बांबू फुलला –
बांबू फुलला – 1999 -2000 वर्ष असेल. अकोटहून कोलखासला जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं जंगल अनेक प्राण्यांचं निवासस्थान होतं. मधुन मधुन स्वतःच्या ताकदीच्या मस्तीत वावरणारे रानरेडे वा गवे कळपामधे फिरत होते. काही चरत होते. काही आपल्याच मस्तीत जातांना त्यांच्या शिंगांवर त्यांनी उकरलेलं गवतही अडकलेलं दिसत होतं. एखादा नर हरीणही डोक्यावर केशभूषा वा पुष्पभूषा केल्यासारखा शिंगांवर अडकलेल्या वेली घेऊन तोर्यात चाललेला , बाकी हा बघा , तो बघा असे चुटपुट प्राणी बघे बघे पर्यंत पळून जात होते. मग त्यात कोल्हे , भेकरं , हरणं , शेकरू अमुक तमुक प्राणी अणि पक्षीही होते. मर्कटांना माणूस जवळचा असतो असं डार्विननीच सांगून ठेवल्यामुळे मर्कटांच्या चेष्टा , माणूस पाहूनही आपलेपणाने सुरू होत्या. पानांवरून खुसफुस झालं की कान टवकारून , डोळ्यात आधीच तेल घालून सज्ज असल्यासारखे आम्ही बघत होतो. वाघ दिसायला बरच नशिब लागतं म्हणे. मी येणार आहे हे कळताच वाघ त्याच्या गुहेत लपून बसतो अशी माझी खात्री आहे. मग कुणाचे पाणवठ्यापाशी उमटलेले पंजे , खूरं पाहून हे अस्वल , हा वाघ असं जे जे काय सांगतील ते मी कौ...