तुकाराम बीज-

 

तुकाराम बीज-

कुठल्याही चमत्कारांवर माझा विश्वास नाही. तरूणपणी हा ताठरपणा, कडकपणा जरा अजूनच जास्त असतो. एक बंगाली मैत्रिण आणि मी एकदा तुकारामबीजेला देहूला जाऊ या का? म्हणून ठरवत होतो. सर्वांनी सांगितलं, ‘तेव्हा देहूला खूप गर्दी असते हं, उगीच जाऊ नका.’ आम्हालाही पटत होतं. पण ज्या नांदुरकी वृक्षावरून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्याची पानं दुपारी बरोबर बारा वाजता सळसळतात आणि तुकोबारायांचं तेथील निसर्गात भरून राहिलेलं अस्तित्व जाणवतं असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय येतो का नाही हे पहायला आम्ही दोघी उत्सुक होतो. आणि कसं काय माहित नाही पण, आमच्या मनातील शंका वा लोकश्रद्धेवर आमच्या मनात उत्पन्न झालेला संदेह पाहून तुकोबोरायांनी थेट निमंत्रणाचा खलिताच पाठवला असावा.

त्याच दिवशी मैत्रिणीच्या पतिदेवांना ऑफिसच्या कामासाठी गाडीने देहूवरून पुढे कुठेतरी कामाला जायचं होतं.  त्यांनी आम्हाला देहूला सोडायचं मान्य केलं. आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास – त्या नांदुरकीच्या ओढीने आम्ही देहूला पोचलो. अकरा साडे अकरा वाजले असावेत. प्रचंड उन्हाने आमचा ताबा घेतला. त्यात जनतेचा महासागर लोटलेला. ‘पर्स सांभाळ हं!’ आम्ही एकमेकींना सांगत होतो. कुठे जायचं कसं जायचं काहीच माहित नव्हतं. तेवढ्यात आमचे नवीन चेहरे पाहून एक 14- 15 वर्षांचा तरतरीत हसरा, गावाकडचा वाटणारा मुलगा म्हणाला, तुम्हाला घेऊन जाऊ का? एक मन म्हणत होतं, फसवणार तर नाही? पण त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच दुवा दिसत नव्हता. ‘पर्स नीट धर.’ म्हणत दोघी आपापल्या पर्सा छातीशी कवटाळून त्याच्या सोबत जात होतो. कोण, कुठला तू? काही विचारायचं सुचलं नाही. सुईत ओवलेला दोरा सुईमागे जावा त्याप्रमाणे तो गर्दीतून मार्ग काढत जसा नेत होता तसं आम्ही जात होतो इतकच!ऊन रणरणत होतं. बसलेल्या बाया बापड्यांच्या गर्दीतून मार्ग काढत त्याने आम्हाला एका तुटपुंजी सावली असलेल्या झाडाजवळ बसवलं. ते बघा समोर ते झाड दिसतय ना! त्याची पान हलतात. एवढ्या गर्दीत बाया बापड्या एकमेकीाना चिकटून चिकटून बसलेल्या असताना दोघींसाठीच तेथे जागा कशी रिकामी असावी हे मनातही आलं नाही. ‘जाताना प्रसाद घेऊन जा हं!’ त्याने बजावलं. ‘नंतर मी तुम्हाला भेटतो. काळजी करू नका.’ म्हणून गेला ही! ‘पर्स सांभाळ हं’! परत आम्ही एकमेकींना बजावताना पर्समधल्या बाटलीतलं घोटभर पाणी पिऊन घसा ओला केला. 2000 साली मोबाइल नव्हते आणि  UPI ही नव्हतं. पैसे गेले तर घरी पोचण्याचे वांधे!

कशी ही माणसं इतक्या उन्हात बसली आहेत? खाली झाडाची मुळं आपल्या कडक अस्तित्वााची जाणीव करून देत होती. वर रणरणणारा सूर्य आम्हाला पिऊन टाकत होता. सर्व वारकरी मात्र चांदण्यांची बरसात होत असल्यासारखे शांतमन बसले होते. घड्याळाकडे पाहून मी म्हटलं, अजून दहा मिनटं आहेत. घाम पुसायला घामही येत नव्हता. फक्त भाजत होतं. दहा मिनिटही लवकर जात नव्हती. तरी दोघींची उत्सुकता शिगेला पोचली होती. तुकोबांचं परत येणं, त्याचं अस्तित्व जे काय घडणार असेल त्या क्षणाची वाट पहात होतो. वारा तर नाहीच ! कुठल्याही झाडाचं एकही पान हलत नव्हतं. तुकोबा कधी येताएत आणि पानं कधी सळसळताएत. बाराही वाजले.--- बारा वाजून एक मिनिट दोन मिनिट!  झाड समाधी लावून बसलं होतं. पण अचानक एकाच क्षणाला सर्व टाळ, मृदुंग, टाळ्या वाजू लागल्या एवढ्या लाखोंच्या जनसमुदायात कोणाचा निमिषाचाही विलंब नाही वा कोणी एक सेकंदही लवकर नाही. कोणाकडे मोबाईल नसताना सार्‍यांच्या घड्याळात सारखे कसे वाजावेत? आजूबाजूच्या स्त्रिया भान हरपून अभंग गात होत्या. सारे वारकरी उभे राहून टाळमृदुंगांच्या तालावर त्यांचे ठरलेले अभंग गात होते. आम्ही एकमेकींकडे पहात राहिलो. दिसली का पानं सळसळतांना ह्या प्रश्नाला दोघींकडे उत्तर नव्हतं. कदाचित कुठला दुसरा वृक्ष असावा आपण तिसर्‍याकडेच बघत बसलो. सर्वांना अनुभव यावा आणि आपण कोरडे पाषाण असावे ह्याचा किंवा जे पहायला आलो तसं काहीच घडलं नाही त्यामुळे जरा हिरमुसले होऊन परत जायला निघालो.  गर्दीच्या प्रवाहात प्रवाह पतितासारखं चालालो होतो.

 ‘‘चला चला भंडारा डोंगरला चला ’’ म्हणत सहा सिटरवाले मागे लागले होते. ‘‘किती लांब आहे?’’ --- ‘‘सहा किलोमिटर!’’ घरी जाऊन काही फार महत्त्वाचं काम नसल्याने चला आता भंडारा डोंगर पाहू म्हणून बसलो. भंडारा डोंगरावर तुकोबांचं मंदिर आहे. तेथेच त्यांनी गाथा लिहीली असं म्हणतात. मंदिरात फारसा उजेड नव्हता. जणु काही गुहेत गेल्याप्रमाणे तुकारामांच्या मंदिरात थंडावा होता. शांत समयीच्या उजेडात तुकारामांची मूर्ती उजळून निघाली होती.  हात जोडले गेले. हातात एकतारी घेऊन कोणी बाबा कोपर्‍यात उभे राहून शांत स्वरात तुकोबारायांच्या निर्वाणाचा अभंग गात होते-----

संसाराचे अंगी अवघीच व्यसने ।

आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ।। 1 ।।

आता हे सोवळे झाले त्रिभुवन ।

विषम धोवोनी सांडियेले ।। 2।।

ब्रह्मपुरी वास करणे अखंड

न देखिजे तोंड विटाळाचे ।। 3 ।।

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ।

ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ।। 4 ।।

 

 मन निवलं. मनातील किंतु ,परंतु तात्कालिक का होईना शांत झाले. त्या क्षणी फार गर्दीही नव्हती आत. दोघी प्रसन्न मनानी बाहेर पडलो आणि कोणी तरी दोघींच्या हातात पत्रावळ ठेवली. भात होता. ‘‘प्रसाद खाल्ल्याशिवाय जाऊ नका.’’ भातासोबत प्रेमळ शब्दही आले. तिथेच कुठे बसून भात खाल्ला. असा तिखट भात घरी खाल्ला नसता पण तिथे गोड वाटला. तरतरी आली. मेंदू परत पूर्ववत विचार करू लागला आणि दोघींनाही एकदमच त्या न्यायला येतो हं सांगणार्‍या मुलाची आठवण झाली. आला नाही हं!  बर झालं आपण आपली पर्स नीट सांभाळत होतो. कोणाची काही हमी देता येत नाही. चला बस शोधायला हवी म्हणत भंडारा डोंगरावरून खाली आलो. समोर तो 14-15 वर्षांचा मुलगा उभा होता. ‘‘अरे येणार होतास नं आम्हाला न्यायला आला नाहीस?’’ आम्ही दोघी एकदम जरा रागवलो त्याला. तो हसला, भेटलो नं! प्रसाद मिळाला ना!  त्याच्या विचारण्यात आम्हाला प्रसाद मिळाला ह्याची खात्री होती. त्याला काही पैसे देऊ करावे म्हणून पर्समधे हात घालताच नको नको पैसे नको. ‘‘तुम्हाला जे पहायचं होतं ते दिसलं न!’’ म्हणून हसला. आणि निघूनही गेला. ‘‘अरे नाव काय तुझं?’’ एवढ्या गर्दीत त्याला ऐकू यावं म्हणून जरा ओरडूनच विचारलं. मागे वळून तो म्हणाला ‘‘गोपाळ!’’  गर्दीत दिसेनासाही झाला. आम्हाला बस शोधायची होती. इतक्यात समोरच बस थांबली. ‘‘चला चला पुणे मनपा!’’

दिवसभराच्या भटकंतीनी, उन्हानी, धुळीनी अंग आंबलं होतं. उन्हं कलली होती. घरी पोचताच मस्त गार पाण्यानी डोक्यावरून शंभो करून ताजी तवानी झाले आणि अचानक विचारांचे दुवे कुठे कुठे जोडले जाऊ लागले. अरे!! आपल्याला  सोहळा कुठे आहे हे माहित नव्हतं.--- आपल्याला झाडाखाली बसवायला कसा काय तो मुलगा हजर झाला?  इतक्या गर्दीत कुठेच जागा नसताना दोघींनाच बसता येईल एवढी जागा कशी काय होती? ---- त्या मुलाने परत न्यायला येतो सागितलं? ----अऽऽहं परत भेटतो म्हणाला--- आपण त्याला रागावलो ही! पण सहा कि.मि वर च्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी इतक्या गर्दीत त्याने परत कसं शोधून काढलं आम्हाला? प्रसाद घेऊन जा म्हणाला होता. बाकी लोक प्रसादासाठी लांबच लांब रांगेत उभे असताना कोणी दिला प्रसाद? तो तिखट कोरडा भात गोड कसा वाटला? तेथील पायर्‍यांवर बसून सगळा खाल्ला! त्या मुलाला कसं कळलं की आम्ही प्रसाद घेतला? नंतर पैसेही घेतले नाहीत. जातांना त्यानी त्याचं नाव काय बर सांगितलं? आठवत कसं नाहिये---- हं! गोपाळ! -------- काय गोपाळ? ------ आणि मनात काही तरी प्रचंड उचंबळून आलं. अरे!!! तेथे जमलेल्या सार्‍या वारकर्‍यांच्या हृदय वृक्षाची  पल्लवं एकदम हलली आणि त्यांनी सर्वांनी त्या एका क्षणाला टाळमृदुंगांचा गजर केला---!! आपल्या मनातील संशयपिशाच्चाला तो क्षण कळलाच नाही----!! अरेरे!! मनात कसला कल्लोळ माजला होता मलाच कळत नव्हत. सूर्य अस्तास गेला तरी कितीवेळ मी अंधारतच बसले होते. मन सुन्न झालं होतं. इतक्यात बेल वाजली.  दिव्याचं बटण दाबत दरवाजा उघडला तर मैत्रिण समोर उभी होती. डोळ्यातून अश्रुमाला झरत होत्या. जे प्रश्न मला पडले होते तेच ती परत मला ऐकवत होती. तुकोबाराय भेटावेत आणि आपण त्यांना ओळखूही नये----! एक दिव्य क्षण भेटूनही हुकल्याची जाणीव मनाला व्यथित करत होती.

-----------------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा

ललित लेख (अनुक्रमणिका)