बसो मेरे नैनन में नंदलाल

 

बसो मेरे नैनन में नंदलाल

मोर मुकुट मकर आकृति कुंडल

अरुण सिहात सोहे भल

 अधर सुधारक मुरली राजत

और बैजंती माला

बसो मेरे नैनन में नंदलाल

 

रुदर घंटिका घटीं शोभित

नुपूर सबत रसाई

मीरा प्रभु संतन सुख दाई

भड वच गोपाल गोपाल गोपाल

एक सुंदर अभंग, बसो मेरे नैनन में नंदलाल. आणि सुंदर मागणं की, माझ्या नेत्री नंदयशोदेचा लाडका कान्हाच सतत राहू दे. माझे नेत्र हेच त्याचं कायमचं वसतिस्थान असावं.  श्री आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या कृष्णाष्टकात हेच मागणं मागितलं आहे `मम भवतु कृष्णोऽक्षि विषयः' -- माझ्या डोळ्यांना कृष्णाशिवाय दुसरा कुठला कुठला विषयच असू नये. -- ``दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा!''

मीराबाई समोर जणु काही कृपासरोवर, कमलमनोहर, मेघःश्याम श्रीहरी उभा आहे असं त्याचं वर्णन ती करत आहे. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट घातला आहे. कानात मकराकृती कुंडलं आहेत. श्रीहरीच्या हृदयातच लोकांना मोहवून टाकणार्‍या कामदेवाचा/मदनाचा वास आहे. ह्या कामदेवाची पताका किंवा ध्वजा ही  मकराकृतीने युक्त असल्याने कामदेवाला, मदनाला मकरध्वज असंही म्हणतात. ह्या कृष्णचंद्राच्या कानावरच जणु काही मदनाने आपली ध्वजा फडकवली आहे. त्यामुळे ह्या कृष्णचंद्राचं अधरं मधुरं वदनं मधुरं ----- असं सारंच कसं विलोभनीय आहे.

अरुण सिहात सोहे भल - सिहात म्हणजे समान. भल म्हणजे भाळ, कपाळ. सोहे म्हणजे शोभून दिसणे.  ह्या नंदलालाची कपाळपट्टी इतकी आकर्षक आणि तेजस्वी आहे की, विशाल आकाशात जणु काही अरुणोदय होत आहे असं वाटावं. किंवा भाळावर अरुणवर्ण तिलक सोहे म्हणजे शोभून दिसत आहे. आकाश-सम्राट, व्योमनाथ सूर्याच्या क्षितिजावर येण्याची दवंडी पहिल्यांदा अरुणाने द्यावी तसा हा भालावरील अरुणवर्ण तिलक कृष्णचंद्र येत असल्याची वर्दि जणु काही सर्वत्र देत आहे.

अधर सुधारक मुरली राजत  - सुधारक हा शब्द मराठीत वापरून वापरून गुळगुळीत झालाय. ह्या मेघःश्यामलाने अत्यंत सौष्ठवपूर्ण शैलीने मुरली त्याच्या अधरांवर / ओठांवर धरली आहे. ( सु- धारक ) त्याची त्रिभंगाकृती काया तीन ठिकाणी इतकी कमनीयतेने लवली आहे की बघणार्‍याच्या नेत्रांचं पारणं फिटावं. कदंबतरुला कंबर टेकून एका पायावर दुसरा पाय किंचित तिरका ठेऊन  मान किंचित कलती करून ओठावर टेकलेली आडवी बासरी ही सु धारक म्हणजे अशा काही अबलखपणे धरली आहे की त्याच्या मधुर ओठातून निघालेली फुंकर त्या बासरीतून फिरताच त्यातून  येणारे नादमधुर स्वर ऐकत सारं गोकुळ त्या स्वरांमधे चिंब भिजून, विरघळून जावं.

