श्री गणेशाय नमः

 

             अर्पण पत्रिका -

            ज्या ज्या भारतीय पूर्वजांनी आजचं सुंदर मॉरिशस उभारण्यासाठी आयुष्य  खर्ची घातली, ज्या आपल्या परिवाराला सुखी करण्यासाठी ते इतक्या दूरवर येऊन राबराब राबले, तो त्यांचा प्रेमळ परिवार---- ती त्यांची मातृभूमी, तो भारताचा किनारा ज्यांना परत कधीच दिसला नाही. भारताचं स्वप्न बघता बघताच ज्यांची आयुष्यच संपून गेलं त्या माझ्या भारतीय बांधवांसाठी हे पुस्तक सादर अर्पण

मॉरिशसच्या अंतरंगात

              दोन शतकांपूर्वी भारतीय संस्कृतीचं बीज मॉरिशसच्या खडकाळ मातीत जाऊन पडलं. तेथील खडक फोडून ते तिथे रुजलं. नुसतच रुजलं नाही तर भारताच्या मातीतून आपल्या हृदयदलांमधे भरून नेलेल्या भारतीय संस्कृतीच्या वारशावर ते फोफावलंही. मॉरिशसच्या मातीचे, पाण्याचे गुणही त्याने आत्मसात केले. अंगावर आलेल्या अनेक संस्कृतींच्या वादळांशी तोंड देता देता त्याच्या जुन्या फांद्यांची पडझडही झाली.  परत जोमाने नवी पालवी फुटली. आज सुंदर दिसणार्या मॉरिशसला सुंदर करण्यासाठी झिजलेली आयुष्य, त्यांच्या कष्टांची ती गाथा, त्यांच्या यशाची कहाणी, मॉरिशसच्या लोकांच्या अंतरंगात त्यांनाही कळत तेवणारी भारतीयत्वाची मंद ज्योत आणि मॉरिशियन लोकांच्या चालण्या, वागण्या, बोलण्यावर पडलेला भारतीय संस्कृतीचा मंद प्रकाश तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात मला ठायी ठायी जाणवत होता.

                  `मॉरिशसमधे नुसता दगड हलवला तरी दगडाखाली सोनं सापडतं' ह्या इंग्रजांच्या भूलथापांना भुलून आपले जे पूर्वज तेथे पोचले त्यांच्या हाती जरी सोनं गवसलं नाही तरी त्यांच्या कष्टांमधून ते पुढच्या पिढ्यांसाठी जमिनीतून उगवलं. ह्या अनिवासी भारतीयांनी प्रयत्नपूर्वक जपलेल्या भारतीय संस्कृतीचं अनमोल लखलखीत सोनं मला मॉरिशसच्या दोन वर्षांच्या मुक्कामात वारंवार हाती लागत राहिलं आणि मोठ्या खजिन्याचा तो अंशही मला आश्चर्यचकित करत राहिला.

                दोनशे वर्षांपूर्वी भारतातून मॉरिशसमधे आलेले आप्रवासी भारतीय भारतातून भारतीय संस्कृती घेऊन गेले खरे पण काळ आणि अंतर यामुळे ते आपल्यापासून दुरावले. तरीही त्यांच्याबरोबर झालेल्या प्रत्येक भेटींमधून आपलच प्रतिबिंब आपणच पहात असल्यासारखं मला वाटत राहिलं. आपणच आपल्यापर्यंत पोचल्याचा, आपणच आपल्याला भेटल्याचा प्रत्यय येत राहिला. जेंव्हा जेंव्हा मॉरिशसच्या अंतरंगात डोकवायला मिळालं तेंव्हा तेंव्हा ते चार क्षणही मॉरिशसच्या बाह्यरंगापेक्षा मला अंतर्मुख करून गेले. पेरलेली बीजं मातीने झाकल्याने दिसत नाहीत पण अचानक उगवून जमिनीबाहेर आली की  अरेच्च्या! म्हणून त्यांचा पत्ता लागतो तसं एवढ्याशा  मॉरिशसमधे दोन वर्ष राहूनही संपूर्ण मॉरिशस पाहून झालं असं कधी वाटलच नाही. दरवेळेस काही तरी नवीन आकर्षण सापडत असे. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित. मॉरिशसवर निसर्गाचा वरद हस्त आहे. अनपेक्षितपणे कल्पनाही करू शकणार नाही असा निसर्ग किंवा घटना समोर येऊन उभ्या राहत. मॉरिशसचं अंतरंग माझ्या अंतरंगात उमटत जाई.  माझ्या मनात उमटलेलं मॉरिशसचं चित्र तुम्हाला दाखवतांना अनेक गोष्टी सुटून गेल्या, काहींना पानांच्या मर्यादा सांभाळण्यासाठी सोडून द्यावं लागलं

                 आपलं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसावं म्हणून आपण आरसा पुसून लखलखीत करून ठेवतो. त्याप्रमाणे भारतातून जगभर बाहेर गेलेल्या भारतीय लोकांबरोबर असलेले संबंध परत चकचकीत करून त्याला उजाळा द्यायची आवश्यकता आहे. त्यातून आपणच आपल्याला भेटणार आहोत. अगदी वेगळ्या स्वरुपात. आपल्याला पाहून आपणच चकित होऊन जाऊ. हरखुन जाऊ. आपलाच एखादा नवीन पैलू आपल्याला आश्चर्यचकित करेल. रसिक वाचकांसमोर हे मॉरिशसचं अंतरंग उलगडून दाखवावं एवढा एकमेव उद्देश मनात ठेऊन केलेला हा लेखन प्रपंच. मॉरिशसवर अनेक पुस्तकं लिहीली गेली. त्यातील अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. अनेक आपण वाचलीही आहेत. पण बाकीच्या कुठच्याही पुस्तकात तुम्ही वाचलं नसेल असं मॉरिशस आज मी तुमच्यापुढे ठेवत आहे. तुम्ही मॉरशसला जाऊन आला असला तरी तुम्हाला जे मॉरिशस अज्ञातच आहे ते मॉरिशस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जे मॉरिशस ऐकलं असेल त्याच्यापेक्षा वेगळं मॉरिशस मी तुम्हाला ऐकवणार

 आहे.

-----------------------------------------------

 Flag of Mauritius          

 

Coat of Arms: 

("Star and Key of the Indian Ocean")

 

              

 

1 मुंबई  ते मॉरिशस

   विषुववृत्त ओलांडले-           

 4700 कि.मी. अंतर विमानाला पार करायचं होतं. अर्धअधिक अंतर पार झालं होत. घड्याळाकडे नजर टाकली. मुंबई सोडून अडिच तीन तास झाले असावे. मी विमानातल्या टि.व्ही. च्या पडद्याकडे नजर टाकली. परत एकदा मुंबई मॉरिशस प्रवासाचा आराखडा दाखविणारा नकाशा दिसू लागला. भारताच्या पश्चिम किनार्यावर मुंबईच्या ठिपक्यावर विमानाची जागा, स्थान दाखविणारा लाल बाण निळ्या समुद्रावरून पुढे सरकत सरकत विषुववृत्तावर येऊन पोचला होता . विमान विषुववृत्त ओलांडत असल्याची घोषणा झाली.     

           जहाजाने प्रवास करतांना विषुववृत्त ओलांडतांना एक गंमतशीर परंपरा पाळली जाते. एखादा  खलाशी वरुणाचा पोशाख करतो. वरुणराजाच्या दरबारात जहाजावरील प्रवाशांना बोलावलं जातं. जहाजाच्या कप्तानाने जहाजातील सर्वांना खूप दिवस समुद्रात फिरवलं, प्रवास करायला लावला . . आरोप त्याच्यावर ठेऊन शेवटी वरुण महाराज निकाल देतात. जहाजाच्या डेकवर पाणी भरुन ठेवलेल्या टबमधे कप्तानाला तीन वेळा डुबक्या देण्याचा वरुणराजांचा आदेश निघतो. त्यानुसार कप्तानाला टबमधील पाण्यात तीन डुबक्या देता देता सर्वांनाच डुबक्या देऊन जलपंचमीचा उत्सव होऊन जातो. आमच्या नौदल आणि इतर सहकार्यांनी सांगितलेली परंपरा आठवत होती. अर्थात विमानात हे काही शक्य नव्हतं. पण ती काल्पनिक रेघ पहिल्यांदाच ओलांडल्याच अप्रूप मनात भरून राहिलं.                       

                  बघता बघता साडेपाच तास संपले. आमचं विमान थेट दक्षिण गोलार्धात आफ्रिका खंडाच्या जवळ येऊन पोचल होतं. आफ्रिकेशेजारी असलेल्या मादागास्कर बेटाशेजारी मॉरिशसचा लहानसा ठिपका लुकलुकत होता. मॉरिशसच्या पूर्वेला भाररताच्या बाजूला मॉरिशस पासुन बर्यापैकी लांबवर त्याच्यापेक्षा अजून फिका आणि लहान असा दुसरा ठिपका दिसत होता. तो स्वतःला रॉड्रीग्ज म्हणवून घेत होता. मॉरिशस आल्याची उद्घोषणा झाली.  खिडकीची पापणी वर उचलून पाहिली. सगळीकडे ढगांचे गठ्ठे पहुडलेले!

        भराभर बॅगेतून कॅमेरा उपसून काढला. विमानात बसतांनाच मिळालेलं Embarkation and Disembarkation card तेंव्हाच  भरून ठेवलं होतं. कॅमेरा खिडकीला लावून ढगांमधून मोकळी जागा मिळताच खालचं दृश्य टिपण्यासाठी On your marks----! च्या Position मधे मी! हे ढगांचे गठ्ठे दूर व्हायला तयार नाहीत. उलट खिडक्यांवरतीच जपानी त्सुमो सारखे धक्के मारताएत. पाणबुडीला देवमाशांनी घेरून सर्व बाजूंनी फिरून चावे घेता येता आहेत का ते पहावं असं ढगांच विमानावर आक्रमण चाललं होतं.  विमानानी खाली यायला सुरवात केली आणि आता पर्यंत अतिशय सुखात तरंगणारं विमान खडबडीत रस्त्यावर आल्यासारखं  वाटायला लागलं. कानांवरचा हवेचा दाब वाढायला लागला होता. हातातला कॅमेरा प्रतिक्षेत-`आऽऽ हा हा! - थोडेसे ढग दूर झाले. - - एक क्षण ---एक क्षण --- खाली मैलोन्मैल हिरवीगार सपाटी. वरतून हिरवळ भासतीए. -- नाही नाही शेती वाटतीए. --ऊस!-ऊसच असणार बहुधा! -वाचलं होतं मॉरिशस विषयी!--छे !! परत ढग! फिरून ढगांचा घेराव! उगीच लहानपणची आठवण झाली. लहान असतांना गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर आधी गणपतीची सजावट आणि वेगवेगळी दृश्ये, देखावे तयार होत असत. आतल्या काम करणार्यांच्या रागवण्याकडे दुर्लक्ष करून, पडदा बाजूला सारून आत डोकावयाला जे कुतुहल आम्हा मुलांना वाटायचं,  ते नंतर पुढचे दहा दिवस तोच गणपती, तोच देखावा पाहून टिकत नसे. लग्नानंतर कितीही वादावादी होऊन एकमेकांच तोंडही बघू नये असं वाटलं तरी अंतरपाट दूर होण्यापूर्वी पलिकडचा चेहरा टिपण्यासाठी डोळे अधीर असतातच. तसच काहीस हे समीकरण होत. पुढचे दोन वर्ष आमचा `मुक्काम - मॉरिशस' होता पण मॉरिशसच प्प्या टप्प्यांनी होणारं दर्शन माझी उत्सुकता अजून अजून वाढवित होतं. खिडकीला नाक लावून कलती मान करून थोडसं मागे पहायचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत विमानाच्या पंखांनी जमिनीशी केलेली  समांतर दिशा सोडून किंचित जमिनीची दिशा तर विमानाच्या शेपटीनी आकाशाची दिशा धरली होती. ढगांमधे नाक खुपसून विमानानी खाली डाईव्ह मारला. व्वा - - व्व!  क्लिक! - क्लिक!!  क्लिक्!!! हिरवळ,पाणी, समुद्र, तलाव, ढग, दिवाळीच्या किल्यात मांडून ठेवल्यासारखी हिरवळीतली घरं- - तुरळक पुंजक्यांमधे..... तीही धाब्याची,  हिरव्या विस्तीर्ण सपाटीवर आणून बसविलेले एकटे दुकटे डोंगर, हिरवळीतून बोट फिरवत आखत जाव तसा लांबवर जाणारा रस्ता,

        हो म्हणजे रस्त्यांच जाळं नव्हे  मोजकेच थोडेसे रस्ते, सकाळचे सात वाजले असतील. तुरळक गाड्या रस्त्यावरून पळत होत्या.  त्रिशंकूसारखे मधेच लोंबकाळणारे ढग! विमान खाली खाली येत होत तसं बेटभर दिसणारी ती हिरवळ हिरवळ नसून ऊसाची शेती आहे हे जाणवायला लागलं. मघाशी embarkation card मधे प्रवाशांना बाहेरच्या देशातून  agricultural products आणि त्यातही ऊस मॉरिशस मधे आणता येणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली होती त्याची कारण मीमांसा खाली दिसत होती.

                  समुद्राच्या गडद आणि फिक्या हिरव्या-निळ्या, मोरपंखी छटांनी हिरव्या सानुल्या  बेटाला हळुवारपणे मांडीवर घेतलं होतं. विमानानी जमिनीवर पाय टेकविले आणि पळायला सुरवात केली. कोळीणीने मासे मांडून ठेवावेत तशी कोपर्यात थोडीशी विमानं मांडून ठेवली होती.त्यांच्या शेपट्यांवरून त्यांची जातकुळी आणि ती कुठल्या समुद्राला पार करून आली होती ते कळत होतं.

दक्षिण गोलार्धात रामगुलाम शिवसागर विमानतळावर -

                    `Ramgoolam Shivoosagur Airport' रामगुलाम शिवसागरचं शक्य तेवढं लांबलचक स्पेलिंग! एअरपोर्ट मात्र आटोपशीर, टुमदार! मिया मुठभर दाढी हातभर असा! विमानचालकानी निरोप घेतला. विमानाला लावलेल्या जिन्यावर पाऊल टाकलं आणि कडक ऊन आणि थंडगाऽऽर वारं यांनी हातात हात घालून स्वागत केलं. काय गम्मत होती! मी  डिसेंबर 13, 2004 ची पहाट उत्तर गोलार्धातील मुंबईची उकडती थंडी पाहिली तर थंड वार्याची उन्हाळी सकाळ दक्षिण गोलार्धातील मॉरिशस मधे अनुभवत होते. एकाच दिवशी भारतातील थंडीचा ऋतु पाहून मॉरिशसचा उन्हाळा बघत होते. विषुववृत्ताची एक रेघ  आणि विमानाचा एक ठिपका ह्यांनी माझी दुनिया अक्षरशः इकडची तिकडे करुन टाकली होती. ढेरपोट्या माणसाच्या पोटावर फिरणार्‍या मुंगीला त्याच्या पोटावरील बेल्टवरून खाली उतरल्यावरच त्याच्या पावलांचं दर्शन व्हावं, तसं मला विषुववृत्त पार केल्यावरच दक्षिण गोलार्धाचं दर्शन होणार होतं.

 

प्रवीण दीक्षितांची मॉरिशसला नेमणूक -

                ह्या सर्वांबरोबर अजून एक मुद्दा होता तो म्हणजे मॉरिशस सरकारने केलेल्या विनंतीनुसार, मॉरिशसच्या सरकारचा सल्लागार म्हणून प्रवीणची नेमणू मॉरिशसला झाली होती. भारत सरकारचे `कार्मिक आणि प्रशिक्षण' विभागाचे (Department of Personnel) चे प्रमुख, सचिव श्री. टंडन मॉरिशस भेटीसाठी गेले असता मॉरिशस सरकारने सांगितले की, आमच्या शासकीय कर्मचार्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा नक्की करण्यासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. परंतु अनेक देशांकडून मदत घेऊनही त्यांना ते शक्य होत नाही तरी त्यांना ह्या कामात भारताने मदत करावी. तेंव्हा भारतातील सर्व शासकीय प्रशिक्षण केंद्रातून उत्कृष्ट इच्छुक अधिकार्यांमधून चार अधिकारी निवडण्यात आले. त्यांचा समन्वयक म्हणून यशदा पुणे येथे काम करत असलेल्या प्रवीणची निवड करण्यात आली. प्रवीण मॉरिशसला आधी पुढे गेले होता. मी आठ दिवसांनी जाणार होते  प्रवीण मॉरिशसला पोचल्यावर त्याच्या स्वागतासाठी तेथील सेक्रेटरीने खास कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी खास मंत्रीमहोदयही आले होते. कार्यक्रम सकाळी नऊ वाजता असला तरी मंत्रीमहोदयांसकट सर्वजण पाच मिनिटे आधीच उपस्थित होते. सेक्रेटरीने प्रवीणची वेगवेगळ्या अधिकार्यांशी ओळख करून दिली. मॉरिशसमधे प्रत्येक ठिकाणी विना अडचण जाता यावे या साठी त्याला एक ओळखपत्रही त्यांनी बनवून दिले.

जादूची गाडी -

              आज प्रवीण मला न्यायला  विमानतळावर येणार होता. विमानाच्या जिन्याच्या पायर्‍या उतरून मी प्रवासी नेणार्‍या बॅटरीवर चालणार्‍या पांढर्‍या गाडीत जाऊन बसले. मागोमाग येणार्‍या गर्दीत झगमग साड्या, पंजाबी सूट, ओढण्या, मंगळसूत्री, कुंकु, टिकल्या इत्यादि भारतीय परंपरांचे उठावदार फलकारे लक्ष वेधून घेत होते. भारतातील कपड्यांच्या रंगांपेक्षा झगमग आणि चमचम आणि उठावदार रंगांची निवड जरा जास्त जाणवली. चेहरे भारतीय वंशाचे आहेत हे कोणी वेगळं सांगायला नको. स्मिताला पलिकडून स्मिताचा प्रतिसाद येत होता. इमिग्रेशन आटोपलं. मी सामान शोधायच्या आधीच Conveyor belt वरचं सामान ट्रॉलीवर चढवून हसर्‍या चेहर्‍यानी प्रवीण स्वागताला हजर होता. ‘जादूची गाडीसेवेसी हाजिर होती. हो! म्हणजे चालकाचं नावच, `जादू'! ``नमस्ते मादाम!'' जादूच्या हिंदीवरची स्थानिक फ्रेंच भाषेची जादू जाणवत होती. प्रयत्नपूर्वक जपलेल्या त्याच्या हिंदीचं कौतुकही वाटलं. स्वच्छ लांबच लांब रस्ता, खड्डे नाहीत , नियम तोडणं नाही, ट्रॅफिक जॅम नाही; सगळं कसं सुखदं वाटत होतं. रस्त्यावरच्या कडेला लावलेल्या जाहिराती  का बरं वाचता येत नाहीएत? प्रयत्न करूनही साधत नव्हतं. ओऽह!  त्या फ्रेंचमधे लिहिल्या होत्या. त्यातल्या त्यात वाचता येणार्‍या जाहिराती  म्हणजे  Red Cow Milk.  या दूध पावडरच्या जाहिराती सगळीकडे झळकत होत्या. त्या वाचता येत होत्या. सोबत तांबू गायीचं चित्र. भारतात कोणी `देशी तांबू गायीचं किंवा काळ्या कपिलेचं दूध' अशी पाटी लावली तर लोकं फिरकणार नाहीत.  आपल्याला आपलं जर्सीचच कौतुक. आत्तापर्यंत आम्ही Plesance प्लेजॉन्स (एस् चा उच्चार ज होतो)एअरपोर्ट ते  QuatreBorne क्वात्र बोन 40 कि.मी. च अंतर सहजगत्या पार करून आलो होतो.

     

 

2 Hotel Gold Crest

हॉटेल गोल्डक्रेस्ट

सें जाँ (Saint Jean) रस्त्यावर भर बाजारात उभं असलेलं हॉटेल! जादूची गाडी पोर्च मधे थांबली.  इथेच आमची तात्पुरती रहायची सोय केली होती. बहुतेक सारे भारतीय, समुद्रकाठच्या एकाकी हॉटेल्स पेक्षा येथे राहणेच पसंत करतात. मलाही कल्पना काही वाईट वाटली नाही. समुद्राच्या किनार्यावर मासळीसारखं एकाकी वाळत पडण्यापेक्षा बाजारात विंडो शॉपिंगला बरेच तास मिळणार होते. प्रवीण ऑफिसला गेल्यावर काय करायचं प्रश्न नव्हता. प्रवीणला ऑफिसला जायचं होतं. “चल चल लौकर आटोप! नाश्ता करून घेऊप्रवीण घाई करत होता. पटकन एक अघोळ मारून कपडे बदलून डायनिंग हॉलमधे गेले. अमेरिकेच्या अनुभवानी जे व्हेजिटेरिअन म्हणून पुढे येईल ते पोटात घालायच्या तयारीनीशी गेले होते. पण इथे चक्क आनंददायक प्रकार होता. सालं काढलेल्या संत्र्या मोसंब्याच्या गोल गोल चकत्या, कलिंगड, खरबूज, सफरचंदाच्या फोडी, वेगवेगळ्या फळांच्या रसांनी भरून ठेवलेले काचेचे जार, स्टॉबेरी योगर्ट, वेगवेगळे ब्रेड,पराठे, छोले, पिवळ्या रंगाच्या बीन्सची राजमाप्रमाणे स्वादिष्ट उसळ, अंडी दूध, कॉर्न फ्लेक्स, सँडविचेस- - -! विमानातल्या तथाकथित `व्हेजिटेरियननंतर हा प्रकार फारच सुखदायक वाटला. आजूबाजूच्या टेबलांवरही भारतीय चेहरे बसलेले दिसत होते. पलिकडच्या टेबलांवरून डोळे आम्हालाच न्याहाळत होते. नजरांची भाषा प्रत्येकालाच उमजली. आणि थोड्याच वेळात सारेच एकमेकांपाशी आले. ``मी कवात्रा'', ``मी श्रीनिवासन्''  ``मी हिरेमठ'',``मी लक्ष्मी नारायण़'', ``मी दीक्षित'' भारतीयांची एक गोलमेज परिषदच भरली. ``ही माझी पत्नी अनुराधा श्रीनिवासन्!''  ``मी अरुंधती''. पहिल्याच दिवशी एक मैत्रीणही मिळाली. मी खूश झाले. ह्या सार्या भारतीयांची मॉरिशस सरकारने त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागात सल्लागार म्हणुन त्यांची निवड केली होती. सव्वाआठच्या ठोक्याला नवरे कामाला गेल्यावर आम्ही दोघी भटकायला मोकळ्याच होतो. तयार व्हायला दोघी आपापल्या खोल्यांमधे गेलो.

करुणा -

              ``नमस्ते मादाम, मैं करूणा हूँ आप कैसी हैं? आपकी यात्रा कैसी हुई? मुझे भारतीय लोग बहुत पसंद हैं।'' छगन कमळ बघ. विमल गगन बघ. असं पहिलीचं छापिल पुस्तक वाचल्यासारखी करुणा बोलत होती. करुणा बेड्स लावत होती. ``अरे वा तुझं नाव तर छान आहे. हिंदी पण छान बोलतेस.'' ``हाँ मादाम मैं हिंडू हूँ। (हिंदू मधील चा झुकाव कडेच जास्त होता.) तो हिंडि आनी चाहिऐ नं?'' आपण हिंदू आहोत हे ती किती अभिमानानी सांगत होती! आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला हिंदी यायला पाहिजे हा तिचा अट्टाहास मला अवाक करुन गेला. आम्ही इंग्रजीची टोपी डोक्यवर चढावी म्हणून किती तडफडतो. `साऊथ मुंबई'च्या दुकानांमधे तर काउंटरवरच्या मराठी, हिंदी पोरी `I don't know Maraaathi. Speak in English.' म्हणत माझ्या मराठी बाण्याचा रोज त्रिफळा उडवत होत्या. माझ्या घरी काम करणार्या बाई आणि बाईंची मुलं सुद्धा  इंग्रजी येवो किंवा येवो पण  मम्मी पप्पा, थ्यँकू च्या वेडाने झपाटली होती. शाळेत जाणारं प्रत्येक पोर इंग्रजीच्या पावन गंगेत बुचकळून काढलच पाहिजे आणि आयुष्यभर आत मधे पाक शिरलेल्या चिरोट्यासारखं फक्त सॉरी थँक्यूत निथळत राहिल पाहिजे ह्या वेडाने भारतात सरकारचे सर्व अधिकारी इरेला पडलेले असतांना इथे भारताच्याही बाहेरची ही मुलगी ``मादाम मैं हिंडू हूँ। तो हिंडि आनी चाहिऐ नं?'' असं तळमळीने सांगत होती. एवढ्या सरळ स्वच्छपणे `मैं हिंडू हूँ ' हे एक छोटसं वाक्य उच्चारायला आमच्या देशात आम्हाला किती वेळेला आजूबाजूला पहायला लागतं! ``मैं यहाँ के स्कूलमें हिंडी पढाती थी।'' माझी विचारमालिका मधेच तोडत करुणा बोलत होती. भारतीय हिंदीची दिंडी मॉरिशसच्या शाळांपर्यंत पोचवणं नक्कीच सोपं काम नाही ह्याची पहिल्याच दिवशी मला तितकिशी जाणीव झाली नव्हती त्यामुळे तिची ही अशी ` हिंडीकी दिंडी' हॉटेलातच बरी असं वाटून मी तिला विचारलं, ``स्कूलमें पढाना क्यों छोड दिया?'' मला वाटलं तिची `ही अशी' हिंदी शाळेत चालणंही कठीणच आहे त्यामुळे असेल. पण उत्तर वेगळच आलं; ``स्कूलसे यहाँ ज्यादा पैसे मिलते हैं !'' एकंदर भारतीय आणि मॉरिशन शिक्षकांच्या माथी सारखाच वनवास आहे.

 ``आपके पटी - -`` ( हं ! बहुधा तिला पती म्हणायच असावं )--काय पऽऽती? दुसर्या क्षणी मी दचकलेच. माझे डोळे विस्फारले गेले. दुसर्या देशात - -  ते सुद्धा पती वगैरे म्हणजे फारच झालं.  - - ``बहुत सज्जन हैं।'' आता मात्र मला भोवळ आल्यासारखं वाटायला लागलं. आपण इंडियन एअरलाईन्स ऐवजी पुष्पक विमानातून थेट द्वापार युगात तर पोचलो नाही ना?  ``आप यहाँ नही थी तो उन्होने कभी मुझसे गलत व्यवहार नहीं किया'' व्यवहार हा शब्द माझ्या मनातल्या मनात अधोरेखीत झाला. नवर्याच्या बाबतीतला इतका प्रशंसनीय उल्लेख ऐकून, कालच ती `नवरा माझा गुणाचा' सिनेमा तर नाही पाहून आली असं वाटायला लागल. पण एकंदर माझी कळी खुलली खरं! ``का ! इथे कोणी तुम्हाला त्रास देतात का?'' ``हाँ मॅडम ये गोरे आते हैं ; वो अकेले है तो, एक रातके लिए कितना पैसा लोगी पूछते हैं। कभी तकलीफ भी देते हैं। दारूका नशा हैं तो बहोत बचना पडता हैं।'' माझं लक्ष तिच्या बेड्स लावण्याकडे होतं बेडस् किती कौशल्यपूर्ण रीतीने लावता येतात ते पहायला छान वाटत होतं.

                  खोलीला बाल्कनी होती. करुणाची खोली आवरून होईपर्यंत बाल्कनीतून मॉरिशस निरखत उभी राहिले. सगळा भूभाग सपाट. नजरेत भरेल इतका हिरवागार. क्षितिजाला टेकलेलं निळशार आकाश. बर्याच वर्षात असं जमिनीला येऊन मिळालेलं क्षितीज पाहिलं नव्हतं. पर्वतरांगा नव्हत्या पण अधून मधून सह्याद्रिच्या सुळक्यांचे काही भाऊ इकडे येऊन राहिले आहेत असं वाटतं होतं. त्याच निधड्या छातीचे ! ड्युक नोजचे चार पाच भाऊही लांब नाकं सावरत, पोलादी छाती पुढे काढून उभे होते. ढगांनी गर्दी केली होती त्यांच्या डोक्यावर. अधूनमधून उतरत्या कौलाची थोडीशी घरं सोडली तर बहुतेक घरं  बंगलेवजा पण धाब्याची. घराघराच्या अंगणातून लिची, आंबा नारळ,पांढरा चाफा जास्वंद डोकावत होती. लिचीची झाडं लिचींनी लगडली होती. ``इतक्या स्वच्छ मॉरिशस मधे झाडांवरती मात्र भरपूर प्लॅस्टिकच्या पिशव्या वार्यानी उडून अडकून का बर बसल्या आहेत?''  ``नहीं! वो लगाया है। रातको फ्रुट बॅट्स आकर सब लिची खा जाते हैं ना! ये हवासे उडते है तो उनमेसे आवाज आती हैं! तो वे डरकर उनके पास नही जाते हैं।''  करुणानी मला पडलेलं कोडं सोडवलं होत. आंब्यांवर आंबे लोंबकाळत होते. त्यांचा आकार आणि रंग मात्र किती वेगळा! लाल मरून रंगाच्या  लांबुळक्या  कैर्या हिरव्या गार पानांतून उठून दिसत होत्या. 

 Bank of Baroda

 दुसर्या दिवशीच बँकेत joint account काढायचं असल्याने प्रवीणबरोबर मलाही पोर्टलुईला जायचं होतं. ही मॉरिशसची राजधानी. मॉरिशसमधे बँक ऑफ बडोदाची शाखा आहे हे पाहून खूप आनंद झाला. LIC ची भव्य इमारतही सुखावून गेली. बँकेमधील मुलीच्या केबिनमधे छानसं बाळकृष्णाचं चित्र आणि सोबत साईबाबा! भारताबद्दल प्रेम आपुलकी असणारे, हिंदू परंपरा काटेकोर पाळणारे आपले कोणी लागेबांधे भारताबाहेर आहेत हे भारत सोडेपर्यंत माहित नव्हतं. नंतर लक्षात आलं की आपल्या ह्या श्रद्धास्थानांना हॉस्पिटल्समधेही मानाचं स्थान आहे.

 Van Market (ला फा)

             7 डिसेंबर, पहाटेचे पाच वाजले होते पण केवढं उजाडलं होतं! रात्रभर पाऊस पडत होता आणि अजूनही पडतच होता. खिडकीतून बाहेर नजर टाकली. हॉटेलशेजारी भल्यामोठ्या पटांगणासारखी लांबलचक बरीच मोकळी जागा दिसत होती. ह्या लांबलचक जागेत टेबलांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. दहा पंधरा ओळींमधे टेबलंच टेबलं मांडून ठेवली होती. वर ताडपत्रीची तात्पुरती छपरं केली होती. सकाळी 8 वाजता पाहिलं तर सारा परिसर गजबजून गेला होता.मार्केटच्याबाहेर व्हॅन्सची गर्दी होती. व्हॅन मालक आपापला माल भरलेल्या मोठ्या पिशव्या म्हणा, मोठाल्या वेताच्या टोपल्या, वेताचे हारे भरभरून भाजी फळं उतरवत होता. सर्वजण आपला विकायचा माल व्हॅन्स मधे घेऊन येतात म्हणून याला व्हॅन मार्केट म्हटलं जातं. ही व्हॅन मार्केट म्हणजे मुंबैचा रानडे रोड, पुण्याची तुळशीबाग, नागपूरची सीताबर्डी किंवा दिल्लीचा चांदणी चौक म्हणा! जीवाचं मॉरिशस करायला पुढचे तब्बल दहा दिवस माझ्या हातात होते. एकदा घर मिळालं की हॉटेलमधे आरामशीर ऑर्डर देऊन खायचे दिवस संपुष्टात येणार होते. आज इथला भाजी डे दिसत होता. माझ्यातील सुगृहिणी जागी झाली होती. काय काय भाज्या मिळतात, फळं मिळतात किंवा कसे पहाण्यासाठी चक्कर मारायला बाहेर पडले. सुरवातीलाच मोसंबी,संत्री, केळी,कलिंगड, खरबूज,सफरचंद अशा अनेक फळांची रेलचेल होती.पलिकडून तळणीचे वास येत होते. आपल्याकडील वडापावच्या गाड्यांसदृश वातावरण होतं काकाची टपरी टाईप 5-6 दुकानदार मोठ्या मोठ्या कढयांमधेगातोपिमा(Gateaux Piment) तळत होते. गातोपिमा हा भारतीय भज्यांचा फ्रेंच अवतार होता. फ्रेंच मधे गातोचा अर्थ आहे केक आणि पिमा म्हणजे मिरची. थोडक्यात मिरचीचं भजं इथे स्वतःला गातोपिमा म्हणवून घेतं. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असलेली ही भजी वाटाण्याच्या डाळीच्या पिठाची किंवा वाटाण्याची डाळ भिजत घालून वाटून त्यात मेथीच्या पानांप्रमाणे दिसणार्या एका खास प्रकारची बारीक चिरलेली सॅलडची पान घालून केलेली असतात. मिरची मात्र गंगा,यमुना,सरस्वती च्या त्रिवेणी संगमातील सरस्वती इतकीच गुप्त असते. 

                आपल्याकडच्या मंडईत गेल्यासारखं वाटत होतं भाजीवाले आपल्या कडील माल खपविण्यासाठी, गिर्हाईकांना आकृष्ट करण्यासाठी,जोरजोरात आरोळया देत होते. `जिस रुपी- - जिस रुपी ' वेन सॅक ,- - -बोंऽझू मादाम!  - -मेर्सी - -पाता गा सी '' !!! अशा कळणार्या शब्दांनी वातावरण भरून गेलं होतं. वेताच्या टोपल्यांमधे टप्पोर्या लाल मरून रंगाच्या लिचिंचे घोस विकायला बसले होते. मॉरिशन दोन रुपयाला एक लिची. भारतीय रुपयांमधे एका लिचीला साडेतीन रुपये. भाजी किलो या परिमाणात मिळता पौंडात मिळत होती. 35 रुपये (मॉरिशयन) पौंड टोमॅटो, 25 रु पौंड भेंडी, धडकी भरतील असे भाव होते.(2004 सालची गोष्ट आहे.) मी प्रत्येक भाव भारतीय चलनात किती ह्याचा हिशोब करत होते. कुठल्याही नवीन देशाची सवय होईपर्यंत जेटलॅगच्या जोडीने चलनस्थित्यंतरचाही माझ्या मेंदूला काही दिवस सामना करायला लागतो. काही दिवस चलनबदलाचे हिशोब भारतातल्या वीस रु किलो टोमॅटोच्या पार्श्वभूमीवर दोनशे रुपये किलो टोमॅटोंपासून मला दूर ठेवत होते. मग थोड्या दिवसात मेंदू, मन आणि हात सर्वच सरावलं. भारतात परत आल्यावर मात्र दानशूरासाखी पहिले काही दिवस मी कुठलीच घासाघीस करता अत्यानंदाने खरेदी करून उरलेले दोन रुपये परत घेता भाजीवाल्याच्याच हातावर ठेऊन आले. महिन्याभराने (पतिदेवांच्या भारतीय चलनातील पगाराचा अंदाज आला आणि )  परत माझी घासाघीस सुरू झाली.

                     बाजारात थोडं आत प्रवेश केल्यावर तर कोकणात आल्यासारखं वाटायला लागलं. केळींच्या फण्या ,सोनकेळ्यांचे घड टांगून ठेवलेले, मोठाल्या टोपल्यांमधे आंबे विराजमान झाले होते. भल्यामोठ्या काटेरी फणसांनीही हाजेरी लावली होती. आंबा, फणसाचे वास लपत नव्हते. भाजीचे फणस, भले दांडगे लाल भोपळे, पांढरे भोपळे, भेंडी, फ्लॉवर, कोबी, आळूची पानं, नारळ, मिरच्या, कढिलिंब, कोथींबीर, लिंबू बरच काही आपल्यासारखं मिळत होत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे किंवा प्लॅस्टिकच्या छोट्या ट्रेमधे प्लॅस्टिक रॅपरने बंद केलेले खोबर्याचे तुकडे +ओव्याची पान+मिरची+कोथिंबीर अशी चटणीची तयारी दिसत होती.   ह्यांच्या जोडीला काही नवीन प्रकारही दिसत होते. मला त्यांची ओळख करून घ्यायला लागणार होती. पडवळाला पाटुल तर वांग्याला लेशु म्हणून संबोधलं जात होतं. पोमदामूर (टोमॅटो), पोमदेतेर ( बटाटे ), शुफेरल (फ्लॉवर) , पिमाँ (मिरची) मी मनाशी पाठ करत होते. शाळेतील पाठांतराची सवय अशीही उपयोगी पडते तर. मॉरिशसच्या पुढच्या दोन वर्षांच्या मुक्कामात मला ही सवय चांगलीच उपयोगी पडली. भले मोठ्ठे कलमी पेरू पाहून मी खूष झाले पण ती  शुशु (Chow Chow ) नावाची भाजी आहे कळलं शुशुच्या जोडीला भोपळ्याच्या वेलासारखी दिसणारी पालेभाजी म्हणजे शुशुचे वेल असल्याचं कळलं.

       

  ह्या भाजीच्या नावामुळे माझी एक भारतीय मैत्रीण त्याला हातही लावत नसे. शुशु (Chowchow) ह्या उच्चाराचा आणि त्याच्या स्पेलिंगचा मात्र दुरान्वयानेही संबंध नसल्यासारखा वाटले. भाजी घ्यायला आलेल्या प्रत्येक मॉरिशन माणसाच्या हातातील वेताच्या बास्केटमधून शुशुचे स्प्रिंगांसारखे तण (टेंड्रिल्स) बाहेर डोकावत होते. ह्या भाजीशिवाय इथल्या लोकांचं पान हलत नाही. आणि भाजीही सुरेख होते. येणार्या मॉरिशियन मंडळींच्या हातातील बॅग्ज पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.

                40-50 वर्षांपूर्वी वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या चपट्या वायरचे गुंडे बाजारात विकत मिळत. बायका ठराविक प्रकारे त्या गुंफत आणि बास्केटस् बनवत. घरटी एकतरी तशी बास्केट असेच. कोथींबीरीच्या जोडीला बारीक पानांचा ओवाही छोट्या गड्ड्या बाधून बसला होता. हा प्रकार आपल्यापेक्षा नवीन होता. भाजीत भाजी मेथीची दिसत नव्हती पण मेथीसारख्या पानाचं सॅलड घेतल्या  शिवाय कोणीही पुढे जात नव्हतं. बाहेर तळल्या जाणार्या गातोपिमामधे हीच भाजी होती तर!  सॉसच्या बाटल्यांमधे कोल्हापुरी लवंगी मिरचीच्या बहिणी व्हिनेगार मधे घालून ठेवलेल्या होत्या. या खास रॉड्रिग्जच्या! विमानातून येतांना इंडियन ओशनमधे पहिल्यांदा टि.व्ही. वरच्या नकाशात त्या ठिपक्याचा थोडासा परिचय झाला होता. पालेभाजीला भाजी म्हणून संबोधलं जात होतं. भाजीसाठी भाजून दळलेले मसालेही प्लॅस्टिकच्या बंद पिशव्यांमधे मिळत होते. त्यांचा खमंग वास बाहेर दरवळत होता. भाजीवाल्यांच्या आरोळ्यांमधून काही सुपरिचित शब्द ऐकू येत होते. कोथिमिली. भाजी इत्यादी. भाजी विकणारे चेहरे आणि अंगकाठ्या कोकण, बिहार, तामिळनाडूशी नातं सांगणार्या दिसत होत्या. इंग्रजीत मी काहीतरी प्रश्न विचारला त्याला एका मिठ्ठास जिभेच्या हासर्या चेहर्याकडून ``इंडियासे आये हैं क्या?'' असा प्रतिप्रश्न आला. त्याचे पूर्वज गुजराथी होते असं त्याने सांगितलं. जेनेटिक्समधे डोळे, रंग, नाक, कान इत्यादि ठरविणारे क्रोमोसोमवरील छोटे ठिपके म्हणजे जीन्स चा उल्लेख असतो. पण हासर्या मिठ्ठास स्वभावाचे जीन्स गुजरात पासून दोनशे वर्ष आपली नाळ तोडल्यावरही तेवढेच प्रभावी राहू शकतात हे पाहून मजा वाटली. त्याला ``केम छो'' असं विचारलं असतं  तर कदाचित ``मजामा '' असं उत्तरही By default  हेरिडिटीमुळे त्याच्या तोंडून येईल असं वाटलं. मासे, सुकट, बोंबिल विकणार्या एका ठेंगण्या ठुसक्या तुडतुडीत म्हातारीकडे बघून वाटलं अल्लाऊद्दीनच्या जीननी अलिबागच्या बाजारातून उचलून तर हिला इथे आणून नाही बसवलं? आता मात्र राहवलं नाही. “काय आजी कसं काय?” म्हणून अंदाज घेतला तर काय ! आजीबाई  शिवाजी कालीन मराठीत बोलायला लागल्या. आजीबाईंच नाव इटाबाई होतं. 

         आपल्या मराठी वरून काळाच्या कितीतरी लाटा जाऊन मराठी शब्दांची अनेक पानं, फांद्या गळून नव्या रंगाची पालवीही आली. कित्येक शब्द दुसर्या भाषांच्या आक्रमणाखाली पुसून गेले. काही नवीन उगवले. मूळ झाडावर उगवणार्या पिंपळ, उंबरासारखे. भारतात एखाद्या ठिकाणचे स्थानिक, मूळ वृक्ष कुठले हे जर शोधायचं असेल तर गायराने आणि देवरायांचा शोध घेतला जातो. गायरान म्हणजे पूर्वीच्या राजा किंवा संस्थानिकांनी गायी चरायला ठेवलेलं राखीव रान. तर देवराई म्हणजे देवळासाठी राखीव ठेवलेली जमिन. देवाच्या पूजेसाठी येथे अनेक वर्षांपूर्वीपासून लावलेल्या फुलझाडांची, फळझाडांची तेथे चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाई. दक्षिण भारतात देवळासाठी राखीव ठेलेल्या अनेक देवराया आढळतात. आजही पुण्यात बेलबाग, तुळशीबाग ह्या ठिकाणी मुचकुंदादि खूप जुनी झाडं पहायला मिळतात. कुठल्याही जुन्या देवळात गेले की मी त्याच्या परिसरातील जुनी झाडं शोधायला लागते. कित्येक वेळा कित्येक माहित नसलेली झाडं पहायला मिळतात. ती आपली स्थानिक झाडं होती. आज आपल्या पूर्वीच्या भाषेचा किंवा संस्कृतीचा मागोवा घ्यायचा असेल तर मला वाटलं भारताबाहेर खूप वर्ष राहिलेल्या लोकांकडूनच आपल्याला बरीच गहाळ झालेली माहिती उपलब्ध होऊ शकेल. कदाचित भाषा आणि संस्कृतीच्या देवरायाच्या रूपात आजही ही माणसं उपलब्ध आहेत. काही वर्षात तेथील स्थानिक संस्कृतीच्या रेट्यात त्याही नामशेष होतील. काळचक्र मागे फिरवल्याच्या सायन्स फिक्शनच्या गोष्टी ऐकल्या वाचल्या होत्या आज प्रत्यक्ष पहात होते. दोन जुळी मुलं जन्मतःच `बिछडून अनेक वर्षांनी समोरसमोर यावीत असं हिंदी सिनेमाचं कथानकच अनुभवल्यासारखं वाटत होत. जेनेटिक्सच्या ``डाटा कलेक्शन’’साठी आणि अभ्यासासाठी  एकदम योग्य जागा वाटली. इथे सर्वांच्या जिभेवर लिलया नाचणारी म्हणजे `नरी नृत्यते' अशी भाषा मात्र क्रेयॉल किंवा क्रियॉल! अफ्रिकन, भोजपुरी, हिंदी,तामिळ, चिनी, ह्या सर्व भाषांच्या मिसळीवर  फ्रेंच उच्चार आणि व्याकरणाची फोडणी घातली की क्रेयॉल ची रेसिपी तयार होते.

           पहिलाच दिवस असल्याने पैशांचा हिशोबाचा गोंधळ होत होता. आधीच ओंजळभर भारतीय रुपये देऊन मुठभर मॉरिशन रुपये हाती आले होते. जिस रुपी, सँक रुपी, वेनसँक असे उच्चार कळून त्या रंगाच्या नोटा शोधणं कठीण जात होतं. पण समोरचा माणूस खरोखरची मदत करत होता. आपल्याकडील नोटांवर जसे गांधीजी असतात तसे त्यांच्या प्रत्येक नोटेवर त्यांच्या राष्ट्रपित्याचं, शिवसागर रामगुलामांचं सदोदित दर्शन होत राही. नोट पाहीली की आमचीं मस्तके आदरानी झुकतांत ती उगीच नव्हेत. मॉरिशसची करन्सी रुपयाच आहे; मात्र पैसे नाही सेंट आहेत. हिंडतां हिंडता बाजाराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचले पण सगळीकडे कस छान स्वच्छ! कुठे भाजीचे नको असलेले अथवा खराब भाग लोळत नव्हते.

क्वात्रबोर्नच्या व्हॅन मार्केटमधे बुधवार, शनिवार हे भाजीचे दिवस सोडले तर कपडे, पिशव्या, खेळणी, चाळण्या, डबे, बाटल्या, टेबलक्लॉथ, पडदे, चपला, पावडरी, कुंकु, अगरबत्या, धूप, निरांजनं, समया, भारतातून आणलेल्या देवाच्या मूर्ती असं एकमेकांशी कसलही नात नसलेलं बरच काहीही मिळू शकत होतं. मॉरिशसच्या प्रत्येक गावा गावात अशी व्हॅन मार्केट्स असतात. प्रत्येक ठिकणी भाजीचे दोन दिवस ठरलेले असतात.

             भाजीच्या मार्केटशेजारीच फुलांचं छोटसं मार्केट होतं. मार्केट छोटं असलं तरी फुलं फारच सुंदर होती. ही सुंदर आणि आगळी वेगळी फुलं बघत मी उभी राहिले. तेंव्हा भारतात दुर्मिळ असलेल्या लालचुटुक अँथुरीयम फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं. वर्गात बाईंनी सोप्पा प्रश्न विचारल्यावर `` बाई मी!!  बाई मी!! '' ( आत्ता बाईंच्या ऐवजी teacher किंवा Miss म्हणत असतील) म्हणत जशा असंख्य इवल्या इवल्या तर्जन्या वर होतील तशा `माझा पहिला नंबर' म्हणत जणु काही लालचुटुक नागवेलीच्या पानावर आपली कोवळी कोवळी बोटं नाचवित असंख्य फुलं डोकावून बघत होती.  Bird of paradise चे रंग बघत रहावेत असे होते.

अँथुरीयम ( Anthurium),                  Bird of paradise

            बाहेर आले तर एका टपरीवजा खोपटापुढे क्यू लावून लोकं उभे दिसले. लोकं सूट-बूट,टाय मधे. पण क्यूतून बाहेर पडणारा  प्रत्येकजण कागदामधे पोळीच्या गुंडाळी सारखा पदार्थ खातांना दिसत होता. इथे ऑफिस मधे प्रत्येकानी सूट,बूट टाय मधेच आलं पाहिजे असा फ्रेचांनी घातलेला पायंडा लोकं घाम पुसत पुसत पाळत होते.  त्या खोपटावरदेवाज् धोलपुरीअसं लिहीलं होतं. अजून अशा गोष्टींचा परिचय झाला नव्हता. त्यामुळे भुकेसाठी गोल्डक्रेस्ट गाठले.

 

 

 ख्रिसमस आणि नवीन वर्ष

आम्ही मॉरिशसमधे पाय ठेवला तो वसंत, ग्रीष्माच्या साक्षीनेच. दक्षिण गोलार्धात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. नवीन वर्षाचं स्वागत करायला गुलमोहोर लाल चुटुक छत्र्या उघडून तयार होते. अमलतास पुष्कराजांची झुंबरं टांगून उभे होते. लाल जांभळ्या कैर्या, आंबे, लिचींचे घोस झाडांवर डुलत होते. भर डिसेंबर-जानेवारीत बकुळ घमघमत होते. बोलण्यातून जसं माणसाचं मन कळतं तशी इतर वेळेला ओळखू येणारी झाडं त्याच्या फुलांमुळे सहज ओळखू येतात.  आम्ही हॉटेलवर येऊन 5-6 दिवस झाले असतील नसतील सर्व हॉटेलमधे एक वेगळीच धूम चालू झाली. हॉटेलचा प्रत्येक काना कोपरा स्वच्छ होऊन सजावट सुरू झाली होती. कोनिफरेर्ल्स जातीच्या झाडांचे विविध आकाराचे छोटे मोठे लाकडी कोन्स सिल्व्हर आणि गोल्डन रंगांच्या स्प्रेने रंगवून ठिकठिकाणी टिकावू पुष्परचना करत होते.

  

 

 काही स्पेशल आहे का? ``मादाम आठवड्यावर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. नाताळच्या सुट्टया सुरू झाल्या की आमच्याकडे टुरिस्टची भाऊगर्दि उसळेल.'' ह्या छोट्याशा देशाचं भवितव्य `अतिथी देवो भव' वरच अवलंबून असल्याच दिसत होतं. सार्या बेटावरच पाहुण्यांच्या स्वागताची तयारी जोर धरत होती. आपल्या देशातल्या वातावरणापेक्षा हे वातावरण फारच वेगळ्या प्रकारचं वाटलं. आपण आपल्या देशात बाहेरच्या देशातून येणार्यांची इतकी दखल घेतल्याचं मला कुठे दिसलं नाही. आपण आपल्या कामात खूप मग्न आहोत का आपण आपल्यातच मश्गूल लोकं आहोत? ज्या बाहेरच्यांना आमच्या इथे यायचं असेल त्यांनी या बघा आणि जा. त्यांनी खूष व्हावे म्हणून आपण जराही झटत नाही. कदाचित सर्व ठिकाणी भारतीयांचीच झुंबड एवढी असते की परदेशी व्यक्तींसाठी  थोड अजून लक्ष द्यावं असं आमच्या डोक्यातच आलं नसेल.  त्याच बरोबर माओचं वाक्यही आठवत होतं. ' If you open the window you will get fresh air and some flies and mosquitoes.' देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या पाहुण्यांसोबत येणारं अदृश्य पण समाज-जीवनावर खोल परिणाम करणारं वातावरण कदाचित ह्या माशा आणि डासांसारखं उगीचच मला तेथील वास्तव्याच्या काळात त्रास देत राहिलं.

 

हॉटेल गोल्ड क्रेस्टच्या समोरच क्वात्रबोर्न शहराची म्युन्सिपाल्टी होती. तेथेही पताका, लाईटिंगची गडबड चालू होती. थोड्याच दिवसात तेथील electronic digital board वर मेरी ख्रिसमस आणि Happy New Year  चे संदेश झळकायला लागले. जो सण असेल त्यानिमित्त म्युन्सिपाल्टीतर्फे लोकांना शुभेच्छा दिल्या जात. ही कल्पना मला मॉरिशसच्या संपूर्ण वास्तव्यात फार सुखदायक वाटत राहिली.

            नाताळ आणि  नवीन वर्षाच्या आगमनाला बेट सिद्ध होत असतांनाच शेजारच्या मादागास्कर आणि इतर छोट्या छोट्या अफ्रिकी देशातले अनेक कलाकार-लोक परदेशी पाहुण्यांना आवडतील अशा लाकडापासून आणि दगडापासून बनविलेल्या अनेक वस्तू घेऊन मॉरिशसमधे दाखल होत असत. फुटपाथवरच त्यांच्या वस्तू मांडून विकत. लाकडी जिराफ, हरीण, अफ्रिकन पुरुष स्त्रियांचे दगडात कोरलेले चेहेरे, दगडाचे बनविलेले हिप्पो, सिंह, चित्ते, हत्ती, डोडो अशा अनेक गोष्टी असत. अफ्रिकेतील निसर्ग, लाकडातून आणि दगडातून तंतोतंत सजीव झालेला दिसे. दगडात, लाकडात कोरलेले  चेहरे मोठे बोलके असत. प्राणी तर विलक्षण कमनीय असत. तेथे थांबून त्यांची कलाकृती पाहिल्याशिवाय मला पुढे जाववत नसे. कधी आमच्याकडे येणार्या पाहुण्यांसाठी त्यातील चार-दोन कलाकृती मी घेऊन ठेवत असे. बांबू पासून बनवलेलं विंड-चाईम मला फार आवडे. त्यातून निघणारे नादमधुर सूर पाणी, लाटा, अशा नैसर्गिक आवाजांशी साधर्म्य साधत असे. क्वात्र बोर्नच्या फुटपाथवरही दोनचार ठिकाणी ह्या अफ्रिकन स्त्रिया बसलेल्या असत. त्यातल्या दोघीजणींचे चेहरे जरा परिचित झाले होते. त्यांच्याकडच्या वस्तू न्याहाळत मी जिराफाची किंमत विचारली. किंमत 50 रुपये ही ठरलेलीच असे पण तरीही संवादाला सुरवात करायला काहीतरी बोलणं आवश्यक होतं.  मी त्या कलाकृती बघत असतांना त्यांची नजर माझ्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीकडे सारखी जात होती. मी भारतातून येताना ह्या उठावदार रंगाच्या कच्छी भरतकाम केलेल्या दोन तीन  गुजराथी पिशव्या भाजी, किराणासाठी घेऊन आले होते. येथे मला पिशवी मोलाची होती. शिवाय माझे पैसे, घराची किल्ली, कार्ड, फोन सर्वच त्यात होतं. नवीन देशात मीही पिशवी जरा आवरून सावरून उभी राहीले.   पिशवी पाहून त्यांचं एकमेकीत काहीतरी बोलणं चालू होतं. परत परत त्या पिशवीकडे बघत होत्या. पिशवी सावरत परत एकदा मी तिला किंमत विचारताच त्यातील एक म्हणाली ``तुझ्या खांद्यावरची पिशवी देशील?'' क्षणभर मी गडबडले. माझे पैसे, कार्ड, घराची किल्ली सर्वच त्यात होतं. (हो आत्तापर्यंत आम्ही आमच्या घरात रहायला गेलो होतो.) माझ्याकडे दुसरी पिशवी नव्हती. `पिशवी तुला दिली तर मी काय वापरू' हा माझा मोह गेला नाही. आत्ता असं वाटतं मी लगेच देऊन टाकायला पाहिजे होती. तशी नाही तरी दुसरी एखादि पिशवी मला बाजारात कुठे ना कुठे नक्कीच मिळाली असती. आपल्याकडे सर्व सुबत्ता असतांनाही  दोनशे- पाचशे रुपयाची एक पिशवी आपल्या हातून सुटली नाही ही बोच मनाला कायमची लागून राहिली. माझं  अति सामान्यपण एका लहानशा प्रसंगातून मला कळून आलं होतं.

            मॉरिशसच्या रस्त्यांवरून हिंडताना मोजकेच भिकारी दिसत. त्यातही चिनी किंवा गोरे भिकारी नसत. असलेच तर जास्त करून अफ्रिकी वंशाचेच असत. तेही महारोगी, अपंग असे नसत. येणारे जाणारे अफ्रिकन वंशाचे लोक  जाता जाता त्यांना हस्तांदोलन करून, त्यांच्याशी हसत खेळत गप्पा मारून मग पुढे जात. साठ वर्षांच्या पुढे प्रत्येकालाच निवृत्ती वेतन मिळे. कदाचित त्यामुळे ह्या व्यवसायाला फारसं प्राधान्य मिळालं नसावं.  कोड असलेली माणसंही कधि दिसली नाहीत आणि अपंग प्रजाही पाहिल्याचे फारसे आठवत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------

3 घराच्या शोधात

कमल अवतार

                           घर शोधायच काम आमच आम्हालाच करायच होतं. क्वात्रबोर्नला घर असण्यात एक फायदा हा होता की सर्व मॉरिशस जास्तीत जास्त दोन अडिच तासाच्या अंतरावर उपलब्ध होतं. कुठेही पोचणं सहज शक्य होत. दुसरं म्हणजे भारतीय लोकं ह्या भागात जास्त प्रमाणात होते. नवीन देश, समजणारी भाषा आणि 15 दिवसाची मुदत हे सर्व लक्षात घेउन प्रवीणनी आल्या आल्याच इस्टेट एजंट `कमल अवातो'च्या मदतीने घर शोधायला सुरवात केली होती. अवातो च्या स्पेलिंग वरून लक्षात आलं की भारतीय कमल अवतार ह्या नावाची ही मॉरिशियन आवृत्ती आहे. फ्रेंच मधे शेवटच्या चा उच्चार करत नाहीत. अवातोपाशी उच्चार संपतो. फ्रेंच भाषेत चा जीभेनी उच्चार करता घशातून करतात. असा जड जीभेनी म्हटल्या सारखा वाटतो. आणि मग राम किशन चा आमकिसून होतो. रोझ हिल ची ओझ हिल होते . curepipe चा उच्चार क्युअरपाईप न होता क्युपिप असा होतो. ह्या गमतीत नंतर कितीतरी शब्दांची भर पडत गेली. एकदा भारतातून आलेल्या  प्रा.  नवलगुंदकर यांच्या भाषणासाठी गेलो होतो. Black River  हा मॉरिशसमधील मराठी वस्ती असलेला भाग. Mrs. घोष ह्या तेथील डेप्युटी मेयर बाई. आणि president of Black River Council. घोषबाई नवलगुंदकर या स्पेलिंगनुसार त्यांच्या आडनावाचा फ्रेंचमधे उच्चार करतांना वारंवार मिस्टर नवलगुंडा म्हणून त्यांना संबोधत होत्या. फ्रेंच स्टाईलने नवलगुंडा म्हणल्यावर स्वाभाविकपणे तोंडाचा वासलेला बराच काळ तसाच रहात होता  आणि त्यांच्या ह्या गडबडगुंड्याने मला हसु आवरता आवरत नव्हतं.  मूळचे भारतीय असलेले शब्द काळाच्या, इतर भाषांच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाच्या अमलातून आणि फ्रेंच  गोमुखातून बाहेर पडतांना भलतीच गम्मत घडवत होते.

          मी मॉरीशसला पोचण्यापूर्वीच, प्रवीणने अवातो च्या मदतीने  2-4 घर निवडून ठेवली. एखाद्या लग्नेच्छुला पाहिलेली प्रत्येक मुलगी आवडावी तसं प्रत्येक घर मला आवडत होतं.  सगळीच घर छान होती. ती का नाकारावीत ह्याला काही कारण नव्हतं. पण एकाच घरात रहायचं होत. एकच घर निवडण भाग होत. चार दिवसातच हॉटेलच्या कृत्रिम आगत्यासोबत येणार्या व्यवहारी कोरडेपणाने हॉटेलमधे रहाणं नको नको वाटायला लागलं होतं. हॉटेल सोडून कधी घरी रहायला येतो असं वाटत होतं. अनेकांनी सांगितलं की येथील लोक भारतीयांना ज्या सहजपणे घर भाड्याने देतात त्या सहजपणे साऊथ अफ्रिकन लोकांना देत नाहीत. भारतीय लोक पैसे वेळेवर देतात, जागा चांगली ठेवतात आणि दारुबिरु पिऊन फार गोंधळ घालत नाहीत. साऊथ अफ्रिकन लोकांनी घरातल्या सर्व फर्निचर आणि फिटिंग्जसह पोबारा केल्याची अनेक उदाहणं सांगत.  आम्ही मिया बीबी दोघच असल्यानी बंगला या संकल्पनेपेक्षा फ्लॅट हा प्रकार सोईचा वाटत होता. मॉरिशसमधे सुंदर सुंदर बंगले उपलब्ध असले आणि ते सहज भाड्याने मिळण्यासारखे असले तरी एक अंदरकी बात होती. घर कितीही मोठ्ठ असलं तरी बहुतेक हिंदूच्या घराला एकच Toilet असे. बहुधा ते घराच्या बाहेर अंगणात किंवा घराच्या सर्वात सुदूर कोपर्यात वसवलेले असे. घर कितीही मोठं असलं तरी बेडरूमला टॅच्ड टॉयलेट ही पद्धत अजूनही तिकडच्या भारतीय मनांना भावलेली नाही.  ( हेही जुन्या भारतीय घरांच्या रचनेशी कुठेतरी साधर्म्य ठेऊन होतं. ) आम्ही एका कोपर्यावरच्या घरात पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट निवडला. फ्लॅट टुमदार छान होता. तो आवडायचं अजून एक कारण होतं. ह्या तीन मजली  इमारतीत नऊ फ्लॅटस् होते. त्यातील सहा प्लॅट्स साठी एक जिना होता तर कडेच्या तीन फ्लॅटस् वेगळा प्रवेश मार्ग होता ग्राऊंड फ्लॅटला समोरूनच प्रवेशदार होतं. पण वरच्या दोन फ्लॅट्ससाठी कडेनी  वेगळा जिना होता. त्यातील  आमच्या डोक्यावर रहाणारे मॉरिशन मराठी गानू कुटुंबातील अंजली या मुलीसाठी घेतलेला फ्लॅट ती लंडनला रहात असल्यानी रिकामाच होता. पर्यायानी आम्हाला एक स्वतंत्र जिना मिळाला. डोक्यावर मिरे वाटायलाही कोणी नाही. आणि हा जिना सरळ वरच्या टेरेस  पर्यंत होता. रात्री अपरात्री आकाश निरीक्षणाला तर दिवसा पक्षी निरीक्षणाला ही टेरेस मला आवडून गेली. इमारतीतले बाकी कोणी येत नसत. दोन वर्ष ही टेरेस बाय डिफॉल्ट आम्हालाच मिळाल्यासारखी आम्ही वापरत होतो. आम्ही इथे केंव्हाही येऊन मनमुराद आकाशाची मजा घेत असू. आमची अमेरिकेहून आलेली अवघे पाऊणशे वयमान मैत्रीण आमच्या घराच्या मागे असलेल्या को-दे-गार्ड डोंगराच्या इतकी प्रेमात पडली की चक्क तिची कलरबॉक्स घेऊन सकाळीच टेरेसवर जाऊन बसली. तासभर त्या डोंगराचं चित्र रेखाटत बसली. तेथील जोरदार हवेनी तिचा कागद दोनतिनदा उडवून दिला. पण तिने आपल्या चित्राच्या स्टँडला कागद लावून चित्र पूर्ण केलं.

उल्कापाताचा देश -  Mauritius  is  land of  meteorite  fall.

       आमच्या भारतीय परिवारांना चांदण्या रात्री कॉफी घेत गप्पा मारत बसायलाही  ही मस्त जागा होती. हवेत धूळ आणि प्रदूषण नावालाही नव्हतं. उजेडाचंही नाही.                आकाशभर चांदण्यांची पोतीच्या पोती ओतल्यासारख्या चांदण्या ओतल्या होत्या. आकाशाच्या कढईत रोज बहुधा ज्वारीच्या लाह्या भाजण्याचा कार्यक्रम होत असावा. रोज आकाशगंगेची सफर आणि नक्षत्रांची उधळण बघत डोळे दिपून जात. खरोखरच नदीप्रमाणे वहाणार्या या आकाशगंगेत अजूनही गोलगोल आकाराच्या आकाशगंगा दिसत. 

             चांदण्यांच्या मांडवाखाली बसून चांदण्या निरखता निरखता पटकन् एखादी चमचमणारी उल्का विद्युत् वेगाने हवेतून खाली  येतांना दिसे. एका बैठकीत बघता बघता दोन चार तारे तरी आपली जागा सोडून खाली झेपावतांना दिसत. ही गम्मत नवीनच होती. एस्ट्रॉनॉमीची माहिती नव्हती. जे दिसत होतं ते मात्र जमेल तितकं डोळ्यात साठवून ठेवत होतो. . आमच्या मॉरिशसच्या मित्रानी विशालनी सांगितलं–Mauritius  is  land of  meteorite  fall.  इथे कायमच उल्का पडतात. म्हणजे सकाळी इंद्रधनुचा असलेला हा देश रात्री उल्कापातासाठीही प्रसिद्ध आहे.

सुदक्षिणा-

               मॉरिशसमधे सुदक्षिणेचा प्रथमच परिचय झाला. दिक्षणदिशा! सुदक्षिणा!  सगळ्यांपेक्षा उजवी! लोकांनी तिला मृत्यूची दिशा, यमाची दिशा म्हणून बदनाम केलं असलं तरी तिचं अद्भुत सौदर्य पहायला मिळणं मोठं भाग्याचच! विषुववृत्ताच्या दक्षिणेला किमान सहा अंश खाली गेल्या शिवाय तिची खरोखरची भेटच होत नाही. मॉरिशस विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेला वीस अंशावर असल्यानी ती मला भेटणार होती. कुठे कशी हे मला माहित नव्हतं. भारत सोडतांनाच उत्तरेनी विषुववृत्तावर अर्ध्या आकाशात रजा घेतली. उत्तरेचा हात हातातून सुटला होता. नेहमी उत्तरेला दिसणार्या सप्तर्षिंच्या पतंगाच्या शेपटीचे शेवटचे दोन तारेच कसेबसे क्षितीजाला टेकलेले दिसत असत. उत्तरेला ठळकपणे दिसणार्या इंग्रजी M  किंवा इंग्रजी W  च्या आकाराच्या शर्मिष्ठा नक्षत्रानेही येथे रजा घेतली होती. आम्ही मॉरीशसमधे असेपर्यंत ध्रुवतारा तर दोन वर्षांच्या लाँग लिव्ह वर गेला होता.  सुदक्षिणेनी माझा हात इतका अलगद धरला की तिचा स्पर्श जाणवलाच नाही.

                    भारतात कायम दक्षिण क्षितिजावर ररेंगाळणाऱया वृश्चिक राशीनी इथे ठळकपणे दक्षिण आकाशात एन्ट्री घेतली होती. भारतात नेहमी दक्षिण क्षितीजावर असलेली ही सर्वात मोठी रास इथे कितीतरी वरती सरकली होती. मान उंचावून बघायला लागत होती. वृश्चिकाची गोल वळलेली बाकदार नांगी चमचमत होती. तिच्यातला सर्वात सुंदर ज्येष्ठाचा तारा तेजानी सर्वांपेक्षा ज्येष्ठ असल्याची जाणीव करून देत होता. आणि अचानक लक्षात आलं की ह्या वृश्चिक राशीच्या खाली कधी न दिसलेलं दक्षिणसौंदर्य - -तीन तीन सॉलितायर (Solitary) डायमंडस्! ठळक हिरे! दक्षिणेच्या गळ्यात असलेला हार , - -  रत्नजडित अमूल्य कंठा मी प्रथमच बघत होते. डायमंड क्रॉस, सदर्न क्रॉस आणि फॉल्स क्रॉस. सदर्न क्रॉस (crux)  दाखवणारे अल्फा आणि बीटा हे पॉईंटर स्टार्स. सुदक्षिणेचं हे सौंदर्य पहायला पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातच यायला लागतं. इतके दिवस ऑस्ट्रेलिया , न्युझिलंड, सामोआ, पापुआ, न्युगिनिआ यांच्या ध्वजांवरच दिसणारा सदर्न क्रॉस मी प्रत्यक्ष बघत होते. बाहेरची थंडी बोचरं वारं सगळं सगळं विसरायला झालं. आत्तापर्यंत दक्षिणेनी अलगद धरलेला हात जाणवलाच नव्हता. किंचित हसून तिनी हातात धरलेला माझा हात जरासा दाबला. आणि माझ्या समोर हिर्या माणकांनी मढलेली सुदक्षिणा पाहून मी हरखूनच गेले. तिचा हात घट्ट धरत मी म्हटलं  -“आज पासून तुझी माझी मैत्री!” आम्ही टेरेस वरून खाली आलो तरी डोळ्यासमोरून दक्षिणेची गर्भश्रीमंती हलत नव्हती. सहज घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि हिरयांचा कंठा घातलेली सुदक्षिणा समोरच हसत उभी होती. घराचा दरवाजा दक्षिणेला आहे म्हणून भयभीत होऊन मंत्रतंत्र करणाऱयाची खूप कीव आली. मॉरिशसच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात सुदक्षिणेला भेटल्यावाचून माझा एकही दिवस गेला नाही.

मॉरिशस रेडिओ टेलिस्कोप (MRT)

                 मॉरिशसचं दक्षिण गोलार्धातील मोक्याचं स्थान दक्षिण गोलार्धाच्या आकाशाच्या निरिक्षणासाठी, अभ्यासासाठी अत्यंत सुयोग्य उपयुक्त आहे हे हेरून मॉरिशस विद्यापीठ , Indian Institute of Astrophysics (IIA),   आणि Raman Research Institute ह्या सर्वांच्या सहकार्यातून तेथे मॉरिशस रेडिओ टेलिस्कोप (MRT) उभारला आहे म्हणण्यापेक्षा दोन कि.मी. लांब पसरला आहे म्हटलं तर जास्त बरोबर होईल. ह्याला दक्षिणोत्तर पसरायला आणि ठराविक कोन मिळायला रोशेनॉयर आणि फ्लॅक ह्या दोन गावांच्या मधे असलेलं पक्ष्यांचं अभयारण्य (forest of Bras d'eau) ही हवी तशी जागाही मिळाली. येथे असलेलं घनदाट जंगल आणि आमराईने त्याला लोकवस्तीपासून लांब आणि सुरक्षित ठेवलं होतं.

              हा टेलिस्कोप नेहमीच्या टेलिस्कोप प्रमाणे नाही. आकाशातील रेडिएशन्स  गोळा करायची तर दोन कि.मी. व्यासाच्या डिश अँटेनाचि जरूर असते. शिवाय पृथ्वीच्या गतीप्रमाणे अवाढव्य डिशचा कोन सतत फिरता ठेवणंही अवघड. अशावेळेस डिश अँटेनाचा दोन किमी. चा फक्त व्यास वापरून हवी ती गोष्ट साध्य करून घेतली आहे. इंग्रजी  T  च्या आकाराच्या रेडिओ टेलिस्कोपला  गोल गोल वळणं घेणार्या (helical antennas) अँटेना  आहेत.

आकाशातून  एखाद्या ठिकाणावरून येणार्या रेडिओ लहरीचे विजेच्या सिग्नलमधे रूपांतर केले जाई. वेगवेगळ्या अँटेनांच्या गटांकडून येणारे हे संकेत गाळून घेऊन अॅम्प्लिफाय करून ते टेलिस्कोपच्या बिल्डिंगकडे पाठवले जातात. तेथे त्यांना डिजिटल स्वरूपात आणून त्यांच्यावर correlator कोरिलेटर च्या सहाय्याने त्यांना प्रतिमा स्वरूपात आणले जाई. दूरवर आकाशातून येणारी ही प्रचंड माहिती गोळा करून त्यांच्या प्रतिमांचा अभ्यास येथे केला जातो.

 

(Corps The Garde)  को-दे-गार्ड.

              घराच्या मागे एक सुंदर डोंगर होता.  या डोंगराचा आकार खूपच गंमतीदार होता. पुढचे पाय समोर पसरून हत्ती खाली बसल्यासारखा हा डोंगर मला वाटे. डोंगराला एक छोटीशी शेपूटही होती हरणाची असते तशी.   ह्या डोंगराचं नाव होतं- को-दे-गार्ड. (Corps The Garde)  फ्रेच मधे `को' म्हणजे body of people `गार्ड' म्हणजे रक्षण करणारा, रक्षक! मराठीत सांगायच तर `जनत्राता' म्हणाना. असा हा कणखर रक्षक सतत आमच्या पाठीशी उभा होता. पाहता क्षणी मी या डोंगराच्या प्रेमात पडले.

श्ले मोक्युडे -

              आमचा घरमालक चाळीशीचा असला तरी त्याचा उंच सडसडीत बांधा आणि उत्साहाने फुरफुरणं पाहिलं की तो विशीचाच वाटायचा. त्याच्याकडून मी पहिले दोन फ्रेंच शब्द शिकले. बोंझू ( Good Morning) आणि बों स्वा( Good Evening/ Good night.) ``तुम्ही माझं नाव ऐकल असेल,  आश्ले मोक्युडे'. मी इथला उत्तम फुटबॉल प्लेअर आहे. माझ्या नावावर असलेलं गोलच रेकॉर्ड अजून कोणी मोडलं नाही.'' थोडक्यात तो तेथील सचिन होता. ''अ‍ॅश्ले दर महिन्याच्या पहिल्या रविवारी यायला चुकायचा नाही. त्याच्या व्यवहारीपणाची चुणुक त्याच्या प्रत्येक भेटीत चमकून जाई. एक वर्षाचं घराचं contract  संपत आल्यावर त्याने आम्हाला `I'll re-do the house'  म्हणून एक भरभक्कम आश्वासन दिलं. आम्हीही नवीन रंग . . ची अपेक्षा करत आनंदात असतांना तो एकदिवस त्याच्या स्वतः रहात असलेल्या घराचे जुने पडदे घेऊन आला. हॉलचे पहिले चांगले जुने पडदे काढून त्याचे अजून जुने पडदे लावून गेला.  काही दिवसांनी आम्ही त्याला विचारलं की, ``अरे घर re - do करणार होतास ना''? त्याचं उत्तर ऐकून हसून हसून आमची पुरेवाट झाली कारण फ्रेंचमधे किंवा क्रेयॉलमधे पडद्यांनाच re - do म्हणतात  आणि ते तर त्याने कधीच बदलले होते.

               आम्ही आटोपशीर फ्लॅट घेण्यामागे तो सहजगत्या आपल्याला आवरता यावा आणि तेवढ्यासाठी आपल्याला कोणावर अवलंबून रहायला लागू नये हा मुख्य भागही होताच. येथे कामवाली ठेवायची असेल तर इथले कामगार कल्याणाचे नियम कडक असत. तिला सरकारी नियमाप्रमाणे ठराविक पगार द्यायलाच लागे. संध्याकाळी पाचनंतर काम सांगितले तर over time चे वेगळे पैसे. रविवारी सुट्टीही. सुट्टीच्या दिवशी कामाला बोलवायचे असेल तर त्या दिवसाचे जास्तीचे पैसे, येण्या-जाण्याचे टॅक्सीचे पैसे किंवा तिला गाडीने आणून पोचवावे लागे. प्रत्येक कामाचे वेगवेगळे पैसे असत. मिनिस्ट्रि ऑफ लेबरचे फिसर्स अचानक येऊन घरी पहाणी करत. घरी काम करणार्या बाईला चांगले वागविले जाते किंवा नाही ह्याची तिच्याकडे चौकशी करत. तिच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं तर ठीक नाहीतर मालकावर सक्त कारवाई होत असे.

Petrol station -

             आत्तापर्यंत आमच्याबरोबर आलेले सर्व भारतीय क्वात्रबोर्नच्या आजुबाजुला स्थिरस्थावर झाले होते. तेथील गरजेप्रमाणे प्रत्येकाने गाडीही घेतली होती. घर सुरू करण्यासाठी अग्निहोत्राची गरज होती. गाडी चालू करण्यासाठी लागणारं पेट्रोल आणि घर चालू करण्यासाठी लागणारा गॅस सिलिंडर एकाच पेट्रोलस्टेशनवर/ गॅसस्टेशनवर मिळणार होते. गाडीत पेट्रोल भरायला पेट्रोल स्टेशनवर जायला लागायचे तसे गॅस-सिलिंडर संपला की तो गाडीत घालून पेट्रोलस्टेशनला जायला लागे. जवळच्या कुठल्याही पेट्रोलस्टेशनवर सिलिंडर बदलून मिळे. घरपोच सिलिंडर, दूध, पेपर, धोबी आणि इतर सेवा मिळायचं कौतुक फक्त भारतातच आहे. पेट्रोल स्टेशनवर गाडीत हवा भरणे हे एक दोन वेळेला हवा भरून आम्ही शिकलो. पहिल्याच वेळेला चाकाच्या हवा भरायच्या छोट्या नळीवरचं टोपण काढायला गेले आणि ते चाकाच्या आत पडलं. जवळ पडलेली काडी उचलून मी चाकात अडकलेली कॅप काढायच्या प्रयत्नात. तेवढ्यात पेट्रोल स्टेशनवरचा एक मुलगा जवळ आला आणि म्हणाला,  ``गाडी थोडी पुढे न्या बाहेर येईल कॅप.'' प्रवीणने गाडी चालू करून थोडी पुढे नेली आणि centrifugal force ने कॅप पटकन बाहेर पडली. एवढी साधीशी गोष्ट सुचू नये ह्याची गम्मत वाटली. नंतर आमचा मुलगा कणाद त्याच्या मित्रांना घेउन आला होता तेंव्हा त्यालाही गाडीत हवा भरायला शिकवली त्यावेळेला नेमकी त्याच्या हातून कॅप चाकात पडली. मीही त्याला गाडी चालू करायचा उपाय सांगून माझा चतुरपणा दाखवून दिला.

 राहण्याचे नियम -

             आम्ही आमच्या भारतीय मित्रांकडे जाउन त्यांची घरं पाहून आलो आणि तेही आमच्या घरी येऊन गेले. आमच्यापैकी काहींनी एका फ्रेंच कॉलनीत घरं घेतली होती. माझ्या मैत्रीणीचं घर ग्राउंड फ्लोअरलाच होतं. घराभोवती सुंदर बगिचा होता. पपई, आंबा अशी सुंदर झाडं होती. पपईला आलेल्या बाळ पपया काही दिवसातच पिकून मोठ्या झाल्यावर तिने त्यातील एक पपई तोडली. ही गोष्ट तेथील फ्रेंच मालकिणीला अजिबातच आवडली नाही. दुसर्याच दिवशी तिचा माळी  इलेक्ट्रिक करवतीने तेथील पपई, आंबा सर्व मोठी झाडे कापून गेला. थोड्याच दिवसात त्या कॉलनीत अजून एक पंजांबी कुटुंब रहायला आले. त्यांची मुलं 8- 10 वर्षांची असतील. शाळेतून आल्यावर कॉलनीमधे असलेल्या ग्राऊंडवर ती फुटबॉल खेळत. आतमधे वेगाने येणार्या गाड्यांना मुलांच्या खेळाची सवय नव्हती.  कारण येथे खेळण्यासाठी बाहेर खरोखरच उत्तम ग्राउंड्स असतात. शिवाय त्यांच्या आवाजाने त्रस्त झालेल्या मालकिणीने इथे फुटबॉल खेळू नका असं सांगितल्यावरही त्यांनी साफ नकार दिल्यावर सर्व फ्रेंच लोकांनी ह्यापुढे ह्या कॉलनीत भारतीयांना जागा द्यायची नाही असा निर्णय घेऊन टाकला. भारतात अनेक अयोग्य गोष्टी आपल्याला नेहमीच्याच झाल्यामुळे योग्य वाटतात. कित्येकवेळेला आपण योग्य गोष्टींची टिंगल टवाळी आणि आपल्या अयोग्य गोष्टींचं हसत हसत समर्थनही करतो. जागतिक स्तरावर योग्य गोष्टींचं पालन करणं हे दंडनीयच असतं. आपण ह्या ग्लोबल व्हिलेजचा भाग आहोत हे लक्षात घेऊन भारतीयांनीही आपलं वर्तन सुधारलं नाही तर त्याचा त्यांना आणि नियम पाळणार्या इतर भारतीयांनाही फटका बसतोच शिवाय बाहेरच्या देशात भारताचं नावही बदनाम होतं. Do You know this is Mauritius. This is not India किंवा Hey! You Indian! असं एखाद्यावेळेला आपल्या बांधवांसाठी ऐकलेलं वाक्यही मनात खळबळ माजवून गेलं.

मलेरियाची तपासणी-

                           मॉरिशसमधे प्रवेश करतांनाच तुम्ही कुठे उतरणार हे विमानतळावरच जाहीर करायला लागतं. तुम्ही कुठल्या हॉटेलमधे उतरणार का तुमच्या मित्र  वा नातलगांकडे जाणार ते तिथे गेल्यावर ठरवू असं म्हणून चालणार नाही. एकदा का तो माणूस त्याच्या वास्तव्याच्या जागी टेकला की, भारत, दक्षिण आशिया इत्यादि यादितल्या देशातले तुम्ही असला तर दुसर्याच दिवशी तुमच्या घरी आरोग्य खात्याचा फोन घणघणतो. पाठोपाठ त्यांचा माणूस मलेरियासाठी तुमच्या रक्ताचा नमुना घ्यायला हजर होतो.  आम्ही गेल्या गेल्या `कान टोचले सोनारे' नाही तरी `सुई टोचली मॉरिशसने' म्हणायला लागलं. आम्हाला आणि आमच्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हे `रक्तदान' करायला लागलं.

 मॉरिशसच्या अंतरंगात -

             घर शोध मोहिमेमधे मॉरिशसच्या अंतरंगात शिरायची थोडीशी संधी मिळाली आणि घरं, बंगले बघता बघता जुन्या पुण्याची छवी डोळ्यासमोर तरळून गेली. पुण्याचा डेक्कन परिसर, तेंव्हाचा भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता तेथील बंगले, बंगल्यांभोवती केलेल्या बाग , रसिकतेने लावलेली झाडं त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

                 पुण्यातील डेक्कन परिसर 1930 च्या सुमारास उदयाला आला असावा. पानशेतच्या पुरानंतर 1960-62 च्या सुमारास पुणेकरांनी त्यांचे पैसे पुण्याच्या मातीत पेरायला सुरवात केली आणि बाजीरावरस्ता,पर्वती, डेक्कन प्रभात रस्ता, भांडारकार रस्ता अशा निसर्गरम्य परिसरांमधे रस्याच्या दुतर्फा बंगल्यांच पीक उगवायला सुरवात झाली.70-80 च्या सुमारास बंगल्यांच अमाप पीक उगवलं आणि बघता बघता 90-ते 2000 मधे ते कापणीलाही आलं. जास्त उत्पादन आणि जास्त भाव मिळवून देणार अपार्टमेंट्सचं पीक घेण्यासाठी बिल्डर्सनी बंगल्यांच उच्चाटन केल. बंगल्यांच्या जोडीनी उभी असलेली अनेक सुंदर झाडही जमिनदोस्त झाली. आणि आडवं पसरलेलं पुणं आता उभं तरारून आलं.

                      मॉरिशस मधील बंगल्यांच पीक मात्र अजूनही टवटवीत होतं. थोड्याफार गगनचुंबी सोडल्या तर 70 साली पुण्यात हिंडतांना जसे दिमाखदार बंगले दिसायचे किंबहुना थोडेसे सरसच बंगले जाता-येता लक्ष वेधून घेत असत. बंगल्याचं आकिर्टेक्चर,त्याची रंगसंगती,पडदे आतला बगीचा,प्राणी, गाड्या माणसं बघत जाता जाता कित्येक किलोमिटर अंतर पाय दुखल्याची जाणीव होता सुखावहपणे पार होतं असे. इथल्या प्रत्येक घराभोवतीचं कुंपण मात्र खणखणीत असे. कुंपणांचे विविध प्रकार पाहून घ्यावेत. कित्येक कुंपणं तर 10-20 फुटी उंच असल्याने परदानशीन सुंदरींसारखे कित्येक बंगले रोजच्या वाटेवरचे असूनही अज्ञातच राहिले. 10-15 फूट उंच आणि अंगठ्या एवढ्या जाड बांबूंच कुंपण एवढं घनदाट असे की आतला उजेडही बाहेर येऊ नये. तर कधी इथल्याच काळ्या तपकिरी पिवळ्या दगडाची कासवाच्या पाठीसारखी भिंत ढालीसारखी घराची राखण करतांना दिसते. तर कधि सिमेंट ब्लॉकनी बाधलेल्या कुंपणाला वेलीनी आपल्या नख्या रुतवून ते इतकं दाट वेढलेलं असतं की नखाएवढी भिंतही कुठून दिसू नये.

                   अर्थात एवढं असूनही या  अभेद्य कुंपणाची मर्यादा झाडं पानं, फुलं, फळ. पक्षी, प्राणी कोणालाच मान्य नाही. 10-15 फुट कुंपणावरुनही माना वर करून फुलं, कळ्या डोकावत असतात. भारानी झुकलेली केळ आपला भला मोठा केळीचा घड कुंपणाबाहेर काढुन रोज तिच्या बाळाची प्रगती कौतुकानी इतरांना दाखवत असे.(बघणार्याची नजर केळीला लागत नाही हेही विशेष. बाजारात केळी महाग असूनही) आंब्याचा सडा कुंपणाच्या आत बाहेर सांडलेला असे. आंब्यांना हातही लावायचा नाही म्हणजे किती लावयचा नाही, आमच्या समोरच्या घराच्या छतावर आणि खाली पडलेले आंबे त्याचा मालक रोज झाडूने झाडून साफ करत असे.  चोर अथवा कुंपण कोणाचीही पर्वा करता लिचीचे वृक्ष आपली सारी संपत्ती अंगावर मिरवित असत. फणसाच्या अंगाखांद्यावर त्याची गोल मटोल बाळं आईचं बोट धरून लोंबकाळत असत. दारादारात उभा असलेला हा फणस मला जनीच्या लेकुरवाळ्या विठूसारखा भासे. मुलांच्या पराक्रमाने आईबापही प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्याप्रमाणे झाडांना फुलं फळं आली की ती नजर वेधून घेत. इतरवेळेला अनामिकपणे उभे असलेले वृक्ष फुला फळांमुळे लगेच ओळखीचे होतात.  नोव्हेंबर-डिसेंबरमधे लगडलेल्या लिचींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पांढरा चाफा येणार्या जाणार्यांसाठी फुलांचे गालिचे अंथरत असे. कुणाच्या परवानगीची गरज सुगंधालाही नाही आणि पक्ष्यांनाही नाही. वार्याच बोट धरून बकुळ, चाफा, रातराणीचे सुगंध थेट घरात दाखल होत. तर ह्या झाडावरून त्या झाडावर ह्या बागेतून त्या बागेत लाल चिमण्या ,पिवळ्या सुगरणी, बुलबुल चिमण्या मैना भुरभुरत असत. चिऊताई चिऊताई दार उघड म्हणायला इथे कावळेदादा मात्र नाहीत. बिचार्या कोकीळेची पंचाईत नाही का? तिची बाळं कोण वाढविणार? काऊच्या जोडीने कोकीळाही अदृष्य झाल्या आहेत. आम्र मंजिर्यांचे बाण सज्ज करून येणार्या वसंत योद्ध्याचं स्वागत करायला कोकीळेचं नसणं म्हणजे रंगमंचावरच्या क्लायमॅक्सच्या वेळी हिरोनी एंट्री घ्यायलाच विसरावं अस काहीसं वाटायच. काही वर्षांपूर्वी मॉरिशसमधे अमेरीकन तज्ञांच्या मदतीने कावळे हटाव मोहीम राबवून कावळ्यांचा आवाज बंद करून टाकला होता. आज पोर्टलुई आणि काही थोड्या ठिकाणीआज मी नवल पाहिलेम्हणण्या इतपत 1-2 कावळे दिसतात. कबुतरांच्या गतीनी वाढणार्या प्रजेवर नियंत्रण ठेवणं मात्र त्यामुळे अशक्य झालं आहे.

                     अनेक घरांना electricity चा मिटर , letter-box ची सोय घराच्या कुंपणाच्या भिंतीतच केलेली असे. प्रत्येक घराला किंवा इमारतीला कुंपणाच्या भिंतीलगत बांधलेल्या कचराकुंडीचा एक दरवाजा रस्त्याच्या बाजूने उघडणारा असे.  कचरावाला, मिटर रिडिंग घेणारा माणूस, पोस्टमन, यांचंही दर्शन आतल्या माणसाला होत नसे. `अरे माझं पत्र आहे का रे?' त्यावर पोस्टमननं त्याची पत्रांनी गुबगुबीत दिसणार्या झोळीत डोकावत, हातंनी चाळत `बघतो हं! - --हं आहे आहे हं! ' असा संवाद शक्य नव्हता. आता आपल्याकडेही हळु हळु तशाच सुधारणा होत आहेत. तेंव्हा मात्र प्रायव्हसीची ही कल्पना मला जरा उलटी वाटत होती - --म्हणजे आपणच आपल्याला तुरुंगात डांबल्यासारखी! ज्या घरांच्या letter-box बाहेर कुंपणात नसत आणि ज्यांच्याकडे पाळीव कुत्र असे त्यांच्या electricity bill वर Dog अशी नोंद असे. आमची एक भारतीय मैत्रीण मंजू चेट्टी. त्यांच्या घरमालकाकडे कुत्र पाळलेलं असल्याने त्यांना येणार्या बिलावर Dog अशी स्पष्ट नोंद असे.

               आता भारताप्रमाणे येथेही प्रत्येक बंगल्यातील मुलं परदेशी गेली आहेत. 12 वी नंतर ऑस्ट्रेलिया, फ्रांस, इंग्लंड, भारत ह्या देशांनी स्कॉलरशिप्सची खैरात केली आहे. भारत सोडून बाकीच्या देशात गेलेली मुलं परत येत नाहीत असा तेथीलही एकंदर कल होत चालला आहे. किंवा भरतात एक पदवी प्राप्त करून पुढच्या शिक्षणाला इंग्लंड फ्रांस मधे जाण्याचा कल तेंव्हा जास्त होता.  बहुधा त्यामुळेच बहुतेक मंत्री व अधिकारी भारतातल्याच विविध संस्थांमधे शिकलेले असत.

मॉरिशसची मोकाट कुत्री -

              तर सांगायचं काय की इथल्या बंगल्यांच्या कुंपणांच्या आत बंद असतात माणसं, कुत्री आणि गाड्या. मर्सीडिज, रोल्सराईस,बीएम्डब्ल्यू ते फोक्स वॅगन पर्यंत विविधता दाखविणार्‍या गाड्यांचं प्रदर्शन बंगल्यांमधे माडलेलं असतं. हवेमधे धूळ नामक प्रकार औषधालाही नसल्याने गाड्यांवर साठलेल्या धुळपाटीवर जाताजाता बोटानी रेखाटलेला हृदयाचा बदाम चिरत जाणारा बाण, किंवा त्याचं किंवा तिचं  नावं ही कचर्यातून कला ( किंवा कलेचा कचरा) डेव्हलप झालेली दिसली नाही. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या ही कायम नव्या सारख्या दिसायच्या. गाड्यांच्या जोडीला अ‍ॅप्सो, जर्मन शेफर्ड पासून आपल्याकडल्या लोकल मोत्या वाघ्या पर्यंतचा ब्रॉड स्पेक्ट्रम कुंपणापलिकडून जिथून बाहेरचा कवडसा तरी दिसेल अशी जागा शोधून भुंकत असे. मॉरिशस मधे संध्याकाळनंतर कुत्र्यांना घराबाहेर काढून द्यायची अजब पद्धत आहे. ही मोकाट कुत्री रात्रभर किंचाळून दमली की पहाटे पाचाच्या नमाजाला मुल्लाच्या सुरात  सुर मिसळूनमिले सुर मेरा तुम्हारा तो बेसुर बने हमाराअसं आर्त आवाजात, विव्हळत `गायला' लागली कीऊठा राष्ट्रवीर हो’! म्हणत पांघरूण झटकून  उठायला पर्याय नसे.

              पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडलं की, पहिली सलामी शेजारी राहणार्या रामचंद्रन् च्या मोत्याची असे. रामचंद्रन् हा आमचा मॉरिशन शेजारी. त्याचं कुत्र आमच्या दिशेने धावत यायला लागलं की आमची समोरची चिनी शेजारीण आम्हाला ``मोवे मोवे !!!'' असं म्हणत सावध करे. तेंव्हा तिची बेकरीतून पाव आणायची वेळ असे. पहिल्यांदा मला कुत्र्यांचं नावच मोवे आहे असं वाटलं. पण मोवे म्हणजे वेडा. ते कुत्र वेडं आहे अंगावर धावून येतं असं तिला सुचवायचं असे. बिचारं दिवसभर बांधून ठेवलेलं असे आणि रात्री सोडून दिलेलं असे. घरातलं उरलं सुरलं खाऊन त्याचं पोटही भरत नसे. भुकेने कळवळलेल्या त्या जीवाला मालक खाऊ घालेना आणि बाहेरचे जवळ करेना अशी अवस्था असे. त्याचं ते पिसाळलेपण  मला बिरबलाच्या घोड्याची आठवण करून देई.  एकदा अकबराने सर्व दरबारी लोकांना एक एक घोडा दिला आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सांगितली. आणि कोण चांगली काळजी घेऊन घोड्याला चपळ ठेवेल त्यासाठी बक्षिसही जाहिर केलं. बिरबलाने त्या घोड्याला एकच झरोका असलेल्या अंधार्या खोलीत बांधून ठेवलं. एकाकीपणाने तो अर्धपोटी घोडा पिसाळल्यासारखा वागे. रोज एकच गवताची पेंडी बिरबल त्या झरोक्यातून त्याला टाकत असे. कोणाचा घोडा बलवान आहे हे पहायला जेंव्हा बादशहाचा मोत्तद्दार आला तेंव्हा झरोक्यातून आत डोकावताच आत आलेली त्याची लांबसडक दाढी गवताची पेंडी समजून घोड्याने रागाने ओढून घेतली. अशा प्रकारे  बिरबलाचा घोडा सर्वात बलवान ठरला. त्याप्रमाणे कोणी दिसलं रे दिसलं की ते कुत्र अंगावर धावून जात असे.

 दिवसभर भुंकणार्या या कुत्र्याला शांत राहण्यासाठी मी आमच्या गच्चीतून चीजचे तुकडे टाकत असे. ते खाण्यामुळे दिवसभर त्याच्या भुंकण्यातून माझी सुटका होई. भयंकर दिसणार्या ह्या कुत्र्याची आणि आमची थोडे दिवसातच मैत्री झाली. सगळ्यांना पळता भुई थोडं करणारं हे कुत्र आम्हाला पाहताच प्रेमळ कसं होतं हे बाकी कुणाला कळत नसे. पण ते त्याच्यातलं आणि आमच्यातलं सिक्रेट होत. त्याच्या अव्याहत भुंकण्यावर मला सापडलेला हा एकमेव तोडगा होता.

             एकदा एका चित्रकाराने खूप पैशांच्या  मोबदल्याच्या आशेने एका कंजूस राजांचं अगदि हुबेहुब चित्र काढलं. पण बोलून चालून राजा कंजूसच असल्याने, येतांना तो त्याच्या कुत्र्याला घेऊन आला. कुत्र्याने चित्राकडे ढुंकूनही पाहिलं नाही. राजा म्हणाला, ``हे कसलं हुबेहुब चित्र? माझं कुत्रसुद्धा ह्याला ओळखत नाही. चल निघ इथून.'' चित्रकाराजवळ उभ्या असलेल्या एका हुशार माणसाने चित्रकाराच्या कानात काहीतरी सांगितलं आणि चित्रकार म्हणाला, ``महाराज मला एक दिवसाचा वेळ द्या. मी ह्या चित्रात काही सुधारणा करतो.'' ``ठीक आहे'' राजा म्हणाला. दुसर्या दुवशी मात्र आल्याआल्याच कुत्र्याने चित्रातल्या राजाचे पाय, हात चाटायला सुरवात केली. राजाला कुत्र्याच्या अशा वागण्याचा उलगडाच झाला नाही. राजाला नाईलाजाने ठरलेली मोठी रक्कम त्याला द्यायला लागली. हुशार चित्रकाराने मात्र चित्राच्या मागच्या बाजूने कागदाला राजाच्या हाता पायाच्या जागी थोडासा खिमा फासून ठेवला होता. लहानपणी ऐकलेल्या ह्याच गोष्टीच्या आधाराने घराबाहेर पडतांनाच मी काठीऐवजी चीजचे तुकडे माझ्याबरोबर ठेवत असे म्हणजे अशा अचानक अंगावर येणार्या मोत्या वाघ्यांचं भय राहत नसे. मॉरिशसमधे हे चीजचेच तुकडे मला श्वानभयावर अंगार्यासारखे उपयोगी पडत होते. त्या वासाने कोपर्यावर असलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर झोपलेली माऊ मात्र अचानक जागी होऊन माझ्या मागे येऊ लागे. तेथील डॉक्टरबाईही रागाने `मेरी बिल्ली और मुझसे म्याऊ' म्हणत तिला आत जायचा आदेश देत. आपल्या मालकिणीकडे ढुंकूनही पाहता ही माऊ पायाला अंग घासत एक चौकभर पुढे येऊन चीज खाऊनच माघारी फिरत असे.

         एका बंगल्यात लुटुलुटु चालणारं मोठ्या कढईपाठीचं कासव ही दिसे. कधी कधी गवत खात तर कधी हातपाय ताणून उन्हात पसरलेलं असे.

बिननावांची घरं -

                     येथील बिननावाची घरं मला कायम बिनचेहर्याचीच वाटत राहिली. नंतर हळु हळु कानावर येणारी येथील एकएक आडनावं मला विचारात बुडवून टाकत. अनेकांची नावं/आडनावं दुखी, भिकारी, शोक अशी असतं. कदाचित मॉरिशसमधे पाय ठेवल्या ठेवल्या नाव नोंदणी करतांना इंग्रजांनी त्यांना आडनावं विचारली असावीत. त्यावेळी आपल्याकडे भारतात आडनावं नव्हतीच. गोत्र विचारलं जायचं. काय सांगावं हे कळल्यामुळे कधीतरी त्यांनी ``मी भिकारी आहे'', ``दुःखी आहे'' , ``माझा शोक मला आवरत नाही.'' असं काहीसं सांगितलं असावं का? तेच शब्द त्यांच्या नावासमोर आडनाव म्हणून कायमचे चिकटले असावेत का? पण अनेक वर्ष काशीला कामनिमित्त जाऊन राहिलेले आमचे मित्र जेंव्हा म्हणाले की, ``येथे लोकांची आडनाव भिकारी, दुखी अशी काहीही असतात.'' तेव्हा मात्र  ह्या आडनावांभोवती माझ्या मनात अजुनच सुटणारा गुंता तयार झाला. सकलांचं दुःख हरण करणार्या गंगामातेच्या किनारी भिकारी आणि दुखी का असावेत कळे. त्यातल्या त्यात एखाद्याचं सुखी आडनाव ऐकून किवा एखाद्या घरमालकाच्या नावाची टिळक ह्या नावाचं Teelouck एवढं मोठ्ठ  spelling  करून लिहिलेली पाटीही  सुखावून जाई.

                          आपल्याकडे बंगल्यांना, घरांना, इमारतींना नावं द्यायची पद्धत मला फार आवडते. कदाचित त्याचं कारण आपल्या संस्कृतीत खूप खोलवर दडलं आहे. रामायण महाभारतात घरांनाच काय तर प्रत्येकाच्या धनुष्याला आणि प्रत्येकाच्या शंखालाही नावं दिलेली आहेत. रामाचं कोदंड तर शंकारचं पिनाक तर अर्जुनाचं गांडीव. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं आणि उठावदार! कृष्णाचा पाञ्चजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौण्ड्र, युधिष्ठिराचा अनन्तविजय, नकुलाचा सुघोष, सहदेवाचा मणिपुष्पक शंख वाजतांना त्या शंखांनीही आपल्या मालकाचं व्यक्तिमत्त्व उचलल्यासारखं वाटतं. आजही दक्षिणेतील राजे वडियार यांच्या सिंहासनाला भद्रासन म्हणतात. भद्र म्हणजे कल्याणकारी. तसे शिव म्हणजेही कल्याणप्रद. पांडवांचे `कायमचेच कल्याण' करण्याच्या हेतूने वारणावतला दुर्योधनाने बांधलेल्या घरालासुद्धाशिवनाव दिल्याचं नमूद केलं आहे. मालकाच्या मनाचं प्रतिबिंब मला त्या घराच्या नावात दिसत. आजसुद्धा मालती माधव नाव वाचतांना घरात राहणारे दोन प्रेमीजीव आज अनेकवर्ष एकमेकांना साथ देत एकमेकांना आधार देत अजूनही रोज फिरायला जात असतील का? असं मला कायम वाटतं. तरपितृस्मृतीचा मुलांवर मायेची पाखरण करणारा बाबा आणि त्याची कृतज्ञतेनी आठवण जपणारा मुलगा कसा असेल अशी उत्सुकता मनात राहते. तरचैतन्यस्मृतीचं चैतन्य अचानक लोपलं तो चैतन्य कोण ही हुरहुर त्या बंगल्यासमोरून जातांना मला कायम अस्वस्थ करते.  समुद्रकाठी उभी मेघदूत मालकाच्या कलासक्त मनाची ओळख करून देते. त्या लोकांना भेटताही प्रत्येक माणसांना, त्यांच्या कुटुंबियांना मी मनानी ओळखत असते. त्यांच्याशी कुठल्यातरी भावबंधानी बांधलेली असते.

मॉरिशसमधल्या हिंदूंची घरे -

              मॉरिशसमधे घरांना नावं नसली तरी घर अथवा बंगला हिंदूचा असेल तर लगेच ओळखू येई.  कुंपणातून आत शिरल्या शिरल्या लक्ष वेधून घेई ते म्हणजे एक सुबक सुंदर मारुतीच छोटसं मंदिर! संध्याकाळी या मंदिरात नित्यनेमानी लाल तर क्वचित काही ठिकाणी पिवळे दिवे प्रकाशत असतात. भारतातून सातासमुद्रापलिकडे आल्यावर इथल्या अनोळखी प्रदेशात महावीर हनुमानच आपलं रक्षण करेल ही पूर्वी भारतातून आलेल्या लोकांच्या मनात असलेली नितांत श्रध्दा आजही तेवढीच प्रखर आहे. प्रत्येक हिंदू घरात मारुतीला आवडणारं पानाफुलांनी डवरलेलं रुईचं झाड आणि मंजिर्यांनी भरगच्च बहरलेली कृष्ण तुळस दारी असणारच! देवाला रोज विडाही हवा. त्यासाठी नागवेली ही प्रत्येक घरात हवीच. लोक मात्र विड्याच्या पानांचा उपयोग फक्त देवाला आणि पूजेसाठीच करतात. घराघरात नागवेल असूनही पान खाऊन रस्तोरस्ती लाल सडे टाकतांना कोणीही दिसला नाही. मारुतीच्या देवळावर लाल किंवा केशरी रंगाचे दोन झेंडे फडकत असत. एकावर लिहिलेल असतं तर दुसर्यावर उड्डाण करणार्या मारुतीचं चित्र असत. ‘गर्वसे कहो हम हिंदु हैं हे वेगळ सांगायला लागत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हे झेंडे बदलले जात. इथली हनुमान जयंती मात्र आपल्या पंचांगाशी जुळणारी असते. मारुती येथे महावीर या नावानी लोकांच्या जीभेवर आहे. दिल्लीला असतांना रामलीला बघतांना स्टेजवर मारुतीचा प्रवेश होताच मी शेजारच्या छोट्या मुलाला म्हटलं, ``देखो देखो मारुती गया!’’ त्यावर त्यानी ``कहाँ है मारुती? रामायणमें मारुती कैसे सकती हैं?’’ म्हणून मला क्लिन बोल्ड केलं शेवटी त्याच्या आजीच्या मध्यस्थीमुळे मला कळले की हिंदी लोकांमधे मारुती हा हनुमान नावानीच प्रचलित आहे.  मारुती म्हटल की त्याचा अर्थ फक्त मारुती गाडी एवढाच होतो. ``हनुमानका दुसरा नाम मारुती भी है।‘’ असं आजीनी नातवाला सांगितल्यावर आमच्या दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि कम्युनिकेशन गॅप मुळे झालेल्या गमतिचं आम्हाला दोघांनाही हासू आलं पुलंच्या अपूर्वाईत इंडोनेशियात मरुत् ची मुलगी म्हणून मुलीच नाव मारुती ठेवतात ही पण गम्मतच आहे. `देव एक नाम अनेक' हेच खरं.

                   देवाच्या रोजच्या पुजेबाबात हे हिंदू अतिशय काटेकोर असतात. भारतीय दूतावासातील उपउच्चायुक्त श्री. राजीव शहारे यांनी बंगला भाड्यानी घेतला तेंव्हा घरमालकांनी सर्वप्रथम त्यांना विचारलं की तुम्ही रोज ह्या मारुतीची पूजा करणार ना? रोजच्या कामामधे त्यांना पूजा करणं जमणार नाही हे कळल्यावर मालकानी गुरुजींना बोलावून विधिवत् मंत्र म्हणून महावीर मारुतीची मूर्ती काढून घेतली आणि मंदिर बंद केलं. हिंदू राज्य नसूनही हिंदुत्व जपायला मॉरिशस मधे कायद्याचा अथवा घटनेचा आसूड सूड म्हणून  उगारत नाहीत. सरकारी गाडी, कचेरी, दवाखाने अशा ठिकाणीही देव पाठीराखा असतो. येताजाता एका बंगल्याच्या ओसरीवरच्या कोनाडयात एक सुबक गणेश मूर्ती दिसे. संध्याकाळी त्याच्याभोवती इलेक्ट्रिकच्या दिव्यांची माळ चमचमत असे मूर्तीच नातं पेणच्या मातीशी आहे हे गणपतीचे रेखीव अवयव आणि डोळेच सांगत. गेटबाहेर सुबक रांगोळी पांढर्या ऑइलपेंटने चितारलेली दिसे. मालकीणीला कुतुहलानी प्रश्न विचारणं मात्र `मेरे बस की बात नव्हती. एक तर इथे पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे लोक एकमेकांना फोन करून मगच घरी जातात त्यामुळे दारावर घंटी नावाचा प्रकार नसतो. नवीन माणसांच्या स्वागताला भलीदांडगी कुत्री ठेवली असल्याने  आतल्या माणसाशी ओळख करून घेण्यापेक्षा `यः पलायते जीवति।' हेच खरं. कोण्या एका सकाळी  प्रवीण आणि मी फिरायला गेलो असता तिळा तिळा दार उघड म्हटल्यावर अलिबाबाच्या गुहेच दार उघडावं तस समोरचं प्रचंड दार हळुहळु सरकायला लागलं. बघता बघता चायनीज रेड रंगाची मर्सीडीज त्यातून दिमाखात बाहेर पडली थोडावेळ थांबली. मघाशी दरवाजा जसा हळु हळु उघडत गेला तसा हळुहळु  आपोआप  बंद झाला. गाडी भुर्रकन् निघुनही गेली.

------------------------------------------------------------------------------------------------

4 मॉरिशसची तोंड ओळख -

       मॉरिशसच्या नकाशांचे शाळेचे पुस्तक -               

         मॉरिशसला गेल्यावर सर्वप्रथम मी बाजारात जाऊन शाळेची पुस्तकं कुठे मिळतात त्याची चौकशी करून ते दुकान शोधून काढलं. मला मॉरिशसच्या नकाशांचं हवं असलेलं पुस्तक तेथे मिळालं. मला नुसते रोड मॅप्स नको होते. तेथील नद्यांची नाव, डोंगराची नावं, शिखरांची नावं, राजकीय, आजुबाजूच्या बेट-बेटुल्यांची नावं, पाऊस, पिकं, बंदर, शेजारी देश, देशात कुठल्या इतर देशांची विमानं येतात, ही मला पाहिजे असलेली माहिती पाहून मी हरखून गेले. मॉरिशस बस सेवेचं एक पुस्तकही  क्वात्र बोर्नच्या बस डेपोत उपलब्ध झालं. आता मॉरिशसची मुशाफिरी करायला मी मोकळी होते. मुंबई दर्शन, किंवा आपल्याकडे असलेल्या प्रत्येक राज्याच्या टुरिस्ट बसेस सारखी येथे टुरिस्टसाठी सरकारी बसेसची वेगळी सोय नव्हती. टुरिस्टनी प्रायव्हेट टॅक्सीनेच हवे तेथे जाणे अपेक्षित होते.  टुरिझमचा कुठलाही बोजा स्वतःच्या डोक्यावर घेता सरकारने टुरिझमला पाठिंबा दिला होता. इतकच नव्हे तर इथले कित्येक सुंदर डोंगर, समुद्र किनारे, रमणीय जागा, अगदि नद्या सुद्धा सरकारने हॉटेल्स आणि टुरिझमसाठी विकून टाकल्या आहेत. बहुतेक सर्व सुंदर जागा ह्या प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याने त्या जागांची चांगली काळजी घेण्याचं काम, त्या सुंदर बनविण्याचं काम हे त्या मालकांकडेच असतं. मॉरिशसच्या जनसामान्य नागरिकांना त्यांचे नियम पाळून आणि त्यांचे मूल्य भरूनच तेथे प्रवेश करता येतो. तेथे खुले आम वावरता येत नाही.

पोस्ट ऑफिस -

ईमेलच्या जोडीने माझी पत्राची सवय थोडीफार टिकून होती. कारण तेंव्हा मराठी टायपिंगची सोय इतकी चुटकीसरशी हाताशी नव्हती. whats app चा जमाना सुरू झाला नव्हता. आई, लाडका लेक, नातेवाईक  ह्यांना अधुन मधुन पत्र लिहायच म्हणजे मला पोस्ट ऑफिस गाठावं लागे. पोस्ट ऑफिसमधे गर्दी असे पण तेथील स्टँप्स, पाकिटं, आंतर्देशीय पत्र इतकी सुरेख असत की कित्येक वेळा भारतात येतांना मुलांना द्यायला मॉरिशसची गम्मत म्हणून छानछान स्टँप्स आणत असे.         

 वाचनालय आणि  मॉरिशसचा इतिहास (Mauritius : History) -

                  क्वात्रबोर्नच्या म्युन्सिपाल्टीमधे एक छान पुस्तकालय असल्याने लगेचच मी त्याचं सदस्यत्व घेतलं. तेथे सर्व वर्तमानपत्रे येत असत. पण ती फ्रेंच असत. इंग्रजी National Geographic ची पुस्तकं येत. संपूर्ण शेक्सपिअर आणि संदर्भग्रंथ होते.  बहुतेक फ्रेंच पुस्तक असली तरी  मॉरिशसच्या भूतकाळावर प्रकाश टाकणारी काही छोटी छोटी इंग्रजी पुस्तकं उपलब्ध होती. मॉरिशसमधे कामगार किंवा गुलाम म्हणून आलेल्या लोकांची आत्मवृत्तही होती. अथवा त्यांच्या मुला-नातवांनी लिहिलेली त्यांची माहिती होती.

            एक पुस्तक अफ्रिकेतून आलेल्या अफ्रिकन वंशाच्या नातु, पणतु किंवा खापरपणतु यापैकी कोणीतरी त्यांच्या पूर्वजांबद्दल लिहिलेलं होतं. गुलाम म्हणून त्यांना आणल्यानंतर त्यांचे झालेले हाल, ह्यासोबतच त्यांचे तिथले त्यावेळचे जीवन ह्याचीही माहिती देणारं होतं. गवताने शाकारलेल्या मातीच्या छोट्याशा झोपडीत त्यांच कुटंब रहात असे. आई बाबा सकाळीच शेतात राबायला जात. मिळेल तो दगड, किंवा चिंध्यांच्या चेंडू बरोबर खेळत रहावं लागे. संडासला लागली तर घराबाहेर कुठेही बसायचं. फ्रेंचांनी त्यांच्या ह्या सवयीला सक्त आळा घातला. तेंव्हापासूनच मॉरिशस हागणदारी मुक्त केलं गेलं.

               काही पुस्तकातील ती गुलामगीरीची भीषण वर्णन वाचल्यावर सारे प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यापुढुन सरकत होते. वाटलं, अफ्रिकेतून आणलेल्या काळ्या गुलांमाची कातडी लोंबेपर्यंत त्यांच्यावर ओढलेले आसूड आणि त्यांच्या प्राणांतिक किंकाळ्या आजही लेमोर्न पहाडाच्या शांत स्तब्ध कडे-कपारीत घुमत असतील. लेमोर्नचा अर्थच मरणाचा डोंगर! मृत्यूचा पहाड!! यमाचा सापळा!!! ज्या काळ्या गुलामांना पळून जाण्यात यश मिळालं, त्यांनी बेसॉल्टच्या बनलेल्या ह्या काळ्या कभिन्न पत्थराचा आश्रय घेतला. जीवन जगण्यासाठी नव्हे तर जीवन समुद्रात विसर्जित करण्यासाठी. ह्या काळ्या पहाडावरून समुद्रात उडी मारून जीवन संपवणं हे फ्रेंच्यांच्या अत्याचारापेक्षा सुसह्य होतं. ह्या सरळसोट पहाडीखाली पसरलेला अथांग समुद्र कनवाळुपणे ह्या गुलामांना कायमचं पोटात घेई.

मॉरिशसच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिण टोकावर  उभा असलेला 1824 फूट उंचीचा हा पर्वत आजही गुलामगिरी विरुद्ध दिलेल्या लढ्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. गोर्यांनी काळ्यांवर केलेल्या भीषण अत्याचाराचं प्रतीक! ह्या पर्वतावर अनेक गुहा आणि लपायला असलेल्या ठिकाणांमुळे काही जण त्यात लपून छपून राहिलेही. 1770 ते 1830 पर्यंत ह्या पर्वताने  ह्या कृष्णवर्णी लोकांना आश्रय दिला.

पँम्पलेमूसच्या खोर्याने ( bassin de Pamplemousses) आजही ह्या गुलामांच्या आठवणी ताज्या ठेवल्या आहेत. बाजारात किंवा मॉलमधे विकण्यासाठी जशा वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. तसा गुलामांनाही बाजारात रांगेत उभे केले जाई. भाजीपाला विकण्यापूर्वी जसा धुवून मग ठेवला जातो तसे गुलामांना खरारा करून धुतले जाई. प्रदर्शनात ठेवलेली  वस्तू जशी पारखून  विकत घेतली जाते तसे विकत घेण्यापूर्वी  गुलामांना निवडून मग त्यांची रवानगी त्यांच्या गोर्या मालकाकडे केली जाई. अशाप्रकारे एक लाख साठ हजार गुलाम मॉरिशसच्या बेटावर आणल्याची नोंद आहे. मॉरिशसमधे 1834 ला गुलामांच्या व्यापारावर आणि माणसांना गुलाम म्हणून वागवायला अखेर बंदी घालण्यात आली. `आमचे पूर्वज गुलाम होते. आमच्या कातडीचा रंग हा त्यांच्याकडूनच आमच्याकडे आला आहे. आम्ही त्यांचे बलिदान विसरलो नाही.' असे सांगत आजही इथे असलेली त्यांची प्रजा आपल्या पूर्वजांच्या ऋणाचे स्मरण ठेऊन आहे. आणि त्याच बरोबर फ्रेंच्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी झालेल्या गुलामांच्या व्यापाराचेही! गुलामांच्या व्यापाराचं स्मरण आणि गुलामगिरीला विराम ह्यासाठी सर्व जगात 23 ऑगस्ट हा दिवस पाळला जातो. हैती, सेनेगल, मॉरिशस ह्या ठिकाणी ह्या दिवसाचं स्मरण होणे अशक्य. 

        

   

 

    मौखिक इतिहास -       

          एका छोट्याशा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझे डोळे खिळून राहिले. धोतर, बाराबंदी, मुंडासं, जोडे घातलेल्या आठरा एकोणीस वर्षाच्या तरुणाबरोबर नऊवारी साडी नेसलेली, कपाळावर कुंकवाची आडवी चिरी रेखाटलेली, एका हाताने डोक्यावरचा ईरकली लुगड्याचा पदर सावरत दुसर्या हाताने कमरेवरचं गाठोडं आवळून धरणारी सोळा सतरा वर्षांची तरुणी मला शतक दोन शतक मागे घेऊन गेले. तरुणाच्या हाती फिरकीचा तांब्या, डोक्यावर अंथरूण-पांघरुणाची वळकटी. एका मॉरिशियन मराठी लेखकाने आपल्या पूर्वजांच्या  लिहिलेल्या आठवणी होत्या त्या. त्यांच्या पूर्वजांना आपल्या आठवणी लिहिता याव्यात इतका  स्वस्थ काळ मिळाला नाही. कित्येकांना लिखाणाची कलाही अवगत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येथे मौखिक इतिहासाला (Oral History) लिखित इतिहासाइतकच महत्त्व दिलं जातं. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी पुढच्या पिढीला सांगितल्या जातात. इतकेच नव्हे तर त्यांचे पूर्वज येतांना घेऊन आलेल्या उखळ, मुसळ, पाटावरवंटा यांचीही वाटणी होते. चांगल्या चांगल्या नवीन पद्धतींच्या पॉश बंगल्यामधेही ओट्यावर सिमेंटमधे बसवून घेतलेला पाटावरवंटा मी पाहिला. तर कुठे स्वयंपाकघराच्या कोपर्यात उभं असलेलं उखळ आणि मुसळ भारतीय वंशाच्या बांधवांनी आम्हाला कौतुकानी स्वयंपाकघरात नेऊन दाखवलं. ``आमची जेंव्हा वाटणी झाली तेंव्हा माझ्या वाट्याला माझ्या आज्याचं हे उखळ आणि मुसळ आलं. माझी बहीण जातं घेऊन गेली. माझ्या भावाकडे पाटावरवंटा आहे. ''  पूर्वजांच्या गरीबीतही असलेली मायेची उब पाटावरवंटा. उखळ, जातं ह्या रूपात सांभाळून ठेवली आहे असं वाटलं. `` हे आमच्या आज्याच!'' ( मराठी लोकं अजूनही आपल्या पूर्वजांचा उल्लेख आज्या म्हणून करतात.) आपल्या पूर्वजांनी केलेल्या काबाडकष्टांमुळेच आपण आज आपण श्रीमंत झालो. सुशिक्षित झालो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात समईच्या ज्योतीसारखी मंद आणि शांत प्रकाश देत तेवत होती.

 आप्रवासी घाट -  

          ज्या भारतीय वेठबिगारांच्या हातांनी मॉरिशस घडलं, ज्या भारतीय वेठबिगारांमुळे मॉरिशसची भूमी सुजला, सुफला झाली, ज्या वेठबिगारांमुळे  संपूर्ण मॉरिशसच रुपांतर हिरव्यागार उसाच्या शेतीत झालं, जे वेठबिगार आपले आई-वडिल, कुटुंब, मुलेबाळे भारतात सोडून येथे आले असता ज्यांना परत आपल्या कुटुंबियांचं दर्शनही झालं नाही, ज्यांना आपल्या मातृभूमीची ओढ असूनही ब्रिटिशांनी त्यांचे मातृभूमीला परतण्याचे दोर कधीच कापून टाकले, त्या आपल्या भारतीय पूर्वजांनी मॉरिशसमधे त्यांचं पहिलं पाऊल ठेवलं ती वास्तू म्हणजे पोर्ट लुईच्या Trou Fanfaron  या भागातील  `आप्रवासी घाट'.  पूर्वी त्याला `कूली घाट' असं म्हटलं जाई. आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाबद्दल असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेमुळे ह्या वास्तूबद्दल लोकांच्या मनात नाजुक भावना आहेत. हे लक्षात घेऊन 1987 ला त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्या वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला गेला. मॉरिशसमधे जो अनेक संस्कृतींचा संगम पहायला मिळतो, जणु  आप्रवासी घाट हे त्याचेच चिह्न आहे. गुलामीचा कायदा संपुष्टात आल्यावर, 1830 ते 1920 या काळात 4,50,000 वेठबिगार भारत, चीन, मादागास्करहून आपली मातृभूमी सोडून येथे दाखल झाले. बहुतेकजण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहिले. मरतांना आपली मुले  अजुन पुढे काम करण्यासाठी इथेच सोडून गेले. सिंहाच्या गुहेत आत जाणार्या प्राण्याच्या  पावलांचे ठसे दिसतात. पण बाहेर पडणार्या पावलांची निशाणी दिसत नाही हे सांगणारा पंचतंत्रातील चतुर कोल्हा आठवून गेला.

ह्या आलेल्या सर्व लोकांची दोन दिवस तात्पुरती रहाण्याची, जेवणाची, झोपायची व्यवस्था येथे उभारलेल्या आगारात करण्यात येत असे.

 1849 ला येथे Immigration विभागाने, आलेल्या  मजुरांची नोंद ठेवण्यासाठी सुरक्षा विभाग  (protector of the Immigrants) सुरू केला.  नवीन आलेल्या वेठबिगारांना येथे उतरवून घेणे, त्यांचे फोटो काढणे, त्यांचे नाव इत्यादि माहितीची नोंद करून घेणे, त्यांना मॉरिशससाठी  प्रवेशपत्र देणे, विविध साखर-क्षेत्रांमधे त्यांची वाटणी/ नेमणूक करणे, सार्वजनिक बांधकामांवर त्यांची नेमणूक करणे किंवा कामाशिवाय फिरणार्या वेठबिगारांना शोधून काढून त्यांना कामाला लावणे, लग्नाचा दाखला देणे,  त्यांच्याकडून कर गोळा करणे, वेठबिगार जेथे जेथे काम करत असतील तेथे त्यांच्यावर लक्ष ठेवणे, वारंवार तेथे भेटी देणे, त्यांची स्वच्छता, सांडपाणी आणि मैल्याची योग्य विल्हेवाट लावली जाण्याकडे काटेकोर लक्ष देणे, ही कामे या कार्यालयातून केली जात.

आज मॉरिशसच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे ह्या  वास्तूला जागतिक सांस्कृतिक वारशाचे ठिकाण (World Heritage Site) म्हणून युनेस्कोने (UNESCO) 2006 ला मान्यता दिली आहे.

             आजही  भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान मॉरिशसला आले की ह्या स्थळाला भेट देऊन पुष्पचक्र वाहून ह्या लोकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्याच्या बलिदानाची  आठवण ताजी ठेवतात.  आम्ही मॉरिशसला असतांनाच्या दोन वर्षात पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मॉरिशस भेटीचा प्रारंभ ह्या वास्तूला भेट देऊनच झाला होता. श्री. कलामांनी आप्रवासी घाटावर काढलेले उद्गार आजही मला आठवतात. "Our ancestors did sweat, sweat, sweat, and sweat to make this country what it is today. - - आपले पूर्वज इथे  राब राब राबले त्यांनी गाळलेल्या घामातून आज दिसणारं हे सुंदर राष्ट्र उभं राहिलं आज आमच्या युवकांनी इथे येऊन आपल्या पूर्वजांनी केलेल्या  अपरिमित कष्टांची नोंद घेतली पाहिजे. आप्रवासी घाट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालून जणु सांगत आहे की, कठोर कष्टांशिवाय कुठलीही चागली गोष्ट साध्य होत नाही. ''

पोर्ट लुईचा किल्ला - (The Citadel / Fort Adelaide)

               आप्रवासी घाटासोबत उल्लेख करायला पाहिजे तो पोर्ट लुईच्या किल्ल्याचा. हा किल्ला `सिटॅडेल किंवा फोर्ट एडलेड नावाने ओळखला जातो. समुद्र-सपाटीपासून चांगला 240 फूट ऊंचीवर असल्याने अगदि किल्याच्या नाकाखालीच असलेल्या शहरात काय चाललं आहे त्याच्यावर कडक नजर ठेवायला जसा तो उपयोगी होता; तसाच येथून दिसणार्या विशाल समुद्र, आणि पोर्टलुईच्या बंदरावर, जहाजांवर लक्ष ठेवायलाही ही जागा  सुयोग्य होती. किंबहुना त्या जागेचं स्थान महात्म्य पाहूनच 1834 - 1840 मधे गव्हर्नर सर विल्यम निकोलाय (Sir William Nicolay) ह्यांच्या काळात  हा किल्ला बांधला गेला होता. विल्यम 4 ह्यांची पत्नी एडलेडचं नाव ह्या किल्ल्याला मिळालं. हा किल्ला शत्रूच्या आगमनाची वार्ता सतत देत राहिला. ह्या किल्ल्यामुळेच येथे आलेला कोणी प्रवासी येथून निसटु शकला नाही.

           ``ग्लोबल इन्शुरन्स’’ कंपनीचे प्रमुख आमचे मुंबईचे मित्र श्रीनिवासन आणि त्यांची पत्नी चंद्रा ही नवी जागा दाखवायला आम्हाला घेऊन आले होते.  रस्त्याच्या दुतर्फा  वाढलेल्या उंच उंच सवाना गवतातून वळणं वळणं घेत गाडी जातांना बाहेरचा वारा सुरेल बासरी वाजवत होता . गाडी टेकडीच्या शिखरावर पोचली. गाडीतून बाहेर आलो आणि समोरच्या दृश्यात  कधी हरवून गेलो  हे कळलच नाही. डावीकडे मॉरिशसच्या रेसकोर्सचा ट्रॅक, (Champ de Mars)  त्यामागे  ऐटीत उभा असलेला `ले पुस' (Le Pouce -Le म्हणजे इग्रजीत The आणि पुस म्हणजे Thumb -अंगठा) डोंगराचा कडा आपल्याकडील `नानाच्या अंगठ्याची' आठवण करून देत होता. तर उजवीकडे पसरलेला विशाल निळाशार समुद्र, नांगर टाकून उभी असलेली जहाजं, उंच इमारती. पोर्टलुईचा सारा परिसर नजरेच्या टप्यात होता. त्याचं स्थानिक महात्म्य आजही तेवढच मोलाचं वाटलं. सतत वाहणारा वारा डोक्यावरील टोप्यांना आणि केसांना त्यांच्या जागेवरून उडवत होता, तर इतिहासामागे आणि निसर्गामागे धावणार्या मनाला मात्र वारंवार भानावर आणत होता. हवेतला प्राणवायू वाढलेला पाहून आपली परवानगी घेताच नाकने फुफ्फुसांच्या पिशव्या भरभरून प्राणवायू साठवून घ्यायला सुरवात केली.  किल्ल्याच्या भिंतीवरून हिंडतांना पुण्याच्या पर्वतीवरील किल्ल्याच्या रुंद भिंतीची आणि त्यावरून  30- 40 वर्षापूर्वी दिसणार्या पुण्याची आठवण करून दिली.

 

मॉरिशसचा थोडक्यात इतिहास -

                                    

coat of Arms ("Star and key of Indian ocean")

 

                     1598 पर्यंत मॉरिशस हे बेट मानवाकडून दुर्लक्षित, अस्पर्शितच राहून गेलं होतं. पृथ्वीवर इतर ठिकाणी सापडणार्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचं तेथे असलेलं जीव वैविध्य इतर ठिकाणी क्वचितच सापडलं असतं. येथे येणारी अरबांची जहाजं मॉरिशसला विश्रांतीसाठी थोडावेळ थांबत होती पण मॉरिशसवर वस्ती मात्र कोणी केली नाही. 1638 ला मात्र इच लोकांनी तिथे वस्ती करायला सुरवात केली. युरोपवरुन अख्ख्या अफ्रिकेला वळसा घालून आल्यावर  ह्या बेटावर मुक्कामाला थांबण हे त्यांना आवश्यक होतं. युरोप ते भारत ह्या जलमार्गावरील हा सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा थांबा होता. मॉरिशसच्या दक्षिण पूर्व किनार्यावर Old Grand Port येथे डचांनी वसाहत स्थापन करण्यास सुरवात केली. ह्या बेटावरील पहिली वसाहत म्हणून तेथे आज The Frederik Hendrik Museum असे डच कॉलनीचे म्युझियम आहे. Key and Star of Indian Ocean  ही पदवी म्हणुनच ह्या बेटाला लाभली. जी आज मॉरिशसच्या Coat of Arms वर विद्यमान आहे. आजही Indian Ocean मधे मॉरिशसचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण आशिया आणि आफ्रिका खंडावर नजर ठेवण्यास मॉरिशस इतकी योग्य जागा नाही ज्यामुळे सर्वदेश मॉरिशसवर कृपा-वर्षाव करत असतात. सिंधुसागरातल्या (Indian Ocean) चीनच्या अनिर्बंध हालचालींवर योग्य नियंत्रण ठेवता यावं ह्यासाठी भारतालाही राजकीय दृष्ट्या मॉरिशसची मैत्री आवश्यक आहे. मॉरिशसमधील आगालिगा (Agalega) हे बेट भारतासाठी त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे मॉरिशसला जेटी बांधून देऊन बंदर विकासाचे काम भारत करीत आहे. त्यातून  आगालिगा संदर्भात भारत संवेदनाशील आहे हे अधोरेखीत होते.

                 बेटावर असलेलं गोडं पाणी, मुबलक मिळणारे डोडो पक्षी, प्रचंड मोठी कासवं ह्यामुळे डचांच्या उदरभरणाचीही सोय झाली. थोड्याच दिवसात ह्या प्राणीजीवनावर संक्रांत आली. बघता बघता डोडो जमिनीवरून नामशेष झाले. तीच गत अनेक प्रकारच्या कासवाचीही झाली. त्यांच्या भक्कम पाठी कॅबिनेट्स् बनवायच्या कामी उपयोगात आल्या. डोडो, सॉलितायर सारखे अनेक पक्षी  हे त्यांच्या उडता येण्यामुळे डचांच्या क्रौर्याचे शिकार झाले. डोडो हा पक्षी वर्षाला एकच अंड घालत असे आणि तेसुद्धा जमिनीवर. त्यामुळे डचांनी बरोबर आणलेल्या कुत्र्या, मांजरांना आणि  जहाजातून धान्यसाठ्यासोबत आलेल्या उंदरानाही त्यांची शिकार सोपी झाली.  त्यांनीही हे पक्षी संपवण्यास हातभार लावला.

               डचांच्या जिह्वालौल्याने जसे इथले अनेक प्राणी जगाच्या पाठीवरून नामशेष झाले तसे डचांच्याच जिह्वालौल्याने काही प्राणी  या बेटावर नव्याने आलेही. डचांनी इंडोनेशियाच्या बेटांवर सापडणारी `जावा रुसा' जातीची हरणं खाण्यासाठी ह्या बेटावर आणली. त्यांना कुंपणात बंदिस्त ठेवलेलं असतांनाच आलेल्या वादळात कुंपण मोडून हरणं आसपासच्या रानात पळून गेली. मॉरिशसमधे शिकारी प्राणी, पक्षी नसल्याने ह्या हरणांची संख्या बघता बघता एवढी वाढली की त्यांचे कळपच्या कळप रानावनात हिंडून तेथील गवत आणि झाडं फस्त करु लागले.

             आजही जून ते ऑक्टोबर हा काळ मॉरिशसमधे शिकरप्रेमींना पर्वणीच मानला जातो. आणि अनेक दुकानात आणि हॉटेल्समधे हरणाचं मांस मिळेल अशा पाट्या दिसायला लागतात. एकेकाळी मॉरिशसचे रहिवासी असलेले पण आता नामशेष झालेले डोडो आणि पूर्वी मॉरिशसमधे नसलेली पण आता मॉरिशसच ज्यांची जन्मभूमी झाली आहे अशी रूसा हरणं ह्याही दोघांना उसासोबत मॉरिशसच्या `कोट ऑफ आर्मस्' वर स्थान मिळालं आहे.

                1710 पर्यंत डच लोकांचं वर्चस्व असलेली ही भूमी 1715 मध्ये फ्रेंच्यांच्या ताब्यात आली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने इथला कारभार पहायला सुरवात केली. वसाहती वसवायला सुरवात झाली. Île de France ह्या नावाने बेटाचं बारसं झालं. 1767 पासून शेजारीच असलेल्या मादागास्कर, मोझांबिक आणि अफ्रिकेच्या अनेक भागांमधून इथे गुलाम आणायला सुरवात झाली. ह्या गुलांमांच्या कष्टप्रद जीवनाची चुणुक आजही इथल्या माहेबुर्गच्या म्युझियम मधल्या चित्रांमधे पहायला मिळते. “ माणसाला जे जे रोग होऊ शकतात ते आम्हालाही होऊ शकतातअसं सांगणार्या गुलामांची करूण कहाणी चित्ररूपात तेथे पहायला मिळते. जहाजाच्या तळाशी एकावर एक कोंबड्या डुकरांप्रमाणे लादून आणलेल्या गुलामांची चित्र आजही माणूसकीला काळिमा वाटतात.

                 1810 मधे ब्रिटेन आणि फ्रांसच्या युद्धात ब्रिटेनची सरशी झाली Île de France ब्रिटिश राज्याला जोडलं गेलं. परत एकदा नव्यानं त्याचं बारसं होऊन त्याचं नाव मॉरिशस ठेवण्यात आलं. गाय विकली की तिच्या दूधावर अवलंबून असलेलं वासरूही गायीबरोबर दिलं जातं तसं 1814 ला पॅरिसच्या तहानुसार मॉरिशसचे दोन्ही हात धरून उभी असलेली रॉड्रिग्ज आणि सेशल ही बेटंही ब्रिटनकडे गेली.

               ब्रिटिशांसोबत झालेल्या युद्धात हरल्यावरही फ्रेंचांनी मॉरिशस आणि आजुबाजूच्या देशांमधे शालेय शिक्षण फ्रेंचमधून मिळावं असा आग्रह धरला. पर्यायाने या देशांची नाळ फ्रांसच्या वातावरणाला बांधली गेली. आणि फ्रेंचांचे वर्चस्व कायमचे मान्य करून त्या देशाशीच जवळीक साधू लागली. पण त्या देशाचे नागरीक म्हणून नाही तर त्या देशावर अवलंबून असलेले दुय्यम म्हणून. इंग्रजी राष्ट्रभाषा असली तरी संपूर्ण मॉरिशसमधे फ्रेंच आणि क्रेयॉल ह्याच रस्त्या,बाजारातून वाहणार्या भाषा आहेत.

मातृभाषेतूनच पोसल्या जाणार्या आपल्या संस्कृतीचा भक्कम आधार तुटलेले हे सारे अफ्रिकी खंडातील देश दोर तुटलेल्या पतंगांसारखे पाश्चिमात्य संस्कृतीच्या आकाशात गोते खात आहेत. मूळं तोडून टाकलेल्या वृक्षांसारखे उन्मळून पडत आहेत. श्रद्धा डळमळीत झाली की त्याक्षणीच जीवन अर्थहीन झाल्याशिवाय रहात नाही.  फ्रेंचांनी हेच मर्म बरोबर ओळखलं. पण आम्हा भारतीयांना कधी कळणार?

                   आत्तापर्यंत गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली होती कायद्याने आणि कागदावर. 1834 साली नोंदणी केलेले 68,616 गुलाम त्या बेटावर होते. त्याजागी आता वेठबिगारी (indentured labourers) ची प्रथा सुरू झाली. गुलामगिरीची ही सुधारित आवृत्ती. मुक्तता इथेही नाही. मालकाच्या मनाप्रमाणे राबणं आलच.  इंग्रजांचं राज्य भारतावर होतच. एकट्या भारतातून दोन लाख मजूर नेल्याची नोंद आहे. थोडे चिनी व्यापारी आणि काही भारतीय व्यापारीही त्यात सामील झाले. 1835 ला जेमतेम एक लाख लोकसंख्या असलेल्या देशाची लोकसंख्या शतका अखेर 3,71,000 पर्यंत फुगली.

  साखर

                ब्रिटनला आणि युरोपला साखरेची जरूर होती. ती हमखास मिळण्याची जागा त्यांनी शोधून काढली. ती म्हणजे मॉरिशस. आज मॉरिशसला युरोपच्या साखरेचं पोतं म्हणायला काही हरकत नाही, फारच गोड शब्दात युरोपचा साखरेचा क्युब म्हणु या हव तर. युरोपला लागणारी सगळी साखर तेंव्हापासून आजपावेतो मॉरिशसमधून जाते. मॉरिशसच्या बेटभर कानाकोपर्यात पसरलेल्या उसाचं एकमेव पीक हे युरोपच्या हुकमी बाजारपेठेचं गणित आहे. आजही मॉरिशसमधल्या कुठल्याही मॉलमधे गेलं की साखरेचं एक वेगळ शेल्फच असतं. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची साखर असते. Dark chocolate  सारखी अगदी गडद ब्राऊन पासून पांढरी शुभ्र ह्या दोन टोकाच्या रंगांमधे  ब्राऊन, थोडी कमी ब्राऊन, पिवळसर,  ऑफ व्हाईट, व्हाईट अशी चार पाच रंगांची तरी साखर असते. ब्राऊन साखर आपल्या गुळासारखी खमंग असे.  आपण वापरतो ती नेहमीची साखर 4 रु. पौंड असे तर मीठ मात्र 10 रु पौंड. म्हणून आम्ही मॉरिशसला साखरेपेक्षा मीठ महाग असलेला देश म्हणत असू. पण आज गोड वाटणार्या साखरेमागचा इतिहास मात्र फार कडू होता.

                     इंग्रजांना  मॉरिशसमधे उसाची लागवड करायची होती. ह्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करणं आवश्यक होतं. मॉरिशस हे बेट हे लाव्हापासून तयार झाले आहे. येथील जमिनीचा पोत चांगला होता पण इथल्या जमिनीवर प्रचंड मोठे धोंडे जागोजागी पडलेले होते; चेंडू एवढ्या आकारापासून खोली एवढ्या आकारापर्यंत. मॉरिशसच्या सुबाना बिस्किट कंपनीचे मालक आणि आमचे मित्र रामधनी यांचे फुफाजी एकदा आम्हाला भेटले होते. त्यांनी आम्हाला विचारलं, ``भारतातही जमिनीवर असेच धोंडे, शिळा सापडतात का?'' आजही पाहिलं तर मॉरिशसच्या जमिनीवर भलेमोठे धोंडे, प्रचंड शिळा दिसतात. त्या दूर करणं आवश्यक होतं. भारतात इंग्रजांनी हूल उठवून दिली, मॉरिशसमधे दगड दूर केला की सोनच सोन सापडतं. मॉरिसस कुठे आहे, किती दूर आहे याची इथल्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. सोनं सापडेल ह्या खोट्या आश्वासनावर आणि आशेवर सर्व प्रांतांमधील दोन लाखापेक्षा अधिक गरीब भारतीय प्रजा त्यांना माहीत नसलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाले. जातांना अनेकजण आपल्याबरोबर बायका, मुलं,  आंबा, फणस जी आवडत असतील ती झाडं, कुत्री मांजरी, आपलं सारं चंबुगबाळं घेऊन गेले. अनेकांचे म्हातारे आई-वडिल भारतातच राहून गेले. अज्ञानाने माणसांचा नुसता धूळ, कचरा करून टाकला. सोनं मिळण्याच्या आशेच्या वावटळीने ह्या मानवी धूळीला मनोरथांचं अंतराळ फिरवून असचं सोडून दिलं कुठेही! अधांतरी नाहीतर पायतळी. अनेक बोटीत मेले. पहाटे चार वाजताच त्यांना जेवण देऊन पाच वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतले जाई.

                    पूर्वी भारतात अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर माणसांना लुबाडून मारून टाकायचा. प्रत्येक मारलेल्या माणसाची करंगळी कापून घ्यायला विसरायचा नाही. ह्या सगळ्या करंगळ्यांच्या माळा करून तो गळ्यात घाले. वाल्याकोळ्याने, मारलेल्या लोकांच्या नावाने एक एक खडा रांजणात टाकला. त्याने रांजणही भरून गेला.  त्याचप्रमाणे आजही मॉरिशसला  शेतांच्या बांधाबांधावर रचून ठेवलेल्या  छोट्या मोठ्या दगड आणि शिळा याच्या राशी अंगुलीमालच्या गळ्यातील करंगळ्यांच्या माळांची आठवण करुन देतात. ठिकठिकाणी उसाच्या फडासाठी केलेली कुंपणं ह्याच दगड धोंड्यांनी बनलेली आहेत. तर कधी शेताच्या अधे मधे मोठाल्या शिळांच्या राशी आढळतात. दगडाखालील साखरेचं गोड सोनं मात्र काही मोजक्यांच्याच खिशात गेलं. आजही मॉरिशला असलेली विस्तृत उस शेती मोजक्याच फ्रेंच कुटुंबियांच्या मालकीची आहे. आणि आजही शेताशेतांच्या कडेला ढीग बनवून ठेवलेल्या  धोंड्यांच्या राशी ह्या आपल्या पूर्वजांच्या कष्टांची ग्वाही देत उभ्या दिसतील. ह्या कष्टकर्यांना दिवसभर कष्ट केल्यावर संध्याकाळी वेळ घालवायला काही साधन नसे. संध्याकाळचा वेळ कसा घालवायचा ह्या विचाराने अनेक जण दारू पिऊ लागले. अशांसाठी ख्रिश्चन मिशनर्यांनी त्यांची प्रवचने सुरू केली. ह्या धर्मप्रसार मोहिमेत प्रामुख्याने अनेक तामीळ  ख्रिश्चन झाले.

            तेंव्हाही बिहारी मजूर त्यांच्या अंगभूत कणखरपणाने खूप कष्टातूनही निभावून गेले. आणि आजही हिंदू धर्म टिकवून आहेत. केरळी माणसांचा ह्या प्रचंड काबाडकष्टांपुढे निभाव लागला नाही. आज त्यांचे कोणी वंशज तेथे दिसत नाहीत. परकीयांची चाकरी करायची नाही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूशीतून तयार झालेले मराठे इंग्रजांना गुंगारा देऊन तेथील Seven Cascade (सात टप्प्यांवरून कोसळणारा धबधबा)च्या दरीत लपून बसले. त्या दरीत डोकावून पाहिल्यावर आजही चक्रावून जायला होतं. हे तेथे आत उतरले कसे असतील आणि त्या दरीत त्यांनी शेती कशी केली असेल कोण जाणे. हे मराठी लोकं त्यांच्या मोठ्या मोठ्या कल्लेदार तानाजी मिशांसाठी प्रसिद्ध होते. ( तानाजी मिशा हा वाक्प्रचार खुद्द आमच्या मॉरिशियन मराठी मित्रांकडूनच ऐकला.) त्या दरीत शेती करून उगवेल तेवढ अन्न खाऊन ते राहिले. तयार केलेल्या, वहाणा, दोर्या इत्यादि बारिक सारिक वस्तू ते दरी चढून येऊन विकून जात असत; ते सुद्धा इंग्रजांचा डोळा चुकवून. बरेच दिवस आपल्या छपरी मिशांमुळे ओळखले जाणारे  मर्हाटे  आज मात्र त्यांची स्वतंत्र ओळख  दाखवून आहेत.

     येथे आलेल्या भारतीयांना एक ना एक दिवस आपण आपल्या मातृभूमीला परत जाऊ ही आस मनात कायम होती. मातृभूमीशी जोडलेली त्यांची नाळ तेथे जाऊनही तुटली नाही. मिळतील ते राणी छापाचे चांदीचे रुपये फिरकीच्या तांब्यांमधे ते साठवत राहिले.  मातृभूमीला परत जायच्या ओढीने, संपूर्ण आयुष्याची पुंजी साठवलेले हे तांबे चुलीच्या खाली पुरलेले तसेच राहून गेले. इंग्रजांनी त्यांच्या परतीचे दोर कधीच कापून टाकले होते. आता आयुष्याचे दोरही  मधेच तुटले. पण मातृभूमीच्या मातीच्या ओढीचा अंकुर पुढच्या पिढीच्या हृदयात पेरून गेले. आज ते तांबे त्यातील नाण्यांसकट माहेबुर्गच्या म्युझियममधे येऊन दाखल झाले.

                          

मानवी वृक्षाची मुळे -

             इतके दिवस मला असं वाटत होतं की एका जागी उभ्या असलेल्या वृक्षालाच मुळं असतात. ज्यामुळे तो सुखावलेला दिसतो. अविचल, ताठपणे, ठामपणे मातीत उभा असतो. पण मॉरिशसमधे आल्यावर जाणवलं की माणसाला सुद्धा मुळं असतात. ती त्याच्या आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा यांच्या रूपाने `त्यांच्या' जन्मभूमीच्या मातीत अदृश्यपणे खोल खोल रुजलेली असतात. त्याच मातीला घट्ट धरून असतात. नीलगिरीच्या झाडांची साल झडून गेली तरी त्यांचा बुंधा भरभक्कम आधार देत राहतो तसे पूर्वज दिवंगत झाले तरी, त्यांचा इतिहास, त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्त्व, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती त्यांचे आचार, विचार, त्यांचं तत्वज्ञान ह्या रूपात ती (मुळं) मजबूतपणे माणसाला घट्ट धरून ठेवतात. त्या संस्कृतीच्या रसावरच तो माणूस बहरून येतो. मग भले तो माणूस पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणी राहो. अगदि भटक्या जमातींना सुद्धा अशी घट्ट धरून ठेवणारी मूळं असतातच, त्यांच्या संस्कृतीची. सरसर पुढे पुढे धावणारी लाट किनार्यापर्यंत पोचली की परत जशी समुद्रात मागे सरकते तशी आपली माती सोडून बाहेर गेलेली माणसं परत एकदा तरी मातीच्या ओढीनी आपल्या जन्मभूमीचं नातं शोधत इतिहासाची पानं उलटून बघतात. प्रवीणचे अमेरिकेतील एक प्रोफेसर पोलंडचे होते. दुसर्या महायुद्धापूर्वी त्यांच्या पूर्वजांना पोलंड देश सोडायला लागला. सगळे अमेरिकेत येऊन स्थायिक झाले. पण अमेरीकेतील भरपूर सुखसोयींनी युक्त जीवनही त्यांना चैन पडू देत नव्हतं. परत एकदा आपली पितृभूमी पोलंडच्या ओढीने ते पोलंडला जाऊन आले. `` कसं वाटलं तुम्हाला?'' प्रवीणने त्यांना विचारल्यावर विषादाने म्हणाले, ``काहीच राहिलं नाही आमचं तिकडे. आमचं घरही आमचं राहिलं नाही. तेथेही कोणीतरी दुसरेच रहात होते.'' गुलजारसाहेबही असेच पाकिस्तानात जाऊन आले एकदा. आपलं घर पाहून आल्यावर व्यथित होऊन परत कुठेच जाता आपल्या नव्या कर्मभूमीत येऊन दाखल झाले. डोंगरात उगम पावणारी नदी समुद्राला भेटायला आवेगाने खाली उतरते खरी पण परत एकदा वाफेच्या रूपाने ढगात बसून वार्याचे पंख लावून पर्वताला भेटायला माहेरी येतेच. त्याप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधून, वेगवेगळ्या गावांहून मॉरिशसला पोचलेल्या भारतीयांच्या पुढच्या पिढ्या आजही आपली मूळं शोधायला भारतात येतात.  प्रवीण मॉरिशस मधील अर्थ विभागात गेला असता तेथील मोदी नावाच्या सह सचिवांची भेट झाली. प्रवीण भारतीय असल्याचं कळतातच त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे पूर्वज गुजरातचे होते. गुजरातमधील आपली जन्मभूमी शोधून काढून ते जन्मभूमीला भेट देऊन आले होते; हे प्रवीणला सांगतांनाही त्यांचं अतःकरण उचंबळून आलं. कंठ दाटून आला होता. महाराष्ट्रातून  गेलेले मराठी लोकंही आज परत आपलं कोकणातलं गाव शोधत कोकणात येतात. कुडाळकर महाराजांच्या रूपाने त्यांना एक छानसा निवाराही लाभला आहे. त्यांच्या मठात राहून अनेक जण उत्तम पौरोहित्य शिकून परत  आपल्या कर्मभूमीत दाखल झाले आहेत. आपली जन्मभूमी भेटली की तिथेच गुडघे टेकून जमिनीला नमस्कार करावा तेथील मातीने आपल्या कपाळावर मळवट भरावा आणि ऋद्ध कंठाने तिची भेट घ्यावी  आणि मग आपल्या कर्मभूमीला परतावं ही ओढ सर्वांमधे सामायिकपणे दिसून येते. भारत सोडून गेलेल्या आणि अनेक पिढ्या बाहेर राहिलेल्या भारतीय वंशाच्या अनेक लोकांची ही मानसिक गरज लक्षात घेऊन भारताच्या विदेश सचिवालयात खास अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. ज्या लोकांना आपली मूळ गावं पहायची असतील त्यांना त्यांची गावं शोधण्यासाठी योग्य मदत मिळावी, बाकी लोकांकडून त्यांची फसवणूक होऊ नये, ह्याची काळजी घेतली जाते.

मॉरिशसचा किंचितसा भूगोल -

   मुंबईच्या आकारमानापेक्षा (603km2) जवळ जवळ साडेतीनपट  मोठ असलेलं मॉरिशस बेट (2040 km2)  तसं छोटं असलं तरी एवढ्याशा बेटावर हवामानाचंही वैविध्य होतं. पोर्ट लुई हा उत्तरेचा भाग कायम फार गरम असे तर मध्यातील डोंगरावरचा वाकवा-फिनिक्स (Vacoas Phoenix) / क्युपिप (Cure pipe) भाग त्याच्या उंचीमुळे थंड असे. बेटावर सर्वत्र असलेल्या आंब्यांना वेगवेगळ्या वेळी मोहोर येई. ह्या पिटुकल्या बेटावर पोर्ट लुईला सर्वप्रथम आंबे तयार होत तर फिनिक्सला जेमतेम 50 किलोमिटरवर आंब्याला नुकता मोहोर यायला लागलेला असे. विमानतळाला जाण्याच्या रस्त्यावर मधेच काही भाग असा असे की जेथे कायम पाऊस असे. तेवढा पाच-दहा किलोमिटरचा पट्टा गेला की विमानतळावर जाईपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश. गंगातलाव परिसरात असलेल्या डोंगरांमुळे तेथे अधुन मधुन सतत पाऊस पडे. डोंगर दर्यांसोबत दाट जंगलं, जंगलातून जाणारे गुळगुळीत रस्ते, व्होल्कॅनिक क्रेटर्स, अफाट सपाटी अशा अनेक नैसर्गिक गोष्टी सामावल्या होत्या.  संपूर्ण बेटाभोवती असलेली प्रवाळाची भिंत दक्षिणेला तुटली असल्याने बाकी ठिकाणी शांत झोपलेला समुद्र ग्री ग्री आणि सुफले हया दक्षिण टोकांवर लाटांचा धडक मोर्चा घेऊन येत असे. क्वात्र बोर्नहून पोर्ट लुईला जातांनाही जरा मोकळ्या मोटार-वे ला लागलं की पाऊसाची भुरभुर चालू होई. वादळं हा इथला स्थायीभाव.

--------------------------------------------------------------------------------------------------

 5 मॉरिशस मोठं शहर  का छोटा देश - 

        मॉरिशसला स्वातंत्र्य -   

           ``मॉरिशसला ब्रिटनचा अविभाज्य घटक म्हणून रहायचं आहे का स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्व पाहिजे?’’ ह्यासाठी मॉरिशसच्या जनतेचे सार्वमत घेण्यात आले तेंव्हा मॉरिशसच्या जनतेने बहुमताने स्वांतंत्र्याची  तीव्र इच्छा व्यक्त केली. मॉरिशसच्या शेजारी एकेकाळी फ्रेंच कॉलनी असलेल्या रियुनियन ह्या बेटावरच्या लोकांनी मात्र फ्रांस सोबतच राहण्याचे ठरवले. ब्रिटिशांना मॉरिशसला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटनने चलाखीने एक राजकीय नासका डाव खेळला. त्यांच्या Devide and Rule ह्या धूर्त धोरणानुसार बेटबेटुल्यांच्या ह्या देशातील छागोस (दिएगो गार्शिया) बेटबेटुल्यांचा समुह मॉरिशसला न विचारताच मॉरिशसपासून तोडून तो परस्पर अमेरिकेला विकून हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ठेवले. 12 मार्च 1968 ला मॉरिशस स्वतंत्र देश झाला.

          दर वर्षी 12 मार्चला कोडा वॉटर फ्रंट वर मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनाचा समारंभ अत्यंत आनंदाने साजरा होतो. भारताने प्रशिक्षित केलेल्या पोलीसांचे रुबाबदार संचलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. प्रवीण तेथे असतांना मॉरिशस सरकारचे विशेष निमंत्रण असल्याने हा कार्यक्रम पाहता आला. त्यावर्षी ह्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे, भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे मुख्य पाहुणे होते.  

मॉरिशस मधील शहरे आणि खेडी -

  मॉरिशसला एक देश म्हणून पाहिलं की देशाला लागणारी राज्य घटना, रचना, विविध खाती ही आवश्यक होती.  गुगल-मॅपवरचा हलणारा छोटासा पंजा  बाहेरच्या दिशेने सरकवत नेला की देशाच्या नकाशाचा आकार वाढवत नेतो अणि आतल्या दिशेने ओढत आणला तर छोटा छोटा करत त्यांना पिटुकलंही बनवतो. तसं एका मोठ्या देशाला छोटं छोटं करत पिटुकलं मॉरिशस राष्ट्र तयार झालं आहे असं वाटे. येथील राजधानी, शहर, गाव, ह्या संकल्पना मनाला कुठेच पटत नव्हती. मुंबई पुणे मिळून झालेला देश त्यामुळे सर्वच गोष्टी खेळण्यातल्या सारख्या लुटुपुटीच्या वाटत होत्या.  भारताच्या आणि अमेरिकेतील भव्यतेच्या परिमाणापुढे इथे सर्वच विचार इटुकले पिटुकले होते. पुणे, नागपूरच्या एखाद्या छोट्या पेठांपेक्षाही इथली शहरं छोटी  आहेत. आणि गावालगतच्या 40- 50 घरांच्या छोट्या वस्त्यांसारखी छोटी खेडेगावं. पोर्ट लुई हे राजधानीचं शहर आणि क्वात्र बोर्न, रोझ हिल इत्यादि  थोडिशी शहर सोडलं तर बाकी सर्व गावं किंवा खेडीच असली तरी स्वच्छ, सुंदर, निर्मळ असतं. रस्तेही खाचखळगे रहित असतं.

             गर्दीच्या रस्त्यांवर पोलिसांचा वावर जाणवण्यासारखा असे. बाजारातून एक पुरुष आणि एक महिला पोलिस नेव्ही ब्लू पँट आणि फिका नीळा शर्ट  अशा गणवेशात कायम जोडी जोडीने अंतरा अंतरावर पायी गस्त घालत असत. हे सर्व पोलीस  सहा फुटाच्यावर उंच, सपाट पोटाचे असत. त्यांना एखादा पत्ता विचारला तर हसतमुखाने मदत करत. स्वच्छता आणि नियम लोकं कटाक्षाने पाळत. रहदारीचे नियम पाळणे हे काम सर्वच नागरीक कर्तव्य समजून आपणहून करत. त्यासाठी पोलिसांना त्यांचा वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवायला लागत नाही. शांतता असलेल्या पोलीस स्टेशनमधील पोलीस पोलिसस्टेशनच्याच असलेल्या मैदानात आनंदाने व्हॉलिबॉल खेळतांना दिसत. 

            प्रवीणने IPS  मधे प्रवेश केला तेंव्हापासून पोलिंसाबद्दल पूर्वापार चालत आलेल्या कथा आणि दंतकथांनी आमच्या घरात प्रवेश केला. एकदा एक DIG जिल्हा मुख्यायलाला भेट देण्यासाठी आले असतांना वाटेतच असलेल्या पोलिस ग्राऊंडवर त्यांना त्यांचे S.P.  व्हॉलिबॉल खेळतांना दिसले. S.P. स्वतः व्हॉलिबॉल खेळत आहेत म्हणजे जिल्ह्यात कुठे काही गडबड दिसत नाही. सर्व जिल्ह्याचा कारभार सुरळीत आणि शांतपणे चालू आहे. मला भेट द्यायची काही जरूर नाही असं म्हणून DIG. शांतपणे पुढे निघून गेले.  मॉरिशसमधे व्हॉलिबॉल खेळणार्या त्या पोलिसांना पाहून ही गोष्ट आठवे. भारतातही एके काळी अशीच असलेली शांतता कुठल्या वादळाने उडवून नेली कळे.

मॉरिशसची सुरक्षा -

                  मॅरिशस ह्या छोटुकल्या बेटाला कोणी उपद्रवी शेजारी नाही. त्यामुळे मॉरिशसचे स्वतःचे सैन्य नाही. पर्यायाने सैन्यावर वारेमाप खर्चही करायला लागत नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी तेथील पोलिसांना प्रशिक्षण देणे , महत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी पोलीसांना प्रशिक्षण देणे, सागरी सुरक्षेसाठी भारताच्या कोस्टगार्ड तर्फे हेलिकॉप्टर्स, जहाजे, अधिकारी देणे या गोष्टी भारत निष्ठापूर्वक पार पाडत आहे.

                  आपला देश टुरीझमवर अवलंबून आहे. हे तेथील वरपासून तळागाळातल्या लोकांना चांगलच माहित होतं आणि म्हणूनच स्वच्छता, नम्र वागणूक, परदेशी प्रवाशांची सुरक्षा यासाठी सारेच दक्ष असत.

मॉरिशसची राजधानी -

           मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई आपल्या दादरएवढी असेल.  पोर्ट लुईला तेथील फुटपाथवरून चालतांना एका दरवाजासमोर कायम एक रुबाबदार गणवेश घातलेला तडफदार पोलिस गार्ड उभा दिसे. वरती चक्क Prime minister of Mauritius अशी पाटी पाहिल्यावरही परत परत वाचली. इतर सामान्य कचेर्यांसारखं पंतप्रधानांचं कार्यालयही सहज फुटपाथवरून जाता जाता रस्त्याच्या कडेला दिसावं याचं अप्रूप वाटलं. येथील  त्यावेळचे प्रेसिडेंट अनिरुद्ध जगन्नाथ त्यांच्याच घरी राहणे पसंत करत. जेंव्हा कधी दुसर्या देशाचे पाहुणे येणार असतील किंवा कोणी खास पाहुण्यांसाठी जेवण, किंवा काही समारंभ ठेवला असेल तेंव्हा तवढ्या वेळेपुरते ते राष्ट्रपतिभवनात येत. अनेक वेळा प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट गाडीतून जातांना दिसायचे. त्यांच्या गाडीच्या पुढे-पाठी पायलट गाड्यांचा ताफा सोडाच फक्त पुढे- दोन मोटरसायकल-स्वार असतं. मोटरसायकलला कडेला असलेल्या दांडीवर लाल दिव्यांमुळे कोणी VIP जात आहे एवढं कळे. त्यांच्या गाडीला लाल दिवा नसे. दर मंगळवारी येथील parliament session  (संसदेचे अधिवेशन ) असे. आम्ही असतांना आता तर 9 डिसेंबर ते 11 मार्च पर्यंत तीन महिने पार्लमेंटला सुट्टी होती. गलिव्हरच्या गोष्टी किंवा सिंदबादच्या सफरी ह्या नुसत्या लहान मुलांच्या गोष्टी नसून त्या विविध देशोदेशी फिरलेल्या लोंकांच्या अनुभवांचं रोचकपणे केलेलं एक छान संकलन असावं असं मला वाटतं. त्यांचा अभ्यास केला तर काळाच्या पडद्याआड गेलेले अनेक प्रसंग, अनेक भूभाग, त्यांच्या अनेक आठवणी परत जिवंत होतील असं मला राहून राहून वाटतं.

मॉरिशसच्या पंतप्रधानांचं साधंसुधं ऑफिस जाता जाता रस्त्यावरच पहायला मिळालं. प्रेसिडेंट राहतात ते The State House खूप सुंदर आहे हे ऐकून होतो आणि अचानक तेही पहायला मिळालं

राष्ट्रपति भवन The State House 

                          मॉरिशसला असतांना 2005 ला श्री अनिरुद्ध जगन्नाथ हे तेथील प्रसिडेंट होते. त्यांनी एका चहापानाच्या कार्यक्रमानिमित्त  निमंत्रण दिल्याने त्यांच्या राष्ट्रपती भवनाला भेट देता आली. अत्यंत साधेपणाने राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सर्वांना भेटत होत्या. मॉरिशसमधील काही प्रख्यात लोकांच्याही त्यानिमित्ताने गाठीभेटी होत होत्या. तेथील एका बाईंची साडी मला त्यांच्याकडे घेऊन गेली. त्या म्हणाल्या, ही साडी दोनशे वर्ष जुनी आहे. बनारसी रेशमी साडीला खर्या सोन्याच्या जरीचे काठ,पदर  झळकत होते. साडीचा उंचीपणा नजरेत भरत होता तशी त्या साडीची 'पुरातन`( antique piece ) म्हणून किंमतही जाणवत होती. आपल्या भारतात दोनशे वर्षांपूर्वी तयार होणार्या साड्यांची प्रत आणि पोत  पाहून माझे डोळे दिपून गेले होते. अशी साडी बनविणारे कलाकार किती प्रगत असतील याचा मी अंदाज बांधत होते. रेशमाची उच्च प्रत हा एक मुद्दा होता. त्या सोबतीने सोन्याचे, चांदीचे काम, त्याची तार काढायचं काम, म्हणजे पर्यायाने धातूशास्त्रातील प्रगती, नक्षीकाम आणि कलाकुसर चित्रित करून तसे बनवणार्याची कमाल आणि ही अशा प्रकारची रंगसंगती दोनशे वर्ष टिकण्यासाठी रंग तयार करण्याची कला. अशा प्रगत देशाला इंग्रजांनी ओरबाडून ओरबाडून कंगाल केलं. परत एकदा बाईंशी संवाद साधतांना कळलं की, त्यांचे मूळ गाव बिहारमधे होते. त्या सांगत होत्या की त्यांचे पूर्वज येथे व्यापारासाठी आले होते. आणि येथेच स्थायिक झाले. आजही मॉरिशसमधे असे काही सधन भारतीय वंशाचे परिवार आहेत. ते त्यांच्या सुना बिहारमधल्या त्यांच्या त्यांच्या काही जिल्ह्यातूनच घेऊन येत. आजही ही परंपरा  चालू आहे.

Indian Ocean Rim Countries -

 

 

 

             ह्या गर्दीत कोण कोण लोकं भेटून तुम्हाला आश्चर्यचकित करतील हे सांगता येत नाही. सर्वांना भेटता भेटता आमची ओळख indian ocean rim countries’ association for regional cooperation च्या श्रीलंकेच्या मुख्य अधिकार्याशी झाली. आम्ही भारतीय असल्याच कळल्यावर त्यांना आनंद झाला.  त्यांच्या तोंडून भारताची स्तुती ऐकतांना मनातून सुखावायला होत होतं. आमच्याविषयी वाटणारा आदर त्यांच्या वागण्या- बोलण्यातून डोकावत होता. ते म्हणाले, `` भारत तर महान व्यक्तिंची, विद्वानांची खाण आहे. आम्हाला आमच्या देशात कुठल्याही कामात काही अडचण आली आणि त्याचं निराकरण आम्हाला अशक्य वाटलं की आम्ही भारतात येतो. त्या विषयातला निष्णात आम्हाला मिळतोच. त्याला घेऊन आम्ही आमच्या देशात आलो की तो आमचे प्रश्न चुटकीसरशी सोडवून देतो. महा अवघड वाटणारी कुठलीही समस्या भारतीयांनी सोडविली नाही असं अजून एकदाही झालं नाही.''

  `` तुमचा भारतीयांवर एवढा विश्वास आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. खरतर आज काही कठिण परिस्थिती असली की सगळे पाश्चिमात्यांकडे नजर लावून असतात. त्यांना सोडून तुम्ही भारतीयांची निवड कशी केली? एक कुतुहल म्हणुन विचारतो'' प्रवीण म्हणाला. `` आम्हीही पहिल्यांदा  पाश्चिमात्यांना  विचारून पहायचो. पण त्यांना आमची समस्या इतक्या सहजपणे कळायची नाही. शिवाय त्यांची बिदागी खणखणित असे. भारत आणि आमची नैसर्गिक आणि सांस्कृतिक एकच पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भारतीयांच्या आणि आमच्या अडचणीही मिळत्या जुळत्या असतात. त्यामुळे भारतीय आमच्या अडचणींची सहजपणे उकल करतात तेही अत्यंत कमी मोबदल्यात. आम्ही ऐकतच राहिलो. मॉरिशसचा मुक्काम भरून पावल्यासारखं वाटलं. कान तृप्त झाले. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते अचानक समोर गवसल्यासारखं वाटलं.  आपल्याकडे हे सांगूनही खरं वाटणार नाही. भारतीयांचा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा हा प्रसंग तुम्हाला सांगतांना मला आनंद वाटत आहे.

ह्या चहापान समारभात हे राजभवन पहायला फार वेळ मिळाला नाही तरी नंतर एकदा तेथे आत सर्वत्र फिरून ते पहाता आलं.

  रिझवी, मोका (Réduit, Moka,) च्या एका हिरव्यागार पाचूच्या घळीत डोंगराचा एक आडवा कडा सरळ दरीतच घुसला आहे. आपल्या टकमक टोकासारखा. ह्याच कड्यावर 240 एकरमधे The State House  / French: Le Château de Réduit)  हा फ्रेंचांनी बांधलेला किल्ला दिमाखात उभा दिसतो. एकेकाळी फ्रेंचांनी शत्रूपासून संरक्षण म्हणून बांधलेला हा किल्ला नंतर Governor House म्हणून वापरला जात असे तर आता राष्ट्रपती भवन (State House ) म्हणून वापरला जातो. ह्या प्रचंड परिसरात अनेक प्रकारची झाडं अत्यंत कौशल्याने लावलेली आहेत. मॉरिशसची काही दुर्मिळ झाड, जगातील विविध भागातून आणलेली सुंदर सुंदर झाडं, ह्यांच्या जोडीने असलेला औषधी वनस्पतींचा स्वतंत्र विभाग आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ पायांना थकल्याची जाणीवही होऊ देत नाही.

               ह्या सुंदर कड्यावरून दरीच्या अंतरंगात डोकावतांना `कनकधारा' स्तोत्रातील लक्ष्मीच्या नजरेची आठवण मला येत असे. निद्रिस्त शेषशायी भगवंताचं सौंदर्य सतत बघतच रहावं असं सुंदर आहे. त्यांच्या त्या सौंदर्याकडे लक्ष्मी एकटक बघत असतांना  तिच्या त्या निळसर काळ्या नजरेच्या सतत प्रवाहाने जणु विष्णुच्या गळ्यामधे असलेली पांढरी शुभ्र मोत्याची माळही तिच्या प्रेमळ दृष्टीत भिजून नीलार्द्र झाली.

दृष्टि तुझी मधुकरासम नीलवर्णी

झाली स्थिराचि मधुसूदन वक्षभागी

दृष्टिप्रभा भिजवि मौक्तिकमाळ वक्षी

नीलार्द्र नील कमलासम नील झाली॥

दृष्टी-सुधा-सुमन-माळचि पद्मजा गे

साफल्य देउनि कृतार्थ  करी सदा  गे।।5

             इथेही त्या गर्द हिरवाईत खोल खोल बुडलेली आपली दृष्टी अशीच शांत, पारदर्शी  होते. मनातील सर्व विचार शांतपणे कुठेतरी तळाला बसून जातात. सर्वत्र स्वच्छता ही तर मॉरिशसची खरीखुरी लक्ष्मीच म्हटली पाहिजे. मॉरिशसला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर एखाद्या भारून टाकणार्या मंत्रासारखे विशालचे शब्द माझ्या मनात घुमत राहत, ``आम्ही अमच्या देशाचा कोपरा न् कोपरा सुंदर बनवितो.’’

मॉरिशसच्या निवडणुका -

                   3 जुलै 2005 च्या मॉरिशसच्या निवडणुकांचे आम्ही साक्षीदार होतो. आपल्या देशात निवडणुकांची धामधूम, निवडणूक चिह्न, विराट सभा, भाषणांची खैरात, एकदुसर्यावर आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चिमटे, ह्या सगाळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मी  इकडच्या निवडणुका पहायला उत्सुक होते. तेंव्हा पॉल बेरोंजे हे फ्रेंच वंशाचे पंतप्रधान होते तर नवीन रामगुलाम आखाड्यात होते. पॉल बेरोंजे हे तेंव्हा अहिंदू पंतप्रधान होते. मॉरिशसमधे हिंदूंची संख्या जास्त आहे.

                 निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तशा रस्तो रस्ती पताका  लोंबायला लागल्या. आपल्याकडच्या पताका त्रिकोणी किंवा छोट्या चौकोनी असतात; इथल्या मात्र लांब लांब आयताकृती. ठिकठिकाणी भिंतींवर  मजकूर, उमेदवारांचे फोटो झळकायला लागले. क्वात्रबोर्नच्या महानगरपालिकेसमोर श्री. नवीन रामगुलामांच भाषण झालं. श्री पॉल बेरोंजेंचंही भाषण झालं. मला कळलं काहीच नाही पण थोडावेळ उभी राहून आले. सगळा माहोल अनुभवायला बरं वाटत होतं. आपल्यासारख्या विराट सभांपुढे इथल्या मोठ्या सभा सुद्धा चिमुकल्या वाटत होत्या. पहायला मजा येत होती. भाजी मार्केटमधे बेरोंजे आणि नवीन रामगुलाम ही नावं कानावर पडत होती, म्हणून सहजच मी ``काय कोण निवडून येणार ?'' कुतुहलाने विचारलं. ``नवीन रामगुलामच !'' उत्तर आलं. ``काल एका बेकरीतला माणूस श्री पॉल बेरोंजे यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत होता.’’ हे त्यांना सांगताच उसळून तो म्हणाला छे छे हिंदू माणूसच आमचा पंतप्रधान झाला पाहिजे. सरळ सरळ असा धर्माचा उल्लेख तो सुद्धा आजूबाजूला बघता -  - मलाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. मी लोकांच्या मनाचा अंदाज घेत असतांना त्याचं असं तावातावाने बोलणं ऐकल्यावर आपण दुसर्या देशातील आहोत ह्याचं भान ठेवणही आवश्यक असल्याचं जाणवलं. पण निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर भांडणं, मारामार्या, खून, जाळपोळ, आंदोलन असं काहीही झालं नाही. ह्याचंही उत्तर आमच्या मित्राकडून ऐकायला मिळालं.

          मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1968 ला हिंदू मुसलमान मोठी दंगल उसळली होती. त्या सगळ्या दंगलीचा अभ्यास केल्यावर तेंव्हाचे मॉरिशसचे पंतप्रधान श्री. शिवसागर रामगुलाम (श्री. नवीन रामगुलाम यांचे वडिल) ह्यांनी मॉरिशसमधे सर्व धर्माच्या लोकांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानंतर मॉरिशसमधे परत कधीही दंगे झाले नाहीत. आमच्या मॉरिशियन मित्राकडून नवी माहिती मिळाली होती. ह्याचा परिणाम म्हणून अनेक मुस्लिम स्त्रिया उच्च शिक्षित होत्या. लंडन, पॅरिस सारख्या ठिकाणी कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आल्या होत्या. त्यामुळे तेथे फॅमिली प्लॅनिंगसाठी वेगळे कायदे किंवा योजना राबवाव्या लागल्या नाहीत. प्रवीणचा ड्रायव्हर जादूची मुलगीही बॅरिस्टरचा कोर्स करायला लंडनला गेल्याचे जादू अभिमानाने सांगत असे. प्रत्येकाला मिळणार्या शिक्षणामुळे सर्वांचीच प्रगती झाली. 19 व्या शतकात येथे आलेले हे भारतीय आपलं मूळ शोधत जेंव्हा भारतात येतात तेंव्हा आपल्या अशिक्षित अडाणी राहून गेलेल्या बांधवांना पाहून अश्चर्यचकित होतात. शिक्षणामुळे त्यांच्यात झालेली सुधारणा पाहिल्यावर कोणालाही शिक्षणाचे महत्त्व थक्क करणारे वाटेल.

       70 पैकी 42 जागा मिळवून नवीन रामगुलाम  निवडून आले. येथे मॉरिशसमधल्या प्रत्येक अल्पसंख्यांकांना जसे चायनीज, अफ्रिकन, तामिळ, तेलगु , मराठी  यांना निश्चित प्रतिनिधित्व दिले जाते. निवडणूक झाली आणि अचानक काही दिवसात सगळ्या भिंती पूर्ववत झाल्या पताका, फलक सर्व निघाले. ही काय जादू आहे? मी विशालला विचारलं. इथे निवडणुकीनंतर तीन दिवसाचा अवधी प्रत्येक पार्टिला दिला जातो. तेवढ्या अवधीत प्रत्येकाने आपापल्या जाहिराती, पताका , आणि आपल्या नेत्यांचे फोटो काढून घेणं अपेक्षित असतं. भिंतीही रंगवून पुन्हा पूर्वीसारख्या चकाचक होतात.

       मॉरिशस मधील सुनियोजित शहरे आणि गावे -    

                 मॉरिशसमधेही लोकवस्ती वाढू लागली की जंगलाची काही जमिन अथवा शेतीची काही जमिन  रहाण्यासाठी म्हणून तयार केली जाते. ही जमिन स्वच्छ करून प्लॉट्स पाडले जातात. घरांचं बांधकाम सुरू होण्यापूर्वीच सर्व ड्रेनेजेस्, पाण्याच्या लाईन्स, इलेक्ट्रिसिटीच्या जोडण्या पूर्ण होतात. रस्तेही बनविले जातात. रस्त्याच्या कडेला फुटपाथस्, आणि सुंदर झाडं लावली जातात. हे सर्व झाले की मग घरांची बांधकामं केली जातात.  काही रस्त्यांवर दुतर्फा अमलतास तर काहींवर दुतर्फा गुलमोहोर, तर काहींवर जकरंडा.  फुलं आली की रस्त्याच्या दुतर्फा एकाच प्रकारच्या फुलांनी सजलेला रस्ता सुंदर दिसे. गरीब लोकांना घर बांधायला सरकारी मदत मिळे. अनधिकृत बांधकाम कोठेही होणार नाही ह्याची उत्तम खबरदारी घेतलेली असे. त्यामुळे कोठेही झोपडपट्टी नव्हती. घरांना नावं नसली तरी इथल्या छोट्या छोट्या लेन्स्ना दिलेली फुलांची नावं मात्र फारच आवडून गेली

सर्व सोयींनी युक्त गावे आणि वस्त्या -

               ह्या छोट्याशा देशात सर्व कसं व्यवस्थित पूर्वनियोजित असे. प्रत्येक  छोट्याशा तुरळक वस्तीच्या गावातही शाळा, प्रत्येक गावात सर्व सोयींनी सुसज्ज असे सरकारी हॉस्पिटल, आयुर्वेदिक चिकित्सालय, प्रत्येक गावात फुटबॉल ग्राउंड, वॉकिंग ट्रॅक, सर्व ठिकाणी स्वच्छ टॉयलेटस् ( ही टॉयलेटस् साफ करायला बाहेर सफाई कामगार उपस्थित नसूनही ) माणसांना माणूस म्हणून जगायला लागणार्या सर्व गोष्टी. आमचा मॉरिशयन मित्र विशाल बापू कायम म्हणे, ``आम्ही आमचा देश सुंदर बनवतो. आमच्या देशाचा कोपरा अन् कोपरा सुंदर असावा ह्याची आम्ही काळजी घेतो.'' अगदि खरच होतं ते. देश छोटा असूनही प्रत्येकाला मी मॉरिशियन आहे ह्याचा सार्थ अभिमान होता. प्रत्येकजण रस्ता, टॉयलेट, सार्वजनिक बागा स्वच्छ ठेवण्याची काळजी घेत होता. रोज घराजवळच्या जॉगिग ट्रॅकवर आम्ही जॉगिंगसाठी जात होतो. येथील गावं छोटी असल्याने दुसर्या गावात पोचायला गाडीने 15-20 मिनिटे पुरत. आजूबाजूच्या गावांमधील खेळाची मैदाने शोधता शोधता आम्हाला आमच्या काही भारतीय मित्रांमुळे वाकवा येथील जिमखान्याचा शोध लागला

वाकवाचा पोलीस जिमखाना-

     हे आमच्यासाठी देऊळ होतं. रोज जरी तिथे जायला जमलं नाही तरी ज्यावेळेला जमेल तेंव्हा तिथे जॉजिंग ट्रॅकवर मनमुक्त जॉगिंग करणे हे देवळाला प्रदक्षिणा घातल्यापेक्षाही उत्साहवर्धक असे. हिरवीगार मऊ मऊ हिरवळीची सात फुटबॉल कोर्टस् उलगडून टाकलेली. प्रत्येक पटांगणावर फुटबॉलचा सामना रंगलेला असे. त्यांच्या कडेनी मस्त जॉगिंग ट्रॅक! कडेनी झाडं. ह्या ट्रॅकवर फिरता फिरताच व्यायाम करता येतील अशी सोपी पण सुंदर व्यायामाची लाकडी साधनं ट्रॅकच्या अजुन बाहेरच्या कडेवर बसवलेली होती. मधेच जमिनीपासून तीन साडतीन फुट उंचीवर आडव्या रुंद लाकडी ओंडक्यावर पाठ टेकवून पाठीवर झोपून लोंबकाळत पाठ मोकळी करून घ्यावी, जाता जाता वर टांगलेल्या लोखंडी कड्यांना लोंबकाळून घ्यावं, मुद्दाम रचना केलेल्या नागमोडी अरुंद पण लांबलचक ओणक्यांवरून तोल सांभाळत चालत किंवा पळत जावं. वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत जावं किंवा सरळ एकसंथपणे पळत रहावं. मॉरिशसचे अनेक मॅरॅथॅान रनर्स येथे पळतांना दिसत. ऑलिंम्पिकमधे पदक विजेता रनरही येथे येत असे. पळता पळता  मधेच दमला तर एखादि फुटबॉलची मॅच बघत बसावं. प्यायचं पाणी, टॉयलेट स्वच्छ आणि सुसज्ज! कितीही गर्दी असली तरी पार्किंगला जागा मिळण्याची खात्री! भेळपुरी, पाणीपुरी, कोणाचाही गराडा नाही. आला आहात तर फक्त खेळायचा, व्यायामाचा आनंद घ्या! 

मॉरिशसची स्मृतीचिह्ने -

तेथे येणार्या लोकांना मॉरिशसची आठवण म्हणून घेऊन जाण्यासाठी अनेक मेमेंटोज् बनविले जात. मॉरिशसच्या नकाशाच्या आकाराच्या कीचेन्स, मॉरिशस लिहिलेले किंवा तेथील जागांची नावे लिहीलेले T shirts, मॉरिशसचे मॅप्स किंवा  मॉरिशसची सुंदर निसर्गचित्रे असलेले टेबलमॅटस्, दगडाचे, लाकडाचे डोडो पक्षी (जे खरतर तेथे आज अस्तित्त्वातही नाहीत.) आजपर्यंत बाहेरच्या विविध देशांची नावं आपल्या T-shirt च्या छातीवर मिरवत जाणारे भारतीय मी आपल्याच देशात पाहिले आहेत. भारत ही ज्ञानप्रभेने उजळून निघालेली बिल्वदलासारखी तीन अक्षरं किंवा INDIA ही पंचामृताची पंचाक्षरं आपल्या छातीवर घेऊन फिरणारा एकही माणूस पाहिला नाही. भारत नको असेल तर आपापल्या प्रांतांची महाराष्ट्र, गुजरात, बिहार,तामिळनाडू, ओरिसा, जम्मू-काश्मीर अशी नाव छातीवर नाहीतरी कोणाच्या पाठीवर सुद्धा पाहिली नाहीत. त्याक्षणी मला असं वाटायला लागलं, आपल्या देशातील अगणित सुंदर निसर्गचित्रांचे, कवितांच्या चपखल ओळींचे, मेमेंटो, किचेन्स, T-shirts, टेबलमॅट्स असावे. आपल्याकडच्या फुलांच्या डिझाईनच्या साड्या असाव्यात. जेवता जेवता टेबलमॅटवरच्या भारताच्या नकाशावरची गावं पहात आमच्या बाळांनी जेवावं. वाघ, सिंह, मोर, कमळ ह्या बरोबर आपल्याकडच्या चिंच, आंबा पेरू ह्या झाडांची, फळांची चित्रही त्यांच्या टिफीनच्या डब्यांवर, दप्तरांवर, पडद्यांवर, माऊसपॅडवर, बेडशीटस् आणि बेडकव्हरवर असावीत. चिमणी तिच्या पिलाला घास भरवत आहे असं टेबलमॅटवर रेखाटलेलं एक सुंदरस चित्र माझ्या मनात मला खुणावत होतं. आंब्यांनी लगडलेल्या झाडाचं प्रिंट असलेला किंवा `आमचा उखाणा ठिया ठिया पिकल्या फळाला बाहेरून बीया' असं काजूचं केशरी फळ आणि त्याच्या खाली लोंबणारा काजू असा T-shirt कोकण भेटीला गेलेल्या प्रवाशांना मिळावा असं वाटत होतं. खांद्यावर मोठा फणस घेऊन येणार्या प्रवाशांच्या अंगावर फणसाचं चित्र असलेलं एखादं उपरणं असायला काय हरकत आहे? चित्र-विचित्र लेगिंग्जवर मोगरा, पारिजात, बकुळ ह्यांची चित्र का असु नयेत? भारताच्या प्रचंड वैभवाची ओळख मुलांना, भारतीयांना करून देण्यासाठी हे किती छोटे छोटे साधे, सोपे आणि तरीही भारतीयत्व मनामनात पाझरत ठेवणारे उपाय आहेत. जे सतत दिसतं तेच मनावर ठसतं. मनाच्या वेगाने एक नवीन व्हर्चुअल भारतीय बाजारपेठच मी उघडली. सब कुछ देसी वाली.

रस्ते - 

           मॉरिशसमधील रस्त्यांची आखणी ही विचारात घ्यावी अशी गोष्ट आहे. फ्रेंचांनी रस्ते बनवले असल्याने सर्व रस्ते एकमेकांना समांतर, एकमेकांना काटकोनात  मिळणारे असतात. चौक किंवा जेथे अनेक रस्ते एकत्र मिळत असतील तेथे कुठल्याही सिग्नलशिवाय फक्त एका सर्कलद्वारे रहदारी कशी सुरळीत चालू ठेवता येते हे पाहूनही छान वाटायचे. आपल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने येणार्या वाहनाला सर्वप्रथम जाऊ द्यायचे एवढा एक छोटासा नियम पाळला की सर्व  रहदारी कशी सुरळीत चालू राही.

        येथे right of way फार कडक रितीने पाळला जातो. मुख्य रस्त्यावरून जाणार्या वाहनांना सर्वप्रथम जाण्याचा अधिकार आहे. मुख्य रस्त्याला एखादा छोटा रस्ता मिळण्यापूर्वी 100 मी. S T O P  अशी मोठी अक्षरे रंगवलेली असत. ( ती पावसाळ्यात वाहून जात नाहीत.) गल्लीचा रस्ता  मुख्य रस्त्याला मिळण्याआधी रस्त्यावर एक पांढर्या रंगाचा पट्टा ओढलेला असे. त्याचा अर्थ डेड स्टॉप.  गाडी तेथेच थांबवायची. हे शाळेपासूनच मुलांना शिकवले जाई आणि त्याची अम्मलबजावणी दक्षतेने होई. चौकाचौकात पिवळ्या रंगाची चौकट असलेले चौकोन आखलेले असत. त्याचा अर्थ `नो व्हेईकल झोन' तेथे कोणीही गाडी थांबवायची नाही. त्यामुळे चौकात सिग्नल असला नसला तरी ट्रॅफिक जॅमचा गोंधळ नसे.

ह्या पिवळ्या चौकटीच्या चौकोनाचा उपयोग इमारतीत सुद्धा केलेला दिसे. इमारतीत असलेल्या कचराकुंडीकडे जाणार्या लोकांना अडथळा होईल अशी गाडी कोणी लावू नये म्हणून तेथेही हा पिवळ्या चौकटींचा चौकोन आखलेला असे. आणि इमारतीत पार्कींगला जागा नाही या सबबीखाली तेथे कोणी गाडी लावत नसे.

 मुख्य रस्त्यावरील गाडीने आपले दिव्यांचे डोळे उघडमिट केले ह्याचा अर्थ ` गप! मागे सरक ' असा नसून `तू आधी जा' असा असे. पहिल्या पहिल्यांदा आम्ही त्याची ही दटावणी आहे असं समजून थांबून राहिलो तर तोही हाताने `तू आधी जा' चा इशारा करत थांबून राही. आम्हीही आमच्या गाडीचे डोळे मिचकावून Thanks  चा इशारा करत पुढे जात असू.

                  मॉरिशचा main motorway आणि काही मुख्य रस्ते सोडले तर बाकीचे रस्ते गल्लीबोळांसारखेच आहेत. हा मुख्य दक्षिणोत्तर जोडणारा मोटर-वे चीनने बांधून दिला होता. सर्व नियमांच अत्यंत काटेकोरपणे पालन केलं गेल्याने, नाकपुडीसारख्या बोळातून सुद्धा वाहनं सहज वेगाने जात असतात. पोर्ट लुई सारख्या राजधानीच्या ठिकाणी वाहनांची गर्दि लक्षात घेऊन दोन-तीन कि.मी. अगोदरच मोठा वाहनतळ बनविला आहे. तेथून पोर्ट लुईला जायला बस सर्व्हिस उत्तम आहे. ह्या उत्कृष्ट बस सेवेवर विसंबून आपल्या महागड्या गाड्या घरी  ठेऊन लोकं आनांदाने बसचा पर्याय स्विकारत. साध्या बसचा प्रवासही सुखकर असे.

    एकदा आम्ही फार रहदारी नसलेल्या रस्त्याने जात होतो. डावीकडे वळायला सिग्नलवर  गाडी थांबवली होती. बराच वेळ झाला पण सिग्नल काही मिळेना. आमचा मॉरिशियन मित्र विशाल बापू आमच्याबरोबरच गाडीत होता. त्याने रस्त्यावर ओढलेल्या पांढर्या पट्ट्याला गाडीच्या चाकांचा स्पर्श होईल अशी गाडी उभी करायला सांगितली. आणि अचानक सिग्नल हिरवा झाला. येथे सेन्सॉर्स बसवले आहेत. पांढर्या पट्ट्याला गाडीच्या चाकांचा स्पर्श होत नाही तो पर्यंत  सिग्नल बदलत नाही. पोलिसांशिवाय लोकं सिग्नल उत्तम पाळत होते

वाहन चालक परवाना विभागातील भ्रष्टाचार  पूर्णपणे बंद करण्यात सरकार यशस्वी झालं होतं. प्रत्येक चालकास परवाना देण्यापूर्वी त्याची कठोर परीक्षा घेतली जाई. त्यामुळेच होणार्या अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती.

            बहुतेक सर्व रस्ते उत्तम ठेवले आहेत. डांबरी, गुळगुळीत, कुठे खाचखळगे नाहीत, खड्डे तर नाहीच नाहीत. इथे भुरभुर, रिमझिम, रिपरिप, धोऽधो, झोडपून काढणारा मुसळधार  असे पावसाचे सर्व प्रकार वर्षभर झेलूनही हे रस्ते कायम ठणठणीत आणि तंदुरुस्त ठेवायची कला इथल्या म्युन्सिपाल्टीला कशी काय जमली असावी कोण जाणे. एकदा दुपारी आमच्या घरासमोर रस्ता खणायला सुरवात केली.( दोन वर्षात एकदाच घडलेला प्रसंग) आणि हाताततली सर्व कामं सोडून आश्चर्यानी मी बाल्कनीत बघतच उभी राहिले. अत्यंत अद्ययावत उपकरणांनी सर्व कामं एक-दोन तासात करून रस्ता पूर्ववत गुळगुळीत करून सर्व जण गेले सुद्धा. रस्त्याच्या कडेला दगडमातीचा कुठला ढिगाराही ठेवता.

रेडिओ आणि टि.व्ही.-

             एकदा सकाळी गाडीने जात असता अचानक गाडीतल्या रेडिओवर `विडा घ्या हो नारायणा - - ' ह्या शब्दांनी आम्हाला चकित करून टाकलं. भारतात असतांना इतका सुंदर `गोविंद' विडा  ऐकला नव्हता. नंतर अशा अनेक जुन्या जुन्या माहित नसलेल्या भारतीय रचनांनी आम्हाला मोहित केलं. रेडिओवर पंतप्रधान आज कोणाच्या घरी गेले आणि कोणाचा सत्कार केला हे  सांगत. ह्या सर्व सत्कारमूर्तींचा त्यादिवशी शंभरावा वाढदिवस असे. येथे शंभरी गाठणारे खूप जण असतात. येथील हवा, पाण्याचे ते वरदान असावे. त्याचप्रमाणे कोणी गेलं की त्यांची नावंही रेडिओ वर सांगितली जात. त्यांची नावं ऐकून लोक त्यांच्या घरी त्यांना भेटायला जात किंवा त्याच्या क्रिया कर्मास जात.

                मॉरिशसमधे असलेलं भाषा वैविध्य लक्षात घेऊन मॉरिशस रडिओ आणि TV वर सर्व भाषांना ठराविक वेळ दिला जाई. सर्व भाषांचे उत्तमोत्तम कार्यक्रम त्यावर असत. भारतातील हिंदी, भोजपुरी, तामिळ, तेलगू, मराठी तसेच चिनी, फ्रेंच क्रेऑल अशा सर्व भाषांमधील कार्यक्रम असत. मॉरिशसच्या टिव्हीवर मी जेवढे तेलगु, तामिळ, भोजपुरी, चिनी, मराठी आणि हिंदी जुने सिनेमे पाहिले तेवढे मी भारतातही पाहिले नाही. रोज कुठल्या ना कुठल्या भाषेचा सिनेमा असे.  इतर भाषातील सिनेमे आणि मालिका आम्ही मनोभावे बघत असू. त्यांच्याखाली सबटायटल्स असल्याने सर्वजण त्याचा आनंद घेऊ शकत. आम्ही तेलगु तामिळ मालिका जशा आनंदाने पहायचो तशी दिलीप प्रभावळकरांची `तात्या टिपरे' ही मराठी  मालिका मॉरिशसच्या लोकांनाही तेंव्हा वेड लावून गेली. त्यातील चौकोनी सुंदर कुटुंब हे सगळ्यांच्याच मनातील आदर्श कुटुंब होतं. तात्या टिपरे हे आजोबा घराघरातील लाडके आजोबा झाले होते. तुमच्याकडे T.V.  असो वा नसो प्रत्येकाच्या घरी T.V.असणारच हे गृहीत धरून प्रत्येकाला दरमहा  शासनाला 100 रु कर द्यावा लागे. तो वीजबीलातून वळता करून घेतला जाई.

      मॉरिशसमधे रेडिओ आणि T.V. कडे वळायचं अजून एक कारण होतं ते म्हणजे, - भारतातून येतांना कमीत कमी वजनाच्या हिशोबाने मी दोनच पुस्तकं घेऊन आले होते. एक संस्कृत स्तोत्रांचं आणि दुसरं म्हणजे पंचतंत्रची मूळ संस्कृत हिंदी अर्थासह आवृत्ती. गणपती, नवरात्र इत्यादि सणांना आपल्याला एखादं स्तोत्र वाचता यावं म्हणून स्तोत्रांचं पुस्तक आणलं होत तर बरीच वर्षे घरात असूनही वाचलच नाही म्हणून पंचतंत्र. तेथील पुस्तकं आणि वृत्तपत्र आहेतच जोडीला असा साधा विचार पूर्णच चकवून गेला. फ्रेंचने माझी विकेट घेतली. संस्कृत वाचण्यापुरतं येत होतं. रोज एक  नवीन स्तोत्र वाचायच आणि रोज पंचतंत्राची एक गोष्ट तरी वाचायचीच असं ठरवलं. काही दिवसात ही दोन पुस्तकं म्हणजे माझी एकदम जीवाभावाचीच होऊन गेली. कित्येक स्तोत्रे त्यांच्या वृत्तांमुळे आणि यमक अनुप्रासांमुळे मला इतकी आवडायला लागली की काही स्तोत्रं स्वयंपाक आणि इस्त्री अशी सरावाची काम करतांना गुणगुणता गुणगुणता पाठही होऊन गेली. तर पंचतंत्रातील अद्भुत नीती आणि तत्वज्ञानाने भारून जायला झालं. आपण हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे असं समजून केवढं दुर्लक्ष केलं याचं वाईट वाटलं. आणि ह्या दोन्ही पुस्तकांना मराठीत आणायचच हा संकल्प मनात रुजला. नंतर काही प्रमाणात मी ते काम हातीही घेतलं.

----------------------------------------------------------------------------------------------------

 

6 देखण्या समुद्र किनार्यांचा देश -

                  सूर्याभोवती पसरलेल्या प्रकाशाच्या लाल, केशरी  प्रभावळीप्रमाणे ह्या हिरव्या पाचूच्या बेटाभोवती समुद्राची चमकदार निळी, हिरवी, मोरपंखी प्रभावळ पसरली आहे. प्रत्येक समुद्र किनारा स्वतःमधे सौदर्याची वेगळीच खासियत घेऊन उभा आहे. आपल्या मायभूमीचा, भारताचा, अंगावर रोरावत येणार्या लाटांचा राकट मर्दानी समुद्र काही काही ठिकाणी शांत वाटला तरी घनगंभीर गाज असलेल्या लाटांचा दरारा मनातून जात नाही. भरती ओहटीच्या वेळा सांभाळतच समुद्रस्नान हा पवित्रविधी उरकावा लागतो. आत्ता ओहटी आहे म्हणून जरा आत शिरावं तर लांब दिसणार्या पाण्याच्या हळुहळु जवळ येणार्या लाटा कधी तुमच्या गळ्यापर्यंत पोचतील आणि पायाला आधार देणारी वाळू कधी पायाखालून निसटून जाईल हे सांगता येणार नाही. रतिमदनाच्या ह्या देशात समुद्रालाही बदलवून टाकलं आहे. बेटाच्या सभोवार असलेल्या प्रवाळाच्या भिंतींमुळे भरती ओहोटी , त्यांच्या वेळा आणि वेळांचं गणित सांभाळत बसायला लागत नाही. दिवसाच्या कुठल्याही वेळेला पाणी असणारच आणि प्रवाळाच्या भिंती लाटांना आडवणारच. मोरचुदासारखा किंवा cobalt blue निळाशार, अथांग समुद्र पारदर्शक इतका की थेट त्याच्या अंतरंगात डोकावून बघू शकता. पहिल्यांदा ह्या स्वर्गीय बेटाचं आणि त्याच्यासभोवार पसरलेल्या समुद्राचं दर्शन झालं तेंव्हा  श्री आद्य शंकराचार्यांनी केलेल्या पार्वतीच्या वर्णनाच्या ओळी झरझर माझ्या मनात उतरत गेल्या

सुगंधी गाभ्याचा सुविकसित तो चंदन तरु

उगाळोनी केले परिमलयुता गंध  रुचिरु

सुगंधी कस्तूरी, तयि मिसळले केशर किती

अशी शोभे माते तनुवर तुझ्या गंधित उटी॥19.1

 

अगे माते जाशी तनुवर अशी लावुन उटी

सुगंधी पायाने करित धरणी पावन अती

मिळे पाण्यामध्ये परिमल-उटी स्नानसमयी

तयाच्या आमोदे सकल जल होई पुनितची॥19.2

 

स्वहस्ते ब्रह्मा तो हळुच उचले धूळ पदिची

तुझ्या स्पर्शाने जी अति पुनित झालीच सहजी

तुझ्या स्नानाचे ते पुनित जलही घेउन करी

सहाय्याने त्यांच्या अभिनव उभारे सुरपुरी 19.3

( - आनंदलहरी )

 

पार्वतीच्या पायाला लागलेल्या धुळीने आणि तिच्या स्नानसमयी तिच्या अंगावरच्या पाण्यात विघळलेल्या उटीचं सुगंधी जल घेऊन खरच विधात्याने स्वर्ग बनवला असला तर तो हाच तर नसेल असं वाटल्याशिवाय राहिलं नाही. मॉरिशसचा प्रत्येक किनारा स्वतःचं वेगळच वैशिष्ठ्य घेऊन स्वागताला उभा आहे. कितीही सांगितलं तरी कमीच पडेल. त्यातील मोजक्या काहींबद्दल फक्त सांगते.

bay du cap  बे जु कॅप -

                          मॉरिशसमधे प्रवेश करता करताच मी क्वात्रबोर्नच्या बस स्टॉपवरून बसरूटचं एक पुस्तक घेऊन आले होते.  घरी गेल्या गेल्या मी बस-मार्ग पहायला सुरवात केली. मॉरिशसच्या दक्षिण टोकाला म्हणजे bay du cap  बे जु कॅपला जाणारा बसचा मार्ग समुद्राच्या बर्यापैकी काठाकाठाने जात होता. आपण बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीत बसलो तर आपल्याला नयनरम्य समुद्र बघत बघत जाता येईल असं मनाशी नक्की केल. दुसर्या दिवशी 5 नं बसमधे बसून शेवटच्या स्टॉपचं तिकिट काढलं. नेत्रांचं पारणं फेडणारा सुंदर प्रवास झाला. मोरपंखीच्या विविध छटा, समुद्राकाठच्या सुरूच्या झाडांमधून गाळून येतांना अजुनच मोहक होत होत्या. वार्याने चेहर्यावर येणारया बटांमधुन माधुरी किंवा मधुबालाच्या सौंदर्यासारख्या. सुरूंमुळे समुद्र का समुद्रामुळे सुरूची बनं सुंदर दिसत होती, सांगता येणार नाही. पण त्या सौंदर्यलहरी माझ्या मनातही उचंबळत होत्या. अधुन मधुन येणार्या गावातील मुलं शाळेत जाण्यासाठी बसमधे चढत होती. त्यांच्या किलबिलाटनी बस जिवंत झाली होती. गावं शाळा मागे पडत होत्या. मधेच महिलांचे घोळके चढत होते आणि काही विशिष्ट थांब्यांना उतरत होते. परत येतांना त्याच सर्व महिला हातात नवीन बनवलेल्या बॅगा, कागदाची फुल असं काहीना काही घेउन येतांना बस मधे परत भेटल्या. सर्वांशी बोलतांना कळलं की दुपारी महिलावर्ग, बास्केटस बनविणे, फुलं बनविणे अशा वर्गांना जात असतो. मधेच डाव्याबाजूला उंचच उंच डोंगराचे हिरवेगार सुळके तर उजव्या बाजूला मोरपंखी समुद्र! डोंगराला खेटून जाता जाता समुद्राच्या मागे राहून गेलेल्या पाण्यावर(लगुन्स) छानसे पूल. ही जागा मला फारच आवडून गेली. रस्त्याच्या कडेने mangrove ची झाडं उथळ समुद्रात उभी होती. mangrove ची ही जातही सुंदर होती. फोटोग्राफरचा त्रिकोणी स्टँड उभा करावा तसा मुळांनी झाडाला पाण्याच्यावर उभं रहायला स्टँड बनवला होता. झाडं त्या मुळांच्या स्टँडवर उभी होती. रावणाच्या सभेत आपल्याच शेपटीच्या गोल गोल विळख्यांनी उंच आसन तयार करून बसलेल्या मारुतीसारखी झाडंही हुशार वाटली            

                             इथला समुद्र आणि ही उंच पर्वतराजी पहायला मधे एखादी उंचावर जागा असायला पाहिजे होती असं मनात यायला आणि एका बाजूला डोंगर तर दुसर्या बाजूला एक छोटीशी टेकडी तयारच होती. नंतर कित्तीतरी वेळेला ह्या टेकडीवर चढून तीन बाजुंनी समुद्र आणि एका बाजूला हा उंच डोंगर बघतांना निसर्गाच्या कलाकुसरीच गुणगान करायला शब्दच अपुरे पडत गेले. संध्याकाळी अंधार पडायला लागला की मॉरिशसच्या जवळ असलेल्या री-युनियन बेटावरचे दिवे येथून चमकतांना दिसत. हा समुद्र किनारा शांत होता. येथे पर्यटकांची विशेष वर्दळ नसे.  बसचा हा शेवटचा थांबा मला मोरपंखी समुद्राजवळ सोडून देत असे जिथे मी आणि समुद्र यांच्यामधे अजुन तिसरा कोणी नसे. सूर्याला बघण्याच्या घाईत जमिनीतून उगवणार्या बीजाला डोक्यावर चिकटलेल्या मोठ्या ढेकळाचं ओझं वाटत नाही त्याप्रमाणे हा विशाल मोरपिशी समुद्र डोक्यावरची सर्व चिंतांची ओझी आणि कामाचा व्याप क्षणात विसरायला लावायचा. तासभर समुद्र किनार्यावर बसून आमच्या दोघात शब्देविण संवाद होई. त्याच्या मोरपंखी रंगात मी पूर्णपणे विरघळून जात असे. आमच्याकडे  आलेल्या पाहुण्यांना आल्या दिवशीच मी ह्या पाच नंबरच्या बसमधून फिरवून आणत असे.

      

           गाडीतून जाता जाता अचानक रस्त्याच्या कडेला  हॉटेल्स, कॅसिनो, दुकानं स्विमिंगसूट्सची दुकानं दिसायला लागली म्हणजे समजावं समुद्रकिनारा जवळच असला पाहिजे. !  समुद्र किनारा जवळ यायला लागला की हवाही `बदली बदलीसी' वाटायला लागे. सगळं वातावरण धुंद बनत जाई. रति-मदनाच्या या देशात समुद्रालाच मदन-स्पर्श झालेला मग माणसांचं काय विचारता? रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवरून  `घे रे कान्हा चोळी लुगडी' पब्लिक दिसायला लागायचं.

 फ्लिक- आँ - फ्लॅक ( Flic en Flac )

                  हा सर्वांचा आवडता बीच. किनार्यावरील सुरूच्या बनात 2-3 हजार गाड्या सहज पार्क होऊ शकतील आणि समुद्राच्या अंगाखांद्यांवर कितीही जीव बागडू शकतील असा लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा. कधी काळी आपल्या अफाट पराक्रमाने रावणाने नवग्रहांना पकडून आपल्या सिंहासनाखाली पालथं घालून ठेवलं होतं म्हणे. इथे मदनाच्या नुसत्या झुळकेनेच अनेक आंग्ल रंभा उर्वशींना वाळुत पालथं घालून ठेवलेलं.

स्थानिक लोकांना समुद्रकिनारा ही एकमेव बिनखर्चिक करमणूक असल्याने शनिवार- रविवार समुद्रकिनार्यांवर जणु जत्राच असे. गाड्यांचं पार्किंग म्हणजे गाड्यांचं जणु भव्य प्रदर्शन भरल्यासाखंच वाटे. इथल्या वृद्धांनाही सरकारी खर्चाने महिन्यातुन एकदा समुद्रकिनार्यावर आणलं जात. आपापले टेंट, खाण्याचे डबे (हे काम सोप्प असतं. बॅगेटमधे चिकन किंवा एखादि भाजी भरली की जेवण तयार!) किंवा बार्बेक्यूचं सामान, खुर्च्या, टेबलं, चटया सगळ्यासकट माणसं वाळूवर मुक्कामाला येतात. No hurry. No worry. No curry. फक्त enjoy! अशाच मूडमधे सारे असत.

मॉरिशसचा माड -

                        मॉरिशसला क्वात्रबोन ते फ्लिकाँ फ्लॅक प्रवास एक सुखद अनुभव असे. आज विशाल बापू आमचा मॉरिशयन मराठी मित्रही आमच्या बरोबर होता. मॉरिशसची त्याला खडान् खडा माहिती होती. मराठी असला तरी त्याला मराठीचा नमस्ते पलिकडे गंध नव्हता. नेहमीप्रमाणे  प्रवीण गाडी चालवित होता. गाडी स्टिव्हन्सन अव्हेन्यू (Stevenson avenue ) वरून सें जॉ (St. Jean) रस्त्याला लागली. कपडे, स्टेशनरी, गिप्ट आयटेम्स, ग्रोसरीनी मार्केट्स खच्चून भरली होती. भारतातून आलेले गॉड फादर म्हणजे  चक्क आपले देवबाप्पा मारुती , गणपती , शंकरराव, दुकानांच्या   शेल्फवर आरामात बसले होते.  पुजेचं साहित्य, अगरबत्त्या, धूप कांड्यांनी दुकान भरलं होतं शेजारीच भारतातून आलेले चमको पंजाबी  सलवार खमीसनी  दुकान सजलं होतं. आमचे भारतीय मित्र याला सुटकेस मार्केट म्हणत.अनेक  मॉरिशस निवासी भारतातून सुटकेसेस भरभरून लॉट का माल घेउन येतात. भरपूर किमतीला मॉरिशसला विकतात. माल संपला की परत भारत फेरीची वेळ होतेच. थोड्या थोड्या अंतरावर बुलांजेरी आणि पॅटिसेरीमधे वेताच्या मोठ्या मोठ्या टोपल्यांमधे हाताएवढे लांब बॅगेट पाव डोकावत होते. सें जॉ (St. Jean) रस्ता संपला. दुकानांची  गर्दी कमी होऊन घरं आणि मधून मंदीरं डोकवायला लागली. उजवीकडे को-दे- गार्ड चा काळ्या फत्तराचा खणखणीत  मजबूत डोंगर एक दोन छोट्या टेकड्यांना घेऊन उभा होता. पाल्मा आलं आणि हळु हळु घरा मंदिरांची दुकानांची गर्दी कमी व्हायला लागली. लिचीच्या बागा आमराया, चिंचाची बनं आणि ऊसाचे फड रस्त्याच्या दुतर्फा धावायला लागले. लिचीच्या बागा आमराया मागे पडल्या आणि  दुतर्फा नजर जाईल तिथे ऊसच ऊस आणि समोर अथांग निळा समुद्र दिसायला लागला. हिरण्यगर्भानी आपला सोन्याचा कुंभ सागरावर उधळून दिला होता. डोळे दिपत हेते. गाडीचे सन स्क्रीनचे फ्लॅप्स खाली करून डोळ्यांची अंधेरी घालवत मी तो माड शोधू लागले.

थोड्या उंचीवर असलेल्या  क्वात्रबोन वरून समुद्र किनाऱयाला येतांना असलेल्या अलगद उतारावरुन निस्सान सनी झोकात वळणं वळणं घेत धावायला लागली की प्रवीणच्या ड्रायव्हींग सीटच्या शेजारी बसलेल्या माझे डोळे  तेझाड शोधायला लागायचे. कॅसकॅव्हील हे मराठी वस्तीचं गाव येऊन गेलं की तें झाड दिसायला लागायचं. सार्या हिरव्यागार ऊसात एकांड्या शिलेदारासारखं. ते एक नारळाचं झाड होत. नारळाची अनेक झाड मी पाहीली होती. अलिबागच्या आमच्या बंगल्यातच दिडशे-दोनशे झाडं चौर्या वारत उभी असायची. एक अनोखं नारळाचं झाड सिंधुदुर्गच्या किल्यात मी पाहिलं होतं.  या  नारळाच्या झाडाला फांदी फुटल्यामुळे इंग्रजी वाय ह्या अक्षराप्रमाणे हे झाड दिसे. काही वर्षांपूर्वी ह्या  झाडावर  वीज पडली. झाड जळालं. अनेक वर्ष ह्या जळक्या झाडाचा सांगाडा तिथे उभा होता. मॉरिशस च्या पँपलेमूस बागेमधे वादळानी पार जमिनीवर झोपवलेली   नारळाची  झाडं आहेत. वादळात साफ कोलमडून जमिनीवर कोसळलेली ही झाडं आजही त्यांच्या जगण्याच्या जिद्दीमुळे ताजी टवटवीत आहेत. त्यांची जगायची जिद्द कायम दाद देण्यासारखी आहे. मग ह्याच नारळाच्या झाडात असं का विशेष होत की ज्या साठी माझे डोळे त्याला शोधत रहावेत? मॉरिशस हे सागरी वादळांच्या क्षेत्रात असलेले बेट आहे. दर वर्षीचा उन्हाळा इथे दोन चार तरी लहान मोठ्या वादळांना घेऊन येतो. साधारण नारळाच्या झाडांपेक्षा ते  झाड बरच उंच होतं. इतक्या सोसाट्याच्या वार्यात सरळसोट वाढलेल्या झाडाच मला नेहमी कौतुक वाटे. एवढं वाढायला त्याला किमान वीस वर्षतरी लागली असणार. वीस पावसाळे पाहिलेल्या या झाडाने किमान वीस ते तीस तरी वादळं सोसली असणार. वादळाला ताठ मानेनी टक्कर देणाऱया त्या माडानं वादळपुढे वाकणारही नाही आणि मोडणार ही नाही हे कस काय साधलं असणार? त्याला पाहून मला आदि शंकराचार्यांच्या शिवानंदलहरीतील

धैर्यासी तव काय वर्णु शिव हे! थारा भया ना जरा

राहे आत्मस्थितीत तू सहजची नाही सुखा पार या

ऐसे धैर्यचि, निर्विकार स्थिति ही लाभे कुणाला कशी

आहे देवगणांसही पतन रे होतीच ते नष्ट ही।।34.1

होती हे भयग्रस्त त्रस्त ऋषिही जाता लया धैर्यची

जाई विश्वप्रपंच पूर्ण विलया उत्पात होई जगी

सारे नष्टचि होतसे बघुनिही तू एकटा निर्भयी

आनंदातचि मग्न तू दिसतसे आनंदसान्द्रा सुधी।।34.2

असा शंकर आठवे.

                      एवढ्यात विशालनी प्रवीणला गाडीचा वेग कमी करायला सांगितला. तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. तेवढ्यात  मी शोधत असलेल्या  त्या माडाकडे अंगुली निर्देश करीत फ्रेंच झिलाईच्या इंग्रजीत त्यानी विचारल तो माड पाहिला का? तो नेहमीच्या माडांपेक्षा उंच आणि सरळ नाही का वाटत? आज आपण तोच माड पाहू. मलाही तो माड पहायचाच होता. प्रवीणलाही कुतुहल होतच. कॅसकॅव्हीलचा सिग्नल गेला की आपल्याला डावीकडे वळायचय. आमच्या वाटाड्या विशालने दाखवलेल्या रस्त्याने ऊसाच्या मळ्यांमधल्या रस्त्याने गाडी धावू लागली. आता तो माड समोरच दिसत होता. अंतर कमी व्हायला लागल तसतसा तो प्रमाणापेक्षा जास्तच ऊंच आणि मजबूत वाटू लागला. माड जवळ आला. प्रवीणने गाडी थांबविली. गाडीतून बाहेर पडून आम्ही माडाच्या दिशेने चालत होतो. आत्तापर्यंतचं कुतुहल आश्चर्यात बदलत होत. दोन्ही हात खिशात घालून विशाल हासत होता. ``काय कस आहे नारळाचं झाड?’’ तो एक टॉवर होता. माना वर कर करून आम्ही त्याच्या पानांकडे बघत होतो. विशाल हात उंचावून बोटानी त्या पानांमधे काहीतरी दाखवत होता. ते पाहिलत काय आहे ते? पानांमधे काहीतरी चौकोनी वस्तू उन्हात चमकत होती. हो काय आहे ते? रडार! शिवाय रेडिओ, मोबाईल, टि.व्ही. चे सिग्नल ह्याच्यावरूनच पाठविले जातात. मॉरिशस मधे आम्ही सर्व गोष्टी सुंदर बनवितो. इथे कुठलीही गोष्ट तुमच्या नजरेला खुपणार नाहीत. माडच्या खोडाचा परीघही चांगलाच मोठा होता. नारळाच्या झाडाच्या बुंध्याच्या चांगला दुप्पट- चौपट! त्याला एक दरवाजाही दिसत होता. बंद होता त्याला कुलुप  होतं. कुठल्याही दुरुस्तीसाठी शेंड्यावर पोचायला  माडाच्या पोटातून टॉवरला वर जायला  जिना होता. असे सुंदर माड़ मॉरिशसमधे बर्याच ठिकाणी पहायला मिळाले. प्रत्येकवेळी ते सुंदर माड पाहिले की विशाल च्या वाक्याची मला आठवण यायची----मॉरिशस मधे आम्ही सर्व गोष्टी सुंदर बनवितो.  तो सुंदर माड माझ्या मनात कायमचाच चित्रित झाला.


 कॅप मालरो Cap Malheureux, कॉईन दु मायर ( Coin Di Mire ) -

   

मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावरील जवळ जवळ उत्तर टोकाला असलेलं हे बेट,- कॉईन दु मायर. निसर्ग-सौंदर्याची लयलूट केलेल्या मॉरिशच्या सौंदर्य-मुकुटातला मोरपिशी तुरा किंवा मोरपिसच. पाचू आणि नीलम या रत्नांचा रंग आणि प्रभा घेऊनच हा समुद्रकिनारा चितारला असावा. आमच्याकडे आलेल्या कुठल्याही आणि कितव्याही पाहुण्याला तेथे नेल्यानंतर एकच प्रतिक्रिया असे. पहिले काही मिनिटे तरी कोणाची नजर समुद्रावरून हटतच नसे. तो/ती स्तंभित होऊन इतका सुंदर समुद्र बघतच रहायचे. काही मिनिटानी भानावर आल्यावर `` काय हा सुंदर समुद्र !'' ह्या अर्थी कुठल्यातरी उद्गारवाचकाचेच शब्द मुखातुन बाहेर पडत. आणि नंतर फोटोंची धांदल. किनार्यावरील सुरुच्या झिपर्यांमधुन घेतलेला समुद्राचा आणि समुद्रातील कॉईन दु मायर या बेटाचा  फोटो म्हणजे आपल्याकडच्या `चौदहवीका चाँदच्या' पुढचं निसर्गाचं सौंदर्याचं परिमाण.

                   इथलं निसर्गचित्रण करतांना मला नेहमी वाटे, जसा देवात ठेवलेला गंगेच्या पाण्याचा गडू, गंगेच्या विशाल पात्राची अनुभूती देऊ शकत नाही त्याप्रमाणे निसर्गाचे काढलेले फोटो निसर्गाच्या विशाल पसार्याची कल्पना पूर्णपणे मांडू शकत नाहीत. आकाशातल्या सर्व तार्यांना एखाद्या कागदावर चित्रित करायचं म्हटलं तर आकाशाचाच कागद करायला लागेल. आणि पृथ्वीवरच्या सर्व निसर्गाला एखाद्या जागेत बंदिस्त करायचं झालं तर पृथ्वीचीच कक्षा वापरायला लागेल. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला, कानांनी ऐकलेला आणि स्पर्शाने अनुभवलेला निसर्ग हळुहळु झिरपत हृदयापर्यत पोचतो, तेंव्हाच त्याचं विशाल रूप हृदयात कायमचं चित्रित होऊन राहतं. एक कायम स्वरूपी प्रतिमा गुगल ड्राईव्ह किंवा क्लाउड मधे कायमची साठवली जावी तसा. गाई जशा स्वस्थ चित्ताने बसल्या की पोटातलं परत ओठावर आणून रवंथ करत राहतात तसा हा कायम स्वरुपी चित्रित झालेला निसर्ग मनावर केलेल्या एका क्लिक मधे कितीही वेळा अनुभवता येतो. एखादा समर्थ कवी किंवा लेखक एखाद्या ठिकाणच्या निसर्गाचं चित्रण समर्थपणे मांडू शकेलही पण ज्याचा त्याचा निसर्ग ज्याने त्यानेच अनुभवावा.

इथला मोरपिशी समुद्र, हिरवीगार झाडी या निळ्या हिरव्या  रंगाच्या कोंदणात लाल चुटुक मानव निर्मित चर्च आणि त्यावरच्या लाल चुटुक घंटा हे जणु एकमेकांसाठीच बनल्यासारखे वाटे.

             काचेचा तळ असलेल्या नावेतून समुद्राच्या अंतरंगात डोकावून पहायची संधी इथल्या नावाड्यांच्या उत्साहामुळे आमच्यापर्यंत चालून आली. वहिनी आणि भावाला घेऊन समुद्रातील कोरल पहायला गेलो होतो. ह्या द्रवमय देवतेने आपल्या अंतरंगात कितीजणांना आश्रय दिला होता ते पहातांना आश्चर्य वाटत होतं. हल्ली शहरा शहरात माणसांनी बांधलेल्या विस्तीर्ण टाऊनशिप्सना मागे टाकतील अशा प्रवाळांच्या वस्त्या  पाण्याखाली फोफावल्या होत्या.  विविध आकाराचे, विविध रंगांचे प्रवाळ पाण्याखाली लपले होते. काचेचा तळ असलेल्या नावेमुळे ही प्रवाळांची दुनिया `खुल जा सिमसिम' म्हटल्यावर संपत्तीने ओसंडून जाणार्या अजब गुहेसारखी आमच्यासमोर उघडली होती. हजारो हजारो वर्षांची साठवलेली ही संपत्ती होती. कोरलच्या वस्त्या बनतांना त्यात त्या इवल्या जीवांची एक कमालीची शिस्त होती, सौंदर्यदृष्टी होती त्यांच्या architecture ची

 कमाल होती. स्थापत्यशास्त्राची वहावा करावी तेवढी थोडी हो ती. प्रत्येक पुढच्या पिढीने त्यांच्या साम्राज्यात अजून अजून मोलाची भर घातली होती. माणूस सर्वात हुशार प्राणी आहे असं म्हणवून घेणार्यांची कीव वाटली. मासे झुंडीने प्रवाळाच्या त्या चिरेबंदी वाड्यांच्या भूलभुलैयातून सुळकन जात होते. कित्ती प्रकारचे मासे, किती रंगांचे मासे!, किती वेगवेगळ्या आकाराचे मासे. उडत्या तबकडीसारखा दिसणारा रे फिश पंख हलवत उडावं तसा पाण्यातून उडत चालला होता. त्याची लांबच लांब  काडीसारखी शेपटी त्याच्यामागोमाग पाण्यातून वहात चालली होती. माशांचे रंग आणि त्यांच्यावर देवाने केलेलं रंगीत टॅटू आजही कोणाला आपल्या अंगावर करायला जमणार नाही.

स्नॉर्केलिंगसाठी पाण्यात उतरतांना नावाड्याने हातात ब्रेडचा चुरा दिला होता. सवईने मासेही तो खायला गोळा झाले. माझ्याभोवती जमलेली ती रंगांची दुनिया वेड लावून गेली. ओठांचा चंबू करून सतत   करत डोळे मिटता माझ्या भोवती जमलेल्या माशांची ती `ओरॅकलची' भाषा एकच सांगत होती, मुठीतला खाऊ लवकर काढ.

                       नावाडी बरोबर येतांना गळ आणि अमिष घेऊन आला होता. त्याच्याबरोबर येणार्यांना गळाला लागलेले ताजे ताजे मासे  भेट म्हणून तो देत असे. पहिल्यांदा कुतुहलाने आम्हीही मासा कसा गळाला लागतो बघत होतो. मासा गळाला लागल्यानंतर गळ्यात गळ अडकलेल्या माशाची तडफड बघवेना. नावाड्याने गळ ओढून काढल्यावर त्याचा घसा फाटून तोंडातून येणारं रक्त, त्याचा प्राणांतिक तडफडाट वहिनीला सहनच होईना. श्री आद्य शंकराचार्य हे केरळचे असल्याने त्यांनीही हे दृश्य कधीतरी पाहिलं असाव असं वाटायला लागलं. तडफडणार्या माशाशी केलेली माणसाची तुलना आणि त्याचं लक्ष्मी-नरसिंहाच्या स्तोत्रातलं वर्णन समोर प्रत्यक्ष बघत होतो.

जाळ्यात मी गवसलो भवसागरीच्या नाही तिथून सुटका करु काय देवा

संसाररूप गळ हा मम कंठ छेदी। घायाळ मी तडफडे बहु वेदनांनी।।4.1

प्राणांतिका कळ उठे मम मस्तकी ही। फाटून जाय मुख हे मम प्राण कंठी

धावून या झडकरी बहु त्रस्त हा मी। लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।4.2

भारताचे लाडके राष्ट्रपति डॉ. A.P.J. अब्दुल कलाम मॉरिशस भेटीसाठी आले असता थोड्यावेळासाठी ह्याच समुद्र किनार्यावरील कोळी बांधवांना भेटले. कुठल्या देशाचा राष्ट्रप्रमुख दुसर्या देशातील सामान्य नागरिकांना इतक्या आत्मीयतेने भेटण्याची ती बहुधा पहिलीच वेळ होती.  डॉ. कलामांच्या अत्यंत साधेपणाने आणि अत्युच्च विचारांनी तेंव्हा साराच मॉरिशस देश भारावून गेला होता. वर्तमानपत्र असो किंवा लोकांच्या तोंडी असो एकच विषय होता. राष्ट्रपति डॉ. A.P.J. अब्दुल कलाम! ``माझे आजोबा नावाडी होते आणि माझा मोठा भाऊही नावाडी आहे '' हे त्यांनी सहजपणे तेथील कोळी बांधवांना सांगितलं. नावेतून जाता जाता ते आपल्या भावपूर्ण शब्दात म्हणाले, ``समुद्राचं हेच पाणी मॉरिशसच्या आणि भारताच्याही किनार्यांना जोडतं.''

आपल्या देशाचं तारु प्रगतीपथावर नेणार्या ह्या महा-नावाड्याने, ``माझ्या मॉरिशसच्या बांधवांना समुद्रात कोठे जास्त मासे आहेत ही माहिती त्यांना लवकरच भारताच्या सॅटॅलाईट मार्फत उपलब्ध होईल आणि त्यांना कमी श्रमात जास्त मासे मिळतील.'' असं त्यांचं जीवन जास्तीत जास्त सुखमय करण्याचं आश्वासन दिलं.

 

Pointe aux piments पाँत पिमा अर्थात पाँतोपिमा -

मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर उत्तरेकडे असलेलं हे पिटुकलं गाव आणि तेथील सुंदर समुद्र किनार्याच्या जोडीने तेथे असलेलं टुमदार छोटसं मत्स्यालय हे मला कितीही वेळेला पहायला आवडायचं. निसर्गाने निर्माण केलेल्या ह्या जीवसृष्टीची कमाल वाटावी असे हे रंगिबेरंगी जीव. एखाद्या जागेचा उत्तम रित्या वापर कसा करावा हे येथेच शिकावं. परत परत ते शब्द माझ्या कानात घुमत, ``आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर बनवितो.'' एकदा का तुम्ही चांगलं काम हाती घेतलं की देव सुद्धा धावून धावून मदत करतो. असं मला नेहमी वाटतं. इतके सुंदर आणि वैविध्यपूर्ण मासे इतक्या निरोगी स्वच्छ परिसरात ठेवलेले पाहून मन प्रसन्न होई. एखादा माशाचा टँक मोकळा आहे असं समजून पुढे जायला निघावं तर अचानक त्याच्या तळाशी ठेवलेले दगड श्वासोच्छ्वास केल्यासारखे का हलत आहेत म्हणून पहावं तर तो दगडासारखा खडबडीत मासा असे. समुद्राच्या तळाशी बराच काळ बसून राहिल्याने दगडावर जशी कोरलची घरे साचावीत किंवा समुद्र-शेवाळ वाढावे तसे त्यांच्याही अंगावर चिकटलेले दिसे. खूप वर्ष तपश्चर्येला एकाच जागी बसलेल्या वाल्मीकी ऋषींच्या, किंवा च्यवनऋषींच्या अंगावर मुंग्यानी वारुळ बांधलं ते खरच असावं. रंगांची सारी दुनिया ह्या माशांच्या अंगावर अवतरली होती. कदाचित सर्वात सुंदर मासे बनविण्याची देवांची स्पर्धा घेतली गेली असावी आणि त्यातील पहिल्या 10%ना इथे ठेवलं असावं. आमच्या पाहुण्यांना आवड असेल तर मी तर हे हटके असलेलं मत्स्यालय मी नेहमीच दाखवायला घेऊन जायचे. 

  ग्री ग्री (Gris Gris) आणि सुफले (Souffle)

मॉरिशस ह्या बेटाचं दक्षिण टोक म्हणजे ग्रीग्री. Gris ह्या  फ्रेंच शब्दाचा अर्थ ग्रे , राखाडी.  इतर जागी लाटा विरहीत असलेला समुद्र इथे मात्र गर्जना करत असतो. सूऽऽसू वारा. पावसाचा मारा. गडद्द निळा सागर. पांढर्या फेसाच्या उसळणार्या निळ्या लाटा समुद्रातल्या काळ्या फत्तरांना चहूबाजूंनी घेरून त्यांच्यावर आदळत हर्षोन्मादाचे तुषार उडवत काळ्या फत्तरांचीही हृदये विर्दीण करत. फेसाळत सरसर किनार्यावर येऊन फुटणार्या लाटा असंख्य तुषारांचे मोती उधळत. फेसाची  लवलव हालणारी रेघ किनार्यावर सोडून मागे सरत. समुद्रकिनारा म्हणावा असा समुद्रकिनारा इथे नाही. समुद्रसपाटीपेक्षा 20-25 फूट ऊंच खडकाळ सपाटीवरून निळं आकाश आणि निळा समुद्र पहात राहणं हीच इथली मजा.  इथल्या सुसाट वार्यापुढे शरणागती पत्करून गवतानीही जमिनीलगत खुरटेपणानी रहायच मान्य केलय. संपूर्ण मॉरिशस भोवती असलेली coral reef  प्रवाळाची भिंत मॉरिशसच्या दक्षिण भागात नाही. त्यामुळे लेमोर्न, सुफले, ग्रीग्री ह्या दक्षिण टोकांवर समुद्र रौद्ररूपात गर्जत असतो. Souffle हाही फ्रेंच शब्द! breath / blast हा त्याचा अर्थ. घोंगावणारा  वारा जेथे आहे ते सुफले. उंच खडकावर उभं राहून  गडद निळ्या   समुद्राच्या लाटंची चाललेली दंगामस्ती नुसती बघत रहायची. भल्या मोठ्या खडकांना फोडून दगडांच्या कमानी तयार करणारा हा शिल्पकार अनोखाच!   इतर ठिकाणी तरंग रहित निळाईवर तरंगत असलेल्या होड्यांचं नेहमी दिसणारं दृश्य मात्र इथे दिसत नाही. आईचे रागावलेले डोळे पाहून मुलानी मागच्या मागे काढता पाय घ्यावा तसे समुद्राचे खवळलेले रूप पाहून होडयांनी ही इथून काढता पाय घेतला आहे.

हे फक्त वानगीदाखल काही समुद्र किनारे .

------------------------------------------------------------------------------------

वादळांचा देश

वादळ हेनी (Hennie)

     आम्ही 6 डिसेंबर 2004 ला डिसेंबरमधे ह्या बेटबेटुल्यांच्या देशात पोचलो. बेटांसोबत येणारा विशाल समुद्र हा देशाच्या प्रत्येक घडामोडीवर ठसा उमटवून असतो. समुद्र आनंदी तर बेटांचा सारा समूह आनंदी. समुद्र रागावला की सारं बेट घराघरात गुपचुप बंद होऊन जातं. मॉरिशसची थोडी थोडी  ओळख होत होती. अजुनही  बरीच ओळख व्हायची होती. डिसेंबर ते मार्च हा मॉरिशसचा जसा Tourist season  तसा cyclone season सुद्धा.  आम्ही आल्यापासून अधुन मधुन स्थानिक लोकांच्या बोलण्यात वादळाचा उल्लेख यायचा. बाजारात नेहमीच्या एका दुकानात गेले होते. काउंटर वर बसलेली  गोड म्हातारी म्हणाली, " It's too hot! Now we need a cyclone."  " कधी येईल तुमचं cyclone?" मीही सहज विचारलं. "असं सांगून थोडच येणार आहे? मागे दोन वर्षांपूर्वी New year Eve लाच आलं होतं. अर्थात वर्षभर सतत वादळंच वादळं येत नाहीत. इथला उन्हाळा म्हणजे डिसेंबर ते मार्च हा वादळांचा काळ'' कोणी सांगे, "February is the month of cyclones. आम्ही भारतातून येणार्या पाहुण्यांना भारतातच थोपवून ठेवलं मार्चमधे या म्हणून कळवून दिलं. पाहुणे आले  आणि मार्च 21 ला सोमवारी Meteorological Service च्या  Director Mr. Sok Appadu (शोक अपादु) नी आम्हाला नको असलेल्या ह्या बिनबुलाये मेहमानच्या आगमनासाठी मॉरिशस बेटाला सज्ज राहण्याचे आदेश दिले. वादळ मॉरिशसवर येऊन थडकणार हे नक्की झाल्यावर  ह्या उपद्व्यापी बाळाचं नाव हेनी (Hennie) ठेवण्यात आलं. वादळापूर्वीची suspense शांतता सुरू झाली. रेडिओ, टि.व्ही. वर वादळाची सतत माहिती चालू होती. मॉरिशसच्या उत्तरपूर्वेकडून येणारं हे वादळ हातात वार्याचा असूड आणि पावसाची गोफण घेऊनच हजर झालं. पाहुण्यांना मॉरिशस दाखवायचं होतं. आमच्या हातात थोडेच दिवस होते. एकदा का वादळात सापडलो तर कायमचच राहून जाणार होतं. आमच्या नेहमीच्या टॅक्सी ड्रायव्हरला -- कुमारला  फोन केला. यायला जरा नाराज होता. पण पाहुण्यांना 8 दिवसात परत जायचं आहे म्हटल्यावर येतो म्हणाला.  ``पाहुणे भारतीय आहेत का दुसर्या देशाचे? '' फोनवरूनच त्याने पहिला प्रश्न टाकला. माझाही स्वाभिमान पटकन दुखावला गेला.   तरी सावध पवित्रा घेत मी त्याला कारण विचारलं. तो म्हणाला, ``नाही नाही तसं काही नाही. cyclone grade 2 साठीसुद्धा माझ्या Taxi चा अणि passengers चा  insurance आहे. पण पाहुणे दुसर्या देशातील असले तर त्यांना साहसी ट्रेक, पाण्यातील साहसी खेळ यांची आवड असते. ते भारतीय असतील तर त्यांना बीचवर जाऊन बसायला किंवा खरेदी करायला आवडतं. त्याप्रमाणे मी दिवसाचा आराखडा आखला असता.'' क्षणभर काय बोलावं ह्या विचारने मी अवाक् झाले. त्याचं खरं होतं. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना दिवसभराचा डबा दिला की ते आनंदाने एखाद्या बीचवर जाऊन आराम करत. लहानपणापासून आपल्याला ह्या साहसी खेळांची कधी तोंडओळखच झाली नाही. पारतंत्र्याचं  जोखड आयुष्यभर मानेवर वाहणार्या आम्हा भारतीयांना आणि आमच्या वाडवडिलांना आत्तापर्यंत ही संधी उपलब्धच झाली नव्हती. त्यांची सारी आयुष्य कुटुंबाच्या पोटासाठीच संपून गेली. आता मात्र आमची नवीन पिढी नक्कीच ह्या सर्व खेळांचं कौशल्य आत्मसात करेल असं वाटलं आणि नंतर आलेल्या भारतीय तरुणांनी  माझ्या मनातले विचार कृतीतही उतरवून दाखवले.

             कुमारसोबत आम्ही निघालो. नेहमी निळाशार चमकदार दिसणारं आकाश आज अंगाला राखाडी फासून आलं होतं. रोजच्या अंग भाजून काढणार्या `आदित्य जगतापांनी' सकाळपासूनच बुट्टी मारली होती. वळणं वळणं घेत कुमारची 2ZM 01 taxi मॉरिशच्या रस्त्यांवरून धावायला लागली. 01 चा अर्थ होता 2001 सालची गाडी आहे. गाडीचा नंबर पाहिला की गाडी किती नवी किंवा जुनी आहे हे सहजच कळत असे. सर्वच गाड्यांची तब्बेत मात्र निरोगी असे. आजच्या हवामानानुसार जरा वेगळ्याप्रकारचा दौरा आखणं भाग होतं. फिनिक्सची ग्लास फॅक्टरी, शिप मॉडेल फॅक्टरी, शॅमॅरिलची सप्तरंगी वाळू, तिथून जवळच असलेला शॅमेरिलचा धबधबा, माहेबुर्गचं म्युझियम आणि माहेबुर्ग वॉटर फ्रंट असा दिवसभराचा कार्यक्रम आखून आम्ही निघालो होतो. खाली उतरलेले ढग,रिमझिम पाऊस, सभोवार हिरवळ आणि त्यातून जाणारा आमचा रथ! चित्रपटातील स्वर्गासारखंच दृष्य होतं.

फिनिक्सची ग्लास फॅक्टरी -

पहिलीत तळेगावच्या पैसाफंडच्या काचेच्या कारखान्यात गेलेली ट्रिप आठवत थोडसं नाखुशीनी गाडीतून उतरलो. ग्लास फॅक्टरीपर्यंत जायला सिमेंटची पायवाट बनवली होती. कुठे जायचं आहे हे विचारायाची जरूर नव्हती. सिमेंटच्या पायवाटेवर मार्गदर्शक म्हणून पावलांच्या उमटवलेल्या ठशांवर काचेचा रस ओतल्याने पावलांचे ठसे चमकत होते. त्याचाच मागोवा घेत आम्ही आत गेलो. छोट्याशा जागेचीही सुबक मांडणी करून लोकांना कसं आकर्षून घ्यावं हे इथेच शिकावं. काचेच्या उकळत्या रसामुळे कुठे धग लागणं नाही, कचरा नाही, काचेच्या तुटक्या फुटक्या गोष्टींचा कचरा नाही. काचेच्या म्युझियममधे गेल्यासारखं! आत कामगार काचेच्या वस्तू बनवत होते. काचेची बंद मूठ, उघडलेला पंजा, पेपरवेटमधेच मॉरिशसचा पोस्टाचा स्टँप, जणु काही हत्तीने पाय देऊन चप्पट केल्यासारख्या फिनिक्सच्या दारूच्या (रिकाम्या) बाटल्या, दिवे, अशा सर्व काचेच्या वस्तू मॉरिशसची आठवण म्हणून न्यायला ठेवल्या होत्या. आपल्याकडे कुंभार मातीचे गोल दिेवे बनवितात. त्यात खालच्याबाजूने तेल घालायचं. ते परत सुलटे करून ठेवले तरी त्यातून तेल गळत नाही. त्यांचा मॅजिक लँप बघतांना मला त्याचीच आठवण झाली. आपल्याकडचं मातीचं तत्रज्ञान इथे काचेत उतरवलं होतं. ``काच कारखान्यात काय पहायच आहे? पाच मिनिटात येतो.’’ असं कुमारला सांगून गेलो होतो. तब्बल पाऊण तासानी ``चला चला वादळ येईल’’ म्हणत बाहेर आलो तेंव्हा आमच्या हातात बरचं सामान गोळा झालं होतं. हसत हसत कुमारनी डिकी उघडून सर्व सामान नीट ठेऊन दिलं.

 Ship model factory

Ship model factory मधेही Ship models बघता बघता इतके रंगून गेलो आणि फोटो घेता घेता तास कधी संपला हेही कळलच नाही. खरोखरच्या पण प्राचीन जहाजांच्या बनविलेल्या प्रतिकृती इतक्या सुंदर आहेत की  त्यावरून नजर हटत नव्हती. ते बघतांना पाय खिळून राहिले होते. दरवेळेस बाहेर आलो की दरवाजाच्या समोरच गाडी घेऊन कुमार तयारीत रहात असे. गाडी जवळ लावता आली नाही तर हातात छत्री घेऊन तो दरवाजापाशी वाट पहात उभा असे तेही आम्ही सांगता.

ढगांमधील गंगा तलाव-

       वाकवा रिझरर्वॉयरच्या दिशेने गाडी धावत होती. येथून मॉरिशसला पाणीपुरवठा होई. रस्त्याच्या दुतर्फा पुरुष पुरुष उंचीची सोनटक्क्याची झाडं शुभ्र पांढर्या आणि पिवळसर सोनेरी फुलांनी लगडलेली होती. ओलीचिंब झालेली झाडं वार्यावर हेलकावत होती. इतरवेळी त्यांचा घमघमणारा सुवास पाण्यासोबत वाहून गेला होता. गंगा तलाव हे इथल्या सर्व भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण. डोंगराच्या कुशीत तयार झालेलं सरोवर आणि त्या सरोवराकाठी बांधलेल शिवाचं मंदिर. गंगातलावाला लागून असलेली टेकडी चढून जाणार्यांसाठी मारुतीराया भेटण्यासाठी प्रेमाने उभा असे. आम्ही गंगा तलावला पोचलो तेंव्हा नेहमी अबोल असलेला वारा चांगला जोरजोरात घुमत होता. भांडणार्या मांजरांचे  खर्जापासून तार सप्तकापर्यंत सारे आवाज आम्हाला काढून दाखवत होता. गंगा तलावाच्या पाण्याची पातळी वाढल्याने मंदिरापर्यंत उतरून जायच्या पायर्यांवरही पाणी आलं होतं. मंदिरापर्यंत जाणं अशक्य होतं. निसर्गाचं रौद्र रूप तरीही  मोह घालणारं होतं. सगळीकडे ढग खाली उतरले होते. ढगांच्या ओलसर साम्राज्यात बुडून गेलेला एखादा डोंगर मधेच आपलं डोकं वर काढे तर कधी ढगांच्या झिरझिरित ओढणीतून झाडं डोकावून बघत. निळ्याशार पाण्यावर लोळणारे ढग जरा लोळत लोळत दूर झाले की गंगा तलावाचं निळंशार पाणी चमकू लागे तर कधी ढगाला सूर्यकिरणाने भोक पाडून सूर्य हळुच झाडांना हात लावून जाई. इतरवेळेस सापडणारं निसर्गाचं हे दर्शन मनाला तिथेच बांधून ठेवत होतं. गंगा तलाव डावीकडे सोडून आम्ही पुढे आलो होतो. पावसातच कुमारने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. आलोच म्हणून धावत गेला. थोड्याच वेळात ओंजळभर चायनीज पेरु तोडून घेऊन आला. दुतर्फा चायनीज ग्वाव्हाचं जंगल होतं . चिनी पेरुंच्या झाडांवर अजूनही मोठ्या बोरांएवढे लाल लाल पेरू उठून दिसत होते. आपल्याकडच्या करवंदांसारखा हा मॉरिशन रानमेवा.

वादळवार्यात ढगातून सफर -

सरळ शॅमोनीला जाता गाडी अ‍ॅलेक्झान्ड्रा फॉलवरून खाली ब्लॅक रिव्हर गॉर्ज (black river gorge)कडे धावायला लागली. वादळातील निसर्गसौदर्य काही वेगळच होतं. black river gorge point ला गाडी थांबली. तेथील हिरव्यागार पर्वतरांगा, त्याच्यावरून खाली उड्या मारणारे प्रपात आणि सर्वापलिकडे दिसणारा निळा समुद्र ह्या नेहमीच्या दृश्यात ढगांनी हजेरी लावली होती. ढगांमुळे चित्र पुसट व्हायच्या ऐवजी अजून गडदच झालं होतं. एकामागे एक उभ्या असलेल्या पर्वतरांगा मागे मागे बघत जावं तशा जास्त जास्त निळ्याशार आणि गडद बनत होत्या. त्यांच्या three dimensional layers मधून दृष्टी बाहेर निघत नव्हती. आज पावसामुळे धबधबेही चांगलेच फुगले होते. सोसाट्याच्या वार्याने आमच्या छत्र्या उलट्या होत होत्या. आम्हाला `आता निघा'चे इशारे देत होत्या. नेहमी गोंडस वाटणार्या मॉरिशसच्या निसर्गाचं रागावलेलं रूपही अविस्मरणीय़ होतं. हे वादळ एवढं भयावह नव्हतं. कुमारचा कान गाडीतल्या रेडिओकडे होताच. दुपारी चार वाजेपर्यंत वादळाची ग्रेड 2 सुरू होईल असं वाटत होतं.तो पर्यंत आम्ही शॅमॅरिलला पोहचलो. शॅमॅरिल म्हणजे सप्तरंगी वाळूचा प्रदेश. जेवढा जास्त सूर्यप्रकाश तेवढे इथल्या वाळूचे वेगवेगळे रंग अजून अजून उठावदार दिसतात. अगदिच पहाण्यापेक्षा पाहून तर येऊ म्हणून आत गेलो - -आणि ढगांमधून सूर्याने दर्शन द्यायला सुरवात केली. वाळूचे सातही रंग उजळून निघाले. वादळामुळे आज जिथे जावे तेथे आमच्याशिवाय हौशी कोणी नव्हते. आमच्यासाठीच निसर्ग मांडून ठेवला होता. अजूनही वादळाचं रूप गोंडस होतं. आम्ही  जवळच्या शॅमेरिल वॉटरफॉलवर मोर्चा वळवला. पायर्या चढून जायला वहिनीने नकार दिला. भाऊ आणि  मी पायर्या चढलो. खोल दरी, दाट झाडी आणि समोर एकाशेजारी एक तीन धबधबे खाली खोल दरीत कोसळत होते. तेवढ्यात दाट ढगांच्या सांदि-सापटीतून सूर्याचे किरण ढगांना भेदून दरीत उतरले. क्षणार्धात दरीत खाली प्रपातावर सप्तरंगी इंद्रधनुष्य चमकायला लागलं. राहवून वहिनीला वरती आणण्यासाठी खाली धावले. तीही आली. देव देवळातच भेटतो असं नाही.

माहेबुर्गचं वस्तू-संग्रहालय - पावसाच्या रिमझिमित आमची गाडी महेबुर्गच्या म्युझियमजवळ आली. म्युझियमच्या आवारात घनदाट झाडी. फार पूर्वी लावलेली झाडं असावीत. सगळी पद्धतशीर ओळींमधे उभी होती. म्युझियमच्या मागच्या बाजूस एक लोकोमोटिव्ह इंजिन ठेवलं आहे. 1860 मधे  मॉरिशसमधे रेल्वे ट्रॅक घालून जवळ जवळ 250 किमी.चं रेल्वेचं जाळ पसरून दळणवळण सोप्प झालं. दुसर्या महायुद्धापर्यंत ही रेल्वे मॉरिशसमधे टिकून होती. पण त्यानंतर वेगाने तयार झालेले रस्ते आणि वाढलेल्या गाड्यांच्या संख्येमुळे मॉरिशन रेल्वे तोट्यात जायला लागली आणि ती बंद झाली. त्याचच एक इंजिन बघण्यापुरतं ह्या म्युझियममधे टिकून आहे. आता मॉरिशसमधे मेट्रोही आली आहे.

म्युझियममधे अफ्रिकेचे 1570 मधे छापलेले नकाशे, डचांच्या काळापासूनचे हातानी काढलेले नकाशे, चित्र हे तीन - चार शतकापूर्वीचे असले तरी त्यातील बारकावे लक्ष वेधून घेतात. 1598 ते 1602 मधे 13 डच तांडेल 46 जहाजं घेऊन आले. त्याची चित्रं तेथे सापडतात.

काही जहाजं बुडाली त्याचा शोध घेऊन त्यातील सामान आजही ह्या संग्रहालयात ठेवलेलं आहे. लोकांनी बरोबर आणलेले मसाले, धान्य, त्यांच् सामान अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. त्याचबरोबर एका गोष्टीनी आमच सर्वांचच लक्ष वेधून घेतल. पितळी तांबे आणि त्यात साठवलेली नाणी. भारतातून जे वेठबिगार येथे आणले गेले, त्यांच्या मनातील आपण परत एक ना एक दिवस आपण आपल्या मातृभूमीला परत जाऊ, आपल्या मुलाबाळांना परत भेटू, आपल्या वाटेकडे क्षीण डोळे लावून बसलेल्या आपल्या म्हातार्या आई-बापांच्या पायावर डोक टेकवून त्यांचे पाय अश्रूंनी चिंब भिजवू  ही इच्छा त्यांच्या तांब्यांबरोबर जमिनीत गाडलेली तशीच राहून गेली. असं वाटलं त्यांनी पै पै साठवलेले तांबे पुरून त्यावर उभारलेली चूल जणू त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्भेटीवर ठेवलेले निखारे होते.

Chelonia Mydas  नावाने ओळखली जाणारी अति प्रचंड आकाराची कासवं 1598 मधे डच लोकांनी खाऊन टाकली आणि त्यांच्या पाठी कपाटं, दरवाजे, टेबलं किंवा इतर शोभेच्या वस्तू  बनवायला वापरल्या. त्या कासवांची माहिती, चित्र, त्यांच्या पाठीवरील भली मोठी कवचं  तेथे पहायला मिळतात.

जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी एप्रिलमधे आलेल्या वादळाने घातलेल्या तांडवाची चित्र चितारली होती. त्यावेळी असंख्य लोक वादळात मरण पावले होते. तेंव्हा सॅटेलाईट  इमेजेस हे तंत्रज्ञान विकसीत झालं नव्हतं. वादळाच्या पहिल्या तडाख्यात हेलपाटून गेलेल्या मॅरिशसने जरा निःश्वास सोडला. वादळात झालेल्या नुकसानीचा अंदाज घ्यायला आणि परत एकदा पडल्या झडल्या संसारांना सावरायला लोक बाहेर पडले. पण ती शांतता वादळानंतरची होती तशी वादळापूर्वीचीही होती. म्हणजे वादळाचा भला मोठा Eye  शांतपणे मॉरिशसवरून सरकत होता. वादळाच्या त्या डोळ्याला माणसाच्या विजिगीषु वृत्तीची, कुठल्याही संकटांवर मात करण्याच्या मनोधैर्याची जणु परीक्षाच घ्यायची होती.  त्यांची दुःख पचवायची ताकद आजमावायची होती. मृत्यूची शांतता घेऊन येणारा वादळाचा डोळा परत एकदा अश्रुंचा महापूर देऊन गेला.      

            तेंव्हापासून वादळ आलं की मॉरिशसमधे  Cyclone Drill  शिस्तबद्धपणे पाळली जाते. फ्रेंच सॅटेलाईटच्या सहाय्याने मॉरिशसच्या जवळ आसपास वादळ येत असेल तर त्याची नोंद घेतली जाते. ते मॉरिशसवरच येत आहे हे नक्की झालं की त्याला नाव दिले जाते. ही झाली वादळाची पहिली ग्रेड. किंवा class 1.  वादळाच्या आधी 36 ते 48 तास आधी हा इशारा नागरिकांना दिला जातो.  दुसर्या ग्रेडमधे वादळाचा मॉरिशच्या दिशेने प्रवास सुरू होतो. किमान 120 किमी. वेगाने वारे वाहू लागतात. वादळ जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी 12 तास आधी ही सूचना नागरिकांना दिली जाते. वादळ प्रत्यक्ष येण्या  आधी सहातास अधी दिलेली सूचना म्हणजे ग्रेड 3. वादळाचं थैमान सुरूच राहील ही 4थी ग्रेड किंवा class 4.  वादळ पूर्ण शमलं की त्यानंतर सर्व उद्योग सुरळीतपणे सुरू करण्याची म्हणजे Cyclone Termination ची सूचना नागरिकांना देण्यात येते. एकदा का वादळाची ग्रेड 3  जाहीर झाली की सर्वांनी आपापल्या घरात दारे खिडक्या बंद करून रेडिओ ऐकत बसायचं हा नियम सर्वजण पाळतात. `लाटा पहायला चला समुद्रावर' अशी नियम मोडणारी वृत्ती नाही. म्हणूनच Cyclone grade 2  पर्यंतचा  Insurance  टॅक्सींना मिळतो. बाकीच्यांना नाही. ग्रेड 3 cyclone ला सर्व सरकारी आणि बाकीच्या कचेर्या बंद होतात. लोक घरी पोचतात. ज्यांची घरं वादळाला तोंड द्याला सक्षम नाहीत त्यांची शेजारील शाळंमधे सोय केली जाते.

            अजूनही बाहेर वादळाने जोर धरला नव्हता. त्यामुळे माहेबुर्ग वॉटरफ्रंटला जायचं ठरवलं. वादळाने आमच्या उत्साहाला लगाम घालावा लागला. तरी नेहमी शांत असलेल्या समुद्राच्या अंगी भलतच चैतन्य संचारलं होतं. नेहमीच्या तरंगहीन समुद्राला जाग आली होती. सरसर लाटा अंगावर धावून येत होत्या. नेहमी आपले मागचे पाय समुद्रात बुडवून बसणारा लायन माऊंटन गडद निळा झाला होता. शेजारीच पोरं फुटबॉल खेळत होती. वार्याचा रेटाही वाढला होता. तरी समुद्राचे विविध रंग बघत स्तब्ध उभे राहिलो.

 

8 बागबगीचांचा देश - ( Country of Gardens) Nature Parks

कॅसेला बर्ड पार्क -

                    मुंबईच्या बागांमधे जातांना सर्वत्र एकमेव दृश्य मनाला त्रास देत असतं. अनेक काकमित्र आणि कुत्रमित्र यानी त्याच्या पिशव्या पिशव्या भरून आणलेला आणि बगीचात मनात येईल त्या ठिकाणी पसरलेला फाफडा, ब्रेडचा चुरा वा घरी उरलेला तत्सम अन्न प्रकार. ते खाण्यासाठी अधीर झालेल्या काकांचे थवे.  पुण्यार्जनासाठी बागाबागाच्या दरवाजात, बाहेर, बागांमधे ठिकठिकाणी वर्तमानपत्राच्या चिटोर्यावर ओतला जाणारा दूध-भात. पार्ले जी खायला चटावलेल्या बेवारस तट्ट पोटांच्या कुत्र्यांच्या झुंडी.  पसापसा मका वा `कबुतरांची ज्वारी' नावाचं  रोगट धान्य भूतदया म्हणून रस्त्यावर कुठेही ओतल्यावर पिसांचा धुराळा उडवत गोळा होणारी मुर्दाड कबुतरं. मारी किंवा मका कुरतडुन रोगट झालेल्या खारी. ते कमी की काय म्हणून माणसांनी जे जे टाकणं शक्य असेल ते ते टाकून केलेली घाण.

                       ह्याच रम्य प्राणी आणि पक्षी जीवनाचा रोज जवळुन परिचय असल्याने मॉरिशची कॅसेला पार्क मला अद्भुतच वाटायला लागली. इतकं रमणीय उद्यान पाहून खर तर गहिवरुन येणच बाकी होत. तमाम पक्षीप्रेमी  आणि प्राणीप्रेमी प्रेमातच पडतील अशी ही बाग!  मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर फ्लिक आँ फ्लॅक ( Flic en Flac)  आणि तमारँ Tamarin ह्यांच्यामध्ये पसरलेला 14 हेक्टरचा भूखंड ह्या सुंदर बागेने व्यापला आहे. अत्यंत काळजीपूर्वक ज्यांचं आरोग्य जपल आहे असे  शेकडो प्रकारचे हजारो निरामय आनंदी, सुंदर पक्षी, अत्यंत निरोगी, चपळ, आनंदी, प्राणी. पक्षी, प्राण्यांना रहाण्यासाठी बनवलेले हवेशीर प्रशस्त निवारे, चहुकडे हिरवीगार हिरवळ, पाण्याचे झरे, हिरवीगार झाडी. बघावं तिथे स्वच्छता. आणि `फुले तोडू नका' अशा पाट्यांशिवाय फुललेल्या अनेक देशी विदेशी फुलांचे ताटवे. `आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर ठेवतो' असे प्रत्येक मॉरिशियन नागरिकाचे निःश्वास जणु मॉरिशसमधे कुठल्याही ठिकाणी गेल्यावर ऐकू येत असतात. स्वच्छतेचा सूर्य उगवला की सौंदर्याची अनेक किरणं त्याच्यासोबतच सर्वत्र फाकली जातात हेच खरं. बागेची शोभा वाढवणारी रेस्टॉरंट्स, पश्चिम किनार्याचं मनोरम सागरदर्शन घडवणार्या खास जागा, उत्तम बसायची सोय.  शिवाय बागेची माहिती देणार्या सहली. सुंदर मॉरिशच्या सौंदर्यात भर घालणार्या या बागा.  तिकिट काढून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत  मनसोक्त कितीही फिरा.

           प्रवेश करताच फार ऊंच उडणारे कोंबडा, बदकं, मोर, वर्गातले अनेक पक्षी  त्यांच्या चिल्यापिल्यांसह आजुबाजूने तुमच्यासोबत चालत असतात.

तोकडा स्कर्ट घालून लांबसडक सुंदर पायांच्या मुलीने बॅले करावा तसं तिच्या लांब पायांशी स्पर्धा करणारं शहामृग त्याची मान लांब करून मधेच तुम्हाला त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी न्याहाळत जातं. त्याचा बॅलेला लाजवणारा पदन्यास बघता बघता सर्व विसरायला होतं.

       लहान असतांना  `नाचरे मोरा आंब्याच्या वनात' असं म्हणत आपणच आपले दोन हात पिसार्यासारखे पसरून शाळेच्या स्टेजवर नाचायला लागायचं. `नाचरे मोरा आंब्याच्या वनात' अशी कितीही आर्जव केली तरी कुठुन कधी मोर डोकावला नव्हता. आमचे लहान अशक्त पाय मात्र त्या गाण्यावर नाचून नाचून दमून जात असत. आपण आपल्याच मनमोराचा पिसारा फुलवुन आनंदी व्हायला लागायचं. इथे मात्र आपल्या कुटुंब कबिल्याला घेऊन जाणारा, पाचू आणि नीलमचा वर्ख गळ्यावर लावलेला एखादा कंठनील मोर त्याचा रेशमी पिसारा ऐटित पेलत जात असतांना तुमच्या पुढ्यात थांबून अख्खा पिसारा थरथरवत अचानक उलगडून दाखवतो. जपानी पंखा परत मिटवून टाकावा तसा परत पिसारा बंद करुन काही बाही टिपायलाही लागतो.

ह्या पक्षांबरोबर सलगी करायची संधीही पक्षीतज्ञांच्या सोबत तुम्हाला मिळते. हातावर येऊन बसणारा काककुवा, हातावरून चालत थेट तुमच्या खांद्यावर येऊन बसतो. तुमच्या हातुन खाउही खातो.

 

   

अत्यंत काळजीने आणि अतीव प्रेमाने वाढवलेले नऊ सिंह आणि चार चित्ते इतके माणसाळले आहेत की तुम्ही त्यांना अगदि जवळुन सुद्धा पाहू शकता. त्यांनी सांगितलेली सर्व काळजी घेऊन तुम्ही ह्या प्राण्यांसोबत हिंडू फिरू शकता. त्यांच्या अंगावरून हात फिरवू शकता आणि त्यांच्या बरोबर फोटोही घेऊ शकता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा खिसा भोक पडेपर्यंत रिकामाही करायची तयारी पाहिजे. झेब्रा, माकडं सर्वच प्राणी निरोगी धष्टपुष्ट, आनंदी पाहून आपलाही आनंद द्विगुणीतच होतो. झेब्रांचे कळप ही हिरवळीवर  हिंडत असतात. मॉरिशसमधील भली मोठी कासवं हा सर्वांनाच नोंद घ्यायला लावणारा प्राणी सर्वसाधारणपणे सर्व बागांमधे उपस्थित असतो.

 राजहंसांसाठी एक प्रशस्त आणि स्वच्छ पारदर्शक सरोवर आणि आजुबाजुला हिरवीगार हिरवळ. हिरवळीच्या भोवती उच उंच झाडं. ह्या सरोवरात असंख्य हंस, राजहंस आणि इतर पाणपक्षी विहार करत असतात. काही हंस, पाणपक्षी बाहेरच्या हिरवळीवर विश्राम करतांना दिसतात.

ज्यांना साहसाची आवड आहे त्यांच्यासाठी इथेही कड्यांवर दोराच्या सहाय्याने चढणे, चढणे, दोरीच्या पुलावरून दरीपार जाणे, अशी Rando Tour असते. 

 

ला व्हॅनील, ( LA VANILLE  CROCODILE  Park ) मगरपट्टा - 

           ही अशीच सुंदर  जागा. खरतर पालीच्या मोठ्या बहिणींना आपणहून भेटायला जायची माझी काही फार इच्छा नव्हती. कारण आम्हा सर्वांच्याच घरी भरपूर पाली होत्या. मॉरिशस बाकी कितीही सुंदर असलं तरी फुटपाथवर अचानक सैरावैरा धावणारी आणि बाहेरून घरात उडून येणारी मोठी झुरळं, घरी रात्रभर मोठ्या मोठ्याने चुकचुक करत घरभर एकमेकींच्या पाठीमागे  भान हरपून पळणार्‍या मोठ्या मोठ्या पाली मी पहिल्यांदा इथेच पाहिल्या. पाल चुकचुकली असा वाक्प्रचार भले भारतात असेल पण त्यांचा रात्री झोपेतूनही जाग आणणारा, एवढा मोठा आवाज मी पहिल्यांदाच इथे ऐकला.   

          पाली, मगरी, सुसरी ह्या कुरूप प्राण्यांबद्दल माझ्या मनात कुठलीच आत्मीयता नाही. सुसरी मगरी बहिणी बहिणी. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने मगरबाई त्यातल्या त्यात सुंदर. तिचा लांबलचक तोंडावळा तर सुसरबाईंचा जरा बसका आणि रुंद. दात तोंडातून बाहेर आलेले. `सुसरीबाई तुझी पाठ मऊ' म्हणतांना कोणी तिच्या पाठीवरून हात फिरवून पाहिला असण्याची शक्यताही कमीच. इथे मात्र फुटभर छोट्याशा मगरीच्या पिलाला हातात घेऊन तुम्ही फोटो काढू शकता. तिचं करवती दातांचं तोंड मात्र रबर लावून बंद केलेलं. इवलीशी पोरटी चावली तर तुकडा पाडते म्हणे. आपल्या कुठल्या पूर्वजाला नक्राश्रुंची कल्पना सुचली कोण जाणे पण इतकी मुस्कटदाबी करूनही खरोखरच तिच्या डोळ्यात अश्रु नव्हते. रडण्याची त्यांची कुठलीतरी दुसरी रीत असावी.

                नाव जरी क्रोकोडाईल पार्क असलं तरी चिली आईस्क्रीमधे मिरची जेवढ्या प्रमाणात चांगली वाटेल तेवढ्याच प्रमाणात ह्या crocodile park  मधे मगरी आणि सुसरी आहेत. बाकी बाग कृत्रिम रीत्या बनवूनही खरोखरच नैसर्गिक सुंदर असावी इतकी सुंदर आहे. त्यातले झरे, जंगल, हिरवळ  हिरवळीवर रांगणारी भली मोठी कासवं, कासवांचे विविध प्रकार पाहता पाहता तुम्ही त्यांच्यात गुंतुन जाता. पाण्याच्या एका टँकमधे ठेवलेली 10-12 छोटी पाण-कासवं टँकच्या एका कोपर्‍यात उतरंड रचावी तशी झोपली होती. एकच कासवं जाग होतं. टँकमधे एक चक्कर मारून आलं की त्या सर्व झोपलेल्या कासवांच्या उतरंडी समोर जाऊन आपले पुढचे चपटे हात त्या प्रत्येकाच्या तोंडासमोर फटकफटक पाण्यावर आपटत  एखादया लहान मुलाप्रमाणे खोड्या काढत होतं. त्याचं दरवेळेला पाण्यात एक चक्कर मारण आणि उतरंडीसमोर वरपासून खालपर्यंत आणि परत खालपासून वरपर्यंत प्रत्येकासमोर पाण्यावर पाय आपटणं  आणि खोड्या काढणं बराच वेळ चालू होतं. हिरवळीवर चालणार्‍या मोठ्या मोठ्या कासवांवर  लहानमुलं बसत होती. त्यांना पाठीवर घेऊन तीही लुटुलुटु चालली होती. मधेच कोणी इकडचा तिकडचा तोडून आणलेला झाडपालाही आनंदाने खात होती. कुठलेच प्राणी दुःखी कष्टी वाटत नव्हते.

पँम्प्लेमूस ( Pamplemousses) ची SSR Botanical Garden. -

                  इंद्राचं नंदनवन कसं असेल ह्याची मनात कल्पना करायची असेल तर मॅरिशसमधल्या बागां आणि बगिचे बघायला पाहिजेत. आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर बनवितो हे ब्रीदवाक्य घेऊन वावरणार्या समस्त मॉरिशियन लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ते सतत त्यांची तुलना सिंगापूरशी करत. आम्हाला आमचा देश सिंगापूरहून छान बनवायचा आहे; ह्या ध्येयाने ते झपाटले होते.

                    अशीच सुंदर बाग म्हणजे पँम्प्लेमूस ( Pamplemousses) ची SSR Botanical Garden. काय सुंदर दरवाजा आहे मनाने कुठे तरी  दाद दिली. ह्या बागेची सफर करायची असेल तर दरवाजातच उभ्या असलेल्या गाईडस् पैकी एखाद्याला घेऊन गेलं पाहिजे. ही बाग गाईड शिवाय कळतच नाही. पूर्ण अंधार झाला की शेजारची गोष्टही दिसत नाही तशी गाईडविना ही बागही कळत नाही.

            ``आत्ता ज्या दरवाजाने आपण आत आला त्या दरवाजानेच सुरवात करू या. पाहिल्या पाहिल्याच तुम्हाला तो नक्कीच आवडला असणार. हा विस्तीर्ण दरवाजा जेंव्हा पहिल्यांदा तयार झाला तेंव्हा लंडन येथील क्रिस्टल पॅलेस (crystal palace) येथे 1862 मधे भरलेल्या आंतर्राष्ट्रीय प्रदर्शनात त्याने बक्षिस मिळवलं होतं.'' जी गोष्ट चांगली वाटते, चित्ताकर्षक असते, ती तशी असण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. हा नेहमीचा अनुभव आहे. आज माझ्या भारतातून आलेल्या मैत्रीणींसोबत मी येथे आले होते. सार्या गर्दीला बरोबर घेऊन त्यांना सतत उत्साह येईल, त्यांच लक्ष थोडही विचलीत होणार नाही, एक मिनिटभरही कंटाळा येणार नाही, असं सतत बोलत राहणार्या गाईडबद्दल मला कायम एक कुतुहल वाटत राहिलं आहे. गाईड ज्ञानाचं दिव्य अंजन डोळ्यात घालून नवीन दृष्टी देणार्या गुरूचं काम करतो. गर्दित ओळखू येणारा नट स्टेजवर प्रकाशझोतात उभा राहिला की लगेच डोळ्यात भरतो. त्याच्या भोवती त्याच्या भूमिकेचं वलय निर्माण होतं. तशी झाडांच्या भाऊगर्दीत सारखीच वाटणारी झाडं गाईडच्या माहितीच्या प्रकाश झोतात आली की उजळून निघत. गाईडचं सतत माहिती देणं हे ह्या प्रकाशझोताचं काम करतं. `` हा बघा इलेफंट इअर पाम '' जाता जाता पाण्यात उगवलेली भल्यामोठ्या पानाची केळीसारखी वाढलेली झाडं पाहतांना त्याची मोठी पानं खरोखरच हत्तीच्या कानांसारखी आहेत हे  पटलं. जाता जाता पानांमधे लपलेलं त्याचं फिकं हिरवट पांढरट शोभेच्या आळूला येतं तसं फूल दाखवायला तो विसरला नाही. ``हा क्रोकोडाईल पाम! ह्याचं खोड मगरीच्या अंगासारखं दिसतं बघा.'' हो खरच की इतकावेळ त्याच्या खोडाकडे पाहिलच नव्हतं. ``हा बघा इलेफंट फीट पाम.'' त्याचं खोड पाहतांना खरोखरच हत्तीनी जमिनीवर पाय ठेवल्यासारखा दिसत होता. आपल्याला निरोगी डोळे आहेत म्हणून आपण सगळं पाहू शकतोच असं नाही. एबनी, महोगनी, लतानिया, पँडानस, आणि पूर्वी पाहिलेलीही अनेक झाडं दाखवत दाखवत तो आम्हाला काही झुडपांकडे घेऊन गेला. झाडांबद्दल समोरच्याचं कुतुहल इतक्या थोड्या वेळात जागृत करून ते टिकवून ठेवणं ही मोठीच कला आहे. ``ह्या झाडाच्या पानाला हात लावून पहा आणि तुम्हीच सांगा ह्याचं नाव काय असेल.'' त्याची पानं आपल्या पारिजातकासारखी किंवा गायीच्या जीभे सारखी खरखरीत होती. ``ह्याला काय नाव देणार?''  सगळे विचार करत असतांना त्यानी नाव सांगितलं, mother in law's tongue. '' हा हा हा एकच हशा पिकला. काही नातेसंबंध जगभर एकसारखेच कडू किंवा गोड असतात .  सासू येणार म्हणून घर साफसूफ करणारी माझी ब्राझीलची मैत्रीण मला आठवली. तिचा नवरा आई येणार म्हणून स्माइली सारखा मुखचंद्रमा घेऊन फिरत होता तर स्माईलीची वरच्या दिशेने वळलेली ओठांची रेघ खालच्या दिशेने वाकवून पुढचे पंधरा दिवस ती वागत होती. mother in law's tongue च्या शेजारच्याच झाडाच्या पानाला हात लावायला सांगताच सगळे पानं कुरवाळायला लागले. हे पान मात्र एकदम मखमल मऊ. ``father in law's tongue.'' उत्साहाने आम्ही फिरत होतो. समोर पाहिलं का? एक पामचं मेलेलं झाडं दिसतय? त्याच्या बोटाच्या दिशेकडे सगळ्यांचे डोळे. त्याला वरती बघा खूप मोठा फुलोरा येऊन गेलेला दिसतोय. ``हं हं!'' - आम्ही. ``तो तालिपॉट पाम बर का.

    

तालिपॉट पाम           कमळ पाने त्यावरून फिरणारे पक्षी           कमळाचे लहान पान

साठ वर्षांनी त्याला असा भला मोठ्ठा जवळ जवळ 20-25 फुटी फुलोरा येतो. एकाच दांड्याला खूप फुलं लागतात. फुलांची फळ व्हायला लागली की हे झाड मरतं. आयुष्यात एकदाच फुल येतात त्याला.'' मेलेल्या झाडालाही आपल्या कॉमेंट्रीने जिवंत करायची कला गाईडजवळ होती. हे बुढा ट्री. झाड पिंपळाचं दिसत होतं. पानं जरा छोटी होती. पानाची पुढे लांबलचक होत जाणारी रेघही आखुड होती. ``ह्या झाडाखाली गौतम बुद्धाला ज्ञान झालं ना म्हणून हे बुढा ( बुद्धाचं झाड) ट्री. आम्ही गयेला असलेल्या बुढा ट्रीची फांदी लावून हे झाड आलं आहे.''  झाडाची एक फांदी 30-40 फूट लांबच लांब वाढली होती. ही जाडजूड लांब फांदी मधे तुटली होती. पण तुटलेल्या भागावर लगेच सिमेंट लावून लिंपल्यासारखं दिसत होतं. ``ह्याला सिमेंट का लावलय?'' नाही नाही ते सिमेंट नाही हे झाड मधेच तुटल्याने त्याला काही रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यावर खास औषधांचा लेप लावला आहे. झाडालाही केलेली मलमपट्टी पाहून  आम्ही आमच्या देशाची प्रत्येक गोष्ट सुंदर बनवतो हे वेगळं सांगायला लागत नव्हतं. मधेच 25- 30 नारळाची झाडं. उभी नाहीत चक्क जमीनीवर झोपलेली. ``आमचा देश वादळांचा. एकदा आलेल्या वादळात ही सर्व झाडं साफ कोलमडली. त्यांना उभं केलं असतं तर त्यांची मुळं दुखावली असती. आम्ही त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना ह्याच आडव्या झोपलेल्या अवस्थेत जिवंत ठेवलं.'' आजही ती घेतलेल्या काळजीला प्रतिसाद देऊन तेवढीच आनंदी दिसत होती. पाचशेपेक्षा जास्त प्रकारची झाडं विविध देशातून आणून त्यांची उत्तम काळजी घेतली होती. दोनशे अडिचशे प्रकारचे पाम,  अनेक प्रकारची कमळं,  आणि अनेक झाडं. ``हा बाऊबाबचा वृक्ष!'' ( गोरखचिंच)  प्रचंड खोडाचा पसारा आणि वरती त्यामानानी छोटासा फांद्या-पान पसारा. आम्ही एका ओळीत पाचसहा जणं उभे राहिलो तरी झाडाचं खोड स्टेजवरच्या पडद्यासारखी विस्तृत बॅकग्राऊंड तयार करत होतं. पाच सहा लोकांनी मिठी मारूनही त्याचा विस्तृत बुंधा कवेत येत नव्हता. ``हे कापराचं झाडं.''  त्याची पानं चुरून नाकाला लावून हुंगतांना कापराच्या वासाने सारेच सुखावले. ``जाळी लावून बंद केलेल्या भागामधे ही सगळी मसाल्याची झाडं बर का. खाली वाकून जमिनीवर पडलेलं एक वाळकं पान चुरून त्यानी सगळ्यांच्या नाकाला लावलं. बघा ओळखू येतो का वास? तमालपत्र? - -लवंग? - -मिरी? --- नीट लक्षात का येत नाही? ``हा `ऑल स्पाईस' चा वास आहे. All in one.'' ते सगळ्या झाडांच्या मधे झाडं दिसतय बघा. त्याला छोटी छोटी फळं लागलेली दिसतायत. - -'' झाडाच्या फांदीवरून प्रथमेची रेघेसारखी चंद्रकोर दिसल्यासारखे आम्हीही ``दिसलं दिसलं!!! फळ आलेलं झाड दिसलं'' म्हणत होतो. ते झाड जायफळाचं. 28 वर्षांनी जायफळं येतात त्याला.  मग ते झाड मरतं का? एका पाश्चिमात्याचा प्रश्न . नाही नाही. अठ्ठावीस वर्षांनंतर त्याला दर वर्षी फळं येतात. ते ऊंच झाड सिनॅमोन, दालचीनीचं. त्याची साल म्हणजेच दालचिनी!  Oh! I love Cinnamon bread ! आमच्या गटातील त्या गोर्या तरुणाची प्रतिक्रिया. आम्ही चालत चालत कमळाच्या तळ्यापाशी आलो होतो. भल्यामोठ्या पांढर्या शुभ्र , पिवळ्या, लाल कमळांनी तळी गच्च भरली होती. त्यांच्या फुलांच्या रंगाप्रमाणेच हिरव्या पानांमधेही तो रंग हलकेच उतरला होता जणु. वेगवेगळ्या आकाराच्या , रंगांच्या पानांनी तळं भरून गेलं होतं. फुलांनी फुललं होतं. पंजे एकाला एक जुळवून ठेऊन फुगवल्यासारख्या उमलण्यासाठी सज्ज झालेल्या कमळाच्या कळ्या टपोर्या दिसत होत्या. आता ह्या बागेचं एक विशेष मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही चालत चालत एका तळ्यापाशी पोचलो. पाण्यावर  तीन साडेतीन चार फुटी व्यासाची ताटासारखी गोल गोल पानं तरंगत होती. ही Giant Amazon water lily. बगळ्यांसारखे काही पाणपक्षी आरामात ह्या पानावरून त्या पानावर चालत होते. नवीन पानं देठाच्या मध्यापर्यंत दोन्ही बाजूनी गुंडाळून ठेवल्यासारखी दिसत  होती. दोन्ही बाजूची गुंडाळी उघडलेली नवीन कोरी पानं चमकदार लालसर हृदयाकृती. छोट्या `पंट होड्यांसारखी तरंगत होती. ह्या छोट्या पानांचं तीन फूट व्यासाच्या पानात रूपांतर व्हायला महिना तरी लागतो.  त्याच्या मोठ्या मोठ्या गोबर्या कळ्या पाण्याबाहेर मान काढून डोकावत होत्या. पांढरी शुभ्र कमळं नुकती आजच उमलली होती. उमलेली पांढरी कमळं दुसर्या दिवशी फिकट गुलाबी रंगाची होतात. झाडं बघतांना कंटाळा पळून गेला. कितीवेळ चालत होतो तेही जाणवलं नाही. ह्या इथे शिवसागर रामगुलाम यांची समाधी आहे. कुठल्याही देशाचे मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आले तर ते येथे येऊन आदरांजली वाहतात. त्यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण होते. आम्ही आपले पूर्व पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी बाजपेयी यांनी लावलेली झाडं पहात होतो.

           जेंव्हा डच लोकांचा अम्मल या बेटावर होता तेंव्हा त्यांचा गव्हर्नर `माहे लँबुर्दोन' येथे रहायचा. त्याने येथे आवश्यक ताजी भाजी आणि मसाल्याची झाडं लावली. बेटावर आणलेल्या शेळ्यामेंढ्यांना चारा मिळावा म्हणून आजुबाजूची अजून जमीन ह्या घराला जोडण्यात आली. त्यांच्या चारापाण्याची सोय झाली. नंतर फ्रेंच horticulturist `पिअर पॉव्हर' इथे आल्यावर ह्या 60 एकर जागेचा विकास एका सुंदर बगिचात करण्यात आला. फ्रेंचांनी 1760 मधे देशोदेशातून आणलेले अनेक पाम, भारत आणि अनेक देशातून आणलेली उंच ,घनदाट वढणारी झाडे, मसाल्यांची झाडे ह्यांनी हा बगीचा सजला. आजही शंभर वर्षांहून जुनी अनेक झाडं येथे दिमाखात उभी आहेत.

ह्या बागेत जाळीने बंदस्त केलेल्या जागेत हरणं, कासवं ठेवलेली आहेत.

बागेचा निरोप घेणंही आनंददायक आहे. बाहेरच्या स्टॉल्सवर मिळणारे मॉरिशियन तिखट-मीठ, चिंचेचं पाणी घातलेले अननस मैत्रीणींच्या हातात दिल्यावर लहान मुलींसारख्या उत्साहाने खिदळत आम्ही घरी पोचलो.

---------------------------------------------------------

9 सुंदर बेटांच्या देशात

         मॉरिशसचा नकाशा उघडला तर ह्या मुख्य बेटाच्या कडेकडेने अनेक छोटी छोटी बेटं आणि बेटुल्या समुद्रात पोहतांना दिसतात. हे बेटांचे थेंब ठिपक्यांमुळे मॉरिशच सौंदर्य उणावता उलट ते मॉरिशसच्या सौंदर्यात भरच घालतांना दिसत. आणि त्यासोबत कालिदासाच्या शाकुंतल मधल्या एका सुंदर  श्लोकपंक्तीची आठवण ही जागी करतात. –

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं

मलिनमपि हिमांशोः लक्ष्म लक्ष्मीम् तनोति।

 

जरि कमल वनासी वेढि शेवाळ सारे

परि कधि उणावे श्रेष्ठ ऐश्वर्य त्याचे॥

जरि दिसत असे तो डाग चंद्रावरीही

परि खुलवि तयाचे पूर्ण सौंदर्य तोची

         `मलिनमपि हिमांशोः लक्ष्म लक्ष्मीम् तनोति।' मलीन झालेल्या हिमांशु म्हणजे चंद्रावर असलेला `लक्ष्म' म्हणजे डाग त्याच्या लक्ष्मीत म्हणजे वैभवात भरच घालतो. प्रत्येक बेटाचं स्वतःचं असं वेगळ नाविन्य आहे. त्यांनी मॉरिशसच्या मुख्य बेटाभोवती सुंदर रांगोळी रेखलीए. अर्थात ह्या प्रत्येक बेटावर पोचायचं म्हणजे तुमचे गरम खिसे नरम हे होतातच.

Ile aux Aigrettes ( लो अ‍ॅग्रेथ) –

मोटरवेवर  एअरपोर्टच्या दिशेनी एका मागून एक सर्कल्स मागे टाकत माहेबुर्ग (Mahebourg)कडे दाखविणार्या बाणाकडे प्रवीणनी गाडी वळवली. प्रवीण, मी आणि बरोबर विशाल बापू हा आमचा मॉरिशन दोस्तही होताच.  आम्हाला क्रेयॉल येत नसल्याने वारंवार आमच्या खिशाला बसणारी चाट विशालमुळे कमी व्हायची. शिवाय सर्व रस्ते शॉर्टकटस् त्याला चांगले परिचयाचे असल्याने वेळ , पेट्रोल आणि पैसे वाचायचे. (Mahebourg) च्या रस्त्याने 15-20 मिनिटांनी गाडी उजवीकडे ब्लूबेच्या पाटीकडे वळली सरळ जाणारा रस्ता आडव्या रस्त्याला मिळाला उजवीकडे ब्लू बे तर डावीकडे Hotel Preskil ची पाटी होती. आम्हाला Preskil ला जायचं होतं. मोरपंखी निळा हिरवा समुद्र चमकत होता. त्यावर  हिरव्यागार बेटाची चकती तरंगत होती. हेच ते ` लो अ‍ॅग्रेथ!' इथला समुद्र कितीही वेळा पाहिला तरी अजून अजून पहावा असा ! पंचमहाभूतांना आजारपण कुठलं आणि म्हातारपण कुठलं?  क्षीण होत जाणं त्यांना कुठे माहित? इथल्या समुद्राच्या तारुण्याचा बहर कधी ओसरत नाही. समोरच झाडाखाली लो अ‍ॅग्रेथला जाणार्या फेअरी सर्व्हिसची पाटी होती. मी इथे अनेक वेळेला अनेक मैत्रिणींबरोबर आले होते. ती पाटी पण पाहिली असेल पण पहाणं, वाचणं आणि कळणं ह्यात माझी कुठे संगती साधली जात नसे. पाहिलं तर वाचता येत नसे. वाचलं तर आपले उच्चार आणि तेथील स्थानिक उच्चार ह्यात थोडंही साम्य नसे.

सकाळी 11, 11.15 आणि दुपारी 1.15 अशी रोज ही फेअरी चाले. रविवारी बंद. स्थानिक लोकांना 175 मॉरिशन रुपये,  मॉरिशस मधे काम करणार्या परदेशी लोकांसाठी 300 मॉरिशन रुपये तर परदेशी प्रवासी लोकांसाठी 600 मॉरिशन रुपये. आमचे पासपोर्ट, प्रवीणचं civil service ministry चं I card आम्ही सुसज्ज आलो होतो. ही गाईडेड टूर होती.

बोटीत आमच्याबरोबर  चारजणांचं चिनी कुटुंब होतं. दोन व्हॉलेंटिअर्स आणि आणि एक गाईड मुलगी. असे 10-11 जणं बोटीत बसलो. समुद्र किनार्यावरून अवघ्या 10-12 मिनिटावर बेट. किनार्यापासून दूर जावं तसा किनाराही सुंदर दिसायला लागला. समुद्राचं नीळेपण जास्त गहिरं व्हायला लागलं. किनार्यावर असतांना लो अ‍ॅग्रेथकडे डोळे लावून बसलेलो आम्ही आता त्याच्याकडे पाठ करून  किनार्याचे, lion Mountain चे,  किनार्याच्या पार्श्वभूमीवर चमकणार्या रंगीबेरंगी यॉटस्, कॅटॅमेरॉन यांचे फोटो काढता काढता बेटावर पोचलोही!  छिन्नी हातोड्यानी छिनून काढल्याप्रमाणे समुद्राच्या लाटांनी बेटाच्या किनार्याला कापून अशी काही कपार केली आहे की वाटावं बेट आधाराशिवायच समुद्रात तरंगत आहे.

बोट जेटीला लागली. जेटीवर उतरताच गाईडनी स्वागत केलं. इतका वेळ शांत बसलेल्या गाईड मुलीनी आता बोलायला सुरवात केली. संपूर्ण प्रवाळाच्या बनलेल्या या बेटावर 2-4 ते 10-15 cm. इतकाच काय तो मातीचा थर आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुरटीच राहून गेली आहे. कमी उंचीच्या ह्या जंगलात मध्यभागी मातीचा थर थोडासा ज्यास्त म्हणजे 10-15cm. असल्यानी तिथे मात्र एबनीचं जंगल अजून तग धरून आहे.

          

 

जादुई चष्म्यासारखी किंवा अंधारात अचानक लागलेल्या दिव्यासारखी ती गाईड मुलगी मला वाटायला लागली. इतक्यावेळ दिसलेल्या गोष्टी आता दिसायला लागल्या.

       मॉरिशसच्या दक्षिणपूर्वेला असलेलं 26 हेक्टरचं  हे प्रवाळाचं बनलेलं बेट 1965 मधे  Nature Reserve म्हणून घोषित करण्यात आलं. पूर्वी किनार्यालगत असलेल्या शिसवी (एबनी) च्या जंगलातील काही अजूनही तग धरून असलेल्या झाडांचं एक छोटसं खुरटं जंगल इथे बेटाच्या मध्यावर आहे. पूर्वी मॉरिशसमधे नैसर्गिकपणे इथल्या सखल प्रदेशात उथळ पाण्यात आढळणार्या डोडो या पक्षांचं ते नैसर्गिक घर होतं. आज  हे पक्षी अस्तित्वात नाहीत. Mauritian Wild Life Foundation (M.W.F)नी आक्रमण केलेल्या बाकीच्या प्राणी आणि वनस्पतींचं उच्चाटन करून  इथल्या स्थानिक वनस्पतींची nursury तयार केली आहे. इथल्या काही वनस्पती जगभरात अजून कुठेही सापडत नाहीत. गुलाबी कबुतर (pink pigeons) इथे नव्यानी सोडण्यात आली आहेत. उंदरापासून हे बेट मुक्त केलं आहे.

आपल्याकडे स्थानिक वनस्पती कुठल्या हे ठरविण्यासाठी जशी गायरानं आणि देवराया ह्या प्रमाण मानल्या जातात; तशा मॉरिशसच्या मूळ वनस्पती कुठल्या ह्याचा अभ्यास करण्यासाठी जी बेटं लोकसंपर्कापासून दूर राहिली त्या बेटांचा अभ्यास केला जातो. बेटांवरील वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांचा अभ्यास केला जातो. ही बेटं छोटी असली तरी इथल्या वनस्पती पूर्णपणे वेगळ्या आहेत. इथे सापडणारी  Rat Wood Tree किंवा  candlewood tree ही झाडं फारचं दुर्मिळ आहेत. Rat Wood च्या एकाच झाडावर तीन वेगवेळ्याप्रकारची पानं येतात. वनस्पती खाणार्य़ा प्राण्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून जवळ जवळ तीन चार फुटांपर्यंत या झाडाची पानं लांब लाल लाल रेघा असलेली; थोडक्यात प्राण्यांना भीती वाटेल आणि ते खाणार नाहीत अशी होती. शेंड्याची पानं मात्र हिरवी आणि गोल होती. मधली पानं वेगळ्याच प्रकारची होती. पूर्वी इथे जिराफाप्रमाणे लांब मान असलेलली कासवं रहायची. त्याची मान तीन चार फूट ऊंच असे. ह्या कासवांपासून संरक्षण मिळविण्यात ह्या वनस्पती यशस्वी होत. पूर्वी इथे उंदीर नव्हते तरीही ह्या झाडांचं नाव Rat Wood का? कारणही गमतीशीर होतं. Rat Wood चं फूल पुस्तकात press करून ठेवलं तर 3-4 दिवसात त्याला मेलेल्या उंदराचा वास यायला लागतो. प्रत्यक्षात मात्र बेटावरील भरपूर प्राणवायुने आम्हाला जास्तच ताजंतवानं वाटत होतं. बेटावरील गुलाबी कबुतरांचे, समुद्राचे, विविध झाडांचे, एकेकाळी तेथे असलेल्या लांब मानेच्या कासवाच्या प्रतिकृतीसोबत आमचे फोटो घेता घेता कधी जायची वेळ झाली हे कळलच नाही.

Ile aux Cerfs  आईल सेफ - इलोसेफ-

                 जशी काशीविश्वेराची यात्रा अन्नपूर्णेचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याप्रमाणे मॉरिशसमधे इलोसेफला गेल्याशिवाय मॉरिशस पाहून झालं असं म्हणता येणार नाही. मॉरिशसच्या भोवतालची बेटं म्हणजे मॉरिशसच्या गळ्यातले रत्नहारच आहेत. त्या रत्नावलीतील इलोसेफ म्हणजे कंठ्यातील मध्यभागी सोनेरी वाळूत जडवलेला नीलमच म्हणायला लागेल.  मॉरिशसच्या पूर्व किनार्यावरील हे बेट नेहमीच्या मोरपंखी पाण्याने, सोनेरी वाळुने, निळ्याशार आकाशाने, हिरव्यागार झाडीने आणि सुंदर प्रवाळाने वेढले असले तरी त्यात अजुन एक गुप्त खजिना दडला आहे जो त्या बेटावर जाईपर्यंत सापडत नाही. तो म्हणजे waterfall of Grand Rivière Sud Est.  G.R.S.E. waterfall. ह्या बेटावर नावेतून पोचल्यावर परत नावेतून पुढे गेले की ग्रँड रिव्हिअर साउथ इस्ट ही नदी समुद्राला मिळते तेथपर्यंत जाता येत. हा संगम ही तेवढाच विलोभनीय. नदी येथे धबधब्याच्या रुपात समुद्रात कोसळते. तोच हा G.R.S.E. waterfall. हा धबधबा स्पिरिच्युअल पार्कच्या गणेश मंदिरातून दुसर्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने उंचावरून खाली बघता येतो. तेथून दिसणारा नदी-समुद्र संगम फार सुंदर दिसतो.  ह्या सर्व बेटांवर सागरीपाण्यातील साहसी खेळ मनसोक्त उपलब्ध असत.

आईल - - बेनिशिए (Ile aux Bénitiers )

 

   

                       मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर असलेलं सर्वात सुंदर बेट म्हणजे इलोबेनिशिए आईल बेनिशिए. फ्रेंचमधे शेजारील शब्दांचे संधी होत असल्याने आईल - - बेनिशिए एवढा लाबलचक उच्चार करता इलो बेनिशिए असं म्हटलं जातं. मॉरिशसच्या पश्चिम किना र्यावरून दक्षिणेकडे जात असतांना `ला गोलेत' (La Gaulette) या गावापर्यंत पोचलं तरी इथे इतकं सुंदर बेट असेल असं वाटत नव्हतं.

                बेनिशिए म्हणजे शिंपी, कालव, असं समुद्रातील अन्न. इथे कालव किंवा शिंपले खूप मिळतात हे तेथे गेल्या गेल्याच जाणवलं. वाळूत खूप शिंपले पडले होते. नावेनी बेटाकडे जातंना अर्ध्या अंतरावर आलो तर पुढे निळा समुद्र पाठी हिरवीगार सुरुची रांग डावीकडे लेमोर्नचा निळा खणखणीत पहाड, उजव्या क्षितीजावरही मागे मागे गडद निळ्या होत जाणार्या डोंगर रांगा. काही वेळाने दूरवर समुद्रात काहीतरी खडकासारखं दिसत होत. हळु हळु नाव त्याच्या जवळ यायला लागली आणि त्या खडकांवरून कोणाची नजर हलेना. त्याचे फोटो काढण्यासाठी सर्वांची धांदल उडाली.

                मी लहान असतांना आई व्रताच्या दिवशी आम्हा मुलांना  कहाण्या वाचून दाखवायची आणि आम्ही मजा म्हणून ऐकायचो. कित्येकवेळा तिची थट्टाही करायचो. जिवतीच्या कहाणीत तर मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काशीला गेलेला राजपुत्र पितरांना अर्घ्य देतांना ते घेण्यासाठी नदीतून दोन हात बाहेर येतात हे ऐकून आम्ही आईला पार भंडावून सोडत असू. इलो बेनिशिएला गेल्यावर मात्र तसच काहीसं वाटलं.

           ह्या नितळ निळ्या समुद्रात लेमोर्न ह्या डोंगरांची पार्श्वभूमी साधत   एखाद्या जलदेवतेने  समुद्रातून मनगटापर्यंत दोन हातांची जोडलेली तिची अंजुली बाहेर काढून जणु एखादा पुष्पगुच्छ सप्रेम अर्पण केला आहे असं वाटत होतं. कदाचित जाचाला कंटाळलेल्या अनेक गुलामांनी ह्या मृत्यूच्या पर्वतावरून उड्या मारून आपला जीवन प्रवास संपवला त्यांना भूमातेने वाहिलेली ही पुष्पांजली असावी.

तेथपर्यंत जाता येईल का? नावाड्याला सर्व जण विचारत होते. भरती असेल तर तुम्हाला त्या खडकावर चढताही येईल. पाणीही चढत होतं. मघाशी दगडी ओंजळीचे मनगटापर्यंत दिसणारे हात दिसता नुसती ओंजळच दिसत होती. खडकाचा खालचा दांडा पाण्यात बुडाला होता. नावाड्याने नाव त्या खडकाला लावताच त्या सुंदर खडकावर  चढून आम्ही फोटो काढून घेतले. त्याच्या शेजारीच एक दुसरा खडक होता. एखादा प्राणी त्याचे चारी पाय वर करून जसा पाण्यात लोळत पडावा तसा तो पाण्यात लोळत होता. काढू किती काढू किती फोटो संपेना इतके फोटो काढले. त्या अफलातून खडकांना वळसा घालून आम्ही इलोबेनिशिएच्या बेटावर आलो.

बगळ्यांसारखे पक्षी किनार्याच्या उथळ पाण्यात वाळूतून त्यांच्या पायांचे ठसे उमटवत चालले होते. लाटांमुळे तयार झालेली नक्षीही इतकी सुंदर होती की त्याचेही फोटो कॅमेराबंद केले.

तिथेच किनार्यावर मराठी कोळी गृहस्थ राहत होते. त्यांच्या आग्रहास्तव त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले व आम्ही जड पावलांनी, पुन्हा यायचे ह्या निश्चयाने परत आलो.

 

10 ट्रेकिंग आणि विविध साहसी खेळ

              मॉरिशसला लाभलेला असीम समुद्राचा सुखद संग, समुद्राची शांत वृत्ती, उथळ प्रेमळ समुद्रापासून गहिर्या गहन समुद्पर्यंत व्याप्ती, सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त अत्यंत निर्मळ पाणी आणि मॉरिशसवर असलेलं धनिक युरोपियनांचं वर्चस्व हयामुळे तेथे समुद्रात खेळले जाणारे surfing, sailing, snorkeling water skiing, windsurfing त्यासोबत Deep sea fishing, Scuba diving सारखे साहसी खेळ असो वा नौकानयन सारखी आरामदायी  कॅटॅमरॉन मधील दिवसभराची एखाद्या बेटावरची सहल असो सर्वच खेळांना भरपूर मागणी असते. आम्हीही आमच्या सर्व पाहुण्यांना पॅरा-सेलिंग करायला प्रोत्साहन देत असू. आणि आधी नको नको म्हणणारे सारे प्रत्यक्ष अनुभवानंतर मात्र अत्यंत आनंदून जात. आलेल्या पाहुण्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढून, छानपैकी एडिट करून ते जाण्यापूर्वी प्रवीण त्यांना सी.डी. बनवून देत असे. ही कायम स्मरणात राहील अशी छोटी भेट सर्वांनाच आवडत असे.

या शिवाय ले पुस, दोमेनदुलाग्राव सारखे डोंगर कडे चढणे, ब्लॅक रिव्हर च्या जंगलातून ट्रेक, किंवा सायकलनी भ्रमंती असे अनेक आनंददायी पर्याय येणार्यांसाठी उपलब्ध असत.

डोंगर दर्यांमधुन भटकंती -  

रविवार सकाळ  

             मॉरशसला शनिवार रविवार हे पूर्ण सुट्टीचे दिवस असत. शुक्रवारी संध्याकाळी फीसला लागलेले टाळे सोमवारी सकाळी आठालाच उघडत असे. `शनिवार रविवार ओव्हरटाईम' असले विचारसुद्धा मॉरिशिअन फिसच्या भोवती घोटाळत नसत. शनिवार भाजी, किराणासाठी आणि आवरावरीसाठी ठेवला तरी रविवार पूर्ण सुट्टी असे. इंग्रजी  पेपर ही फक्त शनिवारची चैन होती. भाजीसोबत येता येता तोही आणायला लागे. आठवड्यातून एकदाच इंग्रजी पेपर येत असल्याने तो पुरवून पुरवून वाचायला लागे.

15 ऑक्टो. 2005 शनिवारच्या वर्तमानपत्रात  नेचर वॉकची मोठी जाहिरात पाहिली. बस 8 वाजता रोझहिल प्लाझाला येणार होती. उद्या बघू आपलं आवरून झालं तर म्हणून  आम्ही दुसर्या दिवसावर सर्व सोपवलं. तरीही स्थानिक लोकांबरोबर जाण्यात जरा वेगळी गम्मत होती. आम्ही  भारतीय, भारतीय ग्रुपने कुठे कुठे जात असलो तरी स्थानिक लोकांबरोबर मिसळण्याच्या संधी अभावानेच येत.

दोमेन दु ला ग्राव -

 दुसर्यादिवशी सकाळीही कालचा पेपर खुणावत होता.  `नेचर वॉक ' ही मॉरिशस मधली रम्य कल्पना होती. ब्रेकफास्ट बनवून, बरोबर घेऊन, आम्ही सकाळी सव्वासातलाच रोझ हिलचा मार्ग धरला. एक धोपटी प्रवीणच्या गळ्यात तर दुसरी माझ्या! प्रत्येकाने आपापले जेवण बरोबर आणायचे होते. रोझहिलच्याच सुपर मार्केटला गाडी पार्क करून आम्ही प्लाझाच्या दिशेने वन् टू वन टू करत चालायला सुरवात केली.

Plaza -

रोझहिल-म्युन्सिपाल्टीपाशी 4-5 म्हातार्या चिनी बायका पिशव्या, सामान घेऊन उभ्या होत्या. इंग्रजीत त्यांना नेचर वॉकसाठी थांबला आहात  का असं विचारलं. ``वीऽऽऽऽवीऽऽ'' (होय होय) त्यांनी फ्रेंच / क्रेऑल बोलायला सुरवात केली. ``आँग्ले ऽऽऽ आँग्ले. '' मी क्रेऑलपुढे शरणागती पत्करली. बस तेथेच येणार होती. दर महिन्याला लोकांच्या मनोरंजनासाठी महानगरपालिका वा नगरपालिका काही ना काही कार्यक्रम ठेवते. ज्यांना काही कारणाने कुठे जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही चांगली सोय होती. बस वेळेवर आली . सगळ्यांनी आपल्या पैसे भरल्याच्या पावत्या दाखवून बसमधे चढायला सुरवात केली. ``आम्ही पैसे भरले नाही. पण आम्हालाही यायला आवडेल. आत्ता आम्ही पैसे भरतो''.प्रवीण म्हणाला. ह्या सर्वांबरोबर जायची संधी आम्हाला सोडायची नव्हती. `` बस फुल्ल आहे उभं राहून येणार का? मग थोडासा विचार करून तो म्हणाला, `` If we want to find a way we can find a way. '' `` तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट आहे का?'' ``होऽऽ!'' आम्ही. ``Then follow us.'' ``आमची गाडी सुपरमार्केटला पार्क केली आहे.'' `` ठीक आहे तेथपर्यंत माझ्या गाडीने चला.'' त्याच्या कारने सुपरमार्केटपर्यंत आलो. आम्हालाही बरं वाटलं. लोकल माहोल अनुभवता येणार नसला तरी आम्ही जाऊ शकत होतो. आमची निस्सान सनी पुढच्या Hollywood Star (घरांना नाव नाहीत निदान बसला तरी नाव होतं. बसचं नाव पाहून आनंद झाला. माझ्या मनात तिचा मर्लिन मन्रोसारखा चेहरा तयार झाला. ) च्या मागे धावायला लागली. थोड्याच वेळात आम्ही टूर ऑर्गनायझर च्या गाडी मागे जाणार होतो. कारण मधेच बस. 2-4 ठिकाणी लोकांना गोळा करत पोचणार होती.गाडीने मोटारवे पकडला आणि एअरपोर्टच्या दिशेने एक-एक सर्कल्स मागे टाकायला सुरवात केली. 16 Miles च्या वळणावर डावीकडे वळतांना पहिल्यांदाच लक्षात आलं की दोमेन - दु- ला - ग्राव कडे असा ठळक बाण दाखवलेली पाटी मौजूद होती.ज्या गावाला जायचं नाही त्याचं नावं कशाला विचारा  - - - वाचता येणारी पाटी म्हणून मी दरवेळी दुर्लक्ष केलं होतं. ---- आज त्याचा उच्चारही कळला- -- - दोमेन - दु- ला - ग्राव! दोमेन - दु- ला - ग्रावकडे दर्शविणारे बाणं जागोजागी दिसत होते. मॉरिशसमध्ये रस्त्यांचं डिझायनिंग इतकं छान आहे की एखादि पाटी दिसली नाही म्हणून रस्ता चुकला ही वेळ कधीच येत नाही. दुतर्फा संपणार्या उसाच्या शेतांमधून वळणं घेत रस्ता पुढे चालला होता. टार रोड संपून मेटलरोड सुरू झाला. पुढे लाकडी पट्ट्या टाकून बनविलेला एक पूल होता. त्याच्यावरून गाडी पलिकडे जाऊ शकेल का असं वाटत असतांनाच पुढची गाडी बिचकता त्याच्यावरून गेलेली पाहून आम्हीही गेलो. एका प्रशस्त रेस्टहाऊस पाशी थांबलो. काळं झिपरं कुत्र आणि एक सोनेरी मांजर उड्या मारतच स्वागताला  आले. एक S.U.V. पार्क केलेली दिसत होती. एक गोरा माणूस बोंझू बोंझू म्हणत स्वागताला आला. ही सर्व त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टि होती. जराशा चढावर हे रेस्टहाऊस होतं. समोर विस्तीर्ण नैसर्गिक हिरवळ. खाली वळणं घेत जाणारी एक छानशी नदी. नदीच्या पल्याड हिरवीगार पर्वतरांग! नदीकडे तोंड करून जागोजागी लाकडी बाक ठेवले होते. बस यायला अजून अवकाश होता. नदीकडे आणि समोरच्या रमणीय पर्वतराजीकडे  बघत आम्ही बाकावर बसलो. कुठेही गेलं तरी ती जागा कशी सर्वांगसुंदर , मन प्रसन्न करणारी असते. अस्वच्छतेचं थोडंही सावट कुठे पडलेलं नसतं. शांत, प्रसन्न चित्ताने आम्ही आमचा ब्रेकफास्ट काढून यज्ञकर्माला सुरवात केली. तोपर्यंत Star of Hollywood ही पोचली. कळणार्या किलबिलाटात सगळ्यांनीच आपले डबे सोडायला सुरवात केली. झिपरू आणि सोनू सगळ्यांच्याच पायाशी घोटाळत होते. थोड्याच वेळात पांगलेल्या सर्वांना आमच्याऑर्गनायझरने एकत्र करून  पुढचा प्लॅन सांगायला सुरवात केली. एकमेकांकडे पाहून हसण्यापलिकडे आमचा कुठलाच भाषा-संपर्क नव्हता. सगळे जे करतील ते आपणही करायचे  एवढेच माहित होते. नदित छोटे छोटे लाकडी तराफे दिसत होते. वल्हवत नदीच्या पलिकडच्या काठाला पोचायचा एक आनंदोत्सव सुरू झाला. माझा ग्रुप वल्हवण्याची शिकस्त करत होता. पण आमचं अ‍ॅलिस सारखं चाललं होतं.  Wonder land मधे पोचलेली अ‍ॅलिस जीव तोडून पुढे पळत होती. पळता पळता तिच्या लक्षात आलं की जेथे होती तिथेच आहे. आमच्या ग्रुपचं ही काही असंच झालं . प्रत्येकजणं जीव तोडून वल्ह मारत होता. परिणामी आम्ही तिथल्या तिथेच गोल गोल फिरत होतो. नेचरवॉकसाठी सगळेजण निघाले. झुळझुळ वाहणार्या नदिच्या किनार्या किनार्याने, सुंदरशा जंगलातून जाता जाता आत्तापर्यंत समोर दिसणारी पर्वतराजी आम्ही चढायला सुरवात केली. दुरून रम्य, साजिर्या दिसणार्या डोंगरांवर चढाई सुरू झाली. इथे प्रत्येक डोंगरावर एकाच प्रकारची माती असते. -चिक्कणमाती. मागे ले- पुस म्हणजे (The big Thumb)  हा डोंगर चढलो होतो त्याच्या आठवणी ताज्या असतांनाच ही नवी डोंगरचढाई! `अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई बूटं ते रोवावे' म्हणत चालायला सुरवात केली. आमच्या भारतीय बांधवांनी आज एका निसर्गरम्य ठिकाणी छान सहल आयोजित केली होती. तिथे जायचं सोडून कुठल्या चिखलात फसलो म्हणून मी माझ्याच उत्साहीपणाला दूषणं देऊ लागले. `वर' जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूस उंच गवत, पायाखाली चिखल आणि निसरडे गोटे ह्या शिवाय कुठेच लक्ष जात नव्हतं. मला `वर ' जायची भिती नव्हती. पण वरून कोसळणार्या गंगेला झेलायला शंकरबुवा सज्ज होते. माझ्यासाठी कोणी नव्हतं ही खंत होती. इथे सारखाच पाउस होत असल्याने पायाखालची माती ओलीच होती. दरवेळी पाय उचलला की बुटाला चिकटून किलो किलो ढेकळं वर येत. जड पावलांनी जाता जाता भोंडल्याचं गाण गुणगुणत होते. `हातपाय  खणखणित गोंडे . एकेक गोंडा वीसा वीसाचा --' इथल्या डोंगरांवर उगवणारं गवत मात्र बांबूच्या छोट्या जातीचं आणि चांगलं पक्क असतं. त्याचा घट्ट आधार घेत घेत पाउल उचलणं सोप्प जात. आजूबाजूला हास्य-विनोद , चिवचिवाट आणि हास्याची कारंजी उडत होती. आमचीही मराठी मुक्तपणे चालू झाली. आमच्या दोघांशिवाय आमची भाषा कोणाला कळत नाही हे परम सुखाचं वाटत होतं. हळु हळु सगळ्याच चेहर्यांवरचा उत्साह, आनंद आणि हास्याचे फवारे कमी व्हायला लागले. बरोबरच्या गर्दिची घनताही कमी कमी व्हायला लागली. काळेसावळे, नीटस भारतीय वंशाचे मॉरिशन, थोडेसे चेहरे टिकून होते. छडीदार अंगकाठीच्या चिनी लोकांचा उत्साह मात्र टिकून होता. आम्हालाही उत्साह आला. एव्हाना आमच्या बूटांनीही सरड्याप्रमाणे आपला रंग बदलला होता लाल ब्राऊन मातीने ( टेरे - रूज)  ते पूर्णपणे माखले होते.. ही चिकट माती नंतर धुवायला सुद्धा बराच त्रास देणार होती. पहिल्या प्प्यावर स्क्वाड थांबलं. एका उंच मचाणावरून खालचं विहंगम दृष्य पहायची सोय होती. मचाणावर चढल्यावर खालची हिरवीगार जमिन पाहून सुखवायला झालं. आकाशात उडणार्या ढगांच्या सावल्यांची सालपट खाली हिरवळीवर  विखुरली होती. खाली ओल्या चिक्कण मातीशिवाय बसायला काहीच नव्हतं. तरी थोडेसे हिरवळीचे तुकडे, दगड पाहून सर्वांनी बसून घेतलं. वर चढणार्यांच्या संख्येत खूपच घट झाली होती.लोकांच्या पिशव्यांमधून बन्स, बॅगेटस् बाहेर आले. भाजणारं कडक उन, गार वारं आणि वर लोंबणारे काळे कुळे ढग हे इथलं वैशिष्ठ्यच आहे. जरा उकाडा वाढला की कधी घननीळ बरसेल हे सांगता येत नाही. चिक्कण मातीची दहशत घेऊन  `बरखारानी आम्ही घरी पोचलो की मग जमके बरसो' म्हणत असतांनाच कोणीतरी पुढे चलण्याचा एल्गार दिला. भाषेच्या ज्ञाना शिवाय पुढे जायच आहे हे कळलं. मागे फिरावं असं वाटत होतं पण प्रवीणने पुढचा रस्ता धरला आणि सति सावित्रीसारखं त्याच्यामागे जाण्यावाचून मला पर्याय नव्हता. एक चढ चढून गेल्याच्या आनंदात असतांनाच पुढचा उतार समोर ठाकत होता. अरुंद पायवाटेवरून मुंगळ्यांच्या रांगेसारखी माणसं चढता उतरतांना दिसत होती. म्हणजे आम्हालाही ती संपूर्ण डोंगररांग पादाक्रांत करायची होती तर.  आपल्याला त्या डोंगर रांगेच्या दुसर्या बाजूने उतरायचे आहे. कोणीतरी सांगितले. आता तेथून मागे फिरायची माझी हिम्मतच नव्हती शेलारमामाने माझ्या परतीच्या रस्त्याचे दोरच कापून टाकले. उतार खडतर असले तरी बाजूच्या बांबूग्रासला पक्की जाळी लावली होती. तिला धरून धरून चढ आणि उतार सोपे केले होते. डोंगर कितीही कठीण असले तरी माझ्या सारख्या डोंगर चढण्यात कच्या असलेल्यांचीही चांगलीच काळजी घेतली होती. चिखलाने बूट जड होत होते. पण मधून मधून खाली दिसणार्या हिरव्यागार दृश्याने `हाऽऽऽ !' म्हणत चालायचे कष्ट विसरले जात होते. चार- पाच डोंगर चढून उतरून परत चढल्यावर समोर काळाशार उतरता खडक दिसत होता.  निसरडा आणि भितीदायक वाटला तरी जाणं भागच होतं. तिथे पोचल्यावर त्या उतारावर सगळ्यांनी बसकण मांडली. खडक फारच अरुंद होता. त्याच्या दुसर्या बाजूला नजर टाकली तर नव्वद अशात कापल्यासारखा  खोलच खोलं. इथून कुठून उतरायचं ? जेम तेम रांगल्यासारखं त्या खडकावर  फिरत होतो.  कोणीतरी सांगितलं जसे आलो तसेच परत जायच आहे. - - -म्हणजे परत ते पाच डोंगर पार करून?  - --तिथल्या खोल दरीकडे लक्ष गेलं आणि मागे जायचा रस्ता एकदम सोप्पा वाटायला लागला.

          खाली आलो तेंव्हा चढलेल्या बाकी लोकांपेक्षा मी कशी ग्रेट आहे  अशा विजयी चेहर्याने मी वावरायला सुरवात केली.  डोंगर चढलेले लोकं डोंगर किती अवघड आहे असं विचारत असतांना  ``हां! अवघड आहे पण आम्ही जाऊन आलो असं मी विजयी मुद्रेने सांगत होते. .तीन साडेतीन तासाच्या चालीने शरीराचीही पूर्ण शुद्धी झाली होती. शरीराचं आणि मनाचं गणितच व्यस्त असावं. शरीराचे जेवढे लाड करावे तेवढं मन दुःखी होत जातं. आणि शरीराकडून जेवढं काम करवून घ्यावं तेवढं मन शांत, आनंदी होतं. आज पाय दुखत होते.  नस अन् नस फुणफुणत होती.  शरीर जाम दमलं होतं. मन मात्र कस शांत शांत होतं. असाध्य ते साध्य केल्याचा आनंद वाटत होता. घरी जाऊन मस्त अंघोळ करून झोपलो ते तीन का चार तासांनीच जाग आली. इतकी गाढ झोप गेल्या कित्येक दिवसात लागली नसेल. आमचे भारतीय मित्र फोन कर करून थकले. आम्हाला कुठच्याच फोनचा त्रास होण्यापलिकडे एका शांत समाधित आम्ही होतो. इतकच काय मशिदीची बांग, कुत्र्यांचा भुभुःक्कार कश्शाकश्शाचा आमच्या झोपेवर तिळभरसुद्धा परिणाम झाला नव्हता.   जाग आली. घड्याळात किती वाजले पाहतांना ``अरे बापरे संध्याकाळचे सात!'' म्हणत उठून बसतांना आमचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. व्वाव! WHAT A TREK!

 

 

11 देवळांचा देश -

                     देवळं हा मॉरिशसचा श्वास आहे. वरवर पाहिलं तर पूर्णपणे साखर आणि टुरिझमवर जगणारा हा देश. पण कान देऊन ऐकलं तर या देशाची स्पंदनं इथल्या देवळादेवळात ऐकू येतील.  एखाद्या मूर्तीवर वारंवार लावलेला शेंदराचा लेप काही काळाने इतका दाट आणि कवचासारखा बनून जातो की आतली मूर्ती कशी आहे, कशाची आहे, किंवा कुठल्या देवतेची आहे  हेही ओळखणे अवघड होऊन जाते.  हे जाड कवच एखाद्यावेळेस अचानक उकलून येते किंवा  भंग पावते आणि आतली मूळची सुबक मूर्ती पहायला मिळते.  त्याचप्रमाणे इथे राहणार्या लोकांच्या संस्कृतीवर दुसर्या संस्कृतीची इतकी पुटं चढली की नक्की आता ह्यांची ओळख काय मानायची असा प्रश्न पडावा. पण  मॉरिशसच्या अंतरंगात शिरायची संधी मिळाली आणि अचानक बाह्य संस्कृतींची कवचं गळून पडली. मॉरिशसच्या देवळात गेल्यावर आणि तेथील सणवार, प्रथा पाहिल्यावर ढगातून सूर्याची तिरीप येताच सर्व देखावा उन्हानी उजळून निघाल्यासारखं वाटायला लागलं. भारतातून आलेल्या या लोकांच बाह्यांग कितीही बदलल्यासारखं वाटलं तरी अंतरंग त्याच दृढ श्रद्धेने भरलेलं आणि भारलेलं दिसेल. प्रभात समयी न्हाऊन केस मोकळे सोडून हातातील पूजेचं तबक जाळिदार रुमालानी झाकून जाणार्या स्त्रिया, तरुणी पाहिल्या की मला राजा रवी वर्म्याच्या चित्रांची आठवण येई. दाट, लांब, काळेभोर केस ही मॉरिशच्या स्त्रियांना मिळालेली देणगी आहे. ह्या लांबसडक केसांच्या स्त्रिया बघतांना त्यांच्यामधेच आपल्या पुराणातील एखादि सीता, द्रौपदी मला भेटुन जायची. एकदा कार्तिकस्वामी म्हणजे मुरुगनच्या देवळाच्या पायर्या चढणारी युवती हातात पूजेचं तबक घेऊन जात होती. तिचा मोकळा सोडलेला टाचेपर्यंत रुळणारा केशसंभार पाहून मलाच तिच्याकडे मागे वळून वळून पहायचा मोह आवरत नव्हता.  मॉरिशसच्या मुक्कामात माझ्या मैत्रिणीने आणि मी एकदा फ्रेंच शिकायचं ठरवलं. शिकवणारीच्या शिकवण्याकडे पाहता तिच्या लांबसडक केसांवर भाळून आम्ही तिची निवड केली. तिच्या लांब दाट केसांचं रहस्य विचारल्यावर तिने `मी कपडे धुण्याच्या डिटर्जंटने केस धुते' सांगितल्यावर आम्ही कपाळाला हात लावून घेतला. परिणामी आमचे केसही वाढले नाहीत आणि फ्रेंचचं ज्ञानही.  मॉरिशसच्या रस्त्यावरून जातांनाही अशा गुडघ्याखालपर्यंत काळेभोर केस रुळणारया अनेक सुंदरी पहायला मिळत. पहाटे देवळात जाणार्या स्त्रिया पाहून मला माझ्या आईची आठवण येई. आज आपल्याकडे अदृश्य झालेलं हे दृश्य चाळीसएक वर्षांपूर्वी आपल्याकडे प्रत्येक गावागावतून शहरा शहरातून दिसे. ते रम्य चित्र मनाच्या पडदयांवरूनही कधी पुसट झालं लक्षातच आलं नाही.

               कधी एखाद्या निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत तर कधी हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी, कधी एखाद्या चित्रमय तलावाकाठी तर कधी नदी-समुद्राच्या गभीर नितळ दुरंगी संगमावर, कधी नदीकाठी, कधी एखाद्या दरीच्या टोकावर तर कधी भर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या मॉरिशसमधील देवळात प्रवेश करताच स्वच्छता आणि शिस्त या दोघी सुमुखी हलकेच तुमच्या दोन्ही हातात हात गुंफत तुम्हाला थेट देवापर्यंत पोचवतात. तत्त्वज्ञानाच्या पायर्या उतरत तुम्हाला हृदयस्थ परमेश्वरापर्यंत पोचविण्याची ताकद इथल्या शांत आणि पवित्र वातावरणात आहे.

              देवापर्यंत कसे पोचावे अशा जिग सॉ पझल सारख्या मधेच बंद झालेल्या वाटा नाहीत. गिर्हाईक गटविण्यासाठी हाकाट्या नाहीत. दलालीचं सावट नाही. प्रवेशाला तिकीट नाही. पोलिसांचा गराडा नाही. स्वयंसेवकांचा ओरडा नाही. देवळाभोवती फुला-पेढ्यांच्या पडव्यांचा गराडा नाही. निर्माल्याचा उकिरडा नाही. चपलांची चिंता नाही. विचारांचा गुंता नाही. रांगांची रेलचेल नाही. माणसांची रेटारेटी नाही, बडव्यांची दलाली नाही, देवाला हात लावायची झटापट नाही, देवावर फुला-हारांची फेकाफेकी नाही, नवसाचे लोंगर नाहीत, तेलाचे ओघळ नाहीत, सोन्याच्या उतरंडी नाहीत, धनाच्या हुंडी नाहीत, पाकिटमारांचे भय नाही सोनसाखळ्यांचा घात नाही, घणाघाती घंटांचा मेंदूवर आघात नाही आरत्या बडवण्याचा प्रघात नाही. सगळं कसं नुकत्याच उजाडत जाणार्या पहाटेसारखं मंद, धुंद प्रसन्न आणि सौम्य ! नास्तिकाचीही समाधि लागावी अशा जागा.

            देऊळ हिंदू (उत्तर हिंदुस्तानी) असो, तामिळ असो, तेलगू असो, मराठी असो. सगळ्या ठिकाणी  हे गुण मात्र सारखेच दिसून येतील. मॉरिशसमधील  हिंदी, तामिळ, तेलगू , मराठी यांची देवळं वेगवेगळी आहेत. कोणी दुसर्याच्या देवळात जायचं नाही असा कुठलाही लिखित नियम नसला तरी सर्वसाधारणपणे प्रत्येकजण आपापल्या देवळात जाण्याचा प्रघात जास्त दिसून येतो. तेथे त्या त्या समाजाच्या पिढ्यानु पिढ्या चालत आलेल्या रीती पाळल्या जातात. त्यांचे त्यांचे सणवार मोठ्या भक्तिभावाने सांभाळले जातात.

1 स्पिरिच्युअल पार्क -

                          

निकोलिए (La Nicoliere) या तलावातून उगम पावलेली रिव्हियर दु रँपार्ट (Rivier Du Rempart) ही नदी मॉरिशसच्या N.E.ला Point du Laskar ला समुद्रात मिळते.  ह्या नदीच्या तीरी अतिशय रम्य परिसरात असलेलं , मनात कायमचं राहुन जाणारं देऊळ म्हणजे स्पिरिच्युअल पार्क. देवळाच्या नेहमीच्या संकल्पना बाजूला ठेऊन हिरव्या गार वनराईत बांधलेल हे देऊळ. बांधलेलं म्हणणं फारस बरोबर नाही. एका चौथर्यावर खांबांच्या आधारानी शाकारलेल्या उतरत्या छपराखाली काळ्याभोर दगडाची 7-8 फूट उं  पंचमुखी गणपतीची अतिशय प्रसन्न, सुबक उभी मूर्ती. कुठल्याही सोन्याचांदीच्या दागिन्यांनी  मढलेली नाही तरी मनात ठसणारी. लाल हिरवं करवत काठी पांढरंशुभ्र धोतर आणि डोक्यावर चंदनाचा टिळा. देवावर मोजकीच फुलं वाहिलेली. एका वेताच्या गोल उभ्या टोपलीत ठेवलेला दिवा मंद शांत जळत आहे.  शेजारीच एका भांड्यात पाणी आणि पाण्यात ठेवलेल्या हिरव्यागार दुर्वा. भाविकांनी तिथल्याच दुर्वा घेऊन देवाला वाहाव्यात. देवळाबाहेर कुठेही दुर्वा, फुलं, मोदक कशाच्याच टपरया , दुकानं काही नाही. सगळीकडे फक्त एकच गोष्ट मिळणार - -- स्वच्छता! छोट्या छोट्या घंटांचा एक नाजुक झेला झुंबरासारखा टांगुन ठेवलेला. हात लावला तर मंजूळ किणकिणाट, शेजारीच असलेल्या समुद्राची धीरगंभीर गाज, पक्षांची मधुर किलबिल, आणि झाडाच्या फांद्यापानातून आवाज करणारा वारा. देवळाभोवती सुंदर कारंजी थुई थुई नाचत आहेत. भोवतालच्या वनराईत हिंडतांना एक एक देव सहज भेटत होते. गर्द वनात तप करणारा दक्षिणामूर्ती शंकरही असाच लोभस!  आत्ता एखाद्या झाडामागून पार्वती नुकती खुडलेली बिल्वदले घेऊन येईल असं वाटावं इतकी ती मूर्ती आणि वातावरण एकमेकांना पूरक होतं. मनापासून हात जोडून एक बेलाचं पान वहावं अशी इच्छा होताच शंकरासमोर बेलाची पानही हजर होती. आवळ्यांनी लगडलेली झाडं, चायनीज वड, आणि  एका बाजूला झाडांमधूनही  दिसणारा नदी आणि समुद्राचा संगम! संगमाचे विलक्षण भिन्न रंग. एकमेकात सामावूनही स्वतःचं स्वत्त्व जपणारे. नदीचा हिरवट काळसर तर समुद्राचा टर्क्वाझ ब्ल्यू. समुद्राकडे तोंड केलेलं समुद्राभिमुख कार्तिकेयाचं मंदीर. सर्वच मूर्ती आखीव रेखीव, प्रमाणबद्ध, प्रसन्न आणि विलक्षण चित्तवेधक

भक्त आणि देवामधे कुठलीही भिंत ठेवणारं हे बिन भिंतींच देऊळ. एकाच छताखाली देव आणि भक्तांना सामावून घेणारं हे देऊळ. एका अमेरिकेत राहणार्या श्रीलंकन तामिळ गृहस्थाने ते बांधलेलं होतं. त्याचा फोटो देवळात लावलेला होता. देवळात एक रजिस्टर ठेवलं होतं. चार कॉलम केले होते. तुमच नाव , पत्ता, फोन, email त्यात लिहून ठेवलं की देवळाच्या सर्व कार्यक्रमांची पत्र तुमच्या पत्यावर येत.

 2 ला लुई (La Laura) येथील व्यंकटेश्वर बालाजी मंदीर -

 मंदिरांच वेड भारतात असतांना आम्हाला नव्हतं. किंबहुना मनःशांती लाभण्याऐवजी अनेक वेळा मनःस्ताप घेऊन परत यायला लागण्यामुळे नास्तिक नसूनही मंदिराकडे फार उत्साहाने आम्ही वळत नव्हतो. मॉरिशसला मिळालेले मित्र परिवार दाक्षिणात्य भारतीय असल्याने त्यांनी शोधून काढलेल्या देवालयांमधे आम्ही त्यांच्या सोबत जात राहिलो. आमचे तेलगु मित्र चेट्टींसोबत त्यांनी शोधून काढलेल्या मॉरिशसमधील तेलगु देवालयातही आम्ही मॉरिशस अजुन बघता यावे म्हणून जात राहिलो आणि काही अप्रतिम देवालयांच्या प्रेमात पडलो त्यातील एक म्हणजे ला लुईचं  बालाजी मंदीर. मोकाहून जातांना लागणार्या उंचच उंच हिरव्यागार पर्वतरांगा आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या बशीसारख्या तयार झालेल्या सपाटीवर असलेलं हे बालाजी मंदिर त्याच्या परिसरामुळे फारच आवडे. मोकाला रस्त्याने वळण घेतलं की उभा असलेला पीटर बॉथचा मजेशीर सुळका दिसायला लागे. एका भल्या मोठ्या सुळक्यावर तोलून धरलेल्या एका भल्यामोठ्या शिळेमुळे तो डोंगराचा सुळका एखादा माणुस उभा आहे की काय असे वाटे. आमच्या मॉरिशियन मित्रांनी त्याची एक अख्यायिका सांगितली होती. ह्या डोंगराच्या पलिकडे एक सरोवर आहे. अत्यंत रमणीय असलेल्या ह्या सरोवरात पहाटेच काही अप्सरा अंघोळ करायला  उतरत असत. त्या आरसपानी पर्यांना एक विकृत मनाचा माणूस चोरून पहात असे. हे त्या पर्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शाप देऊन त्याला दगड  बनवुन टाकलं. तोच हा पिटर बॉथचा सुळका. हा नयनरम्य परिसर कितीही वेळेला जाऊनही हवाहवासा वाटे. आणि पर्यायाने हे बालाजी मंदीरही. येथे वर्षभर चालणार्या अनेक उत्सवांना चेट्टींसोबत आम्हीही जात असू. वेंकटेश्वरा कल्याणउत्सवम् म्हणजे बालाजीच्या लग्नोत्सवाला गेल्यावरच लग्नाला `कल्याण' आणि लग्नमंडपाला `कल्याणमंडपम्' हे शब्द एकदम् पटुन गेले. लग्न आणि कल्याणचा हा अनोखा भावबंध आपल्या ज्या पूर्वजांनी शोधून काढला असेल त्यांना त्रिवार वंदन.  तेथे वाजणारा elctronic चौघडा ऐकणं हा तेथील अजुन एक आनंददायी गोष्ट असे.

3 श्री सुब्रह्मण्यम् तिरुकोविल / श्री मुरुगन मंदीर / कार्तिकेय मंदीर -

आमच्या घरामागेच असलेल्या Quatre-Bornes क्वात्र बोन च्या सुंदर को - दे- गार्ड ( Corps de Garde ) पर्वताच्या कुशीत हे सुंदर मंदीर आम्हाला कायम येता जाता दिसत राहे. आमची स्वाभाविक उत्सुकता एक दिवस आम्हाला तेथपर्यंत घेऊन गेली. को दे गार्डचा पहाड एखादा हत्ती पाय मुडपुन बसल्यासारखा दिसत असे. ह्या ह्तीच्या पायांवर हे सुंदर मंदीर स्थानापन्न झालं आहे. त्याच्या पाठीशी को दे गार्डचा खणखणीत सुळका उभा असे. डोंगराच्या मध्यावरच असलेलं हे मंदिर पहिल्यांदा आम्ही पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो. दररोज सकाळचा जॉगिंगचा कार्यक्रम रविवारी बदलून  सकाळीच मुरुगनची टेकडी हे आमचं ठिकाण ठरून गेलं. शंभरएक दगडी पायर्या चढता चढता, वाटेत दिसणार्या अनेक मूर्ती बघत बघत, वाढत जाणारी स्वच्छ हवा आणि फटफटणार्या पहाटेचं `सोनेरी सकाळ' मधे होत जाणारं रूपांतर अनुभवत आणि वर पोचता पोचता उठावदार रंगांमधील देवळाचं होणारं दर्शन फार छान वाटे. बूट काढून मंदिरात गेलं की  गाभार्याच्या निवांत स्थळी ठेवलेल्या समयांच्या उजेडात मूर्तीचा उजळलेला शांत चेहरा पाहूनच मन प्रसन्न होई. मंदिराभोवती असलेल्या प्रशस्त प्रदक्षिणा मार्गावरून जातांना संपूर्ण मॉरिशसच दर्शन होई. सोनेरी उन्हात चमकणारी घरं, शेतं, लांबवर दिसणारे डोंगर, त्याच्या माथ्यावर उतरलेले ढग, कधी जमिनीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ताणून धरलेलं  सप्तरंगी  इंद्रधनु , कधी आकाशात मधे मधेच लोंबकाळणारे ढग, तर अंगावर शिरशिरी आणणारं गार वारं, आमच्याही अंगात उत्साह निर्माण करून जात असे.

वेलामुरुगन ह्या वेठबिगार म्हणून 1884 साली आलेल्या भारतीयाने त्याच्या वेठबिगारीची मुदत संपल्यावर आपली सर्व पुंजी खर्च करून को दे गार्ड च्या मध्यावर असलेली ही सुंदर जागा विकत घेतली. तेथे सर्व पुंजी खर्च करून कार्तिकेयाचं देऊळ बनविलं. एका वादळात कोसळलेल्या दरडीमुळे देवळाचं नुकसान झालं. तेंव्हा 30 रुपयात अर्धा एकर जमिन विकत घेऊन बनविलेले हे मंदिर आता तीन एकर परिसरात उभे आहे. श्री लंकेहून खास कारागीर आणून त्यांच्याकरवी खास दाक्षिणात्य शिल्पकलेच्या शास्त्रानुसार 2001 मध्ये हे देऊळ उभारण्यात आले. स्कंद जयंतीच्या संध्याकाळी संपूर्ण मंदीर रोषणाईने उजळून निघत असे.

4 गणेश मंदीर -

            

                Seven cascade सेव्हन कास्काड या सात टप्प्यांमधे खोल दरीत कोसळणार्या धबधब्याच्या त्या नयनरम्य दरीकाठी मराठी मंडळींनी गणपतीचं देऊळ बांधलं आहे. एखाद्या सुट्टीच्या दिवशी ह्या गणपतीला भेटायला आम्ही आमच्या सर्व दाक्षिणात्य संघाला घेऊन जात असू. आणि तेही अत्यंत भाविकपणे आमच्या सोबत तेथे गणपति अर्थवशीर्ष म्हणत असतं.

Grand Baie (उच्चार ग्राँबे) ला असलेलं सूर्योदय मंदीर असो अल्बिनो बीच वरील देवी मंदीर असो Tamarin (उच्चार तामार्या म्हणजे चिंच) च्या seven cascade मराठी लोकांचं गणेश मंदीर असो किंवा इतर अनेक मंदीर असो. तेथील शांतता पावित्र्य मनालाही पूर्ण प्रसन्नता देऊन गेले.

5 गंगा तलाव

               श्रद्धा माणसाला जगण्याची उमेद देत असते. हिंदूच्या मनातील गंगेचं पवित्र स्थान कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर हिंदू  कुठेही गेले तरी सुप्तपणे गंगा त्यांच्या मनात वहातच राहते. मॉरिशस बेटाच्या मध्यात डोंगरांच्या रांगांच्या एकात एक गुंफलेल्या पाकळ्यांमधे जणुकाही मधल्या परागाप्रमाणे मॉरिशसच्या हृदयस्थानी असलेल्या तलावाला ``गंगातलाव’’ नाव नसतं मिळालं तरच नवल. ह्या ग्रॉंम्बे (Grand Basin) भागातील ही सुंदर जागा तेथे व्यापारासाठी येणार्या पंडित संजीवनलाल ह्यांच्या मनात भरली. 1866 च्या सुमारास फ्रेंचांची परवानगी घेऊन त्यांनी तलावाकाठी शंकराचं देऊळ बांधलं. शंकराची भव्य पिंड खास भारतातून बनवून आणून त्यांनी येथे शिवाची प्राणप्रतिष्ठा केली.  ह्या भव्य शिवलिंगाचं दर्शन  घेतांना मन प्रसन्न होतं. त्या देवालयातील,  एका कुशीवर झोपलेल्या बाल शिवाचं गोंडस चित्र मला फार मोहवून गेलं.

 तलावाभोवती प्रदक्षिणा करता येईल असा सुंदर रस्ता आणि घाट बांधला आहे.  गंगातलावच्या आजुबाजूचं पवित्र वातावरण आज आमच्या मनाला जेवढं भुरळ घालत होतं तेवढच आपल्या पूर्वजांनाही आपल्या पवित्र भारतभूची आठवण करून देत असावं. कारण हा गंगातलाव पाहून हिंदुंच्या मनातील गंगाप्रेम उचंबळून येत असे. कोणाला स्वप्न पडलं की गंगोत्रीच्या जाह्नवी मधून निघालेला झरा ह्या गंगातलावात येऊन मिळत आहे. त्यांच्या ह्या स्वप्नाचा बोलबाला होऊन गंगामैया आपल्या भेटायला येथे अवतरली आहे अशी लोकांची श्रद्धा अजून दृढ झाली. लोकभावनेचा विचार करून नंतर तेथील पंतप्रधान रामगुलाम शिवसागर स्वतः भारतात आले.  थेट गंगोत्रीच्या गोमुखचे पवित्र गंगाजल घेऊन ते मॉरिशसमधे गेले. तेथे विधिवत् आणि मोठ्या समारंभपूर्वक हे गंगाजल गंगातलावात मिसळण्यात आले. गंगातलाव खरोखरच गंगानिधान झाला.

        डोंगराच्या कुशीत आणि चिनी पेरुंच्या दाट जंगलांनी वेढलेला हा तलाव म्हणजे एका सुप्त ज्वालामुखीच्या खोल मुखाचा बनलेला तलाव आहे. मॉरिशसमधे असे अजूनही दोन Crater lake आहेत. ज्वालामुखीच्या तोंडाजवळचा भाग सुंदर असतो असं म्हणतात. त्याप्रमाणे हा तलाव अत्यंत सुंदर आहे. मॉरिशसमधील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळे सौंदर्याच्या चढत्या भांजणीत वर वर चढणार्या कितव्या स्थानावर ठेवावीत हा कायम प्रश्न पडावा इतकी सुंदर आहेत. ह्या गंगातलावच्या शेजारी असलेल्या एका उंच टेकडीवर चढून मारुतीरायाचे दर्शन घ्यावे लागते. तेथे ह्या वीरवरासोबत दिसणारा गंगा तलावाचा परिसर उंचावरून पक्षाप्रमाणे पहावा आणि डोळ्यात साठवून ठेवावा. गंगा तलावाच्या शेजारी विश्वहिंदूपरिषदेने बांधलेले  मंदिर आणि  त्याच्या सोबत असलेला 33 मिटर किंवा 108 फुटी शिवाचा भव्य पुतळा उभारण्याचे काम  आम्ही असतांना होत आले होते. 

 पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या वेळी  धार्मिक सुट्या नाकरल्या जात असल्या तरी आज मात्र दर महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. पुढे त्याचे वर्णन यईलच.

6`श्री क्षेत्र विठ्ठल'.

13 फेब्रुवारी 2006 ,भारतीय कॅलेंडरप्रमाणे आज वसंत पंचमी! पण इथे मात्र गणपतीचं वातावरण. सरींवर सरी बरसत होत्या. रुपेरी पाठीच्या पानांचा आघाडा नसला तरी दूर्वा भरपूर! दूर्वा आणि जास्वंदीची रेलचेल होती निसर्गात. मैत्रीणीने सांगीतलं, कॅसकॅव्हीलला मराठी वस्ती आहे. पांडुरंगाचं देऊळही आहे. खूप दिवस तेथे जायचं मनात होतं. शेवटी आज गाडी काढलीच. फ्लिक-आँ-फ्लॅकच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्हीबाजूला उसाचे मळे डोलत होते. शेतामधल्या स्प्रिंक्लर्स मधून नर्तकीसारखं गोल गोल उडणारं पाणी बघत गाडीतून जाता जाता एकदम सप्पकन पाण्याचा सपकारा गाडीच्या काचेवर बसला आणि पुढचे दोन मिनिटं गाडी मांजरासारखं वायपर्सनी आपलं तोंड साफ करत बसली. ``थांब थांब थांब!'' मी ओरडले. रस्त्याच्या डाव्या कडेला पाटी होती – `श्री क्षेत्र विठ्ठल'. डावीकडे वळलो. गाडी वळणं वळणं घेत जणू शेतातूनच चालली होती. उसाच्या मळ्यातले स्प्रिंक्लर्स वारंवार गाडीवर पाण्याचा शिडकावा करत होते. मुख्य रस्ता सोडून आत आल्याने वस्त्या वस्त्यांना जोडणारा रस्ता शांत होता. मधेच अफ्रिकन लोकांची वस्ती लागली. मुलं रस्त्यावर खेळत पळत होती. बायका कडेवर पोट्ट्यांना सांभाळत गप्पा मारत होत्या. नाक्यावर तरुणांचा घोळका गप्पा मारत उभा होता. गाडीची काच खाली करत मी देवळाची विचारणा केली. त्यांनी हातानीच रस्त्याचं वळणं दाखवत गाडीला रस्ता दाखवला. अरुंद असलेला रस्ता देऊळ जवळ येताच चांगला रुंद आणि प्रशस्त झाला होता. पार्किंगला चांगली जागा होती. सगळीकडे प्रसन्न शांतता होती. देवळाच्या कंपाऊंडची कडी काढून आत गेलो. ओंजळीत मावणार नाहीत अशी टप्पोरी जास्वंदीची फुलं झाडावर हेलकावत होती. रंगसंगती पहात रहावी अशी. एकाच फुलामधे किती रंगांची दाटी झाली होती. पण एकही रंग विसंगत वाटत नव्हता. देवळावर देवळाच्या स्थापनेची पाटी होती. `मराठी प्रेमवर्धन मंडळी' 1902. `मराठी प्रेमवर्धन मंडळी' यांनी ते देऊळ उभारलं होतं.विठ्ठल रुक्मिणीच्या सुबक सुंदर मूर्ति शेजारीच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची तसबीर होती. ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा प्रत्येक मराठी हृदयात केल्याची ती निशाणी होती. आपल्या नाम्यानी किंवा जनीनी मारलेली हाक ऐकताच धावून येणारा, चंद्रभागेच्या तीरी भक्तांची वाट बघत उभा राहणारा विठू इथेही तेवढ्याच अचलपणे Black River च्या काठी भक्तांना भेटायला आतुर होऊन उभा होता. आवारात मंदिराशेजारीच एक हॉल होता. Vito Hall  - - विठो हॉल! मातृभूमीचा, मातृभाषेचा धागा किती चिवट असतो ना ! काळाचे, दोन देशांमधील कित्येक किलोमिटरचे अंतर, इतकच नव्हे तर देशाटनामुळे बदललेल्या नागरिकत्वाचे अंतर त्यांना तोडू शकत नव्हते. मातृभाषेच्या शिक्षणाची मेख इथेच आहे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपल्या मातीचा परिसर मनात झिरपत राहतो.  आणि मग त्यात रुजलेले आपले संस्कार हृदयातून बाहेर फुलत येतात.

             परत यायला निघालो. उजव्या हातालाच मोठ्ठं फुटबॉल ग्राऊंड होतं. मुलं खेळत होती. टू व्हिलरवर बसून एक तरूण आणि एक पन्नाशीचा माणूस खेळ बघण्यात रंगले होते. गाडी थांबवली. चेहरेपट्टी, नाके डोळे मराठी मुशीतले वाटत होते. when the temple opens? प्रवीणच्या प्रश्नाला ``उघडंच आहे'' असं मराठीतून उत्तर आलं. पुढची चार-पाच मिनिटं कळणारया कळणार्या मराठीतून गप्पा मारल्या. शिवरात्रीला रात्री सात वाजता कीर्तन आहे.  अरेव्वा! तुमचं नाव काय? तुकाराम! खरोखरचा तुकाराम भेटल्याचा आनंद झाला. तुझं नावं काय? प्रवीणने त्या मुलाला विचारलं. ``राजीव गांधीमधलं राजीव.'' मुलानी हसत उत्तर दिलं. जवळचे नातेवाईक भेटावेत असा आनंद दुतर्फा झाला. आपका नाम-? मुलानी विचारणा केली. प्रवीण! भाबीजीका नाम? माझ्याकडे बघत प्रश्न आला. अरुंधती! प्रवीणने त्याचं कुतुहल पूर्ण केलं. समोरून गाडी येत होती. हालणं भाग होतं.

हात हालवत निरोप घेत निघालो. - - श्री क्षेत्र विठ्ठल - - कॅसकॅव्हील - - - तुकाराम - -मॉरिशस - - विठो हॉल - -विठ्ठलाच्या मूर्तीसोबत पंढरपूरच्या विठोबाचा फोटो - - - इथे ब्लॅक-रिव्हरच्या काठीही विठोबा - - कटेवरी हात विटेवरी उभा असाच - - तुकाराम पण येऊन पोचला इथे - - मनाशी अजून सांगडच घातली जात नव्हती. स्वप्नातही शक्य नव्हती पण प्रत्यक्ष पुढे उभी राहिली होती अशी घटना! सत्य  खरोखरचं स्वप्नापेक्षाही अद्भुत असतं.

---------------------------------------------------------------

 

12 रंगांचा देश -

         

कुठल्याही मॉरिशियन माणसाला आपल्या छोट्याशा देशाबद्दल बोलतांना शब्द कमी पडत. आमचा देश सप्तरंगातूनच जन्माला आला आहे. कोणी म्हणे आमचा  देश रंगांचा! खरच होतं ते. वसंतात इंद्रधनुच्या वेलीला रंगीबेरंगी कोवळी तजेलदार पालवी फुटावी आणि ती वेल बहरून यावी असे सप्तरंग ह्या देशात  सतत बहरलेले असत. रत्नांना कोंब फुटावे तशा रंग छटा निसर्गात सर्वत्र कुठल्या ना कुठल्या स्वरुपात अचानक डोकावून जात.

इंद्रधनुच्या देशात

सूर्य आणि वर्षेच्या सुंदर पोट्या इथे जिथे तिथे आपले सप्तरंगी परकर सावरत बागडत असतात. आई-बापाचे कौतुकाने रोखलेले डोळे त्यांच्या लीलांना अजुनच बहार आणतात. आपल्या सप्तरंगी लवचिक देहलतांच्या कमानी कधी समुद्रावर, कधी शेतात, कधी घरांवर, कधी डोंगरावर, कधी दरीत, तर कधी एखाद्या प्रपाताच्या पाण्याच्या धारेवर टाकत दिवसभर त्यांचे सागा किंवा बॅले नृत्य सुरू असतो. तुमचं देहभान विसरायला लावतो. त्यांचे सप्तरंग कॅमेर्यात उतरवून ठेवावे म्हणून कॅमेरा सज्ज करावा तर ह्या गायब! तर कधी पोर्टलुईच्या तासभर प्रवासात त्या तुमची संगत सोडणार नाहीत. आकाशाच्या तर कधी ढगाच्या पोटाला सप्तरंगी हात पुसून जाणर्या ह्या पोट्यांना कॅमेर्यात साठवण्याइतका कॅमेर्याचा आवाका तरी कुठला! कधी एखादी इमारतच सप्तरंगी करतील तर कधी जमिनीच्या कुशीतुन सप्तरंगी तलवारीच्या पात्यासारख्या बाहेर पडतील. कधी निळ्याशार समुद्रावर त्यांच्या देहलता टेकवतील.  मोठीचं अनुकरण धाकटीनी करावं तसं कित्येकवेळा तीन तीन सप्तरंगी इंद्रधनुषी कमानी घालून उभ्या! जणु इंद्राच्या दरबारीच्या रंभा, उर्वशी मेनकाच. त्यांच्या आरसपानी तलम देहांना स्पर्श केला तर थोडेसे रंग हातावर येतील असं वाटायचं. 180 अंशातल्या त्यांच्या कमानी मोजून घ्याव्यात. कंपासनी काढतांनाही इतकी सफाई जमणार नाही. कधी घराचा पडदा दूर सारावा तर त्यांची  सप्तरंगी पावलं सप्तपदी चालल्यासारखी कुठुन कुठे गेलेली दिसतील. त्यांचा लपाछपीचा खेळ बघणं विलक्षण आनंददायी. कितीही म्हटलं तरी पोरींचा ओढा बापाकडेच असतो. सूर्याने दिवसाचा निरोप घेतला की ह्याही त्याचे हात धरुन पळाल्याच.

     

लाल सुंदरी, पिवळ्या सुगरणी, हिरव्या पाली, गुलाबी कबुतरं

             रंगाची उधळण असलेल्या या देशात अनेक रंगिबेरंगी सुंदर गोष्टी मन वेधून घेत.  जरा शहराबाहेर आलं की तेथील कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवतावर बसून झोका घेणार्या लालचुटुक चिमण्या घराच्या आजुबाजुलाही काही दिवसात दिसायला लागल्या. मी स्वयंपाकघरात काम करत असतांना शेजारच्या बाल्कनीत चिमणीची चिवचिव ऐकू आली. सहज डोकावले तर एक चिमणी उड्या मारत होती. चिवचिवत होती पण तिचा रंग मात्र लालचुटुक होता. तिला थोडेसे तांदुळ टाकले तर अजून चार पाच येऊन दाखल झाल्या. डोळ्यात काजळ घातल्यासरखी काळीभोर रेघ डोळ्याभोवती दिसत होती. होत्याही चुणचुणीत. मी नसले तर सरळ घरात यायच्या शोधत. सोफ्याच्या पाठीवर चिवचिवत बसायच्या. `आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर करतो' विशालच्या या वाक्याला निसर्गानेही दुजोरा दिला होता. नेहमीच्या राखाडी चिमण्यांनाही लालचुटुक रंगवून मॉरिशसला पाठवलं होतं. आमच्या समोर राहणारा आमचा एक शाळकरी छोटा चिनी मित्र अंकलना भेटायला आला होता. त्याला त्या लाल चिमण्यांबद्दल विचारल्याबरोबर तो म्हणाला `रूज गॉर्ज?' रूज म्हणजे लाल.  (लहान असतांना गालांना लावायच्या लालीला आम्ही रूज म्हाणायचो.) गॉर्ज (Gorgeous) थोडक्यात लाल देखणी किंवा लाल सुंदरी.

             दोन तीन महिने गेले आणि ह्या लाल धिटुकल्या एकदम दिसेनाश्या झाल्या. दुसर्या साध्या चिमण्या यायला लागल्या. ह्या लाल चिमण्या गेल्या कुठे कळेच ना. लाल चिमण्यांचे परिचित आवाज ऐकू आले की धावत जावं तर राखाडी चिमण्याच किलबिलाट करत असत. मग कळलं की पक्ष्यांच्या वीणीच्या हंगामात लाल दिसणार्या ह्या चिमण्या नंतर परत आपल्या साध्या चिमण्यांसारख्या दिसायला लागतात.

              रस्त्यातून जातांना हळदी रंगाच्या सुगरणींची झाडाझाडंवर लोंबकाळणारी घरटी अणि घरट्यातल्या पिलांना भरवणारे नर-मादी कितीही वेळा पाहून आनंदच वाटत असे. इथल्या सुगरणींची घरटी मात्र जरा वेगळी असतं. घरात शिरायला लांबलचक बोळ त्यांनी विणलेला नसे. कित्येक वेळेला रस्त्यावर हे पक्षी मरून पडलेले दिसत. मॉरिशसच्या तीव्र उन्हामुळे ते मरून पडत का तेथे ह्या पक्षांना मारून खाणारे कावळे, घारी, भारद्वाज, घुबड इत्यादि पक्षी नाहीत हे मात्र नाही माहित.

       येथील निसर्गाने चिमण्यांनाच नाहीतर पालींनासुद्धा (गेको ) रंगीत बनविण्याची करामत साधली आहे. बगिचात हिंडणार्या या हिरव्या-निळ्या लालठिपक्यांच्या सरड्यासारख्या पालींच्या पंजांच्या प्रत्येक बोटावर एक छोटा गोल गोळा चिकटवल्यासारखा दिसे. बाहेर सहलीला गेलं की तिथे बसायला, डबे खायला टेबल आणि बाक असत. कित्येवेळा त्या टेबलांवर ह्या हिरव्या-निळ्या पाली /गेको सुळकन इकडे तिकडे पळून जात.

चाचा नेहरुंच्या फोटोत शांतीदूत म्हणून पांढरी कबुतरं हवेत सोडतांना कधी ना कधी प्रत्येकाने पाहिली असतील. इथल्या रंगांच्या दुनियेने कबुतरांनाही गुलाबी करून दाखवायची करामत साधली आहे. प्रेमाच्या दुनियेचं प्रेमाचं प्रतिक! इलो ॅग्रथ ह्या बेटावर ही गुलाबी कबुतरं ठायी ठायी दिसतात.

सप्तरंगी वाळू -

ही रंगांची दुनिया सजीवांपर्यंतच मर्यादित नाही तर शॅमेरीलच्या टेकडीवर उन सावल्यांचा सुरेख खेळ असावा अशी सप्तरंगी वाळू इथे रंगाचे वेगवेगळे थर  बनवते. आणि रंगांचे सुरेख नमुने वा आकृतीबंध तयार होतात. ह्या वेगवेगळ्या रंगांची वाळू आपण एकत्र जरी केली तरी काही वेळाने प्रत्येक रंगाचे थर वेगवेगळे होतात असं इथले लोकं सांगतात. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या ह्या भागात काहीच भाग असा सप्तरंगी वालुकामय कसा असावा हे मोठं कोड आणि आश्चर्यच आहे. ह्या सप्तरंगी वाळूभोवती आता कुंपण घालून ठेवलं आहे. हा वालुकामय विस्तीर्ण प्रदेश रहस्यमय रीत्या चहुबाजुने दाट जंगलाने वेढला आहे.

 

प्रवाळ, मासे आणि फुलांची रंगित  दुनिया

शॅमेरिलची सप्तरंगी वाळू असो किंवा समुद्राच्या अंतरंगातील रंगतदार प्रवाळांची दुनिया असो. प्रवाळाचे विविध आकार आणि रंग, त्यांच्या तयार झालेल्या प्रचंड वस्त्या, त्याच्या मधुन मधुन आपल्या शेपटांची वल्ही शांतपणे हलवत सुळकन फिरणर्या हजारो रंगीबेरंगी माशांचे थवे , समुद्राच्या पाण्याखालची ही रंगांची गूढ दुनिया असो किंवा प्रत्यक्ष आकाशात क्षणोक्षणी प्रकटणारं इंद्रधनुष्य असो. मोरपंखी समुद्राच्या निळ्या हिरव्या छटा असोत किंवा आकाशाचा निळा घुमट असो. अँथुरियमच्या फुलाचा लाल चुटुक तळवा असो अथवा बर्ड ऑफ पॅरेडाईजच्या फुलावरचे लाल, केशरी, निळे, जांभळे सप्तरंग असोत, आकाशात उगवणारा सूर्य जणु काही परसात झाडावर उमलल्या सारखी लालबुंद जास्वंद असो अथवा तिच्यावर झालेली विविध रंगाची आतशबाजी असो. सुंदर रंगांची पखरण प्रत्येक वस्तुमात्रावर झालेली आढळेल. समुद्राच्या पाण्यातील माशांच्या रंगांनी तर कमालच केलेली दिसेल. कोळी जरी मासे विकत बसला असला तरी त्याच्याकडे लाल, निळे, जांभळे, हिरवे असे विविधरंगी आणि अंगावर विविध कलाकृती रेखाटलेले मासे पाहून शाकाहारी माणूससुद्धा तोंडात मासा नाही तरी आश्चर्याने बोट तरी नक्कीच घालेल. मनात झिरपत गेलेले हे रंग अचानक माझ्या समोरच्या कागदावर उमटत गेले - 

रंग सांडले आकाशात

अलगद उचलले मी हातात

भरून पाहता जीवनात

हरखून गेले मी मनात।।

 

जीवनाचं चित्रच बदललं --

 

रंगिबेरंगी सूर्य नटला

सोनेरी किरणांनी सजला

मुलायम गुलाबी ढगांचा

सुंदरसा गालिचा अंथरला।।

 

पावसाच्याच धारांवरती

इंद्रधनूचा पूल बांधला

चंद्रकोरीचा झुला टांगला

चांदण्यांचा मांडव घातला।।

 

नक्षत्रांची झुंबरं पेटली

नवग्रहाची तोरणं बांधली

आकाशाची गहिरी नीळाई

जीवनात चित्रित झाली।।

 

मी पणाचा मळकट रंग

आकाशगंगेत वाहून गेला

आकाशाएवढातुकाआज

क्षणभर जीवनात अनुभवला।।

 

हा आकाशाएवढा तुका अनुभवायला मात्र मला मॉरिशस गाठायला लागलं. रंगात निथळणार्या या देशात आकाशाएवढा तुका भेटून जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद खरोखरचा हाडामासाचा तुकाराम विठ्ठलाच्या देवळात भेटल्यावरही झाला .

------------------------------------------------------------------

  

(Boulangerie and Patisserie) बुलांजेरी आणि पॅटिसेरीचा देश

बॅगेट्स ( Baguette )

                  मॉरिशसमधे आम्ही सकाळ संध्याकाळ एक लांबची जॉगिंग रपेट मारून येत असू. प्रवीण ऑफिसला गेला की घराच्या आजूबाजूच्या परीसरात मी पायी फिरून येई. त्यावेळी मॉरिशसच्या रोजच्या कारभाराशी निगडीत अशा दोन शब्दांचाही परिचय झाला. ते म्हणजे बुलांजेरी आणि पॅटिसेरी. हे दोन्ही फ्रेंच शब्द.  बुलांजेरी आणि पॅटिसेरी म्हणजे मॉरिशसच्या रोजच्या व्यवहाराचा कणा. बुलांजेरी म्हणजे वेगवेगळे पाव ब्रेड बनविण्यात  आणि विकण्यात माहीर असणार्या बेकर्या. पॅटिसेरी म्हणजे केक पेस्ट्री बनवून विकणारी बेकरी. बुलांजेरी एकदिवस जरी बंद असेल तर मॉरिशस एका दिवसात कोलमडून पडेल. लोकांना जास्तीत जास्त जरूर असेल तेंव्हा संपावर जायचं ही मनोवृत्ती येथे नाही. (किंबहुना गांधीजींनी परदेशी इंग्रजी राजवटी विरुद्ध उगारलेलं असहकाराचं शस्त्र बूमरँगसारख आता आपण आपल्यावरच चालवून आपल्याच मालमत्तेचं नुकसान करून घेतांना पाहून आपल्याला जे भारतीयांचं नुकसान करणं  जमलं नाही ते भारतीय लोक स्वतःहूनच करून घेतांना पाहून इतर देशीयांना मनसोक्त आनंद होत असेल.) लोकांना लागणारी ही दैनंदिन सेवा नित्यनियमाने  चोख चालू असते. येथील लोकांवर फ्रेंचांचा मोठा प्रभाव टिकून आहे. पोळी भाकरी, रोटी हे प्रकार काळाच्या रेट्यात बरेच मागे पडले आहेत. आमचा मॉरिशियन मित्र विशाल दरवेळी `मी भाकर खाऊन आलो' असं सांगत असे. प्रत्यक्षात तो ब्रेडच खाऊन येत असे. इतका ब्रेड लोकांच्या अंगवळणी पडला आहे. रोज पहाटेच पब्लिक हातात पिशवी घेऊन कुठे चाललं आहे हे विचारायला नको. पहाट झाली की, `पाऊले चालती बुलांजेरीची वाट' हे रोजचं पहाटेचं दृश्य असे. परत संध्याकाळीही ऑफिसमधून येता येता प्रत्येकाची बुलांजेरीला भेट नक्की असे. अशा छोट्या मोठ्या बुलांजेरी गल्ली बोळात आपल छोटं मोठं दुकान थाटुन बसलेल्या असत. ह्या बुलांजेरीमधे मोठ्या मोठ्या वेताच्या टोपल्या ठेवलेल्या असत. भट्टीतून निघालेले ताजे ताजे गरमागरम पाव त्यात सतत ओतले जात. आपल्याला पाहिजे ते आणि पाहिजे तेवढे ब्रेड उचलून शेजारीच ठेवलेल्या कागदी पिशवीत घालून घ्यायचे. स्लाईस्ड ब्रेडपेक्षा कोपराएवढे लांब बॅगेट्स (Baguette ) आणि कडक बन पाव ह्यांना सकाळी मोठा उठाव असे. बहुतेकांचा सकाळचा नाश्ता ह्या कडक बनपावाचा असे. ह्या कडक बनपावातील आतला मऊ भाग काढून टाकून त्यात चिकन, मटण किंवा कुठलीही भाजी भरली की नाश्ता तयार. दुपारच्या जेवणालाही  बॅगेटचे दोन भाग करून आतला मऊ भाग काढून त्यात असेल ते कालवण, सॅलड  भरलं की जेवण तयार.

केळीवाला -

ह्या बुलांजेरी आणि पॅटेसरिचा पत्ता नवीन माणसाला हुडकुन काढायला नको. ज्याप्रमाणे रामासमोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, शिवासमोर नंदी असतोच त्याप्रमाणे पहाटे ज्या दुकानासमोर केळीवाला बसला असेल ते दुकान म्हणजे बुलांजेरीच असणार हे वेगळं सांगायला नको. सकाळी नाश्त्यासोबत केळं हे इथल्या ब्रेकफास्टचं खास विशेष. अमेरिकेत an apple a day  ने डे सुरु होत असला तरी येथे banana a day  ने  दिवसाची सुरवात होते.

मुरड कानोला -

इथल्या पॅटिसेरीमधे केक पेस्ट्रीज चे खूप प्रकार नसले तरी एक पदार्थ माझं लक्ष वेधून घेई. तो म्हणजे मुरड कानोला. घराच्या जवळ असलेल्या स्पा (SPAR) नावाच्या मॉलमधे तर हे मुरड कानोले नेहमी असत.  त्याच्याबद्दल विचारल्यावर कळलं की  उकडलेल्या रताळ्याच्या गरात मैदा घालून ह्या करंज्यांच आवरण बनवलं जातं. आतमधे खोबरं आणि साखरेचं सारणं. सुबक मुरड मात्र खास भारतीय वळणाची. दुपारी एकच्या सुमारास ह्या मॉलमधे गेलं तर अचानक बॅगेटचा खमंग वास दरवळु लागे. भट्टीतून भले मोठे स्टँड ढकलत बाहेर आणले जात. एकएका स्टँडवर सहज पाचएकशे गरम बॅगेटस् असत. स्टँड गरम आहे. जपून असं तो सांगत असतांनाच स्टँडवरचे बॅगेट लोकं भराभर उचलून घेत. वर तीळ लावलेले खरपूस भाजलेले बॅगेटस् घेऊन जायचा मोह आम्हालाही आवरता येत नसे. त्याच्या स्लाईसेस करून लोणी लावून भाजून खायला एकदम मस्तच लागत. त्याच्याबरोबर पावभाजीची भाजी केली की संध्याकाळ साजरी होई.

                           मॉरिशसमधे नऊ ही जशी कार्येलये उघडण्याची वेळ आहे तशी चार ही कार्यालये बंद होण्याची वेळ. चार वाजता शिपाई हातात कुलुप घेऊन उभा असे. शुक्रवारी चार वाजता बंद झालेले ऑफिस सोमवारी सकाळी आठ वाजताच उघडे. साडेतीन चार वाजताच दुकानांच्या पापण्या मिटु लागत. रस्ते ओस पडु लागत. सहा वाजताही टिकून असलेली एखादि बेकरी किंवा एखादाच उघडा असलेला मॉलही सात वाजता रजा घेई. सात वाजता रस्त्यांवर शुकशुकाट असे. सात नंतर सागा डान्ससारखे थोडेबहुत कार्यक्रम हॉटेल्स किंवा काही संस्थांपुरतेच मर्यादित असत.   बहुतेक लोक सकाळी ऑफिसला जाता जाता किंवा ऑफिस सुटल्या सुटल्या तेथल्याच कोपर्या कोपर्यांवर असलेल्या टपर्यांमधील बॅगेटचे बनविलेले सँडविच खाऊन ऑफिसला किंवा घरी जात. ‍ऑफिसच्या मधल्या सुट्टीत किंवा ऑफिस सुटल्यावर लोक पोर्ट लुईच्या मंडईतून भाजी घेत. पोर्ट लुईचं भाजी मार्केट हे आपल्या पुण्याच्या फुले मंडई किंवा मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटप्रमाणे छान बांधलेले  आहे. त्यात भाजीवाल्यांसाठी उंच कट्टे बांधलेले आहेत. ह्या मंडईत भाजी , फळांसोबत भारतातून आलेली सर्व वृत्तपत्रे, मासिकेही मिळत.

------------------------------------------------------------------------------------------------

चिली आणि लीचीच्या  देशात

 

फुटपाथ मेवा

मॉरिशसचे फुटपाथ वर्षभर नित्य नवीन गावरान मेव्याने सजलेले असतात. हा गावरान मेवा म्हणजे मॉरिशसमधेच तयार होणारी फळं आणि मॉरिशसच्या जंगलामधील रानमेवा. लीची हे राष्ट्रीय फळ म्हणायला हरकत नाही घराघरात कौतुकानी लावलेलेले लिचीचे वृक्ष आहेतच ; त्यासोबत लिचीच्या भरपूर बागाही आहेत. नोव्हेंबर मध्यापासूनच फुटपाथवर लिचीचे झुपके हातात  घेऊन उभी असलेली मुलंसुद्धा दोन रुपयांच्या खाली एक लिची देणार नाही. जानेवारी संपत आला की लीचीची जागा लोंगाननी घेतली. लीचीसारखीच घोसांनी लगडलेली ही फळं आपल्याकडच्या शेमड्या बोराएवढी असतात. आतमधे लिचीसारखीच मोठी गोल बी. लीचीसारखच पण कमी खरखरीत टरफल काढलं की आत लिचीसारखाच गर. चव मात्र लीचीपेक्षा गोड आणि स्वादही वेगळा. फेब्रुवारीसोबत लोंगानही लुप्त झाले. फुटपाथवर लाल रंगाचे जाम दिसायला लागले. आपल्याकडे कोकणात पांढरट हिरवट रंगाचे जाम असतात. इथे टोमॅटो रंगाचे. पाच रूपयाला पाच,सहा जाम एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्यावर हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि मीठ घालून चटकदार केले जातात. ह्या साईड फळांची व्हरायटी संपतच नाही. मार्च संपत आला आणि फुटपाथचा रंगमंच लालचुटुक रंगाच्या गोटयांपेक्षा थोड्या मोठ्या चायनीज पेरूंनी गजबजून गेला. मिरच्यांचा ठेचा आणि मीठासकट! ते पुढे जाताएत तोपर्यंत त्यांच्यामागे थोडे मोठे पिवळे बोराएवढे पेरू हजर झाले. त्याजोडीने बाजारात वरून हिरवे आतून लाल पेरूही दाखल झाले. गंगा तलावच्या आसपास असलेल्या दाट जंगलात चायनीज पेरूंचीच झाडं होती. सुट्टीच्या दिवशी हे पेरू तोडण्यासाठी लोकांची झुंबड उडे. ह्या पेरूंचा खाण्याबरोबर जाम बनविण्यासाठी वापर होई. मग फुटपाथ फळांमधे चमकदार काळीभोर इवली टिवली जांभळं दाखल झाली. एकदा टॅक्सीतून येतांना टॅक्सीवाल्याला जेवलास का विचारलं. आपली कोणीतरी चौकशी करत आहे ह्याचाच आनंद होऊन त्यानी स्वतःसाठी विकत घेतलेल्या जांभळाची पुडी पुढे केली. दोन जांभळं उचलून घेतली. मजा गया! एकदम फ्रेश, गरदार, गोड! मे महिन्याबरोबर थंडीची चाहूल लागायला लागली आणि जांभळांची आवक रोडावायला लागली अन् त्याच्या सोबत केशरी-लाल लुसलुशीत रॉसबेरी यायला लागल्या. छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे बसलेल्या रॉसबेरी सोबत साखरेचं भांडं आलं. साखर पेरलेल्या रॉसबेरी येणार्या जाणार्यांचा लक्ष्यवेध करत होत्या. गंगा तलावला जातांना वाकवा रिझर्वायर जवळ असलेल्या जंगलातून रॉसबेरी शोधायला विशालनी शिकवलं. सतत टिकून राहिलेलं फळ म्हणजे छोटे छोटे अननस. ते काचेच्या पेट्यांमधे ठेवलेले असतात. आपल्याला पाहिजे तर पूर्ण, अर्धा किंवा चतकर अननस आपण घेऊ शकतो. अननस प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्यावर लालमिरचीची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेच पाणी घालून गोड अननसाला तिखट करून खायला मज्जा यायची. आम्ही मैत्रीणी बाजारात आलो की प्लॅस्टिकच्या पिशवीत अशा चटण्यांमधे बुचकळलेला दोन रुपयाचा चतकर अननस घेऊन बमगोळ्यासारखी त्याची शेंडी पकडून चाखत बाजारात फिरत असू. डिसेंबर ते मार्च ह्या कैर्यांच्या दिवसात अननसासोबत कैर्यांच्या फोडीही तिखटमीठ लावून ठेवलेल्या असत. कोपर्या कोपर्यावर सायकल रिक्षावर किंवा बागेच्या बाहेर काचेच्यापेटीत साल काढून ठेवलेले अननस आणि वरती बरण्यांमधे व्हिनेगार मधे ठेवलेले ऑलिव्ह, कैरीच्या फोडी हे सुखावह दृश्य असे. स्वच्छतेची सर्व परिमाण पाळलेली असल्याने बिनदिक्कत खायला हरकत नसे.

               रस्त्यावर कधीही कुठे 25-30 जणांची रांग दिसली तर ती दालपुरीसाठीच असणार. छोट्या छोट्या टपर्यांमधे गरम गरम नमकीन पुरणपोळीवर बटाट्याची रस्सा भाजी आणि चटणी घालून गुंडाळी करून दिली जाई. स्वच्छतेचे सारे निकष तंतोतंत पाळले जात. आत्ता पर्यंत महिलामंडळांमधे आम्ही आमच्याकडची गुळाच्या पुरणाची का तुमच्याकडच्या साखरेच्या पुरणाची पोळी श्रेष्ठ यावर वादविवाद करत होतो. आता ह्या वादावर पडदा टाकायला किंवा वाद अजून वाढवायला दालपुरी नामक पुरणपोळीचा नवीन लुसलुशीत प्रकार अवतरला होता. चव एकदम मस्तच होती. बटाट्याची भाजी आणि त्याचा मसाला नक्कीच खुमासदार होता. पण आपल्याकडे भेळेच्याही गाड्यांवर दिसणार्या खमंग पाट्या आणि चित्र हे मात्र नव्हत. आमची मॉरिशिअन मैत्रीण पुन्नास्वामी सांगायची आमचे जेवढे मॉरिशियन्स परदेशात जातात ते जातांना दालपुरीची पार्सल्स बरोबर घेऊन जातात. परदेशातून आलेले मॉरिशियन्सही ह्या पुरणपोळ्या घरी आणून खाण्यापेक्षा रांगेत उभं राहून पांढर्या शुभ्र कागदात दिलेली गरमगरम पोळीच पसंत करतात. ओझ्हिल (Rose Hill) ची  `देवाज दालपुरी' (Deva's Dhol-Puri) हा सर्व मॉरिशियन्सच्या आत्मीयतेचा विषय आहे. दालपुरी खायची तर ती देवा' चीच!

 गातोमुताई

आत्तापर्यंत गातो म्हणजे केक हे माहित झालं होतं. पिमा म्हणजे मिरची. गातोपिमा हे कुरकुरीत मिरचीभजं पहिल्या दिवशीच ओळखीचं झालं होतं. एकदा कुणाकडे गेलो असतांना पूर्वीचे मराठी पण पिढ्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले एक गृहस्थ भेटले. त्यांच्याकडून गातोचा नवीन प्रकार ऐकायला मिळाला. भारतातून आफ्रिका खंडात आलेले लोकं आपल्या बरोबर आपल्या चालीरीती आणि खाद्य-संस्कृतीही घेऊन आले. ह्या खाद्य संस्कृतीतून आपली जिलबी आफ्रिकेला नैरोबी, टांझानिया, मादागास्कर अशा अनेक ठिकाणी पोचली. भस्माचे पट्टे कपाळावर ओढणारा स्वामी अमेरिकेत जाताच सॅम होतो आणि सलवार-खमीस घालणारी अनिता अ‍ॅ होते तशी आपल्या जिलबीचीही ओळख बदलली. भारतीय `मिठाई' ची मुताई झाली आणि आफ्रिकन सासरी जिलबीचे नाव बदलून ती `गातो-मुताई' झाली. तेवढ्यात `चला चला जेवण तयार आहे' म्हणत मैत्रीण बाहेर आली. त्यावर आफ्रिकन मित्राने सांगितले, अशा ह्या आफ्रिकन देशांमधे गेले असता, हॉटेलमधे जेवण तयार झाले की बाहेर पाटी लावतात `तयारे ' म्हणजे जेवण तयार आहे. हाही शब्द मराठी तयार आहे वरुनच आला आहे. शब्दांच्या प्रवासाचा अचानक हाती आलेला हा धागा छोटासा असला तरी आश्चर्यकारक होता.

---------------------------------------------------------------------------------

 

अनेक संस्कृतींना सामावून घेणारा अनेक  सणांचा देश -

 महाशिवरात्र -

महाशिवरात्र  जवळ आली आणि रस्तोरस्ती शिवाच्या चित्रांचे फलक दिसू लागले. क्वात्रबोर्नच्या महानगरपालिकेवर शिवभक्तांच्या स्वागताचे मजकूर झळकू लागले. विविध नगरपालिका आणि रस्त्यांमधे असेच फलक दिसत होते. बरेच लोकं पायी जातांनाही दिसू लागले. इथे महाशिवरात्र फार मोठ्या प्रमाणावर साजरी होते. बेटाच्या उत्तर टोकाला राहणारे लोकही पायी गंगातलावला जायला निघतात. ह्या चालत जाणार्या लोकांच्या सेवेसाठी गंगातलावला जाण्याच्या रस्त्यांवर जागोजागी लोकं टेबलं टाकून विविध फळ घेऊन वाट बघत असतात. लांबून चालत  येणारे  थकलेले भागलेले चेहरे पाहून त्यांना पाणी, सरबत, फळं देतात. बहुतेक लोक हे संध्याकाळी निघून रात्री अथवा पहाटे पहाटे गंगातलावला पोचत. देवदर्शन घेऊन कलशांमधे  गंगातलावाचे पाणी घेऊन परत आपल्या मुक्कामी परतत.  जेंव्हा हा गंगातलाव आणि त्या काठी शिवमंदिर बनविलं गेलं तेंव्हा काही हिंदू भारतात आले. गंगेचं पवित्र पाणी आपल्याबरोबर घेऊन गेले. ते पाणी गंगातलावात अर्पण केलं. तेंव्हापासून ह्या तलावाला गंगा-तलाव असं नाव मिळालं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मॉरिशसचे पंतप्रधानही भारतात येऊन गंगोत्रीच्या गोमुखाचे पाणी घेऊन आले आणि ते ह्या तलावात मिसळण्यात आलं. येथील हिंदू या तलावाला गंगेइतकंच पवित्र मानतात. अशाप्रकारे शिवरात्रीला कलशातील पवित्र जल आपल्या घराच्या जवळ असलेल्या शंकराला अर्पण केलं जाई.

 आम्ही आमच्या भारतीय परिवाराला विचारून पाहिलं. आणि चंद्रा आणि श्रीनिवासन् आमच्या सोबत पायी यायला तयार झाले. आमच्या क्वात्रबोर्नच्या घरापासून 20 कि.मी.वर गंगा तलाव असेल तर श्रीनिवासन याच्या घरापासून 24 कि.मी. तेवढं अंतर चालायला काही हरकत नव्हती. इथले स्थानिक लोक पार बेटाच्या उत्तर टोकावरून निघत असतील म्हणून रात्री अपरात्री जात असले तरी आपण सकाळी नाश्ता करून निघू आणि दुपारी दोन-तीन वाजे पर्यंत पोचू आणि दिवसा उजेडी बसने परत येऊ असं ठरवून आम्ही निघालो. तासभर चालल्यानंतर लक्षात आलं ; शिवरात्रीला आपल्याकडे जरी थंडी थोडीशी टिकून असली तरी इथे मात्र चांगलाच उन्हाळा असतो. शिवाय पृथ्वीवरच्या ओझोनच्या थराला अफ्रिकेजवळ भोक पडलं आहे असं आत्ता पर्यंत जे नुसतच ऐकत होतो ते मॉरिशसला अनुभवत होतो.  मॉरिशसला आल्यावर प्रखर सूर्यप्रकाशाने डोळे लाल होत आणि चुरचुरत म्हणून सर्वप्रथम आम्हाला U.V. ला तोंड देतील असे गॉगल्स घ्यायला लागले होते. टाल्कम पावडरवर मेकअपची भिस्त असल्याने सनस्क्रीन इत्यादि इत्यादिची फारशी ओळख करून घेतली नव्हती. त्याचा दुष्परिणाम जाणवत होता. भरतासाठी वांगं भाजावं तशी उन्हाने पाठ होरपळून निघत होती. नमः शिवाय म्हणत जाण्याशिवाय काही जास्त करता येण्यासारखं नव्हतं. वाटेत लोकं आदरभावाने पाणी, सरबत, फळं देऊ करत होते. जाईपर्यंत सूर्याने अक्षरशः आम्हाला पिऊन टाकलं. `नमो उग्राय वीराय' म्हणून ह्या आकाशवीरासमोर आम्ही तर संपूर्ण शरणागतच होतो. पण त्याला काही दया आली नाही. लोकं एवढ्या रात्री का प्रवास करतात हे मात्र चांगलच कळलं. `हाती घ्याल ते तडीस न्या सारखी सुवचनं घरी परतूही देत नव्हती. गंगा तलावाजवळ विश्व हिंदू परिषदेनेही एक सुबक देऊळ बांधले होते. त्या देवळाबाहेर ती मजली उंच शंकराची मूर्ती उभी करण्याचे काम तेंव्हा बरेचसे पुरे होत आले होते. गंगा तलाव जवळ आल्याची खूण   म्हणून लांबूनच तीन मजली उंच शंकराची प्रतिमा दिसायला लागली आणि जीवात जीव आल्या सारखं वाटायला लागलं. गाडीनी जातांना गाडीनी दोन वळण घेतली का तीन घेतली याची कधी मनात मोजणी होत नाही. पायांची गाडी आली की अर्ध्या अर्ध्या पावलाचा हिशोब मनाला जड करत होता. गाडीतल्या AC चं सुख इतरवेळा जाणवत नसलं तरी आता त्याची महती जाणवत होती. अजुन पाच मिनिट, अजुन पाच मिनिटं असा मनाला धीर देत देवळात पोचलो. आत्तापर्यंतच अवसान संपत आलं होत. येतांना मात्र सरकारी बस रथात बसून घर गाठलं मॉरिशसच्या प्रचंड उन्हाने नंतर कितीतरी दिवस पाठीची लक्तरं लोंबत होती. कोणी पाठीवर हात जरी ठेवला तरी पाठ नको गं नको!! म्हणत विव्हळत होती.

कावडीपर्व

हा  तामिळ सण सर्व तामिळ देवळांमधे सर्व मंत्रातंत्रासह साजरा होत असे. अशावेळेला अंगात वेगवेगळ्या ठिकाणी सळया खुपसून घेणे, पाठीला हुक लावून रथ ओढणे, निखार्यांवरून चालणे हे आजही टिकून असल्याचे पाहून आश्चर्यही वाटलं.

ख्रिसमस, चिनी नववर्ष, गुढीपाडवा हे सगळे सण उत्साहा उत्साहात साजरे होत. चिनी नववर्षा निमित्त होणारी चिनी नृत्य अप्रतिम असतं. कार्यक्रमासोबत चिनी नववर्ष भविष्याचे कागद  घरी घेऊन येतांना आपणही गुढीपाडव्याला पंचाग पूजा करतो नवीन वर्षाचं फळ वाचतो तसं वाटलं. एकंदर जगभर ह्या ना त्या प्रकारे भविष्य हा लोकांचा जगण्याचा आधार किंवा उमेद आहे.

गणपती -

                   मॉरिससमधे 2005 साली 50,000 मराठी मंडळी होती. जवळ जवळ चाळीस मराठी मंडळं आणि फेडरेशन्स आहेत. गुढीपाडवा, 1 मे ला `शिवाजी‌-डे' तर भाद्रपद चतुर्थीला गणपती उत्सव हे सण फार मोठ्याप्रमाणावर साजरे केले जातात. दर महिन्याच्या संकष्टीचा  उपवास मराठी मंडळी मनोभावे करतात. संकष्टीला संकष्टीच म्हणण्याचा प्रघात आजही आहे. मोदकांच्या नैवेद्याऐवजी कानोल्यांचा नैवेद्य दाखवला जातो. खोवलेल्या खोबर्यात साखर घालून केलेल्या सारणाचे मुरड कानोले छान खमंग तळलेले असतात. मुरडही सुबक सुंदर असते. ह्या कानोल्यांचा नैवेद्य दाखवून चंद्रोदयाला उपवास सोडतात. प्रत्येक चतुर्थी वेगवेगळ्या मंडळांकडे साजरी केली जाते. चंद्रोदयापर्यंत मृदंग, चिपळ्यांवर भजनं गायली जातात.

                 भाद्रपद गणेशोत्सवाला सार्वजनिक पेक्षा घरगुती स्वरूप असले तरी घरोघरी फार मोठ्याप्रमाणावर उत्सव साजरा होतो. इथे बिजु कॅप ( Beau du cap ) ला शाडूची माती मिळते. त्याच शाडूच्या मातीचे हातानी गणपती तयार केले जातात. त्याला प्लॅस्टरऑफ पॅरिसची साचेबंद सुबकता नसली तरी घरगुती आपलेपण होतं. ऑविएता (Henrita) ( spelling आणि उच्चाराचा संबंध नाही म्हणजे किती नाही ह्याचं हे उत्तम उदाहरण)  आणि   येथे असलेल्या मराठा मंदीर ह्या संस्थेने भली मोठी सुबक मूर्ती मुंबईहून मागवली होती. घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव जवळून बघण्याची संधी विशाल बापू ह्या आमच्या मॉरिशन मित्रामुळे मिळाली. माझी मैत्रिण एशवंतीनीही आग्रहाच्या निमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं.

                  7 सप्टेंबर 2005 ला आम्ही मॉरिशसच्या वाकवामधे गणेशोत्सव साजरा करत असू असं कोणी आदल्यावर्षी सांगितलं असतं तरी आमचा विश्वास बसला नसता. बदलीच्या नोकरीची हीच गम्मत आहे. घरच्या गणपतीची पूजा करून आम्ही वाकवाला जायला निघालो. वाटेत ठिकठिकाणी पताका, मॉरिशसचे ध्वज फडकत होते. सोबत Glory to Lord Ganesha, Family welcomes you to Lord Ganesha चे गणपतीचे चित्र असलेले,  मोठे मोठे फलक, फडफडत होते. वाकवाच्या रस्त्यावर जातांना मुंबई रोड 3, मुंबई रोड 4 अशा पाट्या आहेत. बहुतेक मराठी लोकांचीच वस्ती असलेल्या या भागाला इतर लोक मात्र कँप बंबैय्या  म्हणूनच ओळखतात. विशालच्या मामांकडे गेलो. बाहेरच स्वागताचे फलक झळकत होते. संपूर्ण घरालाच सजावट केली होती. हॉलमधे चारी बाजूला केळीचे खांब लावून केलेल्या मखरात गणपतीची तीन फुटी तरी मूर्ती विराजमान होती.  देवापुढे रंगवलेल्या तांदुळांची सुंदर रांगोळी घातली होती. पांढरया चाफ्याच्या फुलांचा भरगच्च हार, दूर्वा, पत्री, फुलं, नारळ, पान, सुपारी, दक्षिणा, निरांजन, धूप, दीप, नैवेद्य यथासांग षोडषोपचार पूजा पाहून मन प्रसन्न झालं. हात आपोआप जोडले गेले. गणपतीच्या हातावर प्रसादाचा कानोला विराजमान होता. पूजा पहाटे साडेचार वाजताच सम्पन्न झाली होती. कोकणात असल्यासारखं वाटत होतं. भाषा, आणि संस्कृतीचे धागे किती अतूट असतात नाही? आपल्या उगमापासून हजारो मैलावर शेकडो वर्षानंतरही आपलं स्वत्त्व जपण्यामागे काय प्रेरणा असवी? इंग्रज, फ्रेंच ह्यांच्या संस्कृतीचा नांगर फिरूनही मराठीचे तजेलदार लसलसणारे कोंब मनाला सुखावून गेले. तेवढ्यात घरातून विशालच्या आई आणि मामीनी येऊन आता महाप्रसाद घेऊन जायच हं म्हणून प्रेमळ आग्रह केला.  आम्हाला अजून एका ठिकाणी गणपती पूजेचं आमंत्रण होतं. हा गणपती सार्वजनिक होता. एका वस्तीत राहणार्या सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन विशालचेच नातेवाईक `शिवाजी ' यांच्या गॅरेजमधे  हा गणपती बसविला होता. गणपतीच्या चारी बाजूला चार केळीचे खांब लावून केलेलं मखर इकोफ्रेंडली आहे हे सांगायची गरज नव्हती. चार छोट्या प्लस्टिकच्या पिशव्यांमधे पाच पाच कानोले घालून ते चारही केळीच्या खांबांना बांधले होते. गुरुजी आले आणि पूजेला सुरवात झाली. आपल्याकडील गुरुजी आणि ह्या गुरूजींमधे दिसण्यात तर काहीच फरक दिसत नव्हता. थोड्याचवेळात अस्खलित संस्कृतमधे त्यांनी पूजा सांगायला सुरवात केली. ``गुरूजी भारताततून आणले आहेत का?'' मी विशालला विचारलं. ``नाही नाही. गणू कदम इथलेच गुरुजी आहेत. भारतातल्या आमच्या कुडाळकर महारांजांकडून सर्व शिकून आले आहेत.'' गणू कदम संस्कृत बरोबर मराठी आणि क्रियॉलमधेही पूजा विधी समजाऊन सांगत होते. मंत्र पूजा, पुष्प पूजा, पत्र पूजा -- --हवन अशी सविस्तर पूजा होत असतांना जमलेली सर्व मराठी मंडळी पूजेतील श्लोक मनोभावे म्हणत होते. सर्वांचे पाठांतर आणि उच्चार ऐकल्यावर मलाच आपल्याला या मधील अनेक श्लोक माहीत नसल्याची खंत वाटली. गणपती अथर्वशीर्ष लहानांपासून थोरांपर्यंत तोंडपाठ होतं. पूजा संपल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणायच्या आधी गणू कदम यांनी मराठीत सांगितलं, ``ह्या वर्षी आपण जरी गॅरेजमधे गणपती बसविला असला तरी पुढच्या वर्षी आपण खास बांधत असलेल्या हॉलमधेच गणपती बसविला जाईल. आपण पूजा जरी घराघरात करत असलो तरी मंत्रपुष्पांजली आपण विश्वकल्याणासाठी म्हणत आहोत. त्याचा अनुवाद त्यांनी मराठी आणि क्रेयॉलमधेही सांगितला. भारतापेक्षा आपलं मराठीपण भारताबाहेरच किती अतोनात जपलं जात आहे हे पाहूनही आशेचा अंकुर दृढ होत होता. शांतीपाठ सुरू झाला. सारे मनोभावे गणू कदमांबरोबरीने म्हणत होते - - शान्तिः  - -वनस्पतयः शान्तिः  - -- ! मन्त्रोच्चाराने सारं  वातावरण भारून गेलं होतं. 

                 ``महाप्रसाद is compulsory''   पूजा संपल्या संपल्या विशालने सांगितलं. स्वतः शिवाजी आणि इतरांनीही जेऊन जायचा आग्रह केला. घराच्या अंगणातच मांडव घातला होता. अंगणात टेबलं खुर्च्या मांडल्या होत्या. टेबलावर केळीची पानं आडवी मांडली होती. सर्व बायका स्वयंपाक करण्यात गुंतल्या होत्या. कोणी कच्च्या केळांचं साल काढून चकत्या करत होत्या. कोणी इतर भाजी चिरत होत्या.कोणी बाकीची कामं करत होत्या. भारतात सुद्धा अप्रूप वाटावं अशा केळीच्या पानांकडे कौतुकाने बघत असतांनाच विशाल म्हणाला, ``ही सर्व केळीची पानं आदल्या दिवशी आम्हाला इथल्या जंगलातून तोडून आणायला लागतात. मॉरिशच्या जंगलामधे केळीची, आणि रावण केळींची खूप झाडं वाढतात. मॉरिशसमधे इतका पाऊस आणि पावसापेक्षा जोरदार असलेल्या वार्यामधे फाटलेली केळीची पानं मिळवणं कसं शक्य होत असेल? बायका पुरूष सर्वजण जेवण वाढायचं कामं करत होते. आपल्या दुधी च्या चवीची पण कलमी पेरूसारख्या दिसणार्या शुशु (chow chow) भाजी, त्याच्या वेलीसारख्या पानांची भाजी अजून पाच सात वेगवेगळ्या भाज्या, beans, लिंबू आणि मिरचीचा ठेचा, सफरचंद आणि कच्च्या पपईचं लोणचं,  पोळ्या, असं  अस्सल मराठमोळी स्वादाचं जेवणं आम्ही जेवत होतो. वरण, भात, भाजी हे सर्व शब्द इथलेही  मराठी लोकं जसेच्या तसे वापरत होते. परत एकदा जाणवलं, पोळीचा उल्लेख भाकर असा होता.

गणपती विसर्जन -

मॉरिशसमधे गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी  गणेश विसर्जनाची सरकारी सुट्टी (National Holiday) असते.  बहुतेक मराठी मंडळी दिड दिवसाचाच गणपती ठेवतात. काहींकडे पाच दिवसांचा तर मराठा मंदीरचा दहा दिवसांचा गणपती असतो. इथल्या गणेश-विसर्जनाची आम्हालाही उत्सुकता होती. इथल्या बडोदा बँकेचे मॅनेजर श्री रोकडे आणि त्यांच्या पत्नी संजीवनी यांच्या बरोबर  आम्ही वाकवाला पोचलो. शिवमंदिरापाशी विशाल आमची वाटच बघत होता. त्याच्याबरोबर कालच्या शिवाजींच्या घरी पोचलो. गणपतीला कालच्या मखरातून एका चौरंगावर स्थानापन्न केलं होतं. मराठी अनेक तरूण धोतर आणि झब्बा घालून सजले होते. काहींनी धोतरावर टी-शर्टस् घातले होते. टी-शर्टवर गणपतीचं चित्र आणि त्याखाली Glory to Lord Ganesha  असं लिहिलेलं होतं. विसर्जनाच्या मिरवणुकीची सर्व तयारी झाली आणि विशालने गणपतीचा चौरंग डोक्यावर उचलला. ढोलकीच्या तालावर सारे गात होते.  - - ``झाला झाला हो आनंद झाला माझा गणपती नाचत आला.`` सर्वजण तालासुरात गात होते `` बोला बोला लंबोदरा बोला माझा गणपती नाचत आला'' कोणी चिपळ्याही अतिशय सुंदर वाजवत होते. ह्याला इथे झाकरी म्हटलं जातं. कदाचित झाँकीचा तो अपभ्रंश असावा किंवा काही मराठी शब्द आपल्याकडून सुटुन गेले असावेत. आपलं स्वत्त्व टिकवण्याची पराकाष्ठा दिसत होती. नऊवारी, नथी, पैंजण,अंबाडा, अंबाड्यावर गजरा अशा तरुण मुली सजल्या होत्याच पण त्या जोडीला इवल्या इवल्या चिमुरड्याही नऊवारीत ठुमकत होत्या. नऊवारीला इथे काष्टी म्हणतात. बहुतेक सर्वांकडे ही मराठी गाणी फ्रेंचमधे लिहिली होती. त्यांच्या मराठीवर चढलेल्या फ्रेंच मुलाम्यामुळे ती मूळ मराठी आहेत हे कळायला आम्हालाही बराच वेळ लागला. त्यांच्या एका गाण्यात वारंवार ताल हा शब्द येत होता. ते गाणं म्हणता म्हणता एक तरुण माझ्या जवळ आला . Aunty what is the meaning of `Tal’?'' त्याने राहवून विचारले. ``रिदम'' त्याला तो म्हणत असलेल्या मराठी गाण्याचा अर्थही समजाऊन सांगितल्यावर भलताच खूष झाला. नवीन पिढीला मराठी दुर्मिळ होत चाललं आहे. तोडकं मोडकं मराठी बोलणारी ही पिढी मराठी गाणी म्हणत थेट कोकणातल्या बाल्यांप्रमाणे नाचत होती. चेहरे पाहून genetic मराठी नातं स्पष्ट जाणवत होतं. आपल्याच कोकणी बांधवांना मॉरिशसमधे भेटणं हा आमच्यासाठी एक अपूर्व सोहळा होता. मिरवणुकीनी आता बाळसेदार आकार घेतला होता. रस्ता अरुंद असला तरी रस्त्याच्या अर्ध्या भागतूनच मिरवणूक चालू होती. मोजके पोलिस हजर होते. ते जाणारा आणि येणारा ट्रॅफिक आलटून पालटून सोडत होते. रस्ता अरुंद  असूनही कुठेही ट्रॅफिक जॅम झाला नाही. गाण्यांचा, ढोलकी, झांजा चिपळ्यांचा आवाज जवळ आला की पुढच्या गल्लीतला गणपती आणि सोबतची मराठी मंडळी मिरवणुकीत सामिल होत होती. प्रत्येक गणपती हा माणसांच्या डोक्यावरच विराजमान होता. त्यामुळे त्याच्या अकारमानाला आणि उंचीलाही आपसुक मर्यादा होतीच. कुठेही डिजे बिभत्स नाच हा प्रकार नव्हता. कुठेही रस्ता अडवून कोणी उभे नव्हते. नवीन येणार्या गणपतीचं कपूर्र आरतीने स्वागत होत होतं. नव्याने सामिल होणार्या गणपतीसोबतची मंडळीही मिरवणुकीतल्या गणपतींच तसच ओवाळून स्वागत करत होती. गाणी गात, नाचत, बार्ने नावाच्या छोट्याशा नदीच्या काठी मिरवणूक पोचली. नदीच्या दुतर्फा उसाच्या मळ्यातून विसर्जन बघण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्यात चिनी, फ्रेंच, मराठी याव्यतिरिक्त भारतीय वंशाचे तामिळ, तेलगू आणि इतरही लोकं होते. नदीकाठी देवाच्या उत्तरपूजेसाठी छोटे छोटे ओटे बांधले होते. त्यावर मूर्ती ठेवल्या गेल्या. आरत्या, गाणी, मंत्रपुष्पांजली, कर्पूर आरती झाली आणि अचानक 10-12 तरुणांनी कपडयांसहीत एकाच वेळेस नदीच्या पात्रात धडाधड उड्या मारल्या.  सर्व गणपती नदीच्या काठावर आणण्यात आले. प्रत्येक गणपतीसाठी एक एक माणूस आधीच नदीच्या पात्रात होता. प्रत्येकाकडे गणपती सुपूर्त करण्यात आला. सर्वांनी हातात गणपती घेऊन नदीपात्रात अर्धगोल तयार केला; आणि मूर्ती आपल्या चेहर्यासमोर अशी धरली की तीरावरच्या लोकांना माणूस दिसू नये फक्त गणेशमूर्तीच दिसावी. गणपती बाप्पा मोर्या म्हणत सर्वांनी एकाच लयीत तीन डुबक्या घेतल्या. तिसर्या डुबकी नंतर क्षणभराची शांतता पसरली; आणि गणेश विसर्जन करून सर्व डोकी एकदम बाहेर आली. एक शिस्तबद्ध संस्मरणीय गणेश विसर्जन पहायला मिळालं.

                मॉरिशसला मराठी मंडळी वस्त्या वस्त्यांनी अनेक ठिकाणी राहतात. मॉरिशसच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर बेजु कॅपला ही बरीच मराठी मंडळी राहतात. तेथेही गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. तेथेही मोठे मोठे गणपती बसविले जातात. त्यांची विसर्जन मिरवणूकही शिस्तबद्ध असते. समुद्राच्या ठरवून दिलेल्या भागात विसर्जनास परवानगी असते. समुद्रात आधीपासून अंगरक्षक होड्या, life jacket सह अंगरक्षक उपस्थित होते. फार पूर्वीपासून गणपती उत्सव कोकणात किती सुंदरपणे केला जात असावा ह्याची ती पावती होती. कुठच्याही कर्णकर्कश्य वाद्यांची अनुपस्थिती उल्लेखनीय होती. रस्ते बंद नाही रस्त्याच्या एका बाजूने मिरवणूक जात असली तरी कुठल्याही वाहनांची कोंडी होणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी  घेतली जात होती. चिपळ्या, टाळ, इतर अनेक वाद्य सुरेल वाजवली जात होती. त्यावर सर्वजण गात होते. इथेही तेच बाले- नृत्य सुंदर वाटलं. 12 वाजता सुरू झालेली ही विसर्जनावी मिरवणूक बरोबर वेळेत 4 वाजता संपन्न झाली तेही पोलीसांनी कुठलाही हस्तक्षेप करता. 150- 200 वर्ष कित्येक पिढ्यांनी केलेली ही संस्कृतीची जपणूक आश्चर्यकारक होती.

  त्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी येत होता. विशाल, एशवंती ह्यांच्यामुळे आमची अजून मॉरिशसच्या लोकांची ओळख होत होती. त्यांच्या कार्यक्रमाची आमंत्रणही येत होती.

------------------------------------------------------

16 ग्लोबल मराठी-

विशाल आणि एशवंती -

भाषा ही लोकांना सांधणारी फार मोठी ताकद आहे. मनांना एकसंध चिकटवणारा डिंक आहे. एकवेळ फेव्हिकॉलचा जोड विजोड दिसेल पण एका भाषेमुळे जवळ आलेली मनं तंतोतंत सांधली जातात. मराठीने मॉरिशसमधेही आम्हाला विशाल आणि एशवंतीसारखे मित्र मिळवून दिले. त्यामुळे आमचा मॉरिशस मुक्काम सुंदर आठवणींचा खजिना-महाल तयार झाला.

विशाल आम्हाला  कुठे भेटला आठवत नाही. पण मॉरिशसच्या सर्व मुक्कामात तो आमच्या सोबत राहिला. अनेक नवीन नवीन प्रेक्षणीय जागा दाखवत राहिला. मॉरिशसचं अंतरंग उलगडून दाखवायला त्याने मदत केली. तेथील भारतीय मराठी परिवारात त्याच्यामुळेच आमचा शिरकाव झाला. मॉरिशसमधे प्रत्येक हॉटेलमधे पेप्सी पोचविणे हे छोटसं वाटणारं काम तो अत्यंत मनोभावे करत असतांनाच अचानक त्याला कामावरून काढून टाकलं गेलं. त्याचवेळी आम्ही भारतात परतलो. भारतात आल्यावर  फोन मधील मॉरिशसचं फोन कार्ड काढून भारतीय सिमकार्ड घालायच्या घाईत मॉरिशसची सिमकार्डस् चुकून दुकानातच राहून गेली  आणि त्यांच्या आणि आमच्या मधला एकमेव फोन हा तंतुच हरवून गेला. कधीतरी मॉरिशियन लोकं मुंबईला भेटले तर त्यांना मी विशालबद्दल सांगे. पण परत कोणीच त्याच्याबद्दल कळवलं नाही. यथा काष्ठं काष्ठं - - - समुद्रात पडलेली दोन लाकडं एकमेकांना भेटावी अशी ही भेट अर्ध्यातच सुटून गेली.

 एशवंती - टाइट जिन्स, तोकडा टॉप, ओठाच्या धनुकलीवर गडद चमकता रंग --- एशवंती मला भेटायला आली होती. ``बोंझु - - Nice to meet you यशवंती. Welcome!'' मी स्वागत केलं. ``No - --No --No! I am ऽऽ ऽऽ वं ऽऽ ती not  यशवंती.'' शक्य तेवढं स्पष्ट करत ती बोलली.  तिला हसून घरात  घेत, मी तिला सोफ्यापर्यंत घेऊन आले. बसायला सांगितलं. चहा, पाणी स्वागतानंतर हळुच तिला विचारलं , तुझ्या नावाचा अर्थ काय ? नावाला काही अर्थ असू शकतो हे तिला माहीतच नव्हतं. जॅक,जिल, टॉम अ‍ॅनी, बनी सोबत वाढलेल्या मुलीला, मराठी मुलीचं नाव इथे एशवंती असू शकतं. एवढच मान्य होतं. गप्पा मारता मारता तिला सांगितलं ``भारतीय संस्कृतीत प्रत्येक नावाला अर्थ असतो. तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगू का?'' तिला आश्चर्याचा धक्का बसला. ``सांगा ना सांगा! मला कधी माहीतच नव्हता माझ्या नावाचा अर्थ.'' ``खूप सुंदर आहे तुझ्या नावाचा अर्थ -- - नित्य यशस्विनी! Always successfull!''. स्वतः यशस्वी होणारी आणि दुसर्यांना यश मिळवून देणारी. ती हरखून गेली. मधे गेलेला 200 वर्षांचा काळ आणि 6000 कि. मि. चं अंतर यामुळे अर्थ इथल्या मातीत मिसळून गेला होता एवढच! तिला तानाजी आणि यशवंतीची ही गोष्ट सांगितली. यशवंती घोरपडीची गोष्ट ऐकून ती आश्चर्यचकित झाली. तिला शिवाजी महाराज माहीत होते. किंबहुना इथल्या मराठी लोकांचं ते दैवतच आहे. आपण जे काय आज आहोत ते शिवाजीमुळेच आहोत. आपलं मराठीपण हे सर्वस्वी शिवाजीमुळेच आहे हे त्यांच्या पूर्वजांनी त्याच्या मनावर खोल बिंबवलं होत. एशवंती मुंबईला येऊन गेली होती. तुला भारतातलं काय लक्षात राहिल? मी तिला विचारल. `` मी दादर स्टेशनला उतरले. वरच्या ब्रिजवर आले आणि बघतच राहिले. लोकांचा महासागर उसळला होता. मी कितीतरी वेळ आश्चर्याने बघतच बसले. इतकी माणसं मी कधीच पाहिली नव्हती.

मराठी ललनांसोबत-

एशवंती एक आमंत्रण घेऊन आली होती. मॉरिशच्या मराठी ललनांसोबत भेटण्याचं. काही कार्यक्रम दोघांनी एकत्रितपणे करायचं. मी लगेचच होकार देऊन टाकला. स्त्रीवर्ग एकत्र आल्यावर बर्याच वेळेला पहिली सुरवात अन्नपूर्णेच्या आठवणीनीच होते. त्याप्रमाणे माझी मैत्रीण श्वेता कर्णिक आणि मी दोन मराठी पदार्थ करून दाखवणार होतो आणि त्या त्यांचे दोन मराठी पदार्थ करून दाखवणार होत्या. मला पिठलं भाकरी करून दाखवायची हौस असली तरी भाकरीचं पीठ दुर्मिळ प्रकारात मोडत होतं. शेवटी बटाटेवडा आणि शिरा  करुन दाखवायचं ठरलं. मला भाषणही करायचं होतं. सोप्या इंग्रजीत. कारण इंग्रजी ही जरी इथली सरकारमान्य भाषा असली तरी इथला पिंड फ्रेंच आणि क्रेयॉलवरच पोसला आहे. सर्व हॉल खचाखच भरला होता. माझ्या समोर बसलेल्या मराठी बहिणींशी ओळख करुन घ्यायला श्वेता आणि मी जेवढ्या उत्सुक होतो तेवढ्याच त्याही आमच्याशी बोलायला उत्सुक होत्या.

तेथे प्रथम आहारतज्ञ अशा त्यांच्या Health Minister चं भाषण झालं. त्या वारंवार सर्वांना जंक फूड खाऊ नका म्हणून सल्ला देत होत्या. बाहेरचे गातोपिमा (मिरचीची भजी) खाऊ नका. ते वारंवार त्याच त्याच तेलात तळलेले असतात. अशा तेलात तळलेल्या पदार्थांनी शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल वाढून अनेक दुष्परिणाम होतात हे सांगून त्या स्त्रियांचं प्रबोधन करत होत्या. स्त्रियांचे असे मेळावे भरवून त्यांच्यावरच सर्व लक्ष एकाग्र करण्याची ही पद्धत मला खूपच भावली. त्यांना आम्ही बनवलेले पदार्थ खूप आवडले. आम्हाला मराठी मंडळींकडून ही आमंत्रण आलं. त्याना भेटायची संधी आम्हाला दवडायची नव्हती. हा कार्यक्रम मॉरिशसच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार होता. मंदिराच्या ओवर्यांवर संपूर्ण लग्नाचा स्वयंपाक करायची छान सोय होती. आम्हाला गॅस, भांडी कसलीच अडचण नव्हती. भारतात करंजी कशी करतात, त्यासाठी ओल्या नारळाचे सारण कसे शिजवून घेतात हे प्रात्यक्षिक श्वेता आणि मी त्यांना करून दाखवलं. रवा + मैदा + मोहन घालून वरची पारी बनवून दाखविली. आमची खुसखुशीत करंजी त्यांना खूप आवडली. त्यांनी करून दाखवलेली करंजी आमच्यासाठी पूर्ण वेगळीच होती. खोवलेल्या नारळात साखर घालून त्यांची सारण करायची रीत सोपी होती. वरचं आवरण मात्र उकडलेल्या रताळ्याच्या किसात मैदा घालून तयार करायचं किवा नुसत्या मैद्याचं. विठूमाऊलीच्या देवळात मॉरिशसच्या मराठी बहिणींना भेटल्याचा आनंद पंढरीच्या वारीला गेल्यावर जनाबाई आणि बहिणाबाई भेटल्यासारखा परमोच्च वाटला. त्यांनी भेट म्हणून दिलेल्या घड्याळावरही रंगीबेरंगी मासे सुळकन पोहत जात.

 मराठी मंडळी फेडरेशन -

5 सप्टेंबर 2005 ला मराठी मंडळी फेडरेशनच्या वतीने पुण्यात Infosis मधे शिकण्यासाठी म्हणून पाठविलेल्या 11 जणांचा सत्कार होता. आम्हालाही निमंत्रण होतं. कार्यक्रम महात्मा गांधी Institute  (MGI) मधे होता. ही C.B.S.C. चा अभ्यासक्रम  असलेली सुंदर शाळा भारताच्या सहकार्यानेच बांधून दिली आहे. विशालने सांगितल्याप्रमाणे मोटार रोडने रोझ हिल डावीकडे सोडून रिजवी (reduit) चा रस्ता धरून मोका' ला वळलो. डावीकडे M.G.I.पाटी दिसत होती             

 शिलाबाय बापू मंत्री प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच शिलाबाय बापू आणि कृष्णा बाबाजी हजर होते. येथे कुठलाही कार्यक्रम असला तरी सर्व आमंत्रित अगदी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविलेले मंत्री, प्राईम मिनिस्टर सुद्धा बरोबर पाच मिनिटे आधी त्यांच्या खुर्चीत बसलेले आढळतील. कार्यक्रमाची सुरवात गायत्री मंत्राने तर शेवट शांतीपाठाने झाला. कोणीही त्याला आक्षेप घेतला नाही.

             सत्कार करण्यासाठी मुलांची नावं माईकवर घ्यायला सुरवात झाली. नवीन पिढीची धुरा वाहणार्या  टाइट जिन्स, शॉर्ट टॉप्स, सुबक कापलेल्या केसांमधून मधुनच रंगवलेल्या केसांच्या लाल, पिवळ्या, जांभळ्या उठावदार बटा, अशा मुली, मुलं उठून येत होती. त्यांची नाव मात्र त्यांच्या पेहेरावाला कुठे जुळत नव्हती. त्या मॉड मुलींची नावं एसूबाय, शांताबाय, ईटाबाय तर मुलांची बाबाजी, तानाजी ऐकतांना कानांना तरी पटत नव्हती. मराठी स्त्रीच्या नावापुढे बाई किंवा बाय लावायची शिवाजीकालीन प्रथा आज अचानक भेटल्याने आम्ही चक्रावून गेलो होतो. जिजाबाई, येसूबाई, अहिल्याबाई नंतर खंडित झालेला भूतकाळ आज अचानक ह्या मुलांच्या रूपाने आमच्यापुढे उभा राहिला होता.

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा -

                  अशाच एका शाळेत मराठी मंडळीचे मुख्य नारु यांनी मनाचे श्लोक पाठांतराची स्पर्धा होती त्याला प्रवीणला आणि मला परीक्षक म्हणून बोलावलं होतं. साधारण पाचवी ते आठवी नववी पर्यंतची मुलमुली होती. तीन चार वर्गांमधे स्पर्धा सुरू होती. प्रत्येक वर्गात तीस चाळीस तरी मुलं होती.  आम्हाला ज्या गटाचे परीक्षक म्हणून बोलावलं होतं त्यात  तीस पस्तीस तरी मुल मुली स्पर्धेसाठी श्लोक पाठ करून आली होती. सर्वजण बिनचूक छान म्हणत होती. मराठीवर चढलेली फ्रेंच झिलाईही गोड वाटत होती. भारतापासून इतक्या दूर राहूनही मराठी संस्कार सांभाळणारी पिढी पाहून आश्चर्य वाटत होत. पहिल्या नंबरासाठी आम्ही निवडलेल्या धिटुकल्याचं नाव बालकवी होतं. त्याच्या आजोबा किंवा काकांना बालकवींच्या कविता खूप आवडत म्हणून त्याचं नाव बालकवी ठेवलं गेलं. तेथील मराठी तरुण तरुणींनी बसवलेली मराठी नाटकं आणि त्यांच्या रंगित तालमी पहायला विशाल घेऊन गेला. फ्रेंचची कल्हई लावलेल्या मराठीत नाटक ऐकायला मजा येत होती. त्यांचा उत्साह, मराठी वेषभूषा , फ्रेंचमधे लिहिलेले मराठी संवाद पाहून मजा वाटली.

                    आपल्याकडचं आंब्याचं रोप मॉरिशसला लावलं तर थोड्याच दिवसात तेथल्या हवामानाशी जुळवून घेऊन ते जसं नोव्हेंबर डिसेंबरमधेच फळेल तसे आपलेच मराठी बांधव ह्या फ्रेंच  हवामानात मराठी मनाचे श्लोक, नाटकं, सुगमसंगीत ह्या मराठी संस्कृतीनी संपन्न होत होते. मॉरिशियन संस्कृतीची हवा सांभाळत.

 शिवाजी डे

इथे 1 मे हा दिवस इथल्या मराठी लोकांमधे शिवाजी डे म्हणूनसाजरा केला जातो. शिवाजी आणि विनायक दामोदर सावरकरांबद्दल येथील लोकांना अतिशय आदर आहे. एशवंती सांगत होती, `` आमचे जुने लोक आम्हाला नेहमी सांगत असतात की आपण जे काय आहोत ते फक्त शिवाजीमुळेच आहोत. शिवाजी राजांनीच हिंदू धर्म टिकवला. अकबर आणि औरंगजेबाचं तोंडभरून कौतुक करणारा इतिहास इथे सांगितला जात नाही. जो होता तसा इतिहास सांगायचं धारिष्ट इथल्या विजयालक्ष्मी टिळकांच्या मॉरिशसच्या इतिहासात सापडलं.

भारतातील तज्ज्ञ विद्वांनांची भाषणं ऐकायला मिळावित. त्यांच्याकडून आपल्या महान पूर्वजांची माहिती मिळावी अशी तेथील मराठी लोकांची मनापासून इच्छा असे. आपल्याला मराठी उत्तमोत्तम नाटके, पहायला मिळावीत, गायनाचे कार्यक्रम ऐकायला मिळावेत ही त्यांची इच्छा असे. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारकडून काही कार्यक्रमही पाठवले जात. बर्याचवेळेला त्यात ` आपल्यांची वर्णी लावलेल्या' कार्यक्रमांचीच संख्या जास्त असे. भारतात येऊन अनेक चांगल्या गोष्टी अनुभवलेल्या ह्या लोकांचा अशा कार्यक्रमांमुळे विरस होई. आणि त्याची खंत ते आमच्याजवळ व्यक्तही करत. कित्येक वेळा तेथे भाषण देण्यासाठी आलेल्या वक्त्यांचा ओढा मॉरिशस पहाण्याकडेच जास्त असे. इथल्या लोकांना काय कळतय असं समजून तर कधी, इथे मला कोण भारतातून बघायला येतोय असं समजून त्यांनी केलेली जुजबी, थातुर-मातुर भाषणं ऐकून त्यांची कीव येई. सावरकरांबद्दल प्रचंड ओढ असलेल्या या माणसांना सावरकरांसंबंधी काही तरी सारवा सारव करणारं भाषण देणारे कॉलेजचे प्रोफेश्वर कम थोर वक्ते ऐकून आम्हीच खाली मान घालून परत आलो.

भारताचा स्वातंत्र्य दिन-

भारतमातेच्या पायातील दास्याच्या शृंखला तुटल्या तो स्वातंत्र्य दिन मला नेहमीच दिवाळी दसर्यापेक्षा मोठा सण वाटतो. पोलीसांमधे तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हेच सण असतात. क्रॉसबेल्ट आणि तलवार कमरेला लाऊन परेडला जाणार्या प्रवीण सोबत जाणं हा मला माझाही बहुमान वाटतो. वार्यावर फडफडणार्या तिरंग्याची शान पाहून स्वतंत्र भारतात जन्माला आल्याच्या अभिमानाने आणि समाधानाने  मान आपोआप ताठ होते. त्या दिवशी जमेल तेथे झेंडावंदनाला मी आवर्जून जातेच. सुट्टी म्हणून कुठल्यातरी पिकनिकला जाण्याची कल्पना मला मनाला रुचत नाही. स्वातंत्र्याची सत्तरी मुंबईत साजरी करतांना मागे वळून पाहतांना मला भारताचा पन्नासावा स्वातंत्र्य  दिन दिल्लीच्या लाल किल्यासमोर साजरा होतांना पाहता आला ह्याचं जेवढं समाधान आहे तेवढंच भारताचा साठावा स्वातंत्र्यदिन मॉरिशसमधे भारतीय दूतावासासमोर तिरंगा फडकवून  साजरा केल्याचा आनंद.

इंदिरा गांधी Cultural Centre - 

                     येथील मुलामुलींना भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल प्रचंड ओढ होती. त्यासाठी सहजपणे शिक्षक उपलब्ध नव्हते. भारताने त्यांची गरज लक्षात घेऊन तेथे इंदिरा गांधी Cultural Centre  ची स्थापना केली होती. तेथे योगासने, भारतीय संगित  शिकवले जाई. तेथील वाचनालयही सुरेख होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथे होत. भारतीय संगीताच्या मैफिली होत. भारतीय अनेक उत्तमोत्तम चित्रपट तेथे दाखविले जात. रोज योगासने शिकविली जात. ह्यात तेथील भारतीयांसोबत तेथील बाकी वर्णांचे लोक सुद्धा उत्साहाने भाग घेत. आम्ही असतांना तेथिल योगाच्या स्पर्धेत एक चिनी महिला प्रथम आली होती. ज्यांना रामायण वाचण्याची आवड असेल त्यांना रामायणाची प्रत फुकट दिली जात असे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र भारत आणि मॉरिशसमधील संस्कृतीची देवाण-घेवाण करणारा, भारतीय संस्कृती भारताबाहेर जपणारा एक दोन्ही देशातील दुवाच होता.

मातृभाषेचा झटका -

           मातृभाषेचे संस्कार दूरदूरच्या माणसांनाही किती जवळ आणतात हे वारंवार अनुभवत होते. पण आपली भाषा इतरांना काय कळतीए ह्या फुशारकीत वावरतांना अचानक एका वेगळ्याच प्रसंगालाही सामोरं जायला लागलं. एकदम जमिनीवरच आले.

       मैत्रीणी आल्या होत्या भारतातून. ललिता, रेखा आणि मी window shopping करत फिरत होतो बाजारातून. गाडीचे स्पेअरपार्टस् आणि ॅक्सेसरीजच्या दुकानासमोरून जाताना एकदम चमकून मैत्रीण म्हणाली ``अगं आत्ता आमच्या गाडीला आम्ही हे अस्सेच दिवे बसवून घेतले आहेत. चल चल आपण विचारू इथे त्यांची किंमत काय आहे.'' आम्ही तिघीजणी दुकानात शिरलो. शोकेसमधे ठेवलेल्या दिव्यांची किंमत विचारली. समोरच्या बाईंकडून थंड प्रतिसाद. दोनचारवेळा इंग्रजीत विचारूनही बाई काही बोलता शांतपणे दुसरच काम करत आहेत पाहिल्यावर आम्ही बाहेर पडलो. ``अगं चल चल तिला बहुधा इंग्रजीही कळत नसावं. चल फार वेळ घालवायला नको.'' खिदळत, आरामशीर  मराठीत संवाद साधत दुकानाबाहेर पडलो. समोरच्याला आपली भाषा येणं हे कधी कधी किती सुखावह असतं.

त्याचवेळेला आमच्या दुप्पट गतीने आतल्या बाई धावत बाहेर आल्या. ``थांबा थांबा मला मराठी चांगलं कळतं.'' त्यांचा तो आवेश पाहिला आणि बरीच गडबड झाल्याच लक्षात आलं. महाभारताचं युद्ध  नको म्हणून मी लगेचच नरमाईचं धोरण स्वीकारून त्यांची माफी मागून टाकली. विषयांतर करत त्यांना त्यांच्या अस्खलित मराठीचं रहस्य विचारलं. पण माझं खरं पानीपत तर आता होणार होतं. ``मी भारतात मराठी शिकले आहे'' तिने मोठ्या अभिमानानने सांगितलं. ``वा वा! कुठे शिकला?'' –मी. ``पुण्यात!, फर्ग्युसनमधे'' ``अरे वा छान!'' मी पण फर्ग्युसनमधेच होते. तुम्ही किती साली होता?'' त्यांनी सांगीतलेलं वर्ष माझ्या नाही पण प्रवीणच्या फर्ग्युसनच्या वर्षांशी जुळत होतं. आता तरी गप्प बसावं. पण मी पुढे चालूच --  ``हो का?'' माझ्यातली स्त्री जागी झाली असावी. ``कुठचा विषय होता तुमचा?'' ``पॉलिटिकल सायन्स!'' मी खडा टाकून बघावं म्हणून विचारलं- ``प्रवीण दीक्षित माहीत आहे?'' ``तो आणि मी एकाच वर्गातच होतो. आम्ही बरोबरच होतो!'' - ती ``मी त्याची बायको.''- मी ``काय? प्रवीण इथे आहे?'' बैल मुझे मार चा नमुना मी सादर केला. मी तिला आमचा पत्ता, फोन नंबर दिला. यायचं निमंत्रणही दिलं पण मनातून तह झालाच नव्हता. तिने बहुधा प्रवीणच्या बायकोवर काट मारली असावी आणि प्रवीणसोबत त्या रस्त्यावर येऊनही नंतर `ते' दुकान मलाही परत सापडलं नाही(?)

 

मैत्रिणी -

आत्तापर्यंत भारतातून आलेल्या भारतीयांची चागलीच एकजूट झाली होती. माझ्या भारतीय मैत्रिणींमधे जास्त करुन दाक्षिणात्यच जास्त होत्या. सगळ्यांना भारतीय ह्या एका धाग्याने घट्ट बांधून ठेवलं होतं. भारतात असतांना कदाचित आम्ही एकमेकींच्या परंपरांना, जेवणाला नावं ठेवली असती. तेथे मात्र माझ्या हातची आमटी भाजी पासून करंजी, श्रीखंडापर्यंत मेनू त्या आवडीने खात होत्या आणि मीही त्यांच्या भातप्रकारांचे उत्साहाने स्वागत करत होते. भारतात राहून जेवढा एकोपा साधला नसता तेवढी एकात्मतेची तीव्र निकड मॉरिशसमधे आमच्यात आली होती.  थेंब नळातून टपकण्यापूर्वी पाण्याच्या सगळ्या कणांना कसं आवरून सावरून घेतो, जास्तीत जास्त एकत्र रहायचा प्रयत्न साधत असतो-- खाली पडण्यासाठी !  नळाच्या कडेच्या आधारानी किती काळ लोंबत राहतो पण कुठल्याही कणाला सहजासहजी एकटं पडु देत नाही, तसचं भारताच्या वेगवेगळ्या कोपर्यातून आलेले आम्ही अनेकजण येथे एकमेकांना धरून रहात होतो. गुण्यागोविंदाने एकत्र येत होतो.

                   ह्या दाक्षिणात्य मैत्रीणी दर शुक्रवारी एकत्र जमून ललितासास्रनामाचा पाठ करत असत. दाक्षिणात्यांइतकी महाराष्ट्रात स्तोत्रपरंपरा रुजली नाही. सामुदायिक स्तोत्र पठण हेही तितकेसे होत नाही. चला त्या निमित्ताने ललितासहस्रनाम शिकून होईल म्हणत काही दिवसात  मीही शुक्रवारच्या कबिल्यात सामिल झाले. माझी एक मराठी मैत्रीण संजीवनी आणि मी बघता बघता त्यांच्या हेलांसकट ललितासहस्रनाम म्हणायला लागलो.

स्थानिक हिंदू तामिळ किंवा तेलगु मैत्रीणीही आमच्या दाक्षिणात्य मैत्रिणींमुळे आमच्या ओळखीच्या झाल्या.

दिव्यफळ सीताफळ

एकदा पूजेसाठी तेथील स्थानिक ललनेने आम्हाला सर्वांना बोलावले होते. मी जेवणार नाही म्हटल्यावर ती म्हणाली, ``मी तुम्हाला असं एक फळ देते की जे फारच दुर्मिळ आणि फारच रुचकर आहे. त्याची चव फारच मधुर असते.'' `एक ऋषी येऊन राजाला एक दिव्य फळ देऊन जातात ' अशा कुठल्या कुठल्या गोष्टींमधील दिव्य फळं आठवून माझंही कुतुहल वाढलं. आणि `फळाच्या आशेने' मीही हो म्हटलं. थोड्याच वेळात स्वयंपाकघरात जाऊन ते दिव्य फळ घेऊन आली तिच्या हातात काय आहे हे पहाण्याची माझी उत्सुकता शिगेला पोचली असतांना मला तिच्या हातात एक सीताफळ दृष्टीस पडलं.   

            ` हे होय' मी मनातल्या मनता म्हटलं; ह्या सीताफळानी मला दोनदा चकवलं तर. मला एकदम आमची दिल्लीची बदली आठवली. मी पहिल्यांदाच हिंदी प्रदेशात हिंदीशी मारामारी करत होते. एकदा भाजी आणायला गेले होते. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या बाईंनी विचारलं, ``सीताफल कैसे दिया?'' भाजीवाल्याने ``दस रु किलो'' म्हटल्यावर मीही अत्यानंदाने ``मग मलाही एक किलो देच'' म्हणून सांगितलं. सगळ्या भाजीमधे सीताफळं काही दिसेनात. मागितलेला लाल भोपळा  मात्र भाजीत पाहून मी त्याला ``भय्या सीताफळ कहाँ हैं? ये भोपळा क्युं दिया'' असं विचारताच भोपला? भोपला क्या होता हैं? सीताफल यहीं तो हैं।'' असं म्हणत लाल भोपळ्याकडे अंगुलीनिर्देश केला. ``काटा है अभी वापस नहीं लूँगा'' म्हणूनही सांगितले. सीताफळा ऐवजी पदरी पडलेला भला मोठा लाल भोपळा. `करम की गति न्यारी संतो' म्हणत मला घरी आणायला लागला. तर आज एक अद्वितीय फळ म्हणून मला एकेकाळी पाहिजे असलेलं सीताफळ अलगद माझ्या हातात आलं होतं. भाषा आणि स्थानपरत्वे काय काय गडबड होऊ शकते त्याचा परत अनुभव आला. शक्यतो चेहर्यावरचे भाव बदलू नयेत अशा प्रयत्नात ``वा वा मलाही हे फळ फारच आवडतं'' असं म्हणायच्या आधीच माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या भारतीय मैत्रीणीला दाबता आलेलं हसू फुस्सकन बाहेर पडलं. ``हे होय! आमच्या शेतावर ही सीताफळं येवढी येतात की आजोबा हारे भरभरून सीताफळं नातवांसाठी पाठवत असतात.'' तिचा चेहरा गोरामोरा व्हायच्या आतच मी तिला हे फळ मला फारच आवडतं हे पटवून देण्यात जरा यशस्वी झाले. सीताफळ खरचच गोड आणि छान होतं. आपल्या देशातील सगळ्या फळांचं पहिल्यांदाच मला अप्रूप वाटलं. भारत नररत्नांची भूमी आहे तशी फलरत्नांचीही भूमी आहे.

                 येता जाता काही दुकानांमधील भारतीय वंशाच्या स्त्रियांचाही परिचय होत गेला. जाता येता त्यांना ``बोंझू '' म्हणून पुढे जायचे हा पायंडा पडून गेला. कधी वेळ असेल तर त्यातील एक  दोघींशी बोलून  मग मी पुढे जाई. भारतातून कपडे घेऊन येऊन ते मॉरिशसला विकायचा एकीचा व्यवसाय होता. काही दिवसांनी तिने विचारलं, ``भारतीय स्त्रिया चाळीशी आली की म्हातार्या सारखं का वागायला लागतात?'' ``म्हणजे कसं ''? समजून मी विचारलं. ``म्हणजे त्या मेकअप करणं, छान छान कपडे घालणं, दागिने घालणं सोडून का देतात?''  ``अगदि साध्या राहतात  असंच नं?’’ मला जरा हसू आलं कदाचित तिच्या प्रश्नाचा रोख माझ्याकडे असावा. अगं त्यांचा पाक पक्का झालेला असतो. साखरेचा पाक पक्का झाला की पाण्यात त्याचा थेंब टाकून बघतात. पाक पक्का नसेल तर आजूबाजूचं पाणी त्याला विरघळवून टाकत.  पक्क्या पाकाच्या थेंबाला पाणीही विरघळवू शकत नाही. विरघळवणार्या पाण्यात तो अजून  दृढ होतो. घट्ट होतो. तिला फारसं पटणारं नव्हतं आणि कळणारही नव्हतं.

मॉरिशसची मुशाफिरी

 

                         मॉरिशसमधे बरीच वर्षे राहिलेल्या श्वेताची मैत्री झाली आणि अनेक दुकाने, बाजार तिच्यासोबत हिंडून आले. दोघींनाही खरेदीची खूप आवड नव्हती पण मॉरिशसची मुशाफिरी करायला काही हरकत नव्हती. पोर्ट लुईला किराणा मालाची घाऊक दुकाने आहेत. तेथील डाळी आणि बहुतेक माल आफ्रिकन असे. टपोर्या डाळी, मसाल्याचे पदार्थ आणि इतर माल आपल्याकडच्या मारवाड्याच्या किराणामालाच्या दुकानांसारखा पोत्यांमधे भरून ठेवलेला असे. स्वच्छता मात्र बघून घ्यावी अशी असे.  ह्या टुरिस्ट सिझनच्या सुमारास  तेथे मादागास्करहून लवंगा आणि काळी मिरी येत असे. त्याचा घमघमणारा उग्र सुगंध जराही लपून राहत नसे. भारतातून येणार्यांना ही अनोखी भेट घेऊन जायला फार आवडे. काळ्याशार लवंगा आणि काळेभोर मिरे त्यांच्यातल्या स्निग्धांशाने तुकतुकीत दिसत. ते कागदात बांधून ठेवले तर कागदही त्यांच्यामधल्या नैसर्गिक तेलाने तेलकट होत असे. हे मसाले घरी असेपर्यंत त्यांचा वास घरात दरवळत असे. अजुनही मादागास्करचा एक पदार्थ म्हणजे साल काढलेले, कच्चे, टपोरे शेंगदाणे. त्यांचा आकार आपल्या गुजराथी दाण्याच्या दुप्पट मोठा असे. मायक्रोवेव्हमधे त्याच्यावर मीठाचं पाणी शिंपडून केलेले खारे दाणे मस्त होत. कुठल्याही प्रसंगी ते माझ्या मदतीला येत. अचानक आलेल्या पाहुण्यांना चहा कॉफी बनवे बनवे पर्यंत मायक्रोवेव्हमधे गरमा-गरम खारे दाणे तयार होत. प्रत्येक वेळेला नवीन स्टार्टर काय करावं हा माझा प्रश्न संपून गेला. तेथे सुबाना बिस्किट कंपनीची बिस्किटांचं दुकान होतं. ही एकमेव मॉरिशियन बिस्किट कंपनी होती. मॉलमधे बिस्किट मिळायची पण ती फ्रांस, ऑस्ट्रेलिया इत्यादि परदेशातून आलेलली. साधारणपणे कुकीज सारखी गुबगुबीत आणि चोको चिप्सनी भरलेली. एखादेवेळेस ठिक वाटली तरी रोज त्यांचा अत्याचार नको वाटे. आपल्यासारखी पार्ले जी आणि मोनॅको ही भारतीयांना आवडणारी बिस्किटं दुर्मिळ असत. त्याची उणीव सुबाना भरून काढे.

              दक्षिण अफ्रिका आणि मादागास्करहून पडद्यांचं येणारं कापड फार सुंदर असे. त्यावर जिराफ, हरीण, आकाशात उडणारे पक्षी, झाडी अशी निसर्गचित्रे असत. ती अगदि खरी वाटतील इतकी सुंदर चितारलेली असत. ही कापडं स्वस्तही असतं. पोर्टलुईच्या दुकानातून तर असे पडदे शिवूनही मिळत. माझ्या भारतातून आलेल्या मैत्रिणीला मी ते कापडं दाखवलं तिलाही भलतच आवडलं. किती मिटर लागेल ह्याचा अंदाज मात्र येईना. भली मोठी दोन बोचकी घेऊन ती भारतात गेली. नंतर भेटली तेंव्हा माझं कुतुहल मला गप्प बसु देईना. ``कसे झाले गं पडदे?'' मी तिला विचारलं. ``अग फक्त तीस मिटर कापड कमी पडलं''. तिने हसत हसत सांगितलं. भारतातून अनेक कापड गिरण्यांनी  मॉरिशसला मुक्काम हलविल्यामुळे  पोर्ट लुईला अरविंद मिलची कापडं सुंदर मिळत. येथील मॉलमधे मिळणारी विविध रंगी साखर भारतातून येणार्या लोकांना किंवा भारतात गेल्यावर भेट द्यायला चांगली वस्तू असे. अनेकांनी आपल्या होणार्या सूनेची ओटी विविध रंगी साखरेने भरून घेतली.

   मसाल्याच्या पदार्थांची, उदबत्यांची, पडद्यांची, कपड्यांची, अनेक प्रकारच्या हँडिक्राफ्ट्सची, आफ्रिका खंडातील अनेक देशातील वस्तु मिळणारी अशी अनेक प्रकारची दुकानं मला परिचित झाली.

रत्ननगरी

                 कोडा वॉटर फ्रंट ही हिंदी सिनेमांच्या शूटिंगसाठीची लाडकी जागा. कोडा वॉटर फ्रंट च्या बाजारातून त्या दुकानांच्या गर्दितून दुपारभर नेत्रसुख घेत मैत्रिणींबरोबर कधीमधी हिंडायला मलाही आवडे. मॉरिशसमधे खरेदीची माझ्या मैत्रिणींना सर्व माहिती असे. त्यांच्याकडून काही जुजबी माहिती माझ्यापर्यंत येई. एका दुकानात  रंगवलेली , चित्र रेखलेली मोठी मोठी शहामृगाची सुंदर अंडी मी पहिल्यांदाच तेथे पाहिली.

              आफ्रिकेच्या आणि मादागास्करच्या जमिनीतून बाहेर आलेली डोळे दीपवणारी रत्ने पहायला मला आवडे. कुठचीही सुंदर गोष्ट रसिकपणे पहायला मला आवडते. ह्या सर्व गोष्टी घरी आणल्या की मात्र त्यातील नवलाई जाते. आपल्यालाच डोळ्यात तेल घालून त्यांची जपणुक करण्यासाठी त्यांचे सेवक व्हावे लागते. त्या त्यांच्या जागीच शोभतात. भल्या मोठ्या हस्तिदंताचा उभा छेद (L.S.) घेतल्या प्रमाणे भल्या मोठ्या पाचसहा फुट उंचीच्या गारगोटीच्या दगडाला (Quartz) काकडी चिरल्यासारखं उभं चिरून त्याचे दोन भाग दुकानाच्या  दरवाजातच कमानीसारखे शोभून दिसत. त्याच्यामधे गडद दाट जांभळ्या पासून फिक्क्या जांभळ्यापर्यंतच्या छटांमधील लखलखणारे जांभळे, नीळे,गुलाबीसर अॅमॅथिस्टचे स्फटिक डोळे दीपवून टाकीत. त्यांच्यावर सोडलेल्या प्रकाश झोतांमधे ते अजूनच चमकत. ` देवाची करणी आणि नारळात पाणी ; दगडांच्या पोटात रत्नांच्या खाणी. अशी पुढची ओळ माझ्या ओठी येई. इतके सुंदर अ‍ॅमॅथिस्ट पाहून माझ्या डोळ्यांचं पारण फिटे. अनेक दुकानांची शोभा वाढवणार्या या अ‍ॅमॅथिस्टच्या जोडीने तेथील हिरे, पाचू, माणिक, पुष्कराज यासारख्या रत्नांनीही दुकानं झळाळत असत. समुद्राला रत्नाकर तर पृथ्वीला रत्नगर्भाच म्हणणं योग्य होईल. प्रत्येकीचे दमलेले पायच शेवटी रत्नावली, रत्नमालांमधून मनाला बाहेर काढत असतं.

----------------------------------------------------------------------------------------------------

17 मॉरिशियन लग्न

लग्न एक संस्मरणीय सोहळा -

                 तुम्हाला सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणाऱया निळ्याशार समुद्राच्या पांढऱया मऊ मऊ वाळूवर, गडद निळ्या आकाशाच्या छत्री खाली लग्नाच्या आणाभाका घ्यायच्या आहेत? का निळ्या-निळ्या समुद्राच्या पाण्याखाली जिथे रंगीबेरंगी माशांचे थवे वर्हाडी म्हणून तुमच्या अवती भोवती सुळकन् सळसळत आहेत अशा निळ्या पाताळात तुमच्या जलपरीचा हात  जीवनभरासाठी हाती घ्यायचा आहे? का समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन वारं शीडात भरून दूरवर समुद्राचा फेर फटका मारत सागा नृत्याच्या तालावर थिरकत वाईन आणि  बार्बेक्यूचा आस्वाद घेत  कॅटॅमरॉन मधे आपल्या जीवनसाथीबरोबर आपल्या सहजीवनाची सुरवात करायची आहे? का एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर पवित्र देवळात देवाच्या साक्षीनी  कर हा करी धरिला शुभांगीम्हणत आपल्या लग्नाची  आठवण मोरपिसासारखी आयुष्याच्या पुस्तकात सदोदित जपून ठेवायची आहे? मॉरिशस मधे लग्न करण्यासाठी असे सुंदर सुंदर  पर्याय तेथल्या टुरिझम खात्याने आपल्या समोर ठेवले आहेत.  

Civil Status Office–  

प्रवीणच्या कामानिमित्त त्याला एकदोनदा Civil Status office  मधे जायला लागले. तिथे त्याला आलेले अनुभव फारच हृद्य वाटले.

इथे 1876 पासून लोकांच्या जन्म मृत्यू,लग्नाच्या नोंदींची रजिस्टर्स ठेवली आहेत. नवीन कायद्याप्रमाणे  1905 पासूनच्या  रेकॉर्डचे संगणीकरण करायचे आहे. जानेवारी 2005 ला त्यांचे 1920 पासूनचे रेकॉर्ड संगणीकृत झाले होते.

मुल जन्माला आले की त्याला जन्म दाखल्या बरोबर पोस्टमास्टरला मुलाच्या नावानी 200 रुपयांचे  सेव्हींग बँक अकाउंट उघडण्याचा आदेश दिला जातो. त्याच वेळी ऑफिस मधे एक जोडपं  मुलाच्या जन्माचा दाखला घ्यायला आलं होतं. बापाचं नाव दौलत आणि आईच नाव झाँसी रानी. प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर civil status office असते. तिथेच जन्म मृत्यूची नोंद होते. मॉरिशसमधे 47 ठिकाणी अशी कार्यालये आहेत. लग्नाच्या नोंदींसाठी मात्र काही मोठी ऑफिसेस आहेत

Marriage celebration officer असतो. Port Louis च्या  ऑफिसमधील officer अतीशय उत्साही आणि हसतमुख होता. त्याचा हॉल टापटीप आणि छानच ठेवला होता. हॉलमधे छान पुष्परचना करून ठेवली होती. नोंदणी करायला आलेल्या एका नवदाम्पत्याला त्यानी सोफ्यावर बसायला सांगितलं हासतमुखानी त्यानी सांगितलं ’Relax! Do not take tension. Since marriage takes place only once in life time his efforts were to make it happy and memorable.“ लग्न लावतांना मुलीचा जन्म दाखला पाहिला जातो.18 वर्ष हे जरी कायद्यानी मुलीच्या लग्नाचं वय असलं तरी आईवडिलांची सम्मती असेल तर 16 व्या वर्षीही लग्न करता येतं. Section 201, 202  आणि 205 Civil Marriage Act प्रमाणे कायद्याच्या provisions ह्या तरतुदी अधिकारी समजावून सांगत होता. ``You must remain faithful to your wife. You must share her distress. You must educate your children with responsibility. You must remain sincerely faithful to your wife in all her activities.’   sincerely ह्या शब्दावर तो परत परत भर देत होता.  

             हिंदू मॉरिशन लोकांचं  विधिवत् लग्न हा एक हृद्य अनुभव होता. अशा अनेक भारतीय मॉरिशन लोकांच्या लग्नांची आमंत्रण आली की काहीतरी नवीन पहायला मिळणार असल्याने प्रवीण आणि मी आनंदाने लगेचच होकार देत असू.  मॉरिशस मधे लग्न कुठल्याही धर्माचं अथवा जाती-पंथाचं असो ते फक्त  शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसातच होणार असा अलिखित नियमच आहे. इथल्या समजुतदारपणानी ह्या नियमाला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात अद्याप आव्हान नाही आणि कोणी देणारही नाही. मुहुर्तांच्या चौकटीत बसत  नाही म्हणून आत्तापर्यंत कोणाची लग्न बिघडलीही नाहीत.  त्यामुळे लग्नासाठी काम सोडून  रजा घेणे, शाळा ऑफिसच्या बुट्ट्या, सुट्ट्या, रजा , ती नाकारणं ह्या गोष्टीच उद्भवत नाहीत. सगळं कसं सुरळीत पार पडतं.

             भारतीय वंशाच्या वधूच्या साड्यांची खरेदी मात्र शक्य असेल तर भारतातच केली जाते. इथल्याही काही दुकानात भारतीय साड्या मिळतात. पण त्या फारच महागही असतात आणि त्यात विविधताही कमी असते.  मराठी मुलींना लग्नात काष्टी म्हणजे काष्ट्याची साडी/ नऊवारी नेसायची इतकी हौस असते की ही नऊवारी साडी पुण्यामुंबईला कोणी जाणार असेल तर खास मागवली जाते. विशाल बापूच्या नात्यातल्या एका लग्नाच्या जेवणाचं निमंत्रण होतं. त्यावेळी मीही काही कामासाठी भारतात जाऊन येणार होते. त्यामुळे मला मुलीसाठी काष्ट्याची साडी आणायचं काम होतं. लग्न मुलीकडचं असो अथवा मुलाकडचं, दोघेही आपापल्या नातेवाईकांना आपापल्या घरी शनिवारी संध्याकाळी जेवायला बोलावतात. आम्ही गेलो तेंव्हा घराच्या अंगणातच मांडव घालून टेबलं खुर्च्या मांडल्या होत्या. घराचं अंगण लहान असेल तर रस्त्यावर मांडव टाकला जातो. अशावेळेला  रस्त्याच्या दोन्ही बाजूंना No entry चे फलक आधीपासून लावले जात.   नेहमी सुंदर सजवलेल्या घरात जमिनीवर आज सगळीकडे मोठेमोठे पुठ्ठे अंथरून ठेवले होते. घर खराब होऊ नये म्हणून! त्याचं कारण ही दिसत होतं. सर्व स्वयंपाक घरातच बनवला जात होता. घरातल्या सर्व स्त्रिया, नातेवाईक आणि ओळखीच्यांच्या स्त्रियाही अंग मोडून स्वयापाकघरात काम करत होत्या. आलेल्याचे आगत्याने स्वागत होत होते.  बालपणीचे अनुभवलेल्या वातावरणाचे धागे परत इथे कुठेतरी जुळत आहेत असं वाटत होतं. पंगत हा प्रकार नव्हता. लोकं जसे येतील तसे जेऊन जात होते. हजारोंनी लोक असाही प्रकार नव्हता. सर्व कार्यक्रम कुटुंब आणि अति जवळचे इतपतच मर्यादित होता. आम्ही जेवायला बसलो तर घरातील पुरुष माणसांपासून सर्वजण वाढायचं काम आग्रहाने करत होते. एखाद्या कोकणातल्या लग्नाला गेल्यासारखं वाटत होतं. केळीच्या पानावर लोणचं,  कोशिंबिरी ,फळभाज्या, पालेभाज्या  असं सगळ पान सजलं. काळाच्या ओघात पानातल्या डावीकडच्या उजवीकडच्या पदार्थांनी जरी त्यांच्या जागा सोडल्या असल्या तरी उजवं डाव करता प्रत्येकाला आग्रह होत होता. कच्च्या पपईचं सफरचंद घालून केलेलं लोणचं होतं. श्रावणघेवडा म्हणजे बीन्सची भाजी आवडून गेली. शुशु ह्या पेरु सारख्या दिसणाऱया आणि थोडीफार दुधीच्या चवीशी साधर्म्य साधणारी भाजी बनवितांना मात्र एकदम चवदार बनविली होती. सोबत त्याच्या पाल्याचीही भाजी होती. ही भाजी घेतल्याशिवाय लोकं मंडईतून बाहेर पडत नाहीत हे मी पाहिलं होतं. आज त्याची भाजी खातांना आम्हालाही त्या चवीचा मोह पडला. पण हे सगळं कशाशी खायचं ह्याचा विचार करत असतांनाच विशाल म्हणाला, ``भाकर घ्या नं!'' टेबलावर एका पसरट कुंड्यात गव्हाच्या रोट्या ठेवलेल्या होत्या.  ( त्या पोळ्याही नव्हत्या. ) त्यालाच सगळे भाकर संबोधत होते. मराठी भाकर मॉरिशसमधून हद्दपार झाली असली तरी `काप गेले आणि भोकं राहिली' या न्यायाने नुसत्या नावाने अस्तित्त्व टिकवून होती. तिथल्या कोणालाच भाकर ही ज्वारी किंवा बाजरीची असते हे माहित नव्हतं. एवढच कशाला त्यांनी ज्वारी बाजरी  कधी पाहिलीही नव्हती आणि  नावंही ऐकली नव्हती. ज्या कणकेच्या रोट्या बनवल्या जात तो गहू मॉरिशसमधे पिकत नव्हता. तो ऑस्ट्रेलियाहून बंदरावर आला की तेथेच पोर्ट लुईला मोठ्या मोठ्या गिरण्या होत्या त्यात तो दळला जाई आणि लोकांपर्यंत फक्त कणिक नव्हे मैदारूपातच पोचे. ह्या मैद्याचे ब्रेड किंवा रोट्या बनविल्या जात. त्यामुळे मॉरिशसच्या आमच्या मित्रांनी गहू, गव्हाच्या ओंब्या, गव्हाची हिरवीगार आणि गहू पिकला की सोनेरी झालेली शेतं कधि पाहिलीच नव्हती. असो. मॉरिशन लग्नाचं जेवण अप्रतिम होत. लग्नाचं जेवण पूर्ण शाकाहारी असतं. विशाल सांगत होता. लग्न झाल्यावर मात्र आमच्याकडे व्हेज किंवा नॉनव्हेज गोंधळ असतो. गोंधळ म्हणजे आपल्याकडे लग्नानंतर जो खंडोबाचा गोंधळ घालतात तोच. दुसर्या दिवशी लग्नाला यायचा आग्रह करत विशाल त्याची आई आणि नातेवाईकांनी आम्हाला निरोप दिला आणि छान बांधलेल्या दोन पुड्या. ``काय आहे ह्यात?'' ``स्वीट'' विशाल म्हणाला. जेवण इतकं सुग्रास होतं की जेवणात गोडाची कमी जाणवलीच नव्हती. ``कानोला आहे.'' ओल्या खोबर्याचे दोन मुरड कानोले घेऊन आम्ही घरी आलो. येथे जेवतांना गोड खायची पद्धत नाही. गोड पदार्थ जातांना बरोबर दिला जातो.

दुसर्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो. स्त्रिया साडी ते फ्रॉक अशा ब्रॉड स्पेक्ट्रम मधे आल्या होत्या. कित्येकींचे शॉर्ट बॉब असले तरी अनेक जणींनी केसात गुलाब माळले होते. तेही कानावर येतील असे. फुलं कानावर माळण्याची ती पद्धत पाहून माझ्या डोळ्यासमोर महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील देवीची सुंदर मूर्ती प्रकट होत होती. नेहमी रणांगणावर निवास करणारी ही शक्ति-देवताही जरा निवांत वेळ मिळाला की रणांगणाच्याच कडेला उगवलेलं एखादं फूल त्याच्या कोवळ्या तांबुस पानासहित खुडून कानावर खोचते.

 

सुमन सुगंधित किंचित तांबुस पर्णविभूषित कर्णभुषा

तुजसि दिसेचि मनोहर सुंदर मोहक रूप खुले सुषमा

तुझि कुरळी कुरळी मन मोहवि श्यामल सुंदर केशभुषा

जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तूच उमा ।।12.2

 

कदाचित पूर्वी भारतीय स्त्रियाही असच कानावर फूल खोचत असतील. स्तोत्रात वर्णन केलेली देवी इथे अचानक मला गवसल्याचा आनंद झाला. असं पूर्वीचं सूत सापडलं की ते मला स्वर्गापर्यंत नेत असे.

लग्नाचे सर्व विधी यथासांग झाले. जेवणाचा घोळ मात्र कुठेच नव्हता. लग्न लागल्यानंतर सुबकपणे बांधलेलं एक बदामाचं चॉकलेट(पेढ्याएवढं) सर्वांना वाटण्यात आलं. बत्ताशाला किंवा पेढ्याला शोधलेला पर्याय छान होता. बहुतेक लग्नांच्या हॉलबाहेर दालपुरी आणि आईस्क्रीमची गाडी उभी केलेली होती. ज्याला भूक लागेल त्याला तिथे दालपुरी विकत घेता यावी फार लांब जायला लागू नये ह्यासाठी ही सोय होती.

प्रवीणच्या ऑफिसमधील एका मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ती तामिळ मॉरिशियन होती. प्रत्येक तेलगु अथवा तामिळ देवळाला इथे कल्याणमंडपम् (लग्नासाठी सभागृह) असतोच. तिथेच हे लग्न होतं. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर नवरा-नवरीला भेटायला गेलो. एका छोट्या लवचिक काडीच्या दोन्ही टोकाला मुंडावळ्यांसारखे फुलांचे गजरे बांधले होते. भेटायला येणार्या प्रत्येकाने ती मुंडावळी नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवायची प्रथा आपल्याकडच्या मुंडावळ्यांशी जुळत होती. कधी कधी पंढरीच्या पांडुरंगाच्या मुकुटावरून दोन्ही बाजूंना लोबणार्या गजर्याशी ही पद्धत मिळतीजुळती वाटे.  येथेही जेवणाचा घोळ नाही. एक चॉकलेट घेऊन सर्वजण आनंदानी आपापल्या घरी जात होते. किंवा क्वचितच बाहेर दालपुरी खात होते.

18 अनपेक्षित अनुभव -

हनिमून

            विशाल उत्साहाने आम्हाला सांगत होता, बहिणीचं लग्न झालं की दोन दिवसांनी ती आणि तिचा नवरा  हनिमूनला जाणार आहे. उत्साहाने मीही विचारलं, ``अरे वा! कुठे जाणार आहेत?'' पोर्ट लुईच्या हॉटेलचं बुकिंग केलं आहे. इथे दक्षिणेला राहणारे लोक उत्तरेला हनिमूनला जातात आणि उत्तरेचे लोक दक्षिणेला येतात. विशालच्या घरापासून गाडीने कितीही फिरत फिरत गेलं तरी पो. लुई दिड तासाच्या अंतरावर होतं. म्हणजे भारताच्या भव्यतेच्या परिमाणात बोलायचं झालं तर बोरीवलीच्या लोकांनी कुलाब्याला किंवा कुलाब्याच्या लोकांनी हनिमूनला कांदिवली विरारला जाणयासारखं होतं. फार फार लांबचं बोलायचं झालं तर पुण्याच्या लोकांनी मुंबईला आणि मुंबईच्या लोकांनी पुण्याला जाण्यासारखं होतं. उद्या मुंबईकरांवर पासपोर्ट, व्हिसा शिवाय मुंबईबाहेर कुठेही बाहेर जायचं नाही असे निर्बंध आले तर त्यांचं काय होईल? किंबहुना काय काय होईल ह्याचा विचारच मी करु शकत नव्हते. मानसिक होणारी घुसमट मी विचारच करु शकत नव्हते. आजही शनिवार रविवार दोन सुट्ट्या जोडून आल्या की मुंबई पुणे express way वर गाड्यांच्या खचाखच रांगा लागतात. एका छोट्याशा बेटावर राहणार्या लोकांचा वावर आणि विचार किती सीमित होऊन जातो.

         आम्ही नोकरीनिमित्त भारतभर आनंदाने फिरत होतो. अनेक लोकांना भेटत होतो. पहात होतो. विविध भाषांची, मजा अनुभवत होतो. अनेक प्रांत पादाक्रांत करत होतो. इतक्या दूरदूरच्या गावांना जाऊनही तिरंग्याचं केवढं मोठ्ठ छत्र सतत आपल्या डोक्यावर आहे, आपण किती सुदैवी आहोत ही जाणीव कधी झाली नव्हती. आई आपल्यासाठी काय करते ह्याची जाणीव लहान बाळाला कुठे  असते? ती आज प्रकर्षाने झाली. भारतात असतांना एकमेकांविरुद्ध दंड थोपटतांना ह्या तिरंग्याची छाया आपल्या डोक्यावरून गेली तर किती पोरकेपण येईल ह्याची कधी कल्पनाही केली नव्हती. एका भल्या मोठ्या देशाने आपल्याला कुशीत घेतल्याची , सनाथ केल्याची भव्य जाणीव मॉरिशस नाव्याच्या छोट्याशा देशात गेल्यावरच झाली.

                        प्रवीणला तेथील एक मंत्री म्हणाले मला 15 दिवस भारतात सुट्टीवर यायचं आहे कुठे जावं ते सुचव. प्रवीणने एक छानसा प्लॅन बनवला.  त्यांना नैनिताल पहायचे होते. दिल्लीहून नैनितालला गाडीने जायला 4-5 तास तरी लागतील असं म्हटल्यावर इतका वेळ? इतका वेळ गाडीने प्रवास? छे छे मी इतका वेळ गाडीत बसूच शकत नाही म्हणून त्यांनी नकारच दिला. मॉरिशसचं दक्षिणोत्तर अंतर अवघ्या दोन-तीन तासात संपून जायचं तिथे भारताचं दक्षिणोत्तर सोडाच पण दिल्ली नैनितालही प्रचंड दूर वाटणं सहाजिकच होतं.  मॉरिशस मध्ये ट्रेन नसल्याने अनेकांना भारतातील ट्रेन-प्रवासाची भीती वाटायची. ट्रेनशिवाय आम्ही कुठे जाऊ शकू हे सांगा म्हणतं.

           मॉरिशसमधून मी जेंव्हा काही कामासाठी भारतात आले, तेंव्हा पुणे-मुंबई अंतर हे फारच लांब वाटायला लागलं. घाटरस्ता आणि सह्याद्रिचे डोंगर हिमालयासारखे विशाल वाटायला लागले. छोट्या देशातून मोठ्या देशात आल्याचं दडपण दिवसभर तरी टिकून राहिलं. म्हणजे नुसता शरीराला जेटलॅगचाच सामना करायला लागतो असं नाही तर मनाला छोट्याकडून विशालतेकडे जायचाही सामना करायला लागतो

परत आज गलिव्हरच्या गोष्टींची सत्यता अनुभवत होतो.  मॉरिशसमधल्या छोट्या छोट्या घटना कधी आम्हाला आश्चर्यचकित करत तर कधी अंतर्मुख करत. कधी हताश करत कधी उत्साहित करत. अशीच एक घटना बहुलीची.

बाहुली - 

येणार्या प्रत्येक पाहुण्यांना वेगवेगळ्या गोष्टींमधे असलेली रुची लक्षात घेऊन मी मॉरिशस दाखवत असे. माझ्याकडे भाऊ आणि वहिनी आले असतांना  भावाने आल्या आल्याच ``मला काहीही खरेदी करायचं नाही'' हे स्पष्ट केलं. तरीही इथले मॉल कसे असतात हे दाखवायला मी त्याला आणि वहिनीला घेऊन गेले. मॉलमधून सगळ्या गोष्टींवरून नजर टाकता टाकता आम्ही शेवटच्या मुलांच्या विभागात आलो. मी आणि वहिनी काहीतरी बघण्यात गढून गेलो होतो. खरेदीसाठी मला वहिनीला प्रत्येक गोष्टीत रस वाटत होता आणि भावाला प्रत्येक गोष्ट निरस.  तो एकटाच पुढे पुढे चालला होता. आणि अचानक ओरडलाच - -- -``अफलातून! अगं बघ बघ !'' ``काय रे काय झालं '' ? ``अग त्या बघ. त्या भावल्या.'' मीही गमतीने तो दाखवत होता त्या दिशेकडे नजर टाकली. ह्याला बाहुल्या पाहून एकदम काय झालं?  समोरच्या शेल्फवर बाहुल्या होत्या. ब्राऊन, काही अजुन गडद चॉकलेटी, काळ्या, मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्याच्या, जाड ओठाच्या, मॅगीसारख्या कुरळ्या केसाच्या. काहींच्या कुरळ्या केसांच्या खूप छोट्या छोट्या वेण्या घातलेल्या. अफ्रिकन अंगकाठीच्या. त्याच चेहर्यांची छोटी बाळं, भावले. ``सुंदर'' मीही बघतच राहिले. मुंबईला एखाद्या छोट्याशा अरुंद गल्लीतून आत आत जात असतांनाच अचानक ती गल्ली भव्य समुद्रापाशीच आपल्याला सोडून चकित करून जाते तसं बाहुलीच्या छोट्याशा विषयाने एका मोठ्या प्रश्नापर्यंत आम्हाला आणून सोडलं होतं. .....  भला मोठा .....सागरासारखा मोठा, गहन. भारतात मिळणार्या बाहुल्या गोर्या, सोनेरी केसाच्या नीळ्या डोळ्याच्याच का असतात? त्यांचं दिसणं जरासुद्धा आपल्यासारखं नसतं. तरी आपल्या मुलांवर लहानपणापासून ह्या बाहुल्यांना जवळ करायची सक्ती का?

           अमेरिकेत जातांना मला विमानात भेटलेल्या एका अमेरीकन बाईची आठवण आली. ती भारतातून अमेरिकेत परत चालली होती. सहज मी तिला विचारलं, ``तुला भारतात काय आवडलं?''  आणि पटकन ती बोलून गेली, ``भारतातल्या मुलांचे काळेभोर मोठ्ठे मोठ्ठे डोळे!'' मग आम्हालाच का आमच्या मुलांना अशा बाहुल्या देण्याची लाज वाटावी? सौंदर्यवती द्रौपदी काळीच होती ना? भारतीयांच्या ह्दयात आजही विराजमान असलेला कृष्णही तर काळाच आहे. मग?  माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणूनही प्रश्नच येत होता. भारतात सर्वात जास्त उजळ होण्याची क्रीम्स खपतात - -का? ---- आमची गुलामगीरी अजूनही आमच्या रक्तारक्तातून सळसळत आहे का? आपण जसे दिसतो तशाच सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या, काळ्या केसांच्या, लांब शेपटा किंवा अंबाडा घालणार्या, परकर पोलकं घातलेल्या  बाहुल्या बनवाव्यात असं कोणालाच कसं वाटलं नाही? पूर्वी असायच्या अशा बाहुल्या. परकर पोलकंवाल्या. त्या काळाच्या प्रवाहात वाहून गेल्या, लुप्त झाल्या. कधी? कशा? त्याची जाणीवही मनाला शिवली नाही. रक्तचंदनाची ठकीही चालायची आम्हाला. अचानक ह्या गोर्या भावल्यांनी अतिक्रमण केलं आमच्या ठकीवर. परदेशी कुत्र्यांनी आमच्या गावठी मोत्या, वाघ्याला बेघर केलं. रस्तोरस्ती ती भटकी कुत्री म्हणून फिरू लागली. आमच्या टपोर्या, कारुण्याने ओथंबलेल्या डोळ्याच्या गाई गोठ्यातून हद्दपार झाल्या. त्यांची जागा जर्सी नावाच्या प्राण्याने घेतली. तशीच ठकीलाही बार्बी नावाच्या गोर्या मडमेनी देशातूनच हद्दपार केलं.   गुलामगिरीच्या रोवलेल्या मुळ्या आमच्या देशाच्या गळ्याभोवती अजून अजून जखडुन टाकतायत. स्वातंत्र्य मिळवतांना इंग्रजांना भारतातून `चले जाव' म्हणत गुलामगिरीची वरवरची पालवीच फक्त आम्ही खुडली. स्वातंत्र्य मिळूनही आमचे गुलामगिरीचेचे रोगट जीन्स तसेच आहेत का? संस्कृतचं सुभाषित आठवत होतं. शस्त्रहता हताः ; बुद्धिहता हता शस्त्राने मारून मृत्यू येत नाही. बुद्धी मारली तर कायमचा मृत्यू होतो. एका छोट्याशा बाहुलीनी आमचं मन ढवळून काढलं होत. काही घ्यायचं नाही असा निश्चय करून निघालेल्या भावाने अत्यंत प्रेमाने एक बाहुली खरेदी केली. ब्राऊन रंगाची, काळ्या, मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्याची, जाड ओठाची, मॅगीसारख्या कुरळ्या केसाची.  मनात विचांरांची वावटळ घेऊन आम्ही घरी परतलो. पूर्ण दिवस अस्वस्थतेतच गेला. तो परत भारतात गेल्यावर मी मुद्दाम फोन करून बाहुलीची चौकशी केली. बाहुली माझ्या भाच्चीला आणि तिच्या मैत्रीणींना खूप खूप आवडली होती.

लवकुश पाळणाघर-

            बाहुलीसारखी अशीच एक छोटीशी गोष्ट माझ्या बाहेर धावणार्या सर्व विचारांना मनाच्या तळापर्यंत आत घेऊन गेली. सहज मॉरिशसच्या अंतरंगातून फिरतांना एका पाटीने लक्ष वेधून घेतल. पाटी होती `Lav-Koosh Creche ' (लवकुश पाळणाघर) पाळणाघरासाठी इतकं सुंदर नाव अजुनसुद्धा मला सापडलं नाही. लव-कुशांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करणार्या वाल्मिकींचा  आश्रम जणु त्या लवकुश पाळणाघराच्या रूपाने माझ्या डोळ्यासमोर साकार झाला. अनिवासी भारतीयांनी जपलेल्या संस्कृतीतून असे अचानक सोनेरी क्षण अनुभवायला मिळायचे. आणि आम्हाला चकित करुन जायचे.

समस्त मातृशक्ती -

 भारतातून आलेल्या प्रा. नवलगुंदकरांच्या भाषणाला गेलो होतो. Mrs. घोष या Black River Council च्या President बाईंनी त्याच्या भाषणाची ``समस्त मातृशक्ती - - -'' अशी सुरवात केली. अभावितपणे आमच्या दोघांच्या हातानी टाळ्या वाजविल्या गेल्या. भगिनींनो ह्यासाठी पर्यायी फार पूर्वापार वापरात असलेला सोन्यासारखा शब्द जणु भाषेच्या उत्खननातून सापडल्याचा आनंद झाला.

शकुंतलेला निरोप -

               अशीच एकदा मॉरिशसचं अंतरंग शोधत बसने जात होते.  बसमधे फार प्रवासी नव्हते. गावागावांना ओवत जाणारी बस एका थांब्यापाशी थांबली. एक कृष्णवर्णी तरुणी बाळाला कडेवर घेऊन बसची वाट पहात होती. तिला पोचवायला तिची आईही आली होती. बस थांबताच सासरी चाललेली लेक आईच्या गळ्यात पडली. आई समजूत काढत होती. तिचे डोळे पुसत होती. बसमधले सर्वजण खिडकीतून हे दृश्य पाहून हेलावून जाऊन काळजी करू नकोस असं तिला सांगत असावेत. बसच्या चालकानेही शांतपणे गाडी थांबवली. निरोपाचा सोहळा जणु प्रत्येकाच्या घरचाच झाला होता. चालकानेही आईची, लेकीची समजूत काढली. बहुतेक `बोल बाई अजुन दोन मिनिटं' म्हणून गाडीही अजुन दोन पाच दहा मिनिटं उभी राहिली. शेवटी जड पावलांनी लेक बसमधे चढली. आणि आईला हात करत करत बस सुरू झाली. कण्वांनी शकुंतलेला निरोप द्यावा इतक्या आस्थेने हा सारा निरोप समारंभ मी अनुभवला.

( बसमधून सासरी जाणारी मॉरिशियन शकुंतला )

जगभर कुठेही जा. माणसांचा बाह्य पोशाख, राहणीमान, कितीही बदललं तरी नाती तशीच असतात. मानसिक भावना त्याच राहतात.  . दि. मां च्या मराठी गाण्याची ओळ  ` दीर थांबले खोळंबुन गाडी - - जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ' ही गाण्याची ओळ त्या मॉरिशियन प्रसंगालाही चपखल जुळतांना पाहुन गंमत वाटुन गेली.

 पुतळ्याखालील मनाला यातना देणारी ती ओळ -

        मॉरिशसचं सौंदर्य निरखतांना काही गोष्टी मात्र मनाला अशा काही सलत राहिल्या की कधी कधी सारा दिवस मन उदास होऊन जाई. को डा वॉटर फ्रंट ही भारतीयांची लाडकी जागा असली तरी तेथील एक पुतळा आणि त्याखाली लिहीलेली एक ओळ मला फार टोचत राही.  

 

भारताच्या पारतंत्र्याच्या काळी उभारलेला , अजूनही उभा असलेला तो पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा.  त्याच्या खाली कोरलेली अक्षरं माझ्या मनावर छिन्नीनी कोरल्यासारखी आजही मला यातना देतात. `EMPRESS OF INDIA' इंग्लंडच्या राणीला इंग्लंड ऐवजी एवढ्या मोठ्या भारताची साम्राज्ञी म्हणवून घ्यायचा लोभ मी जाणू शकत होते. पण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या पुतळ्याखालची  `EMPRESS OF INDIA' ही ओळ बदलावी असं तेथे स्थायिक झालेल्या भारतीयांनाही वाटू नये? इतके भारतीय आजही मॉरिशसला भेट देतात. त्यांच्याही डोळ्यांना ही ओळ खुपू नये? मला दर वेळेस त्या ओळीवरून डोळे फिरले की ओशाळवाणं आणि हतबल वाटे. 

http://c8.alamy.com/comp/DN3Y6/the-queen-victoria-statue-port-louis-mauritius-DN3YP6.jpg ह्या लिंकवर त्याखालील अक्षरेही वाचता येतील

 

अमूलची हरलेली लढाई

मॉरिशसवर निसर्गाने सौदर्याची उधळण केली आहे. नैसर्गिक सौदर्याचा ठेवा अत्यादराने जपणार्या मॉरिशसमधे गोधनाचं दर्शन दुर्मिळच होतं. सर्वत्र पसरलेली उसाची शेतीही बैलांवर अवलंबून नव्हती. सर्वत्र मशिननेच शेती होत होती. गाय, बैल, म्हैस हे प्राणी जेवढे दुर्मिळ होते तेवढेच गाढव आदि प्राणीही. नाही म्हणायला पँम्पलेमूसच्या बोटॅनिकल गार्डनमधे हरणांच्या जोडीने ठेवलेलं एक गाढव मात्र पहायला मिळायचं.

             आमच्या घरापासून काही अंतरावर दूध डेअरी होती. मॉरिशसच्या मानाने ती फारच छोटी होती. गाईचं फ्रेश दूध प्लॅस्टिकच्या अर्ध्या लिटरच्या बंद प्लॅस्टिक  थैलीत तथे सकाळी नऊ वाजेपर्यंत उपलब्ध असे. आमच्या सारखे भारतीयच त्याचे जास्त ग्राहक असू. भारतातलं अत्यंत सकस, मधुर दूध प्यायची सवय झाल्यावर बाहेरच्या देशातलं (अगदि अमेरिकेतील सुद्धा) दूध किती वाईट चवीचं असतं. हे पटतं. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला नाही किंवा जे जाहिरातींच्या बहकाव्यात आले असतील त्यांनाच माझं म्हणणं पटणार नाही. इथले ज्यास्त करून सर्व लोकं मिल्क पावडरवरच त्यांची दुधाची तहान भागवत असत. रस्तोरस्ती Twin Cow आणि Red Cow पावडर मिल्कच्या बोर्डस् झळकत असत. ह्या दूध पावडरी न्यूझिलंड, ऑस्ट्रेलियाहून येत असत. मॉरिशियन लोकं अतिशय चोखंदळ आहेत ते महाग असल्या तरी फक्त ब्रँडेड गोष्टीच वापरतात असा लोकांचा अहंकार फुलवत आपल्या गोष्टीच वापरायला लावायचा त्यांचा प्रचार थाट असे.

                 एक दिवस पेपरमधे बातमी आली की भारतातून जहाज भरून `अमूल्या'ची दूधपावडर मॉरिशसमधे येत आहे. उदबत्त्या आणि आरतीच्या सामानाव्यतिरिक्त काहीतरी भारतीय गोष्टी मॉरिशसच्या मॉल्समधे पहायला मिळणार म्हणून आम्ही खूष होतो. अमूल्याला  `या या' म्हणत त्याचं स्वागत करायला आपण भारतीय तिथे उपस्थित असल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसर्या दिवसापासूनच अमूल्याच्या दोषांची यादी ज्याच्या त्याच्या जिभेवर फिरतांना दिसायला लागली. 1 red cow milk पेक्षा अमूल्यात preservatives ज्यास्त आहेत.  2 ही दूध पावडर पाण्यात नीट मिसळत नाही. 3 हे दूध homogenous होत नाही. 4 हे दूध गाईचं नसून म्हशीचं आहे. 5 म्हणूनच त्यात  स्निग्धांश (fat percentage) जास्त आहे. 6 त्याचं पॅकेजिंग वाईट आहे. - - - अशी अनेक. खेदाची गोष्ट अशी की अमूल्याची ओझरती झलकही बघता त्याला नावं ठेवणार्यांमधे भारतातून आलेले भारतीयच जास्त होते.  मी उत्साहाने मॉलमधे गेले. अनुभव अजून दारूण होता. आपल्या अमूल्य मालाची जाहिरात करायला कोणीही अमूलच्या बाजूने तेथे उभा नव्हता. त्या उलट मॉलच्या दरवाजातच टेबलावर Red cow milk ची पिवळी खोकी सुबकपणे मांडून सजवून ठेवली होती. लालचुटुक शॉर्ट स्कर्ट घातलेल्या स्मार्ट तरुणी red cow milk च्या दूधाची असाधारण महत्ता लोकांना समजावून सांगत होत्या. शिवाय एका खोक्यावर एक खोकं फ्री मिळणार होतं. लोकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही पॅकेजिंगलाही कसं महत्त्व देतो हेही त्या खूबीने पटवून देत होत्या. आमचं अमूलचं दूध बेवारसपणे मॉलच्या दुर्लक्षित शेल्फांवर अगदी खालच्या कप्प्यांमधे दयनीय अवस्थेत दिसणारही नाही अशा प्रकारे ठेवलं होतं. खाली बसून घेतल्याशिवाय ते हाती लागणार नव्हतं. खाली बसून घ्यायला लागणार्या मालाला फारच कमी उठाव असतो; हे लक्षात घेऊन सर्व अग्रेसर कंपन्यांनी मॉलमधल्या मोक्याच्या जागी (prime shelves) वर आपला माल ठेवण्यासाठी आग्रह धरलेला होता. अमूल्या रिफिल पॅकमधे होतं. त्याच्यावर छानशा खोक्याची खोळ नव्हती. पहिला नकार मिळायला तेथूनच सुरवात झाली. मी घरी अमूल्या घेऊन आले. त्यांनी सांगितलेल्या कृतीनुसार दूध बनवून पाहिलं; दूध मस्तच होतं. बाकीच्या दूधांपेक्षा कितीतरीपट चविष्ट आणि गोड होतं; फक्त पावडर आधी घालून वरून पाणी ओतायचं होतं. कोमट पाण्यात पावडर लगेचच विरघळत होती. पाण्यात वरतून घातली तर विरघळायला थोडासा वेळ लागत होता. सरळ नाकाच्या मुलीला आधीच नकटी ठरवून मग तिच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न कशी निर्माण केली जातात हे पाहून वाईट वाटत होत. आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त दूध पावडर मी खरेदी करत होते. भेटेल त्याला जीव तोडून अमूल्या चांगलं आहे हे सांगत होते. पण माझ्या एकटीच्या खरेदीने आणि सांगण्याने किती खप वाढणार? शेवटी flop अशी काट मारून ही सर्व दूधपाकिटं एक दिवस मॉलमधून गायब झाली. परत एकदा Red Cow Milk चे भाव चढणीला लागले. एकावर एक फुकट वाटलेल्या पाकिटांचा हिशिबही त्यांनी चुकता करून घेतला. अमूल्या मिल्क पावडर गाईगुरांना खायला घातल्याच्या बातम्याही छापून आल्या. व्यापारी लढाया कशा लढल्या जातात ते जवळून पाहिलं आणि अमूल्याचा व्यापारी अस्त पाहिला.

            मॉरिशसमधे फूड अॅनेलिसिस करणारी अद्ययावत लॅब होती. तेथील मशिनरी युरोपियन युनियनने भेट दिली होती. देशात येणारा प्रत्येक माल हा युरोपिय स्टँडर्डप्रमाणे आहे की नाही हे पाहिले जायचे. साहजिकच अमूल बाजारात येण्यापूर्वीच त्याचे नसलेले दोष बाजारात फिरायला लागले. ह्या ना त्या कारणाने भारतातील गहू आणि  आट्याचाही शिरकाव झाला नाही. गहू ऑस्ट्रेलियाहूनच यायचा. गहू दळायच्या मोठ्या गिरण्या पोर्ट लुईला बंदराजवळच स्थानापन्न झाल्या होत्या. फक्त ब्रेड योग्य आटा मिळे. सर्वजण ब्रेडच खात असल्याने साधारणपणे आटा घेऊन पोळ्या करणार्यांची संख्या नगण्य होती. आपल्याकडची मऊसूत पोळ्यांची सरबती,लोकवाण, नाहीतर सिल्होर गव्हाची कणीक कुठे आणि इथे मिळणारी लॅबचं `येस'चं लेबल लावून आलेली कणीक कुठे?   आपल्या बासमतीला फक्त परवानगी होती. पाकिस्तानी बासमतीची स्पर्धा करत त्याला टिकाव धरावा लागे. बाकी आंबेमोहोर, विष्णुभोग असा तांदूळ नाही. त्यामुळे रोज फक्त बासमतीचाच भात खावा लागे. खरतर आपल्या चांगल्या गोष्टींची सवय इथल्या लोकांना लागली तर परत ते इतर देशांच्या मालाकडे ढूंकून पाहणार नाहीत. मनाची तगमग मनात कोंडतांना त्याचा कधीतरी ज्वालामुखी होईल असं वाटत राहिलं. काही दिवसांनी दुसर्या देशात राहून आलेल्या काही तरूण भारतीय डिप्लोमॅटस् बरोबर जेंव्हा जेंव्हा बोललो तेंव्हा सगळ्यांच्या बोलण्यात भारतीय माल कसा वाईट असतो, परदेशातील माल कसा उत्कृष्ट असतो अशी वचनं ऐकायला मिळायची. ते ज्या देशात राहून आले असतील त्या देशाच्या बेगडीपणाने भाळून त्याच देशाची वकीली सुरू करत. त्यांना आवर्जून ह्या व्यापारी लढाईची गोष्ट मी सांगत असे.

 चिकनगुन्याचा उद्रेक -

                         ह्या सुंदर देशात 2005 मधे एका भयंकर रोगाची साथ तेथे सुरू झाली. ताप, प्रचंड सांधेदुखी अशी रोगाची लक्षण असलेला तो रोग होता चिकनगुन्या. हे नाव चार चार वेळेला म्हटल्यानंतरच तोंडात बसेल असं वाटत होतं. आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनीही हा रोग भारतात नाही. आफ्रिकेत असतो असं ऐकिवात आहे म्हणून  सांगितलं. किंबहुना हा रोग भारतीयांना काय मॉरिशसमधील डॉक्टरांनाही तो पर्यंत माहित नव्हता. हा रोगही मलेरियाप्रमाणे डासांमुळेच होणारा रोग आहे. व्हिक्टोरिया जनरल हॉस्पिटलचे डीन  दर आठवड्याला एका नवीन मेडिकल टॉपिकवर चर्चा घेत असत. त्यावेळेला CME (continuous Medical education) तर्फे त्यांनी चिकनगुन्यावर चर्चा ठेवली होती कारण तेथील डॉक्टरही ह्या बाबत अनभिज्ञ होते. प्रायव्हेट डॉक्टर मॉरिशसमधे फारच कमी होते. आणि जे होते ते फार सक्षम नव्हते. त्यामुळे बहुतेक सर्वांना सरकारी व्यवस्थेवरच अवलंबून रहावे लागे. मॉरिशस हा देश सपूर्णपणे टुरिझमच्या पायावरच उभा असल्याने ह्या साथीची वाच्यता कुठेच केली जात नव्हती. वर्तमानपत्रातून बातमी आली तर ती सुद्धा एखादि दुसरी पण तिला फार महत्त्व नसे. मला काही महत्त्वाच्या कामासाठी महिनाभर भारतात येणं भाग होतं. मी परत य़ायला 2-4 दिवस असतांनाच प्रवीणचा फोन आला, ``पाय खूप दुखतोय, जरासा तापही वाटतोय''. ``कसंही कर पण हॉस्पटल गाठ'' मी त्याला सांगितलं. घरी आम्ही दोघंच असल्याने काम करायला आम्ही कोणाला ठेवलं नव्हतं. प्रवीणला स्वयंपाक करून, बाकी सर्व आवरून एकट्यालाच हॉस्पिटला पोचायला लागलं. हॉस्पिटलमधे रक्ताचा नमुना घेतला गेला आणि गोळ्याही दिल्या गेल्या रक्ताचा रिपोर्ट घ्यायला मात्र 15 दिवसांनी बोलावण्यात आलं. नेहमी मलेरियाचा रिपोर्ट काही तासात कळविणार्या आरोग्य विभागाने चिकनगुन्या बरा झाल्यावरच तो चिकनगुन्या होता हे सांगायची दक्षता घेतली होती. सुदैवाने रोजचा नियमित आणि भरपूर व्यायाम ह्या एकाच गोष्टीने प्रवीण तरून गेला. बाकी अनेकांचा ह्या रोगाने चांगलाच पिच्छा पुरविला. सहा महिने, वर्षभर सांधेदुखीने हे रुग्ण अक्षरशः जायबंदी झाले होते.

                    थोड्याच दिवसात भारतातून चिकनगुन्याच्या बातम्या आमच्या कानावर येऊ लागल्या. आपल्याकडे बाकी देशातून  येणार्यांचे रक्त तपासण्याने आपण केवढी मोठी संकटं ओढवून घेतो. किमान दुसर्या देशातील भारताच्या दूतावासाने त्या देशात असलेल्या साथीच्या रोगांवर बारीक नजर ठेऊन वारंवार भारतात कळवायला पाहिजे आणि भारतानेही त्या त्या देशात जाणार्या आपल्या नागरीकांना सावधतेचा इशारा द्यायला हवा. तेथून येणार्यांना तर सक्त क्वारंटाईनमध्ये ठेवायला हवे.  Yelllow Fever साठी ही काळजी घेतली जाते.  अमेरिका, युरोप सारख्या देशांमधे बाहेरच्या देशातून साथीचे रोग येऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतली जाते! भारताच्या पैशांचा आणि आरोग्याचा विनाश करणार्या ह्या साथींची सुरवात ही भारताबाहेरूनच होते.

----------------------------------------------------------------------------------------------------

19 भारतीय मान्यवरांच्या भेटी -

राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भेट

          ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशा शब्दातच आपल्या राष्ट्रपतींच्या भेटीविषयी बोलता येईल. दुसर्या देशाला भेट देतांना ह्या VVIP ना आपल्याबरोबर अजून एका व्यक्तीला घेऊन जाता येत असे. आम्ही मॉरिशसला असतांना पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनीही मॉरिशसला भेट दिली होती. येतांना त्यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा परिवार घेऊन ते आले होते. राष्ट्रपती अब्दुल कलाम मात्र त्यांच्यासोबत एका निष्णात अशा प्राध्यापकांना घेऊन आले होते. राष्ट्रपतींनी 10-11 वी च्या अनेक विद्यार्थ्यांना, एका शाळेला, विद्यापीठाला भेट दिली. सर्व विभाग प्रमुख प्राध्यापकांसोबत त्यांची जी बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. त्यावेळेस सर्वांना त्यांनी पहिलाच प्रश्न केला, तुमच्यापैकी कितीजण स्वतंत्र संशोधन करता? अब्दुल कलाम पुढे म्हणाले, पुस्तकात उपलब्ध असलेली माहिती विद्यार्थ्यांना सांगणे म्हणजे शिकवणे नव्हे. तुम्ही स्वतः संशोधन करा. ते संशोधन मुलांसमोर मांडा. तेच खरे शिकवणे आहे. नॉनो टेक्नॉलॉजीची सविस्तर माहिती देउन त्यांनी सर्व प्राध्यापकांना जागृत केले की येणार्या काळात जगावर नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्त्व राहणार आहे. प्राध्यापकांसोबतही त्यांनी चर्चा करून अनेक विषय हाताळले. प्राध्यापकांना सतत नवीन संशोधन करण्यास उद्युक्त केले.

           विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. त्यावेळी पूर्वीचा समाज, औद्यौगिक क्रांतीने त्यात घडवलेला बदल आणि आता ज्ञानाधिष्ठित समाज आणि त्यात घडलेले बदल त्यांनी अधोरेखित केले. पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक शेतात काम करत असत. त्यांना औद्योगिक क्रांतीतील विविध यंत्रे आणि त्यांचे भाग कसे काम करतात हे समजाऊन सांगण्यासाठी एक प्रशिक्षक एका घोळक्याला माहिती देत असे त्यांच्याकडून यंत्रातील एक एक काम करवून घेत असे. परंतु ज्ञानाधिष्ठीत समाजात इंटरनेट अन्य माध्यमातून सर्व माहिती सर्वांना उपलब्ध असते. फक्त माहिती कुठे उपलब्ध आहे हे माहित असले म्हणजे झाले. `राजीव गांधी सायन्स म्युझियम' ह्या भारताने बांधून दिलेल्या वास्तूत अब्दुल कलाम यांनी शाळकरी मुलांसोबत संवाद साधला. हा संपूर्ण संवाद प्रश्नोत्तरे ह्या स्वरूपात होता. ``पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?'' ``सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचायला किती वेळ लागतो?'' असे अनेक प्रश्न अत्यंत उत्साहाने मुलांना विचारून अब्दुल कलाम त्यांची उत्सुकता वाढवत होते. पटापट उत्तरे सांगून मुलांचा आनंद ज्ञान द्विगुणीत करत होते. ``तुम्ही सारे संशोधक होणार ना?'' असा प्रश्न विचारून त्यांनी सर्व मुलांना उभे केले आणि त्यांच्याकडून मोठ्यांदा शपथ म्हणून घेतली. स्वतः ती शपथ उत्साहाने म्हटली. `एनर्जी सिक्युरिटी' हा त्यांचा लाडका विषय होता . एरंडेलाच्या बीयांपासून काढलेल्या तेलाने गरीब देशातील तेलाच्या समस्येवर कशी प्रभावी मात करता येईल हे ते त्यांना भरभरून सांगत होते. आफ्रिकेतील सर्व देशांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे त्यांना उत्तम औषधोपचार मिळावे म्हणून भारतीय विद्यापीठे आणि इस्पितळे आफ्रिकेशी सॅटेलाईटच्या माध्यमातून जोडून नवीन पर्व सुरू करावे असे त्यांचे लाडके स्वप्न होते.

राजीव गांधी विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गप्पांमधे संस्कृतीचं जतन आणि विज्ञान या गोष्टींची सांगड कशी घालावी या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी नाहीत का? दिवसेंदिवस संस्कृतीचा जो ह्रास चालू आहे त्याबद्दल आपलं मत काय असं विद्यार्थ्यांनी विचारल्यावर श्री कलाम म्हणाले, `` विज्ञान आणि आपला सांस्कृतीक वारसा बरोबर घेऊन होणार्या आर्थिक सुधारणांमुळेच एक चांगली पिढी उदयाला येते. MBC मधे त्यांच्या मुलाखतीत ते म्हणाले,-

When there is righteousness in the heart

There is beauty in the character

When there  is beauty in the character

There is harmony in the home.

When there is harmony in the home

There is order in the nation

When there is order in nation

There is peace in the world.

          अनेक जणांना आपापली प्रेझेंटेशन्स डॉ. अब्दुल कलाम यांना दाखवायची होती. त्या सगळ्यांची प्रेझेंटेशन्स ते अत्यंत उत्साहाने रोज रात्री दीड वाजेपर्यंत पहात होते. त्यांना मोलाच्या अनेक सूचना करत होते.  इतकं करूनही सकाळी लवकर नेहमीप्रमाणे त्यांचा दिवस चालू होत होता.

           त्यांची आणि तेव्हाचे मॉरिशसे राष्ट्रपती श्री.अनिरुद्ध जगन्नाथ याची अर्धा तासाची चर्चा ठरली होती. ती नंतर एक तास लांबली. तेंव्हाचे भारतीय दूतावासातील उपप्रमुख श्री राजीव शहारे त्यावेळी उपस्थित होते. नंतर ते सांगत होते की श्री. अब्दुल कलामांनी इतक्या विविध विषयांवर चर्चा केली की त्यांची नोंद घेता घेता त्यांचीच दमछाक झाली.

             अब्दुल कलाम यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रवीणची होती. त्यामुळे त्यांच्या तीन दिवसाच्या वास्तव्यात प्रवीणला सतत त्यांचा सहवास लाभला. प्रवीणही त्यांच्या बरोबर असतांना त्यांनी `मॉरिशसचा नकाशा आणि माहिती पुस्तक मिळेल का'? म्हणून विचारणा केली. त्यावेळेसच काही कामासाठी मी भारतात आल्याने शाळेच्या  मुलांसाठी असलेलं नकाशाचं पुस्तक प्रवीणने खूप शोधूनही त्याला मिळालं नाही.  आपण ते पुस्तक श्री अब्दुल कलाम यांना देऊ शकलो नाही ह्याची मला राहून राहून खंत वाटत राहिली.

         अत्युच्च पदी विराजमान झालेले हे राष्ट्रपती इतके साधे होते की ज्या हॉटेलमधे ते उतरले होते तेथील काही कामगारांनी त्यांना `आमच्याबरोबर फोटो काढाल का?' विचारल्यावर सहजपणे त्यांच्यासोबत फोटोला उभे राहून त्यांनी फोटोही काढू दिला. संकोचून पहात असलेल्या आजूबाजूच्या कर्मचारी वर्गालाही आवर्जून बोलावून त्यांच्याबरोबरही फोटो काढले.

           त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पसरणार्या उत्साहाच्या लाटा मॉरिशसभर उत्साहाचं वातावरण पसरवून गेल्या. नंतरही कित्येक दिवस मॉरिशसवासी कलाममय झाले होते. नंतर कित्येक दिवस सर्व वृत्तपत्रे त्यांच्याविषयी लिहीतांना थकत नव्हती.

कलाम त्याच्या ह्या छोट्याशा भेटीतही तेथील कोळी बांधवांना भेटायचे विसरले नाही. त्यावेळेस डॉ. कलाम म्हणाले, `` तुम्ही कुठेही रहा; पण अत्युत्तम काम करून; भारताचा डंका सर्वत्र वाजत राहील ; याची खात्री करा.’’  मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या लोकांसाठी त्यांनी एक जेवण ही ठेवलं होतं. श्री कलाम यांना भेटायला मिळेल, त्यांच्याशी हस्तांदोलन तरी करता येईल, त्यांच्या सोबत फोटो काढता येईल म्हणून लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

 

 भारताच्या पंतप्रधानांची मॉरिशस भेट -

              आम्ही जाऊन दोन महिने होत आले होते. नवीन देशात आम्ही बर्यापैकी रुळलोही. आमचा मुलगा कणाद नोकरी आणि GRE ची तयारी करत भारतातच राहत होता. आम्ही जरा स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला एकमेकांना भेटायची ओढही लागली होती आणि मॉरिशस म्हटल्यावर त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत येणार होते. त्यांनी फेब्रुवारीची तिकिटंही काढून ठेवली होती. आणि त्याचवेळेस तेंव्हाचे भारताचे माननीय पंतप्रधान मनमोहनसिंग यांची मॉरिशस भेट ठरली. दोघांच्या तारखाही जुळत होत्या. कणाद आला की दुसर्याच दिवशी पंतप्रधान येणार होते. प्रवीण PM च्या सुरक्षेचे मुख्य असल्याने त्याला सतत पंतप्रधानांसोबत रहायचं होतं. येथे बाहेरदेशीच्या प्रमुखांची व्यवस्था राजभवनात होता हॉटेल्समधेच केली जाते. येथे त्यांच्यासाठी खास असे शासकीय सर्किटहाऊस ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्चही वाचतो. भारताच्या पंतप्रधानाची भेट मॉरिशसच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. भारताकडून अनेक सुविधा ह्या छोट्या देशाला मिळत. भारताने इंदिरा गांधी कल्चरल सेंटर, राजीव गांधी सायन्स सेंटर, विवेकानंद कन्हेंन्शन  हॉल अशा अनेक उत्तमोत्तम संस्था मॉरिशसला बांधूनही दिल्या आहेत. मॉरिशस मात्र या सर्व सुविधा मिळुनही नाखूशच दिसत असे. त्याचा ओढा चीन, फ्रांस, इंग्लंड या देशांकडेच जास्त दिसे. याच्याशीच सलोखा साधायचा त्यांचा प्रयत्न आहे असे वाटे. अर्थात हे त्या त्या वेळच्या शासनप्रमुखावर अवलंबून असे. हे सर्व असले तरी भारतातील उपचार हा अत्यंत योग्य आणि वाजवी दरात होतो हे लक्षात घेऊन मॉरिशसच्या नागरीकांना आजारी पडल्यास भारतात उपचारांसाठी येता येत असे. रुग्णाबरोबर एक डॉक्टर आणि त्याच्या सोबत एक नातेवाईक यांचा खर्च मॉरिशस सरकार देते.  मॉरिशसच्या विद्यार्थ्यांसाठी भारतात अनेक स्कॉलरशिप्सही ठेवलेल्या आहेत.

                 कणादला जेमतेम एअरपोर्टहून आम्ही घेऊन आलो आणि प्रवीणने गाडी आमच्या ताब्यात देऊन टाकली. प्रवीणला पंतप्रधानांच्या सोबत राहणं आवश्यक होतं. कणादला येतांना भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स आणायला सांगितलं होतं. हवं तिथे फिरा पण सांभाळुन असं आधीच सांगून ठेवलं होतं. प्रवीण त्याचा बाड बिस्तरा घेऊन निघून गेला. पुढचे दोन चार दिवस T.V.वर आम्ही पंतप्रधानांच्याच बातम्या बघत होतो.

                         कार घेऊन आम्हाला बाहेर जाता येणार होतं. कणाद  आणि त्याचे मित्र  सहा फूटाच्यावर ऊंच होते. शिवाय एकजण सरदारजी असल्याने पगडी घालून तो साडेसहा फुटीच होता. कुठेही फिरायला गेलं की सगळ्यांच्या नजरा पगडीवाल्या दोस्तामुळे आमच्यावरच खिळत. बाजारात कुठे फिरायला गेलं की सगळे धावत एकमेकांना सांगत, मनमोहनसिंगजींचे नातेवाईक बाजारात आले आहेत. सगळे आम्हाला पहायला गोळा होत. सगळ्या गोष्टींचे भाव आमच्यासाठी दुप्पट होत. शेवटी तिघजणं ह्या स्वागताला कंटाळून एका कट्ट्यावर बसायला जात असतांना एक मुलींचा घोळका येत होता. ह्या तिघांना पाहून त्या आश्चर्याने एकदम वीऽऽऽऽ!!!  (वी म्हणजे हो किंवा अश्चर्याने ओह! सुद्धा.)करून ओरडल्याच. ``फोटो काढायचा आहे का तुम्हाला आमच्याबरोबर?’’ सरदारजीने हताशपणे विचारले परत  मोठ्ठा वीऽऽऽऽऽऽऽऽ! आला. शेवटी माझ्यासारख्या कलियुगातल्या आईला आपल्या मुलांचे असे परदेशी मुलींबरोबर फोटो काढायची वेळ आली. कारण सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असल्याने फोटोग्राफर म्हणून एकटी मीच उरत होते.

              शेवटी तिघांनीही जंगलात ट्रेकिंगला जायचं ठरवलं. येथील हिरवीगार जंगलं, ठिकठिकाणी सर्व सोयी सुविधा असल्याने आणि जंगली पशू नसल्याने काळजीचं काही कारण नाही. असा विचार मीही बोलून दाखवला. ते आल्यावर   ``कसा होता ट्रेक''? असं आम्ही  कौतुकानी विचारल तर अनपेक्षितपणे त्यांनी सांगितलं, जंगलं चांगलं आहे पण त्यात कुठेच वाघ, कोल्हा काही नाहीत. अरे जपून! पुढे साप आहे! असं म्हणायलासुद्धा जंगली प्राणी नाहीत. त्यामुळे  कुठे उत्सुकताच राहिली नाही. किमान इथे जंगली प्राणी नाहीत हे तुम्ही पहिल्यांदा सांगितलं नसतं तर बरं झालं असतं.

------------------------------------------

  I.N.S.शारदा आणि  I.N.S. दिल्ली

मॉरिशसला ज्या मान्यवरांनी भेटी दिल्या त्यात महत्त्वाच्या व्यक्तीही होत्या आणि भारतातून आलेली जहाजेही होती. आम्ही मॉरिशसला असतांना  I.N.S. शारदा आणि I.N.S. दिल्ली ह्या दोन भारतीय जहाजांनी मॉरिशसला भेटी दिल्या. दोन्ही वेळेला ह्या जहाजाच्या कॅप्टननी आयोजित केलेल्या जहाजभेटीच्या कार्यक्रमाला प्रवीण दीक्षितांना आणि त्यांच्यासोबत मलाही निमंत्रण असे. दोन्ही जहाजांना दिलेल्या भेटी माझ्यासाठी अप्रूपच होत्या.

  I.N.S.शारदा(22एप्रिल 2005) -

मॉरिशस आणि भारताचे संबंध छान मैत्रिचे आहेत. हे सलोख्याचे संबध दृढ करण्यासाठी आपल्या ह्या छोट्या मित्राला भारत सरकार उदारपणे सहाय्य करते.  भारतातून अनेक वर्षांपूर्वी आपले सख्खे बांधव, भारतीय रक्ताचे लोक मॉरिशस ला गेले हे लक्षात ठेऊन भारत सरकारने आपल्या ह्या भारतीय वंशाच्या लोकांना ʻGuardianʼ नावाचे व्यापारी जहाज भेट म्हणून दिले आहे. जशी गाडीला serviceing ची जरुरी असते, तशी जहाजालाही असते. गार्डियनलाही सर्व्हिसिंगसाठी भारतात न्यायला I.N.S.  शारदा ही नौका भारताहून मॉरिशसला आली . शारदाच्या सर्व स्टाफनी शारदा भेटीचं खास आमंत्रण श्री. दीक्षितांना पाठवलं. सर्व मॉरशन्स साठी ही ही एक पर्वणीच होती. शारदाचं येणं ही एक तिथे फारच उल्लेखनीय घटना होती. अशा प्रसंगातून भारताबद्दल बोलले गेलेले चार गोड शब्द ऐकून, जगात भारताकडेही आशेनी पहाणारे कोणी आहे हे पाहून, मनाला सुखावल्या सारख झालं. ब्रेकिंग न्यूज म्हणून टि. व्ही. वर चार  चार वेळा  शारदाचे कॅप्टन दत्ता मॉरिशन ऑफिशियल्सना, मंत्र्यांना हस्तांदोलन करतांना दाखवत होते. आपल्याकडे अमेरिकन फॉरिन मिनिस्टर अथवा इंग्लंडचा राजपुत्र यावा तशी शारदाला विविध चॅनेल्सवर मिळणारी प्रसिद्धी नक्कीच आनंददायी होती. 

आम्ही I.N.S. शारदा आणि गार्डियन ला भेट देण्यासाठी पोर्ट लुई ला निघालो. गाड्यांच्या गर्दिमुळे दिवसा हा भाग फारच गजबजलेला असतो. संध्याकाळचे पावणेसात वाजले होते. आजचा अनुभव ही वेगळाच होता. दिव्यांच्या चमचमाटात रस्तारेड कार्पेटसारखाआमच्यासमोर उलगडून ठेवला होता. चंद्रप्रकाशात डोंगरही स्वप्नवत् भासत होते. पोर्टलुईपर्यंत पोचायला इतरवेळी एक-दिडतास घेणारी गाडी चवदाव्या मिनिटाला पोर्टलुईत हजर होती.थोडं अजुन पुढे जायचं होतं - – डावीकडे पाटी होती, Docks! आज ह्या वेळी जहाज फक्त अति विशिष्ट आणि वरिष्ठ लोकांसाठीच खुलं होतं त्यामुळे वळणावळणावर दिशादर्शक दिवे किंवा खास टॉर्चेस घेऊन पोलिस ऊभे होते.गाडी पार्क केली.समोर अजस्र आकाराचं जहाज उभं होतं जहाजावरच एक प्रचंड मोठी क्रेन होती. खणखणीत तटबंदिचा जणु एक किल्लाच समोर उभा होता. त्याच्या शेजारीच दुसरं जहाज उभं होतं. त्याच्यावरची I.N.S. शारदा ही सुस्पष्ट अक्षरं नजरेत भरत होती. शारदाच्या डेकवर छानसा शामियाना घातला होता. शामियान्याच्या छताचे दिवे वाऱयावर हेलकावत होते. डेकवर जाण्यासाठी जहाजावरून धक्क्यावर लाकडाची रुंद फळी किंवा रॅम म्हणुया लावली होती. ह्या लाकडाच्या घसरगुंडीला पाय घसरू नये म्हणून थोड्या थोड्या अंतरावर  आडव्या लाकडी पट्या म्बलर्स सारख्या लावल्या होत्या. ह्या जिन्याच्या सुरवातीलाच जेटीवर  पांढऱया स्वच्छ uniform मधे दोन स्मार्ट तरुण खलाशी S.L.R. (7.62 Rifle) घेऊन स्वागतासाठी ऊभे होते. त्यांनी कडक सॅल्यूट मारला. आणि हासर्या चेहर्यानी स्वागत केलं. विशीतील त्या कोवळ्या तरुण चेहऱयांबद्दल आम्हालाही  उत्सुकता होती. डेकवरही लगबग जाणवत होती. कोणाला भेटाव? हा  प्रश्न एका छोट्या तडफदार तरुणानी सोडवला. आमचं स्वागत करत आम्हाला आत  घेऊन जातांनाही त्याच्या चेहऱयावरचा आत्मविश्वास डोळ्यातून ही चमकत होता. आंध्राच्या चित्तुरचा हा छोटा खलाशी शारदाबरोबर मॉरिशसच्या मदतीसाठी आला होता. background  ला आकाशात वीजा तळपत आणि पळत होत्या. ’मॉरिशस च्या मदतीसाठी भारताचा मदतीचा हात कायमच पुढे आहे’’. छोटा खलाशी अत्मविश्वासानी सांगत होता. ``आम्ही गार्डियनला टो करून मुंबईला घेऊन जाणार आहोत. तिला तिथे सोडून  आम्ही कोचिनला जाऊ. गाडीला जशी सर्व्हिसिंगची गरज असते तशी जहाजाला सुद्धा असते. जहाजाच्या सरव्हिसिंगला refitting म्हणतात. जहाज किती वर्ष वापरलं आहे ह्यावर त्याला refitting ला किती वेळ लागणार हे अवलंबून असतं.’’ “ पण गार्डियनला बांधून ओढत कसे नेणार''? गार्डियन तर केवढं प्रचंड आहे तो हसला. ``मॅम गार्डियन  आणि शारदाच्या बनावटीत फरक आहे. गार्डियनची बांधणी व्यापारउदिमासाठी योग्य अशी आहे तर शारदा ही लढाऊ बांधणीची आहे. मॅम, आम्ही जहाजाचा उल्लेख  she असा म्हणजे, स्त्रीलिंगी करतो. म्हणून त्यांची नावही स्त्रीलिंगीच असतात.'' शारदावर 15 ऑफिसर्स आणि प्रत्येक ऑफिसर बरोबर 10 ते 12 खलाशी असा दिडएकशे लोकांचा स्टाफ होता. प्रत्येकाबरोबर थोडं थोडं बोलतांना नवीन नवीन माहिती कळत होती.26 डिसेंबर2004 च्या त्सुनामीच्यावेळी इंडोनेशिया पासून श्रीलंकेपर्यंत भारतीय नौदलाची 45 जहाजं त्सुनामी पीडीत देशांना मदत करत होती. ’मी तेंव्हा श्रीलंकेत मदतकार्य करीत होतो“. अजुन एक चमकदार डोळ्याचा तरुण उत्तरला. वादळात जहाजाला खूप धोका असेल ना? तो म्हणाला ,- ``बंदरावर असतांना जहाजाला वादळापासून जास्तीत जास्त धोका असतो. त्याला बांधून ठेवलेल्या दोऱया तुटणं, किंवा त्या वेड्यावाकड्या होणं असं काहीही होऊ शकतं. नांगरून ठेवलेल्या जहाजाचे इंजिन बंद असल्याने त्या जहाजावर कसलाही ताबा रहात नाही. अशावेळी हे जहाज पाण्याबरोबर भरकटत कुठेही जाऊ शकतं. तर कधी कधी उथळ वाळुकिनाऱयावर चढून बसतं. त्यामुळे वादळाची सुचना मिळताच जहाज प्रथम खोल समुद्रात नेणं फार आवश्यक असतं. तरच ते सुरक्षित रहायला मदत होते. जहाजावरच्या लोकांसाठी जरी वादळातील समुद्र फारसा चांगला अनुभव नसला तरी जहाजासाठीमात्र तो  बर्यापैकी सुरक्षित असतो. वादळात सापडता वादळाच्या बाजूने जहाज घेऊन जायला लागतं. तू मॉरिशस पाहिलस का? विचारल्यावर आमच्या त्या छोट्या मित्रानी त्याच्या गळ्यातील साखळी आणि त्याला लावलेल्या किल्या दाखविल्या. ज्याच्या जवळ ह्या किल्ल्या आहेत त्याला हे जहाज सोडता येत नाही.तो अतिशय जबाबदारीने सांगत होता. प्रत्येक जहाजावर असे दोन सर्व्हिस ऑफिसर असतात. जहाजावरच्या प्रत्येक गोष्टीला त्यांना जबाबदार धरलं जातं.जहाजाला आग लागली, जहाजावरच्या लोकांमधे भांडण झाली तरी सगळी जबाबदारी त्यांची असते.

-----------------------------------------------------

 

 

20 रॉड्रिग्ज द्वीप समुह I’lle Rodrigues  

 

सुदैवी रॉड्रिग्ज -

               `Rodrigues, the tiny piece of land must have indeed been exceptionally  loved and favoured by God Almighty who chose to cast it in the ocean far away from Chagos archipelago, thus sparing it the abominable fate of islands like Diego Garcia, Peros Banhos and others.'

          सुदैवी रॉड्रिग्ज - मी मॉरिशसचा `News on Sunday'  वाचत होते. फ्रेंचचा पगडा असलेल्या ह्या बेटावर आठवड्यातून एकदाच मिळणार्‍या इंग्रजी वृत्तपत्राचं प्रत्येक पान वाचून झाल्याशिवाय मी ते सहजासहजी रद्दीत टाकत नसे. रॉड्रिग्ज हा मॉरिशसचा अविभाज्य भाग असला तरी या सुदूर बेटाबद्दल मॉरिशसच्या कुठल्याच बातम्यांमधे प्राधान्य नसे. ह्या छोट्याशा बेटावर देवाने सौंदर्याची लयलूट करतांना त्याला छागोस ह्या द्वीपसमूहापासून दूर ठेऊन अशी कुठली कृपा केली असावी हे कुतुहल मनात डोकावून गेलं. माझ्या कुतुहलाचं थोडक्यात उत्तर असं होतं -

                मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी 1965 साली ब्रिटन आणि अमेरिकेमधे एक गुप्त करार झाला. आणि इंडियन ओशनमधे मालदीव्सच्या दक्षिणेला असलेल्या ब्रिटिशांच्या ताब्यातील British Indian Ocean Territory (BIOT) मधील छागोस आर्चिपिलॅगो ह्या साधारण 30 बेटांच्या द्वीपसमूहातील दिअ‍ॅगो गार्शिया या बेटाची अमेरिकेचे सैनिकी तळ उभारायला निवड केली गेली. आणि त्याचबरोबर नारळाची शेती करणार्‍या छागोस द्वीपसमुहातील आणि खास करून दिअ‍ॅगो गार्शियामधील अंदाजे दोन हजार भूमिपुत्रांची गाठोडी आवळली गेली. `स्थलांतरीत कामगार' ह्या नावाखाली त्यांना जहाजात घालण्यात आलं आणि मॉरिशसमधे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सोडून देण्यात आले. मॅरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटिशांनी हे हलवायाच्या घरावर ठेवलेले तुळशीपत्र. पेरॉस बेन्हॉस आणि सॉलोमन ( Peros Banhos and Salomon) हे दोन द्वीपसमूह आता काही प्रमाणात प्रवासी बोटींना (cruise) खुले करण्यात आले आहेत. सहाजिकच निसर्गाचं वरदान लाभलेलं रॉड्रिग्ज हे छागोस द्वीपसमूहापासून दूर ठेवल्याबद्दल मॉरिशियन लेखक `भीष्मराजने' मानलेले देवाचे आभार माझ्या मनात रॉड्रिग्जबद्दल एक कुतुहल जागं करून गेले. मॉरिशसमधे राहणारे भारतीय किंवा बाकी मॉरिशियन्स या बेटाचं नाव निघाल्यावर ``ह्या छोट्याशा बेटावर जाण्यासारखं काय असणार आहे? परत परत समुद्र काय पहायचा आहे? मला तर घुसमटायलाच होईल.’’ अशा निरुत्साही प्रतिक्रिया देत असले तरी ह्या लेखकानी माझ्या मनात नक्कीच एक उत्सुकता निर्माण केली. प्रवीण कामासाठी रॉड्रिग्जला जाऊन आला असला तरी बेट पहायची संधी त्याला मिळली नव्हती. आज मात्र मी  प्रवीणबरोबर रॉड्रिग्जला जाणार होते. बॉलिवुडमुळे मॉरिशस हे भारतीयांना सुपरिचित आहे. हनिमून कपल्ससाठी हॉट डेस्टिनेशन आहे. रॉड्रिग्जचं सौंदर्य मात्र आपल्यापैकी फारच थोड्याजणांनी अनुभवले असेल.

मॉरिशस ते रॉड्रिग्ज प्रवास -

 मॉरिशसच्या North-East ला  653 कि.मि. वर 104 कि. मि. 2 चे हे  बेट! रॉड्रिग्ज हाही मॉरिशसप्रमाणेच एक बेट बेटुल्यांचा ताफाच. मुख्य बेटाभोवती ही बेटं विखुरलेली आहेत. पाण्यातून जाणार्‍या बदका मागची जणु छोटी छोटी पिल्लचं! समुद्रानी आपल्या तळहातावर कुतुहलानी त्यांना उचलून घेतलं आहे.

विमानातून बघतांना समुद्रात पोहणारी ही छोटी छोटी बेटं, मेणबत्ती पेटवून वितळलेल्या मेणाचे थेंब पाण्यात टाकताच मेणाच्या छोट्या छोट्या टिकल्या पाण्यात तरंगत रहाव्यात तशी दिसतात. मेणबत्ती पेटवून काडेपेटीची काडीही टाकून द्यावी आणि तीही पाण्यावर मस्त तरंगत रहावी तशी Ile Aux Sables  आणि Ile Cocos ही लंबुळकी बेटं  आणि त्यानंतर रॉड्रिग्ज! Bay Topaz --खरोखरच अगदि नावाप्रमाणे नितळ, नीलार्द्र--!!!

Plaine Corail Air Port आणि रॉड्रिग्जचे प्रथम दर्शन-

 

            विमानानी Plaine Corail Air Port वर पाय टेकविले. छोटंसं टुमदार Air Port!  Air Port Buildingचा आकारही जरासा होडीसारखा. अमेरिकेच्या शिकागो, न्यूयॉर्क या अति अति भव्य, विशाल, huge huge विमानतळानंतर हा पिटुकला सुंदर विमानतळ अगदि घरगुती वाटत होता. मोरपंखी समुद्रावरून अजुन गडद चमकदार मोरपंखी समुद्रावर, निळ्याशार आकाशाकडून अजुन गडद निळ्या आकाशाकडे, एका tiny tot बेटावरून अजुन एका tiny dot बेटाकडे जाणारा प्रवास म्हणजे मॉरिशस ते रॉड्रिग्ज प्रवास. आम्ही दिल्लीला असतांना अनेक मोरांचा ताफा आमच्या घरासमोरून डौलात जायचा. त्यांचे मोरपंखी पिसारे ऐटित तोलत जाणारे ते मोर काही दिवसांनी आमच्या चांगलेच परिचयाचे झाले. सर्वांचे रंग मोरपंखी असले तरी त्यातील तरुण मोर हे जास्तच कमनीय आणि तजेलदार दिसत. त्यांच्या पिसांचा मोरपंखी रंग ज्यास्त गडद, उठावदार आणि चमकदार असे. रॉड्रिग्ज आणि मॉरिशसच्या सौदर्यात हाच फरक होता. आकाशाच्या निळाईच्या अजुन अजुन गडद होत जाणार्‍या छटा, हवेतील धूलीकणांचा पूर्ण अभाव, काचेसाखा पारदर्शी मोरपंखी चमकदार समुद्र, जणु विधात्याने आत्ताच समोरचं चित्र ओल्या फडक्याने पुसुन ठेवलं होतं. बेट नुकतच सुस्नात झाल्यासारखं दिसत होतं. बेटावर एक वेगळाच ताजे तवानेपणा सतत भरून राहिला होता. येथे आम्ही सरकारी पाहुणे असल्याने  आम्हाला  घ्यायला गाडी आली होती. हासर्‍या चेहर्‍याच्या तुकतुकीत सागवानी रंगाच्या ड्रायव्हरने आमचे स्वागत केले.

                    गाडीत रेडिओ चालू होता. आम्ही गप्पा मारत असतांनाच ड्रायव्हरने रेडिओवर चालू असलेल्या बातम्यांकडे आमचं लक्ष वेधले. इंडियाहून आपल्या मदतीसाठी मॉरिशसला आलेले भारतीय डेलिगेशन रॉड्रिग्जला पोचल्याचे ठळक बातम्यांमधे सुरवातीलाच सविस्तर सांगत होते. मला त्यात भारत किंवा इंडिया हा शब्द कुठेच ऐकू येत नव्हता. बर्‍याच वेळाने माझ्या लक्षात आलं फ्रेंचमधे ड चा उच्चार ज असल्याने इंडिया ऐवजी ते भारताला इंज्या इंज्या असं संबोधत होते.

पो. मांचुरिआ (Port.Mathurin) -

          बेटाच्या पश्चिम-दक्षिणेकडून दुसर्‍या टोकाला उत्तरपूर्वेकडे असलेल्या राजधानीच्या ठिकाणी पो. मांचुरिआला (Port.Mathurin) पोचायचं हेतं. 20-25 मिनिटं पुरली. गाडी मात्र 4बाय 4 पाहिजे हं! बाकी गाड्या इथे टिकावच धरु शकणार नाहीत. बेटाच्या मधोमध असलेल्या पर्वतराजीला ओलांडून जातांना खंडाळ्याच्या जुन्या घाटाची आठवण होत होती. मोजक्याच गाड्या होत्या. रस्ता डांबरी गुळगुळीत होता. पण चढ श्वासांना थोडतरी रोधून धरायला लावत होता. आपलेच श्वास ऐकू येत होते. श्वासाला लय असते तसा आवाजही असतो हे सांगणारी शांतता होती. शांततेकडुन अजून नीरव शांततेकडे आम्ही पोचलो होतो.

                      मधे मधे लागणार्‍या छोट्या वस्त्या म्हणजे इथली गावं! (villages) सगळी मिळून वस्ती अवघी 37,000. जातांना केळीच्या बागा आणि त्यांचे लोंबणारे घड नजरेत भरत होते. संध्याकाळ झाली होती.

Tamarin!! हॉटेल चिंच!

         हॉटेलवर सामान टाकलं आणि  फिरायला बाहेर पडलो. उताराकडे चालत राहिलं की समुद्र येणार त्या हिशोबानी चालत होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटेखानी दुकानांवरून नजर टाकत पुढे निघालो. बघता बघता समुद्र किनारा कधी आला ते कळलच नाही. चालत थोडसं पुढे गेलो. एक जेटी दिसत होती. मुशीतून सोन्याचा रस ओíतावा तसा आकाशात आणि समुद्रावर सूर्य सांडला होता. त्याच्या सोनेरी झगमगाटाकडे बघायची डोळ्यांना हिम्मत होत नव्हती. येथे मॉरिशसची नुसती स्वच्छताच परत एकदा घासून पुसून घेतली घेतली नव्हती तर त्याबरोबरच सूर्यालाही बर्हिगोल भिंगातून पावन करून घेतलं असावं. अगस्तिऋषिंनी हजारो वर्षांपूर्वी आदित्यहृदय स्तोत्रात केलेलं सूर्याचं वर्णन साक्षात समोर पसरलं होतं.

मूशीत घालिता सोने  तेजस्वी दिसते जसे

सुवर्णवर्ण तैसाची। कांति ह्याची दिसे दिसे।।

 

प्रचंड आतपी देई   ताप ह्या जगताप्रती

घाम-घाम जना होई । जीव व्याकूळ अंतरी।।

 

अत्यंत उग्र तेजस्वी। प्रभा फाके प्रखर ही

प्रचंड शक्तिशाली जो। वंदितो देव तोच मी।।

( मराठी अनुवाद)

            ह्या शक्तीमान विश्वसम्राटाला हात जोडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. गावातले लोकंही फिरायला जेटीवरच आले होते. येथे बसू नये वगैरे बोर्डस् नव्हते. बसायला छान बाक ठेवले होते. लोकही गप्पा मारत बसले होते. उजव्या हाताला डोंगर, डोंगर कडेनी रस्ता आणि डावीकडे समुद्र! समुद्र-क्षितिजाच्या रेघेवर ढगांनी चित्र काढायला सुरवात केली. तासभर चालत होतो. ढगांना आग लावून सूर्य ढगांमागे दडून बसला. ढगांच्या निखार्‍यावर जणु काय वार्‍याने फुंकर घातल्यासारख्या त्यांच्या कडा चमचमायला लागल्या. गुलाबी आणि निळसर राखी रंगातील चित्रकला समोर उलगडत होती. समुद्रातील दगडावर बगळ्याच्या जमातीतील पक्षी लांब मान करून मासा शोधत उभा होता. अधे मधे दिसणार्‍या होड्यांनी चित्रातल्या मोक्याच्या जागा घेतल्या होत्या. विचार निर्माण करणारं डोक्यातलं यंत्र बंद पडलं. काहीही न बोलता समोर फिरणार्‍या अदृष्य कुंचल्यातून उमटणार्‍या रंगांची करामत बघत स्तब्ध बसलो. चित्र पूर्ण झालं आणि सूर्यानी आपला गुलाबी कुंचला पाण्यात खळबळून ढगांना पुसून टाकला. निळ्या गुलाबी पाण्यावर बोटींना खडकाळ समुद्राचे इशारे देणारे दीपस्तंभांचे दिवे लुकलुकतांना दिसायला लागले. समुद्रकिनार्‍यावर एका समुद्रपक्षाचं दगडात कोरलेले शिल्प माणसाच्या पुतळ्यापेक्षा सुंदर वाटलं. कुठल्यातरी फुलांचा मंद सुगंध हवेबरोबर पसरत पसरत असमंतात भरून गेला. कुठला तरी परिचित सुवास होता. चालता चालता अचानक समोर फुलांनी बहरलेला शिरीषाचा प्रचंड वृक्ष सामोरा आला आणि सुवासाचा पत्ता सापडला. येतांना पाहिलेल्या खुणा लक्षात ठेवीत मागे परतत होतो. मघाचा टुमदार बस डेपो आत्ता निर्मनुष्य दिसत होता.  लाल कौलारू उतरत्या छपराचे 10-12 बस थांबे एकत्र. प्रत्येक थांब्यावर सुटणार्‍या गाड्यांचे क्रमांक , सुटण्याच्या वेळा , तिचे सर्व स्टॉप्स अशी सर्व माहिती लिहिलेली. BusTerminal वर Toilet, Phone अशी माणूस म्हणुन जगण्यासाठी लागणारी सर्व सुविधा उपलब्ध होती.  बोट बंदराला लागते ती छोटी जेटी सामसुम झाली होती. मघाशी फिरायला आलेल्या लोकांनी बाकं रिकामी केली होती. थोडं पुढे आलो. मघाचा तो भाजीवाला सामानाची आवरासावर करीत बसला होता. आजुबाजुची वेताच्या टोप्या, स्विमिंग सूट्स, त्यावर ओढून घ्यायचे सराँग,  बाटलीबंद व्हिनेगार मधील मिरच्या, मेमेंटो, टि.शर्टस् अशा रंगिबेरंगी वस्तुंनी नटलेली छोटेखानी दुकानंही बंद झाली होती. परतीचा मार्ग बरोबर होता. कारण जातांना दिसलेलं ते प्रचंड वडाचं झाड दिसलं. गाव शांत आणि सामसूम झालं होतं पण वडाच्या झाडाला मात्र जाग आली होती. वस्तीला आलेल्या असंख्य पक्षांच्या चिवचिवाटानी बोललेलही ऐकू येणार नाही अशी अभूतपूर्व गडबड उडवून दिली होती. त्यांची गोड गाणी संपून बहुधा झोपण्याच्या जागेसाठी मारामारी, भांडणं चालू होती. कदाचित दिवसभर कशी गम्मत केली ते आपल्या इतर मित्रांना सांगण्याची चढाओढ लागली असावी. माझ्या डोक्यात पंचतंत्रातली गोष्ट जिवंत होत होती. - - अस्ति दाक्षिणात्ये जनपदे महिलारोप्यं नगरम्। तत्र अस्ति विशालः वटवृक्षः! - दक्षिणेकडे एक महिलारोप्य नावाचं एक गाव आहे.  (कदाचित मॉरिशचा उल्लेखच महिलारोप्य होत असावा. ) तेथे एक विशाल वटवृक्ष आहे. हा वृक्ष अनेक पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. पावलं पुढे चालत होती आणि चिवचिव मागे अस्पष्ट होत होती. अहमदिया मुस्लिम मशिद आणि होस्टेल समोर MCB पाटी, छोटं बस स्टेशन- - वळणावर - -100 मि वर Hotel La Tamarin!! हॉटेल चिंच! आपल्या कडे हॉटेल्सना चिंच, आंबा, पेरु अशी नावं का बर देऊ नये? मॉरिशसला `ला तामार्‍या' म्हणजे चिंचआळी किंवा चिंचवाडी म्हणता येईल असा भाग आहे. चिंचेला एवढी प्रतिष्ठा पाहून बरं वाटायच.  खरतर भारतातील चिंच इतकी चविष्ट आहे की रोज तिच्याशिवाय आपल शब्दशः पान हालत नाही.  आपण मात्र तिला घर की चिंच ना के बराबरकरून टाकलं आहे. पोटातल्या भुकेची जाणीव झाली. जेवणाच्या टेबलावरील मिरचीच्या वासाला नाकानी सणसणून दाद दिली. पाश्चिमात्यांना ब्रेड बरोबर लोणी तर भारतीयांना मिरच्यांचा ठेचा दिला जात होता. पण आपल्या लवंगी मिरचीची इथली बहीण पाहिल्यावर `ती  खट का ही खट' हे ठरवणं जरा अवघडच होतं. कटकट नको म्हणून लोणीच मागवलं.  आपल्या पूर्वजांनी उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्मअसं जेवायच्या आधिच आपल्याला म्हणायला शिकवून खूपच उपकार केले आहेत. खेळीमेळीत जेवण चटकन संपून गेलं.

हॉटेल कोकोचे (Cocotiers) -

                            दुसर्‍या दिवशी नाश्ता झाल्या झाल्या आम्हाला दुसर्‍या हॉटेलवर पोचविण्यात येईल असं हॉटेल मालकानी फर्मान काढलं. हॉटेल चिंच अगदि गावाच्या मध्यात होतं. आता आम्ही बेटाच्या उत्तर टोकाला  English bay च्या किनारी असलेल्या हॉटेल कोकोचे (Cocotiers) म्हणजे हॉटेल नारळ वर जाणार होतो. दोन्ही हॉटेल्स एकाच मालकाची होती. दुसर्‍या हॉटेलमधे जागा रिकाम्या झाल्या होत्या. ते जास्त प्रशस्त आणि सुंदर होतं. प्रवीण एका मिटिंगसाठी पूर्वी  रॉड्रिग्जला आला होता तेंव्हा त्याच हॉटेलमधे उतरला होता. तोच समुद्र नवीन जागेवरून अजून नवीन दिसणार होता. आम्हा सर्वांना घेऊन गाडी `हॉटेल कोकोचे' वर आली. हासरे चेहेरे, नारळ पाणी यांनी आमचं स्वागत केलं. प्रवीण कामाला निघून गेला होता.  पहिल्या मजल्यावरील खोलीत गेले आणि सर्वप्रथम पडदे बाजूला करून सज्जाचे दरवाजे उघडले. सज्जातून मोरपंखी समुद्र सतत दिसत होता. अतिशय प्राचीन, अनादि तरीही सदोदित नवीन अशी दोन विरुद्ध वर्णनं ह्या अफाट सागरासाठी वापरतांना सरसाम् अस्मि सागरः’ - -‘जलाशयांमधे मी सागर आहेह्या भगवान श्रीकृष्णाच्या उक्तीची यथार्थता जाणवत होती. खोलीच्या उजव्या हाताच्या खिडकी शेजारीच एक प्रचंड वटवृक्ष त्याच्या पारंब्या खाली सोडून बसला होता. हे दोन महर्षि वर्षानुवर्ष कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा करीत जमिनीशी कायमचं नातं जोडून बसले होते.

माझं समुद्राचं वेड अजून संपलं नव्हतं आणि संपेल असं वाटत नव्हतं. न राहवून मी जवळ असलेल्या दुकानातून स्विमिंग सूट घेऊन आले. चार दिवस वेळ मिळेल तेंव्हा समुद्रात मनसोक्त पोहून घेतलं. समुद्राच्या खार्‍या पाण्याचा कंटाळा आला तर गोड्या पाण्याचा निळाशार तरणतलाव खोलीच्या बाहेरच मौजूद होता.

रॉड्रिग्जची पहाटसफर - morning-walk -

 

                 रॉड्रिग्जमधे खर्‍या अर्थानी निसर्ग अनुभवायचा असेल तर एक दिवस तरी पहाटे पहाटे उठून समुद्र किनार्‍यावर लांब फिरायला जायलाच पाहिजे,तेथील शांतता अनुभवायला पाहिजे. ’ माझ्या आधी कामानिमित्त प्रवीण रॉड्रिग्जला आला असतांना मॉरिशसच्या एका मंत्र्यांनी त्याला हे सांगितलं आणि morning-walk चं आमंत्रणही दिलं होतं. तेथे मंत्र्यांबरोबरच्या अनुभवाने प्रवीण आणि मीही पहाटेच फिरायला जायचं ठरवलं. काल पाहिलेल्या विराट मोरपंखी स्वप्नाची धुंदी अजूनही डोळ्यांवरून उतरली नव्हती. हिमालयाची विविध शिखरं अनुभवतांना प्रत्येक अनुभव ताजाच वाटतो. तसं ह्या चैतन्य-निधानाचं विविध दिशांमधून होणारं दर्शनही विलोभनीयच असतं. परत असा समुद्र मला कधीही पहायला मिळणार नव्हता. कारण ह्या छोट्याशा बेटावर परत येण्याची शक्यताही नव्हती. चार वाजता ऊठून बरोबर पाचच्या ठोक्याला बाहेर पडणं आवश्यक होतं. आम्हाला Grand-Baie( ग्राँम्बे) ला जायचं होतं.

                  समोरून मॉरिशसचे मिनिस्टर येत होते. त्यांच्याबरोबर असलेल्या एका पोलिस गार्डमुळे फक्त त्याचं वेगळेपण जाणवलं. माशा ओठांवर, डोळ्यांवर बसत होत्या. एवढ्या स्वच्छ सुंदर जागी माशा कशा? उत्तर नाही मिळालं. हात हलवायचा हातांना व्यायामच मिळून गेला. प्रत्येक घराघरातून जास्वंदीचे भरगच्च गेंद बाहेर वाकून बघत होते. समुद्रकिनारीच दोन मोठ्या सिमेट्रिज मधे प्रत्येक क्रॉस समोर प्लॅस्टिकची फुलं खोचून ठेवली होती. सिमेट्रीला लागून बंगलेही होते.  दोन्ही हातात सामान घेऊन कोळी समुद्रात चालला होता. होडीपर्यंत पोचता पोचता त्याच्या मांडीपर्यंत पाणी वर चढलं होतं. केळीवाला भले मोठे केळ्यांचे घड विकायला बाजाराच्या दिशेनी चालला होता.

                   रस्त्याची खडी चढण चढत असतांनाच आजुबाजुच्या बंगल्यांमधील मोत्या वाघ्यांनी अशी काही दमदार सलामी दिली की आमचा हाड हाडचा जप सुद्धा फळास येईना. व्यायामाशिवायच ते आमच्या शरीरावरचं अर्धा-पाव किलो मांस कमी करतात की काय असं वाटायला लागलं. सुदैवानी मालकाच्या मध्यस्थीमुळे बचावलो. रात्री कुत्र्यांना घराबाहेर काढून द्यायची प्रथा मॉरशस आणि इथे अगदि `शेम टू शेम' वाटली. पाच वाजले होते फटफटत होतं. चढाच्या दोन्ही बाजुंना बाभळीचं रान माजलं होतं. आपल्याकडल्या बाभळींपेक्षा त्या अंगापेरानं मजबूत होत्या. अधुन मधुन वाक्वा च्या 12-15 फूट ऊंचीच्या झाडांवर अननसासारखी फळं लोंबत होती. वाक्वा म्हणजे आपल्याकडील केवडयाचाच एक प्रकार . आपल्या केवड्यापेक्षा हाडापेरानं मजबूत. त्याच्यावर लोंबकाळणारी अननसासारखी फळं कोकणच्या केवड्यावर कधी पाहिली नव्हती. चढण पूर्ण चढून गेलो आणि सभोवार नजर टाकली. एक मोरपंखी निळं अर्धचंद्राकार स्वप्न समोर शांत पहुडलं होतं. सगळे कष्ट कुठल्याकुठे पळून गेले.

डोंगराच्या उतरणीवर समुद्राला मिळेपर्यंत हिरवळच हिरवळ पसरली होती.  त्या विस्तीर्ण हिरवळीवर उतरत्या छपरांचे छोटेखानी टुमदार 12-15 बंगले बसले होते. हिरवळीवर एक डौलदार कोंबडा कुटुंब कबिल्यासह वॉक घेत होता. एवढ्यात तिथल्या पाटीकडे लक्ष गेलं- ‘हॉटेल ले कोनोकोनो’!  (हे ही इथल्या खाऊन संपलेल्या अजुन एक माशाचं नाव) तो सुंदर परिसर न्याहाळत उभे असतांनाच तिथल्या हॉटेल मालकानी आमचं स्वागत केलं. ``या ना आमचं हॉटेल बघा.'' आग्रहानी त्यानी हॉटेल दाखवलं. आम्हाला सूर्योदयाच्या आत रूमवर पोचायची घाई होती.शेवटी व्हिजिटिंग कार्डस् ची आदलाबदल करून आम्ही पुढच्या समुद्रदर्शनाला निघालो. आता पूर्ण उतारच होता. उतरतांना समोरच समुद्र आणि पांढरी पुळण दिसत होती सुरूची झिपरी झाडं मधुन मधुन झिप र्‍या हलवून एकमेकांच्या कानात कुजबुजत होती. सुरुच्या बनात बसायला बाकही होते. आम्ही शांतपणे समुद्र डोळ्यात साठवून घेत तिथल्या बाकावर कितीतरी वेळ निश्चलपणे बसून होतो.

      नितांत शांत समुद्रात इंग्रजी व्ही च्या आकाराच्या लहरी उठवित एक नाव डौलात पाणी कापत चालली होती. पक्षांशिवाय एकही आवाज येत नव्हता. पूर्वेकडे गडद निळ्या आकाशावर उजाडल्याच्या खुणा उमटायला लागल्या. जवळपास चाळीस मिनिटं इथवर पोचायला लागली होती. तेवढंच मागे जायचं होंतं. मघाशी गोड वाटलेला उतार  चढतांना तेवढा गोड वाटत नव्हता. सकाळी पो. मांचुरिआ ला जाण्यासाठी ग्राँबे वरून सुटलेली पहिली बस आमच्यामागून घूँ घूँ घूँ घूँ आवाज करीत पो. मांचुरिआला निघाली. तिच्या घुमण्याच्या आवाजावरून आणि डिझेलच्या काळ्या काळ्या धुराच्या घनतेवरून ती आम्हाला घ्यायला मधे थांबेल अशी शक्यताच  नव्हती. असा दणकटच चढ होता. तो पर्यंत सूर्यराव तळपद्यांनी आकाशाच्या स्टेजवर एंट्री घेतली आणि आल्या आल्याच आमची पाठीची चामडी अशी काही भाजून काढायला सुरवात केली की थोड्याच वेळात आमच्या पाठींचं पुरतं भरीत झालं. समुद्रही तळपायला लागला. निळ्या समुद्रावर सोनेरी तरंगांची गर्दी उसळली. सोनेरी तरंग सतत हेलावण्याने त्यांच्यावर चमचम हिरकण्यांसारख्या चांदण्या चमकत असल्याचा भास होत होता. जेवढं बेट छोटं तेवढी समुद्राची व्याप्ती विशाल, अति विशाल भासत होती. हेच त्या छोट्या बेटाला लाभलेलं महा-वरदान होत. विश्वरूपाची झलक बघत बघत खोलीवर पोचलो व्हॉट अ वॉक!!!!

  बेटाचा  बसप्रवास -      

                      हॉटेलच्या लॉबीच्या दोन्ही भिंतींवर रॉड्रिग्ज मधल्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो लावले होते. ते बघत बघत जातांना तेथल्या गुफेच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. आम्ही चार दिवस येथे राहणार होतो. प्रवीण मात्र सकाळी आठाच्या ठोक्याला रोज कामाला जाणार होता.  मी फोन करून मला ती गूढ गुफा पहायला जायचं आहे म्हणून सांगितलं. आज शक्य नाही. आजची रिझर्वेशन्स फुल आहेत. त्यासाठी सरकारी परवानगी लागते. आज आम्ही ती घेऊन ठेऊ मग उद्या जाता येईल. दुसर्‍या दिवसाचं बुकिंग करून मी नकाशा पसरून बसले. प्रवीण चार वाजता येणार होता. मला चारवाजेपर्यंत वेळ होता. ठरवून कुठे न जाता नुसतच बसनी फिरून येऊ या. बेटाच्या मधोमध मोठा डोंगर पसरला आहे माँट ल्युबिन. त्याच्या पलिकडे जाऊन पाहू या. बसनी जातांना गाव, माणसं, त्यांचं राहणीमान सर्वच नजरेखालून जातं. बस अनेक वस्त्या-वस्त्यांमधुन फिरत जाते. एखादं गाव छान समजावत जाते. रस्ते हे अंगभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांसारखे असतात तर बस कानाकोर्‍यातून फिरणार्‍या पेशी सारखी. सगळ्या गावाचं आरोग्य बघत, दाखवत जाते.  मी पो माचुरिआपर्यंत बस घेतली.

परत तेच कालचं चित्र मांडून ठेवलं होतं. पण त्यात वेगळेच रंग भरणं चालू होतं.

वेताच्या विणलेल्या बास्केट्स, टोप्या दुकानांतून डोकावत होत्या. काल पाहिलेलं समुद्रपक्षाचं शिल्प पाहून कालचा आनंद वाटला नाही.  कारण हा सॉलितायर (Solitair) नावाचा चविष्ट पक्षी लोकांच्या पोटात कधीच अदृष्य झाला होता. जिभेवर रेंगाळणाऱया त्याच्या आठवणी त्याच्या दगडी पुतळ्याच्या रुपात उभ्या होत्या. डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या खादाडपणामुळे मॉरिशसचा डोडो आणि रॉड्रिग्जचा सॉलितायर (Solitair) भूतळावरून कधीच अदृष्य झाले आहेत. मॉरिशस आणि रॉड्रिग्ज दोन्ही ठिकाणी अति प्रचंड आकाराची आणि विविध प्रकारची कासवं होती. ह्या कासवांचा जीवन काळ 400 वर्षांचा असतो.

 

                काल पाहिलेली जेटी दिसत होती. अरेवा! आज जेटीवर एक जहाज ही लागलं होतं. दर सोमवारी मॉरिशसहून अत्यावश्यक सामान घेऊन हे जहाज इथे येतं.  हे जहाज भारतानेच मॉरिशसला भेट दिलेलं आहे. जवळच मोठ्ठं गोडाऊन होतं. तेथे पेप्सी आणि कोकचा प्रचंड साठा मौजूद होता. आणि अजून भरला जात होता.

माझा मुलगा लहान असतांना मी त्याला आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब सडक हात असलेला असं सागत असतांनाच अचानक त्याने ``हो हो कळलं कळलं - म्हणजे चिंपांझी'' अशी माझी विकेट घेतली होती. आज इतक्या सुदूर बेटावर बोट भरभरून आलेला एवढा मोठा कोक आणि पेप्सीचा साठा पाहिल्यावर कोणी मला विश्वव्यापीचा अर्थ कोक आणि पेप्सी सांगितला असता तर नक्कीच पटला असता.

 

                        पो. माचुंरिआ आलं होतं येथूनच मला पुढची बस घ्यायची होती. बस टर्मिनलवर बेटाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोक गाठणारी बस उभी होती. ती मला हॉटेल एबनी पर्यंत नेणार होती. बसने डोंगराची चढाई चढायला सुरवात केली. रस्त्याच्या दोन्ही कडेला दोन तीन फुटी रुंदीच्या काळ्या प्टॅस्टिक पेपरच्या रस्त्याच्या लांबीच्या लांबलचक पट्ट्या लावल्या होत्या.  त्यातून ठराविक अंतरा अंतरावर छोटी छोटी गवतासारखी पानं डोकावत होती.  कंडक्टरलाच त्याबद्दल विचारल असता तो म्हणाला, ``ते अननस लावले आहेत.'' रस्त्याच्या कडेकडेनी केलेली दोन-तीन फुटी रुंदीची आणि रस्त्याच्या लांबीची ही अननसाची शेती मला फारच आवडून गेली. माँट ल्युबिन! मी खिडकीतून बाहेर पहात होते. ``ह्या डोंगरावर ट्रेकींग करायला चांगले ट्रेक्सही आहेत. सध्या आपण माँट लिमॉन ( Mountain Limon at 398 m (1,306 ft).) रॉड्रिग्जमधे सर्वात उंच जागी आहोत.''  कंडक्टर सांगत होता. सेंट गॅब्रिअल चर्चवरून बस पुढे जात होती. बेटाच्या आकाराच्या मानाने चांगलं ऐसपैस चर्च होतं. मॉरिशसमधे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जास्त आहे. येथे मात्र जास्त करून आफ्रिकन वंशाचे कॅथॉलिक ख्रिश्चन.  बस गावा गावात शिरून मला बेटाचं अंतरंग दाखवत होती. सर्वात उंच ठिकाणाहून आमची बस जरा खाली सरकली आणि समोर विराट अर्धगोल समुद्रच समुद्र. जणु एक विशाल मोरपिसारा समोर उलगडला होता. मोरपंखावर असलेले विविध रंग समोरच्या समुद्रावर उमटले होते. शिवरूपी मोर त्याचा हा विशाल पिसारा फुलवून आकाशाचा तुरा उभारून समोर प्रकट झाला होता.

 

हे आकाश तुर्‍यासमान दिसते शंभो तुझ्या मस्तकी

शेषाचा उघडा फणाचि दिसतो शंभो पिसार्‍यापरी

त्याचे नेत्र सहस्र हीच जणु का नक्षी पिसार्‍यावरी

नाचे शंभु-मयूर तो फुलवुनी त्याच्या पिसार्‍यासही

( मराठी अनुवाद)

 

आदि शंकराचार्यांनी केलेलं शिवानंद लहरीतील शिवाचं वर्णन समोर साकर झाल्यासारखं वाटत होतं. मनात खरोखरच आनंदाच्या लहरी उठत होत्या. फोटो काढावेत का समोरचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं हे मलाच कळत नव्हतं. दोन तीन फोटो काढले. नंतर शांतपणे बघत बसले. बस उतरावरून उतरत होती. समोरच चित्र ज्यास्तच जवळ जवळ सरकत होतं. समोर प्रचंड आकाराची नीळिशार स्वच्छ काच बसवली असल्यासारखं वाटत होतं. इतकं स्वच्छ पाणी की तरंगही जणु गाळून घेतले असावेत. मॉरिशसपेक्षाही स्वच्छ, सुंदर. छोट्या छोट्या वस्त्यांमधुन बस चालली होती. इतक्या सुंदर गावात प्रत्येक घरापुढे कपडे वाळत घालायला दोर्‍याच दोर्‍या बांधलेल्या दिसत होत्या. कपडे मात्र वाळत घातलेले नव्हते. काही तरी वेगळच वाळत होत. मनाला काहीतरी खटकत होतं. बसमधे बसल्यापासूनच कंडक्टरला मी नवीन आहे हे कळलच होतं. तो मला मधुन मधुन माहिती देत होता. `` येथे लॉबस्टर्स आणि‍ ऑक्टोपस छान मिळतात. रॉड्रिग्जमधला माणूस ऑक्टोपस शिवाय जेवत नाही. ह्या सगळ्या दोर्‍यांवर ऑक्टोपस वाळत घातले आहेत.'' हिरवीगार हिरवळ, नीळाशार समुद्र, काळेभोर खडक एक सुंदर कोलाज तयार झालं होतं. खडकावर बसून फ्रॉक घातलेली एक काळी आज्जी  नातवाला सांभाळत होती. हे जिवंत शिल्प माझ्या कॅमेर्‍यात बांधून घेतलं. त्याच बसने परत मी पो. मांचुरिया परत गाठलं. मला उद्या सकाळीच त्या गूढ गुफा पहायला जायची उत्सुकता होती.

  ( Caverne Patate) कॅव्हॅरॉन पेटिट गुफा -

                  हॉटेलमधील फोटो पाहून गुफांचा अंदाज येत नव्हता. नैसर्गिक रित्या तयार झालेल्या या गुफा मी पहाणार होते पण एकटीच. प्रवीण आणि त्याच्या डेलिगेशनला पूर्ण दिवस काम होत. टॅक्सी येणार होतीच. मला फक्त टॅक्सीत बसायचं  होत.  मी इच्छित स्थळी पोचले. ते एक खुरटी झुडपं वाढलेल माळरान होतं. तेही समुद्रापसून दूरच. थोडासा विरस होणाराच परिसर दिसत होता. तरीही आलो आहोत तर पाहून घ्या ह्या तयारीनीच मी तिथे आलेल्या ग्रुपला बोंझु ऽऽ बोंझु (Good morning) म्हणून घेतलं. गुहा पहायला डोंगरही कुठे नजरेच्या टप्प्यात नव्हते. थोड्याच वेळात एका ऊंच सडसडीत हसरया चेहर्‍याच्या आफ्रिकन वंशाच्या माणसाने बोंझू म्हणत आमचं स्वागत केलं. तो हसला आणि त्याचे हिरकण्यांसारखे दात प्रकाशाची तिरीप यावी तसे चमकून गेले. काळ्या ढगातून वीज चमकून जावी तसं वाटलं.  पांढर्‍या शुभ्र रंगाचं परिमाण ठरवायला मला त्याचे चांदण्या चमचमत जाणारे दात हे अजून एक परिमाण सापडल्याचा आनंद झाला. हे काळे लोकं अत्यंत मोकळे ढाकळे आणि सरळ मनाचे असतात. सगळ्या रुक्ष माळरानावर त्याच्या हसण्यानेच उत्साह संचारल्यासारखं वाटल. इतरवेळेला पाहूनही न कळणार्‍या गोष्टींमधे गाईड रंग भरायला लागला की रोचक होऊन जातात. न दिसलेल्या गोष्टी दिसायला लागतात. समोर असुनही अदृश्य वाटणार्‍या अनेक गोष्टी अचानक प्रकट झाल्यासारख्या वाटतात.                       

                थोड्याशा औपचारीक परीचयानंतर आम्ही15-20 जण गाईडच्या मागे जात होतो. त्याच नाव जॉन होतं. जमिनीच्या सपाटीवरून खाली उतरणार्‍या 70 - 80 पायर्‍या आम्हाला जमिनीच्या पोटात 50 फूट खोल घेऊन गेल्या. जॉनच्या हातात भले मोठे प्रखर टॉर्चेस होते. त्यातील दोन टॉर्च त्याने आमच्यापैकी काहींच्या हातात दिले. बाहेर सकाळचे 11 वाजले असले तरी इथे बर्‍यापैकी अंधार असावा. उजेडाकडून अंधाराकडे जातांनाही काही वेगळ्याच गोष्टींवर प्रकाश पडतो. माझ्या मनात विचार आला आणि जॉनचे दात त्या बॅटरीच्या उजेडात चमचम चमकले. खर तर तो कमीच दिसत होता त्याचे फक्त दातच दिसत होते. मला तो अदृष्य जादुगारासारखा वाटत होता. गुहेमधे त्याचा पांढरा शर्ट आणि त्याच्या दातांव्यतिरिक्त तो दिसतच नव्हता.

`` आता आपण अशा जागी आहोत जेथे आपल्या डोक्यावर समुद्र आहे. आणि आपण ज्या जमिनीवर उभे आहोत त्या जमिनीखालीहि समुद्र आहे. मॉरिशस बेट लाव्हापासून झालं असलं तरी हे बेट बर्‍याच अंशी प्रवाळाचं आहे. हे वरचे, म्हणजे आपल्या डोक्यावर दिसणारे दगड जाळीदार आहेत त्यातून पाणी अभिषेक केल्यासारखं अनेक जागांमधून झिरपत राहतं. ह्या झिरपणार्‍या पाण्यासोबत क्षारही खाली येतात. जेंव्हा हे झिरपणं मंद मंदपणे होत राहतं, तेंव्हा त्याच्या सोबत येणारे क्षार हळु हळु तेथे साठत जातात. कॅलशियम कार्बोनेटचे एकावर एक साठणारे हे कण काही हजार वर्षांनंतर वरतून लोंबणार्‍या खांबांसारखे दिसतात. हे झिरपणारं पाणी थेंब थेंब खाली एकाच जागेवर पडून खाली शिवलिंगासारखे आकार तयार होतात. छतातून लोंबणारे खांब हे जास्त लांबीचे होते.

                आम्ही गुहेत प्रवेश केला आणि वेगळ्याच विश्वात आलो. धबधब्याचा किंवा झाडांवरचा बर्फ वितळता वितळता परत  थंडीने गोठून जावा अशा आयसिकल्स सारखे खांब वरून लोंबत होते. अंधारात लपून बसलेली निसर्गाची किमया आम्ही प्रकाशझोत टाकून पहात होतो. निसर्गाने बनवलेल्या वेगवेगळ्या आकारात आम्ही आमचे ओळखीचे आकार शोधत होतो. फोटोंचे फ्लॅश झळकत होते आणि प्रत्येक फ्लॅश सोबत जॉनचे चमचम चांदण्यांचे दात. ``सावकाश! खाली पाण्यामुळे घसरडं झालं आहे. शेवाळही आहे.'' अधुन मधुन अंगावरही  पाण्याचे थेंब टपकत होते. गुहेच्या भिंतींवरून पाझरणार्‍या पाण्याने भींतींवरही क्षार साठण्याने सुरेख नक्षी तयार झाली होती. वेरुळमधे कोरलेल्या चित्रांसारखी भिंत सजली होती. ही लेणी मात्र निसर्गाने कोरली होती. चितारली होती. त्या निसर्गाच्या कलेत कोणाला चर्चिलचा चेहरा दिसत होता तर कोणाला लेडी डायनाचा. मावळतीवर ढगांच्या चित्रनगरीत विविध आकार  शोधत रहावेत किंवा रुद्राक्षाच्या वळ्यांवळ्यांवर असलेल्या नक्षीत कुठेतरी ॐ, त्रिशूळ, शंख शोधावेत तसे त्या भींतींवर आणि आजु बाजूला आम्ही मनातले आकार भितींवरील चित्रकलेशी जोडून पहात होतो. वारंवार युरेक्का युरेक्का ओरडत होतो.

मातीसी नच कोंब हे फुटति की , माठा घटांचे कधी

कुंभारा मनि कल्पना उपजवी, आकार सृष्टी नवी।।

त्याप्रमाणे पाश्चिमात्यांना त्यांच्या ओळखीचे चेहरे तेथे भेटत होते तर मला आपल्याकडचे शिव, विष्णू, लक्ष्मी, गांधीजी असे. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव. शिवलिंग आणि त्यांच्यावर नैसर्गिक होत असलेला अभिषेक आपल्या भारतीयांनी पाहिला असता तर लगेच गुहेबाहेर बेल, फुलांची दुकानं लागली असती. आणि दुधाच्या घागरी रित्या झाल्या असत्या. Stalactites आणि  stalagmites  चं ते अद्भुत दर्शन आश्चर्यकारक होतं. एका क्षणी वरतून लोंबणारे stalactites आणि जमिनीवर उगवलेले ते stalagmites आणि त्याच्या मधून चालतांना मला आपण मगरीच्या तोंडात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. खाली बसून एका सुंदर शिवलिंगाला मी हात लावून पाहिला. ते गायीच्या नाकासारखं गार गार होतं. मी जॉनला त्याचं कारण विचारलं.  जॉन म्हणाला ज्या स्टॅलॅग्माईटची तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते तो गार असतो. तो गार नसेल तर त्याची तयार होण्याची प्रक्रिया संपली. सारे खाली वाकून प्रत्येक शिवलिंगाला गोंजारायला लागले. परत एकदा ``अरे हा गार आहे'' , ``हा पण!''  ``अरे हा नाहीए'', ``पाहु पाहु!'' `` खरच की'' `` मि. जॉन बघा बघा हा स्टॅलॅग्माईट डेड आहे का?'' अशी धमाल उडाली. अर्थात हा संवाद असा चालू असावा असा माझा नुसता तर्क आहे. कारण बहुधा रॉड्रिग्जला येणारे प्रवासी हे `रीयाँ ' (Re Union) किंवा सेशल ह्या चिमुकल्या बेटांवरचेच असतात. त्यांच्या फ्रेंच किंवा क्रेऑल बोलण्याचे त्यांचे चेहरे वाचून केलेलं हे मुक्त भाषांतर आहे.

 

 ``आता आपण ह्या गुहेच्या बरोबर अर्ध्या अंतरावर आलो आहोत. आपण सगळेजणं आपले टॉर्चेस अर्ध्या मिनिटासाठी बंद करू या.'' जॉनच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी दिवे बंद केले. इतकावेळ प्रकाशाने उजळून निघालेल्या त्या गुहेत भीषण अंधार झाला. जवळचा माणूसही दिसणार नाही असा अंधार. सगळ्यांचा किलबिलाट एका क्षणात एकदम बंद झाला. इतका काळा अंधार कधीच पाहिला नव्हता. वीऽऽऽ!! तेवढ्यात कोणाचा तरी पाय सटकला. प्रकाशाने डोळ्यांची आणि विवेकाने माणसाची साथ सोडली तर अशा महाअंधारात चाचपडत ठेचकाळणं  क्रमप्राप्तच होतं. आपल्याकडे अज्ञानाला अंधार का म्हणतात ते एका सेंकंदात उमगलं.  ``आता तुम्हाला माझे चमकणारे दातही दिसणार नाहीत.'' डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही अशा अंधारातून जॉनचा हसरा आवाज आला. आणि सगळ्यांची भीती हसण्यात परिवर्तित झाली. जॉनच्या दातांच्या चमचमत्या चांदण्या अंधारात अदृश्य झाल्या होत्या. ``येथे येण्यासाठी सरकारी परवांनगीचं पत्र लागतं. तुम्ही गाईडशिवाय जाऊ शकत नाही. पहिल्यांदा काहीजणं येथे आले आणि आत हिंडण्याच्या नादात त्यांच्या टॉर्चेस्चे सेल संपले. ते येथून बाहेरच पडू शकले नाहीत.''  आत्तापर्यंत जॉनच्या सांगण्याची वाट न पाहता सर्वांनी आपापले टॉर्चेस लावले होते. ह्या गुहेत अजून एक रस्ता दिसत होता. ``तो रस्ता कुठे जातो''?  ``सरळ समुद्रात.'' येथून जे जे गेले ते परत आलेच नाहीत. ही गुहाही सरळ समुद्रात मिळते पण आपण इतकच पुढे जाऊन परत येऊ या. त्याच्या उत्साहाच्या तालावर आमचीही पावलं पडत होती. ह्या अशा एकमेकांना जोडलेल्या अकरा गुहा आहेत. ही एकच गुहा प्रवाशांसाठी खुली आहे. कॉमेर्‍याचे सेल संपेर्पंत प्रत्येकाने फोटो काढले होते.

                बाहेर आलो तर दुसर्‍या ग्रुपचा गाईड माझ्याकडे आला. ``काल तुम्ही एकट्याच बसने हॉटेल एबनीला गेला होता ना?''  छोट्याशा बेटावर सगळे एकमेकांना परिचित होते. नवीन माणसाचा वावर लगेचच टिपला जात होता. ह्याच कारणामुळे येथे गुन्ह्यांचं प्रमाणही असल्या नसल्यातच जमा होतं.

           ``उद्या मी कोकोचे बेटावर जाणार आहे एक ग्रुप घेऊन. तुम्ही येणार का? खूप पक्षी आहेत तेथे. बोटीवर बार्बेक्यू आणि ताजे ताजे मासे भाजून आम्ही देतो.'' ``किती वाजता निघणार?'' ``सकाळी नऊला निघुया आणि 7-7.30 वाजेपर्यंत परत येऊया.'' जायची वेळ मला जमणार होती पण संध्याकाळी प्रवीण आणि त्याच्या डेलिगेशन बरोबर हे चिमुकलं बेट पहायला जायचं होतं. प्रवीण हा भारतीय पोलीस सेवेतील (IPS)असल्याचे कळल्यावर तेथील पोलीस दलाने प्रवीणला शोफरड्रिव्हन स्वतंत्र गाडी दिली. पोलीस ही एक स्थानिक संस्था नसून सर्वच देशांच्या सीमा ओलांडून जाणारं एक विशाल कुटुंब आहे.  भारतातच नव्हे भारताबाहेरही हा अनुभव आम्हाला वारंवार दिलासा देऊन गेला.

                         ड्रायव्हर बरोबर होणार्‍या वार्तालापातून कळलं की रॉड्रिग्जमधील लोकांना भारतीय हिंदी सिनेमे फार आवडतात. रॉड्रिग्जमधे दर गुरुवारी टि.व्ही. वर दुपारी तीन वाजता भारतीय हिंदी सिनेमा दाखवला जाई. हिंदी सिनेमाच्या दिवशी सर्व अ‍ॅफिसेस् दुपारी दोन वाजताच सुटत. तीस वर्षांपूर्वी आपल्या कडील टि.व्हीवर महाऽऽऽभाऽऽरत अशी लकेर घुमली की सगळे रस्ते जसे सामसुम होत, तसे दर गुरुवारी दुपारी रॉड्रिग्ज मधले रस्ते सामसुम होतात हे ऐकून आमचं कुतुहल अजुनच वाढलं. ``येथील लोकांना हिंदी कळतं का?'' ``नाही कळत पण खाली सबटायटल्स येतात ना.'' `` एवढे हिंदी सिनेमेच का आवडतात?'' - मी ``आम्हाला हिंदी सिनेमाचा शेवट फार आवडतो. बहुतेक सिनेमे सुखान्त असतात.''

                      ``येथे भारतातर्फे एक धरण बांधत आहेत. त्याचे मुख्यही भारतीयच आहेत. तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का?'' ड्रायव्हरच्या प्रश्नाला आम्ही लगेच होकार देऊन टाकला. रॉड्रिग्ज पर्यंत भारतीय पर्यटक अभावानेच पोचत असले तरी तेथे पोचल्यावर हा एक सुखद अनुभव होता . रॉड्रिग्जमधे त्यांचं पहिलं धरण बांधून देणारे भारतीय अभियंता भेटले तेथे धरण बांधायच्या निमित्ताने ते कित्येक वर्ष तेथेच राहत होते. त्याने हाती घेतलेले बांधकामही जवळजवळ पूर्ण झाले होते.

           रस्त्याने जातांना ठिकठिकाणी लोकांना बसायला, एकत्र यायला, एखादा कार्यक्रम करायला छान, टुमदार जागा किंवा हॉल बांधलेले दिसत होते. जागोजागी सुसज्ज हॉस्पिटल्सही दिसत होती. भरपूर वार्‍याचा उपयोग करून घेऊन पवनचक्या फिरत होत्या. थोड्याशा सखल प्रदेशातून जात असतांना ड्रायव्हरने त्यावेळेला (26 डिसेंबर 2004 ) नुकत्याच येऊन गेलेल्या त्सुनामीची आम्हाला आठवण करून दिली. `त्यावेळेला आमच्या येथेही मोठ्या मोठ्या लाटा आल्या होत्या. ह्या ह्या इथल्या रस्त्यावर पाणी आलं होतं. त्या सोबत मोठे मोठे मासे येथे येउन पडले होते.'

 

                   तेथील फायर सर्व्हिसेसचे मुख्य प्रवीणला भेटल्यावर त्यांनी अभिमानाने त्यांचे सर्व ट्रेनिंग आणि B.E. in Fire services ही डिग्री नागपूरच्या फायर सर्व्हिसेस कॉलेजमधून पूर्ण केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले. त्यांच्या अ‍ॅफिसमधे लावलेला तेथील ग्रॅज्युएशनचा फोटोही अत्यंत उत्साहाने आणि कौतुकाने दाखविला. अतिदूर असलेल्या 140 देशातील लोकांना भारत त्यांच कौशल्य वाढविण्यासाठी गेल्या 50 हून अधिक वर्ष Indian Technical and Economic Coopretion (ITEC) द्वारे करत असलेल्या मदतीबद्दल त्यावेळेला सार्थ अभिमान वाटला. ह्या माध्यमातून आपल्याला मॉरिशसला मदत करता आली ह्याचाही आनंद झाला. अशा अनेक मिनिस्ट्रीजमधे भारत आपले पैसे खर्च करून भारतीय तज्ज्ञांच्या रूपाने अन्य देशांना  भरघोस मदत करत आहे.

                     प्रवीण Jean Claude Pierrre Louis - Island Chief Executive (चीफ सेक्रेटरी) ना भेटायला गेला असता तेथील अनुभव सांगत होता. Island Chief Executive च्या फिसात कामानिमित्त येणार्‍या प्रत्येकाला तेथे कामाला असलेल्या बायका नम्रपणे आणि हसतमुखाने बसायची विनंती करून चहा पाणी देत होत्या.

              आम्ही बेटावर आलो तेंव्हा नेमकी आमावस्या किंवा आमावस्येच्या जवळची तिथी होती. रात्री जेऊन आम्ही जरा पाय मोकळे करून यावेत म्हणून हॉटेलबाहेर पडलो. बाहेर मिट्ट काळोख होता. पायाखालचा रस्ताही दिसणार नाही इतका. आवाजाची जराही गाज नसलेला समुद्र आमच्याशी आंधळी कोशिंबीर खेळतांना आमच्या डोळ्यांवर अंधाराची पट्टी बाधून कुठल्यातरी दिशांमागे लपला होता जणु.  आम्ही अजून थोडं पुढे आलो आणि लक्षात आलं देवाजीनी आमच्या डोक्यावर चांदण्यांचं छत्र उघडून धरलं होतं. आकाशात लाखो लाखो  तारे चमचमत होते. कुठे बिन तार्‍यांची इवलीशी सुद्धा जागा दिसत नव्हती. आकाशगंगा लांबवर पसरली होती. इतकंच नाही तर जिथे जिथे पाणी तिथे तिथे चांदणी. खाली वर हा भेदही संपून गेला होता. सभोवार चांदण्यांचं साम्राज्य पसरल होतं.  आपल्याभोवतीची मोकळी जागा आक्रसली जाऊन सर्व जागा चांदण्यांनी व्यापण्याचा तो अनुभव अशक्य, आणि तरीही थोडासा गुदमरवून टाकणारा होता. अर्जुनाने विश्वरूप दर्शानाच्या भीतीने डोळे मिटल्यावर त्याला स्वतःच्या आतही तेच विश्वरूप दिसायला लागले. त्याप्रमाणे वर खाली, बाजूला चांदण्याच चांदण्या पाहून आकाश कुठलं आणि समुद्र कुठला हेच कळेनासं झालं.

           ढग, वारा, वादळ, पाऊस हे सर्व वातावरणात एका उंचीपर्यंतच असतात. 30 हजार फूटावर हे सर्व संपून जातात.  ह्या उंचीवर विमानाला कुठलाच अडथळा रहात नाही. प्रवाशांना वेगाची जाणीवही होत नाही. जाणीव असते ती घर्षणाची संघर्षाची. निसर्गाचे हे अनाकलनीय अनुभव आपल्याला असेच खूप खूप वरती घेऊन जातात; जिथे तू तू मी मी, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ वादविवाद यां चे सारे ढग, वादळ, वारे खालीच राहून जातात. मनात उरते एक चिरंतन शांती किंवा अद्भुत आनंद. अशा अढळपदांवरून सहजा सहजी तुम्ही खाली येत नाही. मग बारीकसारीक कुरबुरींच्या जळमटांची काय कथा?

                  अशी ही शांत निवांत, प्रदूषणमुक्त जागा पाहूनच तेथील आकाशाचा अभ्यास करायला, समुद्रातून ग्रहणाचा अभ्यास करायला हवामान खात्याने माऊंट ल्युबिन येथे दोन मजली वेधशाळा उभारली आहे. तेथील टेरेसवर दोन टेलिस्कोप विराजमान होते. तेथूनच हवामानावर सतत लक्ष ठेवलं जातं. ग्रहणांचा अभ्यास केला जातो. ग्रहणाची पर्वणी साधून अनेक देशातील खगोल-शास्त्रज्ञ येथे येतात असे तेथील वेधशाळा-प्रमुख सांगत होते. प्रवीणमुळे ही वेधशाळा पहायला मिळाली.

                  जाता जाता ड्रायव्हरने विषय काढला. भारताने मॉरिशसच्या मुलामुलींसाठी भारतातील विद्यापीठात अनेक स्कॉलरशिप्स ठेवल्या आहेत. त्याच्या मुलाचा भारतात शिक्षणासाठी निवड समितीकडून इंटरव्ह्यू झाला होता. प्रवीणने भारतीय अॅम्बॅसिडरला शब्द टाकला तर त्याच्या मुलाला नक्की स्कॉलरशिप मिळेल. असे तो आवर्जून सांगत होता. ज्याप्रमाणे भारतीयांना अमेरिकन युनिव्हर्सिटीजच अप्रूप असतं तसं रॉड्रिग्जच्या लोकांना भारतीय युनिव्हर्सिटीजचं अप्रूप वाटतं हे पाहून मूठभर मांस वाढल्यासारखं वाटलं. आपण शिकलेल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीचा अभिमान वाटून गेला.

              परत जायची वेळ झाली होती. आम्ही मॉरिशसला परत निघालो होतो. अठरा किलोमिटर लांबीच्या आणि साडेसहा कि.मी. रुंदीच्या एका टिकली एवढ्या  बेटावर पाहिलेलं, अनुभवलेलं, मोरपंखी समुद्राचं विराट स्वप्न मी कायमचं माझ्याबरोबर घेऊन चालले होते. पायाखालची जमीन जेवढी आक्रसत जावी तेवढा क्षितीजरेखेचा परीघ जास्तच प्रदीर्घ गोलाकार आणि सुस्पष्ट होत जातो ,  नजर जास्त दूरवर पहायला लागते, समुद्राची व्याप्ती नजरेत मावेनाशी होते. समोर पसरलेली स्वप्न जास्त विशाल होत जातात. आकाशाचा तुकडा विस्तीर्ण घुमटाच्या रुपात साकार होतो. आकाशापलिकडे खुणावायला लागतो. तो चमकदार मोरपिसारा उलगडून बसलेला मोरपंखी समुद्र मनातून हलत नव्हता. श्री आदि शंकराचार्यांच्या शिवानंदलहरी स्तोत्रात दक्षिण भारतातील अंकोल नावाच्या झाडाचा उल्लेख आहे.

देठातून सुटे परीच चिकटे अंकोल वृक्षास बी

तैसे चित्त अनन्यभाव धरुनी विश्वेश्वरा आठवी

( मराठी अनुवाद)

फेब्रुवारी मार्चमधे फुलं येणार्‍या ह्या अंकोल वृक्षाची फळं मार्च एप्रिलच्या सुरवातीस पिकून जमिनीवर पडतात. किड्या मुंग्यांनी गर खाऊन बिया जमिनीवर विखुरतात. एप्रिलच्या अखेरी अखेरीस येणार्‍या पहिल्या वादळवारा पावसाच्या रात्री ह्या सर्व बिया अंकोलाच्या बुंध्याला जाऊन चिकटतात.त्याच्या पायाशीच रुजतात. माझंही तसचं झालं होतं. विमानातून मॉरिशसला परत फिरतांनाही माझं मन त्या विराट मोरपंखी स्वप्नालाच चिकटून राहिलं होतं.

----------------------------------------------

 

 21 परतीचे वेध-

नेहमी प्रमाणे नवीन ठिकाणी गेल्यावर आम्ही आप्त-स्वकीयांना बोलवत राहिलो, ते येत गेले. मॉरिशसला आप्त-स्वकीयांना बोलावण्याचा माझ्या मनात बराच काळ राहून गेलेला वेगळाच हेतू होता. आम्ही दिल्लीला असतांना आमच्या आजूबाजूला राहणार्या अनेक जणांचे नातेवाईक बाहेरच्या देशात असत. ते त्यांच्याकडे जाऊन त्याच्या सुरस गोष्टी सांगत. त्याकाळी मराठी लोकांचे नातेवाईक अभावानेच बाहेरच्या देशात असत. आणि ते असले तरी त्यांना भेटायला जाण्याचा खर्चही कोणाला परवडणारा नसे. मला माझे मराठी आप्त-स्वकीय ``आपल्या कोणाकडेतरी’’ जाऊ शकले हा फार मोठा आनंद त्यातून मिळत होता. ह्या साध्याभोळ्या लोकांना मॉरिशसचं तिकिट कुठे आणि कसं काढावं हाही प्रश्न पडे. कणादच्या ऑफिसमधेच ही सोय होती. ह्यावेळेला मी शहाणी झाले होते आणि कणादही. येणार्या पाहुण्यांच्या बॅचेस बनवून दर पंधरा दिवसानी त्यांना मॉरिशसला पाठवायचं काम तो करत होता. एक बॅचनंतर घर आवरायला आणि पुढच्या बॅचसाठी सामान भरून ठेवायला मला 8 दिवस मोकळे सोडून परत पुढची बॅच पाठवत होता. शेवटी तेथील मुलाने त्याला विचारल, ``तुम्ही मॉरिशचा टुरिझम ऑर्गनाइझ करता का? आमचे जास्तीत जास्त पाहुणे मॉरिशसला यावेत ही आमची इच्छा पूर्ण झाली. आणि आपल्याला बोलावणारे आपले कोणी परदेशात नाही ही मनातील रुखरुख धुवून गेली.

 

`En Vendre ' आँ वॉन्द्र '

             दहा दिशांसोबत गुंफल्या जाणार्या बदलीच्या रेशीम गोफाला धरून आम्ही सर्कशीतील झुल्यांवर काम करणार्यां Trapeze Artist सारखे नवीन नवीन गावांवर स्वार होत होतो. बदलीची टाळी वाजली की पहिल्या गावाचा झोपाळा सोडून दुसर्या गावाच्या झोपाळ्यावर उडी मारत होतो. मॉरिशसची दोन वर्ष संपली. भारतातून बदलीचा खलिता आला आणि आम्ही मॉरिशचा झोपाळा सोडायला सज्ज झालो.

             आम्ही गाडी विकायची असं ठरवलं. पेपर मधे जाहिराती देऊनही गिर्हाईक काय ते फिरकेना. आमच्या मित्रमंडळींच्याही गाड्या विकल्या जाऊ लागल्या. तेवढ्यात आमच्या मॉरिशियन मित्राने आम्हाला सल्ला दिला. गाडीच्या मागे पुढे     `En Vendre ' आँ वाँन्द्र ' म्हणजे `गाडी विकणे आहे' असे लिहून त्यावर तुमचा फोन नंबर लिहून गाडी बाजारपेठेतून लोकांच्या जाण्या येण्याच्या वेळेला फिरवून आणा.  आम्हीही उत्साहाने आमच्या फोन नंबरची माळ गाडीच्या हातात देऊन तिला स्वयंवरासाठी सज्ज केलं. गाडी धुवून पॉलिश करून वेगवेगळ्या मॉल, बाजार गर्दिचे रस्ते येथून फिरवून आणत असतांनाच फोन घणघणू लागले आणि लगेचच `देवानंद' हा सुनियोजित वर  तिला लाभला. देवानंदने एकदाच बॉनेट उघडून पाहिलं  ठिकठिकाणी इंजिनवर बोट फिरवून त्याने गाडीची परीक्षा केली. आणि लगेचच गाडी पसंतीचा होकारही दिला. राहवून मी त्याला विचारलं, ``बॉनेट उघडून तुम्ही काय पाहिलं?'' तो म्हणाला  ``26 डिसेंबर 2004 ला  जपानमधे भूकंप आणि त्यानंतर प्रचंड मोठी त्सुनामी आली होती. त्यावेळेला तेथील नवीन बनविलेल्या असंख्य गाड्या पाण्याखाली गेल्या. त्यांच्यामधे चिखल भरला गेला. ह्या सर्व गाड्या नंतर धुवून साफ करून आफ्रिका, मॉरिशस अशा देशांमधे पाठविण्यात आल्या. त्यांच्या इंजिनमधे काही ना काही तक्रारी येत आहेत. त्या गाड्यांच्या इंजिनावर कुठे ना कुठे कोपर्यात त्या चिखलाचे अंश का होईना सापडतात. पण ही गाडी संपूर्णपणे साऊथ अफ्रिकेत ॅसेंबल झालेली आहे. मला पसंत आहे.'' देवानंद एका प्राणांतिक अपघातातून केवळ गाडीला असलेल्या एअरबॅग्जमुळेच वाचला होता. त्यामुळे गाडीला एअरबॅग्ज पाहिजेतच ह्या गोष्टीवर ठाम होता. ``तुम्हाला पाहिजे त्या करन्सीत पैसे देईन'' त्याने सांगितलं. त्याचा फुलांचा व्यवसाय अगदि भरभराटीला आलेला होता.फुलं युरोपात जायची त्यामुळे त्याच्याकडे युरो, डॉलर अशी कुठलीही करन्सी उपलब्ध होती. गाडी नवी कोरीच होती. आम्हीही तिच्या सर्व accessories सह तिचं सालंकृत कन्यादान केलं. गाडी एका भारतीय वंशाच्या भल्या माणसाच्या तेही `देवानंदच्या' हाती सोपविल्याचा आनंद झाला. अखेर आमची वहिदा रहेमान तिचा गाईड देवानंदबरोबर निघून गेली.

--------------------------------------------

निरोपसमारंभ -

                    प्रवीण त्याच्याबरोबर काम करणार्य़ा अधिकार्यांनी मॉरिशस सरकारने दिलेली जबाबदारी तडफेने एक वर्षाच्या आत पूर्ण केली. सर्व विभागाच्या सर्व स्तरातील अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा नक्की केल्या. त्यानंतर पुढच्या वर्षात एकट्या प्रवीणने अनेक विभागातील अनेक अधिकार्यांचे सॉफ्ट स्किल संवंर्धनाचे तसेच महिला कल्याण विभागातील अधिकार्यांसाठी महिलांचे सक्षमीकरण; पोलीस अधिकार्यांसाठी मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन; सरकारी अधिकारयांसाठी कार्यालयीन प्रोसीजर्स असे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. दोन वर्षांनंतर तेथून निघतांना Ministry of Civil cervices चे प्रमुख श्री जग्रु ह्यांनी त्यानिमत्त निवडक अधिकार्यांना बोलावून निरोप समारंभ आयोजित केला. मुद्दाम सांगितले की इथून  जाणार्या कोणत्याही अधिकार्याला असा निरोप समारंभ आम्ही ठेवत नाही पण खास तुमच्यासाठी तो करत आहोत. आम्हाला तुम्ही केलेल्या कामाबद्दल अतिशय आनंद आणि अभिमान आहे.

                एक छानसं बोटीचं मॉडेल त्यांनी भेट म्हणून आम्हाला दिलं. मलाही निरोपसमारंभाचं खास आमंत्रण दिलं होत.  ``मॅडम मॉरिशस आवडल का? आमच्याकडे तुम्हाला आवडली नाही अशी काही गोष्ट आहे का?''  मॅडम मॉरिशस आवडल का? इथपर्यंत प्रश्न ठीक होता. पण पुढच्या अर्ध्या प्रश्नानी माझं विश्वच ढवळून गेलं. माझ्या डोळ्यांसमोर पोर्ट लुईचा राणी व्हिक्टोरियाचा पूर्णाकृती पुतळा डोळ्यासमोर उभा राहिला. त्याच्याखाली लिहिलेली ती एक छोटीशी पण कट्यारीसारखी हृदयात जखम करणारी ओळ दिसायला लागली. `EMPRESS  OF INDIA'  दगड धोंड्यांचा रस्ता तुडवतही माणूस एकवेळ शिखर पादाक्रांत करु शकेल; पण बुटातच असलेला एखादा छोटासा कण सलून सलून पायाला जखम तयार करतो. दोन पावलही चालू देत नाही. मॉरिशसच्या दोन वर्षांच्या काळात त्या एका ओळीने मला जखमी केल होतं. इथे रोज इतके भारतीय येतात पण त्यांना ह्या ओळीने जखम सोडाच खरचटल्यासारखंही वाटू नये ह्याची अजूनच सल होती. ती ओळ माझी भळभळणारी जखम झाली होती. त्यावर मीठ चोळल्यासारखा प्रश्न अचानक पुढ्यात आला होता. सूर्यालाही ग्रहण लागतं, पण काही काळासाठी. सावली दूर झाली की तोही तळपायला लागतोच की. भारतावरची गुलामगिरीची छाया कधीच दूर झाली आहे मग ह्या ओळीची तरी अभद्र छाया कशासाठी? भारताबाहेर भारताबद्दलची ही अपमानजनक गोष्ट मला स्वस्थ बसू देत नव्हती मी स्वतंत्र भारतात जन्मले आहे. मला तो माझा अपमान वाटत होता. ती ओळ पुसून टाकायला माझं मन अधीर होतं. आजही आहे.

        माझ्या नजरेसमोरून म्यझियममधले पै पै गोळा करून भरलेले तांबे हलत नव्हते. आपल्याला कधी ना कधीतरी आपल्या मातृभूमीला परत जायला मिळेल, म्हणून सार्या आयुष्यभर काटकसरीने वागून पै पै वाचवून सारे चांदीचे रुपये लोट्यांमधे भरून ठेवून, ते चोराचिलटांच्या हाती पडू नये म्हणून चुलीखालच्या जमिनीत पुरणारी आणि त्यांना प्राणपणे जपणारी अनेक आयुष्य, भरल्या तांब्याला कोणाचा तरी पाय लागावा आणि तांब्या लवंडून जावा तशी मातृभूमीची आस हृदयात ठेऊन सांडून गेली होती. मातृभूमीचं अखेरचं दर्शनही त्यांच्या डोळ्यांना लाभलं नव्हतं.

           गाडीतून जातांना हिरव्यागार उसाच्या फडांच्या बांधावर, शेताच्या कोपर्या कोपर्यावर दिसणारी दगड-धोंड्यांची रास- - - तीच ती धोडयांची रास मला गोफणीतून दगड मारावे तशी घायाळ करत होती. ती माझ्या पूर्वजांच्या कष्टांची रास होती. भारतातून येणार्या प्रवाशांना सुंदर मॉरिशस मधील ही रास अज्ञातच होती का?

          बाहेरच्या देशात काही गोष्टी diplomatically फार कुशलतेने बोलायला लागतात. त्या फार टोकदारपणे बोचेल अशा रीतीने बोलू नयेत. त्यामुळे दोन देशांचे संबंध बिघडू शकतात . . सर्व गोष्टी आठवायला लागल्या. माझा मराठी बाणा आणि जिभेला असलेली तलवारीची धार नको ते करून जायची ह्या कल्पनेनी जिभेवरचे शब्द मी मागे रेटत राहिले. मला एकदम असहाय्य वाटू लागलं. वाटलं रडू येईल.

             प्रवीणने परिस्थितीची जाणीव करून देत मला बोलायचा इशारा केला. ``छान आहे तुमचा देश पण मला आता माझ्या देशात जायची ओढ लागली आहे.'' कसंबसं मी मला सावरलं. आता मला इथलं काहीच देखणं वाटत नव्हतं. मॉरिशस आणि भारताच्या किनार्याला जोडणार्या  समुद्राला  पैलतीरी माझा भारत कसा आहे? असं मन विचारत होत. सोन्याची लंका सोडून रामालही परत मातृभूमीची ओढ कशी लागली असेल हे जाणवत होतं. केवढ्याही मोठ्या ऐश्वर्यापुढे आईची झोपडीच मला प्रिय आहे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर आठवत होते.

              विमानानी भारतमातेच्या भूमीला स्पर्श केला आणि मन गलबलून आलं. वाटलं हात पसरून धावत सुटावं. आपल्या भूमीवर डोकं टेकवावं. हात मातीत भरून कपाळावर भस्माच्या पट्ट्यासारखे ओढावेत. डोळे वारंवार भरून येत होते. संजय माझा दीर, माझी बहीण सुरेखा, तिचे पति नरेनभाई सारेच आले होते न्यायला.  आम्हाला पाहताच त्यांच्या चेहर्यांवर आपली माणसं आल्याचा आनंद पसरला. एवढ्या गर्दितून हात उंचावून उंचावून आम्ही त्यांना हात हलवत होतो. एवढा आनंद मला पूर्वी कधीच झाला नव्हता.

----------------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)