बांबू फुलला

 बांबू फुलला

1999 -2000 साल असेल. अकोटहून कोलखासला जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं जंगल अनेक प्राण्यांचं निवासस्थान होतं. मधुन मधुन स्वतःच्या ताकदीच्या मस्तीत वावरणारे रानरेडे वा गवे कळपामधे फिरत होते. काही चरत होते. काही आपल्याच मस्तीत जातांना त्यांच्या शिंगांवर त्यांनी उकरलेलं गवतही अडकलेलं दिसत होतं. एखादा नर हरीणही डोक्यावर केशभूषा वा पुष्पभूषा केल्यासारखा शिंगांवर अडकलेल्या वेली घेऊन तोर्यात चाललेला, बाकी हा बघा, तो बघा असे चुटपुट प्राणी बघे बघे पर्यंत पळून जात होते. मग त्यात कोल्हे, भेकरं, हरणं, शेकरू अमुक तमुक प्राणी अणि पक्षीही होते. मर्कटांना माणूस जवळचा असतो असं डार्विननीच सांगून ठेवल्यामुळे मर्कटांच्या चेष्टा, माणूस पाहूनही आपलेपणाने सुरू होत्या.
पानांवरून खुसफुस झालं की कान टवकारून, डोळ्यात आधीच तेल घालून सज्ज असल्यासारखे आम्ही बघत होतो. वाघ दिसायला बरच नशिब लागतं म्हणे. मी येणार आहे हे कळताच वाघ त्याच्या गुहेत लपून बसतो अशी माझी खात्री आहे. मग कुणाचे पाणवठ्यापाशी उमटलेले पंजे, खूरं पाहून हे अस्वल, हा वाघ असं जे जे काय सांगतील ते मी कौतुकाने पाहून घेते. हा पायाचा लांबट ठसा बघा ! हा वाघिणीच्या पंजांचा आहे. त्या ठशामागे बघा लहान ठसेही दिसताएत. वाघीण तिच्या छाव्याला घेऊन आली होती. प्रत्यक्ष वाघ माझ्यासमोर दत्त म्हणून ठाकल्यावर होणार्या माझ्या प्रत्यक्ष ``रनिंग कॉमेंट्री’’पेक्षा मला ही नंतर सावकाशपणे सांगितलेली रनिंग कॉमेन्ट्री आवडते. प्रत्यक्ष वाघ समोर ठाकण्यापेक्षा आधी वा नंतरच येऊन गेलेला बरा. त्याने पाणवठ्यावर त्याचा घसा निःशंक ओला करावा आणि आपलाही घसा त्याला पाहून कोरडा पडू नये ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. येता जाता घरात सारखं डोकावून जाणारा शेजारी एखादयावेळी दरवाजातून डोकावतांना सापडला तर त्याच्या तोंडावर दरवाजा खाडकन आपटला जावा त्याप्रमाणे अपण वाघोबाच्या जंगलाच्या घरात त्याला असं डोकावून पाहतांना एखाद्यावेळी तरी त्याला राग येणाच की. मग त्याने अंगावर उडी घेतली म्हणून त्याला का नावं ठेवायची? त्यापेक्षा त्याला सुखात राहू द्यावं हे बरं.
जंगलातून झाडं पहात जायला मात्र मला आवडतं. गाडीतून जातांना सार्या तरुवरांचे बुंधेच बुंधे नजरेसमोरून मागे धावत राहतात. त्यांच्या खोडांचे गडद काळ्या पासून पांढर्या शुभ्र पर्यंत विविध रंग, त्यांच्या खोडावरील वेगवेगळ्या नक्षी, वळ्या, रेघा, गुळगुळीतपणा, कधी खोडाच्या लोंबणार्या साली, कधी त्यांच्यावरील छोटे मोठे पडलेले डाग; प्रत्येकाचा वेगवेगळा पोत--- सारं सारं त्या रानाचं एक व्यक्तिमत्त्व आकाराला आणत असतात. सलाई, चारोळी, डिकेमाली, कळलावी, दीपमाळ, मोह, गराडी, रक्तचंदन, भेर, माहूर, टेंभुर्णी, लेंड्या, बेहडा, भुत्या किंवा कौलु, अनेक प्रकारचे बांबू इत्यादि अनेक प्रकारच्या झाडांनी आकाराला आलेलं हे जंगल, पश्चिम घाटातल्या जावळीसारखं घनदाट नसलं तरी फार आनंददायी आहे. मधून मधून दिसणारं किंवा पानापानांमधून गाळून येणारं निळं आकाश जंगलाला भयाण, एकाकी बनवत नाही. मधुनच दिसणारं भुत्याचं पांढरंशुभ्र खोड सकाळी तरी गोर्या मडमेसारखं वेगळं उठून दिसतं. रात्री वाटत असेल भुतासारखं!
आम्ही अकोटच्या वाटेला लागण्यापूर्वीच ड्रायव्हर म्हणाला होता, ``अकोटच्या जंगलात बांबू फुलावर आलाय. बांबूला फुलं आली आहेत. 50- 60 वर्षांनी बांबूला फुलं येतात. बांबूचं फुलावर येणं हेही म्हणे संसर्गजन्य असतं. म्हणजे, एका जंगलात एक बांबू फुलला की त्या जंगलातील सर्व बांबू तर फुलतोच पण आजूबाजूच्या जंगलांमधलाही बांबू फुलतो. ’’ 50-60 वर्षांनी घडणारी घटना म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला एकदाच अनुभवता येणार असल्याने बांबूच्या फुलांचं कुतुहल मनात होतं.
बांबूचं एक बेट आल्यावर ड्रायव्हरनी गाडी थांबवली. खरच बांबू फुलला होता. नखशिखांत फुलला होता. फुलं रंगित नसली तरी बांबूच्याच रंगाचे फिकट पांढरट, पिवळट फुलांचे तुरे कांडाकांडातून, पेर्यापेर्यातून फुटले होते. सार्या जंगलात बांबू अंगोपांग फुलला होता. आनंदला होता. तसं पाहिलं तर बांबूचं झाड हे कायम हसरं आणि आनंदीच वाटतं. फुल आल्यावर तर आनंदानी मुसमुसत असल्यासारखं वाटलं. थोड्या फुलांच्या काड्या घेऊ या का बरोबर? मी तोडायचा प्रयत्न केला पण दोर्याएवढी पातळ काडीही इतकी चिवट की हातानी तुटणारी नाही. शेवटी जवळ असलेल्या कुठल्यातरी चाकू प्रकारातील आयुधाने दोन चार काड्या तोडल्या, आजही एखादी काडी एखाद्या पुस्तकात 100 व्या पानावर असेल.
``पण --- बांबूला फुलं येणं चांगलं मानत नाहीत. बांबू फुलला की बांबू मरतो.’’ बरोबरचे ऑफिसर सांगत होते.
``म्हणजे एवढ सगळं बांबूचं जंगल मरणार? ‘’
``हो पण त्याच्या खूप बिया वार्याबरोबर रानभर पसरतील रुजतील आणि पुन्हा बांबू उगवेल. ‘’
तर ----- मरण- जननाचा खेळ वेळूच्या बनालाही सोडत नाही.
``त्याबरोबर अजूनही एक धोका असतो. बांबूच्या बीया उंदरांचं खाद्य असतात. त्यामुळे उंदरांची संख्याही वाढते असं म्हणतात.’’
पुढचं पहायला आम्ही तेथे राहिलो नाही. पण मरणापूर्वीही अंगोपांग फुलून येणारा आनंदी बांबू मनात कायमचा फुलला.
------------------
लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)