और बैजंती माला - गळ्यातील वैजयंतीमाला ह्या कृष्णचंद्राचं रूप खुलवते का ह्या कृष्णचंद्रामुळे वैजयंती शोभिवंत दिसते हेच सांगता येत नाही. चंद्रामुळे चांदणी रात्र का चांदण्या रात्रीमुळे चंद्र, कमळांमुळे सरोवर का सरोवरामुळे कमळं खुलतात ह्याचं उत्तर एकमेकांमुळे ते दोघेही शोभिवंत होतात असचं असेल.

रुदर घंटिका घटीं शोभित - (रुदर-उदर) कमरेला असलेल्या सोन्याच्या मेखलेला लावलेल्या छोट्या छोट्या घंटा किंवा घुंगरांचा त्याच्या लयबद्ध हलचालींसोबत होणारा मधुर नाद मीराबाईच्या मनाला मोहवून टाकत आहे. तर

नुपूर सबत रसाई - पायातील वाळे, नुपूर त्याच्या इकडे तिकडे धावण्या पळण्या सोबत मधुर, अत्यंत रसाळपणे किणकिणाट करत आहेत. सबत म्हणजे शब्द. जणु काही रसाळपणे ह्या कान्ह्यासोबत बोलतच आहेत.

मीरा प्रभु संतन सुख दाई - संतांना सतत सौख्य देणारा हा आनंदकंद असा मीरेचा स्वामी, सर्वगुणसम्पन्न, बलशाली अत्यंत उत्तम शासक म्हणजेच प्रभु आहे. प्रभु हे विशेषण जो सम्राटांचा सम्राट किंवा देवांचा देव आहे किंवा जो लोकांच्या मनावर सत्ता गाजवतो त्यांच्यासाठीच वापरलं जातं. श्री विष्णु आणि श्री सांबसदाशिव शंकर किंवा त्यांच्या स्वरूप असल्याने प्रभुरामचंद्र किंवा मीराके प्रभु गिरीधर नागर असे खरे दोनच प्रभु. प्रेषित हे ईश्वराची/प्रभुची लेकरे असू शकतात पण प्रभु नव्हे.

भड वच गोपाल गोपाल गोपाल

भड हा संस्कृत भण् ह्या क्रियापदाचा अपभ्रंश आहे. भण म्हणजे बोलणे. हे माझ्या वाचे, हे माझ्या जिह्वे त्रिवार सांगते, तिन्ही त्रिकाळ तू एकच जप कर गोपाल ---गोपाल --- गोपाल.

खरी मेख इथेच आहे. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिये.  गाय रानावनात चरत असतांना हिरवीगार कुरणे पाहून हरखून जाते. मग तिला चरतांना भान रहात नाही. गुराखी म्हणजेच गोपालक तिची सतत काळजी घेत असतो. त्याच्या मुरलीच्या आवाजाच्या टापूत गायीगुरे निःशङ्क चरत राहतात. गायी योग्य जागी चरतील, चरतांना पाय घसरून दरीत कोसळणार नाहीत, कुठे वेली, काट्याकुट्यात अडकणार नाहीत, वाट चुकणार नाहीत, आडवाटेनी जाऊन वाघाची शिकार होणार नाहीत ह्याकडे गोपाल सजगपणे, सतर्कपणे लक्ष ठेऊन असतो. अचानक वाघरू आलं तर  तो हातातल्या काठीने  वाघावर धावून जायलाही कमी करत नाही. कधी कधी न ऐकणार्‍या गायीला वठणीवर आणायला काठीचा सौम्य तडाखाही आवश्यक असतो. त्यामागे थोडासा धाक दाखवून गायीला सुधारण्याचाच प्रयत्न असतो.

जसा हा मुरलीधर माधव गायीगुरे राखणारा उत्तम गोपाल आहे त्याप्रमाणे गो म्हणजे सर्व इंद्रियांवर अंकुश ठेवणारा आहे. इंद्रियांच्या स्वैराचारावर नियंत्रण ठेवणारा आहे. तो जर सतत नजरेसमोर असेल (बसो मेरे नैनन में नंदलाल) तर इंद्रियांची काय हिम्मत आहे इकडे तिकडे स्वैर वागण्याची!

