शुभ्र बहार -

 

शुभ्र बहार -

               भोजराजाच्या औदार्याची,दानशूरपणाची कीर्ती ऐकून अनेक दरिद्री लोक मोठ्या अपेक्षेने धारानगरीत येत. कुठलेच काव्यगुण, साहित्यगुण नसलेले हे लोक विन्मुख परत जाऊ नयेत ह्यासाठी कालिदासाला काही ना काही युक्ती शोधावी लागे. प्रत्येकाच्या पात्रतेनुसार तो कोणाला एखादा श्लोक रचून देई आणि तो दरबारात म्हणायला सांगे तर कधी नुसतेच एखादे आशीर्वचन सांगे. पण त्यातही हे लोक काही ना काहीतरी गफलत करत आणि राजावर चमत्कारिक चमत्कारीक आशीर्वादांचा पाऊस पडे. अशावेळेला त्यांच्या चुका सुधारून त्या गरीब लोकांना धन मिळवून देण्यासाठी कालिदासच पुढे येई.



एकदा एकजण कालिदासाने सांगितलेला आशीर्वाद घोकत घोकत दरबारात येत असतांना त्याला उंट हा नवीनच प्राणी दिसला. कुतुहलाने त्याचे नाव विचारले असता सांडणीस्वार म्हणाला, ``उष्ट्र म्हणतात याला.'' झाल! ह्या नवीन प्राण्याचं नाव चांगल लक्षात रहावं म्हणून तो उषरट उषरट घोकत राहिला आणि प्रत्यक्ष राजाच्या दरबारात पोचेतो कालिदासानी सांगितलेला मूळ आशीर्वाद विसरून `उषरट गा राया' म्हणून गेला. शेवटी उ ष र ट ह्या प्रत्येक आद्याक्षराने चरण (ओळ) असलेला, राजावर कल्याणाची बरसात करणारा श्लोक तत्क्षणी कालिदासाने रचला आणि त्या दरिद्री माणसाच्या मनात किती उदात्त विचार आहे असे राजाला पटवून दिले.



एकदा तर एक माणूस `त्रिपीडाऽस्तु दिने दिने।' (राजा तुला दररोज तीन प्रकारच्या पीडा होवोत.) असा विचित्र आशीर्वाद घोकत आला. संतापलेल्या राजाला आणि दरबारी मंडळींना कालिदासाने लगेच तो आशीर्वाद मंगलमय करून दाखवला.

शयने पत्नीपीडाऽस्तु । पुत्रपीडाऽस्तु भोजने ।

 दाने विप्रपीडाऽस्तु । त्रिपीडाऽस्तु दिने दिने।। 

(झोपतांना तुला पत्नीकडून सतत काही तरी गोड तगादा असावा. जेवतांना मुले तझ्या हातचा घास खाण्यासाठी किंवा तुला घास भरवतांना त्यांच्या पायाची हाताची माती,लडबडलेले अन्न ह्यांनी तू त्रस्त व्हावे. दान घेण्यासाठी तुझ्याकडे ज्ञानी लोकांचे जथेच्या जथे दरबारात हजर असावेत. अशा तीन पीडांनी तुझा दिवस पूर्ण होवो.) काही पीडाही सुखकर असतात त्यांच्याशिवाय माणसाला पूर्णत्व आलं अस वाटत नाही.



माझ्या लहानपणी माझी आई असाच एक गम्मतशीर आशीर्वाद द्यायची. खास करून आम्हा मुलांच्या वाढदिवसाला. `` कापसासारखी म्हातारी हो. हरळीसारखी लांब हो.''  गौरी गणपतीत गौरी बसल्यावर साक्षात त्या जगज्जननी महालक्ष्म्यांना काही मागायच्या ऐवजी असा आशीर्वाद देणारी ही पहिलीच बाई असावी असं वाटायचं. `` कापसासारखी म्हातारी हो. हरळीसारखी लांब हो.'' !  ``काहीतरीच काय ग आई? हा कसला आलाय आशीर्वाद ? '' तिच्याशी वाद नाही घातला तर मी कसली. ``अगं कापसासारखे केस पांढरेशुभ्र होई पर्यंत जग. आणि हरळी सारखा तुझा वंश अमर असु दे. असा अर्थ आहे त्यात.'' ``खूप काळ जग हे ठीक आहे पण केस पांढरे! दातंचं बोळक! असल कसल ग जगणं?''

मंद हसत ती म्हणायची, ``अगं, माणसाचंही झाडासारखच असतं. फक्त फरक इतकाच की माणूस नावाच्या तरुला आयुष्यात दोनदाच बहर येतो.'' - आई. ``तो काय बांबूच्या झाडासारखा वाटला का तुला दर साठ वर्षांनी फुलणारा?'' मी कुठलं पडतं घ्यायला. ``हो ना. झाडांमधलं आणि आपल्यामधलं हेच साम्य आहे.'' - आई. ``सांग बर केंव्हा येतो हा बहर?'' - मी

``एकदा सोळाव्या वर्षी वसंत माणसाला स्पर्श करतो आणि दुसर्‍यांदा साठाव्या वर्षी. '' म्हणजे फक्त दोनच दिवस?'' माझी शंका. ``नाही. साधारण ह्या दोन वेळेला फुलायला सुरवात होते माणसाची. झाडांचा बहर कसा दोन, तीन,चार महिनेही टिकतो तसा हा बहर किती टिकवायचा हे माणसाच्या हातात असतं. सोळाव्या वर्षाचा बहर साठीपर्यंत ही टिकवता येतो पण त्यासाठी शरीराची मशागत ,निकोपता आवश्यक आहे. तर दुसर्‍याला मनाची! फुलणं माणसाच्या किंवा झाडाच्या हातात नसतच मुळी. वसंत आला की झाडाला आणि माणसाला आतूनच फुलायला होतं. झाड मोहरतच. सोळाव्या वर्षीचा वसंत रंगीत फुलांचा, रंगीत स्वप्नांचा असतो. आकर्षुन घेतो तो नेत्रांना. हा वसंत देहाकर्षणाचा सोहळा असतो. साक्षात मदनाच्या धनुष्याला लागलेला फुलांचा बाण लागून फुलांनी जखमी व्हायचे आणि करायचे दिवस असतात.

घेत राहतो हा बहार दुनियेकडून सतत काही ना काही. अपेक्षांचे चटकदार गडद रंग असतात त्याचे. देण्यासारखा सुगंध मात्र नसतो ह्या चटकदार रंगांमधे. काटेसावरीसारखा नुसताच लालचुटक रंग. त्यांची रंगीत स्वप्न पाहून हरखून गेलेली दुनिया ओतत राहते ओंजळीत त्यांच्या हिरे, माणकं. `घेणार्‍याने घेत जावे. देणार्‍याने देत जावे. घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावेत.' असा सहज सारा बदल होत राहतो आणि मग --- वर्षांमागून वर्ष लोटतात आणि- - हळुवार दुसरा वसंत बहार फुलतो आयुष्यात.

हा वसंत मात्र शुभ्र बहाराचा. अत्यंत सुगंधी. संध्याकाळी फुलणार्‍या पांढर्‍या शुभ्र जाई, जुई, मल्लिकेसारखा. संध्याकाळीच फुलतात ही फुलं. त्यांच्या सुगंधाने वेड लावतात जीवाला. तसा हा बहारही आयुष्याच्या संध्याकाळी फुलणारा. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दाही दिशी पसरवणारा. हळुच माथ्यावर कापुस फुलवणारा. दुनियेला मोहित करणारा. `नाही पुण्याची मोजणी । नाही पापाची टोचणी ।' असा अगदी गंगेच्या उगमासारखा पवित्र, निर्मळ. सगळे राग, लोभ, मत्सर, विद्वेश गळून पडतात जीर्ण पानांसारखे. मग शत्रूपक्षातल्या गुणवंताचंही कौतुक मनात सहजच फुलुन येतं. आपल्याच मरणाचं वरदान सहज पार्थाला देऊ केलं जातं भीष्म, द्रोणांकडून---- मोठ्या कौतुकाने. आयुष्याचंही मोल संपत. `उरलो उपकारापुरता' इतक सहज असतं जगणं. हाच वैराग्याचा शुभ्र बहार.''

खरच, अशा शुभ्र बहाराने फुललेले अनेक तरुवर आज मी पाहिले आहेत. प्रवीण दीक्षितांनी केलेल्या चांगल्या कामासाठी आशीर्वादाचे हात वर उचललेले. मृत्युशय्येवर असतांनाही प्रवीण दीक्षितांना भेटायचा ध्यास घेतलेले. आम्ही भेटायला गेलो तर चांदण सांडलं त्यांच्या दंतहीन प्रसन्न हसण्यातून. आजही ते चांदणं कुठे तरी मनात सुखाची पखरण करतय. काय नातं होत आमचं आणि त्यांच? दोन दिवसांनी तो बहरलेला शुभ्र तरु उन्मळून पडल्याचं कळल. एका भेटीसाठी थांबला होता का तो? आजही असे अनेक शुभ्र तरु त्यांच्या मुलांची वाट पहात नसतील इतकी आमच्या भेटीची वाट पहात असतात. अधुन मधुन कोणाचा तरी फोन येतोच, ``कधी येतेस गं भेटायला. फार आठवण येते बेटा तुझी''. किंवा पेपरमधे वाचून तुम्हाला भेटण्याची आस घेऊन एक शुभ्र तरु उभा आहे. तुमच्याकडे कसा येणार? तुम्ही याल भेटीला? त्यांच्या डोळ्यांमधून बरसणारी सुगंधी फुलं पारिजातकाच्या सड्यांसारखी टपटप अंगावर ओघळतात. मोहवून टाकतात मनाला.

कोकणी मधे म्हातारा नाही म्हान्तारो म्हणायची पद्धत आहे. महन्त पासून म्हान्तारो. महन्तच होतो कापसासारखा म्हान्तारो! येर्‍या गबाळ्याचं काम नाही ते.

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -





 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -