बांबू फुलला –

 

बांबू फुलला

1999 -2000 वर्ष असेल. अकोटहून कोलखासला जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं जंगल अनेक प्राण्यांचं निवासस्थान होतं. मधुन मधुन स्वतःच्या ताकदीच्या मस्तीत वावरणारे रानरेडे वा गवे कळपामधे फिरत होते. काही चरत होते. काही आपल्याच मस्तीत जातांना त्यांच्या शिंगांवर त्यांनी उकरलेलं गवतही अडकलेलं दिसत होतं. एखादा नर हरीणही डोक्यावर केशभूषा वा पुष्पभूषा केल्यासारखा शिंगांवर अडकलेल्या वेली घेऊन तोर्‍यात चाललेला, बाकी हा बघा, तो बघा असे चुटपुट प्राणी बघे बघे पर्यंत पळून जात होते. मग त्यात कोल्हे, भेकरं, हरणं, शेकरू अमुक तमुक प्राणी अणि पक्षीही होते. मर्कटांना माणूस जवळचा असतो असं डार्विननीच सांगून ठेवल्यामुळे मर्कटांच्या चेष्टा, माणूस पाहूनही आपलेपणाने सुरू होत्या.

पानांवरून खुसफुस झालं की कान टवकारून, डोळ्यात आधीच तेल घालून सज्ज असल्यासारखे आम्ही बघत होतो. वाघ दिसायला बरच नशिब लागतं म्हणे. मी येणार आहे हे कळताच वाघ त्याच्या गुहेत लपून बसतो अशी माझी खात्री आहे. मग कुणाचे पाणवठ्यापाशी उमटलेले पंजे, खूरं पाहून हे अस्वल, हा वाघ असं जे जे काय सांगतील ते मी कौतुकाने पाहून घेते. हा पायाचा लांबट ठसा बघा ! हा वाघिणीच्या पंजांचा आहे. त्या ठशामागे बघा लहान ठसेही दिसताएत. वाघीण तिच्या छाव्याला घेऊन आली होती. प्रत्यक्ष वाघ माझ्यासमोर दत्त म्हणून ठाकल्यावर होणार्‍या माझ्या प्रत्यक्ष ``रनिंग कॉमेंट्री’’पेक्षा मला ही नंतर सावकाशपणे सांगितलेली रनिंग कॉमेन्ट्री आवडते. प्रत्यक्ष वाघ समोर ठाकण्यापेक्षा आधी वा नंतरच येऊन गेलेला बरा. त्याने पाणवठ्यावर त्याचा घसा निःशंक ओला करावा आणि आपलाही घसा त्याला पाहून कोरडा पडू नये ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. येता जाता घरात सारखं डोकावून जाणारा शेजारी एखादयावेळी दरवाजातून डोकावतांना सापडला तर त्याच्या तोंडावर दरवाजा खाडकन आपटला जावा त्याप्रमाणे अपण वाघोबाच्या जंगलाच्या घरात त्याला असं डोकावून पाहतांना एखाद्यावेळी तरी त्याला राग येणाच की. मग त्याने अंगावर उडी घेतली म्हणून त्याला का नावं ठेवायची? त्यापेक्षा त्याला सुखात राहू द्यावं हे बरं.

जंगलातून झाडं पहात जायला मात्र मला आवडतं. गाडीतून जातांना सार्‍या तरुवरांचे बुंधेच बुंधे नजरेसमोरून मागे धावत राहतात. त्यांच्या खोडांचे गडद काळ्या पासून पांढर्‍या शुभ्र पर्यंत विविध रंग, त्यांच्या खोडावरील वेगवेगळ्या नक्षी, वळ्या, रेघा, गुळगुळीतपणा, कधी खोडाच्या लोंबणार्‍या साली, कधी त्यांच्यावरील छोटे मोठे पडलेले डाग; प्रत्येकाचा वेगवेगळा पोत--- सारं सारं त्या रानाचं एक व्यक्तिमत्त्व आकाराला आणत असतात. सलाई, चारोळी, डिकेमाली, कळलावी, दीपमाळ, मोह, गराडी, रक्तचंदन, भेर, माहूर, टेंभुर्णी, लेंड्या, बेहडा, भुत्या किंवा कौलु, अनेक प्रकारचे बांबू इत्यादि अनेक प्रकारच्या झाडांनी आकाराला आलेलं हे जंगल, पश्चिम घाटातल्या जावळीसारखं घनदाट नसलं तरी फार आनंददायी आहे. मधून मधून दिसणारं किंवा पानापानांमधून गाळून येणारं निळं आकाश जंगलाला भयाण, एकाकी बनवत नाही. मधुनच दिसणारं भुत्याचं पांढरंशुभ्र खोड सकाळी तरी गोर्‍या मडमेसारखं वेगळं उठून दिसतं. रात्री वाटत असेल भुतासारखं!

आम्ही अकोटच्या वाटेला लागण्यापूर्वीच ड्रायव्हर म्हणाला होता, ``अकोटच्या जंगलात बांबू फुलावर आलाय. बांबूला फुलं आली आहेत. 50- 60 वर्षांनी बांबूला फुलं येतात. बांबूचं फुलावर येणं हेही म्हणे संसर्गजन्य असतं. म्हणजे, एका जंगलात एक बांबू फुलला की त्या जंगलातील सर्व बांबू तर फुलतोच पण आजूबाजूच्या जंगलांमधलाही बांबू फुलतो. ’’ 50-60 वर्षांनी घडणारी घटना म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला एकदाच अनुभवता येणार असल्याने बांबूच्या फुलांचं कुतुहल मनात होतं.

बांबूचं एक बेट आल्यावर ड्रायव्हरनी गाडी थांबवली. खरच बांबू फुलला होता. नखशिखांत फुलला होता. फुलं रंगित नसली तरी बांबूच्याच रंगाचे फिकट पांढरट, पिवळट फुलांचे तुरे कांडाकांडातून, पेर्‍यापेर्‍यातून फुटले होते. सार्‍या जंगलात बांबू अंगोपांग फुलला होता. आनंदला होता. तसं पाहिलं तर बांबूचं झाड हे कायम हसरं आणि आनंदीच वाटतं. फुलं आल्यावर तर आनंदानी मुसमुसत असल्यासारखं वाटलं. थोड्या फुलांच्या काड्या घेऊ या का बरोबर? मी तोडायचा प्रयत्न केला पण दोर्‍याएवढी पातळ काडीही इतकी चिवट की हातानी तुटणारी नाही. शेवटी जवळ असलेल्या कुठल्यातरी चाकू प्रकारातील आयुधाने दोन चार काड्या तोडल्या, आजही एखादी काडी एखाद्या पुस्तकात 100 व्या पानावर असेल.

``पण --- बांबूला फुलं येणं चांगलं मानत नाहीत. बांबू फुलला की बांबू मरतो.’’ बरोबरचे ऑफिसर सांगत होते.

``म्हणजे एवढ सगळं बांबूचं जंगल मरणार? ‘’

``हो पण त्याच्या खूप बिया वार्‍याबरोबर रानभर पसरतील रुजतील आणि पुन्हा बांबू उगवेल. ‘’

तर ----- मरण- जननाचा खेळ वेळूच्या बनालाही सोडत नाही.

``त्याबरोबर अजूनही एक धोका असतो. बांबूच्या बीया उंदरांचं खाद्य असतात. त्यामुळे उंदरांची संख्याही वाढते असं म्हणतात.’’

पुढचं पहायला आम्ही तेथे राहिलो नाही. पण मरणापूर्वीही अंगोपांग फुलून येणारा आनंदी बांबू मनात कायमचा फुलला.

------------------

लवचिक बांबू –

उंच, झिपरा बांबू माणसाला आनंदित करतो. त्या बांबूचे प्रकार तरी किती! हिरवा बांबू, पिवळा/ Golden बांबू, काही बांबू मुठीत मावणार नाहीत एवढे हाडापेरानी मजबूत--- जे घराला पराती बांधायच्या कामी वापरतात.(scaffolding ) तर, सप्पकन् हातावर बसणारा शाळेतला वेत अगदी करंगळीएवढा पण लवलवणारा. मॉरिशसमधे अंगठ्याएवढ्या जाड बांबूचे काही बंगल्यांभोवती केलेले कुंपण इतकं दाट आणि उंच असे की आतला बंगला पूर्ण अज्ञातच राहून जाई. बंद्या रुपया एवढ्या व्यासा पासून चार आणे व्यासाचा बांबू! आता ना रुपया दिसतो ना चार आणे दिसतात.

पण बांबू म्हटलं की त्याची उंची, चिवटपणा आणि लवचिकता हे गुण मन मोहून घेणारे आहेत. त्याचं भरभर उंच होणं बघत राहण्यासारखं असतं. एखाद्या वेळूच्या बनातून खेळाखेळात झुळुक बनुन खेळणारं वारही आनंदानी गाऊ लागतं. तर बांबूच्या बेटातून जाणारं वादळ सूँऽऽऽ सूँ आवाज करत त्याच्या वेगाची तीव्रता सांगत राहतं. सारे बांबू जोवर एकत्र राहतात तोवर एकमेकांचे, आतल्या कोवळ्या बांबूंचे रक्षण करत राहतात.

घरात काचपात्रात, पाण्यात ठेवलेले चिनी बांबू मात्र मला केविलवाणे वाटतात. त्यांचे शेंडेच तोडल्याने हातपाय कलम केलेल्या माणसासारखे जगत असतात इतकचं. त्यातून त्यांना नागमोडी होण्यासाठी घातलेले पिळे दुःखदायक वाटतात जंगलातली झाडं आपणहून कितीही वेडीवाकडी वाढली तरी त्यांच्या लचकण्यात एक नैसर्गिक लकब आणि तोल सांभाळणं असतं. कमनीयता असते. ती झाडाचे हातपाय मुरगाळून कशी जमणार?

2008 ह्या वर्षात परत एकदा प्रवीणसरांची पोलीस कमिशनर म्हणून नागपूरला बदली झाली आणि नागपूर वेगळ्या उंचीवरून पहायला मिळालं. वेस्ट हायकोर्ट मार्गावरच्या कमिशनर बंगल्यात रहायला गेलो. पाच एकराच्या परिसरातील घराभोवती भव्य बकुळ, आंबा, संत्री, केळी, पपया--- झाडांसोबत बांबूही होता. खूपसा बांबू आम्ही नव्याने घराच्या कुंपणाच्या भिंतीलगत लावला. घरासमोरच सुंदर हिरवीगार हिरवळ होती. हिरवळीच्या कडे कडेनी गुलाब, शेवंती, झेंडू सजलेले असत. रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍यांच्या, पाहणार्‍यांच्या आणि घरातूनही बाहेर डोकावणार्‍यांच्या नजरेत भरेल अशा प्रतिष्ठित जागी हिरवळीवर झेंडा लावायचा उंच ध्वजदंड होता. दर स्वातंत्र्यदिनाला, प्रजातंत्रदिनाला, 1 मे आणि महत्त्वाच्या दिवशी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण, ध्वजवंदना होत असे. तिरंगा फडकतांना मोठा अभिमान वाटत असे.

गुढी पाडव्याला घरच्याच हिरव्यागार बांबूवर केशरी पैठणी काठाची गुढी सजली आणि ध्वजदंडा शेजारी ऐटीत उभी राहिली. एवढी उंचचउंच गुढी उभारण्याची मजा नागपूरलाच मिळाली. दिवसभर बांबूची गुढी किंचित वाकून वार्‍यावर मस्त डुलत राहिली. ह्या उंच गुढीवर बसून अनेक पक्ष्यांनी झोका घेतला. तिच्या गळ्यात घातलेल्या अनेक खाऊचा आस्वाद घेतला.

इतरवेळेला खास करून सूर्योदयाच्या सुमारास बांबूच्या शेंड्यावर बसून झोका घेणारा निळ्या खंड्या, काळाशार दयाळ, हिरवागार वेडा राघू आणि इतर लहान लहान पक्षी बघणं म्हणजे नयनोत्सव असे. पक्षी तसेही अत्यंत हलकेच असतात. पण इतक्या छोट्याशा पक्ष्यांच्या अचानक बसण्याच्या आवेगाने, भारानेही किंचित वाकणारा वेळू झोके घेत राही आणि पंचतंत्राच्या खास उपदेशाची मला आठवण करून देत राही.

एका क्रूर आणि बलाढ्य शत्रूचा पुरता बिमोड केल्यावर पुन्हा एकदा राज्य राजाकडे सोपवतांना त्याचा अत्यंत अनुभवी, हुशार, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध मंत्री राजाला मोठा सुंदर उपदेश करतो,

हे राजा,

मी इथला राजा आहे; मी काहीही करीन अशा मस्तीत कोणी राहू नये. ह्या उच्चपदासोबत येणारं वैभव, ऐश्वर्य, मान-मरातब पाहून, भुलून कोणी त्याच्या आहारी जाऊ नये. ही घमेंड तुम्हाला कुठल्या संकटाच्या खाईत लोटेल सांगवत नाही. उच्चपदासोबत चिकटलेला महिमा, येणारं वैभव, ऐश्वर्य, मान-मरातब, प्रतिष्ठा काही क्षणात होत्याची नव्हती होते.

बांबूवर कोणी चढू शकतो का? ज्या क्षणी कोणी चढेल त्या क्षणीच लवचिक बांबू वाकतो. वर चढलेल्याला खाली जमिनीवर आणतो, पाडतो. बांबूच्या झाडावर चढणं जितकं असाध्य, दुरारोह (दुर् + आ+ रुह् ) असतं. तितकीच ही प्रतिष्ठा मानमरातब आणि लक्ष्मी टिकून राहणं !

कितीही शिकस्त केली तरी पारा हातात पकडणं, हातात धरून ठेवणं अशक्य, दुर्धर असतं. त्याप्रमाणे राज्यलक्ष्मीला रोखण्याचा, थांबवण्याचा, अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यलक्ष्मी दुर्धर असते. तिला धरून ठेवता येत नाही. ती आपल्याकडे रहावी म्हणून तिची कितीही प्रार्थना केली, आराधना केली तरी ती हा हा म्हणता फरार होते. कारण ती गमनशीलच असते. वियोगाचं दारूण दुःख मात्र देऊन जाते.

मर्कटलीला करणार्‍या माकडाच्या मनात काय येईल आणि ते काय करेल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे राज्यलक्ष्मी अत्यंत चंचल व अस्थिरबुद्धी असते. कमळाच्या किंवा आळवाच्या पानावर पडलेलं पाणी ज्याप्रमाणे पानाला जराही चिकटत नाही, जसं संपर्कहीन असतं त्याप्रमाणे हे क्षणैक ऐश्वर्य तुम्हाला स्पर्शही न करता ओघळून जातं. पाण्याचा थेंब मातीत पडून शोषला जावा त्याप्रमाणे मातीमोल होतं.

वारा कुठून कुठे जाईल हे थोडचं सांगता येत? वारा आणि वाळूची गाठ मारणं अशक्य! त्याप्रमाणे हे मोठेपण कायम गाठीला बांधून ठेवता येईल असं कोणी समजू नये. दुष्टांची संगत वा मैत्री जशी ऐन युद्धजन्य परिस्थितीत, अत्यंत गरजेच्या वेळेला वा महत्त्वाच्या क्षणी तुमचा घात करते, तुमचा समूळ नाश करते त्याप्रमाणे उच्च पदासोबत येणारा मोठेपणाचा अहंकार नेमका चारी बाजूंनी समस्यांनी घेरलेले असतांना तुमचा घात करतो. ``तुला माहित नाही का मी कोण आहे’’ असा मोठेपणाचा ज्वर सापाच्या विषासारखा असतो. त्यावर उपचार फार कठीण असतात. हा सगळा मानमरातब इतका क्षणभंगुर असतो की पाण्याचा बुडबुडा फुटावा इतक्या लवकर तुमचा भ्रमनिरास होतो. मी बलवान आहे म्हणता म्हणता क्षणात कॅन्सर वा करोनासारखा रोग एखाद्या पैलवानालाही काळाच्या पडद्याआड लोटतो त्याप्रमाणे हे मोठेपण मोठं कृतघ्न असतं. स्वप्नात लाभलेला खजिना डोळे उघडताच नाश पावतो त्याप्रमाणे हा हा म्हणता प्रतिष्ठा, मोठेपण लयाला जाते

भव्य बंगला, समोरील सुंदर बाग बघतांनाही मनात बांबूवर चढणार्‍याला बांबू क्षणात खाली आणतो हे सांगणारा राजाचा आमात्य आपल्यालाच उपदेश करत आहे असे वाटे. पोलीसांमधे एक उक्ती म्हटली जाते; ``पोलीस कमिशनर येतांना हत्तीवरून येतो आणि जातांना गाढवावरून जातो.’’ हे अनेकांच्या बाबतीत अगदी अनुभवास आलं आहे.----हमऽऽ!! एक अलिप्तता मनात भरून राहिली असतांनाच प्रवीणसरांनी विचारलं, ``आपली येथे दोन वर्षं पूर्ण झाली. तुम्हाला इथे अजून रहायचं आहे का बदली केली तर चालेल असं विचारलं आहे. काय सांगू?’’

``बदली!!!!’’ ---- जराही विचार न करता मी सांगून टाकलं.

आपला मार्ग चालतांना सुंदर वृक्षाच्या छायेत दोन घटका बसायला मिळाल्याचा आनंद मानून ताजतवानं होऊन पुढचा मार्ग धरायलाच लागतो. झाडाखालीच बसून कसं चालेल? जो पर्यंत एखाद ठिकाण गोड वाटत असतं तोपर्यंतच ते सोडलेलं बरं. समोर वार्‍यावर हिरवेगार बांबू आनंदानी डोलत होते. पाठीशी उभा असलेला बंगलाही किंचित हसल्यासारखा वाटला.

चला! पसरलेला संसार परत आवरायला लागणार होता. नागपूरच्या जनतेच्या दीक्षितसरांबरोबर मी येथे हत्तीवरून आले होते. आता ऐरावतावरून निरोप घेणार होते. माझ्या मनात काय आहे हे ताडत दीक्षित म्हणाले, ``कधी कधी आपण किती साधे, सरळ आहोत ह्याचा सुद्धा अहंकार होतो.'' ---- आणि लवचिक बांबू क्षणात वाकला.---- मी अलगद जमिनीवर उतरले.

-----------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -