`अलका तू असं लिही '

 

`अलका तू असं लिही '

`अलका तू असं लिही ' ड्यूक युनिव्हर्सिटीच्या भव्य लायब्ररीत बसून मी एक छोटसं पुस्तक चाळत होते. कदाचित सत्तरएक वर्षांपूर्वीचं पुस्तक असावं. मला नीट आठवत असेल तर, मालती बेडेकर या लेखिकेचं. पहिल्यांदा जरा बाळबोधच वाटलं. पण गम्मत म्हणून वाचलं इतकच.

काही दिवसांनी नाते लडाखशी लिहीण्यासाठी पहिल्यांदाच मी लेखणी हातात धरली  आणि माझ्यासमोर अलका उभी राहिली. `प्रवासवर्णनात त्या गावांचे बारकावे ध्यानात घे हं' सांगणारी. तुला आठवत नसले तरी त्या गावच्या लोकांना, तेथे जाऊन आलेल्यांना सर्व बारकावे चांगले माहित असतात. पत्र पाठवून , फोन करून लेखकाला तोंडघाशी पाडतात. माझे `नाते लडाखशी' प्रसिद्ध झाल्यावर एका लहानशा गावातून फोन आला मला, `` ताई, आपण लेला नुकत्याच कधी गेला होता का?'' ``नाही! एकदा बदली झाली की त्या गावांना बहुतेक मी कधीच जात नाही'' -मी. ``बरोबर. आता ले खूप बदललं आहे. तुम्ही ले ला गेला असता तर असं पुस्तक लिहून झालं नसत. आता तुमच्या पुस्तकाला अँटिक व्हॅल्यू आलीय.'' ले बदलल्याचं तेंव्हाच मला कळलं.

`निसर्गाचं वर्णन करतांना कुठल्या ऋतुत कुठली झाडं फुलतात, कुठल्या झाडांना फळ येतात, झाडांची  पान, फुल, फळ, रंग, अवतीभवतीचा परिसर याचं भान ठेव हं. तेथील पर्वत, नद्या, टेकड्या, त्यांची नावं सर्वांचं एक टाचण करू ठेव. कुठली झाडं कुठे असतात आणि कुठे नसतात, तिथले पक्षी, प्राणी बघितल्याशिवाय लिहू नकोस. कधीतरी मी लिहीलं होत, बाहेर बुचाच्या फुलांचा मंद सुगंध दरवळत होता तर पत्रच आलं एकाचं, `अलकाताई, आपण उन्हाळ्याचं वर्णन करताए. उन्हाळ्यात बुचाला फुल नाही येत. थंडीत फुलतं ते झाड' त्यापेक्षा मोगरा लिहा.''

``दोन व्यक्तिंमधील संभाषण लिहीणं महा कठीण. त्यांच्या गावाप्रमाणे त्यांच्या भाषेचा लहेजा सांभाळत आपल्याला हवं ते त्यांच्या तोंडून वदवण सोप्प नाही.  वाचकाला खर वाटलं पाहिजे. वाचक चोखंदळच असतो.'' अलका सांगत होती.

मला ज्ञानेश्वरांसमोर बसलेला श्रोतृवृंद दिसत होता. ज्ञानेश्वर प्रत्येकवेळेला निरूपणाआधी ``रसिक श्रोतेहो!'' म्हणूनच त्यांचा उल्लेख करत होते. ``माझ्या भाग्यानेच मला अशा विद्वान श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगायला मिळत आहे. आपल्यासारख्या विद्वानांसमोर मी अज्ञानी बालक काय बोलणार? आपणच माझ्याकडून वदवून घेत आहात नाहीतर माझ्यासारख्या अज्ञ बालकाचे धारिष्ट्य तरी कसे होणार?'' ''ज्ञानाचा अहंकार असा अपसूक उतरल्याशिवाय शब्दांना अर्थ प्राप्त होत नाही. शिव आणि शिवा म्हणजेच गिरिजा-गिरिजेश्वरासारखे, अर्धनारीश्वरासारखे शब्द आणि अर्थ एकरूप असतात.'' कालिदास हळुच म्हणाला.

संत वाङ्मय वाचल्याशिवाय लेखणीला परीसस्पर्श होत नाही. बा.. बोरकर सांगत होते. Nucleus नसेल तर पेशी जिवंत राहू शकत नाही तसा संत वाङ्मय आत्मा प्राप्त करून देतो लेखनाला. चांगले शब्द सुंदर विचार, लेखनशैली, भाषेचा ओघ तेथेच सापडतो.

गझलसम्राट सुरेश भट सांगत होते, `` एकच कल्पना किती विविध प्रकारे मांडता येऊ शकते त्याचा अभ्यास कर सतत मनात. एका र्थाचे विविध शब्द लेखनात आले पाहिजेत. परत तोच तोच शब्द आला तर बेचव आणि  नकोसा होतो चवीला.

एकदा तर मी लिहीत असतांना माझा एक कान पकडून माझ्या पाठीशी चक्क आचार्य अत्रे उभे होते एक हात कमरेवर ठेऊन त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधे. आणि दुसरा कान आईऽऽऽआईग! म्हणून ओरडेपर्यंत धरून पुल उभे होते. `` काय लिहायचं ह्यापेक्षा काय लिहू नये हे जास्त चांगलं कळायला पाहिजे. लिहू नकोस असलं काही तरी तू. कर डिलीट. हित म्हणजे जे हितासहित आहे, ज्या लिखाणात समाजाचं हित करण्याची ताकद असेल तेच साहित्य.'' अत्र्यांनी सपशेल काट मारली होती. ``विनोद कायम स्वतःवर करायचा. दुसर्‍यांवर केलेला विनोद लोकांना रुचत नाही. तो विनोद रहातच नाही. त्या होतात गलिच्छ कुचाळक्या.'' पुलंनी पकडलेला कान सोडवून मी विनोदावर काट मारली.

जगद्गुरू शंकराचार्य समोर बसून मोठ्या प्रेमाने सांगत होते. कोणालाच उपदेश आवडत नाही. नेहमी चुकणारा, आगतिक असा सामान्य माणूस कायम स्वतःवर आरोपित करून लिहायचं. आजही जेंव्हा शंकराचार्य लिहीतात, ``हे माते भवानी, आता मी पंच्याऐंशी वर्षांचा झालो आहे मला तुझी भक्ती कशी करावी हेही अजून उमगलं नाही. इतके दिवस मी फक्त वागू नये असे सर्व वाईटच वागत राहिलो.  तू माझी माय आहेस मुलगा चूक करू शकतो आई मात्र त्याला पोटाशीच घेते गं!'' (कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता भवति।)

  तेंव्हाच  80 वर्षाचा वाचक मनात म्हणतो, ``चला पंच्याऐंशी वर्षांचे झाल्यावर मग शंकराचार्यांना काय करायला पाहिजे हे उमगलं. ते तर माझ्यापेक्षा जास्त वाईट वागले असावेत. मला सुधारायला अजून बराच स्कोप आहे. मी तर अजून पाच वर्ष लहानच आहे. मला हा मार्ग अनुसरून पहायला काहीच हरकत नाही.'' प्रत्यक्षात अत्यंत कर्तव्यकठोर नियमबद्ध आयुष्य जगणार्‍या त्या महात्म्याला पूर्ण ज्ञान होउन त्याने बत्तीसाव्या वर्षीच समाधी  घेतलेली असते.

अत्यंत धारदार नजरेने रामदास सांगत असतात, थांब! थांब! थांबव तुझी लेखणी. हे भलत भलत मोठ्या शहाण्याच्या आविर्भावात नको लिहू.  वाचकांना असं करा तसं करा सांगू नकोस. मन कधी सज्जन असतं का? पण मना सज्जना म्हणत, चुचकारत, फुलवत, आशा पल्लवित करून साखरेत घोळवत कडक विचार गळी उतरवता येत असतील तरच लिही. नाहीतर नको.''

``थांब जरा घाई नको करूस छापायची.'' पुष्पा दीक्षित मध्यप्रदेशच्या कॉलेजमधील संस्कृत विषयाच्या मुख्य. `प्रथम तुझ्या सर्व स्तोत्रांची भाषांतर वृत्तात बसव.' - हे त्यांनी मनात उच्चारलेलं स्वगत मला स्टेजवरच्या स्वगतासारखं स्पष्ट ऐकू आलं. आणि काही दिवसांनी उमगलं ही.

``भाषांतर मूळ काव्याच्या वृत्तातच पाहिजे.'' बा. . बोरकर मला बजावत होते. आपले कुसुमाग्रज आणि शांताबाई थोडे प्रेमळ. म्हणाले, ``कुठल्याही वृत्तात केलं तरी बिघडत नाही पण ती कलाकृती स्वतंत्रपणे उभी रहायला पहिजे.'' तेथेच पागुळायला झालं मला. त्यापेक्षा बोरकर बरे.  ज्ञानदेव तर गोडपणे सांगत होते, ``  भावार्थाच्या पालखीत ठेवलेल्या पादुकांसारखा असावा भावनुवाद. कुठला आधी निर्माण झाला आणि कुठला नंतर कळता कामा नये. ''

ललितबंध कसा असावा ह्याच्या आकलनासाठी एलकुंचवारांच्या `सप्तका'ची तर पारायण करावी. कुठलाही छोटा, मोठा प्रसंग फुलवत अशा एका उंची पर्यंत नेऊन ठेवायचा की वाचकांच्या विचारांची मजल पार करून वर उठला पाहिजे. वाचकाला अवाक, दिग्मूढ करता आलं पाहिजे. जेंव्हा विचारांपेक्षा, त्या प्रसंगापेक्षा  लेखक मोठा होतो तेंव्हा पडत ते लेखन. ``जमत नसेल तर लिहू नकोस. ललित लेखन करण्यासाठी विचारांची प्रगल्भता पाहिजे. पन्नाशी नंतरच ललित लेखन करावं.'' वय माझ्या बाजूचं असलं तरी बाकी कुठलेच गुण माझ्या पक्षात नव्हते.

विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसायला सिद्ध झालेल्या राजा भोजाला दरवेळी सिंहासनाला जोडलेल्या बत्तीस सुवर्ण पुतळ्यांपैकी एक एक पुतळी सजीव होऊन विक्रमादित्याचे एक एक गुणवर्णन करणारी गोष्ट सांगत असे. शेवटी ``विक्रमादित्याचा हा गुण तुझ्या अंगात असेल तर हे भोजराजा तू ह्या सिंहानावर बैस अन्यथा नाही'' असे ऐकल्यावर दरवेळी भोजराजा माघारी फिरे.

त्याप्रमाणे सिद्धहस्त लेखकाच्या सिंहासनावर बसण्यासाठी काय काय गुण पाहिजेत हे दरवेळेस एक एक लेखक मला सांगत असे आणि ते ऐकून मी सपशेल माघार घेत असे.

 पण परत परत कधी तरी लिखाणाची उर्मी मला स्वस्थ बसू देत नाही हे  पाहिल्यावर हसत हसत पुलंनी शेवटचा गुगलीच टाकला. ``लेखकाचे सगळे गुण असले तरी, डिंक लावून तासनं तास  खुर्चीवर चिकटून बसल्यासारखं बसायची आहे तयारी? तर लिही.'' त्यांचे बनीसारखे पुढचे दोन दात मला हसत होते. मोठे केलेले डोळे मला बरच काही सांगत होते. आता मात्र मी माझे हात माझ्या कानांवर दाबून धरत मी उठले आणि ओरडले, ``अशक्य! त्रिवार अशक्य! दिवसातून पंधरावीस मिनिट फारतर अर्धातास असतो माझा. तोही रात्री दहा नंतर. माझा संसार सांभाळायला विठू नाही येणार.''

`` तेथेही अनन्य भक्तिचा उपदेश करणार्‍या तुकोबांनी मला नापास केलय. म्हणतात, `` बायांनो माझा मार्ग अनुसरू नका. मी आपल्याच हाताने आपल्याच संसाराला चूड लावून शांतपणे मागेही वळून बघता प्रियकराच्या(भगवंताच्या) शेजेवर आनंदाने पहुडले आहे. त्याच्याशी जीवेभावे रत आहे. तशी तयारी असेल तर या मार्गात या बायांनो. नाही तर दादलाही नाही आणि देवही नाही अशी त्रिशंकू अवस्था होईल तुझी.

``नको मला ते विक्रमादित्याचं सिंहासन. आणि परवडणार नाही मला तुकोबांचाही मार्गही.'' मी हताश. पण मन कुठलं ऐकायला. ``पुस्तकं नको तर नको'' मन म्हणालं, ``पण विचारांच्या इवल्या इवल्या द्रोणात सवडीनुसार रसिक मायबापांना छोट्या छोट्या (डॉलर) शब्दजिलब्या द्यायला काय हरकत आहे. रसिक मायबाप गोड मानून घेतील ते.

---------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -