridian ही काल्पनिक रेखा भारताच्या मध्यातून उज्जयनीतून जाते असं सर्वत्र मानलं जायचं. ब्रिटिशांच्या सत्तेनंतर ती इंग्लंडमधून जाते असं मानू लागले.)
आपल्या भारतभूमीचं वर्णन करताना श्री जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, ‘‘ह्या भारतभूमीच्या, ह्या उर्वीच्या, ह्या पार्वतीच्या अंगाला अत्यंत सुगंधी उटी लावलेली आहे. त्यात केशर, चंदन, आगरू, वाळा अशा सुगंधी वनस्पती आहेत. आपल्या भारतभूमीचा नकाशा पाहिला तर भारतभूमीच्या कपाळाच्या जागी असलेल्या काश्मिरमधे केशराची शेती होते. ‘काश्मिर’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ केशर असा आहे. पूर्वापार आपले पूर्वज काश्मिरमधे केशराची शेती करत होते. केशरानी समृद्ध असल्याने ह्या भूभागाला काश्मिर असं संबोधले जातं. काश्मिरमधेच कस्तूरीमृग सापडतात. सहाजिकच आपल्या वंदनीय मातेच्या, आपल्या भारतभूमीच्या माथ्यावर केशरकस्तूरीचा टिळा (केशरकस्तूरी लल्हाटी) कायमच शोभत असतो. (ललाटे काश्मीरं)
तर पश्चिम किनारपट्टीला
असलेल्या निलगिरी /मलय पर्वताच्या रांगावर चंदनाची जंगलं असतात तर पूर्वेला असलेल्या
अगरताळा आणि एकेकाळी भारताचे भाग असलेल्या
म्यानमारमधे सुगंधी आगरची झाडं असतात. तेच लाकूड आज अगरबत्ती/ उदबत्तीसाठी वापरलं जातं.
डेहराडून, सहाराणपूर,
पश्चिम घाट/ निलगिरी , ओडिशा, अंदमान हया भागांमधे कापराची झाडं मुबलक आहेत. तर वाळा
दलदली उष्ण भागात मुबलक वाढतो.
ह्या सर्व सुगंधी झाडांनी
भारताचा पूर्व, पश्चिम, दक्षिण उत्तर सर्व भूभाग व्यापला आहे. जणु काही आपल्या भारतभूमीने अंगावर केशर, कस्तूरी,
चंदन, आगरू, कापूर यांची सुगंधी उटी लावली आहे. ( काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरा )
सुवासाचे अनेक प्रकार
आहेत. जो आह्लादकारक सुवास असतो त्याला गंध वा सुगंध म्हटलं जातं. सुरभी हा अत्यंत मधुर गंध आहे तर घ्राणतर्पण वा इष्टगंध हा नाकाला आनंद देणारा सुगंध
आहे. आमोद हा अत्यंत आकर्षक सुवास असतो. परिमल
हा घर्षणानी दरवळणारा सुगंध आहे. चंदनाचं खोड सहाणेवर उगाळलं की चंदनाचा सुगंध येतो.
वा अत्तराचा फाया हळुवार हातावर लावून हात एकेकावर घासता अत्तराचा परिमळ दरवळायला लागतो.
दूरवर पसरणार्या, व्यापणार्या सुवासाला समाकर्षी किंवा निर्हारी म्हणतात. ताम्बूलादि
सुगंधाला मुखवास, सुगंधी वा आमोदी म्हणतात.
फुलाफुलात दडलेला सुगंध
वेगळा! काही सुवास जाई, जुई, चमेली सारखे मंद, काही सप्तपर्णीसारखे उग्र! त्यांच्या
तीव्र पणाने दर्प ह्या सदरात मोडणारे! काही
मोगर्यासारखे दरवळणारे काही चाफ्यासारखे त्यांच्या घमघमटाने लक्ष वेधून घेणारे! गावठी
गुलाबासारखे काही मोहून टाकणारे, काही वेड लावणारे, काही घायाळ करणारे! आम्रमंजिरी,
मोगरा, चाफा, कमळ, अशोक ह्या वेड लावणार्या मादक सुगंधांचे कामदेवाने मारलेले पाच
बाण ज्याला लागतात तो घायाळ झाल्याशिवाय रहात नाही. चाफ्याला भृंगमोही असंही म्हणतात
कारण चाफ्याच्या सुगंधाने वेड्या झालेल्या भुंग्याला त्या वासाने मूर्छा येते व तो
मरतो. (असं संस्कृत साहित्यात वर्णन आहे.)
केवड्याचा सुवास वेड
तर लावतो पण त्यात मधाचा अंशही नसतो. शिवाजीच्या पदरी रुजु झालेला कवी भूषण त्याच्या
भावाच्या आग्रहाखातर एकदा औरंगजेबाच्या दरबारात गेला असता औरंगजेबाने त्याला कवन म्हणण्यास
सांगितलं. कवी भूषण म्हणाला, ‘‘खाविंद, माझ्या प्राणांची आपण हमी देत असला तर मी काव्य
सादर करीन.’’ तशी हमी मिळताच भूषण म्हणाला, ‘‘ खाविंद, हे सर्व मांडलिक राजे हे वन
उपवनांसारखे आहेत आणि आपण फुलातून मध घ्यावा त्याप्रमाणे त्यांच्याकडून खंडणी वसूल
करणारे भृंग आहात! ‘‘वाहव्वा!’’ बादशाहने दाद देताच कवी भूषण म्हणाला, ‘‘थांबा माझं
पूर्ण ऐकून घ्या. शिवाजी महाराज मात्र केवड्याच्या बनासारखे आहेत. त्यात शिरलेल्या
भुंग्याला जसा मध तर मिळत नाहीच पण त्याचं अंग मात्र परागाच्या धुळीनी भरून जातं त्याप्रमाणे
हे औरंगजेबा, दर वेळेस तू शिवाजीवर चढाई करायला जातोस आणि धूळ खाऊन परत येतोस.’’ औरंगजेबाने
कवीचा शिरच्छेद करायची आज्ञा दिली. पण सर्वांनी त्याला भूषणला दिलेल्या वचनाची आठवण
करून दिली. भूषण शिवाजी महाराजांकडे सहीसलामत परत आला.
ही झाली केवड्याची कहाणी! आकाशमोगरा, अनंत आणि
शिरीषासारखे लपाछपी खेळणारे काही सुगंध त्यांना शोधून काढल्याशिवाय स्वस्थ
न बसू देणाारे असतात! चैत्राच्या उबदार वातावरणात कडुनिंबाच्या फुलांचा मंद मंद सुवास
त्या झाडाखाली मंदमंद रेंगाळत राहतो; जसे काही 'ह्या तरुतळी विसरले गीत --!' गुलछडी सारखे थंडावा देणारे तर रातराणीसारखे काही
मादक सुगंध अंधारात हवेच्या झुळकेसोबत अलगद घरात, मनात प्रवेश करणारे! काही केवड्याच्या
पातीसारखे वा बकुलफुलासारखे पुस्तकांच्या पानात खूण म्हणून ठेवल्यावर पुस्तकालाही सुगंधित
करणारे! बकुळ चाफा दरवळत असतात, फणस आंबा घमघमणारे सुवास सारा परिसर त्यांच्या घमघमाटाने
कोंदाटून टाकतात. दुसर्या कुठल्याही सुवासाला जणु त्याच्या राज्यात प्रवेश वर्ज्यच
असतो. बुच/ आकाशमोगर्यासारखे काही सुगंध हवेसोबत दूरवर पोचणारे तर काही मन मोहून घेणारे
पण ओळखू न येणारे.
वन सर्व सुगंधित झाले,
मनमाझे मोहुन गेले कितीतरी,
मी सारे वन हुडकीले, फुल कोठे न कळे फुलले मजतरी
काही असेही सुगंध !
आणि जे आणि शोध घेतल्यावर
फुल दगडाआड दडाले लहानसे,
दिसण्यात फार ते साधे, परी आमोदे,
जगामधी पहिले जगामधि
पहिले,
मन माझे मोहुन गेले कितीतरी
असे ही काही!
पांडव वनवासात असताना
एका अलौकिक फुलाच्या वासाने द्रौपदी इतकी मोहित झाली की, हे फूल मला पाहिजे म्हणून
तिने भीमाकडे हट्ट धरला. भीमही थेट त्या फुलाच्या शोधात कुबेराच्या बागेत पोचला. तेथे
राक्षसांशी लढून त्याने ती फुलं द्रौपदीसाठी आणल्याची गोष्ट आपल्याला माहित आहे. हाच तो दूरवर पसरणारा अत्यंत आकर्षक सुवास निर्हारी किंवा समाकर्षी!
कमळ हे तर आपल्या भारतभूमीचं
फूल! कमळाचा आकर्षक, मोहक आमोद सार्या भुंग्यांना इतका मोहित करतो की सूर्यास्तासोबत
मिटणार्या कमळातून बाहेर पडण्याचं भानही भुंग्यांना रहात नाही.
ज्ञानदेवांचा एक सुंदर
अभंग आहे.
अवचिता परिमळु झुळकला
अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळु आला गे माये
फार
अद्भुत वर्णन आहे हे. ह्याच्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून त्या कोंदणात बसवला आहे. ज्ञानेश्वर
म्हणतात, अचानक हा मंदसा (अळुमाळु) सुगंध (परिमळु) कोठून बरे दरवळला? मला वाटते, साक्षात
गोपाळकृष्णच माझ्या भेटीला येतो आहे! सर्व दिशांचा, आकाशाचा, वाणीचा, सूर्यचंद्राचा स्वामी असलेला हा गोपाल माझ्या इंद्रियाचाही
स्वामी आहे.
गो ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गो म्हणजे, गाय, आकाश, प्रकाशाचा किरण, स्वर्ग, पृथ्वी, वाणी, सरस्वती,
माता, दिशा, जल, डोळे, इंद्रिय, सूर्य, चंद्र. तर पाल म्हणजे संरक्षक, राजा ,स्वामी.
ज्याप्रमाणे गुराखी गायींची योग्य
काळजी घेतो, त्यांना जंगलात भलतीकडे भटकू देत
नाही, दर्या खड्डे ह्यात न पडू देता सांभाळून त्यांना योग्य लुसलुशीत औषधी
गवताळ प्रदेशात चरायला नेतो, त्यांची पूर्ण काळजी घेतो त्याप्रमाणे हा कृष्ण हा इंद्रियांचा
स्वामी असल्याने इंद्रियांना स्वैर भटकू देत
नाही. त्यांना हिताच्या योग्य मार्गावर ठेवतो.
परिमल हा घर्षणाने जाणवणारा सुवास आहे. हातावर लावलेल्या
अत्तराला सुवास असतोच पण अत्तराचा फाया हळुच, हलके हातावर घासावा लागतो. त्या घर्षणाने
तो सुगंध दरवळतो. हात एकमेकावर घासले की अत्तर दरवळतं त्या अत्तराच्या फायापेक्षाही
अलगद स्पर्श झुळकेचा आहे. झुळुक अलगद अंगाअंगाशी लगट करून गेली तेव्हा तिच्यात सामावलेला
मोरपिस फिरवल्याप्रमाणे त्या गोपालाचा स्पर्श आणि त्या घर्षणातून मंद मंद दरवळलेला
गोपाल हा फक्त अनुभवच घ्यावा लागेल. (डाव्या/इडा किंवा उजव्या/पिंगला नाकपुडीतून श्वासोच्छास
चालू असतो. जेव्हा समाधी लागते तेव्हा इडापिंगळा ह्यांचे भेदन होते. म्हणजे श्वास दोन्ही
नाकपुड्यातुन वाहू लागतो. ह्याला एक मंद सुगंध असतो. तोच गोपाल )
परीक्षेसाठी तयारी करणं,
परीक्षेला बसणं आणि उत्तम मार्कांनी उत्तीर्ण
होणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन अभ्यास करत असताना अचानक एखाद्या वेगळ्याच
गोष्टीचा शोध लागावा, आज पर्यंत कोणालाच न उलगडलेली गोष्ट उलगडावी, अकल्पितपणे काही
जगावेगळी गोष्ट आकलन व्हावी आणि त्याच्या आकलनानी मनाचा गाभारा उजळून निघावा तशी ही
गोष्ट
अचानक, अवचित, ज्याची
कल्पनाच केली नाही, असा अकल्पितपणे, ध्यानीमनी नसताना येणारा हा समाधिचा अनुभव ज्ञानदेवांनी अवचिता परिमळु म्हणत काव्यात व्यक्त
केला आहे.
--------------------------------
Comments
Post a Comment