“सुखं म्हणजे नक्की काय?”

 

मित्रांनो,

“सुखं म्हणजे नक्की काय?” हा प्रत्येकाला वारंवार पडणारा प्रश्न आहे आणि प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचं उत्तर शोधत राहतो.

सुख म्हणजे नक्की काय? हा प्रश्न श्रीमंतालाही पडतो, गरीबालाही पडतो, नाटकातील नटालाही पडतो वा शेपटीचं टोक पकडू पाहणार्‍या,गोल गोल स्वतःभोवती फिरणार्‍या भूभूच्या पिल्लालाही पडतो. कवी गदिमा त्याचं उत्तर देतात, ---आजोबा कुत्र्याच्या तोंडून – ``शेपटात सुखं असतं हे खरं आहे पण त्याच्यामागे लागलं तर ते तोंडात येत नाही. पण बाळा, तू चालत रहा; सुख तुझ्या मागून येत राहील.’’

 किंबहुना जीवन हीच सुखाच्या शोधार्थ असलेली पदयात्रा वा शोधमोहिम आहे. पाश्चात्य जगामधे आजही सुख हे भौतिक सुखाच्या तराजूत तोललं जातं. जेवढ्या जास्त सुखसुविधा तेवढं सुखही जास्त! हीच तेथील समजूत आहे.  असं असतं तर दुःखापासून कृत्रिमरित्या पूर्ण अलिप्त ठेवलेल्या, ऐषोआरामात दिवस व्यतीत करणार्‍या राजकुमार सिद्धार्थाला अत्युच्च सुख मिळायला पाहिजे होतं. पण----तसं नाही झालं! जे दुःखाचं प्रकरण वडीलांनी त्याच्या पुस्तकातून काढून टाकलं होतं नेमकं तेच प्रकरण त्याच्या पुढ्यात आलं. दुःखाच्या दर्शनाने व्यथित झालेल्या सिद्धार्थाने सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून मोठ्या खडतर तपःश्चर्येतून वैराग्य; वैराग्यातून ज्ञान; आणि ज्ञानातून सुख प्राप्त करून घेतलं. परत राज्यसुखाकडे मागे वळूनही पाहिलं नाही. हे पाहिल्याव  ज्ञानदेवांनी केलेली सुखाची सुंदर व्याख्या नक्की पटेल. ज्ञानदेव सुखाचं लक्षण सांगतांना सांगतात (गीता अध्याय 13)

``ज्याचा लाभ झाल्यावर माणूस सर्व काही विसरून जातो तेच खरे सुख!’’ 

‘ जे इंद्रियांच्या वृत्तीसी । निवांतपणे हृदयासी।

एकांती आणुनी तयासी । झोपविते थोपटुनी’

राधेला कृष्ण मिळाल्यावर ती जग विसरून गेली. तिचा भवाब्धि दुःखाचा प्रश्न संपला. सुख सापडल्यावर दुःख संपतं. कायमचं संपत. बालपण संपलं की बागुलबोवाचं भय संपतं. चंद्रप्रकाश पसरला की मृगजळाचा भास संपतो. त्याप्रमाणे सुख सापडलं की दुःखाचं दर्शनही होत नाही. सगळं जग माणूस विसरून जातो.

 ज्याप्रमाणे अर्भकाचे हातपाय सहज अहेतुकपणे हालत राहतात त्याप्रमाणे तो कर्मयोगी त्याचं विहीत काम करत राहतो.  आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण स्वेच्छेने स्वीकारलेले आवडीचे वा जगण्यासाठी निकडीचे काम, नोकरीधंदा.

सुखं सापडलेल्या प्रबुद्ध जीवाठायी अविद्याही उरत नाही. मी, माझे हे दोन्ही विरून गेले की कर्म बंधक होत नाही.

सूर्य अंधार शोधत भुयारात शिरला तरी त्याला अंधार सापडत नाही. त्याप्रमाणे सुख सापडलेल्या,  दुःख अज्ञान उरत नाही  ज्ञानाच्या प्रकाशा शिवाय काहीच दिसत नाही. हेच ब्रह्मज्ञान.

काष्ठात गुप्त असलेला अग्नी एकदा प्रकट झाला की लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्ञेय आणि ज्ञात्यांतला फरक संपला की मी देह असे वाटणे संपून जाते तो सर्वव्यापक होऊन जातो. पदार्थाला अग्नीचा स्पर्श झाला की जाळणारा आणि जळणारा असा द्वैत भाव संपतो. एक अग्निपण फक्त बाकी उरते

 

            पुतळ्याच्या हातातील शस्त्र, वेड्याच्या अंगावरील वस्त्र, गाढवाच्या पाठीवरील धर्मशास्त्र ह्याची जशी त्यांना जाणीव नसते त्याप्रमाणे  ज्ञानी माणसाच्या हृदयात मी कवी आहे, जिज्ञासू आहे शास्त्रप्रवीण आहे अशी कुठलीही जाणीव शिल्लक रहात नाही.

 

            खेडेगावात राहणार्‍या एखाद्या अशिक्षित आज्जीबाईंना ‘आज्जी कशा आहात?’ विचारल्याबरोबर ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान’ असं सहज त्यांच्या तोंडातून येते. हे उत्तर जसे वाटते तसे सहज येत नाही. कविता करणारी बहिणाबाई अशिक्षित नसते. जेंव्हा समाजाच्या पिढ्यानु पिढ्या भारतीय-तत्वज्ञानाच्या अमृतरसात सम्पृक्त होतात, जेंव्हा हे तत्वज्ञान जीवनाचा भागच होऊन जाते, तेंव्हाच हृदयात स्थापित केलेल्या अमृताच्या निस्यंदिनीसारखे ते मुखावाटे पाझरायला लागते.  आणि कृतीवाटे आचरणातूनही उमटायला लागते.

                          आज एखाद्या पंचतारांकीत हॉटेलला सुद्धा आमच्या कुठे कुठे शाखा आहेत, आमच्याकडे काय काय सुविधा आहेत, आमच्याकडे इतरांपेक्षा काय वेगळं आहे. किती डिस्काऊंट आहे ह्याच्या जाहिराती कराव्या लागतात. पण पंढरीच्या वारीची ना जाहिरात ना डिस्काऊंट! सोयी सुविधांची नामोनिशाणीही नाही. तरीही ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ म्हणत लाखो लोकं वाटेवरचे दगड धोंडे काटेकुटे आजारपणं ह्यांची पर्वा न करता पायात चप्पल असेल तर असेल नाही तर अनवाणी मैलोनमैल चालत, पळत, टाळमृंगांच्या गजरात अभंग गात गात ज्या आसोशीनी पांडुरंगाला भेटायला जातात आणि जे सुख मिळवतात ते पंचतारांकीत संस्कृतीला कळण्या पल्याडचेच म्हणावे लागेल. आणि एकदा का ‘तुका म्हणे देह भारीला विठ्ठले’ हा अनुभव आला की अशा लोकांच्या सहवासात आलेल्यांनाही ह्या विचारांची लागण झाल्याशिवाय रहात नाही

                      ज्या प्रमाणे रिलेच्या शर्यतीत बेटन मागच्या खेळाडूकडून पुढच्या खेळाडूकडे सोपविले जाते, तद्वत ज्ञानदेवांकडून, नामदेव एकनाथ, तुकाराम, रामदास, संत सावतामाळी, जनाबाई----- इत्यादि अनेक संताच्या हातातून आलेली ही तत्त्वज्ञानाची पताका अनेक ओव्या, अभंगांमधून, गौळणी, भारुडं, गाण्यातून, अनेक भक्तिरचनातून, लिखाणातून आजच्या पिढीच्या हातात आलेली पहायला मिळते. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ अशी परिस्थिती निर्माण होताच, ज्ञानदेवांनी पेटवलेल्या जीवनाच्या होमात अनेकांनी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवलेल्या दिसतील. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या वातीवर लावलेले अनेक दिवे उजळले तरी सगळ्यांचा प्रकाश सारखाच असतो, त्याप्रमाणे सर्वच संताचा उपदेश मानवतेला साद घालत राहिला. वाटा अनेक असल्या तरी सर्वांचे गंतव्यस्थान एकच असल्याने सर्व मार्गांमधील परस्पर सामजस्य टिकून राहिले. डोळसाचा हात धरून चालणारा नेत्रहीन जसा योग्य जागी पोहोचतो तसे माझ्यासारखे अनेक अज्ञानी योग्य मार्गाला लागतात. सुख अजुन मिळालं नसलं तरी सुखाचा मार्ग हाच आहे तो चुकला नाही ही ग्वाही मन देत राहतं.

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -