4 मॉरिशसची तोंड ओळख -

 

4 मॉरिशसची तोंड ओळख -

       मॉरिशसच्या नकाशांचे शाळेचे पुस्तक -              

         मॉरिशसला गेल्यावर सर्वप्रथम मी बाजारात जाऊन शाळेची पुस्तकं कुठे मिळतात त्याची चौकशी करून ते दुकान शोधून काढलं. मला मॉरिशसच्या नकाशांचं हवं असलेलं पुस्तक तेथे मिळालं. मला नुसते रोड मॅप्स नको होते. तेथील नद्यांची नाव, डोंगराची नावं, शिखरांची नावं, राजकीय, आजुबाजूच्या बेट-बेटुल्यांची नावं, पाऊस, पिकं, बंदर, शेजारी देश, देशात कुठल्या इतर देशांची विमानं येतात, ही मला पाहिजे असलेली माहिती पाहून मी हरखून गेले. मॉरिशस बस सेवेचं एक पुस्तकही  क्वात्र बोर्नच्या बस डेपोत उपलब्ध झालं. आता मॉरिशसची मुशाफिरी करायला मी मोकळी होते. मुंबई दर्शन, किंवा आपल्याकडे असलेल्या प्रत्येक राज्याच्या टुरिस्ट बसेस सारखी येथे टुरिस्टसाठी सरकारी बसेसची वेगळी सोय नव्हती. टुरिस्टनी प्रायव्हेट टॅक्सीनेच हवे तेथे जाणे अपेक्षित होते.  टुरिझमचा कुठलाही बोजा स्वतःच्या डोक्यावर घेता सरकारने टुरिझमला पाठिंबा दिला होता. इतकच नव्हे तर इथले कित्येक सुंदर डोंगर, समुद्र किनारे, रमणीय जागा, अगदि नद्या सुद्धा सरकारने हॉटेल्स आणि टुरिझमसाठी विकून टाकल्या आहेत. बहुतेक सर्व सुंदर जागा ह्या प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याने त्या जागांची चांगली काळजी घेण्याचं काम, त्या सुंदर बनविण्याचं काम हे त्या मालकांकडेच असतं. मॉरिशसच्या जनसामान्य नागरिकांना त्यांचे नियम पाळून आणि त्यांचे मूल्य भरूनच तेथे प्रवेश करता येतो. तेथे खुले आम वावरता येत नाही.

पोस्ट ऑफिस -

ईमेलच्या जोडीने माझी पत्राची सवय थोडीफार टिकून होती. कारण तेंव्हा मराठी टायपिंगची सोय इतकी चुटकीसरशी हाताशी नव्हती. whats app चा जमाना सुरू झाला नव्हता. आई, लाडका लेक, नातेवाईक  ह्यांना अधुन मधुन पत्र लिहायच म्हणजे मला पोस्ट ऑफिस गाठावं लागे. पोस्ट ऑफिसमधे गर्दी असे पण तेथील स्टँप्स, पाकिटं, आंतर्देशीय पत्र इतकी सुरेख असत की कित्येक वेळा भारतात येतांना मुलांना द्यायला मॉरिशसची गम्मत म्हणून छानछान स्टँप्स आणत असे.         

 वाचनालय आणि  मॉरिशसचा अल्पसा इतिहास (Mauritius : History) -

                  क्वात्रबोर्नच्या म्युन्सिपाल्टीमधे एक छान पुस्तकालय असल्याने लगेचच मी त्याचं सदस्यत्व घेतलं. तेथे सर्व वर्तमानपत्रे येत असत. पण ती फ्रेंच असत. इंग्रजी national Geographic ची पुस्तकं येत. संपूर्ण शेक्सपिअर आणि संदर्भग्रंथ होते.  बहुतेक फ्रेंच पुस्तक असली तरी  मॉरिशसच्या भूतकाळावर प्रकाश टाकणारी काही छोटी छोटी इंग्रजी पुस्तकं उपलब्ध होती. मॉरिशसमधे कामगार किंवा गुलाम म्हणून आलेल्या लोकांची आत्मवृत्तही होती. अथवा त्यांच्या मुला-नातवांनी लिहिलेली त्यांची माहिती होती.

            एक पुस्तक अफ्रिकेतून आलेल्या अफ्रिकन वंशाच्या नातु, पणतु किंवा खापरपणतु यापैकी कोणीतरी त्यांच्या पूर्वजांबद्दल लिहिलेलं होतं. गुलाम म्हणून त्यांना आणल्यानंतर त्यांचे झालेले हाल, ह्यासोबतच त्यांचे तिथले त्यावेळचे जीवन ह्याचीही माहिती देणारं होतं. गवताने शाकारलेल्या मातीच्या छोट्याशा झोपडीत त्यांच कुटंब रहात असे. आई बाबा सकाळीच शेतात राबायला जात. मिळेल तो दगड, किंवा चिंध्यांच्या चेंडू बरोबर खेळत रहावं लागे. संडासला लागली तर घराबाहेर कुठेही बसायचं. फ्रेंचांनी त्यांच्या ह्या सवयीला सक्त आळा घातला. तेंव्हापासूनच मॉरिशस हागणदारी मुक्त केलं गेलं.

               काही पुस्तकातील ती गुलामगीरीची भीषण वर्णन वाचल्यावर सारे प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यापुढुन सरकत होते. वाटलं, अफ्रिकेतून आणलेल्या काळ्या गुलांमाची कातडी लोंबेपर्यंत त्यांच्यावर ओढलेले आसूड आणि त्यांच्या प्राणांतिक किंकाळ्या आजही लेमोर्न पहाडाच्या शांत स्तब्ध कडे-कपारीत घुमत असतील. लेमोर्नचा अर्थच मरणाचा डोंगर! मृत्यूचा पहाड!! यमाचा सापळा!!! ज्या काळ्या गुलामांना पळून जाण्यात यश मिळालं, त्यांनी बेसॉल्टच्या बनलेल्या ह्या काळ्या कभिन्न पत्थराचा आश्रय घेतला. जीवन जगण्यासाठी नव्हे तर जीवन समुद्रात विसर्जित करण्यासाठी. ह्या काळ्या पहाडावरून समुद्रात उडी मारून जीवन संपवणं हे फ्रेंच्यांच्या अत्याचारापेक्षा सुसह्य होतं. ह्या सरळसोट पहाडीखाली पसरलेला अथांग समुद्र कनवाळुपणे ह्या गुलामांना कायमचं पोटात घेई.

मॉरिशसच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिण टोकावर  उभा असलेला 1824 फूट उंचीचा हा पर्वत आजही गुलामगिरी विरुद्ध दिलेल्या लढ्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. गोर्‍यांनी काळ्यांवर केलेल्या भीषण अत्याचाराचं प्रतीक! ह्या पर्वतावर अनेक गुहा आणि लपायला असलेल्या ठिकाणांमुळे काही जण त्यात लपून छपून राहिलेही. 1770 ते 1830 पर्यंत ह्या पर्वताने  ह्या कृष्णवर्णी लोकांना आश्रय दिला.

पँम्पलेमूसचं खोर्याने ( bassin de Pamplemousses) आजही ह्या गुलामांच्या आठवणी ताज्या ठेवल्या आहेत. बाजारात किंवा मॉलमधे विकण्यासाठी जशा वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. तसा गुलामांनाही बाजारात रांगेत उभे केले जाई. भाजीपाला विकण्यापूर्वी जसा धुवून मग ठेवला जातो तसे गुलामांना खरारा करून धुतले जाई. प्रदर्शनात ठेवलेली  वस्तू जशी पारखून  विकत घेतली जाते तसे विकत घेण्यापूर्वी  गुलामांना निवडून मग त्यांची रवानगी त्यांच्या गोर्या मालकाकडे केली जाई. अशाप्रकारे एक लाख साठ हजार गुलाम मॉरिशसच्या बेटावर आणल्याची नोंद आहे. मॉरिशसमधे 1834 ला गुलामांच्या व्यापारावर आणि माणसांना गुलाम म्हणून वागवायला अखेर बंदी घालण्यात आली. `आमचे पूर्वज गुलाम होते. आमच्या कातडीचा रंग हा त्यांच्याकडूनच आमच्याकडे आला आहे. आम्ही त्यांचे बलिदान विसरलो नाही.' असे सांगत आजही इथे असलेली त्यांची प्रजा आपल्या पूर्वजांच्या ऋणाचे स्मरण ठेऊन आहे. आणि त्याच बरोबर फ्रेंच्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी झालेल्या गुलामांच्या व्यापाराचेही! गुलामांच्या व्यापाराचं स्मरण आणि गुलामगिरीला विराम ह्यासाठी सर्व जगात 23 ऑगस्ट हा दिवस पाळला जातो. हैती, सेनेगल, मॉरिशस ह्या ठिकाणी ह्या दिवसाचं स्मरण होणे अशक्य. 

 

    मौखिक इतिहास -      

          एका छोट्याशा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझे डोळे खिळून राहिले. धोतर, बाराबंदी, मुंडासं, जोडे घातलेल्या आठरा एकोणीस वर्षाच्या तरुणाबरोबर नऊवारी साडी नेसलेली, कपाळावर कुंकवाची आडवी चिरी रेखाटलेली, एका हाताने डोक्यावरचा ईरकली लुगड्याचा पदर सावरत दुसर्या हाताने कमरेवरचं गाठोडं आवळून धरणारी सोळा सतरा वर्षांची तरुणी मला शतक दोन शतक मागे घेऊन गेले. तरुणाच्या हाती फिरकीचा तांब्या, डोक्यावर अंथरूण-पांघरुणाची वळकटी. एका मॉरिशियन मराठी लेखकाने आपल्या पूर्वजांच्या  लिहिलेल्या आठवणी होत्या त्या. त्यांच्या पूर्वजांना आपल्या आठवणी लिहिता याव्यात इतका  स्वस्थ काळ मिळाला नाही. कित्येकांना लिखाणाची कलाही अवगत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येथे मौखिक इतिहासाला (Oral History) लिखित इतिहासाइतकच महत्त्व दिलं जातं. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी पुढच्या पिढीला सांगितल्या जातात. इतकेच नव्हे तर त्यांचे पूर्वज येतांना घेऊन आलेल्या उखळ, मुसळ, पाटावरवंटा यांचीही वाटणी होते. चांगल्या चांगल्या नवीन पद्धतींच्या पॉश बंगल्यामधेही ओट्यावर सिमेंटमधे बसवून घेतलेला पाटावरवंटा मी पाहिला. तर कुठे स्वयंपाकघराच्या कोपर्यात उभं असलेलं उखळ आणि मुसळ भारतीय वंशाच्या बांधवांनी आम्हाला कौतुकानी स्वयंपाकघरात नेऊन दाखवलं. ``आमची जेंव्हा वाटणी झाली तेंव्हा माझ्या वाट्याला माझ्या आज्याचं हे उखळ आणि मुसळ आलं. माझी बहीण जातं घेऊन गेली. माझ्या भावाकडे पाटावरवंटा आहे. ''  पूर्वजांच्या गरीबीतही असलेली मायेची उब पाटावरवंटा. उखळ, जातं ह्या रूपात सांभाळून ठेवली आहे असं वाटलं. `` हे आमच्या आज्याच!'' ( मराठी लोकं अजूनही आपल्या पूर्वजांचा उल्लेख आज्या म्हणून करतात.) आपल्या पूर्वजांनी केलेल्या काबाडकष्टांमुळेच आपण आज आपण श्रीमंत झालो. सुशिक्षित झालो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात समईच्या ज्योतीसारखी मंद आणि शांत प्रकाश देत तेवत होती.

 आप्रवासी घाट -  

          ज्या भारतीय वेठबिगारांच्या हातांनी मॉरिशस घडलं, ज्या भारतीय वेठबिगारांमुळे मॉरिशसची भूमी सुजला, सुफला झाली, ज्या वेठबिगांरांमुळे संपूर्ण मॉरिशसच रुपांतर हिरव्यागार उसाच्या शेतीत झालं, जे वेठबिगार आपले आई-वडिल, कुटुंब, मुलेबाळे भारतात सोडून येथे आले असता ज्यांना परत आपल्या कुटुंबियांचं दर्शनही झालं नाही, ज्यांना आपल्या मातृभूमीची ओढ असूनही ब्रिटिशांनी त्यांचे मातृभूमीला परतण्याचे दोर कधीच कापून टाकले, त्या आपल्या भारतीय पूर्वजांनी मॉरिशसमधे त्यांचं पहिलं पाऊल ठेवलं ती वास्तू म्हणजे पोर्ट लुईच्या Trou Fanfaron  या भागातील  `आप्रवासी घाट'.  पूर्वी त्याला `कूली घाट' असं म्हटलं जाई. आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाबद्दल असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेमुळे ह्या वास्तूबद्दल लोकांच्या मनात नाजुक भावना आहेत. हे लक्षात घेऊन 1987 ला त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्या वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला गेला. मॉरिशसमधे जो अनेक संस्कृतींचा संगम पहायला मिळतो, जणु  आप्रवासी घाट हे त्याचेच चिह्न आहे. गुलामीचा कायदा संपुष्टात आल्यावर, 1830 ते 1920 या काळात 4,50,000 वेठबिगार भारत, चीन, मादागास्करहून आपली मातृभूमी सोडून येथे दाखल झाले. बहुतेकजण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहिले. मरतांना आपली मुले  अजुन पुढे काम करण्यासाठी इथेच सोडून गेले. सिंहाच्या गुहेत आत जाणार्या प्राण्याच्या  पावलांचे ठसे दिसतात. पण बाहेर पडणार्या पावलांची निशाणी दिसत नाही हे सांगणारा पंचतंत्रातील चतुर कोल्हा आठवून गेला.

ह्या आलेल्या सर्व लोकांची दोन दिवस तात्पुरती रहाण्याची, जेवणाची, झोपायची व्यवस्था येथे उभारलेल्या आगारात करण्यात येत असे.

 1849 ला येथे Immigration विभागाने, आलेल्या  मजुरांची नोंद ठेवण्यासाठी सुरक्षा विभाग  (protector of the Immigrants) सुरू केला.  नवीन आलेल्या वेठबिगारांना येथे उतरवून घेणे, त्यांचे फोटो काढणे, त्यांचे नाव इत्यादि माहितीची नोंद करून घेणे, त्यांना मॉरिशससाठी  प्रवेशपत्र देणे, विविध साखर-क्षेत्रांमधे त्यांची वाटणी/ नेमणूक करणे, सार्वजनिक बांधकामांवर त्यांची नेमणूक करणे किंवा कामाशिवाय फिरणार्या वेठबिगारांना शोधून काढून त्यांना कामाला लावणे, लग्नाचा दाखला देणे,  त्यांच्याकडून कर गोळा करणे, वेठबिगार जेथे जेथे काम करत असतील तेथे त्यांच्यावर लक्ष ठेवणे, वारंवार तेथे भेटी देणे, त्यांची स्वच्छता, सांडपाणी आणि मैल्याची योग्य विल्हेवाट लावली जाण्याकडे काटेकोर लक्ष देणे, ही कामे या कार्यालयातून केली जात.

आज मॉरिशसच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे ह्या  वास्तूला जागतिक सांस्कृतिक वारशाचे ठिकाण (World Heritage Site) म्हणून युनेस्कोने (UNESCO) 2006 ला मान्यता दिली आहे.

             आजही  भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान मॉरिशसला आले की ह्या स्थळाला भेट देऊन पुष्पचक्र वाहून ह्या लोकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्याच्या बलिदानाची  आठवण ताजी ठेवतात.  आम्ही मॉरिशसला असतांनाच्या दोन वर्षात पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मॉरिशस भेटीचा प्रारंभ ह्या वास्तूला भेट देऊनच झाला होता. श्री. कलामांनी आप्रवासी घाटावर काढलेले उद्गार आजही मला आठवतात. "Our ansestors did sweat, sweat, sweat, and sweat to make this country what it is today. - - आपले पूर्वज इथे  राब राब राबले त्यांनी गाळलेल्या घामातून आज दिसणारं हे सुंदर राष्ट्र उभं राहिलं आज आमच्या युवकांनी इथे येऊन आपल्या पूर्वजांनी केलेल्या  अपरिमित कष्टांची नोंद घेतली पाहिजे. आप्रवासी घाट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालून जणु सांगत आहे की, कठोर कष्टांशिवाय कुठलीही चागली गोष्ट साध्य होत नाही. ''

पोर्ट लुईचा किल्ला - (The Citadel / Fort Adelaide)

               आप्रवासी घाटासोबत उल्लेख करायला पाहिजे तो पोर्ट लुईच्या किल्ल्याचा. हा किल्ला `सिटॅडेल किंवा फोर्ट एडलेड नावाने ओळखला जातो. समुद्र-सपाटीपासून चांगला 240 फूट ऊंचीवर असल्याने अगदि किल्याच्या नाकाखालीच असलेल्या शहरात काय चाललं आहे त्याच्यावर कडक नजर ठेवायला जसा तो उपयोगी होता; तसाच येथून दिसणार्या विशाल समुद्र, आणि पोर्टलुईच्या बंदरावर, जहाजांवर लक्ष ठेवायलाही ही जागा  सुयोग्य होती. किंबहुना त्या जागेचं स्थान महात्म्य पाहूनच 1834 - 1840 मधे गव्हर्नर सर विल्यम निकोलाय (Sir William Nicolay) ह्यांच्या काळात  हा किल्ला बांधला गेला होता. विल्यम 4 ह्यांची पत्नी एडलेडचं नाव ह्या किल्ल्याला मिळालं. हा किल्ला शत्रूच्या आगमनाची वार्ता सतत देत राहिला. ह्या किल्ल्यामुळेच येथे आलेला कोणी प्रवासी येथून निसटु शकला नाही.

           ``ग्लोबल इन्शुरन्स’’ कंपनीचे प्रमुख आमचे मुंबईचे मित्र श्रीनिवासन आणि त्यांची पत्नी चंद्रा ही नवी जागा दाखवायला आम्हाला घेऊन आले होते.  रस्त्याच्या दुतर्फा  वाढलेल्या उंच उंच सवाना गवतातून वळणं वळणं घेत गाडी जातांना बाहेरचा वारा सुरेल बासरी वाजवत होता . गाडी टेकडीच्या शिखरावर पोचली. गाडीतून बाहेर आलो आणि समोरच्या दृश्यात  कधी हरवून गेलो  हे कळलच नाही. डावीकडे मॉरिशसच्या रेसकोर्सचा ट्रॅक, (Champ de Mars)  त्यामागे  ऐटीत उभा असलेला `ले पुस' (Le Pouce -Le म्हणजे इग्रजीत The आणि पुस म्हणजे Thumb -अंगठा) डोंगराचा कडा आपल्याकडील `नानाच्या अंगठ्याची' आठवण करून देत होता. तर उजवीकडे पसरलेला विशाल निळाशार समुद्र, नांगर टाकून उभी असलेली जहाजं, उंच इमारती. पोर्टलुईचा सारा परिसर नजरेच्या टप्यात होता. त्याचं स्थानिक महात्म्य आजही तेवढच मोलाचं वाटलं. सतत वाहणारा वारा डोक्यावरील टोप्यांना आणि केसांना त्यांच्या जागेवरून उडवत होता, तर इतिहासामागे आणि निसर्गामागे धावणार्या मनाला मात्र वारंवार भानावर आणत होता. हवेतला प्राणवायू वाढलेला पाहून आपली परवानगी घेताच नाकने फुफ्फुसांच्या पिशव्या भरभरून प्राणवायू साठवून घ्यायला सुरवात केली.  किल्ल्याच्या भिंतीवरून हिंडतांना पुण्याच्या पर्वतीवरील किल्ल्याच्या रुंद भिंतीची आणि त्यावरून  30- 40 वर्षापूर्वी दिसणार्या पुण्याची आठवण करून दिली.

 

मॉरिशसचा थोडक्यात इतिहास -

                                 

                     1598 पर्यंत मॉरिशस हे बेट मानवाकडून दुर्लक्षित, अस्पर्शितच राहून गेलं होतं. पृथ्वीवर इतर ठिकाणी सापडणार्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचं तेथे असलेलं जीव वैविध्य इतर ठिकाणी क्वचितच सापडलं असतं. येथे येणारी अरबांची जहाजं मॉरिशसला विश्रांतीसाठी थोडावेळ थांबत होती पण मॉरिशसवर वस्ती मात्र कोणी केली नाही. 1638 ला मात्र इच लोकांनी तिथे वस्ती करायला सुरवात केली. युरोपवरुन  अख्ख्या अफ्रिकेला वळसा घालून आल्यावर  ह्या बेटावर मुक्कामाला थांबण हे त्यांना आवश्यक होतं. युरोप ते भारत ह्या जलमार्गावरील हा सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा थांबा होता. मॉरिशसच्या दक्षिण पूर्व किनार्यावर Old Grand Port येथे डचांनी वसाहत स्थापन करण्यास सुरवात केली. ह्या बेटावरील पहिली वसाहत म्हणून तेथे आज The Frederik Hendrik Museum असे डच कॉलनीचे म्युझियम आहे. Key and Star of Indian Ocean  ही पदवी म्हणुनच ह्या बेटाला लाभली. जी आज मॉरिशसच्या Coat of Arms वर विद्यमान आहे. आजही Indian Ocean मधे मॉरिशसचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण आशिया आणि आफ्रिका खंडावर नजर ठेवण्यास मॉरिशस इतकी योग्य जागा नाही ज्यामुळे सर्वदेश मॉरिशसवर कृपा-वर्षाव करत असतात. सिंधुसागरातल्या (Indian Ocean) चीनच्या अनिर्बंध हालचालींवर योग्य नियंत्रण ठेवता यावं ह्यासाठी भारतालाही राजकीय दृष्ट्या मॉरिशसची मैत्री आवश्यक आहे. मॉरिशसमधील आगालिगा (Agalega) हे बेट भारतासाठी त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे मॉरिशसला जेटी बांधून देऊन बंदर विकासाचे काम भारत करीत आहे. त्यातून  आगालिगा संदर्भात भारत संवेदनाशील आहे हे अधोरेखीत होते.

                 बेटावर असलेलं गोडं पाणी, मुबलक मिळणारे डोडो पक्षी, प्रचंड मोठी कासवं ह्यामुळे डचांच्या उदरभरणाचीही सोय झाली. थोड्याच दिवसात ह्या प्राणीजीवनावर संक्रांत आली. बघता बघता डोडो जमिनीवरून नामशेष झाले. तीच गत अनेक प्रकारच्या कासवाचीही झाली. त्यांच्या भक्कम पाठी कॅबिनेट्स् बनवायच्या कामी उपयोगात आल्या. डोडो, सॉलितायर सारखे अनेक पक्षी  हे त्यांच्या उडता येण्यामुळे डचांच्या क्रौर्याचे शिकार झाले. डोडो हा पक्षी वर्षाला एकच अंड घालत असे आणि तेसुद्धा जमिनीवर. त्यामुळे डचांनी बरोबर आणलेल्या कुत्र्या, मांजरांना आणि  जहाजातून धान्यसाठ्यासोबत आलेल्या उंदरानाही त्यांची शिकार सोपी झाली.  त्यांनीही हे पक्षी संपवण्यास हातभार लावला.

               डचांच्या जिह्वालौल्याने जसे इथले अनेक प्राणी जगाच्या पाठीवरून नामशेष झाले तसे डचांच्याच जिह्वालौल्याने काही प्राणी  या बेटावर नव्याने आलेही. डचांनी इंडोनेशियाच्या बेटांवर सापडणारी `जावा रुसा' जातीची हरणं खाण्यासाठी ह्या बेटावर आणली. त्यांना कुंपणात बंदिस्त ठेवलेलं असतांनाच आलेल्या वादळात कुंपण मोडून हरणं आसपासच्या रानात पळून गेली. मॉरिशसमधे शिकारी प्राणी, पक्षी नसल्याने ह्या हरणांची संख्या बघता बघता एवढी वाढली की त्यांचे कळपच्या कळप रानावनात हिंडून तेथील गवत आणि झाडं फस्त करु लागले.

             आजही जून ते ऑक्टोबर हा काळ मॉरिशसमधे शिकरप्रेमींना पर्वणीच मानला जातो. आणि अनेक दुकानात आणि हॉटेल्समधे हरणाचं मांस मिळेल अशा पाट्या दिसायला लागतात. एकेकाळी मॉरिशसचे रहिवासी असलेले पण आता नामशेष झालेले डोडो आणि पूर्वी मॉरिशसमधे नसलेली पण आता मॉरिशसच ज्यांची जन्मभूमी झाली आहे अशी रूसा हरणं ह्याही दोघांना उसासोबत मॉरिशसच्या `कोट ऑफ आर्मस्' वर स्थान मिळालं आहे.

                1710 पर्यंत डच लोकांचं वर्चस्व असलेली ही भूमी 1715 मध्ये फ्रेंच्यांच्या ताब्यात आली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने इथला कारभार पहायला सुरवात केली. वसाहती वसवायला सुरवात झाली.   Île de France ह्या नावाने बेटाचं बारसं झालं. 1767 पासून शेजारीच असलेल्या मादागास्कर, मोझांबिक आणि अफ्रिकेच्या अनेक भागांमधून इथे गुलाम आणायला सुरवात झाली. ह्या गुलांमांच्या कष्टप्रद जीवनाची चुणुक आजही  इथल्या माहेबुर्गच्या म्युझियम मधल्या चित्रांमधे पहायला मिळते. “ माणसाला जे जे रोग होऊ शकतात ते आम्हालाही होऊ शकतातअसं सांगणार्या गुलामांची करूण कहाणी चित्ररूपात तेथे पहायला मिळते. जहाजाच्या तळाशी एकावर एक कोंबड्या डुकरांप्रमाणे लादून आणलेल्या गुलामांची चित्र आजही माणूसकीला काळिमा वाटतात.

                 1810 मधे  ब्रिटेन आणि फ्रांसच्या युद्धात  ब्रिटेनची सरशी झाली Île de France ब्रिटिश राज्याला जोडलं गेलं. परत एकदा नव्यानं त्याचं बारसं होऊन त्याचं नाव मॉरिशस ठेवण्यात आलं. गाय विकली की तिच्या दूधावर अवलंबून असलेलं वासरूही गायीबरोबर दिलं जातं तसं 1814 ला पॅरिसच्या तहानुसार मॉरिशसचे दोन्ही हात धरून उभी असलेली रॉड्रिग्ज आणि सेशल ही बेटंही ब्रिटनकडे गेली.

               ब्रिटिशांसोबत झालेल्या युद्धात हरल्यावरही फ्रेंचांनी मॉरिशस आणि आजुबाजूच्या देशांमधे शालेय शिक्षण फ्रेंचमधून मिळावं असा आग्रह धरला. पर्यायाने या देशांची नाळ फ्रांसच्या वातावरणाला बांधली गेली. आणि फ्रेंचांचे वर्चस्व कायमचे मान्य करून त्या देशाशीच जवळीक साधू लागली. पण त्या देशाचे नागरीक म्हणून नाही तर त्या देशावर अवलंबून असलेले दुय्यम म्हणून. इंग्रजी राष्ट्रभाषा असली तरी संपूर्ण मॉरिशसमधे फ्रेंच आणि क्रेयॉल ह्याच रस्त्या,बाजारातून वाहणार्या भाषा आहेत.

मातृभाषेतूनच पोसल्या जाणार्या आपल्या संस्कृतीचा भक्कम आधार तुटलेले हे सारे अफ्रिकी खंडातील देश दोर तुटलेल्या पतंगांसारखे पाश्चिमात्य संस्कृतीच्या आकाशात गोते खात आहेत. मूळं तोडून टाकलेल्या वृक्षांसारखे उन्मळून पडत आहेत. श्रद्धा डळमळीत झाली की त्याक्षणीच जीवन अर्थहीन झाल्याशिवाय रहात नाही.  फ्रेंचांनी हेच मर्म बरोबर ओळखलं. पण आम्हा भारतीयांना कधी कळणार?

                   आत्तापर्यंत गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली होती कायद्याने आणि कागदावर. 1834 साली नोंदणी केलेले 68,616 गुलाम त्या बेटावर होते. त्याजागी आता वेठबिगारी (indentured labourers)  ची प्रथा सुरू झाली. गुलामगिरीची ही सुधारित आवृत्ती. मुक्तता इथेही नाही. मालकाच्या मनाप्रमाणे राबणं आलच.  इंग्रजांचं राज्य भारतावर होतच. एकट्या भारतातून दोन लाख मजूर नेल्याची नोंद आहे. थोडे चिनी व्यापारी आणि काही भारतीय व्यापारीही त्यात सामील झाले. 1835 ला जेमतेम एक लाख लोकसंख्या असलेल्या देशाची लोकसंख्या शतका अखेर 3,71,000 पर्यंत फुगली.

  साखर

                ब्रिटनला आणि युरोपला साखरेची जरूर होती. ती हमखास मिळण्याची जागा त्यांनी शोधून काढली. ती म्हणजे मॉरिशस. आज मॉरिशसला युरोपच्या साखरेचं पोतं म्हणायला काही हरकत नाही, फारच गोड शब्दात युरोपचा साखरेचा क्युब म्हणु या हव तर. युरोपला लागणारी सगळी साखर तेंव्हापासून आजपावेतो मॉरिशसमधून जाते. मॉरिशसच्या बेटभर कानाकोपर्यात पसरलेल्या उसाचं एकमेव पीक हे युरोपच्या हुकमी बाजारपेठेचं गणित आहे. आजही मॉरिशसमधल्या कुठल्याही मॉलमधे गेलं की साखरेचं एक वेगळ शेल्फच असतं. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची साखर असते. Dark chocolate  सारखी अगदी गडद ब्राऊन पासून पांढरी शुभ्र ह्या दोन टोकाच्या रंगांमधे  ब्राऊन, थोडी कमी ब्राऊन, पिवळसर,  ऑफ व्हाईट, व्हाईट अशी चार पाच रंगांची तरी साखर असते. ब्राऊन साखर आपल्या गुळासारखी खमंग असे.  आपण वापरतो ती नेहमीची साखर 4 रु. पौंड असे तर मीठ मात्र 10 रु पौंड. म्हणून आम्ही मॉरिशसला साखरेपेक्षा मीठ महाग असलेला देश म्हणत असू. पण आज गोड वाटणार्या साखरेमागचा इतिहास मात्र फार कडू होता.

                     इंग्रजांना  मॉरिशसमधे उसाची लागवड करायची होती. ह्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करणं आवश्यक होतं. मॉरिशस हे बेट हे लाव्हापासून तयार झाले आहे. येथील जमिनीचा पोत चांगला होता पण इथल्या जमिनीवर प्रचंड मोठे धोंडे जागोजागी पडलेले होते; चेंडू एवढ्या आकारापासून खोली एवढ्या आकारापर्यंत. मॉरिशसच्या सुबाना बिस्किट कंपनीचे मालक आणि आमचे मित्र रामधनी यांचे फुफाजी एकदा आम्हाला भेटले होते. त्यांनी आम्हाला विचारल, ``भारतातही जमिनीवर असेच धोंडे, शिळा सापडतात का?'' आजही पाहिलं तर मॉरिशसच्या जमिनीवर भलेमोठे धोंडे, प्रचंड शिळा दिसतात. त्या दूर करणं आवश्यक होतं. भारतात इंग्रजांनी हूल उठवून दिली, मॉरिशसमधे दगड दूर केला की सोनच सोन सापडतं. मॉरिसस कुठे आहे, किती दूर आहे याची इथल्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. सोनं सापडेल ह्या खोट्या आश्वासनावर  आणि आशेवर सर्व प्रांतांमधील दोन लाखापेक्षा अधिक गरीब भारतीय प्रजा त्यांना माहीत नसलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाले. जातांना अनेकजण आपल्याबरोबर बायका, मुलं,  आंबा, फणस जी आवडत असतील ती झाडं, कुत्री मांजरी, आपलं सारं चंबुगबाळं घेऊन गेले. अनेकांचे म्हातारे आई-वडिल भारतातच राहून गेले. अज्ञानाने माणसांचा नुसता धूळ, कचरा करून टाकला. सोनं मिळण्याच्या आशेच्या वावटळीने ह्या मानवी धूळीला मनोरथांचं अंतराळ फिरवून असचं सोडून दिलं कुठेही! अधांतरी नाहीतर पायतळी. अनेक बोटीत मेले. पहाटे चार वाजताच त्यांना जेवण देऊन पाच वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतले जाई.

                    पूर्वी भारतात अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर माणसांना लुबाडून मारून टाकायचा. प्रत्येक मारलेल्या माणसाची करंगळी कापून घ्यायला विसरायचा नाही. ह्या सगळ्या करंगळ्यांच्या माळा करून तो गळ्यात घाले. वाल्याकोळ्याने, मारलेल्या लोकांच्या नावाने एक एक खडा रांजणात टाकला. त्याने रांजणही भरून गेला.  त्याचप्रमाणे आजही मॉरिशसला  शेतांच्या बांधाबांधावर रचून ठेवलेल्या  छोट्या मोठ्या दगड आणि शिळा याच्या राशी अंगुलीमालच्या गळ्यातील करंगळ्यांच्या माळांची आठवण करुन देतात. ठिकठिकाणी उसाच्या फडासाठी केलेली कुंपणं ह्याच दगड धोंड्यांनी बनलेली आहेत. तर कधी शेताच्या अधे मधे मोठाल्या शिळांच्या राशी आढळतात. दगडाखालील साखरेचं गोड सोनं मात्र काही मोजक्यांच्याच खिशात गेलं. आजही मॉरिशला असलेली विस्तृत उस शेती मोजक्याच फ्रेंच कुटुंबियांच्या मालकीची आहे. आणि आजही शेताशेतांच्या कडेला ढीग बनवून ठेवलेल्या  धोंड्यांच्या राशी ह्या आपल्या पूर्वजांच्या कष्टांची ग्वाही देत उभ्या दिसतील. ह्या कष्टकर्यांना दिवसभर कष्ट केल्यावर संध्याकाळी वेळ घालवायला काही साधन नसे. संध्याकाळचा वेळ कसा घालवायचा ह्या विचाराने अनेक जण दारू पिऊ लागले. अशांसाठी ख्रिश्चन मिशनर्यांनी त्यांची प्रवचने सुरू केली. ह्या धर्मप्रसार मोहिमेत प्रामुख्याने अनेक तामीळ  ख्रिश्चन झाले.

            तेंव्हाही बिहारी मजूर त्यांच्या अंगभूत कणखरपणाने खूप कष्टातूनही निभावून गेले. आणि आजही हिंदू धर्म टिकवून आहेत. केरळी माणसांचा ह्या प्रचंड काबाडकष्टांपुढे निभाव लागला नाही. आज त्यांचे कोणी वंशज तेथे दिसत नाहीत. परकीयांची चाकरी करायची नाही ह्या छत्रपती शिवाजीच्या मूशीतून तयार झालेले मराठे इंग्रजांना गुंगारा देऊन तेथील Seven Cascade (सात टप्प्यांवरून कोसळणारा धबधबा)च्या दरीत लपून बसले. त्या दरीत डोकावून पाहिल्यावर आजही चक्रावून जायला होतं. हे तेथे आत उतरले कसे असतील आणि त्या दरीत त्यांनी शेती कशी केली असेल कोण जाणे. हे मराठी लोकं त्यांच्या मोठ्या मोठ्या कल्लेदार तानाजी मिशांसाठी प्रसिद्ध होते. ( तानाजी मिशा हा वाक्प्रचार खुद्द आमच्या मॉरिशियन मराठी मित्रांकडूनच ऐकला.) त्या दरीत शेती करून उगवेल तेवढ अन्न खाऊन ते राहिले. तयार केलेल्या, वहाणा, दोर्या इत्यादि बारिक सारिक वस्तू ते दरी चढून येऊन विकून जात असत; ते सुद्धा इंग्रजांचा डोळा चुकवून. बरेच दिवस आपल्या छपरी मिशांमुळे ओळखले जाणारे  मर्हाटे  आज मात्र त्यांची स्वतंत्र ओळख  दाखवून आहेत.

     येथे आलेल्या भारतीयांना एक ना एक दिवस आपण आपल्या मातृभूमीला परत जाऊ ही आस मनात कायम होती. मातृभूमीशी जोडलेली त्यांची नाळ तेथे जाऊनही तुटली नाही. मिळतील ते राणी छापाचे चांदीचे रुपये फिरकीच्या तांब्यांमधे ते साठवत राहिले.  मातृभूमीला परत जायच्या ओढीने, संपूर्ण आयुष्याची पुंजी साठवलेले हे तांबे चुलीच्या खाली पुरलेले तसेच राहून गेले. इंग्रजांनी त्यांच्या परतीचे दोर कधीच कापून टाकले होते. आता आयुष्याचे दोरही  मधेच तुटले. पण मातृभूमीच्या मातीच्या ओढीचा अंकुर पुढच्या पिढीच्या हृदयात पेरून गेले. आज ते तांबे त्यातील नाण्यांसकट माहेबुर्गच्या म्युझियममधे येऊन दाखल झाले.

                          

मानवी वृक्षाची मुळे -

             इतके दिवस मला असं वाटत होतं की एका जागी उभ्या असलेल्या वृक्षालाच मुळं असतात. ज्यामुळे तो सुखावलेला दिसतो. अविचल, ताठपणे, ठामपणे मातीत उभा असतो. पण मॉरिशसमधे आल्यावर जाणवलं की माणसाला सुद्धा मुळं असतात. ती त्याच्या आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा यांच्या रूपाने `त्यांच्या' जन्मभूमीच्या मातीत अदृश्यपणे खोल खोल रुजलेली असतात. त्याच मातीला घट्ट धरून असतात. नीलगिरीच्या झाडांची साल झडून गेली तरी त्यांचा बुंधा भरभक्कम आधार देत राहतो तसे पूर्वज दिवंगत झाले तरी, त्यांचा इतिहास, त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्त्व, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती त्यांचे आचार, विचार, त्यांचं तत्वज्ञान ह्या रूपात ती (मुळं) मजबूतपणे माणसाला घट्ट धरून ठेवतात. त्या संस्कृतीच्या रसावरच तो माणूस बहरून येतो. मग भले तो माणूस पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणी राहो. अगदि भटक्या जमातींना सुद्धा अशी घट्ट धरून ठेवणारी मूळं असतातच, त्यांच्या संस्कृतीची. सरसर पुढे पुढे धावणारी लाट किनार्यापर्यंत पोचली की परत जशी समुद्रात मागे सरकते तशी आपली माती सोडून बाहेर गेलेली माणसं परत एकदा तरी मातीच्या ओढीनी आपल्या जन्मभूमीचं नातं शोधत इतिहासाची पानं उलटून बघतात. प्रवीणचे अमेरिकेतील एक प्रोफेसर पोलंडचे होते. दुसर्या महायुद्धापूर्वी त्यांच्या पूर्वजांना पोलंड देश सोडायला लागला. सगळे अमेरिकेत येऊन स्थायिक झाले. पण अमेरीकेतील भरपूर सुखसोयींनी युक्त जीवनही त्यांना चैन पडू देत नव्हतं. परत एकदा आपली पितृभूमी पोलंडच्या ओढीने ते पोलंडला जाऊन आले. `` कसं वाटलं तुम्हाला?'' प्रवीणने त्यांना विचारल्यावर विषादाने म्हणाले, ``काहीच राहिलं नाही आमचं तिकडे. आमचं घरही आमचं राहिलं नाही. तेथेही कोणीतरी दुसरेच रहात होते.'' गुलजारसाहेबही असेच पाकिस्तानात जाऊन आले एकदा. आपलं घर पाहून आल्यावर व्यथित होऊन परत कुठेच जाता आपल्या नव्या कर्मभूमीत येऊन दाखल झाले. डोंगरात उगम पावणारी नदी समुद्राला भेटायला आवेगाने खाली उतरते खरी पण परत एकदा वाफेच्या रूपाने ढगात बसून वार्याचे पंख लावून पर्वताला भेटायला माहेरी येतेच. त्याप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधून, वेगवेगळ्या गावांहून मॉरिशसला पोचलेल्या भारतीयांच्या पुढच्या पिढ्या आजही आपली मूळं शोधायला भारतात येतात.  प्रवीण मॉरिशस मधील अर्थ विभागात गेला असता तेथील मोदी नावाच्या सह सचिवांची भेट झाली. प्रवीण भारतीय असल्याचं कळतातच त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे पूर्वज गुजरातचे होते. गुजरातमधील आपली जन्मभूमी शोधून काढून ते जन्मभूमीला भेट देऊन आले होते; हे प्रवीणला सांगतांनाही त्यांचं अतःकरण उचंबळून आलं. कंठ दाटून आला होता. महाराष्ट्रातून  गेलेले मराठी लोकंही आज परत आपलं कोकणातलं गाव शोधत कोकणात येतात. कुडाळकर महारांजांच्या रूपाने त्यांना एक छानसा निवाराही लाभला आहे. त्यांच्या मठात राहून अनेक जण उत्तम पौरोहित्य शिकून परत  आपल्या कर्मभूमीत दाखल झाले आहेत. आपली जन्मभूमी भेटली की तिथेच गुडघे टेकून जमिनीला नमस्कार करावा तेथील मातीने आपल्या कपाळावर मळवट भरावा आणि ऋद्ध कंठाने तिची भेट घ्यावी  आणि मग आपल्या कर्मभूमीला परतावं ही ओढ सर्वांमधे सामायिकपणे दिसून येते. भारत सोडून गेलेल्या आणि अनेक पिढ्या बाहेर राहिलेल्या भारतीय वंशाच्या अनेक लोकांची ही मानसिक गरज लक्षात घेऊन भारताच्या विदेश सचिवालयात खास अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. ज्या लोकांना आपली मूळ गावं पहायची असतील त्यांना त्यांची गावं शोधण्यासाठी योग्य मदत मिळावी, बाकी लोकांकडून त्यांची फसवणूक होऊ नये, ह्याची काळजी घेतली जाते.

मॉरिशसचा किंचितसा भूगोल -

   मुंबईच्या आकारमानापेक्षा (603km2) जवळ जवळ साडेतीनपट  मोठ असलेलं मॉरिशस बेट (2040 km2)  तसं छोटं असलं तरी एवढ्याशा बेटावर हवामानाचंही वैविध्य होतं. पोर्ट लुई हा उत्तरेचा भाग कायम फार गरम असे तर मध्यातील डोंगरावरचा वाकवा-फिनिक्स (Vacoas Phoenix) / क्युपिप (Cure pipe) भाग त्याच्या उंचीमुळे थंड असे. बेटावर सर्वत्र असलेल्या आंब्यांना वेगवेगळ्या वेळी मोहोर येई. ह्या पिटुकल्या बेटावर पोर्ट लुईला सर्वप्रथम आंबे तयार होत तर फिनिक्सला जेमतेम 50 किलोमिटरवर आंब्याला नुकता मोहोर यायला लागलेला असे. विमानतळाला जाण्याच्या रस्त्यावर मधेच काही भाग असा असे की जेथे कायम पाऊस असे. तेवढा पाच-दहा किलोमिटरचा पट्टा गेला की विमानतळावर जाईपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश. गंगातलाव परिसरात असलेल्या डोंगरांमुळे तेथे अधुन मधुन सतत पाऊस पडे. डोंगर दर्यांसोबत दाट जंगलं, जंगलातून जाणारे गुळगुळीत रस्ते, व्होल्कॅनिक क्रेटर्स, अफाट सपाटी अशा अनेक नैसर्गिक गोष्टी सामावल्या होत्या.  संपूर्ण बेटाभोवती असलेली प्रवाळाची भिंत दक्षिणेला तुटली असल्याने बाकी ठिकाणी शांत झोपलेला समुद्र ग्री ग्री आणि सुफले हया दक्षिण टोकांवर लाटांचा धडक मोर्चा घेऊन येत असे. क्वात्र बोर्नहून पोर्ट लुईला जातांनाही जरा मोकळ्या मोटार-वे ला लागलं की पाऊसाची भुरभुर चालू होई. वादळं हा इथला स्थायीभाव.

-----------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

मॉरिशस मोठं शहर  का छोटा देश - 

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती