तिलक देत रघुबीर -
तिलक देत रघुबीर-
गुलमोहोराची नजाकतीने उभी असलेली
झाडं मे महिन्यात सर्वांचच लक्ष वेधून घेतात. थंडीमधे भुरुभुरु पान गाळणारी ही
गुलमोहोराची झाडं सारा अहंकार झाडून, सर्व ऐश्वर्याचा त्याग करून व्रतस्थ
होतात. ध्यानस्थ बसतात. सर्व संपत्ती दान केलेल्या रघुराजासारखी भासतात. तर कधी
झाडांचा नुसताच फांद्यांचा उरलेला सांगाडा पाहून मला दधिचींची आठवण येते. इंद्राला
वज्र बनविण्यासाठी आपली हाडे अर्पण करण्यासाठी दधीची ऋषी ध्यानस्थ बसले होते.
त्यांच्या अंगावर पोपड्यासारखे उरलेले कातडी व मास कामधेनुने चाटून काढून टाकले.
आता उरला फक्त हाडांचा सांगाडा. वज्र बनविण्यासाठी उपयोगी. तसच काहीस हे झाड वाटत.
रिकाम्या झाडावर लटकणार्या गडद तपकिरी चपट्या बीजमंजुषांमधेही त्याची बीजे
ध्यानमग्न असतात.
वैशाख वणव्यात सूर्याच्या प्रतिमेचे
स्मरण करता करता झाडावरही केशरी , पिवळसर केशरी, फिके केशरी, गडद केशरी , लालबुंद असे झाडागणिक विविध रंगातील गोलक अवतरायला लागतात. आणि बघता बघता
दहा पंधरा दिवसात सार झाड लाल, केशरी फुलांनी असं काही बहरुन येत की एकही फांदी दिसू नये.
कधी आकाशाकडे बघत हात पसरलेल्या
ह्या लालचुटुक छत्र्या दिसतात. तर कधी ह्या झाडाच्या चिवट बारीक फांद्या
जमिनीपर्यंत खाली झुकतात. जमिनीला स्पर्श करायच्या आधीच हत्तीच्या सोंडेसारख्या
परत वरती वळतात. वरून ओघळणार्या ह्या माणकांच्या सरी मला भारी आवडतात. कधी
हिरव्या, पोपटी मखमाली पानांच्या कोंदणात माणिक, पोवळी बसवलेल्या
ह्या रत्नजडित तरुवरांचे गुलमोहोर ऐवजी माणिकमोहोर हेच नामकरण मी करून टाकते.
झाडाखालून जातांना लाल गालिच्यातील
एक फूल उचलून घेतांना मला कायम वाटत, गुलमोहोराच्या पाच पाकळ्यातील चार
लाल लाल पाकळ्यांच्या सोबतीने एकच पाकळी अशी उठून दिसेल अशी वेगळी का बर? थोडीशी जाड पिवळट
पांढरट वर लाल रेघा असलेली पाकळी मी हातात घेऊन पाहू लागते.
गुलमोहोराच्या ह्या पाकळ्यांचा
आकारही किती वेगळा. बहुतेक फुलांच्या पाकळ्या वरच्या टोकाकडे निमुळत्या होत जातात.
ही वरच्या बाजुला गोलाकार आणि आतल्या बाजूस निमुळती होत गेलेली. हिचा वेगळा आकार
कशासारखा दिसतो बर? आठवता आठवता डोळ्यापुढची पाकळी धूसर होत अचानक मला ती
पांडुरंगाच्या कपाळावर रेखलेल्या गंधासारखी दिसू लागते.
गुलमोहोराचं झाड कितीही लांबून
पाहिल तरी ते नुसतच लाल/केशरी दिसत नाही. त्याच्या ह्या पाढर्या गंध-पाकळीची
नक्षी लांबूनही त्या लाल केशरी झाडावर जणु पांडुरंगाची गंध मोहोर उमटल्याची साक्ष
देत असतात. कधी पांडुरंग त्याच्या कपाळी गंध रेखून जातो न कळे. इतकी वर्ष नजर
ठेऊनही मी गुलमोहोराच्या कपाळावर गंध रेखून जाणार्या त्या पांडुरंगाला पाहू शकले
नाही.
------------------------------
विचारा विचारात तुलसीदासाची कहाणी
आठवते.
तुलसीदास वाराणसीला राहात असत. रोज
संध्याकाळी तेथील अस्सी घाटावर मोठ्या रसाळ भाषेत ते रामचरिमानस लोकांना सांगत असत. ते ऐकण्यासाठी
लोकांची खूप गर्दी होत असे.
पहाटे लवकर उठून तुलसीदासजी आपले
शौच मुखमार्जन करून गंगेवर अंघोळ करत असत. दररोज शौचाहून परततांना लोट्यात उरलेले
पाणी वाटेवरील एका बोरीच्या झाडाला घालत असत. त्या बोरीच्या झाडात एक ब्रह्मसमंध
राहत होता. रोज मिळणार्या त्या अपवित्र पाण्याने तो खूष होत असे. एकदा
तुलसीदासांसमोर प्रकट होत तो म्हणाला, ``तुलसीदास, मी ह्या झाडात
राहणारा ब्रह्मसमंध आहे. रोज रोज तू न विसरता मला पाणी देतोस मीही तुला काही तरी
देऊ इच्छितो. तुला काय हवं असेल ते मागून घे.'' ते ऐकल्यावर
तुलसीदास म्हणाले, ``राम चरित मानस लिहीलं पण मला रामाचं प्रत्यक्ष दर्शन काही झालं
नाही. ते तू घडव.'' ब्रह्मसमंध म्हणाला, `` अरे वेड्या ते जर मला शक्य असतं तर
मी हजारो वर्ष ह्या नरकात खितपत कशाला पडलो असतो? पण एक मार्ग मी
तुला सांगू शकतो. '' ``कोणता? '' - तुलसीदास. ``रोज राम चरित
मानस कथा सांगतांना कीर्तनासाठी सर्वात आधी येऊन बसणारी आणि सर्वात शेवटी निघून
जाणारी व्यक्ती हनुमान आहे. तोच तुला राम भेटीचा काही मार्ग सांगेल.''
त्या ब्रह्मसमंधाच्या सांगण्यानुसार
तुलसीदासजी संध्याकाळी मंदिरात गेले तर तेथे कोणीच नव्हतं. पण दूर झाडाखाली एक
कोडी माणूस बसला होता. हातात काठी, अंगावर एक कांबळं पांघरून बसला
होता. हा नसावा नाहीतर मंदिराबाहेर बसला नसता म्हणत तुलसीदाजी कोणकोण येत आहे
त्याची वाट बघत बसले. थोड्याच वेळात सर्व मंदीर माणसांनी फुलून गेलं. कीर्तन चालू
झालं. कोडी अजून बसलाच होता. कथा संपली. माणसं उठली. आणि हळु हळु आपल्या घरच्या
रस्त्त्याकडे जाऊ लागली. कोड्याही उठला काठी घेऊन लंगडत लंगडत चालू लागला. लांबवर
एक पिंपळाचं झाड होत त्यामागे गेल्यावर दिसेनासा झाला. दुसर्या
दिवशीही असच घडलं. तिसर्या दिवशीही नेहमीप्रमाणे कीर्तन संपलं. लोकं उठून
आपापल्या घरी जायला निघाले. सर्वजण गेले आणि जाण्यासाठी कोडीही उठला. कोडी उठल्या
उठल्या तुलसीदासही उठले. रोज कोडी ज्या पिंपळाच्या झाडाच्या मागपर्यंत जाताना
दिसायचा त्या झाडामागे लपून उभे राहिले. लंगडत लंगडत कोडी झाडामागे पोहोचला मात्र, तुलसीदासाने
त्याचे पाय धरले. `` अरे सोड सोड. माझे पाय धरू नकोस. मी कोडी आहे. मला कोणी शिवतही
नाहीत.'' ``मारुतीराया आता मी आपले चरण सोडणार
नाही'' आपण रामभक्त आहात. आपण मलाही रामाचे दर्शन घडवा.'' तुलसीदासाचा भाव
पाहून मारुतीरायाने आपलं खरं रूप प्रकट केलं.
मारुतीराया म्हणाले, तुलसीदास, जर तुला रामाची
भेट व्हावी असं वाटत असेल तर-- तर तुला चित्रकूटाला जावे लागेल.'' चित्रकूटाची
महतीही तशीच फार मोठी आहे. वनवासाच्या चौदा वर्षांपैकी फार मोठा कालखंड रामप्रभु
सीतामाई आणि लक्ष्मणासह येथे राहिले आहेत. क्षणाचाही विलंब न करता तुलसीदासांनी
चित्रकूटाचा रस्ता धरला. मंदाकिनीत स्नान करून कामत गिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी
तुलसीदास निघाले.
कामतगिरीमें रामप्रसादा । अवलोकत
अपहरत बिषादा
(तुलसीदासांच्या दोह्यात हे उल्लेख आहेत. कामतगिरीमधे
श्रीरामचंद्रांचे निवासस्थान, प्रासाद आहे. त्याचे जो कोणी अवलोकन करेल त्याचा विषाद, दुःख दूर होईल.)
तेवढ्यात घोड्यावरून दोन राजपुत्र तुलसीदासाकडेच
आले. त्यांनी तुलसीदासांना रस्ता विचारला. तुलसीदासांनी तो सांगितला. त्या दिशेला
ते निघून गेले. जवळच असलेले मारुतीराय तुलसीदासांपाशी आले. ``तुलसीदासजी, प्रभु भेटले ना?'' ``नाही.'' ``अहो, आत्ता तर स्वतः
रामचंद्र आणि लक्ष्मण आपल्याला रस्ता विचारून गेले.'' तुलसीदास म्हणाले, ``माझ्या डोळ्यासमोर
प्रभुंची अशी अश्वारूढ मूर्ती कधी नव्हती. मी कसं त्यांना ओळखणार? '' ``आज संधी हुकली
तरी परत प्रभु दर्शन देतील.'' हनुमानजी म्हणाले.
दुसर्या दिवशी पहाटे मंदाकिनीत
स्नान करून मंदाकिनीच्याच तीरावर एका पिंपळाच्या झाडाखाली आपल्या गोड
आवाजात राम नाम जपत तुलसीदास सहाणेवर चंदन उगाळत बसले. रामनामात ते इतके तल्लीन
झाले की त्यांना स्वतःचाही विसर पडला. इतक्यात एक बालक तेथे आला आणि म्हणाला, ``व्वा! तुलसीदासजी
आपण चंदन तर छान उगाळले आहे. मलाही लावता का?'' तुलसीदासाने त्या
बालकाच्या कपाळावर तिलक रेखल्यावर त्या बालकानेही तुलसीदासाच्या कपाळावर चंदनाचा
टिळा लावला. वर झाडावर बसलेल्या मारुतीरायाची घालमेल व्हायला लागली. आताही
तुलसीदासाने प्रभु रामचंद्रांना ओळखले नाही तर हीही संधी हुकेल हे पाहून ते
तुलसीदासाला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाले,
``चित्रकूट के घाट पर भयी संतनकी भीर ।
तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर
।।
( चित्रकूटाच्या घाटावरी । गर्दी संतांची दाट ।
तुलसी उगाळे चंदन । तिलक करे रघुनाथ
।।)
क्षणार्धात भानावर येत तुलसीदासांनी
प्रभुचे पाय पकडले. ``भगवंता ह्या रूपात मी आपल्याला कसे ओळखणार? आपण मला आपल्या
चापबाण हाती असलेल्या, कोदंडधारी रूपात भेट द्या.'' प्रसन्न झालेल्या
रामचंद्राने तुलसीदासाला त्याला हव्या असलेल्या रूपात भेट दिली आणि प्रभु अंतर्धान
पावले. त्या एका क्षणात डोळ्यात साठवलं गेलेलं प्रभुंचं रूप तुलसीदासांना सतत
नजरेसमोर दिसतच राहिलं. रामचंद्राने एकदा तुलसीदासाच्या कपाळावर तिलक लावण्यासाठी टेकवलेलं
बोट तुलसीदासाला कायमचं पुलकीत करून गेलं.
मम गुण गावत पुलक शरीरा । गदगद गीरा, नयन बह नीरा
अशी तुलसीदासाची अवस्था झाली.
आज गुलमोहोराची ही वेगळी पाकळी----
गुलमोहोराच्या कपाळी रेखलेलं हे पांडुरंगाचं चंदनगंध मलाही पुलकीत करून जातं.
---------------------------------------------------
माणिकमोहर
(गुलमोहर) /गंध पाकळी
8; 8; 8; 3
तरुवर सुंदर उभा राहिला लेऊन वसने
लाल
भरजरि वस्त्रे अनुपम
त्याची काय ऐट तो डौल
पाचूची पानडी तयावर माणिक
पुष्पे लाल
माणिक पाचू रत्न-सरींसी झुलवीत अंगावर
वार्यावरती हेलकावते
लक्ष्मी तीच गजान्त
पायापाशी अंथरलासे गालिचाच
आरक्त
एक पाकळी परी वेगळी सुमनांच्या
झेल्यात
वेधुन घेते चित्तचि माझे
मन करे आकर्षित
दूरवरुनही रेशिम बुट्टे
दिसती हेची खास
लाल शालुवर साज चढवती
नाही उपमा त्यास
उचलुन घेते फूल कौतुके
निरखुन पाही त्यास
धूसर झाली तोच पाकळी
नयन पाहती काय?
टिळा चंदनी विठू कपाळी
दिसू लागला त्यात
रंग रूप आकार तोच तो
मज दिसे पाकळीत
गंध पाकळी विठू कपाळी
तरू कपाळी कशी
लावुन जाई विठूमाऊली फुलाफुलांवर
कधी?
---------------------------------------------
Comments
Post a Comment