अंघोळ -

अंघोळ -

विमानाचा पहिलाच लांबचा प्रवास होता. कितीही वाजत होते. कधी भारतातले कधी अमेरिकेचे. कोणाच्यातरी वेळेनुसार आम्ही नाश्ता करत होतो, जेवत होतो आणि विमानवाल्यांनी विमानाच्या काचांच्या पापण्या मिटायला लावल्या की झोपतही होतो. विमानसुंदर आणि सुंदरीनी दिवे लावून सकाळ केली आणि गरमागम ओले नॅपकीन त्यांच्या बॉक्समधून चिमट्यानी काढून वाटायला सुरवात केली. त्या ड्रायक्लीनने एकदम फ्रेश वाटलं. मघाशी साबण लावून शक्य तेवढ तोंड धुवून आवराआवरी करून आले असले तरी अंघोळीची तहान नॅपकीनवर भागवून ``गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती’’ म्हणून घेतलं. अमेरिकन शेजारणीने कसलीशी बाटली काढून त्याचे दोन थेंब डोळ्यात, दुसर्‍या बाटलीचे दोन थेंब नाकात, दोन थेंब तळहातावर, एक स्प्रे तोंडात उडवून विविध बाटल्यांतील थेबांनी बसल्याजागी   `बिंदुमात्रेण’ सफाई आटोपली.

तुम्ही लोक रोज अंघोळी करता का? ह्या तिच्या प्रश्नाला माझ्या मनात काय तुम्ही रोज अंघोळी करत नाही का? असा प्रश्नच उमटत होता. आणि वर कसले रे घाणेरडे!. आमच्याकडच्या आया तुम्हाला लाभल्या असत्या तर त्यांनी अंघोळीशिवाय तुम्हाला जेवायला नसतं दिल. वर सांगितलं असतं की, ``पहाटे पाचच्या आत अंघोळ केली तर ती देवाची, सूर्योदयापर्यंत माणसाची आणि नंतर राक्षसाची’’ पण हे सगळं कधी ना कधी अंघोळ करणार्‍यांसाठी आहे. अंघोळ न करणार्‍यांसाठी धुणं वाळत घालायची काठी किंवा लाटणंच बसलं असतं पाठीत. अंघोळ नाही केली की घोळ ठरलेलाच!

अरे बाबांनो,

मातीत अंघोळ करणार्‍या चिमण्या, जरा उथळ पाणी दिसताच त्यात पंख फडफडवून अंघोळ करणारे पक्षी, पाणी दिसताच त्यात बसकण मारणारा वाघ, नदी, तलाव दिसताच त्यात शिरून बागडणारा, सोंडेनी पाण्याचे फवारे उडवणारा हत्तींचा कळप, नदीच्या पात्रात डुंबणार्‍या म्हशी, तेल, मालीश अंघोळ घालून सुखावलेला तान्हुला----- ह्या सर्वांना पाहिलं की अंघोळ हा सर्व प्राण्यांचा जन्मसिद्ध सुखाधिकार आहे ह्या विधानावर वेगळी मोहोर उठावायची जरूर नाही हे तुम्हालाही सर्वांनाच पटेल. तुकारामांनी जरी तीर्थक्षेत्र म्हणजे धोंडापाणी म्हटलं असलं तरी ह्या पाण्यात देहाला बुचकळून काढल्याशिवाय आमच्या मनांना स्वच्छ वाटत नाही. आम्ही ले ला असतांना अनेक म्हातारे कोतारे सिंधुस्नानाची मनीषा उरी बाळगून यायचे. त्यांना तिथल्या बर्फाळ पाण्यात डुबकी मारू नका म्हणून हात जोडावे लागत. तरीही अनेक संत महंत अशा बर्फाळ पाण्यात आनंदानी शिरतांना दिसतात. एकदातर गंगेचे भव्य विशाल पात्र पाहिल्यावर देहभान विसरून एक माणूस मैयाऽऽऽ म्हणत धावत पात्रात शिरतांना इतरांनीच त्याला सावरलेलं मी पाहिलं आहे.

आपल्याकडे लक्ष्मीचं केलेलं वर्णन मोठं हृद्य आहे. 

चारी दिशात सजले गज स्वागतासी

 गंगा सलीलयुत हेमघटा धरोनी

वर्षाव ते तुजवरी करिती जलाचा

 आहे अती विमल जे सुखवी तनूला॥17.1

तू चिंब गे सुखद त्या जल-वृष्टीने ची

 पुत्रीच त्या जलधिची सुखसागराची

आहेत थोर उपकार तुझेच आई

विश्वावरी सकल या गणती न त्यासी।।17.2

तू विश्वनाथ-रमणी जननी जगाची 

माते करी नमन मी तव पादपद्मी ।।17.3

(कनकधारास्तोत्र)

चारही दिशातून ढगरूपी गज सोंडेनी पुन्हा पुन्हा पाणी उडवून आमच्या सोन्या-मोत्या-रत्नांनी मढलेल्या, जरीची साडी नेसलेल्या लक्ष्मीदेवींना पाण्यानी चिंब चिंब करूनही त्यांना काय मेली ही कटकट, सगळी साडी ओली झाली असं च्चुकनही वाटत नाही. गजान्तलक्ष्मी जवळ बाळगणारी कमलाराणी अजूनच दिमाखदार वाटते.  आमची अंघोळ माणसाच्याच का देवांच्याही गात्रा गात्रांना पुलकित करते.  आळस, कंटाळा धुवून टाकून मन चैतन्याने प्रफुल्लित होत नुसतं.

 दीपावली म्हणजे तर पहाटेच्या गुलाबी थंडीत सुवासिक तेल, उटणं, गरमागरम पाणी---- घरोघरी अभ्यंगस्नानाचा आनंदोत्सव असतो नुसता. अशा वेळेला नामदेवाला  एकट्याला चैन कशी पडावी? तो देवळात जाउन देवाला  घरी घेऊन आला. पुढची लडिवाळ अंघोळ तुम्हालाही आवडेल.

सण दिवाळीचा आला ।

नामा राऊळासी गेला ।। 1 ।।

हाती धरून देवासी ।

चला आमुच्या घरासी ।। 2 ।।

देव तेथुनी चालिले ।

नामयाच्या घरा आले ।। 3 ।।

गोणाईने उटणे केले ।

दामाशेटीने स्नान केले ।। 4 ।।

पदर काढिला माथ्याचा ।

बाळ पुशिला नंदाचा ।। 5 ।।

हाती घेउन आरती ।

चक्रपाणी ओवाळती ।। 6 ।।

जेऊनिया तृप्त झाले ।

दासी जनीनें विडे दिले ।। 7 ।।


आपल्या देवाची पूजा सर्वप्रथम स्नानानेच सुरू होतात. मनानेच रामाला न्हाऊ घालतांना केलेला थाट काय विचारावा! त्यापुढे त्या पंचतारांकित हाटेलातील राजाराणीचे स्वीट सुद्धा फिके पडतील.

कल्पवृक्षाखाली, मंदारवृक्षाच्या छायेत वरतुन प्राजक्ताची मोहक फुलं ओघळत आहे अशा रम्य ठिकाणी सोन्याच्या चौरंगावर रामाला बसवून , रत्नजडित सोन्याच्या घंगाळ्यात गंगाजल घेऊन,  देवाला अंघोळ घालतांना त्याला दूध, दही साखर, मध, तूप चोळून, मंत्रघोषात घातलेली पंचामृतयुत अंघोळ काय वर्णावी! इतरवेळी पाऊल पुढे टाकून धनुष्याची प्रत्यंचा ताणून धरलेला कोदंडधारी राम भक्तासाठी गोड गोजिरा होऊन पाटावर बसून अंघोळही घालून घेतो त्याच्याकडून.

 

कल्पूनी हृदि दूध साखर दही तूपा मधाने युता

हे पंचामृत मीच हो बनविले प्रेमे स्वहस्ते बघा

श्रीरामा मधुपर्क पाठ म्हणुनी हे अर्पितो आपणा

घेई कांचन रत्नमंडित घटी स्नानास गंगाजला ।। 3.1

 

ह्याची कल्पतरू तळी सुखदशा मंदार छायेतच

जेथे वर्षति पारिजातक फुले अल्लाद आल्हादक

सोन्याचा बघ मांडला सुबकसा चौरंग स्नानास्तव

तेथे सूक्त म्हणोन मी विविधशी स्नाने तुला पूजिन ।। 3.2

देव कोणताही असो पहाट झाली की त्याला `स्नान इज मस्ट!’ शंकराच्या डोक्यावर सतत गंगाजलाची धार अभिषेकपात्रातून पडत असली तरी शिवमानसपूजा म्हटली की,

माझ्या मानसि कल्पना करुनि मी दिव्यासना निर्मिले

रत्नांनी करुनी सुशोभित तया भावे तुला अर्पिले

स्नानासी तुज आणिले सलिल मी मंदाकिनीचे भले

आहे शीतल, शुद्धची, विमल हे प्रेमे तुला अर्पिले।।1.1

राजाला राज्यावर बसायचं असेल तर राज्याभिषेकाशिवाय नाही.  भारतभरच्या नद्यांमधून आणलेले जलकुंभ त्याच्या डोक्यावर ओततांना त्याचा मंत्री त्याला सावध करतो, हे राजा हे विविध तीर्थांचे जल तुझ्या मस्तकावर घालत असतांना त्यांच्यासोबत तुझ्या माथ्यावर दाही दिशांमधून आलेली संकटांचा, आपत्तीचाही वर्षाव होत आहे. त्यांना तोंड देण्यासाठी तू सिद्ध रहा. किंबहुना ह्या पवित्र जलाचा तुझ्या मस्तकावर अभिषेक होण्यापूर्वीच सर्व संकटांचा आढावा घेऊन त्यांना तोंड देण्यासाठी सर्व मंत्रणा करून तू सुसज्ज ऐस.

राज्याभिषेकासमयीच माथी जलासवे वर्षति संकटेही

नाना उपायांसह सज्ज राही हे भूपते संकट-मोचनासी ।। 250

संकटांना कुठलच स्थान अगम्य नसतं. ती कुठेही कशीही चंचुप्रवश करू शकतात. कुठला माणूस वा विषय त्यांना वर्ज नसतो.

मस्तकावर  घागरी भरभरून थंडगार पाण्याच्या अभिषेकानंतर तल्लख झालेल्या मेंदूत नवनवीन सद्विचार, कल्पना, संकटांचा सामना करायच्या युक्त्या-प्रयुक्त्या नक्कीच स्फुरतात.

--------------------------------

#लेखणीअरुंधतीची –

वर वर्णिलेल्या श्रीराममानसपूजा, शिवमानसपूजा आणि लक्ष्मीचे वर्णन असलेले कनकधारा स्तोत्र ब्लॅागवर उपलब्ध आहेत.


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -