‘सर गुलगुल द बुलबुल’

 

Dear बुलबुल!

 


मी जेथे जेथे पतीसवे नवीन बदलीच्या गावी जायचे तेथे तेथे जवळच्याच झाडाच्या फांदीवर, कधी वेलाच्या कमानीवर तर कधी कुंडीतल्या झाडावरच तू तुझी वाटीसारखी गोलगोल सुबक सुंदर घरटी बांधून तुझाही संसार थाटायचास. कावळा चिमण्यांच्या अरसिक काड्यांच्या बोजड घरांहून तुझी ही वेगळी सुंदर वाटीसारखी सुबक घरटी मला फार आवडत. तुझ्यासवे मांजर, मुंगुस, साप, सरडे आदि एकमेकांचे शत्रू असलेले अतिथीही घरी हजर होत. आणि तुझ्या पिलांना वाचवण्याची अजून एक नसती जबाबदारी माझ्यावर येऊन पडे. वरवर तुझ्यावर डाफरत मी तुझ्या संसारात समरस होऊन ती पार पाडू लागे.

तुझा फास्ट कलर आपल्या सस्य श्यामल देशाला अगदी शोभेसा! तू काही स्थलांतरि पक्षीही नाहीस. ब्रह्म मुहूर्ताला ऊठायची तुला पिढ्यानु पिढ्या लागलेली सनातन सवयही तीच! तरी तुझा जरा आगाऊ ‘स्नॉबिश’ पणा पाहिला की तू जरा अंतर राखूनच मानवी जीवनात वावरतोस असं वाटतं वा तुझा शिष्ठपणा पाहून तुला फार जवळ कोणी केलं नसावं. शुक सारिका मोरांना जवळ करणार्‍या देवदेवताही तुझ्यापासून जरा फटकूनच असतात.

 कदाचित अलेक्झांडरच्या शिरस्राणासारखा दिसणारा तुझा तुरा तुला जरा देखणा आगाऊ लुक देत असावा. मोरालाही तुरा असतो पण अलेंक्झांडर सारखा नाही. तसा स्नॉबिशपणा रक्तातच असावा लागतो म्हणा! तो आतून आतून बाहेर पडताना प्रत्येक कृतीतून व्यक्त होत गेला पाहिजे--- अमिताभ बच्चनसारखा! तुझ्यासारखा असा सामान्य लुक देणारा असा नैसर्गिक ‘बॉर्न स्नॉब’ नसेल. मोर तुझ्यापेक्षा सुंदर असूनही देवांच्या बरोबर राहून राहून नम्र नरम होऊन गेला असावा. हंसाचा डौल आणि रंगरूप तुझ्यापेक्षा कितीक पटींनी श्रेष्ठ असलं तरी तो देखणा, रुबाबदार मिलिंद सोमणच्या वर्गात मोडतो.

तुला अुमक चूडामणी, तमूक वाचस्पती, विद्यालंकार अशा भारतीय पदव्या शोभत नाहीत एवढं खरं! तुझा थ्रि-पीस काळा कोट आणि वर इंग्रजी हॅट पाहून तुला ‘सर’ हीच पदवी शोभेल. ‘सर गुलगुल द बुलबुल’!  असं काहीसं नाव नेत्र आणि कानांचा मसावि (महत्तम साधारण विभाजक.)काढून निघतं म्हणून चालेल असं वाटतं. सकाळीच जराही कटु भाषा न बोलता तू ‘‘गु गुलु गुलु  गुलु असं सातत्याने गात ओरडत राहिलास की, झाडावर सावधपणे चढणारी तुझ्या घरट्याच्या दिशेने एकएक पाऊल टाकणारी मनी मला घरातूनच जाणवत राहते. तुझ्या पिल्लांवर कावळा वा भारद्वाजाची वक्रदृष्टी वळल्याचं मला घरात बसूनही कळतं. टिटवी वा साळुंकी ताईंसारखा पिलांसाठी तू टाहो फोडत नाहीस वा रात्री अपरात्री सक्काळीच जीवाची घालमेल झाल्याचे दाखवणारा कानफोड परफॉरमन्सही देत नाहीस.

‘प्रभातसमयो पातला’ असं असताना तुझी गुलगुलीत बडबड मला कधी भूपाळीशी साम्य दाखवत नाही तर चक्क अरेबिक मधे तू अल् मदीऽऽना! अल् जझीऽऽरा असं काहीसं म्हटल्यासारखं वाटत. कधी ए्ए! प्रवीण! हाक मारतोस असंही वाटतं. त्यात अचानक युक्‌ ऽऽ क्रेनिया, युक्‌ ऽऽ क्रेनिया, बिट्ऽऽ ट्वेनिया, ल्युथ्ऽऽ थ्वेनिया अशा कुठल्या नसलेल्या देशांची नावं तू घ्यायला लागलास की वाटतं, ट्रंपतात्यांना अजून रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबवता येईना; इथे त्यांच्या आधीच तू त्यांचं एकीकरण साधून त्यांचा संयुक्त युक्ऽऽक्रेनिया देशही बनवलास. मनोमन मी तुला नोबेल देऊन टाकते. इतकच नाही तर कुठल्या दोन देशांमधल्या भागाला तू बिट्ऽऽट्वेनिया हे नाव दिल्याची दवंडीही देऊन जातोस! कितीवेळ तेच तेच बोलून  ना तू कंटाळतोस ना तुझी गोड पोपटपंची ऐकून मी कंटाळते!

ज्या तोर्‍यात तू पाम ट्री मधून निघालेल्या, न उलगडलेल्या, समशेरीप्रमाणे उभ्या असलेल्या सर्वात उंच पानावर बसून गातोस वा सर्वात उंच दिव्याच्या खांबावर तुझं सिंहासन सजवतोस ते पाहिलं की तुझ्या इटुकल्या पिटुकल्या जीवात दडलेला आगाऊपणाही मला आवडतो. तुझा थ्रिपीस काळा कोट, अ‍ॅलेक्झांडर हॅट मधलं तुझं रूप पाहतानां खुद्कन् हसुही येतं. साहेबाच्या काळ्या कोटावर घालायचा रेड बो मात्र तुला कुठे घालतात हे लक्षात आलं नाही; वा गळ्यभोवती लावायला जमलं नसावं . त्यामुळे त्या रेड बो चा तू आरामात तेवढ्याच फुशारकीने ‘लाल चड्डी बो’ म्हणून केलेला वापर तुझ्या निर्व्याज बालमनाची खात्री देऊन जातो. बालपण गोड असतं. त्यात काहीही शोभून दिसतं.   माझ्यातील आज्जी जणू तुला जवळ घेत म्हणते, ‘‘ गोलु, कधी रे शहाणा होणार!’’

------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-




Comments