आपण जे जे चांगलं वागत असतो त्या त्या चांगलं वागण्याची खिल्ली उडवायला अनेकजण टपून बसलेलेच असतात. अभ्यासू विद्यार्थ्याला ते कुथू , KTP (keen type) ठरवतात, कोणी व्यायाम करत असेल तर सर्वांच्या देखत अरे हा मोठा विराट कोहली किंवा सिंधु होणार आहे म्हणून टिंगल टवाळी करतात. जो जंक फूड हादडत नसेल त्याला `खाण्याचीही मजा घ्यायची नसेल तर असलं मिळमिळीत आयुष्य जगायचं तरी कशाला' म्हणून स्वैर चरणार्‍यांच्या गटातून odd man out  ठरवतात. खरतर अशा लेच्यापेच्या विचारांचं आयुष्य मिळमिळीत असतं. सर्व वेळेला नजरेसमोर असलेला विवेकरूप नंदलाला दरीत कोसळण्यापासून भक्ताचं रक्षण करत असतो. इंद्रियांवर मिळवलेल्या विजयानंतर लाभणार्‍या परमोच्च आनंदाची अनुभूती देतो. नको त्या गोष्टींमधे जेथे जेथे लोकांना भरमसाठ आसक्ती असते, जास्तच जागरूकपणा असतो तेथे तेथे नजरेतच विवेक रूपाने राहणारा गोपाल भक्ताला पहिल्यांदा संयम शिकवतो. कदाचित एखादी लाठी बसली तरी ती हितासाठी आहे हे कळलं की नेमकी रुची कोठे घ्यायला पाहिजे हेही लक्षात येतं. अशा अत्यंत हितकारक गोष्टींमधे बहुतेकांना अजिबात रुची नसते.  या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः संयम शिकवणार्‍या ह्याच हिताच्या वाटा यशोमंदिरापर्यंत पोचविणार्‍या असतात.

विवेकरूपाने हृदयस्थ राहणारा हा गोपाल नुसते वैयक्तिक हित नाही तर राष्ट्रहितासाठीही प्रेरित करणारा असतो. आणि असलाच पाहिजे. राष्ट्रहितासाठी पुढे सरसावतांना आपले योग्य विचार (मिडीया कितीही गोंधळ घालत असली तरी  सर्व घटनांचा, बदलांचा अभ्यास करून) न कचरता मांडलेच पाहिजेत. कुठल्याही दबावाने न नमता , न मोडता योग्य वाटेवर चाललेच पाहिजे ह्या साठी हा गोपाल धैर्य देणारा असतो. माझ्या जिह्वे तू गोपाल गोपाल गोपाल म्हणून माझ्या हृदयस्थ भगवंताला जागृत ठेव. हा सत्यस्वरूप गोपाल हेच खरे वाचेचे भूषण आहे. `हस्तस्य भूषणं दानं । सत्यं कण्ठस्य भूषणं ।' गोपाल नाम रस हा अमृताप्रमाणे मधुर आहे. पण हे जिह्वे अलंकार कितीही सुंदर असले तरी ते योग्य प्रकारे घालायलाही लागतात. सर्व अलंकारांची एक पोटली बांधून ती गळ्यात अडकवून कशी बरं शोभा येईल? लहान बालकाला अन्न सुग्रास असलं तरी छोटे छोटे घास करून भरवायला लागतं. त्याच्या समोर पंचपक्वान्न नुसतीच ठेऊन काय उपयोग? म्हणून हे जिह्वे इंद्रियांना योग्य चालना देणारा, त्यांच्यावर संयमरूपी अंकुश ठेवणारा विवेकरूपी गोपाल जोपर्यंत नेत्रात कायमचा रहायला येत नाही तोपर्यंत गोपाल गोपाल गोपाल असं हृदयस्थ भगवंताचं नामस्मरण करत रहा.

-----------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -