चहा + माणूस + प्राणी -

 

माझे प्राणी जगत

 चहा + माणूस + प्राणी -

                      पुस्तकातील सेट थेअरी मला कधी फार कळली नाही आणि मार्कही देऊन गेली नाही. पण व्यवहारात मात्र अरुंधतीचे जग इंटरसेक्शन प्राण्यांचे जग (  – Intersection ) किंवा अरुंधतीचे जग इंटरसेक्शन झाडांचे जग याने अजून एक छोटा सेट तयार होण्याऐवजी माझा `अरुंधतीयुनिव्हर्स' (  – Union) हा सर्वव्यापक सेट तयार झाला आहे. म्हणजे असे की, मी ह्या प्राण्यांना निकराने नाकारायचे ठरवले तरी अशी काही मुसंडी मारून  ते कधी घरात तर कधी मनात कायमचे घुसले. झाडांपासून ते पक्षी, प्राणी अगदी किटकवर्गही माझ्या मनावर अधिकार गाजवून आहेत. त्यामुळे  माणसांच्या सेट थेअरीचे नियम धुडकावून त्यांनी त्यांची जागतिक सलोख्याची सेटथेअरी रचली आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर   हे प्राणी मला भेटत गेले आणि त्यांनी माझं अपूर्ण जग पूर्ण केलं.

                       चहा + माणूस + प्राणी अस एक अजब जग आहे. 40 वर्षांपूवीची गोष्ट असेल. आईबाबांचं घर भर बाजारात होतं. समोरच अमृततुल्यचं चहाचं दुकान होतं. पहाटे चार ते रात्री  अकरा दुकान चालू असे. रात्री अकराला दुकान बंद झालं की एक कुत्र रात्रभर त्या दुकानाच्या पायरीवर बसून त्याची राखण करी. पहाटे पहिला चहा उकळला की दुकान सांभाळल्याच्या मोबदल्यात पहिला बशीभर चहा मात्र त्याला लागे.  हे विश्वासाचं विश्व होत. तिथे लेखी करार वगैरेशिवाय एकमेकांना आपलं काम चांगलच कळत होत. दोघांकडून नियम काटेकोर पाळले जात होत. सकाळ झाली की मात्र हे कुत्र कुठेतरी निघून जाई.

                      सकाळी आठची वेळ एका वेगळ्याच गिर्‍हाईकाची होती. एक माहूत एका हत्तीला घेऊन तिथे यायचा. दुकानातला पोर्‍या तत्परतेने त्यांना दुकानाबाहेरच चहा नेऊन द्यायचा. उशीर मंजूर नव्हता. माहूत चहा बशीत ओतून फुंकून गार करेपर्यंत सोंडेने हत्ती त्याच्या खाद्यांला धरून 'लवकर दे ना रे' चा तगादा/ धोशा लावी आणि तो त्याला एखाद्या लहान मुलाला समजावून सांगितल्या सारखा ``ठहेरो बेटा ठहेरो! अभी बहोत गरम है!'' म्हणून  सांगत राही. बशीतला चहा गार झाला की तो ती बशी हत्तीसमोर ठेवे.  एवढ्या मोठ्ठ्या हत्तीसमोर ती इवलीशी बशी मोठी गमतीशीर दिसे. हत्ती ने नुसती सोंड लावल्या लावल्याच चहा फिनिश!! माहूत मात्र इवल्याशा कपातला उरलेला घोटभर  चहा फुंकून फुंकून पाच मिनिटे पीत राही. वर्षानुवर्ष हा परिपाठ चालू होता.

                       भावाचं लग्न झालं आणि वहिनी आणि चहानी एकदमच आमच्या घरात प्रवेश केला. नवीन लग्न झालेल्या सुनेनी एकटीनीच कसा चहा घ्यायचा म्हणून ती सर्वांना आग्रह करू लागली आणि माझी आई चहाची पहिली व्हिक्टिम झाली.  रोज संध्याकाळी चार आणि चहा ह्या चकारादि गोष्टी नित्यनेमाच्या झाल्या. चार वाजता चहा झाला तरी दोन कपबशा पाणी घालून संध्याकाळी सहा वाजता येणार्‍या नळाची वाट बघत ओट्यावर बसून असत. एकदा पाणी घालायच राहिल आणि लक्षात आलं की कपबशा कोणीतरी चकचकीत केल्या आहेत. हे नित्य नेमानी घडू लागलं आणि लक्षात आलं की, एक मधमाशी बरोब्बर  चारला येऊन चहाच्या कपात राहिलेला अर्धापाव चमचा चहा रोज चट्ट करत असे. बघता बघता मधमाशीला चहाची इतकी सवय लागली की, चार वाजता चहा अधणाला पडताच ती येऊन गुंऽगुंऽगुं आवज करत स्वयंपाकघरभर `मला पण चहा! मला पण चहा!' करत फिरत राही. चहा पिऊन संपेपर्यंत तिला दम धरवत नसे. कपात अर्धाचमचा चहा शिल्लक ठेवावाच लागे. एकदा मात्र जरा लवकर बाहेर जायच असल्यानी चहा लवकर झाला आणि मधमाशीचा चहा विसरला. कपबशा धुवून जागेवरही गेल्या होत्या. मधमाशीताईंना कुठलं पटायला! त्यांनी गुंऽगुंऽगुं करत घर डोक्यावर घेतलं. प्रत्येकाच्या चेहर्‍यासमोर आवाज करत गोल गोल फिरून तिची चहाची मागणी चालू होती. शेवटी तिच्यासाठी थोडासा चहा परत केला गेला. कपात गार करून ठेवला गेला. हा चहा चमच्या ऐवजी दोन चमचे झाला. आणि मधमाशीताईंसाठी तळच झलं. थोड्यावेळात चहात गोते खाणार्‍या मधमाशीला चमच्यानी हलकेच काढून आईनी बाहेर ठेवलं. पेपरवर थोड्यावेळ बसलेली ही मधमाशी पंख वाळताच परत उडून गेली ती चहाचा धसका घेऊनच! परत काही फिरकली नाही. ती आपणहून उडाल्याच्या आनंदात आई ती जिथे असेल तिथे सुखी राहो.” असा रोज चार वाजता तिला आशीर्वाद मात्र देत राहिली.

                     मैत्रीणीकडे असलेला मिठ्ठू  चहाचा वास आला की पिंजर्‍यातच नाचू लागे आणि चमच्या चमच्यानी चहापान करी. चहा पितांना हलणारी त्याची इवलीशी जीभ खूप गम्मतशीर दिसे.

                  त्यामुळे आम्ही गीतेतल्या `सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो' ह्या  ओळीचा अर्थ सोयीस्करपणे `सर्वांच्या हृदयात चहा आणि स्टो (तेंव्हा गॅस ही नवीन स्टाईल होती आणि घरोघरी रॉकेलचे स्टोव्ह होते. ) असतो असा करून टाकला.

--------------------------

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -