पुणेरी पाट्या -

 

आत्तापर्यंत लक्ष गेलेल्या पुणेरी पाट्या -

`पुणेरी पाट्या' ह्या विषयावरील अनेक लेख whats app, F.B, अनेक social media  वरून  अधुन मधुन viral होणं ही नेहमीचीच गोष्ट आहे. पुणेरी पाट्यांबद्दल लिहिणारे हे काही कोणी पहिले नाहीत. 1921 ते 1932 च्या काळातील आचार्य प्र. के. अत्रे यांच्या  साहित्यातही त्यांनी पुणेरी पाट्यांवर  सर्वांच मनोरंजन होईल अशी यथेच्छ लेखणी चालवलेली होती. `माझे खाद्य जीवन' ह्या पु.लंच्या लेखाच्या अर्धशतक आधी अत्रे यांची लेखणी पुण्याच्या ठिकठिकाणच्या मिळणार्‍य़ा खमंग पदार्थात बुचकळून ताजीतवानी झाली होती.  

 हो पण मला बोलायचं आहे पुण्याच्या पाट्यांबद्दल! ज्या इतरांना सहजासहजी दिसल्या नाहीत `त्या' पाट्यांबद्दल. कधीकाळी आईन्स्टाईन म्हणाला होता, `जगात ज्याला जे पाहिजे तेवढच दिसत.' त्याप्रमाणे काही पुणेरी  पाट्या आजही माझ्या नजरेसमोरून हलत नाहीत. त्या पाट्यांनी अनेकांची जीवनं घडवली असतील. अनेकांच्या मनात त्या मंद बकुळीसारख्या दरवळत असतील. देवघरात तेवणार्‍या मंद शांत समईसारख्या अनेक जुन्या हृदयांमधे तेवत असतील. कदाचित अजूनही त्या पाट्या टिकून असतील. कदाचित अर्धबोबड्या इंग्रजीच्या रेट्यापुढे त्या गळूनही पडल्या असतील. कदाचित नवीन चमचमाटात त्या हीनदीन अवस्थेत जगतही असतील.

एके काळी नूमवी हे नाव शाळांच्या अग्रभागी चमकत असे. तेंव्हा 11वी बोर्डाच्या रिझल्टस्ने झळकणार्‍या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जवळ जवळ सर्वच्या सर्व चेहरे हे नूमवि प्रशालेचे असत. गावातल्या ह्या नूमवीच्या दगडी इमारतीवर बाहेरूनही नजर गेली तरी सहज नजरेत भरेल असं एक वाक्य लिहिलेलं असे - `हाती घ्याल ते तडीस न्या.' प्रवीण किंवा मी दोघेही त्या शाळेचे विद्यार्थी नाही तरीही जाता जाता नेहमी दिसणारं हे वाक्य मेंदूचा एक भागच होऊन गेलं आणि काही काळाने जीवनाचाही. ह्या एका वाक्यावर अनेकवेळा तरुन गेलो. अठरा- वीसव्यावर्षीच पुण्याला अल्विदा केल्यावर दिल्ली आणि देशभर आणि देशाबाहेरही नोकरीनिमित्त फिरतांना आलेल्या अनेक भीषण अनुभवांमधेही पाय रोवून उभं राहतांना परत मागे फिरण्याचा विचारही मनाला शिवला नाही. हाती घेतलेले सर्व तडीस नेल्याचा आनंद एका वेगळ्याच रितीने, शांत, सौम्यपणे हृदयात अखंड झिरपत राहतो.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्रविभागात प्रवेश करताच अशीच एक ठळक  अक्षरात लिहिलेली पाटी नजरेत भरत असे. आजही ती तेथे टिकून आहे. तो एक संस्कृत श्लोक आहे -

अमन्त्रमक्षरम् नास्ति नास्ति मूलमनौषधम्

अयोग्यम् वस्तु नास्त्ये योजकस्तत्र दुर्लभः

तेंव्हा शाळेत नुकताच संस्कृतचा परिचय झाला असतांना त्या भव्य इमारतीवरचा तो दिव्य श्लोक गोंदवल्याप्रमाणे मनावर कायमचा विराजमान झाला. प्रत्येक अक्षर हे मंत्रासारखं प्रभावी असतं. किंबहुना असं एकही अक्षर नाही जे मंत्ररूप नाही. अशी एकही वनस्पती नाही किंवा अशी एकही मूळी नाही जी कुठल्या ना कुठल्या औषधावर इलाज म्हणून वापरली जाऊ शकत  नाही. ह्या जगात जिचा काहीच उपयोग नाही अशी एकही अयोग्य वस्तु असु शकत नाही. फक्त एकच गोष्ट दुर्लभ आहे ती म्हणजे तिचा उपयोग जाणणारा माणूस - -योजक.

अमन्त्रम् अक्षरम् अस्ति -

          जर योग्य लेखक असेल तर तो कुठल्याही अक्षराला मंत्ररूप देतो. झरझर झरझर किती ओळी डोळ्यासमोर आल्या. `अविनयमपनय विष्णो' म्हणणारे आद्य शंकराचार्य! हे देवा माझा उद्धटपणा दूर कर असं कोणीही म्हणेल. पण उद्धटपणाचं सर्वात लहानग परिमाण म्हणजे अविनय. थोडासा कमी पडणारा विनयही आचार्यांना केवढा त्रासदायक वाटतो. बुटात गेलेल्या मातीच्या कणासारखा सलत राहतो. हे विष्णो! माझा हा अविनय  माझ्यापासून दूर ने.(अपनय).  गंगास्तोत्रात ते म्हणतात, `हे गंगे माझ्या `प्राणप्रयाण-महोत्सवा'च्यावेळेस तू माझ्यासोबत रहा बर का!' ज्ञानदेव म्हणतात, `मातीला कधि घटा-माठाचे कोंब फुटत नाहीत. कुंभाराच्या मनाच्या कल्पनेतून ते साकार होत असतात.' रामदास सांगतात, ` कोणी गम्मत म्हणून जरी म्हणालं की आत्ताच ह्या तुपात पडलेली माशी तू ओरपून खाल्लीस तर ते तूप घशाखाली उतरत नाही.

जया भक्षिली मक्षिका जाणिवेची रुचि प्राप्त कैसी तया भोजनाची

अहंभाव ज्या मानसीचा विरेना  तया ब्रह्म हे अन्न पोटी जिरेना

त्याप्रमाणेच अहंकाराची नुसती जाणीव सुद्धा ब्रह्मज्ञानाचा आनंद मिळवू देत नाही.'

 अशा अनेक अनेक मंत्रस्वरूप ओळींनी मना मनातील कीड कधीच धुवून टाकली.   `जिणे गंगौघाचे पाणी' असे अनेकांचे जगणे पवित्र गंगेच्या पाण्यासारखे बनविले. माझ्या मना बन दगड म्हणून अहिल्येचे शापित जिणे लाभलेली जीवने झुळझुळ झर्‍यासारखे वाहू लागली.

    अस्ति मूलम् अनौषधम् -      

 

                जर कुठल्याही वनस्पतीचे गुणधर्म माहित असलेला उत्तम वैद्य असेल तर तो चिवट रोगांनाही बरा करु शकतो. जीवकाला गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या गुरुंनी औषधी नसलेली एक वनस्पती आणायला सांगितली. जीवकाने पंचक्रोशीतील रानं, वनं, लोकांच्या बागा खणून काढल्या आणि सरतेशेवटी रिकाम्या हातानी, डोळ्यात अश्रू घेऊन परत आला. प्रसन्न मनाने गुरू म्हणाले, ``जीवका आज तुझं शिक्षण पूर्ण झालं. वनस्पती शास्त्राच्या अभ्यासात आणि वैद्यकीय परीक्षेत तू उत्तीर्ण झालास.

अयोग्यम् वस्तु अस्ति एव -

तर एखादा कल्पक टाकावूतूनही टिकावू सौंदर्य तयार करतो. एडिसनसारखा शास्त्रज्ञ विजेवर चालणारा बल्ब बनविण्यासाठी शोधत होता, एक असं द्रव्य जे गरम केल्यावर जळूनही जाणार नाही आणि स्वच्छ प्रकाशही देईल. चारशे साडेचारशे गोष्टी त्याने गरम करून पाहिल्या पण सर्व जळून गेल्या. शेवटी राहवून त्याचा मित्र म्हणाला, ``तुझे सर्व परिश्रम वाया गेले.'' त्यावर सर थॉमस अल्वा एडिसन उत्तरला, ``छे! आज मला साडेचारशे अशा गोष्टी कळल्या की ज्या गरम केल्यावर प्रकाश देत नाहीत.''

अजुन एक भुरळ घालणारं पुणेरी पाटीवरचं वाक्य मला नेहमीच आठवत - -  नीलकंठ प्रकाशनाचं !

`` आमच्या येथे शब्दकोशातील सर्व शब्द सुंदर होऊन मिळतात.'' नीलकंठाच्या उघडलेल्या पिसार्‍यासारखं ते वाक्य मनाला आनंद देऊन जात. --- आजही- - इतक्या वर्षांनी. ह्या एका वाक्यासाठी मला कायम पुस्तक लिहावसं वाटायचं जे नीलकंठ प्रकाशनातर्फे प्रकाशित होईल. कदाचित माझ्याही पुस्तकाच्या मागच्या पानावर किंवा पहिल्याच पानावर हे सुंदर वाक्य लिहिलेलं असेल. `` आमच्या येथे शब्दकोशातील सर्व शब्द सुंदर होऊन मिळतात.'' पण मनात हळहळ मात्र राहून गेली.

 मासलेवाईक पाट्या लिहिणे हे पुणेकरांनी घेतलेले पेटंट नाही बर का! पूर्वीही अशा पाट्या लिहिण्याची प्रथा असणार. संस्कृत कथेत त्याचा उल्लेख सापडतो. एक राजा त्याच्या राजधानीतील रस्त्याने जात असतांना त्याला एक दुकान दिसले. दुकानात काहीच सामान नव्हते. एक तरुण तेथे बसला होता. दुकानावर पाटी होती- ` येथे सल्ला विकत मिळेल ' ( कदाचित तेंव्हाचा तो पहिला मॅनेजमेंट कन्सलटंट असावा.) राजा कुतुहलाने तेथे गेला. ``मी या देशीचा राजा आहे. मला काही सल्ला विकत दे'' असे म्हणताच त्याने एका कागदावर सुवाच्य अक्षरात एक ओळ लिहिली, ` सहसा विदधीत क्रियाम्।' अविचाराने कुठलीही गोष्ट करू नकोस. किंवा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी विचार कर. त्या तरुणाने तो कागद राजाच्या हातात देतांना हजार होन मागितले. ``एवढे? ह्याचा काहीच फायदा झाला नाही तर? '' ``सल्ला परत! म्हणजे तो कधीही वापरणार नाही असं वचन द्यायचं आपण! '' राजाने हसत हसत हजार होन दिले आणि ते वाक्य राजमहालात प्रवेशद्वाराशीच मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं. काही दिवसांनी राजाला स्वारीवर जायची वेळ आली. खूप वर्ष लढाई चालू राहिली. ती जिंकून राजा परत आला. राणीला अचानक भेटलो तर तिला फार आनंद होईल म्हणून तिला कळवताच तिच्या महालात गेला तर काय? राणी दुसर्‍याच तरुणाच्या सोबत झोपलेली! राजाने रागाने तलवार उपसली. त्याचवेळी त्याची नजर  भिंतीवरच्या ओळीकडे वेधली. ` सहसा विदधीत क्रियाम्।' अविचाराने कुठलीही गोष्ट करू नकोस. किंवा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी विचार कर. राजाने राणीला उठवताच आनंदाने आणि घाईघाईने  तिने त्या तरुणालाही उठवले. ``पुत्र! लवकर उठ! तुझे तात आले आहेत. तुझे सुंदर रूप पाहून तेही आनंदून जातील बघ.'' आपल्या मुलाला पहिल्यांदाच आलिंगन देतांना राजाचा आपण अविचाराने काय केलं असत ह्या विचारानेही थरकाप झाला. ` सहसा विदधीत क्रियाम्।' अविचाराने कुठलीही गोष्ट करू नकोस. किंवा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी विचार कर. ह्या पाटीने राजाला सुखी केलं तसं तुम्हा आम्हालाही करो अशी ही पाटीची कहाणी सुफळ संपूर्ण.

आता अशा दुर्लक्षित पण सुंदर पाट्या आणि त्यावरील वाक्य तुम्हालाही दिसायला लागतील. थोडसं शोधा. नौदलाचं `शं नो वरुणः' असो किंवा LIC `योगः क्षेमम् वहाम्यहम्' असो किंवा आपल्या संसदेत लिहिलेल `एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति' असो!

----------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -