नीरवस्त्र

 

नीरवस्त्र -

एक नूर आदमी दस नूर कपडा म्हणतात ते काही खोट नाही. माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलवून टाकतात कपडे. रावाचा रंक दिसू शकतो तर रंकाचा रावही शोभून दिसतो कपडे बदलताच!

पुरातन काळापासूनच आपल्या भारतातील वस्त्रोद्योग केवढा पुढारलेला आहे. ह्याचा मनात विचार करत होते. राम, लक्ष्मण, सीता वनवासास निघाल्यावर शृंगवेरपुरात भरद्वाजांच्या आश्रमात त्यांनी आपले सुंदर कपडे उतरवून वल्कले परिधान केल्याचा उल्लेख आहे. तर पुढे दंडकारण्यात पोहचल्यावर सती अनसूयेने सीतेला काही खास प्रकारची वस्त्रे दिली आहेत जी वनात उपयोगी पडतील आणि जी घामाने अथवा कशानेच मलीन होणार नाहीत. वा त्यांना दुर्गंधी येणार नाही; जी आजही अशक्य कोटीतील गोष्ट वाटावी.

पांडवांचा अज्ञातवास संपत आला होता. त्याचवेळेला कीचकाला ठार मारल्याची वार्ता वार्‍यासारखी कौरवांपर्यंत पोचली. आणि हे काम नक्कीच भीमाच हे लक्षात येऊन संपूर्ण कौरवसेना विराटावर चालून गेली. त्यावेळेला विराटाचा मुलगा उत्तर कौरवसेनेशी  लढायला निघाला असता सर्व राणीवशातून आणि खास करून राजकन्या उत्तरेकडून त्याच्याकडे एकच मागणी झाली की, `ह्या कौरवांचे कपडे हे अत्यंत सुंदर रंगांचे मुलायम रेशमाचे असतात. तेंव्हा त्यांचा पराभव करून त्यांची सर्वांची उत्तरीय घेऊन ये.' अर्थात अर्जुनच पाठीराखा असल्याने हा हट्ट पुरवला गेला.  द्रौपदीला कृष्णाने पुरवलेली वस्त्र किंवा द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून कृष्णाच्या कापलेल्या करंगळीला बांधलेली चिंधी वस्त्रोद्योगासोबत आपल्या धातूशास्त्राबद्दलचाही पुढारलेपणा दाखवते. कारण सुरीसाठी/ बाणासाठी / तलवारीसाठी किंवा साडीत जर म्हणून वापरण्याएवढी बारीक सोन्या, रुप्याची तार काढणं वा लोखंडाचं धारदार पात बनवणं हे सोन्यारुप्याच्या,  वा लोखंडाच्या खाणीतून ते धातू

शुद्ध करून घेण्याचे अद्ययावत कारखाने कामगार असल्याशिवाय संभवत नाही.

700- 800 वर्षांपूर्वीच्या श्री आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रामधील ललितादेवीच्या अंगावर कांचीची भरजरी रेशमी साडी आहे. आकाशी साडीवर लालबुंद बुट्टे असल्याचा उल्लेख आहे. औरंगजेबाच्या मुलीने ढाक्याच्या मलमलीच्या केवळ एका काडेपेटीत माऊ शकतील अशा एकावर एक सात साड्या नेसूनही त्या तलम वस्त्रातून तिचं शरीरसौंदर्य उठून दिसत असल्याची वर्णन आहेत.  अगदी आत्ता आत्ता काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या रुक्मीणीला कांचीहून भेट आलेली भरजरी नऊवारीसाडी त्या ठेंगण्या ठुसक्या सतत हात कमरेवर ठेवलेल्या दोन फुटी मूर्तीला  त्यावेळच्या उपाध्यायांनी इतक्या सराईतपणे, झरझरझर चापून चोपून नेसवली की आम्ही आश्चर्याने बघतच राहिलो. माझी आई नऊवारी  नेसायची त्याची आठवण झाली. इतकी चापून चोपून  सुंदर नेसायची की बघत रहावं. कमरेचा काठ जराही दुमडणार नाही की कुठे जरा पोटरी दिसणार नाही. पदर दुसर्‍या खांद्यावर येतांना  अशा नजाकतीने येईल की पोलक्याची एक बाही आणि त्याचा काठ आणि त्याचबरोबर गळ्यातील मंगळसूत्र आणि कंठीमाळ उठून तर दिसेल पण त्या तलम इंदुरी साडीतून सर्वांग कुलीनतेने झाकलेलंही असेल. आता मात्र देवीच्या नव्या पुजार्‍यांना देवीला साडी नेसवता येण्यामुळे चणियाचोळीतले किंवा गोलसाडीतले तिचे फोटो पाहून परत एकदा आईच्या वृद्धत्त्वातील शेवटच्या दिवसांची परकर पोलक्यातील तिची विद्ध करणारी आठवण डोळ्यात पाणी आणून गेली. माझी 80 वर्षांची अमेरिकन मैत्रीण मला जेंव्हा म्हणाली की, माझे वडिल पूर्वी फक्त मद्रास कॉटनचे कपडे वापरत आणि काश्मीरी स्तोल किंवा स्कार्फ वापरत तेंव्हा आश्चर्याने तोंडाचा होण्याची पाळी माझ्यावर आली.

म्हणजे रामायण काळापासून किंवा त्याच्या कितीतरी आधीपासूनच भारताचा वस्त्रोद्योग हा प्रगतीच्या शिखरावरच होता. अनेकप्रकारचे तंतु तयार करून त्याची वस्त्र बनवण्याची कला माहीत होती. कापसाचे वस्त्र कदाचित रेशमी वस्त्रांनंतर प्रचलित झाले असावे.

कपड्यासोबत किती गोष्टी येतात. पहिल म्हणजे त्याचं material.  कापड किंवा कापडाचा धागा कुठल्या कच्च्या मालापासून बनला आहे. त्यावर त्या कापडाचा पोत ठरतो. धाग्याच्या मूळ घटकपदार्थ, त्याचा काढलेला धागा एकसारखा असणं किंवा नसणं, त्यावर केलेल्या प्रक्रीया, त्याचा जाड, पातळपणा, आणि नंतर तो कसा विणला गेला आहे ह्यावर त्याच्या कित्ती कित्ती गुणधर्म अवलंबून असतात.

कापडाची जाडी, तलमपणा, झिरझिरीतपणा , विसविशीतपणा, घट्टपणा, अंगाला चिकटणे, झुळझुळीतपणा, सुळसुळीतपणा, कपड्याची चमक , भगभगीतपणा, झळाळी, सौम्य शांतपणा, डोळ्यालाच जाणवणारा थंडपणा किंवा लोकरी वस्त्राचा उबदारपणा, वस्त्र अंगावर घेतलं की त्याच्या घरंगळण्याची पद्धत, टाटा मीठासारखं सुर्रकन का  माशाच्या हलचालीसारखं सुळ्ळकन का, प्राजक्ताच्या फुलासारखं  नकळत अलगद का मधुमालतीच्या भिंगरीसारखं गिरक्या घेत समोरच्याला आऽऽआऽऽहा! म्हणायला लावत का घोंगड खांद्यावरून पडाव तस धप्पकन!  त्याला पडणार्‍या चुण्या किंवा लहरींची कमनीयता हा अजून वेगळा विषय. काही वर्ष काश्मीरवासी असतांना खरी काश्मिरी तूश ओळखण्याची परीक्षा कळली. तळहातावर एकेरी तूशची शाल ठेऊन त्यावर कडेनी हळूच फुंकर मारली तर पाण्यावर तरंग उठावेत असे एकसारखे तरंग त्या तूशवर तयार होतात. ढाक्याच्या जामदानी साड्या आजही एका अंगठीतून काढून दाखतांना पहाणे हा माझ्यासाठी एक अभूतपूर्व सोहळा असतो. crease , fall  ह्या अजून कापडाच्या गुणवत्तेच्या परीक्षा.

कापडाचं Material / ज्या घटक पदार्थापासून कापड तयार व्हावं ह्यात यमुनाष्टक वाचत  असतांना अचानक एक नवी भर पडली आणि ह्या नवीन material चा पुढचे अनेक दिवस मन विचार करत राहिलं. मुरारिकायकालिमाललामवारिधारिणी म्हणजे कृष्णाच्या अंगाच्या मेघनीळ रंगात रंगवलेल्या वारिचं म्हणजे पाण्याचं वस्त्र धारण करणारी यमुना! मराठी भावानुवाद करतांना लिहीत गेले

 

सलील सावळे जिचेच कृष्णरंगि रंगले

सुनीलवर्ण नीरवस्त्र चारुगात्रि वाहते

 

-------

 

सुवर्ण वर्ण सावळा झळाळतो जिचा सदा

जिला बघूनि आठवे सदैव कृष्ण सावळा।।5.1

 

अशा यमुनेच्या ह्या अलौकीक वस्त्राचा पोत, झुळझुळीतपणा, पर्वतांनी अंगावर घेतलेल्या ह्या वस्त्राचं मोत्यांप्रमाणे तुषार उधळत खाली ओघळणं! निशब्द होऊन ``आहाहाऽऽऽ! म्हणावं का, हाय! हाय! म्हणत दिल थामके उभं रहाव? सौदर्याची परीसीमा! सूर्याच्या प्रकाशातील त्याची चमक, चंद्रप्रकाशातील त्याचं गूढ निळेपण,  तिच्या तिरावरच्या  वृक्षांच्या प्रतिबिंबांची तिच्या वस्त्रावर रेखलेली चित्रे, तिच्या वालुकामय काठाची किनार,  नजरेसमोर उलगडत होती.

सुधांशुरश्मि चंद्रकांत स्पर्शिता जला हिच्या

फुलेच चांदण्यांचि माळिते हि स्वप्नसुंदरा

रुप्यात नाहतीच वृक्षमंजिरी जिच्या तिरा

सुशोभिता करी प्रवाह शारदीय रात्रिला।।5.2

 

कृष्णाला शोधतांना राधेच्या वेणीतून गळून पडलेल्या फुलांची  वेलबुट्टी ह्या वस्त्राला आहे. तर कृष्ण तिच्या पाण्यात खेळतांना त्याच्या अंगाची सुगंधी चंदनाची उटी त्या  जळात मिसळली गेल्याने त्या नीरवस्त्राला एक अनोखा कृष्णगंध लाभला आहे.  त्या सुगंधामुळे अनेक भुंगे, मधमाश्या ह्या नीरवस्त्रावर आकृष्ट झाल्या आहेत. आजही मनाची चंदनाची पेटी करून त्यात ठेवलेलं हे आद्य शंकराचार्यांनी विणलेलं यमुनेचं नीर वस्त्र किती वेळेला मी घडी उलगडून बघते आणि कितीवेळेला घडी करून ठेवते ह्याला गणतीच नाही.

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -