हिशोब

 

 

हिशोब-

एकनाथ हे जनार्दनस्वामींचे शिष्य! जनार्दन स्वामी हे जसे नाथांचे अध्यात्मिक गुरू होते तसे देवगिरीच्या म्हणजे सध्या औरंगाबाद जवळ असलेल्या दौलताबादच्या किल्ल्याचे किल्लेदारही होते. एकनाथ त्या किल्ल्याचे आर्थिक हिशोब बघत असत. एक दिवस वारंवार हिशोब तपासूनही कुठेतरी एका पै चा हिशोब कमी पडत होता. एकनाथ वारंवार सर्व तपासून बघत होते. पण काही केल्या चूक सापडत नव्हती.  बघता बघता संध्याकाळ झाली. आजूबाजूचे लोक एकनाथांच्या परवानगीने गेलेही. पण एकनाथ ते सर्व हिशोब तपासण्यात इतके तल्लीन झाले की त्यांना वेळेचे भानही राहिले नाही. आणि सापडली ---- नाथांना चूक सापडली. आनंदानी त्यांनी टाळी वाजवली. त्याचवेळी किल्लेदार जनार्दनस्वामी किल्ल्याची गस्त घालत तिथून जात होते. इतक्या पहाटे खोलीत दिवा आणि किंचित किलकिलं दार पाहून ते त्या दिशेने येत असतांनाच त्यांना टाळीचा आवाज ऐकू आला. ते बघतात तर काय!  एकनाथ अजूनही चोपडीत हिशोब लिहीत होते. `` एका! अरे अजून तू इथेच! पहाट झाली.’’ एकनाथ आनंदून म्हणाले, ``एका पै चा हिशोब लागत नव्हता. लागला!’’ एकनाथांची कामातील अत्युच्च विश्वासार्हता, निष्ठा, एकाग्रता पाहून जनार्दनस्वामीही स्तंभित झाले.  नाथांना स्वतःचीही एक पै घालून हिशोब पूर्ण दाखवता आाला असता. पण त्यांची कामाप्रति असलेली अढळ निष्ठा, हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा त्याचा चिवटपणा पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले. म्हणाले, `` एकनाथा जेवढी तळमळ, जेवढी एकाग्रता तू एका पै साठी दाखवलीस  तेवढी तळमळ, तेवढी एकाग्रता जर ईश्वर प्राप्तीसाठी दाखवलीस तर ईश्वरही प्रसन्न होईल. जन्म सफळ होईल तुझा.’’

असा उत्तम शिष्य आणि उत्तम गुरू मिळाल्यावर अशक्य ते काय? जनार्दन स्वामींनी एकनाथांना आत्मज्ञानाचा, ईश्वरप्राप्तीचा मार्ग आणि मार्गदर्शन दोन्हीही दिले.

घृष्णेश्वर ते औरंगाबाद ह्या रस्त्यावर शूलीभंजन नावाची छोटी टेकडी आहे. तेथेच जनार्दनस्वामींनी तपश्चर्या केली. तेथे त्यांना श्रीदत्तांचे दर्शन घडले. त्याच जागी एकनाथांनीही तपश्चर्या केली आणि आत्मज्ञान मिळवले.

आजही ते स्थान अत्यंत पवित्र, शांत आहे. तेथील मोठ्या शिळेवर काठी वा दगडाने आघात केल्यास वा काही विशिष्ठ पद्धतीने हात आपटून, त्यातून संगिताचे विविध सूर उमटतात. बहुधा असे दगड तेथे जवळपास मुबलक असावेत. वेरूळच्या लेण्यांमधेही तेथील काही खांबातून गाईड सप्तसूर वाजवून दाखवतात.

( कवितेतील काही संदर्भासाठी ही गोष्ट देत आहे.)

हिशोब

शाळेत असताना हिशोब करायचे मी
परीक्षेला किती दिवस राहिले त्याचा!
मग येणार्‍या सुट्टीच्या दिवसांचाही ----
गावाला मामाकडे जायला किती दिवस राहिले त्याचाही!

आई मात्र हातात किती आणि खाणारी तोंड किती याचा---
येणार्‍या दिवाळीसाठी आधीपासून
किती शिल्लक टाकायची त्याचा,
दोन टोक सांधायचा
तीन मुलं, नवीन कपडे,
लुगड्याला लागलेला धस शिवायचा

काही दिवसांनी माझेही हिशोब सुरू झाले
काही मनात, काही डायरीत काही
भिंतीवरच्या कालनिर्णयवर
काही संक्षिप्त, काही सांकेतिक
किती लिटरपासून घराच्या हप्त्यांपर्यंतचे
मुलाच्या शिक्षणासाठी किती काढून ठेवायचे
लग्नासाठी किती वापरायचे आणि बरेच काही--

मग ग्रॅच्युइटी, पेन्शन,
औषधांचे किती, सोसायटीचे किती
भागवायचं कितीत फिरायचं कितीत
फिक्सनी कितीआणि परिस्थितीप्रमाणे
बदलणारे सर्व खर्च भागवायचे कितीत----

पण आत्ताशा लागतच नाहीए हिशोब
 हाती किती उरले त्याचा---
हातच्चा एक धरायचा का सोडायचा ?
पटींचा गुणाकार भागाकार काही चुकतोय
जिथे पटींची वाढ अपेक्षित होती,
तिथे मोठ शून्य पदरात!
जिथे बाकी अपेक्षित नव्हती तिथे सर्वच बाकी आहे.

पण एवढं मात्र नक्की की,
हिशोब लागला की `नाथांची' टाळी ऐकू येईल
किलकिल्या दरवाजातूनअजून का जळतोय दिवा
म्हणून जनार्दनस्वामी डोकावतील

``
एका कौडीच्या हिशोबासाठी रात्र जागवलीस !!!
मालव आता दिवा’’ म्हणत
पाठीवर हात ठेऊन सावकाश
आपल्या हाताने चोपडी मिटवतील…!
प्रत्येक क्षणाचा हिशोब पूर्ण केल्याच्या आनंदात
मी कृतार्थ !!!
-------------------------------
लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -