12 ऑगस्ट! हत्तीदिन.

 

12 ऑगस्ट! हत्तीदिन.

2018 ला Z TV वर आनंद शिंदे ह्या गजप्रेमी गजमित्राची हत्ती दिनानिमित्त मुलाखत लागली होती. हत्ती हा अत्यंत संवेदनाशील प्राणी. त्याला उगीचच कोणी जोरात बोललेलं, रागावलेलं आवडत नाही. त्याचं हृदय अगदी लोण्यासारखं मऊ असतं. कारणाविना उगीच कोणाला त्रास देणं त्याला आवडत नाही. पूर्वी हत्तींना दारू पाजून युद्धामध्ये शत्रूसैन्याचा मोठ्याप्रमाणावर नाश करण्यासाठी वापरत असत. पण तरीही त्याचा मूळचा सौम्य, मृदू स्वभाव बदलत नाही. आनंद शिंदे ह्यांनी सांगितल्या प्रमाणे सलीमने  जेंव्हा महाराणा प्रतापवर हल्ला केला तेंव्हा अशा माजलेल्या हत्तींचा वापर केला होता. महाराणा प्रतापने त्यावेळेस त्याच्या घोड्याला पुढे सोंड आहे असं वाटावं अशा प्रकारची झापड बांधली होती. दारू पाजून मस्त केलेले हत्तीही त्या घोड्याला पाहून चक्रावून गेले. तो छोटा हत्तीच असावा असं समजून त्यांनी बाजूला सरकून त्याला जाण्यासाठी वाट करून दिली.

आनंद शिंदे ह्यांच्या मुलाखतीतील एक गोष्ट मला खूप भावली. हत्तींचा कळप एखाद्या तळ्यात अंघोळ करायला येतो तेंव्हा, त्यांच्या 3000 ते 3500 Kg. वजनाने आजूबाजूच्या चिखलात त्यांच्या पायाचे ठसे उमटतात. ते तळ्यात अंघोळ करतांना तळ्यातले पाणी बाहेर उडून हे ठसे पाण्याने भरून जातात. हत्ती अंघोळ करून गेल्यावर ह्या ठशांच्या पिटुकल्या तलावांमधे पाणी पिण्यासाठी, फुलपाखरे, मधमाशा, आणि इतर किटकवर्गाची गर्दी होते. त्यांना खायला बेडूक येतात. बेडकांना खायला साप येतात आणि सापांना खायला गरूड येतात. अशा प्रकारे  हत्ती असलेल्या जागी एवढ्या प्राण्यांची सोय होते.

सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथे कायम हत्ती येऊन तेथील शेते फस्त करतात. त्या हत्तींना घालवायला तेथील लोक मोठे मोठे ढोल वाजवणे, फटाके उडवणे शेताभोवतीच्या कुंपणामधे वीजेचा प्रवाह सोडणे असे काही उपाय करत असतात. एकदा आनंद शिंदे तेथे गेले असता रात्री अचानक  ढोल वाजायला लागला. हत्ती आले की काय म्हणून ते बाहेर आले. तेंव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगितले की, ``तेथील लोक जे ढोल हत्तींना पळवून लावण्यासाठी वापरत असत त्यातील एक ढोल एक हत्ती पळवून समोरच्या डोंगरावर घेऊन गेला आहे. आता रोज येण्यापूर्वी तो ढोल वाजवतो. हा ढोल म्हणजे त्याच्या येण्याचा संकेत आहे. आता थोड्यावेळात तो येईल आणि त्याला पाहिजे ते शेत फस्त करून जाईल.’’ हत्ती हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे. तो खात असलेले गवत, फळं, धान्य ह्यांच्या बीया त्याच्या शेणातून सुदूर पोचल्यामुळे गवताचं क्षेत्रही वाढत जात.

केरळमधे हत्तींना खाद्य पुरवणारे कर्मचारी संपावर गेल्याने हत्तींना जेवण देण्यास उशीर व्हायला लागला. त्यावेळेस त्यांनी आनंदला बोलावून घेतले. तेंव्हा त्याला प्रत्येक रागावलेल्या हत्तीला चुचकारून चुचकारून खायला घालायला लागले. हत्ती अत्यंत मानी प्राणी आहे. तो असे तसे खात नाही. त्याला `चाटु शतैव भुङ्ते'  म्हणजे शंभरदा मिनतवा र्‍या केल्यावर तो खातो.

हत्ती आनंदात असतांना, किंवा त्याच्या आवडता माणूस यायची वेळ झाली की त्याचे कान मागे पुढे हालत राहतात. पण हत्तीचे कान दोन्ही बाजूला ताठ पसरले गेले की ती समोरच्याला सूचना असते की, `तू जे करतोएस ते मला अजिबात पटलेले नाही. तू ते बंद कर नाही तर मी तुझ्यावर हल्ला करीन.'

त्याचबरोबर मागे आलेली एक गोष्ट मला आठवली. आसाममधे काही ठिकाणी रेल्वेमार्ग बराचसा जंगलातून जातो. त्या रेल्वेमार्गावर हत्तींचा येण्याजाण्याचा रस्ता आहे. दरवेळेला हत्तींना रेल्वेमार्ग ओलांडून पलिकडे जावे लागते. हा रेल्वे मार्ग ओलांडत असतांना जर ट्रेन आली तर ट्रेनची धडक बसून हत्ती मरत असत. हती अथवा कुठलेही जंगली प्राणी त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या मार्गावरूनच जातात. ते त्यांचा मार्ग बदलत नाहीत. रेल्वेचाही रस्ता बदलणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत हत्तींचे मृत्यू कसे थांबवता येतील ह्यावर बराच विचार केला गेला. गावकर्‍यांच्या मते एवढा मोठा हत्ती पण मधमाशांना फार घाबरतो; म्हणून मधमाशांचे मोहळ उठ्यावर मधमाशांचा जो गूँऽऽ गूँ गूँऽऽ गूँ आवज होतो तो रेकॉर्ड केला गेला. ट्रेन जेव्हा जाणार असेल तेंव्हा तेथे हा रेकॉर्डेड आवाज लावतात. त्या आवाजाने घाबरून हत्ती तेथे जवळपास फिरकत नाहीत. ट्रेन गेली की आवाज बंद केला जातो. ज्यामुळे हत्ती सुरक्षित रेल्वेमार्ग ओलांडू शकतात.

हत्तींच्या अशा अनेक गमती जमती आहेत. सध्या एवढ्याच; आणि हत्ती दिनाच्या शुभेच्छाही! 

------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –

ललित लेख (अनुक्रमणिका)