भारतीय पेये

 

भारतीय पेये

आहाहा!

आज माझ्या रसनेने अनुभवलेल्या असंख्य असंख्य भारतीय पेयांच्या नुसत्या चवींच्या आठवणीनेही माझ्या तोंडून आहाहा!!!! असे उद्गार निघाले. आरामखुर्चीवर मस्त रेलून डोळे मिटून त्या विविध चवींची उजळणी करण्यानेही जीव सुखावला. प्रवीण दीक्षितांच्या  नोकरीच्या निमित्ताने भारताचा काही अंश पहायला मिळाला तेवढ्यातसुद्धा थंडीत पहाटे अंगावर ओढून घेतलेल्या दुलईसारख्या अनेक जीव सुखावणार्‍या खाद्य-पेयांची भर पडत गेली

सहज म्हणून नुसत्या भारतीय पेयांची गिनती चालू केली आणि लेखच होईल असं वाटलं. सर्वात प्रथम निसर्गनिर्मित शहाळ्याची जीव सुखावणारी थंडगार आठवण झाली. हे शहाळं मोहाच्या माडाचं असलं तर मग विचारूच नका. सुखाची परिसीमा!  मोहाच्या नारळाचं पाणी, खोबरं हे चवीला अत्यंत मधुरतम असतं. मोहाच्या नारळाचं विशेष म्हणजे एखाद्या सामान्य घराण्यात अचानक एखादा अतुलनीय विद्वान, कवी, लेखक, वैज्ञानिक जन्माला यावा पण त्याच्या अतुलनीयतेचं रहस्य कळू नये तसा मोहाचा नारळ! मोहाचा नारळ रुजवून तयार झालेलं रोप मोहाचे गोड नारळ निर्माण करू शकत नाही.  बागेत लावलेल्या नारळी पैकी अचानक एखादा माड गोड फळे देणारा असल्याचं लक्षात येत. आणि आपल्या बागेत पठ्ठेबापूराव जन्मल्याचा आनंद होतो.

कोकणात जाऊन कोकमचं सरबत प्यायलं नाही तो करंटाच!  ताजी कोकमाची फळं मधे कापून त्यातील बिया काढून तयार झालेल्या कोकमफळाच्या वाट्यांमधे साखर भरून बरणीत आठ दिवस ठेऊन दिल्या की लालबुंद सुटणारा रस अमृत कोकमच्या सरबताची जननी असतो. ताज्या रसाचं सरबत पोट तुंडुंब होईपर्यंत रसनेला थांबू देत नाही.

माडावरून ताजा नारळ उतरवून, नारळाचं ताजं दूध घालून (साखर न घालता) कोकमच्या  आगळापासून केलेली सोलकढी कोणी एकदा जरी चाखली तर तो लग्नात प्लॅस्टिकच्या ग्लासमधे मिळणार्‍या सोलकढीला हातही लावणार नाही. 

भारतात बहुधा सर्वत्र सहजपणे उपलब्ध आणि उन्हातून आल्यावर आहाहा! करून तरतरी देणारं आपलं घरोघरीचं ताज्या लिंबाचं सरबत! ---- साखर, मीठ आणि ताज्या लिंबाचा स्वाद ह्यांच परिमाण जमलं की तयार होणारं रसायन  रसनेच्या संपर्कात येताच दर घोटागणिक मेंदूलाही ताज करत थेट स्वर्गसुखाचा अनुभव देत जातं. खास कार्यक्रमासाठी बनवायचं असेल तर हलकासा वेलदोडा केशराचा स्वाद ह्या घरगुती पेयाला एकदम फायुस्टारची चमक देऊन जातो. (पण प्रत्यक्ष फायुस्टारमधलं फ्रेश लेमन नामक अत्यंत आंबट पेय घशाच्या स्वरयंत्राचे बारा वाजवतात हा माझा प्रत्येकवेळचा अनुभव आहे.) लिंबूसरबतात साखरेची जागा मधाने घेतली तर त्याची मधाळ चव रसनेला वेगळीच रसिकता शिकवून जाते. पॅशनफ्रुट ह्या लिंबूवर्गीय फळाचं सरबत स्वतःची एक वेगळीच चव घेऊन येतं.

मे महिना आला की मात्र कैरीचं पन्हच पाहिजे. आमच्या गृहीणी काय काय घालून सजवतात त्याला. गुळाचं पन्ह, साखरेचं पन्ह परत गुळ साखरेच्या निवडीनुसार वेलदोडा, केशर आलच. कच्या कैरीचं, उकडलेल्या कैरीचं, ह्या पन्ह्यासोबत कैरीच्या डाळीची चवही जिभेवर रेंगाळायला लागते चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाचं उत्साहाचं वातावरण कायम ह्या पन्ह्यासोबत हात धरून येत.

दिल्लीला मात्र काळं मीठ जीरेपूड घातलेले बिन गुळाचं पन्ह सोबत पुदिन्याची चव घेऊन येत. अजून एक अफलातून चव! प्रत्येक भारतीत पेयाला माझा `थम्ब अप' असतो. प्रत्येक प्रदेशात, प्रांतात बनवलं जाणारं पन्हं हे तेथील unique identity असते. आजही अशा अनेकोअनेक प्रांतीच्या, जागीच्या येथील पन्ह्याची विसरू शकणारी चव मला दूरून येणार्‍या अनामिक बासरीच्या सूरांसाखी हुरहुर लावून जाते.

उत्तरेत  उन्हाळ्यात  जलजीरा हे पेय  ताजं ताजं प्यावं. ( रेडीमेड जलजीरा ची पावडर पाण्यात घालून नव्हे.) त्याच्यात उतरलेला पुदिनाचा स्वाद काळ्या मीठाने अजून बहरतो.  उन्हाळा वाढत जाईल तसं नारळा एवढ्या भल्यामोठ्या बेलफळातील केशरी गर काढून त्यात गार पाणी घालून केलेलं सरबत बेलाची किंचित चव घेऊन येतं. उन्हाळयामुळे होणार्‍या सर्व प्रकारच्या त्रासापासून रक्षण करतं.  मला बेलाच्या सरबताच्या जोडीने  एक वेगळीच आठवण झाली ती  महाशिवरात्रीच्या सुमारास होणार्‍या कवठाच्या कढीची! व्वा! लज्जतदार! करवंद, आवळा, जांभूळ यांच्या मोहक चवी सरबतात डोकावतात तेव्हा जीव सुखावतोच सुखावतो. पण एवढ कशाला उन्हाच्या झळयांमधून घरी आल्यावर  वाळा  आणि घरच्या एखाद्या मोगरीच्या फुलाने नटलेलं थंडगार माठातलं पाणी पितांना आत्मा  सुखावल्याने तुमचे डोळे क्षणभर तरी मिटतील हे पैजेवर मी सांगते. सिंहगडावरील देवटाक्याच्या थंडगार पाण्याची चव सिंहगड चढल्यावरच काय खास आहे हे कळतं.

उत्तरेत थंडीमध्ये काळी गाजर यायची. त्यात मोहरी पावडर, पाणी, काळे मीठ, पुदिना घालून केलेले पेय जेंव्हा माझ्या शेजारच्या दादींनी मला दिलं तेंव्हाही माझ्या आहाहा!!!! च्या यादीमधे अजून एक भर पडली. कदाचित आज माझ्या लेखातील आहाहा!!! ची संख्या तुम्ही रसिक नक्की मोजणार. पण जिभेवरच्या रेंगाळणार्‍या चवीच्या सुखाने डोळे आपोआप मिटले की तोंडातून फक्त आहाहा!!! हाच उद्गार येतो


पन्ह्यासोबत पुण्याला मिळणार्‍या खास पुंड्या उसाच्या रसाची आठवणं झाली नाही असा उन्हाळा जाणार नाही. मुरलीधर रसवंती, गुलाब रसवंती, नवनाथ रसवंती अशा रसवंतीगृहात प्रवेश करताच शेणाने सारवलेल्या जमिनीचा वास आणि त्यासोबत असलेला नितांत सुंदर गारवा मनाला प्रसन्न करून जाई. चरकापाशी माशा येऊ नयेत म्हणून लावलेल्या धूपकांड्या देवळात गेल्याचा `फील' देत. स्वच्छ गुर्‍हाळात मैत्रीणींबरोबर बसून शिवाजी, माळ ओढत बसलेले गुरू नानक , मेरू पर्वत घेऊन उड्डाण करणारा हनुमान, ध्यानस्थ शंकर ह्याच्या सोबत शेजारीच आपली हेमा, जया, रेखा, बटा काढलेली जयप्रदा, धर्मा , जितू ह्यांच्या कॅलेंडरांकडे बघत जम्बो ग्लासमधून रस पिण्याची मजा काही और होती. स्वच्छ पांढरा पायजमा/ धोतर, पांढरा शर्ट आणि पांढरी शुभ्र टोपी घातलेल्या काकांना ``काका, बर्फ नको हं!'' असं सांगून टिळंटिळ भरलेल्या रसाच्या ग्लासमधील वरच्या वरच्या फेसाचा फन्ना करून, ओठावरची फेसाची लवलवती रेघ पुसता परत बर्फ मागून घ्यायची मुलांची शक्कल माहित झाली होती. बोलता टेबलावर भांड्यात बर्फ वेगळा आणून ठेवत असत.  उसाच्या रसाच्या माधुरीला थोडं आलं लिंबू सोबतीला आलं की अमृतानुभवाचाच आनंद! त्यात अजून कोणाला वरतून मीठाची चिमुट भुरभुरून टाकायची असेल  तर चवीप्रमाणे टाकू शकतो. जीव सुखावला नाही तरच विशेष!

ललिता पंचरत्न ह्या स्तोत्रात शंकराचार्यांनी ललितादेवीचं केलेलं वर्णन मोठं बहारदार आहे . ह्या देवीच्या हातात `पुण्ड्रेक्षु-चाप' म्हणजे पुंड्या उसाचं धनुष्य आहे. हा लालसर उस मऊ असल्याने सहज वाकतो. ह्या उसाच्या धनुष्याला फुलांचा बाण जोडलेला आहे. (पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमेषु-सृणीर्दधानाम्।।2) उसाच्या धनष्याने फुलांचा बाण मारून राक्षासही घायाळ होत असतील तर उसाच्या रसाच्या आठवणीनेही आज मला घायाळ व्हायला होत असेल तर नवल नाही. काही चवीच घायाळ करणार्‍या असतात. हाच पुंड्या उस तुळशीच्या लग्नाला मामा बनून घरोघरी यायचा. अर्थात असा गोडमामा दुसर्‍या दिवशी आम्हा बाळगोपाळांना फारच आवडायचा. ह्या उसाचं वरपासून खालपर्यंत पहिल्या `अॅटेम्प्टमधे' दातानी साल काढायची आमची पैज असे.

हिमालयाच्या नैनिताल . भागात उन्हाळ्यात र्‍होडोडेंड्रॉन नामक फुलांचा बहर येतो. कोकम प्रमाणे ह्या फुलांमधे साखर घालून बरणीत भरून ठेवली की काही दिवसात त्याला सुंदर लाल रंगाचा रस सुटतो. तो बाटलीत भरून त्याच पाहिजे तेंव्हा सरबत करून प्या.---- आहाहा! अमृत! आपल्या अमृतकोकमचा तेथील भाऊ.  चव  आणि रंग योगीश्वरांचंही चित्त चोरल्याशिवाय राहणार नाही.

र्‍होडोडेंड्रॉन आणि अमृतकोकम च्या चवी किंचित बाजूला ठेऊन खरोखरच्या अमृतसरला गेला तर मात्र तेथील बंपर ग्लासमधील लस्सी आणि लस्सीवर घातलेलली डावभर मलई ओठावर स्निग्ध पांढर्‍या मिशा रेखत खाणं किंवा पिण हा अमृतसरचा साक्षात अमृतानुभवच असतो. अमृतसरच्या वाडगाभर दह्याचा ब्रेकफास्ट हा जगातल्या कुठल्याही ब्रेकफास्टच्या तोंडात मारून जाईल इतका अप्रतिम असतो.

ताक कस पाहिजे हा प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न असतो. ते किती पातळ पाहिजे का घट्ट , त्यानुसार पाण्याचं प्रमाण, ताक साईचे दही घुसळून केलेले असले पाहिजे का टोण्ड दुधाचे, एक डोळा बंद होईल इतके आंबट का अधमुर्‍या दह्याचे गोड--- हे सर्व प्रश्न त्या त्या घरच्या test buds ची तज्ज्ञ  गृहीणी शिताफीने सोडवत असते. घरी अचानक हुणे आले तरी ताक कधी कमी पडत नाही. एक राजस्थानी म्हण तुम्हालाही नक्की पटेल `` लस्सी और लडाई कितनी भी बढ सकती हैं।’’ ताक पीत पीत पुतीन आणि झेलेन्सकी यांच्या गप्पा मारल्या तर गप्पाही कितीही काळ वाढू शकतील. असो! 

आंबटशौकीनांपासून ते  अधमुर्‍या दह्याचं ताक पिणार्‍यांच्या चवीपर्यंतच्या एका broad spectrum ची तहान भागविण्याचे काम ताक करत असतं. त्यात घालायचा मसाला जीरेपुड, काळं मीठ/ मीठ, पुदिना, कोथिंबीर, आलं, किंचित मिरची, ---- हे प्रत्येकाच्या आवडीनुसार.  स्वर्गात कितीही भारी भारी गोष्टी मिळत असल्या तरी तक्रं शक्रस्य दुर्लभम्। म्हणजे स्वर्गातल्या इंद्रालाही ताक मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे. पूर्वी लग्नात मसालेभात आणि जिलबीसोबत जगमधून वाढायला येणारा मठ्ठा आता extinct ह्या सदरात मोडतो की काय असं वाटायला लागलं आहे. 

ह्या सांसोबत आद्य शंकराचार्यांच्या काव्य रसांची आठवण कशी होणार नाही? आनंदलहरी ह्या रुचिर काव्यात पार्वतीचं वर्णन करतांना ते म्हणतात, दूध, मध, द्राक्ष -- सगळेच गोड पण त्या गोडाची चव वेगवेगळी. ती चव रसनाच जाणू शकते डोळे कसे जाणणार? त्याप्रमाणे पार्वतीच्या सौंदर्याचं आकलन शंकरालाच व्हावं आम्हाला कस?

जरी राहे गोडी दुध, मधचि द्राक्षात विविधा

कळे कैसी नेत्रा, विविधपण जाणेचि रसना

तसे सौंदर्याचे तव विविध पैलू अनुपमा

मला शब्दांमध्ये जमतिल कसे बद्ध करण्या।।2.1

अर्थात रसनेचं काम रसना इतकं चोख करते की तिने घेतलेल्या चवींच्या आठवणींचा मेंदूच्या मेमरीत एक वेगळा फोल्डरच भरलेला असतो.

 अमृतसरच्या लस्सीप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली येथे असलेल्या दूध कट्ट्यावर पहाटे पहाटे जाऊन म्हशीचं/ गायीचं चर्र चर्र आवाज करत काढलेलं पेल्यावर लवलव हलणार्‍या फेसाचं धारोष्ण दूध पिण अविस्मरणीय! अमेरीकेचं कोणी कितीही कौतिक गायलं तरी तेथे मिळणारं कितीही उत्तम ब्रँडचं ग्लासभर दूध कोणी पिऊन दाखवावं. अश्वत्थाम्याला दिल्या जाणार्‍या पिठाच्या दूधापेक्षा भयानक चवीचं असतं. मी लहान असतांना आई खारीक कुटून दूधात घालून देई. वरचं वरचं खारकेच्या चवीचं दूध पिऊन झालं की चमच्याने दुधात भिजलेली खारीक खाणे आहाहा! एक अल्टिमेट अनुभव असे. अगदि बोर्नव्हिटा . . च्या चवींना आणि ताकदीला चित करणारा. खर तर त्यांच्या चवीची तुलनाच होऊ शकत नाही.

अमेरीकेतील एक पेय तेथील कडाक्याच्या थंडीत आम्हाला वेड लावून गेलं. बघा करून थंडीमधे! टेट्रापॅकमधे मिळणारा 1 लिटर सफरचंदाचा रस एका बोरोसिलच्या काचेच्या Beaker  सारख्या पात्रात ओतून त्यात चारपाच लवंगा, चारपाच काळे मिरे व एक दालचिनीची सळई घालून उकळावा आणि कपातून  गरम गरम प्यावा. लांबदालचिनीचीच्या लांब सळई  ने हलवत हलवत प्यायल्यास थोडा अजून आनंद घेता येतो.

 

ले ला रात्रभर पाण्यात जर्दाळू भिजत घालून दिवसभर ते जरासं गुळचट पाणी प्यायला मस्त लागायचं आणि थंडीलाही तोंड द्यायचं. लडाखमधे रस्त्याने जाता जाता एखाद्या निर्झराचं पाणी सहजपणे बाटली भरून घेतलं तरी चालतं. अशा निर्झराच्या पाण्याची चव कुठल्या बाकीच्या पाण्याला येणार नाही !

कोल्हापूरला अजून एक रसविशेष म्हणजे मँगो लस्सी! ह्या मँगो लस्सीने पोट तुडंब झालं तरी रसनेची तहान भागली नाही. मिल्कशेकची यादी तर संपणारी आहे. कारण सिझननुसार भारतात येणारी, चिक्कू, सिताफळ, अंबा, स्ट्रॉबेरी, लिची------ यादीही संपणारी आहे.


पुण्याला कावरे कोल्ड्रिंक्सने सुरू केलेला मस्तानी हा प्रकार कधी बाजीरावाने प्राशन केला असता तर त्याने खरोखरच्या मस्तानीलाही सोडून दिलं असतं. त्या मस्तानीतील मिल्कशेक आधी प्यावा का वरचा आईस्क्रीमचा गोळा हे ठरवेपर्यंत पेला रिकामा झाल्याने अजून एक मस्तानी मागवावीच लागे.

नागपूरला `लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र' आहे. एकदा कुतुहलाने सरळ तेथे आतच गेले. तर जंगी स्वागतच झालं. मला पाहिजे असलेली झाडं तर मिळालीच पण तेथील मुख्यांनी त्यांच्या खास चवीच्या संत्र्यांचा ज्यूस देऊन मला असं काही थंड केलं की इतर वेळेस माझ्या उचकटणार्‍या जिभेनी `मी अजून एक ग्लास रस घेईन' असं निर्लज्जपणे सांगून टाकलं. आहाहा! विसरणारी चव. नागपूरच्या कमिशनर बंगल्यात असलेल्या संत्र्याच्या झाडांची रोज बादली बादली संत्री काढून ब्रेकफास्टसोबत ग्लास ग्लास ज्यूस ---- आहाहा ---अनुपम!

सोलकढी, कवठाची कढी (खरतर कढी हा शब्द जात बरोबर नाही त्या पेयांबरोबर ), चिंचेच सार, असमूलाचं सार, ---- पाणीपुरीनंतर मागून घेतलेलं बशीभर चिंचेच पाणी अगणीत पेये!

मित्रांनो, कृष्ण अर्जुनाला त्याच्या विभूती सांगतांना गीतेत म्हणतो की, ``बाबारे, मी जे काही सांगतोय त्या तुला कल्पना येईल इतपत काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच माझ्या विभूती (म्हणजे मी कुठे आहे आणि माझे स्वरूप ठळकपणे तुला दिसून येईल अशा गोष्टी) आहेत. मी तर चराचर व्यापून उरलो आहे.'' त्याप्रमाणे भारतभरातली ही मोजकीच पेय. (पेय म्हणजे जे पीता येतं ते.) अशा उत्तमोत्तम भारतीय पेयांची संख्या हजारो हजारोंच्या घरात जाईल.

सवंगड्यांनो, माझ्या मनातला प्रश्न इथून सुरू होतो. इतक्या उत्तमोत्तम चवींनी भारत समृद्ध असतांना कुठल्याही मॉलमधे गेल्यावर दरवाजापासूनच शेंदूर आणि बुक्का कालवल्यासारख्या पेयांच्या महा भयानक आकाराच्या बाटल्या  का बुधले खचाखच भरलेल्या पाहून, शेल्फच्या शेल्फ खोट्या ताकदीच्या पावडरींनी भरलेली पाहून, कडूजहर कषायपेयांनी बेसुमार व्यापलेली जागा पाहून --- आणि सर्वात म्हणजे ट्रॉल्या भरभरून घरी साठवणुकीला ही शेंदुर बुक्क्याची पेय घेऊन जाणारी मेंदू गहाण टाकलेली प्रजा पाहून मी अचंबित असते.

वय झालं आपलं म्हणत परत एकदा शंकराचार्यच आठवते आणि एक अद्भुत रस मला सापडतो. ज्याच्या चवीपुढे अमृतही फिकं पडेल. शंराचार्यांनी केलेल्या ह्या स्तोत्राची चारच कडवी उपलब्ध आहेत. तेवढीच मराठीत देते.

माझ्या प्रिय सखि जिह्वे! करणे अनुकंपा मजवर तू गे
जोडुन कर मी विनवी। परनिंदा सोडुनी तू दे।।1.1

शरण शरण तव पायी मम ऐक ऐक गे माझे सखये
अविरत जपत रहा तू अमृतकण नमो शिव हे।।1.2

आश्रय तूचि गुणांसी। माधुर्य, ओज, सत्य, प्रसादासी
सोड सोड निंदेसी। तुज शपथ असे सखे माझी ।।2.1

चर्चा सकल जगाची कुजबुज, अफवा, तर्क, कुतर्कासी
मैत्रिणि रसने सोडी जपत रहा नमो शिव हे।।2.2

माहित आहे मजसी तुज षड्रस पक्वांन्नांची गोडी
तू तिखट, मधुर,खारे। आंबट ,तुरट,कटु रस-लोभी।।3.1

रसने! शिवनामाचे। माधुर्य आगळे सर्वांहूनी
प्रेमे सेवी नित ते अमृतकण नमो शिव हे।।3.2

जोडुनि कर तुज रसने। फिरुन फिरुन तुजला मी विनवी गे
खोचक बोचक वाक्ये। उच्चारी ना कटू वचने।।4.1

तुरटीने जल निवळे तैसे प्रणवसहित शिवनामाने
निर्मळ होते मन हे। जपत रहा नमो शिव हे।।4.2

----------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)